चित्रपटकथालेखक, कवी, गीतकार आणि विचारक जावेद अख्तर यांनी ‘लोकसत्ता गप्पां’च्या मंचावर आपल्या बहुआयामी लेखनापासून ते धार्मिक सहिष्णुता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समान नागरी कायदा, लिंगसमानता, तरुण पिढीची मानसिकता, हिंदी चित्रपटांतील आपला प्रवास आदींबद्दल केलेलं मुक्त चिंतन.. रिपोर्ताज् स्वरूपात..
‘तुम्हाला नद्यांचा प्रवाह माहितीये ना कसा असतो ते. त्यांच्यात समान गोष्ट म्हणजे पाणी. पण प्रत्येक नदीचं वाहणं वेगळं, वळणं वेगळी. ज्या प्रदेशातून वाहायचे ते प्रदेश वेगळे, भुई वेगळी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक नदीच्या प्रवाहातील जोम, ऊर्जाही वेगळी. प्रवाहातील हा जोम फार मोलाचा. प्रत्येक नदीचं अंतिम वळण सागराचंच. पण नदी सागराप्रत जाण्याच्या प्रवासात तिच्यातील जोम ठरवतो- की ती कशी पुढे जाणार.. ती कशी वाहणार.. कशी वळणं घेणार. माणसाच्या आयुष्याचंही असंच आहे. प्रत्येकाचं आयुष्य त्याच्या त्याच्या दृष्टीने एकमेवाद्वितीय. हरएक माणूस आयुष्याच्या वाटेवर कुठे जाणार, कुठे पोहोचणार, हे ठरवणार त्या माणसातील जोम, त्याच्यातील प्रवाह, ऊर्जा. हा जोम माणसात असेल तर त्याच्या आयुष्याचा प्रवाह फेसाळत, धडकेने पुढे जाणारच..’
नदीच्या प्रवाहाच्या अनुषंगाने माणसाच्या आयुष्यावर केलेले हे भाष्य..
‘चित्रपट, गाणी किती नाकारले विचारताय? अहो, जितके स्वीकारले त्यापेक्षा अधिक नाकारले मी. कुणाच्याही दबावाखाली एक शब्द लिहिला नाही कधी आयुष्यात. जे लिहिले ते माझ्या मर्जीनेच..’
हे चोख उत्तर पशाच्या लखलखाटाने डोळे दिपवून शब्दांना आपल्या दावणीला बांधणाऱ्या प्रवृत्तींसाठी.
‘पाश्चिमात्य चित्रपटांत गाणी असलीच तर ती पाश्र्वभूमीवर वाजतात. म्हणजे त्या चित्रपटांतील कुणी पात्र पडद्यावर थेट गाणं गातोय आपल्यासारखं असं होत नाही. आमच्या चित्रपटांमध्ये त्यातली पात्रेच गाणी गातात, तर त्यात वावगं काय? त्यावर टीका करण्याचं कारण काय? आम्हाला आमची गोष्ट गाण्यांमधूनच सांगण्याची सवय आहे. आम्ही ती तशीच सांगणार. तुम्हाला ती ऐकायची तर ऐका..’
आपल्या परंपरांचा रुबाब मिरवण्याची ही लोभस रीत..
‘सामान्य लोकांना काय आवडतं, काय आवडत नाही, हे ठरवण्याचा अधिकार मूठभरांना कुणी दिला? सामान्यांना काहीतरी कमअस्सलच आवडतं हे ठरवून मोकळे होणारे हे मूठभर कोण? सगळ्याच क्षेत्रांतील सत्ताधीशांचे सामान्यांच्या अभिरुचीबद्दलचे मत इतके वाईट का?’
सत्तेवरील दीडशहाण्यांच्या दिशेने भिरकावलेला हा परखड आणि बहुआयामी प्रश्न..
विषय कुठलाही असो.. चित्रपट, संगीत, खासगी आयुष्य, सामाजिक प्रश्न, धर्म, राजकारण.. त्यावरील प्रश्नांच्या प्रत्येक उत्तराचा लसावि आणि मसाविदेखील एक मोलाचे मूल्य. हे मूल्य स्वातंत्र्याचे. हे स्वातंत्र्य विचाराचे, आचाराचे, विहाराचे आणि चुकण्याचेदेखील. हे स्वातंत्र्य कुणापाशी मागितलेले असे नाही.. त्यामुळे कुणी दिलेले असेही नाही. हे स्वातंत्र्य स्वयंभू, जन्मसिद्ध. ते माणसापाशी कालही होते.. आजही आहे.. उद्याही असणारच. या अशा स्वयंभू स्वातंत्र्याचे संवादी स्वगत मांडले ते जावेद अख्तर यांनी. कवी, गीतकार, लेखक, विचारवंत अशा अनेक बिरुदांची प्रभावळ जावेद यांच्या पाठीशी. त्यातील प्रत्येक भूमिकेतून ते उच्चारत राहिले या स्वातंत्र्याचे मोल. यास निमित्त होते ते रोजरहाटीच्या बातम्यांपलीकडे जाऊन वाचकास कसदार असे काही मिळावे, त्याची आंतरिक समृद्धी वाढावी, तो अधिकाधिक जागता व्हावा यासाठी सदैव प्रयत्नशील असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ‘लोकसत्ता गप्पा’ या उपक्रमांतर्गत रंगलेली जावेद अख्तर यांची अरभाट गप्पामफल. किशोर कदम ऊर्फ सौमित्र यांनी या गप्प्पांमध्ये जावेद यांच्याशी संवाद साधलाच; शिवाय विविध क्षेत्रांतील उपस्थित मान्यवरांकडूनही प्रश्न विचारले गेले. गंभीर विषयावरील प्रश्नाला तितक्याच गांभीर्याने, मात्र बोजड न होणारे दिले गेलेले उत्तर.. थेट प्रश्नांचा तसाच थेट सामना.. मिश्कील प्रश्नावर प्रश्नकर्त्यांला हळूच चिमटा काढून मग मिश्कील उत्तर.. असा या मफलीचा थाट. प्रश्न अनेक विषयांवर.. अनेक मुद्दय़ांवर. त्यावरील जावेद यांच्या उत्तरांनी साधत गेला तो एक रसरंगभरीत संवादी कोलाज..
मुद्दा संवादाचाच. गाजलेल्या अनेक चित्रपटांचे संवादलेखक म्हणून सलीम-जावेद ही जोडगोळी चित्रपटप्रेमींना प्रिय. चित्रपटातील संवादलेखनाच्या निमित्ताने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जावेद यांचा रोख नकळत वळतो तो तुमच्या-आमच्या प्रत्यक्ष आयुष्यातील संवादाकडे. ‘चित्रपटांतील संवाद व प्रत्यक्ष आयुष्यातील संवाद यांत खूपच फरक असतो. चित्रपटांतील संवाद हे नेमके असतात. आणि ते तसेच असायला हवेत. ते तसे नसतील तर एका सीनमध्येच चित्रपट संपून जाईल. पण प्रत्यक्ष आयुष्यात आपण किती विस्कळीत बोलतो. दोन माणसे एकमेकांशी बोलताना कधीतरी गुपचूप ते रेकॉर्ड करा आणि ऐका नंतर. कधी कधी दोन्ही माणसे एकच मुद्दा वेगवेगळ्या शब्दांत मांडत असतात, तर कधी दोन्ही माणसे वेगवेगळ्याच विषयांवर बोलत राहतात अशी गंमत अनुभवास येईल. याचे कारण काय? तर आपण समोरच्याचे नीट ऐकतच नाही कधी. समोरचा कधी एकदा गप्प बसतो आणि मी कधी एकदा बोलतो अशी घाई असते आपल्याला. तुम्ही समोरच्याचे म्हणणे नीट ऐकले पाहिजे. म्हणजे त्याच्या म्हणण्यातील कुठल्या मुद्दय़ांशी तुम्ही सहमत आहात.. कुठल्याशी नाही, हे नीट कळून येईल ना तुम्हाला! तेच तर होत नाही..’ हे सूक्ष्म निरीक्षण संवादलेखक जावेद यांचे.
याच संवादलेखनाच्या निमित्ताने मुद्दा येतो तो संवादाच्या रीतीचा आणि त्याचसोबत लेखकाच्या स्वातंत्र्याचा. ‘मला कुणाशी संवाद साधायचाय, माझे म्हणणे कुणापुढे मांडायचेय, याची नीट कल्पना माझ्या डोक्यात पक्की हवी. मग ज्याच्याशी संवाद साधायचाय त्याच्याशी त्याला समजेल अशा भाषेत बोलणे ओघाने आलेच. पण ते करताना मला जे म्हणायचे आहे तो गाभा मी सोडत नाही. माझी भाषा कदाचित वेगळी असेल, पण माझ्या म्हणण्याला मी चिकटून राहणारच. आणि लेखकाच्या स्वातंत्र्याचे म्हणाल तर आजवरच्या आयुष्यात माझ्या मनाविरुद्ध, मर्जीविरुद्ध एक शब्द कधी लिहिला नाही मी. कितीतरी चित्रपट, गाणी नाकारली मी या कारणासाठी. त्याबाबत माझा सदसद्विवेक पूर्णत: जागा, स्वच्छ आहे. कधी कुणी म्हणतो, हे असे असे लिहा. मी सांगतो त्याला.. नाही, हे व्याकरणदृष्टय़ा चूक आहे. समोरचा म्हणतो.. कुणाला माहिती आहे ते? मी त्याला ठणकावून सांगतो, मला माहितीये. स्वत:च्या मनाला पटत नाही ते लिहूच नये लेखकानं. आणि तसे लिहिलेत काही- तर वाचणाऱ्याला बरोबर समजते की, हे काही खरे नाही. तुम्ही मनापासून जी गोष्ट लिहीत नाही, बोलत नाही ती पोकळ असते..’ जावेद यांचे नि:संदिग्ध सांगणे.
लेखकाच्या स्वातंत्र्याला जोडून प्रश्न येतो तो समस्तांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा आणि त्या अनुषंगाने उच्चार होतो सहिष्णुता-असहिष्णुता वादाचा. त्यावर जावेद अख्तर यांचे सांगणे काल आणि आज यांची तुलना करणारे.. ‘या मुद्दय़ावर आपल्याकडे एकदम टोकाची मते असलेले दोन गट आहेत. देशात सर्वत्र असहिष्णुता आहे, अशी एका गटाची तक्रार. तर दुसरा गट म्हणतो, कुठे आहे असहिष्णुता? काहीतरीच बोलताय. आणि यापुढे असे काही बोलाल तर याद राखा! तर अशा दोन्ही टोकाचे विचार चुकीचेच. आज सभोवताली सगळेच वाईट चालले आहे असे म्हणणे योग्य नाही. पण त्याचबरोबर- सगळेच कसे छान छान आहे, असे कौतुक करणेही चुकीचेच. याच विषयाच्या अनुषंगाने साधे उदाहरण घ्या. नसीर, ओम आदी मंडळींनी कित्येक वर्षांमागे ‘जाने भी दो यारों’ हा चित्रपट केला. आज असा चित्रपट केला तर गहजब होईल. ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटामध्ये महाभारतावर बेतलेली जी विनोदी दृश्ये आहेत तशी आज चित्रपटात आली तर चित्रपटगृहावर दगडफेक होईल. येथे मुद्दा येतो तो टीकेचा. आज तुम्ही सरकारवर टीका केलीत तर देशद्रोही ठरता. म्हणजे काल मनमोहन सिंग हे चांगले पंतप्रधान नाहीत, असे म्हणालात तरी ते चालत होते. असे बोललात तरीही तुम्ही राष्ट्रवादी ठरत होता. पण आज जर पंतप्रधान मोदींवर काही टीका कराल तर तुम्ही एकदम राष्ट्रद्रोहीच ठरवले जाता. असे कसे काय? मोदी सरकारची नोटाबंदी योग्य की अयोग्य हा मुद्दा बाजूला ठेवू या; पण त्यावर टीका करणे म्हणजे राष्ट्रद्रोह- असे कसे म्हणून चालेल? प्रत्येकाचे काही ना काही मत असू शकतेच ना..!’ असे जावेद यांचे ठणकावून सांगणे.
जावेद यांच्या या सांगण्याला अनुलक्षून प्रश्न येतो तो सभोवतालच्या घटनांबाबत समाज मौन असण्याचा! त्यावरील जावेद अख्तर यांचे उत्तर सामान्य माणसावर विश्वास दाखवणारे. ‘सामान्य माणूस- मग तो कुठल्याही जाती-धर्माचा असो, कुठल्याही प्रदेशातील असो- आपल्या आयुष्याशी झुंजण्यात पूर्णपणे गुंतलेला असतो. घर, कुटुंब, मुलांच्या शाळांची फी, किराणामालाचा खर्च अशा गोष्टींमध्ये तो इतका व्यग्र असतो की त्याला इतर गोष्टी करण्यासाठी हाती ना वेळ उरतो, ना ताकद. त्याला स्वत:ला काही मते नसतात असे मुळीच नाही. पण त्याचा सगळा वेळ जातो तो रोजच्या जगण्यातील गणिते सोडवण्यात.. आणि आहे ते आयुष्य आणखी चांगले कसे होईल यासाठी प्रयत्न करण्यात. हा सामान्य माणूस गडबड करत नाही. कुठेतरी जाऊन पुतळाच फोड, दुकानांवर दगडफेक कर, बसला आग लाव असले प्रकार तो करीत नाही. असे प्रकार करणारे माथेफिरू लोक प्रत्येक समाजात असतात आणि ते यापुढेही असणारच. पण या माथेफिरूंची संख्या एकतर कमी असते. आणि ते केंद्रस्थानी नसतात. त्यांची जागा दूर एका कोपऱ्यात. त्यांना केंद्रस्थानी आणण्यात हात कुणाचा? तर सामान्य माणसाचा मुळीच नाही. तो हात राजकारण्यांचा. राजकारणी मंडळींच्या मदतीखेरीज हे असे माथेफिरू लोक केंद्रस्थानी येऊच शकत नाहीत..’ हे जावेद यांचे निरीक्षण.
जावेद अख्तर स्वत: नास्तिक. सत्य-असत्याला मन ग्वाही करूनच पाऊल टाकणारे. अशा या सत्य-असत्याला ग्वाही ठेवण्याच्या प्रक्रियेत ‘धर्म’ या संकल्पनेचे स्थान काय? त्यावर जावेद यांचे नि:संदिग्ध सांगणे.. ‘धर्म असावा, पण तो वस्तुसंग्रहालयात!’ मग त्याच ओघात एका व्यक्तीच्या वागण्यापासून ते कोटय़वधी लोकांच्या वर्तनावर क्ष-किरण ते टाकतात.. ‘आपण वाईट गोष्टींना गोंडस नावे देण्यात पटाईत आहोत. म्हणजे कुठे स्त्रियांवर अन्याय होत असेल, त्यांच्या अधिकारांवर गदा येत असेल, तर ते ‘कुटुंबाची प्रतिष्ठा’ या नावाखाली दडपून टाकायचे. उद्योगविश्व काही ठरावीक खासगी उद्योगांच्या हाती देत असू, तर त्याला ‘खासगीकरण’ नाही म्हणायचे. शब्द खटकतो ना हा. म्हणून मग त्याला ‘अर्थव्यवस्था खुली केलीय’ म्हणायचे. एखाद्या देशातील तेलावर डोळा ठेवून हल्ला करायचा तर त्यासाठी निमित्त पुढे करायचे की, त्या देशात जगाचा संहार करण्याची ताकद असलेली अस्त्रे आहेत. त्यासाठी आम्ही हल्ला करतोय. त्याला नाव द्यायचे- दहशतवादाविरोधातील लढाई.. वॉर ऑन टेरर.
‘याच अनुषंगाने बघा, की विश्वास आणि श्रद्धा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. विश्वास तर्काच्या कसोटीवर घासून बघता येतो, त्याची सिद्धता होऊ शकते, तो थेट अनुभवता येऊ शकतो. श्रद्धेला पुरावा लागत नाही, तर्क लागत नाही, सिद्ध करण्याच्या पलीकडे ही गोष्ट आहे, असे सांगितले जाते. मग ही अशी श्रद्धा म्हणजे वेडेपणा नाही तर दुसरे काय? ‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते’ हे सांगणाऱ्या गॅलिलिओला सोळाव्या शतकात लोक फासावर चढवायला निघाले होते. मी त्या लोकांना वेडे म्हणणार नाही. कारण त्यावेळी त्यांच्याकडे असलेले ज्ञान हे ‘सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असेच होते. मात्र, आज नासामध्ये काम करणारा एखादा शास्त्रज्ञ मंगळावर जाणारे यान तयार करतो आणि नंतर चर्चमध्ये जातो, हा शुद्ध वेडेपणा आहे. याचा अर्थ तो विसंवादी जगणे जगतोय असा काढायला हवा. ही अशी गोष्ट एखाद्याच्या बाबतीत होत असेल तर त्याला स्किझोफ्रेनिया झाला आहे असे म्हणू शकतो आपण. पण कोटय़वधी लोकांबाबत तसे होत असेल तर काय म्हणणार त्याला? संख्या ही मूर्खपणाला कधी कधी प्रतिष्ठा देते ती अशी..’
या रसाळ गप्पांच्या समारोपाकडील एक प्रश्न खरे तर हिंदी चित्रपट संगीतासंदर्भात विचारला गेलेला. ‘दुय्यम-तिय्यम दर्जाची गाणी हे चित्रपटवाले आमच्या माथी का मारतात?’ असा तो प्रश्न. मात्र, त्याचे उत्तर देताना जावेद अख्तर परखड शब्दांत झाडाझडती घेतात ती सत्तावर्तुळाची. ‘लोकांना हिणकस गाणी आवडतात म्हणून आम्ही ती देतो.. त्याचसाठी आयटम साँग्ज देतो, हे चित्रपटवाल्यांचे म्हणणे निखालस चूक आहे. मास कम्युनिकेशनच्या क्षेत्रातील लोकांची- मग ते राजकारणी असोत वा चित्रपट क्षेत्रातील लोक- सामान्य भारतीय माणसाला हिणकसच पसंत पडते अशी धारणा का झाली आहे, ते समजायला मार्ग नाही. आपण काही चांगले, योग्य केले, बोललो, तर ते लोकांना आवडणार नाही असं त्यांना वाटतं. सामान्य माणसाबाबत त्यांचं इतकं वाईट मत का? आता आपल्याकडील तोंडी तलाक पद्धतीचेच बघा ना. तलाकचा इतका अन्याय्य आणि भयंकर कायदा पाकिस्तानात, बांगलादेशातही नाही. पण भारतातील सरकारे तो बदलत नाहीत. का? तर सामान्य मुसलमानांना वाईट वाटेल म्हणून! अरे, नाही वाटणार त्यांना वाईट. सामान्य मुसलमान आणि मुल्ला-मौलवी यांच्यातील फरकच त्यांना कळत नाही. सनातन संस्थेचे उदाहरण घ्या. सरकार तिच्यावर बंदी नाही आणणार. का? तर सामान्य िहदू माणसाला ते पसंत पडणार नाही म्हणून. अरे, कुणी सांगितले तुम्हाला असे? तुमच्या धारणाच सामान्य भारतीयांच्या बाबतीत चुकीच्या आहेत..’ जावेद ठाम शब्दांत स्पष्टपणे बजावतात.
‘धर्माचा विषय निघाल्यापाठोपाठ त्याला जोडूनच प्रश्न येतो तो समान नागरी कायद्याबाबतचा. आपल्या देशात धर्म, जाती, पंथ, समूह यांची संख्या खूपच मोठी आहे. प्रत्येकाच्या परंपरा वेगळ्या, रीतीभाती वेगळ्या. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, पारशी अशा विविधधर्मीयांचे स्वत:चे असे वैयक्तिक कायदे आहेत. त्यात मुख्यत: भेद आहेत ते विवाह, वारसा आणि घटस्फोट या मुद्दय़ांवर. त्यात हिंदू वैयक्तिक कायदा हा तुलनेत काळासोबत बदलत, प्रगत होत आला आहे. अशा स्थितीत या सगळ्या धर्माना सामावून घेणारा एकच एक कायदा करणे तसे कठीणच आहे. पण व्यक्तिगत पातळीवर तुम्ही तसे करू शकता की! माझेच उदाहरण घ्या. मी स्वत: समान नागरी कायद्याला अनुसरूनच जगतोय. माझा घटस्फोट झालाय. मुस्लीम वैयक्तिक कायदा- जो अतिशय प्रतिगामी आहे- सांगतो की घटस्फोटानंतर विभक्त पत्नीला मदत करण्याची जबाबदारी पतीवर केवळ चार महिने असते. त्यानंतर त्यांचा संबंध संपला. पण मी तसे केले नाही. विभक्त पत्नीप्रती असलेली माझी जबाबदारी मी आयुष्यभर निभावत राहिलो.. आणि यापुढेही निभावणार आहे. अडचणीच्या प्रसंगी तिच्यामागे मी उभा राहणारच. ती माझी नैतिक जबाबदारी मानतो मी. वारसाहक्काचे घ्या. मुस्लीम वैयक्तिक कायद्यानुसार वारसा संपत्तीमधील दोन-तृतीयांश वाटा मुलाला आणि एक-तृतीयांश वाटा मुलीला अशी वाटणी त्यात केलेली आहे. पण मी माझा मुलगा आणि मुलगी या दोघांना समान वाटाच देईन.. कदाचित मुलीला अधिकही! तर अशा सगळ्या स्थितीत समान नागरी कायदा झाला तर उत्तमच! पण नाही झाला तरी एक गोष्ट नक्कीच करता येईल. व्यक्तिगत कायदा आणि देशाची घटना यांच्यात जर संघर्षांचा प्रसंग आला तर कुणाचीही काहीही परंपरा असो, प्रथा असो, राज्यघटनाच सर्वोच्च असेल, असे ठामपणे आपल्याला ठरवता येईलच. आणखी एक गोष्ट.. जे लोक समान नागरी कायद्याचा आग्रह धरत आहेत त्यांनी आपल्या स्वत:च्या संपत्तीची वाटणी मुला-मुलींत समान रीतीनेच करायला हवी. तसे करणार नसाल तर मग समान नागरी कायद्यावर फुकाच्या गप्पा मारू नका..’ असे ठणकावत यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तराचा समारोप जावेद करतात.
या रसाळ गप्पामफलीचा समारोप होतो तो.. ‘यह खेल क्या है..’ आणि ‘यह वक्त क्या है..’ या त्यांच्या कवितांनी. पूर्णपणे वेगवेगळा गाभा असलेल्या या कविता. गप्पांना पूर्णविराम मिळाल्यानंतरही दीर्घ काळ मनात रेंगाळत राहतात जावेद अख्तर यांच्या कवितेतील या ओळी..
‘मं इन सवालों से जाने कब से उलझ रहा हूं
मिरे मुखालिफने चाल चल दी है
और अब मेरी चाल के इंतजार में है..’
सलीम-जावेद जोडी..
‘चला, चित्रपटांसाठी आपण एकत्र काम करू या, असे काही ठरवून मी आणि सलीम खान यांनी काम सुरू केले नव्हते. मी १९६४ मध्ये वयाच्या एकोणिसाव्या वर्षी मुंबईत आलो. इथे आल्यावर एका चित्रपटासाठी लिखाण करीत होतो. पगार महिना शंभर रुपये. आणि त्यात सलीम यांची भूमिका होती. त्यादरम्यान आमची मैत्री झाली. खरे तर ते वयाने माझ्यापेक्षा मोठे. त्यामुळे आमची मैत्री बरोबरीची अशी नव्हती कधी. तर त्यावेळी आम्ही दोघेही बेरोजगार होतो. वांद्रय़ाला कार्टर रोडवर बसून आम्ही कथा लिहायचो, पटकथा लिहिण्याचा प्रयत्न करायचो. तेव्हाचे एक नामवंत चित्रपटकार नरेंद्र बेदी यांच्याकडे आम्ही काम मिळवण्यासाठी गेलो. साडेसातशे रुपये महिना पगारावर नोकरीला लागलो त्यांच्याकडे. जवळपास पाच-सहा वर्षे काम केलं तिथे एकत्र. त्यानंतरही आम्ही दोघांनी मिळून अनेक चित्रपट लिहिले. त्यातील जवळपास सगळेच तुफान चालले. मग आम्ही वेगळे का झालो? तर मुळात एकत्र लिहिणे ही सोपी गोष्ट नाही. तो काही व्यापार नाही, की तू इतके काम केले आहेस तर तुला इतके टक्के नफा, मी इतके केले तर माझा वाटा इतका, असे. लिखाणाची प्रक्रिया गुंतागुंतीची असते. आणि महत्त्वाचे म्हणजे माणूस बदलत जातोच ना काळासोबत. त्याचा दृष्टिकोन बदलतो.. विचार बदलतात. आणि तुमचे एकमेकांसोबत फार चांगले नसेल जमत, तर आपापल्या वाटेने निघून जाण्यात गैर काहीच नाही. त्याचं दु:ख काय करीत बसायचं? उलट, जितका काळ एकत्र होतो त्याचा आनंद मानणं अधिक श्रेयस्कर.. ‘वह अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन, उसे एक खूबसूरत मोड दे कर छोडना अच्छा..’
आयटम साँग्जमुळे समाज कसा बिघडेल?
‘हिंदी चित्रपटांतील वाह्य़ात, अश्लील गाणी, आयटम साँग्जमुळे समाजावर विपरीत परिणाम होतो आहे, तो बिघडतो आहे, हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. मी स्वत: असल्या गाण्यांचे समर्थन कधीच करणार नाही. पण असल्या गाण्यांमुळे समाज बिघडतोय असे चुकीचे निदान करू नका. उलट, समाज बिघडला असल्यामुळेच अशी हिणकस गाणी येत आहेत. हा तोच समाज आहे- ज्या समाजाने ‘दो बिघा जमीन’, ‘श्री ४२०’ सारखे चित्रपट डोक्यावर घेतले होते. आज ‘दो बिघा जमीन’ दोन दिवसही चालणार नाही. समाजाची अभिरुची घसरली आहे. काही वर्षांपूर्वी प्रचंड लोकप्रिय झालेल्या ‘चोली के पिछे क्या है..’ या गाण्याचेच उदाहरण घ्या. त्याबद्दल दोषी कुणाला मानायचे? ते गाणे लिहिणाऱ्याला? त्यास संगीत देणाऱ्याला? त्या चित्रपटाच्या निर्मात्याला? दिग्दर्शकाला? अभिनेता-अभिनेत्रीला? नाही. हे गाणे ज्या प्रेक्षकांमुळे लोकप्रिय झाले ते प्रेक्षकच त्यासाठी दोषी आहेत. कित्येक घरांमध्ये ‘बघा, आमची लहान मुलगी या गाण्यावर कशी छान नाचते..’ असे सांगत मुलीला नाच करायला लावणारे पालक मी पाहिले आहेत. यावर काय बोलायचे! म्हणजे तुम्ही तुमच्या घरात कधी कवितेचे पुस्तक नाही आणणार.. मुलांसमोर कधी कविता म्हणणार नाही.. त्यांना चांगले संस्कार देणार नाही. आणि खापर मात्र फोडणार गाण्यांवर! तुमची अभिरुची हीन झालीय, तुमच्या भाषेचा कस कमी होतोय, याला चित्रपट दोषी कसे? एक आकडेवारी सांगते की, आपल्याकडील दर पाच बलात्कारांपैकी चार बलात्कार हे ग्रामीण भागात होतात. का बुवा? तिकडे तर संस्कार, परंपरा यांचा बोलबाला आहे. मग? हे संस्कार कसले? स्त्रियांना तुच्छ लेखण्याचे.. त्यांना माणूस म्हणूनही जमेत न धरण्याचे. हा जो स्त्री-पुरुष भेदभाव आहे ना, त्याने सामाजिक प्रदूषण वाढतेय. हे असले सडलेले, किडके विचार, संस्कार आपण फेकून द्यायला हवेत.
जबाबदार पालक..
प्रत्येक बाप आणि मुलगा यांच्यात एक अजब असे तिढय़ाचे नाते असते. प्रत्येक मुलाला वाटत असते की, आपला बाप आभाळाएवढा उंच असावा.. पण मी त्याच्यापेक्षाही उंच व्हावे. आणि प्रत्येक बापाला वाटत असते की, माझ्या मुलाने खूप कर्तृत्ववान व्हावे. पण माझ्यापेक्षा मोठे नाही.. हे नाते फार गमतीदार आहे. अर्थात जो मुलगा सतत बापाच्या छायेत राहील तो कधीच एका मर्यादेपलीकडे जाऊ शकणार नाही. मोठे व्हायचे असेल तर मुलाने बापापासून एक ठरावीक अंतर राखायलाच हवे. आमच्याकडे फरहान आणि झोया ही दोघं वयात आल्यानंतर एक दिवस मी त्या दोघांना सांगितले की, आता तुमचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईल. त्यापुढे काय करायचे, हे तुमचे तुम्ही ठरवा. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. त्यासाठी शक्य ती मदत मी करेन. ते माझे कर्तव्य आहे. पण एका गोष्टीत मात्र पालकांनी मुलांना अजिबात सल्ला देऊ नये. ते म्हणजे लग्न. लग्न ही गोष्ट मुळात मोठे झाल्यावर करतात. ज्याला कुणाशी लग्न करावे हेही समजत नसेल त्याने लग्नच करू नये..
खलनायक लोकप्रिय का?
‘शोले’मधील गब्बर घ्या, ‘मिस्टर इंडिया’मधील मोगँबो घ्या, किंवा जुन्या चित्रपटांतील इतर खलनायक घ्या- आज असे छान खलनायक उरले नाहीत ही बाब सोडून द्या; पण या खलनायकांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांचे संवाद लिहिण्यात मजा यायची. प्रेक्षकांना खलनायक इतके का भावतात? साधी गोष्ट- लहान मुलगे जेव्हा बागेत जातात तेव्हा सगळ्यात आधी त्यांना वाघ बघायचा असतो, अजगर बघायचा असतो. मला वाटतं, माणसाच्या आतमध्ये जी एक कुप्रवृत्ती असते तिच्या स्वातंत्र्याचे प्रच्छन्न दर्शन खलनायक पडद्यावर करीत असतात. त्याला मिळालेलं प्रच्छन्न स्वातंत्र्य कदाचित प्रेक्षकांना भावत असावं. म्हणून ते लोकांच्या पसंतीस पडत असावेत.’
राजीव काळे – rajiv.kale@expressindia.com