नेहरू सेंटर कलादालनातर्फे दरवर्षी भरविण्यात येणाऱ्या ‘भारतीय महान कलाकारांचे सिंहावलोकीत प्रदर्शना’चा बहुमान यावर्षी चित्रकार दीनानाथ दलाल यांना त्यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून देण्यात आला आहे. १७ डिसेंबर ते ३ जानेवारी २०१६ या कालावधीत नेहरू सेंटर कलादालनात हे प्रदर्शन होत आहे..
चित्रकलेच्या एखाद्या शाखेत प्रावीण्य असलेले अनेक चित्रकार आहेत, परंतु यथार्थवादी चित्रांपासून नवचित्रकलेपर्यंत सर्वत्र संचार करणारा एखादाच असतो. अशांमध्ये दीनानाथ दलाल यांचा अंतर्भाव होतो.
३० मे १९१६ रोजी गोव्यात जन्मलेल्या दलालांनी मडगावच्या साहित्य संमेलनात शिवरामपंत परांजपे यांचे रेखाचित्र काढले. ते पाहून परांजपे यांनी त्यांच्या पाठीवर शाबासकी देत ‘तू पुढे मोठा चित्रकार होशील,’ असा आशीर्वाद दिला. हा आशीर्वाद फळाला आला. रेखाटने, व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे, पुस्तकांची सजावट, मुखपृष्ठे असे विविध प्रकारचे काम दलालांनी केले. मराठी माणसांना दलालांनी ग्रंथ व मासिकांचे मुखपृष्ठ पाहायला शिकवले. दलालांची सही म्हणजे त्रिकोणातील ‘द’! तीही किती सृजनात्मक!
दलालाची रेषा ही खास दलालांची होती. सळसळत्या नागिणीसारखी गतिमान तर ती होतीच, पण त्यातली सहजता, डौल हा तपश्चय्रेने आलेला होता. १६ ते १८ तास दलाल काम करीत. रेषा- मग ती पेन्सिलची असो, पेस्टलची असो वा डायब्रशची असो; पु. भा. भावेंचे व्यक्तिचित्र याची साक्ष देते. दलालाची रेषा सर्व भावभावना व्यक्त करी. कामाची प्रचंड मागणी आणि खूप काम करण्याची क्षमता या चित्रकाराकडे असल्यामुळे त्यांना विपुल काम करणे शक्य झाले. त्यांची शैली अत्यंत साधी. खूप बारकावे नसलेली. चित्रांत तीन-चार छटांत छायाप्रकाशाचे चित्रण केलेले असे. शास्त्रीय रेखाटनात न अडकता त्याला योग्य वळण देऊन, योग्य तपशील ठेवून, चित्रातील प्राण टिकवून; पण तरीही विविध प्रयोग करून दलालांनी एकरंगसंगतीचा वापरही कौशल्यपूर्ण केलेला दिसतो. रचना व आकृतिबंधाची जाण, तसेच रेषा, रंग, आकार या तिन्हीवर हुकमत असल्यामुळेच रसिकांसमोर ते सतत नवनव्या चित्रकृती सादर करीत राहिले. सतत काम केल्याने कामात सफाई आली तरी त्यात त्यांनी साचेबंदपणा येऊ दिला नाही. सतत वेगवेगळे नवे प्रयोग करीत राहिले. विविध माध्यमे हाताळत राहिले. शैलीतही त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. यथार्थदर्शनवादी हुबेहूब चित्रणशैली, त्रिमितीचा आभास निर्माण करणारी पाश्चात्त्य शैली, मानवी मनातील भावना निसर्गावर आरोपित करणारी द्विमिती पद्धतीची भारतीय शैली, वास्तववादी पारंपरिक शैली, आधुनिक शैली, इतकेच नव्हे तर अमूर्त शैलीतही त्यांनी यशस्वी प्रयोग केले. अभिजात शैलीत काम करण्याची आत्यंतिक इच्छा असल्यामुळेच त्यांच्या व्यावसायिक कामांतही अभिजाततेचा ध्यास जाणवतो. पाश्चात्त्य चित्रकारांबरोबरच गायतोंडे, देऊस्कर, रझा, माळी, गुर्जर, हळदणकर, चिमुलकर, अमृता शेरगील, जेमिनी रॉय, अविनद्रनाथ टागोर, इ. चित्रकारांचा प्रभाव दलालांच्या अनेक चित्रांवर आढळतो. आपल्या कामाच्या व्यापातून वेळ काढून दलाल बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया या व अशा अनेक कलाप्रदर्शनांत आपल्या कलाकृती पाठवीत आणि त्या कलाकृतींना अॅवॉर्डही मिळत.
बॉम्बे आर्ट सोसायटीची १३ अॅवॉर्डस त्यांना मिळाली होती.
दलालांच्या सहजसुंदर उत्स्फूर्ततेचे उत्तम उदाहरण म्हणजे व्यक्तिचित्रण. त्यातही विविधता आढळते ती शैली व माध्यमाची! स्वतंत्र कलाविष्कार म्हणून केलेली वि. स. खांडेकर आणि ना. सी. फडके यांची व्यक्तिचित्रे आणि ‘दीपावली’ तसेच इतर मासिकांच्या चित्रमालिकांमधून रंगवलेली समूहचित्रे त्यांच्या सर्वसंचारी प्रतिभेची साक्ष आहेत. खांडेकरांच्या जलरंगातल्या व्यक्तिचित्रात पाश्र्वभूमीच्या कागदाचे सौंदर्य जपण्यासाठी त्यावर हलके रंगलेपन केलेले दिसते. न. चिं. केळकरांच्या जलरंगातील व्यक्तिचित्रात चेहरा, हात-पाय यांसाठी पारदर्शक पद्धतीने तपकिरी रंगाच्या छटा वापरल्या आहेत. तर पाश्र्वभूमी आणि वस्त्र धवल छटांमध्ये रंगविले आहे. महात्मा गांधींचे जलरंगातील चित्र तलरंगाचा भास निर्माण करते. विनोबांचे तलरंगातले चित्र उत्कृष्ट व्यक्तिचित्राचा नमुना आहे. ना. सि. फडके यांचे जलरंगातील व्यक्तिचित्र तर अप्रतिमच! कमीत कमी रंगलेपन करून डोळे व नाकाचा शेंडा आणि ओठांवरील तीव्र प्रकाश आणि पाश्र्वभूमीपासून चेहरा उठून दिसावा म्हणून चेहऱ्याजवळ दिलेला पांढऱ्या रंगाचा फटकारा खूपच विलोभनीय. या व्यक्तिचित्रांत दलालांच्या तंत्रकौशल्यातली विविधता आणि हुकमत जाणवते. विविध माध्यमांवरील त्यांच्या प्रभुत्वाचा दाखला म्हणजे त्यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे पेन्सिलमध्ये केलेले व्यक्तिचित्र.
दलालांना निसर्गाचे हुबेहूब चित्रण करण्यापेक्षा त्याचा घेतलेला अनुभव अधिक महत्त्वाचा वाटे. मुक्त निसर्गचित्रण करताना दलाल मनस्वी, स्वतंत्र असत. घराचे यथार्थदर्शन सांभाळून चित्रण करण्यापेक्षा त्याचे घरपण त्यांना महत्त्वाचे वाटे. त्यांची रफ स्केच म्हणून केलेली निसर्गचित्रे, पेन आणि शाईने केलेली काश्मीरमधील चित्रे, प्राणी, माणसे, झाडे यांची कमीत कमी रेषांमधून अधिकाधिक आशय दाखविणारी रेखाटने चकित करतात. चित्रफलकावर ते उत्स्फूर्तपणे, पण विषयाला धरून सृजनक्रियेचा सुंदर अनुभव देतात. यातून त्यांची अभिव्यक्तीवादाशी असलेली जवळीक जाणवते.
आधुनिक साधनांचा वापर करून आणि पाश्चात्त्य वाङ्मय सजावटीचा सखोल अभ्यास करूनही त्यांनी आपल्या चित्रांतले भारतीयत्व जपले, हे विशेष. त्यांच्या चित्रांत लयबद्ध रेषा, काव्यात्मकता दिसते. स्त्रीचित्रण हा दलालांच्या कुंचल्याची श्रीमंती डोळ्यांत भरवणारा विषय. त्यांच्या चित्रांतल्या शेलाटय़ा बांध्याच्या रूपवतींचा स्त्रियांनाही हेवा वाटे. परंतु पदर फडकवत जाणाऱ्या या ललनांचे सौंदर्य कधीही उत्तान वाटले नाही. काहींच्या चेहऱ्यावर सोज्वळ भाव, काहींच्या चेहऱ्यावर असीम गोडवा, कधी कधी खटय़ाळ भाव, तर काही मुग्ध सौंदर्यवती. त्यांच्या चित्रांतल्या स्त्रिया अजिंठा-वेरुळच्या लेण्यांतील स्त्रियांची आठवण करून देतात. धनुष्याकृती भुवया, कमळासारखे हात, सिंहकटी, सुंदर केससंभार, याचबरोबर नृत्यकलेचा प्रभाव जो भारतीय चित्र आणि शिल्पांवर आढळतो, तोही दलालांनी अंगिकारला आहे. त्यामुळे भारतीय कलारसिकाला त्यांची चित्रे देशी मातीतून निर्माण झालेली वाटतात.
संकल्पना व्यक्त करणारी सिनेमा जाहिरातीसाठी दलालांनी केलेली चित्रे, लहान मुलांच्या गोष्टीच्या पुस्तकांना साजेशी चित्रे, कथा-कादंबऱ्यांकरता काढलेली चित्रे आणि पाठय़पुस्तकांतील चित्रे.. अशा सर्व प्रकारची चित्रे त्या- त्या विषयाला न्याय देणारी असत. दलालांची मुखपृष्ठे हा एका स्वतंत्र लेखाचा विषय ठरावा. विविध प्रकारचे प्रयोग करत पुस्तक प्रकाशनाचा कलात्मक दर्जा जाणीवपूर्वक उंचावण्याचे काम त्यांनी केले. अनेक मान्यवर लेखक आपल्या पुस्तकाचे मुखपृष्ठ दलालांचे हवे अशी इच्छा व्यक्त करीत. प्रकाशकही कथाचित्रे, मांडणी, दलालांचीच हवी यासाठी आग्रही असत. दलालांचे चित्र मुखपृष्ठावर असले की पुस्तकाची हमखास विक्री होते अशी श्रद्धाच निर्माण झाली होती. आठ- आठ महिने अगोदर दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठासाठी दलालांची चित्रे आरक्षित केली जात.
एक मार्मिक व्यंगचित्रकार म्हणूनही दलालांची ओळख करून देता येईल. ‘चित्रा’ मासिकातून त्यांची राजकीय टीकाचित्रे गाजली. त्याकाळी राजकीय व्यंगचित्रांवर डेव्हिड लोची प्रचंड छाप होती. दलालांनी लोचे संस्कार स्वीकारले, पण त्यांच्या शैलीच्या आहारी ते गेले नाहीत. गांधी, नेहरू, राजगोपालचारी, आझाद, मोरारजी, स. का. पाटील, जीना यांची दलालांनी काढलेली व्यंगचित्रे आजही अनेकांच्या स्मरणात असतील. १९४४ साली दलालांनी दिलेली व्यंगचित्रांची प्रात्यक्षिके पाहिली की त्यांची रेषेवरील हुकमत व सूक्ष्म निरीक्षण लक्षात येते.
१९४४ मध्ये दलाल आर्ट स्टुडिओची स्थापना झाली, तर १९४५ ला ‘दीपावली’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला. त्यांना आयुष्यभर इतरांच्या इच्छे-अपेक्षेनुसार कामे करून द्यावी लागत होती. स्वत:च्या इच्छेप्रमाणे चित्रे काढता यावीत म्हणून ‘दीपावली’ हे वार्षकि नियतकालिक त्यांनी सुरू केले. छपाई तंत्राच्या मर्यादा सांभाळून त्यावर मिळवलेल्या नपुण्यामुळेच रंगसंगतीचे असंख्य प्रयोग त्यांनी ‘दीपावली’तील चित्रमालिकांमध्ये केले. अष्टनायिका, पंचकन्या, मध्ययुगीन ऐतिहासिक जोडपी, नवरस, रागमाला, ऋतू, नद्या, अप्सरा, लावणी, नíतका, इ. चित्रमालिकांमुळे ‘दीपावली’चा अंक संग्रही ठेवला जाई. ही चित्रे दिवाणखान्यात फ्रेम करून लावली जात. रांगोळी प्रदर्शनात आणि हौशी चित्रकार नक्कल करण्यासाठी दलालांचीच चित्रे निवडत. कारण त्यांच्या चित्रांतील साधेपणा अनुकरणाला सोपा होता. पण वरवर साधी वाटणारी दलालांची ही चित्रे म्हणजे प्रचंड मेहनत आणि अभिजात चित्रकलेच्या शास्त्रोक्त अभ्यासाचे फळ आहे.
१९५६ मध्ये दलालांनी ‘शृंगारनायिका’ या लेखक स. आ. जोगळेकरांकरिता चित्रे काढली होती. हे पुस्तक त्याकाळी खूप गाजले. प्रतिमा वैद्य यांनी आपल्या वडिलांना श्रद्धांजली म्हणून नवीन स्वरूपात हे पुस्तक इंग्रजी आणि मराठीमध्ये छापले आहे आणि प्रदर्शनाच्या ठिकाणी ते उपलब्ध असेल.
स्वभावाने मनमिळाऊ आणि कष्टाळू दलालांचा मित्रपरिवार मोठा होता. अरिवद गोखले त्यांच्याविषयी आपल्या ‘देवमाणूस’ लेखात लिहितात, ‘दीनानाथ दलाल हे मत्रीचे भुकेले, साहित्याबद्दल सुजाण, व्यवहारी, तितकेच उदार होते.’ चित्रकार आणि कलेविषयी लिखाण केलेले द. ग. गोडसे यांनी लिहिलंय, ‘दलालांचे काही समकालीन व्यावसायिक प्रतिस्पर्धी सोडले तर ते समकालीन कला, वाङ्मय आणि मुद्रण, प्रकाशन क्षेत्रात अजातशत्रू होते.’
१९४० ते १९७० असा ३० वर्षांचा कालखंड मराठी चित्रकलेच्या आणि साहित्याच्या क्षेत्रात ‘दलाल युग’ म्हणून ओळखला जावा इतका त्यांचा या कालखंडावर प्रभाव होता. नेहरू सेंटर कलादालनातील या प्रदर्शनाच्या निमित्ताने हा त्रिकोणातील ‘द’ (पृथ्वीच्या) वर्तुळातील ‘द’ होईल- अर्थात जगप्रसिद्ध होईल अशी सदिच्छा व्यक्त करू या. ल्ल
plwagh55@gmal.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा