हिंदुस्थानी संगीतातील प्रख्यात कलावंत वीणा सहस्रबुद्धे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचा गाढ संगीताभ्यास आणि गायकीवर टाकलेला हा साक्षेपी दृष्टिक्षेप..
वीणाताईंचा जन्म झाला तेव्हा भारत नावाच्या देशानेही नव्याने जन्म घेतला होता. राष्ट्र म्हणून उभारणीची अनेक पातळ्यांवरील स्वप्ने पाहणाऱ्यांना या देशात अस्तित्वात असलेल्या अनेक शतकांच्या कलांच्या इतिहासाची नक्कीच कल्पना होती. नव्या देशाच्या उभारणीत समांतरपणे वीणा सहस्रबुद्धे या अभिजात कलावंताने आपलीही कला बदलत नेली आणि काळाबरोबर राहून या कलेच्या संपन्न वारशात भर टाकली. असाध्य रोगाने पछाडले नसते तर वीणाताईंचे गाणे या वयात अधिक खोल आणि अधिक टवटवीत झाले असते यात शंकाच नाही. परंपरा आणि नवता यांचा एक अतिशय सुरेख संगम वीणाताईंनी आपल्या गायनात स्थापित केला आणि भारतीय अभिजात संगीताच्या परंपरेचा पहिला दुवा मानल्या गेलेल्या ग्वाल्हेर घराण्याची पताका एकविसाव्या शतकातही फडकवत ठेवली. कलेच्या क्षेत्रात कलावंताला आपल्या कलेचे भान येण्यास पुरेसा अवधी मिळावा लागतो. वय वाढते तशी कलेची समजही बदलत जाते आणि आपल्याच कलेकडे अधिक तटस्थपणे पाहण्याची प्रवृत्ती आपोआपच निर्माण होते. स्वत:च्या सर्जनाची ताकदही कळून येते आणि त्यामुळे सादरीकरणातही महत्त्वाचे बदल घडून येतात. भारतातील सगळ्याच कलावंतांच्या बाबतीत सहसा हाच अनुभव आलेला आहे. त्यामुळेच वयाच्या अडुसष्टाव्या वर्षांत वीणाताई गात्या राहिल्या असत्या तर त्यांचे गाणे अधिकतेने सुंदर झाले असते. काळाला मात्र ते मान्य नव्हते.
ज्या घरात वीणाताईंचा जन्म झाला, ते बोडस यांचे कुटुंब संगीतात चिंब भिजलेले होते. इतिहासाची पाने चाळली तर शंकरराव बोडस- म्हणजे वीणाताईंचे वडील- यांनी संगीताच्या क्षेत्रात जे प्रचंड काम करून ठेवले आहे, त्याचा संदर्भ लागतो. भारतीय संगीतावर गेल्या काही शतकांत झालेल्या अनेकविध आक्रमणांना झेलत ते टिकून राहू शकले याची जी अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक अतिशय महत्त्वाचे कारण म्हणजे- ते संगीत टिकून राहण्यासाठी शंकरराव बोडस यांच्यासारख्या अनेकांनी घेतलेले अथक परिश्रम आहेत. महाराष्ट्रात संगीताची ही गंगा ग्वाल्हेरहून आणून लोकप्रिय करण्याचे कार्य करणाऱ्या बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे ज्येष्ठ शिष्य विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी आपल्या गुरूचे केवळ गाणेच आत्मसात केले नाही, तर ते देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी एका मोठय़ा चळवळीचीच उभारणी केली. विष्णू दिगंबर पलुस्कर हे नाव भारतीय संगीताच्या क्षेत्रात अपरिहार्यपणे सोनेरी अक्षरात लिहिले जाते, याचे कारण त्यांनी संगीताच्या प्रसाराचे महान कार्य हाती घेतले. त्यांचे शिष्य असलेल्या त्या काळातील अनेकांनी त्यांना या कामी साथ दिली आणि स्वरांचा हा यज्ञ सर्वदूर पोहोचवला. लक्ष्मणराव बोडस, शंकरराव बोडस, वामन हणमंत पाध्ये, नारायणराव खरे, शंकरराव व्यास, विनायकबुवा पटवर्धन, व्ही. ए. कशाळकर यांच्यासारख्या अनेक शिष्योत्तमांनी विष्णू दिगंबरांच्या कार्यात स्वत:ला संपूर्णपणे झोकून दिले आणि देशाच्या अनेक प्रांतांत जाऊन गांधर्व महाविद्यालय या संगीत प्रसाराच्या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. पाकिस्तानची राजधानी असलेल्या कराचीमध्ये आजही शहराच्या मध्यवर्ती भागात ‘गांधर्व महाविद्यालय’ अशी पाटी दिसते. लक्ष्मणराव बोडस यांनी स्थापन केलेली ही संस्था आज किमान फलकरूपात तरी तिथे जिवंत आहे.
वीणाताईंचे वडील हे या परंपरेचे पाईक. कानपूर येथे त्यांनी शंकर संगीत विद्यालय सुरू केले आणि तेथूनच आपल्या कलेच्या प्रसारास प्रारंभ केला. एखाद्या मराठी आडनावाच्या व्यक्तीने संगीतगंगेच्या उगमस्थानी जाऊन आपला ठसा उमटवणे, याला केवढे तरी महत्त्व असायला हवे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर ही संगीताची गंगोत्री. कानपूर येथे शंकरराव बोडस यांनी संगीताच्या विद्यादानाचे काम सुरू ठेवले. वीणाताईंच्या पाठीशी असा अतिशय उत्तुंग परंपरेचा इतिहास आहे. या परंपरेचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे भारतीय परंपरेतील स्त्रीमुक्तीची सुरुवात येथून झाली. ज्या संस्कृतीमध्ये महिलांना गाणे ऐकण्याचीही परवानगी नव्हती, तेथे एका स्त्री-कलावंताला भर मैफलीत आणून कला सादर करायला सांगणे ही मोठीच क्रांती होती. विष्णू दिगंबरांनी ती करून दाखवली. किराणा घराण्याच्या असामान्य कलावंत हिराबाई बडोदेकर यांच्या रूपाने ही क्रांती विसाव्या शतकाच्या आरंभीच घडून आली आणि संगीताच्या भरदार आणि भरजरी दरबारात एका शालीन आणि अभिजात गायनाने प्रवेश केला. वीणाताईंचा जन्म झाला तेव्हा संगीताच्या क्षेत्रात महिलांनी आपले स्थान पक्के केलेले होते.
वीणा सहस्रबुद्धे यांचे शिक्षण वडिलांकडे होणे स्वाभाविक होते. पण त्यांनी त्या शिक्षणाकडे डोळसपणे पाहिल्यामुळे त्यांच्या कलेमध्ये महत्त्वाचे बदल घडून आले. हिंदीभाषक प्रांतात त्याकाळी संगीताचा मोठा बोलबाला होता. श्रोते आणि कलावंत यांचे एक वेगळे नाते तयार झाले होते. उस्तादी ढंगाबरोबरच पंडिती परंपरेलाही मान्यता मिळत होती आणि संगीतात सूक्ष्म बदल घडत होते. वीणाताईंच्या संगीत अध्ययनात या सगळ्या घडामोडींचा नकळत झालेला असर त्यांच्या संगीतात स्पष्टपणे दिसू शकतो. घरातच संगीत विद्यालय असले तरीही केवळ गाणेच शिकायचे, या कल्पनेला थारा न देता वीणाताईंनी उच्च शिक्षणापर्यंत मजल मारली आणि त्यातून आपल्या कलेकडेही तटस्थपणे पाहण्याची वृत्ती स्वीकारली. ‘माझ्या संगीताची मीच समीक्षक असते,’ असे त्या म्हणत. संगीतातील घराणेदार गायकीच्या परंपरेत घडत असतानाही गाण्याच्या अन्य अलंकारांकडे त्यांची नजर होती. सौंदर्य ही कल्पना स्वरांमधून समोर आणणे ही सर्वात अवघड गोष्ट. वीणाताईंनी त्यासाठी अपार मेहनत घेतली आणि आपले गायन कसदार आणि सौंदर्यपूर्ण केले. आलापीतील भावदर्शन हे त्यांच्या कलेचे मर्म. स्वराच्या लगावापासून ते रागाच्या मांडणीपर्यंत प्रत्येक अंशात सौंदर्य कसे भरून राहील याचा त्यापूर्वी झालेला विचार वीणाताईंनी आत्मसात केला. ग्वाल्हेरचा तोरा मिरवत असतानाच जयपूर आणि किराणा घराण्याच्या शैलीतील सौंदर्यस्थळे त्यांना न खुणावती तरच नवल. त्यांचा आपल्या कलेत मोठय़ा खुबीने समावेश करत आपले गायन त्यांनी सतत प्रवाही ठेवले. सौंदर्याचा हा ध्यास संगीताच्या आरंभापासूनच असल्याने ते आजवर टिकून राहिले. त्यातील बारकावे समजून घेत, त्यांना अधिक अर्थपूर्ण करण्याची क्षमता प्रत्येक कलावंत अजमावून पाहत आल्यानेही हे घडू शकले. वीणाताईंनी आपली कला केवळ रसिकसापेक्ष न ठेवता त्याला सौंदर्याची डूब दिली आणि त्यामुळेच देशभरातील सगळ्या संगीत सभांमध्ये त्यांच्या गायनाची कायम वाहवा झाली.
संगीताकडे स्वतंत्र दृष्टीने पाहण्याची त्यांची शैली केवळ ग्रंथात्मक नव्हती. प्रत्यक्ष सादरीकरणात ती स्पष्टपणे दिसणे यालाच शेवटी महत्त्व असते याची त्यांना पुरेपूर जाण होती. म्हणून प्रत्येक मैफल हीच आपली परीक्षा हे ध्यानी ठेवून केलेल्या अभ्यासाचे सुंदरतेने दर्शन घडविण्यावर त्यांचा भर राहिला. संगीताबद्दल त्यांनी केलेले ग्रंथात्मक लेखनही याची साक्ष ठरते. आलापीपासून ते तानांपर्यंतच्या सगळ्या संगीतालंकारांवर प्रभुत्व असतानाही कशाचा, किती प्रमाणात उपयोग करायचा, हे ज्या कलावंताला उमगते तो रसिकांची नाडी बरोबर ओळखू शकतो. वीणाताईंना ही नाडी समजली होती. म्हणूनच संगीताकडे अभ्यासू नजरेने पाहताना त्यातील नाजूक सौंदर्याची जाण त्यांच्या ठायी रुजली. आपले गाणे नुसते आवडले पाहिजे, यापेक्षाही त्यातून प्रत्येक वेळी काही नवे हाती लागले पाहिजे, यावर भर देणाऱ्या निवडक कलावंतांमध्ये वीणा सहस्रबुद्धे यांचे नाव त्यामुळेच घ्यावे लागते. स्वातंत्र्योत्तर काळातील संगीताच्या बदलत्या आवडीनिवडींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अशा कलावंताचे निधन ही म्हणूनच केवळ क्लेशदायक घटना राहत नाही, तर संगीतासाठीची ती हानीही ठरते.
मुकुंद संगोराम mukund.sangoram@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा