प्राचीन वाङ्मय, लोकसाहित्य तसेच संतसाहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या मूलगामी संशोधन-अभ्यासाची पाळेमुळे उलगडून दाखविणारा लेख..
डॉ. रा. चिं. ढेरे गेले!! भल्या पहाटे चंद्रपूरची कवयित्री प्रा. माधवी भट ताईचा मेसेज आला- ‘अण्णा गेले रे, हेमंता..!’ पाठोपाठ काही मित्रांचे व्हॉटस्अ‍ॅपवर मेसेज आले. आणि तत्क्षणी डोळ्यांत अश्रू तरळले. अगदी सात-आठ दिवसांपूर्वीच जर्मनीतल्या एरफुर्ट विद्यापीठात आयोजित केलेल्या एका परिसंवादामध्ये अमेरिकेतील आणि युरोपातील काही मोजक्या अभ्यासक मंडळींसोबत सहभागी होण्याची संधी मिळाली होती. तिथे एका निबंधावर चर्चा करताना- ‘‘ढेरेंच्या अमुक निबंधामध्ये अमुक संदर्भात त्यांनी मांडलेला हा दृष्टिकोन किती नेमका आणि चपखल आहे! तो संदर्भ अवश्य बघायला हवा..’’ असं वॉशिंग्टन विद्यापीठातील प्रा. ख्रिश्चन नोव्हेत्झ्के यांनी आवर्जून नमूद केलं होतं. ज्यांना मी माझे अभ्यास क्षेत्रातले गुरू, प्रेरणास्थान वगैरे मानत आलो त्या डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांचा असा गौरवपूर्ण उल्लेख झाल्यामुळे मी मनोमन सुखावून गेलो. नंतरच्या अनौपचारिक गप्पांतही डॉ. ढेरे आणि अरुणाताईंचा विषय निघाला. त्याआधी दोन-चार दिवसांपूर्वीच अरुणाताईंशी फोनवर संवाद झाला असता पुढील काही योजनांची माहिती सांगताना ‘अण्णा आजारी आहेत, वयोमानानुसार थकले आहेत..’ असे त्या सांगत होत्या. अशा थकलेल्या अवस्थेतही त्यांच्या डोक्यात अभ्यासाचा विचार आणि नवीन संशोधनपर कल्पनाच तरळत असणार याविषयी माझ्या मनात तीळमात्र शंका नव्हती.
डॉ. ढेरेंना प्रत्यक्ष भेटण्याचा योग कधीच आला नाही. जर्मनीत यायच्या कितीतरी आधी- पुण्यात असताना २००४ साली भांडारकर संस्थेच्या रा. ना. दांडेकर वाचनालयात ढेरेंच्या साहित्याशी, व्यासंगाशी माझी घनिष्ठ ओळख झाली. पुढे तेथील ग्रंथपाल सतीश सांगळे यांच्याकडून त्यांचा फोन नंबर मिळवला. पण ते स्वत: सतत कार्यमग्न असल्याने कधीच कॉल रिसीव्ह करत नसत. एकदा काहीतरी गंभीर अभ्यासकीय कारण सांगून त्यांना फोनवर बोलण्यासाठी भाग पाडण्यात मी यश मिळवले. पण ते फोनवर विशेष बोलले नाहीत. ‘‘माझे ग्रंथ वाचनासाठी, विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तुम्ही त्यावर काही भाष्य करायचे असल्यास निश्चित करा. त्यातून काही नवीन माहिती, मुद्दा समोर आला तर चर्चा होईलच..’’ असं त्यांनी सांगितलं. पण विशीत प्रवेश होऊ घातलेल्या वयात मी तो विषय फार गांभीर्याने तेव्हा पुढे नेला नाही. भांडारकर संस्थेचेच माजी ग्रंथपाल वा. ल. मंजूळ यांच्यामार्फत डॉ. ढेरे यांना भेटण्यासाठी काही प्रयत्न केले. पण बहुधा प्रत्यक्ष भेटण्याचा योग कधी जुळून यायचाच नव्हता. मात्र, कधीही प्रत्यक्ष न भेट होता अथवा कधीही चर्चा न करता या थोर अभ्यासकाने पदरात टाकलेले माप आयुष्यभर ऋणाईत ठेवणारे आहे.
पुणे विद्यापीठाच्या संस्कृत-प्राकृत भाषा विभागात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यावर धर्म व धर्मविषयक जाणिवांसंदर्भात अधिक संशोधन करण्याची प्रेरणा मला (आणि माझ्यासारख्या अनेकांना) डॉ. ढेरे यांच्या संशोधनातून, साहित्यातूनच मिळालेली आहे. ही प्रेरणा मिळाली म्हणजे नेमकं काय मिळालं, हा विचार मी ही दु:खद बातमी मिळाल्यापासून करतो आहे. त्याचं उत्तर संपूर्णतया देता येणं अवघड आहे. मला वाटतं, महाराष्ट्र, महाराष्ट्रीय सांस्कृतिक-सामाजिक इतिहास हा ढेरे यांचा केवळ ध्यास नव्हता, तर ज्ञानेश्वर माऊलींच्या ‘श्वासोश्वासही प्रबंध होआवे’ या उक्तीनुसार त्यांचा ध्यास हा त्यांचा श्वास झाला आणि ती नि:श्वसिते प्रबंध होऊन मराठी शारदेच्या दरबारात प्रकटली. अनेकदा असा ध्यास हा काहीसा कल्पनारम्यतेत- रोमँटिक स्वरूपात अभिव्यक्त होतो आणि विषयाची वस्तुनिष्ठता लयाला जाते. मग लेखनविषयाला किंवा खुद्द लेखकालाच दैवतीकरणाचा संसर्ग होतो, हे मराठीतील अनेक नामवंत इतिहास-संस्कृतीच्या अभ्यासकांच्या/ लेखकांच्या बाबतीत झाल्याचे दिसून येते. मात्र, ‘देवताविज्ञाना’सारख्या अतिशय संवेदनशील विषयाची ओळख भारतासारख्या धार्मिक-सांस्कृतिक जाणिवांविषयी आत्यंतिक संवेदनशील अशा समाजाला नव्यानेच करून देताना अण्णांनी ती खबरदारी कसोशीने घेतली. अण्णांच्या भाषेचे वैशिष्टय़च हे, की ते वेदकाळापासून ते महानुभावांपर्यंत आणि गुरुचरित्रापासून ते २० व्या शतकातील एखाद्या संतपरंपरेपर्यंतच्या विशाल इतिहासपटलाविषयी उपलब्ध झालेल्या संदर्भाची आणि पुराव्यांची अतिशय काटेकोर आणि कठोर चिकित्सा करूनदेखील ती चिकित्सा एखाद्या खुल्या मनाच्या भाविक भक्ताच्या गळीही ते सहजपणे उतरवतात. ‘श्रीनृसिंह सरस्वती : चरित्र व परंपरा’ या अण्णांच्या चिकित्सक संशोधनपर ग्रंथाचा पारंपरिक विचाराचे लेखक विष्णू केशव पाळेकर तथा अप्रबुद्ध यांनी पारंपरिक दृष्टिकोनातून प्रतिवाद केला होता. पुढे अण्णांनी आपल्या ‘दत्त- संप्रदायाचा इतिहास’ या गाजलेल्या पुस्तकात अप्रबुद्ध यांच्या लिखाणाची दखल घेत अतिशय संयतपणे तथ्ये मांडून, परंपरेविरुद्ध कोणताही कडवट अभिनिवेश न दाखवता त्यांच्या मुद्दय़ांची चिकित्सा केल्याचे दिसून येते. आपल्याच ग्रंथाची नवीन आवृत्ती प्रकाशित करत असताना इतर जुन्या आणि नवोदित अभ्यासकांची व त्यांच्या कार्याची ससंदर्भ परिचय करून देत अण्णा त्या अभ्यासकांना प्रोत्साहन देतच; शिवाय विद्यार्थी-वाचकांच्या मनातही संबंधित विषयासंदर्भात कुतूहल जागृत करतात. सोलापूरचे आनंद कुंभार असोत की दा. ध. कोसंबी असोत, पुणे विद्यापीठाच्या संस्कृत विभागातले निवृत्त ग्रंथपाल व ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रा. प. गोस्वामी सर असोत की दि. के. बेडेकर असोत, किंवा कुणी विदेशी विद्यापीठातला नवखा किंवा फेल्डहाऊस बाईंसारखा अनुभवी, ज्येष्ठ संशोधक असो; या जुन्या-नव्या अभ्यासकांच्या आणि विचारवंतांच्या संशोधनाचा नेमका संदर्भ देऊन अण्णा तो संदर्भ शोधायला प्रवृत्त करतात. यानिमित्ताने वाचकाला त्या अभ्यासकाचे लिखाण वाचायची प्रबळ इच्छा होते. अनेकदा त्या अभ्यासकांशी पत्रव्यवहार किंवा भेटीद्वारे प्रत्यक्ष परिचयही करून घेता येतो.
अनेकदा काही अश्लील संदर्भ किंवा काही अतिशय संवेदनशील विषयांवरील तपशील अण्णा आपल्या अमोघ शब्दप्रभुत्वाच्या व नेमक्या आणि प्रभावी मांडणीच्या आधारे वाचकाला मान्य करावयास भाग पाडतात. उदाहरण द्यायचे झाल्यास आजच्या काळातल्या अधिक प्रखर आणि जास्तच कचकडय़ा झालेल्या धार्मिक संवेदनांच्या काळात डॉ. ढेरेंचा ‘मुसलमान मराठी संत-कवी’ हा ग्रंथ मला अतिशय महत्त्वाचा वाटतो. या ग्रंथातून डॉ. ढेरे भारतीय श्रद्धाविश्वातील सामायिक श्रद्धाविश्वाची (shared faiths) ओळख वाचकांना करून देतात. या ‘मिश्र-श्रद्धा’ विकसित होताना झालेल्या काही राजकीय घडामोडी, दडपशाही यांची काटेकोर चिकित्सा ढेरे करतातच; पण हे भडक संदर्भ काळाच्या ओघात समाजातील सरमिसळीद्वारे कसे फिकट होत जातात, हेदेखील ते वाचकाला पटवून देतात. सोबतच मराठी समाजाच्या बहुरंगी, बहुतरंगी होत जाणाऱ्या इतिहासाचा पट समजून घेताना समतेचा, सहिष्णुतेचा आणि मानव्याचा आगळा बोधही वाचकास मिळालेला असतो. भारतासारख्या पुरुषप्रधान व्यवस्थेत मुरलेल्या देशात स्त्रीप्रश्नांविषयीची, लैंगिक संकेतांविषयीची मते अण्णांनी ‘लज्जागौरी’सारख्या अद्वितीय ग्रंथातून किंवा ‘अंकुशपुराण : लोकतत्त्वीय समीक्षा’, ‘शिवी आणि समाजेतिहास’ वगैरेंसारख्या चिकित्सापूर्ण लेखांतून अतिशय संयतपणे मांडली. किंबहुना, अण्णांनी केवळ अशी मते केवळ मांडली नाही, तर आपल्या अनोख्या शब्दकळेच्या जोरावर दैनंदिन आयुष्यात गढून गेलेल्या सामान्य वाचकांच्या मनातही आधुनिकता आणि संशोधकीय दृष्टी रुजवली.
मात्र, हे करताना त्यांनी आपल्या लेखणीला कुठेही कडवट अभिनिवेश आणि आक्रस्ताळेपणाचा स्पर्श होऊ दिला नाही. माझ्या मते, यामागचे कारण म्हणजे त्यांच्या मनाला गवसलेले संतत्वाचे मर्म आणि अखंड भ्रमंती आणि निरीक्षणाद्वारे त्यांना सापडलेली महाराष्ट्रीय समाजाची नेमकी नस. अण्णांना मराठी समाजाचे मन अचूक समजले होते. काही वर्षांपूर्वी कोणतासा पुरस्कार घेताना तत्कालीन मंत्रिमहोदयांनी (बहुधा विलासराव देशमुख यांनी) ‘संत-साहित्याचा अभ्यास करता करता ढेरे स्वत:च संतत्वाला पोहोचले आहेत,’ असे उद्गार काढले होते. अण्णांच्या लिखाणाला संतत्वाचा स्पर्श झाल्याचे त्यांच्या संतसाहित्यावरील संशोधनाने दिसून येत असले तरी अण्णांचे संतत्व हे भाबडय़ा नामघोषात अडकून पडणारे नव्हते. त्याला माऊलीच्या रसाळतेसोबत आणि तुकोबांच्या सडेतोडपणाबरोबरच आधुनिकोत्तर समाजातील धारणांची आणि संवेदनांची कालोचित जोड मिळाली होती. सोवळ्याओवळ्या धर्माच्या कालबातेवर आणि संकुचिततेवर अण्णांनी आपल्या लिखाणातून चिकित्सापूर्ण भाष्य केलेच; पण धर्माधिष्ठित राजकारणाविषयीची निर्थकता आणि त्यातला दांभिकपणादेखील अण्णांनी आपल्या ससंदर्भ भाष्याद्वारे उघडा पाडला. त्यामुळेच एखाद्या विद्यापीठीय शिस्तीत संशोधन करणाऱ्या देशी अगर विदेशी अभ्यासकालाही त्यांचे लिखाण वाचून साक्षात्कार झालेल्या योग्याला मिळावे तसे समाधान मिळते आणि आजच्या आधुनिकोत्तर काळात वावरणाऱ्या भाबडय़ा, धर्मश्रद्ध माणसाच्या मनातल्या परंपरेविषयीच्या जाणिवांना कालौचित्याचे व औचित्यपूर्णतेचे भान येते.
अण्णांच्या संशोधन-चिकित्सेसोबतच त्यांचे शब्दप्रभुत्वदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक शिलालेख, ताम्रपट, दानपत्रे वाचण्यासाठी अनेक लिपी, भाषा, ऐतिहासिक संदर्भ, सामाजिक रीतींचे संदर्भ अण्णांनी लोकगीतांतून, ओव्यांतून, संत-पंतसाहित्यातून बालपणापासून वेचले होते. मात्र, केवळ मौखिक पांडित्य दाखवून पैसे कमावणाऱ्या तोंडपुज्या पंडिताप्रमाणे किंवा प्रवचनकाराप्रमाणे जीवनयापन करण्याचा मार्ग पुण्यासारख्या शहरात सहज उपलब्ध असूनही अण्णा केवळ आपल्या संशोधकीय ध्यासामागे चालत राहिले. अण्णा आजारपणाने ग्रासलेल्या विकल अवस्थेतही काही नोट्स डिक्टेट करत राहिले.. या आजारपणातही त्यांची काही पुस्तके प्रकाशित झाली. या ग्रंथांत नेहमीच्या शैलीची आणि मांडणीची खुमारी नसली, तरीही अण्णांनी त्यातील संदर्भाद्वारे आणि संशोधनाद्वारे एक मोठं संचित नव्या अभ्यासकांपुढे खुले केले आहे. अण्णांचा हा वारसा पुण्यात, महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर आणि देशाबाहेरही सांभाळणारे अनेक अभ्यासक निश्चितच चालवतील याविषयी शंका नाही. कारण अण्णांनी आपल्या लिखाणातून नवख्या विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रकारची संशोधकीय अस्वस्थता आणि जिज्ञासा निर्माण केली आहे! ती अस्वस्थता आणि जिज्ञासा अण्णांचे स्मृतिरूप चैतन्य बनून सर्व अभ्यासकांना दिशा दाखवीत राहील, अभ्यासकांच्या कुळाची व्याप्ती वाढती राहण्यास साहाय्यभूत ठरेल.
आता अण्णा गेले आहेत. एखाद्या व्रतस्थ योगीराजाप्रमाणे शेवटपर्यंत संशोधनकार्यात निमग्न राहून आळंदीतील माऊलीच्या वारीसोबतच अण्णांनी प्रस्थान ठेवले. या नि:स्पृह अभ्यासकाची शासनदरबारी झालेली उपेक्षा अनेक अभ्यासकांना आणि चाहत्यांना सलत असली तरी अण्णा आणि त्यांचे कार्य कोणत्याही ज्ञानपीठाहून, महाराष्ट्रभूषण किंवा पद्म्विभूषणादी पुरस्कारांहून शतपटीने मौल्यवान आहे, ही जाणीव जाणत्यांना नक्कीच आहे. म्हणूनच अण्णा गेल्यावर आता अभ्यासकांची जबाबदारी अधिक वाढली आहे. अमेरिकेतील शिकागो विद्यापीठाने त्यांचा ग्रंथसंग्रह आणि हस्तलिखितसंग्रह पुण्यातच योग्य प्रकारे जपण्याचे कार्य हाती घेतलेले आहे. मात्र, अण्णांचे लिखाण मराठीमध्येच असल्याने ते अमराठी भारतीयांना आणि विदेशातील अभ्यासकांना वाचनासाठी उपलब्ध नाही. मध्यंतरी प्रा. अ‍ॅन फेल्डहाऊस यांनी ‘श्रीविठ्ठल : एक महासमन्वय’ या त्यांच्या गाजलेल्या ग्रंथाचा इंग्रजीत अनुवाद केला आहे. मात्र, अण्णांचे इतर साहित्यदेखील इंग्रजी व अन्य भारतीय भाषांत अनुवादणे आवश्यक आहे. अण्णांच्या व्रतस्थ, अभ्यासमय जीवनात राहून गेलेले हे कार्य पुढे आणून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर उचित सन्मान मिळवून देणे आणि त्यांच्या अनमोल संशोधनकार्याचा व लिखाणाचा लाभ देशातील व विदेशातील शेकडो, हजारो अभ्यासकांना करून देणे ही खरोखरीच काळाची गरज आहे.
देवाधर्माच्या नावाखाली सतत ऐकू येणाऱ्या भडक, आक्रस्ताळ्या किंचाळ्या, तेल-तूप-साबण विकणारे आणि मांगल्याचा, पावित्र्याचा बाजार मांडणारे ओंगळवाणे गुरू आणि योगसम्राट, वेगळा विचार मांडणाऱ्यांच्या विरुद्धच्या द्वेषयुक्त चिथावण्या आणि प्रसंगी पडणारे मुडदे, पुरावे-मांडणीच्या नावे प्रसृत होणारी सोयीस्कर संभाषिते (rhetorics) व सिद्धान्त, आपापल्या नेत्यांची आणि आदर्शाची चिकित्सा सहन न करू शकणाऱ्या मनांची वाढती संख्या, हरवत चाललेला संयम अशा वैशिष्टय़ांनी अधिक भयप्रद वाटणाऱ्या आजच्या या काळात अण्णांचे- डॉ. रा. चिं. ढेरे यांचे संयत चिकित्साकौशल्य आणि त्यांची मांडणीची सहज शैली अधिकाधिक औचित्यपूर्ण व आवश्यक ठरत जाईल आणि डॉ. रा. चिं. ढेरे हे नाव येणाऱ्या अनेक शतकांत अभ्यासकांसाठी प्रेरक आणि स्फूर्तिदायक ठरेल याविषयी माझ्या मनात शंका नाही!
हेमंत प्रकाश राजोपाध्ये
(लेखक जर्मनीतील ग्योटिंगेन विद्यापीठात पीएचडी संशोधक आहे.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा