दक्षिण आफ्रिका या देशाची भारतीयांना असलेली ओळख महात्मा गांधी आणि क्रिकेट याच्यापलीकडे जात नाही. प्रवासाला जायचेच तर युरोप सर्वात आधी डोळ्यासमोर येते. पण दक्षिण आफ्रिकेने गेल्या काही वर्षांत पर्यटनाचे एक अत्यंत आकर्षक केंद्र म्हणून जी नवी ओळख मिळवली आहे, ती सगळ्यांनीच समजून घेतली, तर एका वेगळ्या, आकर्षक आणि चित्तवृत्ती उल्हसित करणारे पर्यटन केल्याचा आनंद मिळण्याची शक्यता अधिक आहे. जंगलांचा देश अशी या देशाची जी खूण होती, ती अधिक गडद करताना, या देशाने परदेशी पर्यटकांच्या आनंदाची जी काळजी घेतली आहे ती कौतुकास्पद म्हणावी अशी. जंगली प्राण्यांचा आवास असणारी शेकडो जंगले दक्षिण आफ्रिकेमध्ये खासगी मालकीची आहेत. पाचशे ते हजारो हेक्टर जमिनींवरील या जंगलांची आणि तेथील प्राण्यांची निगा राखणे, हा या देशातील एक प्रमुख उद्योग झाला आहे. याला जोडूनच पर्यटकांना आकर्षून घेणाऱ्या अनेकविध गोष्टी तेथे विकसित झाल्या आणि पर्यटकांना अधिक काही मिळण्याची व्यवस्था झाली.
दक्षिण आफ्रिकेतही श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी खूप मोठी आहे. विशेषत: गोरे आणि काळे यांच्यामध्ये ही दरी अधिक स्पष्टपणे जाणवते. निग्रोंना गुलाम म्हणून आणून ब्रिटिशांनी आपली वसाहत निर्माण केली. अनेक दशके ही गुलामगिरी तेथे चालूच होती. वर्णसंघर्षांविरुद्ध तेथे महात्मा गांधी यांनी आवाज उठवला आणि नंतर तेथील सामाजिक अभिसरण मोठय़ा प्रमाणावर घडले. कृष्णवर्णीयांना आपल्या हक्काची जाणीव झाली आणि त्यासाठी नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी दीर्घ लढा दिला. मात्र त्यात यश मिळण्यासाठी बराच काळ जावा लागला. मंडेलांकडे या देशाचे नेतृत्व आल्यानंतर कृष्णवर्णीयांना नव्याने ओळख मिळाली. त्यातून संपन्न जगण्याची उर्मीही आली. परिणामी गुलामगिरीच्या जोखडातून मुक्ती मिळण्यासाठी त्यांनीही मनापासून प्रयत्न सुरू केले. भारतासारखा अॅट्रॉसिटीचा कायदा तेथे अतिशय काटेकोरपणे पाळला जातो. त्यामुळे कृष्णवर्णीयांविरुद्ध गोऱ्यांना निदान जाहीरपणे असंतोष व्यक्त करणे अवघड होऊन जाते. तेथे या कायद्याचा गैरवापर होत असल्याची तक्रार मात्र अजिबातच नाही!
लोकसंख्या साडेपाच कोटीच्या आसपास आणि भूभाग मात्र एक लाख चौरस किलोमीटर. दक्षिण अटलांटिक आणि भारतीय समुद्राचा २५०० किलोमीटरचा किनारा आणि विशिष्ट हवामान यामुळे या देशात पर्यटनाचा आनंद काही आगळा असतो. सोने आणि अन्य खनिजांचा भरपूर साठा, शिवाय नव्या उद्योगांसाठी पोषक वातावरण यामुळे या देशातील रँड हे चलन भारतीय चलनाच्या पाचपट अधिक आहे. शाळेतल्या पाठय़पुस्तकांमध्ये वाचलेले ‘केप ऑफ गुड होप’ म्हणजे नेमके काय, हे पाहण्यासाठी मात्र तुम्हाला प्रत्यक्षात केपटाऊन या शहरातच तळ ठोकायला हवा. आधुनिकतेचा चेहरा असलेले हे शहर सर्व सुखसोयींनी समृद्ध तर आहेच, परंतु परिसरातील अन्य अनेक गोष्टींसाठी तिथे अधिक काळ राहणे सुखकारक आहे. दोन्ही समुद्र मिळतात, ते दक्षिण आफ्रिकेचे शेवटचे टोक म्हणजे केपटाऊन. त्या टोकापर्यंत जाण्यासाठी डोंगरमाथ्यावर असलेल्या विस्तीर्ण पठारांवरून जावे लागते. विशिष्ट हवामानामुळे त्या पठारावर उगवणाऱ्या अनेकविध वनस्पतींची जपणूक करण्यासाठी तयार केलेल्या राष्ट्रीय वनस्पती उद्यानातून जाताना त्या देशाचे या नैसर्गिक संपत्तीकडे असलेले लक्षही जाणवते. प्रत्यक्षात ‘केप ऑफ गुड होप’ या ठिकाणी समुद्राची अथांगता पाहिल्यानंतर कुणालाही हरखून जायला होते.
पर्यटकांना सर्वात आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे उत्तम चवीचे अन्न. मांसाहार करणाऱ्यांची तर तेथे अक्षरश: चंगळच. विविध पद्धतीने तयार केलेले हे पदार्थ जिव्हालालित्य आणि नव्या चवीची अपूर्वाईही दाखवतात. शहरे आणि छोटय़ा गावांमधील छोटी छोटी हॉटेल्स इतकी सुंदर सजवलेली असतात. पर्यटकांना तेथे मिळणारे अन्नही प्रेमाने खाऊ घालण्यात हॉटेल चालकांना कमालीचा आनंद असतो.
ब्रिटिशांनी या देशात आपले बस्तान बसवल्यानंतर तेथील सगळ्या शहरांना आपोआप नवी ओळख मिळाली. जुन्या ब्रिटिश पद्धतीचे बंगले आणि डोंगरांच्या माथ्यापर्यंत बांधलेली घरे हे या शहराचे वैशिष्टय़. घरांचे रंगही असे, की रस्त्याने जातानाही लक्ष वेधून घ्यावे. कमालीची स्वच्छता राखणाऱ्या या देशात हिंडणे हा अनुभव त्यामुळेच अधिक सुखदही होतो. डोंगराच्या कुशीत असलेल्या या शहराला आता पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. पण त्यातूनही मार्ग काढत या शहराने आपली ऐतिहासिक ओळख जपतानाच तिला आधुनिकतेचा मुलामा अगदी अलगदपणे दिला आहे. घरांपर्यंत जाणारे छोटे रस्ते आणि शहराच्या मुख्य बाजारपेठेतील भव्य रस्ते असा मिलाफ तेथे दिसतो. उपनगरांमध्ये उंचच उंच इमारतींऐवजी बैठय़ा बंगल्यांचे प्रमाण अधिक, तर शहराच्या मध्य भागात पाश्चात्त्य धाटणीच्या अनेक गगनचुंबी इमारती असे क्वचित दिसणारे हे मिश्रण या शहरात अनुभवायला मिळते. या शहराच्या परिसरात पर्यटकांना आवडणाऱ्या अनेक केंद्रांचा समावेश आहे. जगातील सर्वात मोठी आणि जुनी केबल कार तिथे आहे. सुमारे तीन हजार फुटांवरील डोंगरात या विजेरी पाळण्यातून अलगदपणे जाणे हा विलक्षण अनुभव वर गेल्यानंतर तेथे विकसित केलेल्या उद्यानामुळे द्विगुणित होतो. केपटाऊनमध्ये गेल्यानंतर केबल कारमध्ये न बसणे हा गुन्हा वाटावा, इतकी ही सफर आनंददायी असते. समुद्र आणि डोंगर यांच्या कुशीतील या शहरात नव्याने आकर्षण ठरते ते हेलिकॉप्टर सफारीचे. समुद्रावरून फिरणाऱ्या हेलिकॉप्टरमधून हे शहर किती देखणे आहे, हे लक्षात येते. भारतात अशा सोयी फारच कमी ठिकाणी आहेत. आणि जेथे आहेत, तेथे केवळ तेवढय़ासाठीच जावे लागते. पेंग्विन कॉलनी हा केपटाऊन परिसरातील आणखी एक सुखद अनुभव. समुद्राच्या काठाशी वसलेली ही कॉलनी म्हणजे पक्षीजगतातील एक अपूर्व अशी गोष्ट. कमी उंचीचे हे पेंग्विन याच भागात वास्तव्याला आहेत आणि त्यांचे हे वास्तव्य सुखाचे होण्यासाठी तेथे भरपूर प्रयत्नही केले जातात. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनच्या परिसरात या सगळ्याच गोष्टी एकत्रितपणे अनुभवता येतात आणि त्यामुळे पर्यटनात अधिक वैविध्यही येते.
दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नापैकी नऊ टक्के केवळ पर्यटनातून मिळतात. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या देशात विविध पातळ्यांवरून सातत्याने प्रयत्न होत असतात. मात्र वैशिष्टय़ असे की, त्याला तेथील नागरिक संपूर्णपणे सहकार्य करतात. आपल्या देशातील पर्यटनस्थळे अतिशय नीटनेटकी ठेवणे हे त्यांना आपले कर्तव्य वाटते. कचरा न करणे आणि तेथील भिंतींवर काहीबाही न लिहिणे ही तेथील लक्षात येणारी नागर संस्कृती आहे. सगळ्यांना सहज समजतील असे फलक आणि त्याहून आतिथ्यशील कर्मचारी यामुळे कोणत्याही ठिकाणी कोणतीही अडचण येत नाही. भारताने यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या एकूण भूभागापैकी ३७ टक्के (सव्वा कोटी हेक्टर्स) भाग जंगलांनी व्यापलेला आहे. एवढे जंगल असणारा हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश. जंगले आहेत, तर त्याचा पर्यटनासाठी उपयोग कसा करून घेता येईल, याचा जाणीवपूर्वक विचार तेथील राज्यकर्त्यांनी केला. त्यामुळे खाजगी क्षेत्रात जंगले विकसित करण्यास परवानगी देण्यात आली. तेथे वन्य प्राण्यांच्या निवासाचीही सोय करण्यास मान्यता देण्यात आली. साहजिकच हजारो हेक्टर्स जमिनीवर खाजगी उद्योगांनी शेकडो जंगले विकसित केली. मबुला हे असेच एक जंगल; सुमारे बारा हजार हेक्टर क्षेत्राचे. दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठे जंगल ‘कुर्ग नॅशनल पार्क’ या नावाने सरकारनेच विकसित केले आहे. एवढय़ा मोठय़ा जंगलातील वन्य प्राणी पाहायला जगभरातून हजारो प्रवासी तेथे जात असतात. जंगलाच्याच एका टोकाला पर्यटकांना राहण्यासाठी पंचतारांकित सुविधांची रिसॉर्ट तयार केली आहेत. साहजिकच जंगलात राहण्याचा अनोखा अनुभव आणि या प्राण्यांचे दुर्लभ दर्शन असा संयोग घडून येतो. मबुलामध्ये राहायचे, तर पहाटे उठून जंगल सफारीला बाहेर पडण्याची तयारी हवी. चित्रपटात दाखवतात, तशीच ही सफारी. तुमचे नशीब बलवत्तर असेल, तर जंगलातले प्राणी तुम्हाला सहजसुलभ दर्शन देतीलही. आधुनिक तंत्रज्ञानाने या प्राण्यांच्या गळ्यात ‘कॉलर’ घालून त्यांचा शोध घेणे सहजशक्य असले, तरीही तसे करण्यास व्यवस्थापनाचा विरोध असतो. अचानकता हा जंगल सफारीतील सर्वात विस्मयकारक अनुभव असतो. त्यामुळे सकाळी सहा ते नऊ आणि दुपारी तीन ते सहा असे सहा तास हिंडताना दूर कुठेतरी तुम्हाला सहजपणे जिराफ दिसू शकेल. बागडणारी हरणे हा तर नयनरम्य सोहळा. तो अवचित अवतरेल आणि सिंह, झेब्रा, हत्ती, गेंडे यांचे दर्शन घडणे मात्र नशिबाचा भाग असेल. प्राणी संग्रहालयात बंदिस्त असलेले हे प्राणी जंगलात त्यांच्या दिमाखात वावरताना पाहिल्याशिवाय, वन्यजीवांचे वेगळेपण लक्षातच येऊ शकत नाही. एखाद्या राजासारखे कुणाचाही मुलाहिजा न ठेवता सहजपणे िहडणारे हे प्राणी आपल्याला निसर्गाबद्दल अधिक अंतर्मुख व्हायला लावतात. या प्राण्यांच्या जपणुकीसाठी तेथील सरकारने कडक नियम केले आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र व्यवस्थाही केली आहे. त्यामुळे सहजपणे कुणीही शिकारीच्या हेतूने तेथे प्रवेश करण्याची शक्यता फारच कमी.
नीरव शांतता हे शब्द फक्त वाचण्यापुरतेच माहीत असतात. जंगलाच्या मध्यभागी वाहन थांबवून शांतपणे थांबल्यानंतर या नीरवतेचा आकळ होतो. जंगलातील प्राण्यांना ही अशी शांतता हवी असते, त्यामुळे त्यांच्या या स्वातंत्र्याचा संकोच होऊ न देता त्यांना निरखणे हा खरा आनंदाचा भाग असतो. दक्षिण आफ्रिकेतील जंगलांमध्ये तो मिळू शकतो. जंगलाचे वेड असणाऱ्यांनी तर या देशात जाणे त्यासाठीच अत्यावश्यक आहे. निसर्गाचा खराखुरा आनंद मिळवण्यासाठी मूळ स्वरूपातील जंगले पाहता यायला हवीत. ती तशी राखणे हेही कठीण काम. दक्षिण आफ्रिकेत या सगळ्याचे उद्योगात रूपांतर झाले. प्राण्यांची आयात – निर्यात, त्यांचे प्रजनन आणि संवर्धन, त्याबद्दलचे संशोधन अशा अनेक अंगांनी हा विषय तेथील सरकारने गंभीरपणे हाताळला आहे.
या देशातील रस्ते ही एक अनुकरणीय बाब आहे. संपूर्ण देशभर रस्त्यांचे जे जाळे उभारण्यात आले आहे, त्याने कोणाही भारतीयास आनंदच होईल. एकही खड्डा नसलेले भव्य रस्ते या देशात सर्वत्र दिसतात. महामार्गाच्या बरोबरीने देशांतर्गत रस्तेही अशाच पद्धतीने तयार करण्यात आले असल्याने दळणवळण हा या देशातील सर्वात सुखद अनुभव ठरतो. मुद्दामहून शहरांच्या आतल्या भागात हिंडल्यावर जे रस्ते पाहायला मिळतात, ते महामार्गाच्याच दर्जाचे असल्याचे लक्षात येते. हे आपल्यादृष्टीने आक्रितच!
प्रिटोरिया ही दक्षिण आफ्रिकेची अधिकृत राजधानी. शेजारीच असलेले जोहान्सबर्ग आधुनिकता आणि परंपरा यांचा संगम असलेले मोठे शहर.पर्यटकांना आवडतील, अशी जवळपासची अनेक ठिकाणे. जंगलांचा भागही याच परिसरात. त्यामुळे केपटाऊन ते जोहान्सबर्ग हा विमानाने दोन तासांचा प्रवास तुम्हाला एका नव्या जगाची ओळख करून देतो. या शहराच्या जवळच असलेले मारोपेंग हे ठिकाण वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्ध आहे. वीस लाख वर्षांपूर्वीचा मानवी सांगाडा तेथे सापडला आहे. जगात आजवर उपलब्ध असलेला हा सर्वात जुना अवशेष. सोन्याच्या खाणीतून सोने काढल्यानंतर त्यावरील प्रक्रियेसाठी चुनखडी हे खनिज अतिशय आवश्यक असते. सोन्याच्या शोधाबरोबरच तेथे चुनखडीचा शोध सुरू झाला आणि त्यासाठी खाणी खोदल्या जाऊ लागल्या. अशी खाण खणता खणता अचानकपणे एका प्राचीन गुहेचा शोध लागला. त्या गुहेत हा मानवाचा सर्वांत प्राचीन अवशेष आढळून आला. त्या गुहेत जाणे आणि आदिमानवाच्या काळातील वातावरणाचा अनुभव घेणे ही एक क्वचित मिळणारी संधी आहे. तो सांगाडा ही आता जागतिक महत्त्वाची गोष्ट असल्याने पाहायला मिळत नाही, मात्र तेथील १८ डिग्री सेल्सिअसच्या गारठय़ात त्या गुहेत प्रवास करण्याचा थरार अनुभवण्यासारखा आहे. त्या परिसरात मानवाच्या उत्क्रांतीचे महत्त्वाचे टप्पे दाखवणारे कायमस्वरूपी प्रदर्शन मांडण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्य़ाने उत्क्रांतीचे टप्पे समजून घेणे ही अधिक आनंदाची बाब ठरते.
सोन्याच्या खाणीत तळापर्यंत जाता येणे हाही एक सहसा न मिळणारा अनुभव दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात मिळू शकतो. जोहान्सबर्गपासून अध्र्या तासाच्या अंतरावर असलेल्या या भागाचे नावच मुळी ‘गोल्फ रीफ सिटी’ असे आहे. शंभर वर्षांमध्ये कित्येक लाख किलो सोने काढून झाल्यानंतर त्याच्या उत्खननाचा खर्च वाढू लागला, म्हणून तेथील सोन्याची खाण बंद करण्यात आली. मात्र त्या खाणीचे पर्यटन केंद्रात रूपांतर करून ते प्रेक्षणीय करण्यात आले आहे. ‘थीम हॉटेल’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणताना गोल्ड रीफ सिटीतील हे ठिकाण म्हणजे विस्मयकारक अनुभवाचा खजिना. या ठिकाणी कॅसिनोजची मोठी चलती असते. त्यामुळे जगभरातील अनेक पर्यटक या भागात मुक्कामाला येतात. चित्रपटात पाहिलेला कॅसिनो प्रत्यक्षात पाहणे हा आता नवा अनुभव नाही. पण पर्यटकांना गुंगवून ठेवणारे हे केंद्र ‘लांबून’ अनुभवण्यासारखे आहे खास.
‘हॉट एअर बलून’ हाही एक अतिशय वेगळा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला या देशात जावेच लागेल. प्रचंड आकाराच्या फुग्यात हवा भरून तो एकदा का आकाशत गेला, की नैसर्गिकरीत्या त्याची जी सफर घडते, त्यासाठी डोंगररांगांनी अडवलेला वारा आणि त्याच्या परिसरात शेकडो एकराची मोकळी जमीन अशी परिस्थिती आवश्यक असते. हॉट एअर बलूनसाठी जगातील एक उत्तम ठिकाण या देशात आहे. मारोपेंगच्या अगदी जवळ असलेले हे ठिकाण म्हणजे निसर्गाचा एक चमत्कार म्हणायला हवा.
अप्रतिम समुद्रकिनारा, उंचच उंच डोंगररांगा आणि डोंगरांच्या माथ्यावर असलेली भलीमोठी पठारे असा क्वचित दिसणारा भूगोल या देशात अनुभवायला मिळतो. पर्यटकांसाठी उत्सुक असलेले तेथील नागरिक आणि व्यावसायिक यामुळे दक्षिण आफ्रिकेला जाणे हा केवळ सुखद असा अनुभव होऊ शकतो. केवळ हटके अनुभव हवा असेल, तर परंपरेने जिथे सगळेच जण जातात, त्याऐवजी या देशात फिरून आलात, तर तुम्हाला अनुभवाने श्रीमंत झाल्याचा अनुभव नक्कीच मिळेल.
मुकुंद संगोराम mukund.sangoram@expressindia.com