कवयित्री वर्षां पवार-तावडे यांचा ‘मनाला दार असतंच’ हा कवितासंग्रह कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे आज प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने कवी सौमित्र अर्थात किशोर कदम यांनी या संग्रहास लिहिलेल्या प्रस्तावनेचा संपादित अंश..

आज मराठीत कितीतरी कवयित्री स्वत:चा ठसा उमटवताहेत. अनुपमा उजगरे, प्रज्ञा पवार, नीरजा, कल्पना दुधाळ आणि अनेक कवयित्री कविता लिहून मराठी भाषेत स्त्री-जाणिवांवर प्रखर प्रकाश पाडत आहेत. या सर्व कवयित्री वेगवेगळ्या स्त्री-जाणिवांनी लिहीत असल्या, तरी त्यांच्यातलं स्त्रीत्व हीच त्यांच्या कवितेची महत्त्वाची बाजू ठरते. काळाच्या किती तरी थपडा खाऊन, शतकानुशतकांचे कालडोंगर चढून येऊन आज त्या आपापलं वेगळेपण टिकवून कविता लिहिताहेत. स्त्रीची माया, हळुवारपणा, समजून घेण्याची प्रगल्भता, सगळा डोलारा सांभाळण्याची दुर्दम्य ताकद, प्रसंगी स्वत:च स्वत:ला तोडणं, मोडणं, जोडणं, समजून घेणं आणि पुन्हा नव्याने काहीच न झाल्यासारखं परिस्थितीला सामोरं जाणं हे सगळे गुण वर उल्लेखलेल्या (किंबहुना कुठल्याही) कवयित्रींमध्ये आढळतात. ते सगळे गुण वर्षां पवार-तावडे या कवयित्रीमध्येही आढळतात. म्हणूनच त्यांचीही कविता स्वत:चा असा वेगळा ठसा घेऊन उभी राहते.

‘मनाला दार असतंच’ या त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहाबद्दल लिहिताना अशाच सगळ्या भावना येत आहेत. या कविता जसजशा वाचत जाव्यात तसतशी त्यांच्यात एक सुसंगती आहे असं जाणवतं. उत्तम चित्रकार म्हणतो, तो एकच चित्र आयुष्यभर पूर्ण करत असतो. एक उत्तम कादंबरीकार एकच कादंबरी लिहीत असतो. एक उत्तम कवी एकच कविता पूर्ण करत असतो. या तिन्ही म्हणण्याला एक तत्त्व लागू पडतं, ते म्हणजे आपण एकच आयुष्य जगत असतो. एकाच आयुष्यात आपणच आपल्याला वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळे भेटत राहतो, जाणवत राहतो. एकाच जगण्यात आपण अनेक ओळखी घेऊन जगत असतो. एक पुरुष नवरा, मुलगा, भाऊ, मित्र, बॉस, सहकारी अशा अनेक ‘आयडेंटिटीज्’ने जगत असतो. तशी स्त्री एक बाई, आई, बायको, मुलगी, प्रेयसी, बॉस, अधिकारी म्हणून वेगवेगळ्या ओळखी धारण करत असते आणि हे जगणं आपल्या सगळ्यांचं अपरिहार्य अंग असतं. परंतु एक कलावंत त्या सगळ्या व्यामिश्रतेला त्याच्यातल्या कल्पनेने एक वेगळा पोत देऊन स्वतंत्र परिमाण देत असतो.

या कवितासंग्रहातील पन्नासच्या आसपास असलेल्या कविता ‘मन’, ‘स्त्री’, ‘तू आणि मी’, ‘बालपण’, ‘समाजकारण-राजकारण’, ‘ती आणि तो’, ‘कुटुंब’, ‘निसर्ग’, ‘देव’ यांच्यामध्ये अगदी सहजपणे विखरून गेल्या आहेत. या प्रत्येक भागात त्या एकाच तत्त्वाकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून अतिशय प्रगल्भतेने पाहताना आढळतात.

उदाहरणार्थ, ‘मना’बद्दलच्या त्यांच्या पाच-सहा कविता आहेत. बाहेरच्या जगात वावरत असताना त्यांच्या मनात चाललेल्या आंतरिक लहरींवरल्या या कविता आपला हात धरून त्या फिरवून आणतात. ‘मनाला दार असतंच’ या कवितेत खरं तर मनाला दार नसतंच असं त्या ‘दार असतं’मधून सांगताहेत की काय, असं वाटत राहतं. ‘दोन्हीकडच्या चाव्या आपल्याच ताब्यात, म्हणजे आपणच कुलूप आणि आपणच आपलं दार, म्हणूनच ते कधी आतून लावलं जातं, कधी बाहेरून उघडलं जातं, ते आपल्यालाही कळत नाही.’ अशा प्रकारचं मनाचं अद्भुत अस्तित्व दाराच्या आत-बाहेर जाणवू द्यायला कवयित्री यशस्वी होतात. दुसऱ्या एका कवितेत त्याच मनावर संस्काराचा ‘ट्रॅफिक जॅम’ होतो आणि त्या स्वत:लाच विचारतात – ‘संयमाचा ट्रॅफिक पोलीस संपावर गेलाय का?’ तशाच एका ‘खूप बोलायचंय मनाशी’ या कवितेत त्या मनातल्या मनालाच फसवतात, सगळं नीट चाललंय असं मनालाच भासवतात. ते चक्रावतं, हे कोण नवीन असं बाहेर डोकावतं, हादरतं व एकांतात हरवतं. मग कवयित्री म्हणते – ‘ते सापडलं तर त्याला निरोप द्या, असं अचानक सोडून न जायला, कारण त्याच्याशी खूप खूप बोलायचंय अजून.’ अशाच मनाच्या अद्भुत जादूई जगात ‘मनात लपलेला नारद’, ‘देह आणि मन’ या कवितांनी त्या फिरवून आणतात.

संग्रहातल्या कवितांमधला मोठा भाग व्यापला आहे तो स्त्री-जाणिवांनी. या स्त्री-जाणिवांमध्येच त्या कधी स्वत:लाच ‘तू’ म्हणून संबोधतात, कधी ‘त्याच्या’शी बोलतात. कधी त्या ‘ती’ होतात आणि त्याला ‘तो’ करतात. मग आपोआपच अपरिहार्यपणे ‘कुटुंब, मुलं’ येतात, वय येतं, सहजीवन येतं, वडील येतात, एक महिला म्हणून स्वत:चं अस्तित्व येतं. त्यातच ‘बाबाचं मनोगत’ नावाची सुंदर कविता येते-

‘तुझ्या लहानपणी राहूनच गेलं

तुझ्याबरोबर रोज खेळायचं

तुझ्या शाळेच्या मित्रमत्रिणींना

घरी बोलावून त्यांच्यात रमायचं’

वडिलांच्या भूमिकेत शिरून एक दिवस अचानक जाणीव झालेल्या वडिलांचं मन त्यांनी अगदी सहज समोर मांडलंय. याप्रमाणेच ‘जन्म नाही दिला तिला’ या कवितेत मुलांना फक्त जन्म देणं म्हणजे ‘आईपण’ नसतं हे कवयित्री पटवून सांगतात. जन्मासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्या उचलण्यात वडिलांच्या सोबत आईचा वाटा जरा जास्तच असतो हे कुणीही मान्य करील. ‘असे का होते’ या कवितेत स्त्रीला येणारं भयाण एकटेपण त्या प्रखरपणे मांडतात. वयाच्या एका अपरिहार्य टप्प्यावर ‘तो’ कामाच्या रगाडय़ात पुढे निघून गेलेला. तिच्यातला काही तरी करण्याचा आवेग मंदावलेला. ‘घर’ या संकल्पनेत घुटमळती ‘ती’ हे असं का होतंय, या प्रश्नाच्या दोराला घट्ट धरून उभी आणि आता काही काळातच तिची ‘पिलं’ पंख फैलावून उडून जातील तेव्हा काय? मधला पुसला गेलेला काळ तिला परत मिळणार आहे का, त्याच्या चढत्या आलेखात तिची आठवण त्याला येईल का, ही भीती घेऊन ती जगत राहते. कमी-जास्त प्रमाणात प्रत्येक स्त्रीच्या वाटय़ाला हाच प्रश्न, हेच दु:ख दिसतं, जे इथं कवयित्री लख्खपणे मांडतात. ‘महिला दिवस’, ‘तो माणूस कधी होणार’, ‘ती सध्या काय करते’, ‘कोण म्हणतं स्त्री रंग बदलते’, ‘अगं अगं सावित्री’, ‘वटपौर्णिमा’ या कवितांबरोबरच एक अतिशय सुंदर कविता उगवते- ‘जोडवी’! मुलगी माहेर सोडून संसार गिरवते. तिकडलं सगळं आपलं करून घेते. घर घेते उरावर, पण अचानक-

‘बोचरी जोडव्याची तार

येता विकासाच्या आड

तारेलाच दे वळण

मानू नकोस कधी हार’

असं म्हणत तिच्या विकासाच्या आड येणाऱ्या गोष्टींनाच वळण देते. अन्याय सहन करत खितपत न पडता, त्यातून बाहेर पडण्याची तयारी ठेवते.

स्त्री कुठल्याही वयात कितीही ‘त्या’ घरची झाली, तरी तिच्या स्त्री-मनात तिचं बालपण नेहमीच झुलत असतं. आपल्या मुलांशी खेळताना कवयित्रीला तिने लहानपणी खेळलेला ‘मधलं बोट’ पकडण्याचा खेळ आठवतो. या मन:स्थितीमधलीच ‘अल्बममधल्या जुन्या मत्रिणी’ ही कविता. आपली मुलं स्वतंत्र होत असताना कवयित्रीला अल्बममधल्या एकेका मत्रिणीची आठवण येऊ लागते –

‘मुखवटय़ाशिवाय राहण्यासाठी

निखळ गप्पात रमण्यासाठी

आठवणींच्या जगात

पुन्हा पुन्हा विहरण्यासाठी’

अतिशय बोलकी अशी ‘डावं-उजवं’ ही कविता मार्मिक टिप्पणी करत वास्तवाची जाणीव करून देते. याशिवाय निसर्ग, देव, मंदिर, ग्लोबलाइज्ड होत चाललेलं जग, मोबाइल्सचं अपरिहार्य असणं, गुगलने व्यापलेलं जग या सगळ्यांवर कवितांतून विचार, भावना मांडत जातात.

सध्याच्या संमिश्र, व्यामिश्र कालखंडात वर्षां पवार-तावडे यांची कविता आपल्याला गर्दीपासून दूर नेऊन मनाच्या एकांतात यायला भाग पाडणारी आहे.

Story img Loader