निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या आगामी चित्रपटात राणी पद्मावतीच्या कथित बदनामीकारक चित्रणास आक्षेप घेऊन राजपुतांच्या कर्णी-सेना या संघटनेने त्यांना धक्काबुक्की केल्याची घटना नुकतीच घडली. प्रत्यक्षात राणी पद्मावतीची कथा व तिची लेखकानुरूप बदलत गेलेली विविध संस्करणे यांचा आढावा घेऊ जाता मात्र वेगळेच वास्तव समोर येते. त्याचा यानिमित्ताने घेतलेला परामर्ष..

गेल्या आठवडय़ात प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना त्यांच्या ‘पद्मावती’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सेटवर धक्काबुक्की झाल्याचे वृत्त पसरले. या बातमीपाठोपाठ संबंधित प्रसंगाची चलत्चित्रफीत इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि सोशल मीडियावरून व्हायरल झाली. ‘कर्णी-सेना’ या राजपूत समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका संघटनेतर्फे भन्साळींविरोधात निदर्शने केली जात असल्याचे सांगितले जात होते. त्याचे पर्यवसान या धक्काबुक्कीच्या प्रसंगात झाल्याचे माध्यमांवरील वृत्तांकनानुसार समजते. ऐतिहासिक चित्रपटासंबंधीच्या वादामुळे भन्साळी सलग दुसऱ्या वर्षी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडत असल्याने हा प्रसंग चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी खुद्द भन्साळींनीच घडवून आणला असावा असा कयासदेखील काही मंडळींनी मांडला आहे. या घटनेमागचे वास्तव काहीही असले तरीही यानिमित्ताने भारतीय समाजातील ऐतिहासिक पात्रे व घटनांविषयीची संवेदनशीलता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सहिष्णुता वगैरे विषय पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Woman with baby in babys belly gives birth safely
‘फिट्स इन फिटू’ : ‘त्या’ महिलेची प्रसूती सुखरूप! पोटातील बाळाची शस्त्रक्रिया…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
activists stage sit-in protest over removal of unauthorized statue of dr ambedkar
डॉ. आंबेडकरांचा विनापरवाना बसविलेला पुतळा हटवल्याने कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन
From fish to reptiles here are 5 that can change their gender
निसर्गाची किमया न्यारी! माशांपासून सरपटणाऱ्या प्राण्यांपर्यंत, हे पाच प्राणी करू शकतात लिंग परिवर्तन, कसे ते जाणून घ्या?
death of pregnant woman and newborn after surgery under mobile light
मोबाइलच्या प्रकाशात शस्त्रक्रियेनंतर गर्भवती व नवजात बालकाच्या मृत्युचे प्रकरण : महापालिकेच्या सर्व प्रसूतीगृहांची पाहणी होणार
buldhana after multiple checks woman had baby in her womb and another in baby s stomach
धक्कादायक! गर्भवतीच्या पोटात बाळ आणि… बाळाच्या पोटातही ‘बाळ ‘!! अतिदुर्मिळ प्रकार
Madras High Court judgment Maternity Leave Third Pregnancy
तिसर्‍या बाळंतपणाला मातृत्व रजा मिळेल का?
Baby Girl Sharing food with Dad
‘म्हणून लेकीला घरची लक्ष्मी म्हणतात…’ उपाशी बापासाठी चिमुकलीने केलं असं काही की… VIDEO पाहून डोळे पाणावतील

गेल्या वर्षी भन्साळींच्याच ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटासंबंधीदेखील असाच वाद निर्माण होऊन पुण्यात आणि अन्य ठिकाणी विविध ‘इतिहासप्रेमी’ संघटनांनी निदर्शने करून चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये अडथळे आणायचे प्रयत्न केले होते.  तेव्हा श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पात्राला नृत्य करताना दाखवल्याने आणि काशीबाई व मस्तानी यांच्यावर चित्रित झालेले नृत्यप्रधान गीत ट्रेलरमधून प्रदर्शित झाल्यावर अनेक ‘इतिहासप्रेमीं’च्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. यावेळी अल्लाउद्दीन खिलजीचे पात्र वठवणारा रणवीरसिंह आणि राणी पद्मावतीचे पात्र अभिनित करणारी दीपिका पदुकोण यांच्यावर काही प्रेमदृश्ये चित्रित झाल्याचे वृत्त ‘कर्णी-सेने’ला (बहुधा कर्णोपकर्णी) समजल्याचे संबंधित संघटनेतर्फे सांगण्यात आले. यासंबंधी इंटरनेटवर शोधाशोध केली असता संबंधित प्रेमदृश्य वास्तवात राजा रतनसिंह व पद्मावती यांच्यावर चित्रित होण्याचे शिजत होते असे समजले. मात्र, रतनसिंहाची भूमिका करणाऱ्या शाहिद कपूरच्या पत्नीच्या इच्छेखातर अशी दृश्ये टाळण्यात आल्याचे ‘इंडिया टुडे’ या व अन्य सिनेगप्पा रंगवणाऱ्या मासिकांच्या संकेतस्थळावर दिसून आले. ‘कर्णी-सेने’चे प्रवक्ते आणि सोशल मीडियावर संबंधित घटनेचा (भन्साळींना झालेली धक्काबुक्की) निषेध व समर्थन करणाऱ्या मंडळींना मात्र अल्लाउद्दीन खिलजी (रणवीरसिंह) आणि राणी पद्मावती यांच्यावर संबंधित दृश्य चित्रित केल्याचे वृत्त कुठून समजले, हे कळायला वाव नाही. बाकी, संजय लीला भन्साळी हे प्रदीर्घ काळ चित्रपटसृष्टीत सक्रीय असल्यामुळे त्यांना चित्रपटाची कथावस्तू प्रदर्शनापूर्वी उघड होऊ  न देण्याचे कसब एव्हाना नक्कीच साधले असणार, ही बाब सामान्य चित्रपट प्रेक्षकालाही सहज मान्य होऊ  शकते. त्यामुळे यासंबंधीचा वाद उद्भवण्यामागचा उद्देश केवळ सनसनाटी निर्माण करणे हा असल्याचे जाणवते. कर्णी-सेनेच्या या कृत्यानंतर पाठोपाठ मध्य प्रदेशातील सत्ताधारी पक्षाच्या एका स्थानिक नेत्याने भन्साळी यांना धक्काबुक्की करणाऱ्या व्यक्तीला दहा हजार रुपयांचे इनाम जाहीर केल्याची बातमीही लगेचच माध्यमांतून समजली! तेव्हा मात्र हा मुद्दा येत्या काळात राजपूत जातीय अस्मितेच्या भिंती ओलांडून धार्मिक अस्मितांच्या चौकटीत जाऊन पोहोचणार असल्याची शक्यता बळावल्याचे स्पष्ट झाले.

यानिमित्ताने पद्मावती हे पात्र व हा सिनेमा आजच्या काळात बनण्यामागचे औचित्य आणि त्याचे जातीय-धार्मिक अस्मितांच्या दृष्टीने स्थान इत्यादी विषयांवर भाष्य करणे क्रमप्राप्त ठरते. पद्मावती राणीचा पहिला संदर्भ अल्लाउद्दीन खिलजीच्या मृत्यूनंतर जवळपास दोन शतकांनंतर जन्मलेल्या मलिक महंमद जायसी या कवीच्या अवधी बोलीतील ‘पद्मावत’ या काव्यात सर्वप्रथम मिळतो. अल्लाउद्दीनच्या समकालीन राजपूत अथवा दिल्ली सल्तनतीतील साधनांमध्ये मात्र पद्मावती/ पद्मिनी या पात्राचा उल्लेख कुठेही येत नाही. जायसीनंतर साधारणत: चार दशकांनी हेमरत्न या कवीची या कथेचे राजपूत संस्करण असलेली ‘गोरा बादल पद्मिनी चौपाई’ ही राजपूत साधनांपैकी पद्मिनी/ पद्मावतीचा उल्लेख असणारी पहिली रचना होय. त्याच्यानंतर मुहता नैनसी नामक लेखकाच्या नावे असलेली ‘नैनसी रि ख्यात’ नावाची रचना ही भाट-चारणांच्या परंपरेतून ऐकलेल्या कथेतून संपादित केल्याचे प्रा. रम्या श्रीनिवासन् यांनी नोंदवले आहे. पद्मावती कथेची काही संस्करणे मुघल दरबारातील राजपूत आणि मुस्लीम कवींच्या साहित्यातून निर्माण झालेली दिसतात. यापैकी जायसीच्या आद्यकथेचा सारांश असा : रतनसिंह हा राजा एका पोपटाच्या माध्यमातून सिंहल देशातील पद्मावती या राजकन्येचे रूपवर्णन ऐकून वेडावून जातो व विविध अडथळे आणि संकटांवर मात करून (शिव-पार्वतीच्या अनुग्रहाने) तिला प्राप्त करवून घेतो. पुढे रतनसिंहाने दरबारातून आणि राज्यातून हद्दपार केलेल्या एका ब्राह्मणाकडून पद्मावतीचे गुणवर्णन ऐकल्याने अल्लाउद्दीन तिला प्राप्त करण्याची कामना मनात धरून चितौडवर स्वारी करतो व कपटाने रतनसिंहाला अटक करून दिल्लीला नेतो. राणी पद्मावती ‘गोरा’ व ‘बादल’ या आपल्या शूर सेनापतींच्या मदतीने राजाला दिल्लीहून सोडवून आणते. मधल्या काळात शेजारील कुंभलनेर राज्याचा राजा देवपाल याने पद्मावतीची कामना करून तिच्याकडे विवाहाची मागणी केल्याने राज्यात सुखरूप परतलेला राजा रतनसिंह देवपालावर चालून जातो व त्या युद्धात दोघे मरण पावतात. पुढे पद्मावती व रतनसिंहाची प्रथम-पत्नी सती जातात. आणि त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी चितौड जिंकून घेतो.

हीच कथा पुढील काळात हेमरत्न (इ. स. १५५९), मुहता नैनसी (१६६०), जेम्स टॉड (१८२९), केशवभट्ट (१८४९) यांच्या संस्करणांमध्ये थोडय़ाफार कल्पनाविस्तारादि फरकाने दिसते. १९ व्या शतकात राजस्थानातील राज्यव्यवस्थेतील संतुलन राखण्यासाठी राजेरजवाडे व त्यांच्या हाताखालचे अधिकारी-सेनापती इत्यादींच्या सत्तेचे विकेंद्रीकरण करून त्यांना कंपनी सरकारच्या नियंत्रणाखाली ठेवण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या लेफ्टनंट कर्नल जेम्स टॉड या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्याने केलेल्या पद्मावतीविषयक कथानकांचा (narratives) इंग्रजी अनुवाद (१८२९ साल) बंगालमधील साहित्यात उतरला. त्या अनुवादातून निर्माण झालेल्या विभिन्न कथात्म संभाषितांचा/ संस्करणांचा प्रसार होऊ लागला असतानाच बंगालमधील हिंदू-मुस्लीम धार्मिक दंग्यांच्या पृष्ठभूमीवर ज्योतिरिन्द्रनाथ टागोर (सरोजिनी ब चितौर आक्रमण, १८७५), क्षीरोदप्रसाद विद्याविनोद (पद्मिनी, १९०६) इत्यादींच्या साहित्यकृती बंगाली साहित्यविश्वात मोठय़ा प्रमाणावर प्रसिद्धी पावल्याचे प्रा. रम्या श्रीनिवासन् यांनी त्यांच्या ‘The Many Lives of a Rajput Queen : Heroic Pasts in India C.1500-1900’ या ग्रंथात नमूद केले आहे. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २० व्या शतकात राष्ट्रवादाची कल्पना रुजू लागल्यावर या कथेने घेतलेली नवी वळणे व त्यातील सूचकता याविषयी अधिक संशोधन करण्याची गरजही त्यांनी या ग्रंथात व्यक्त केली आहे.

वरील कथेच्या सारांशामधला ‘पद्मावतीकडे शेजारील राज्याचा राजा असलेल्या देवपालानेदेखील (अल्लाउद्दीन खिलजीप्रमाणेच)   तिची कामना केल्याचा’ संदर्भ जायसीप्रमाणेच अन्य संस्करणांमध्येही येतो. पण ‘कर्णी-सेना’, राजपूत अस्मितेचे अन्य प्रतिनिधी किंवा या धक्काबुक्कीचे समर्थन करणाऱ्या गटाला राजपूत राजा देवपालाच्या वासनेविषयी/ कृत्याविषयी भाष्य करायचे नाही (किंवा ते त्यांच्या गावीच नाही.) हे स्पष्ट दिसून येते. यामुळेच ‘बंगालमध्ये ही कथा हिंदू-मुस्लीम दंग्यांच्या अनुषंगाने अधिक प्रसिद्ध पावणे’ किंवा ‘एका राजकीय पक्षाच्या (बिगर-राजपूत) नेत्याच्या संदर्भाने भन्साळींना मारण्यासाठी इनाम घोषित करणे’ या घटनांतून हा वाद धार्मिक अंगाने चिघळू शकण्याची संभाव्यता यथार्थ वाटू लागते. अशावेळी अल्लाउद्दीन खिलजी या सुलतानाच्याच कारकीर्दीतील त्याच्या मलिक काफूर या क्रूरकर्मा मानल्या गेलेल्या सेनापतीच्या दख्खन आक्रमणाच्या पर्वाच्या काळानंतर तमिळ भावविश्वात स्थिरावलेल्या व देवत्व प्राप्त केलेल्या सुलतानाच्या कन्येची (राजकन्येची) कहाणी आठवते. ही सुलतानाची मुलगी (हा सुलतान अल्लाउद्दीन खिलजीच असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.) ‘श्रीरंगनाथ’ या विष्णूमंदिरातील मूर्तीच्या प्रेमात पडून पुढे विष्णूची सहचरी झाल्याची कथा आजही मंदिरातील अर्चक-भक्तादि मंडळींकडून सांगितली जाते. श्रीरंग-विष्णूच्या आख्यानात या राजकन्येचे- ‘तुलुक्क नाच्चियार’चे (शब्दश: अर्थ : तुर्की देवता) स्थान आजही महत्त्वाचे आहे.

भारतावर विविध काळांत झालेल्या आक्रमणांपैकी मध्य-उत्तर आशियातून आलेल्या मुस्लीमधर्मीय सुलतानांची सत्ता ही कालदृष्टय़ा तुलनेने अधिक जवळची आणि दीर्घकालीन असल्याने त्या काळाविषयीच्या स्मृती ‘पद्मावत’सारखे कथनात्म साहित्य व लोकधारणेत रुजलेल्या आख्यानांतून अद्याप टिकून असणे स्वाभाविकच मानायला हवे. त्या काळातली (व इस्लामी आक्रमणापूर्वीच्या काळातली) हिंसा आणि विध्वंस हा वादग्रस्त विषय असल्याने व येथील शब्दमर्यादा लक्षात घेता त्यात अधिक खोलवर जाणे उचित होणार नाही. मात्र, पद्मावतीची कहाणी किंवा तमिळ भावविश्वातली ‘तुलुक्क नाच्चियार’ची कहाणी ही त्या काळातल्या सांस्कृतिक सहसंबंधांची व सांस्कृतिक मिलाफाची प्रतीके म्हणून पाहणे आजच्या काळात अधिक योग्य ठरेल असे निश्चितच वाटत राहते. वासाहतिक काळात रुजलेली ‘राष्ट्रराज्य’ कल्पना, ‘रिलिजन’ ही नव्याने मिळालेली चौकट आणि इंग्रजी शिकलेल्या अभिजन वर्गाच्या माध्यमातून रुजलेली व्हिक्टोरियन मूल्ये आजच्या वासाहतोत्तर व आधुनिकोत्तर काळात वेगळी परिमाणे धारण करतात. अशावेळी मध्ययुगीन घटना आणि राजकीय-सांस्कृतिक-धार्मिक सहसंबंधांच्या इतिहासाकडे पाहण्याची दृष्टीदेखील वस्तुनिष्ठ आणि आधुनिक अभ्यासकीय मापदंडांना अनुकूल अशीच राहायला हवी. या बदललेल्या परिमाणांमुळेच एखाद्या धार्मिक/ धर्माभिमानी व्यक्तीलादेखील तत्कालीन जोहार-सतीसारख्या प्रथा आज नृशंस वाटू लागतात आणि धर्माच्या नावाखाली होणारी हिंसा अस्वस्थ करून जाते.

पद्मावतीसारख्या शेकडो कथांची विविध संस्करणे विविध भाषांतून आणि भाट-चारणांच्या चौपाया-दोहे-पोवाडे वगैरे Genres मधून आपल्यापर्यंत येऊन पोहोचली. अनेकदा या आख्यानांच्या कथनात्म परंपरांमध्ये परस्परविरोधी तपशील, विसंगत धारणा, व्यंगात्मक सूर अथवा विडंबनेही दिसतात. भारतीय उपखंडातल्या विविध मौखिक आणि कथात्म परंपरांची अशी बहुविध संस्करणे निर्माण होऊन त्यातून वेगवेगळ्या सामूहिक स्मृती विकसित होण्यामागचे प्रमुख कारण त्या कथा-संस्करणांच्या जनकांना मिळालेले अलिखित समाजदत्त स्वातंत्र्य हे होय. त्यातूनच आपल्याकडे रामायणाची विविध व्हर्जन्स, सहस्रावधी उपकथानके व पुरवण्या जोडलेला ‘पंचम वेद’ महाभारत, परस्परविरोधी आशयाची पौराणिक कथानके, कथासरित्सागरातून आलेली बाणभट्टाची कादंबरी, इथपासून ते नौटंकी, रामलीला, मालवणी दशावतारी वस्त्रहरण अशा वेगवेगळ्या Genres  ची कथानके, नाटय़कृती व साहित्यकृती निर्माण झाल्या. त्यातून निर्माण झालेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सामूहिक स्मृतींद्वारे त्या, त्या प्रदेशातल्या अभिजनांपासून ते बहुजनांपर्यंत सर्वाचे मनोरंजन, प्रबोधन तर झालेच; शिवाय तिथल्या संस्कृती व लोकजीवनाला वेगवेगळे आयामही मिळाले. संबंधित कलाकृतींचा आस्वाद घेताना त्या काळात अस्मितांचे मुद्दे उपस्थित झाले असते आणि मूठभर मवाल्यांच्या झुंडशाहीला बळ मिळाले असते तर आज उपखंडातील कथात्म/ मौखिक परंपरा इतक्या समृद्ध झाल्या नसत्या! त्या स्वातंत्र्यावर घाला घालून परंपरांच्या गतिमानतेला आणि संस्कृतीच्या प्रवाहितेला सुरुंग लावायचे काम करणाऱ्यांचे समर्थन अप्रत्यक्षरीत्या/ आडून आडूनही होता कामा नये.

अर्थात् भन्साळी प्रकरणासारखे प्रसंग अनेकदा चित्रपट निर्मात्यांचा पब्लिसिटी स्टंटही असल्याचे दिसून येते. पण शेवटी चित्रपट निर्माते मंडळी हीदेखील याच समाजाचा भाग असल्याने आजच्या आत्यंतिक संवेदनशील झालेल्या काळात त्यांनाही जबाबदारीचे भान असायला हवे, हेही निश्चित!

हेमंत प्रकाश राजोपाध्ये

Story img Loader