मुंबईतील ‘प्रभात चित्र मंडळ’ ही फिल्म सोसायटी ५ जुलै रोजी सुवर्णमहोत्सवी वर्षांत प्रवेश करते आहे. त्यानिमित्ताने फिल्म सोसायटी चळवळीच्या वाटचालीचा आढावा घेणारा व भारतीय प्रेक्षकांमध्ये सिनेसाक्षरता वाढविण्यात सोसायटींची भूमिका आणि तिच्यासमोरची आव्हाने यांची चर्चा करणारा लेख..

‘चित्रपट ही या युगातील अत्यंत महत्त्वाची कला आहे’ हे विधान वारंवार मांडले जात असले, तरी ‘चित्रपट ही मुळात उत्तम मनोरंजन करणारी कला आहे’ हा जनसामान्यांच्या मनातील विचार पुसून टाकण्यात ते अजून यशस्वी झालेले नाही. आणि ही परिस्थिती आजची नाही. चित्रपट सुरू झाला तेव्हापासूनचा हा वादाचा मुद्दाआहे. मनोरंजन करणाऱ्या, दुसऱ्या शब्दांत लोकप्रिय आणि यशस्वी चित्रपटांच्या स्पर्धेत निखळ कलात्मक चित्रपट हे बव्हंशी मागेच पडत असल्याचे दृश्य पूर्वीपासून आजपर्यंत दिसत आले आहे. चित्रपट ही एकमेव अशी कला आहे जी जन्मल्यापासूनच व्यवसायाच्या विळख्यात सापडलेली आहे. मात्र या विळख्यातून सुटण्याची धडपडदेखील अनेक कलावंतांनी सातत्याने केली आहे. असे प्रयत्न संख्येच्या दृष्टीने अल्प असले तरी त्यांचे महत्त्व नाकारता येत नाही. मात्र असे प्रयत्न पुरेशा प्रेक्षकांच्या पाठिंब्याशिवाय अनेकदा अयशस्वी ठरले आहेत.

कलात्मक चित्रपटांना प्रेक्षक मिळत नाहीत आणि प्रेक्षक मिळाल्याशिवाय अशा चित्रपटांची मोठय़ा प्रमाणावर निर्मिती होऊ  शकत नाही, असे हे दुष्टचक्र आहे. हे भेदण्याचा उपाय म्हणजे सामान्य प्रेक्षकाची चित्रपट कलेबद्दलची जाण वाढविणे हाच आहे, हे सिनेमासंबंधी गंभीरपणे विचार करणाऱ्या अभ्यासकांच्या आणि कलाकारांच्या ध्यानात आले आणि ‘फिल्म सोसायटी’ या संस्थेची निर्मिती झाली. १९२४ मध्ये ‘फिल्म क्लब’ या नावाने फ्रान्समध्ये तर १९२५ साली ‘फिल्म सोसायटी’ या नावाने इंग्लंडमध्ये कलात्मक सिनेमाला पाठिंबा देण्यासाठी ही चळवळ सुरू झाली. इंग्लंडमधील फिल्म सोसायटीत एच. जी. वेल्स, जॉर्ज बर्नार्ड शॉ अशा लेखकांचा समावेश होता, ही नोंद घेण्यासारखी गोष्ट.

हळूहळू ही चळवळ युरोपभर आणि नंतर अमेरिका व कॅनडामध्येही पसरली. मात्र १९४० साली दुसऱ्या महायुद्धाच्या वावटळीत ती काहीशी मागे पडली. अनेक सोसायटय़ा बंद पडल्या. परंतु महायुद्ध संपले तशी या चळवळीने पुन्हा एकवार उभारी घेतली. भारतात फिल्म सोसायटीची चळवळ उभी करण्याचे श्रेय सत्यजित राय आणि चिदानंद दासगुप्ता यांना जाते. या दोघांनी काही समविचारी मंडळींच्या सहकार्याने १९४७ साली ‘कलकत्ता फिल्म सोसायटी’ची स्थापना केली. (काही अभ्यासकांच्या मते, मुंबईत १९३७ साली ‘Amature Film Society’ आणि १९४२ साली ‘बॉम्बे फिल्म सोसायटी’ अशा दोन संस्थांनी भारतात ही चळवळ सुरू केली. परंतु हे प्रयत्न अल्पायुषी ठरले.) ‘कलकत्ता फिल्म सोसायटी’ने मात्र मोठय़ा प्रमाणात कलात्मक चित्रपट सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे, अशा चित्रपटांत त्यांची रुची वाढविण्याचे काम हाती घेतले. चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलावंत आणि या कलेला वाहून घेणारे अभ्यासक सोसायटीला लाभल्यामुळे अल्पावधीतच एक उत्तम चळवळ आकाराला आली.

‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज् ऑफ इंडिया’ ची (ाारक) स्थापना १३ डिसेंबर १९५९ रोजी कृष्णा कृपलानी यांच्या घरी झालेल्या बैठकीत करण्यात आली. या वेळी ‘कलकत्ता फिल्म सोसायटी’, ‘दिल्ली फिल्म सोसायटी’, ‘पटना फिल्म सोसायटी, ‘बॉम्बे फिल्म सोसायटी’, ‘रुरकी फिल्म सोसायटी’ आणि ‘मद्रास फिल्म सोसायटी’ या सहा सोसायटींचे पदाधिकारी एकत्र आले होते. या संस्थेची उद्दिष्टे अशी होती – १) चित्रपटातील  सामाजिक शक्तीच्या व कलात्मक रूपाच्या अभ्यासाला चालना देणे. २) कलात्मक चित्रपटांच्या निर्मितीस प्रोत्साहन देणे. ३) या प्रकारच्या चित्रपटांविषयी जनतेत रुची निर्माण करणे. ४) सिनेमावरील संशोधनाला साहाय्य करणे.

फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून सत्यजित राय यांची निवड करण्यात आली. चिदानंद दासगुप्ता, विजया मुळे वगैरे मंडळी या फेडरेशनमध्ये विविध पदांवर होती. फेडरेशनने भारत सरकारच्या मदतीने  वेगवेगळ्या देशांतील अप्रतिम कलात्मक चित्रपटांचे आदानप्रदान करण्याचे मोलाचे कार्य केले. आतापर्यंत फक्त अमेरिकन आणि इंग्लिश / फ्रेंच सिनेमा प्रामुख्याने भारतीय प्रेक्षकाला ठाऊक होता. आता सुदूर देशांतील श्रेष्ठ कलावंतांचे चित्रपट पाहता येऊ  लागले. फेडरेशनच्या सहकार्याने आज साठहून अधिक देशांतील समांतर सिनेमा रसिकांना आणि अभ्यासकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. या फेडरेशनतर्फे प्रतिवर्षी सुमारे बारा फिल्म फेस्टिव्हलचे भारतभर आयोजन केले जाते.

महाराष्ट्रातील फिल्म सोसायटीच्या इतिहासात ‘प्रभात चित्र मंडळा’चे स्थान महत्त्वपूर्ण आहे. ही संस्था या वर्षी पन्नासाव्या वर्षांत पदार्पण करते आहे. १९६८ साली सुधीर नांदगावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थापन केलेली ही संस्था महाराष्ट्रातील अग्रगण्य फिल्म सोसायटी म्हणून आजही कार्यरत आहे. अभिजात चित्रपटाची गोडी प्रेक्षकांना लागावी यासाठी या संस्थेतर्फे सुरुवातीपासूनच अनेक वेगवेगळे कार्यक्रम राबविले जातात. अनेक चित्रपट महोत्सवांचे कल्पक आयोजन या संस्थेने केले आहे. आज नावारूपाला आलेला ‘मामी’ महोत्सव हे खरे तर ‘प्रभात’चेच अपत्य आहे. ‘प्रभात’तर्फे ‘वास्तव रूपवाणी’ या नावाचे चित्रपट कलेचा गंभीर विचार करणारे नियतकालिकही काढण्यात येते.

१९८५ साली स्थापन झालेल्या ‘आशय फिल्म क्लब’ या संस्थेचे या संदर्भातील कार्यही उल्लेखनीय आहे. सतीश जकातदार, मुकुंद संगोराम आणि त्यांचे समविचारी मित्र यांनी स्थापन केलेली ही संस्था पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. ‘लघुपट’ या चित्रपटाच्या काहीशा बाजूला पडलेल्या रूपाला व्यासपीठ मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य ‘आशय’ने केले. व्यावसायिक क्षेत्रात अजूनही लघुपटांना शिरकाव नाही हे ध्यानात घेऊन नव्या लघुपटांच्या स्पर्धा आयोजित केल्या, लघुपट महोत्सवही आयोजित केले. चित्रपट रसास्वाद शिबिरांबरोबर चित्रपटविषयक लेखन, पटकथा, समीक्षा यांविषयी कार्यशाळाही आयोजित केल्या.

चांगला सिनेमा हा प्रेक्षकाला जीवनाच्या अधिक जवळ घेऊन जातो आणि फिल्म सोसायटी रसिकाला चांगल्या सिनेमाच्या जवळ नेण्याचे कार्य करते. फिल्म सोसायटी चळवळीचे परिणाम मराठी चित्रपटांत आलेल्या मन्वंतरात स्पष्ट दिसून येतात. या चळवळीतर्फे जागतिक पातळीवरील असामान्य चित्रपटांची आणि नव्या नव्या प्रयोगांची माहिती मराठी कलावंतांना झाली. या कलेच्या विकसित रूपाचे आणि आपल्या मर्यादित वर्तुळाचे भान त्यांना आले. मराठी सिनेमात कधी नव्हे तेवढी विषयांची विविधता आणि ताजेपणा आज दिसतो आहे, त्यामागे असणारे फिल्म सोसायटींचे योगदान नाकारता येत नाही.

फिल्म सोसायटी चळवळ गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणावर विस्तारली आहे हे खरे असले, तरी या चळवळीने प्रामुख्याने मुंबई, पुणे, नाशिक अशा महानगरांतच मूळ धरले आहे असे दिसून येते. फेडरेशनने या संदर्भात बरेच प्रयत्नही केले आहेत, परंतु महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात, अगदी जिल्ह्य़ाच्या ठिकाणीसुद्धा ही चळवळ फारशी वाढू शकली नाही. सोसायटींची संख्या वाढली, पण सातत्याने कार्यरत अशा संस्था हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच आहेत. चळवळीशी संबंधित कार्यकर्त्यांनी यामागील कारणांचा विचार करायला हवा.

फिल्म सोसायटी चळवळीशी काही काळ मी संबंधित होतो. या संदर्भातील माझे दोन अनुभव बोलके आणि चळवळीसंदर्भात काही मुद्दय़ांचे स्पष्टीकरण करणारे आहेत. भारत सरकारने महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये ‘कॅम्पस फिल्म सोसायटी’ स्थापन करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. एफएफएसआयकडून अशा सोसायटींना सर्व ते सहकार्य केले जाते. एका विद्यापीठामध्ये कॅम्पस फिल्म सोसायटी उघडावी यासाठी मी दोन वर्षे पाठपुरावा केला. खूप प्रयत्नांनंतर ती स्थापन करण्यात मला यश मिळाले. तिथे मी तीन कार्यक्रमही केले, परंतु विद्यापीठातील कुणीही तिची पूर्ण जबाबदारी घेण्यास पुढे न आल्याने आणि बहुसंख्य प्राध्यापकांनी तिच्यात रस न दाखविल्यामुळे तिची प्रगती झाली नाही. असे का व्हावे? खरे तर उत्तम चित्रपटांचा प्रसार होण्यासाठी सामान्य प्रेक्षकांत ‘सिने साक्षरता’ वाढणे फार आवश्यक आहे. दुर्दैवाने सुशिक्षित आणि उच्चशिक्षित वर्गातही अशी सिनेसाक्षरता नाही, मुळात ती वाढावी अशी  निकड व कळकळही फारशी कुणाला वाटत नाही. यासाठी खास प्रयत्न करणे जरुरीचे आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या महाविद्यालयांत सोसायटीतर्फे भाषणे आणि चर्चा यांचे प्रात्यक्षिकासह कार्यक्रम घ्यायला हवेत. कारण श्रेष्ठ सिनेमाचे भावी प्रेक्षक हीच तरुण मंडळी आहेत. प्रौढ प्रेक्षक एकदम आपला ‘मार्ग’ बदलण्याची शक्यता कमीच. परंतु हे काम बाहेरची व्यक्ती करू शकत नाही. चित्रपट या कलेविषयी प्रेम आणि तिच्या प्रसारासाठी कार्य करण्याची ओढ असणारे अत्यंत तुरळक प्राध्यापक महाराष्ट्रात आहेत ही वस्तुस्थिती आहे. ती बदलली पाहिजे. आणखी एक, अशा कार्यक्रमांचे माध्यम शक्यतो मराठीच हवे. ग्रामीण व निमशहरी महाविद्यालयीन विद्यार्थी अजूनही इंग्रजीला बिचकतो हे वास्तव आहे. गेल्या काही वर्षांत फेडरेशन ‘मराठीतून चित्रपट रसास्वाद’ कार्यशाळांचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम राबवत आहे.

नांदेड येथे ‘मॅजिक लँटर्न फिल्म सोसायटी’ची स्थापना करून काही समविचारी मित्रांच्या सहकार्याने मी कलात्मक चित्रपट दाखविणे आणि त्यावर चर्चा असे काही कार्यक्रम केले. नांदेडसारख्या जिल्ह्यच्या गावात फिल्म सोसायटी स्थापन करण्यासाठी अनेक अडचणी येतात. चित्रपट दाखविण्यासाठी चित्रपटगृहे मिळत नाहीत. खाजगी जागांत प्रोजेक्टर, आसन व्यवस्था, आवाज यांची नीट सोय होत नाही. कार्यक्रमाचे खर्च भागवण्यासाठी प्रायोजक मिळवावे लागतात आणि ते सहजी मिळत नाहीत. (थोडय़ाफार फरकाने महाराष्ट्रात सर्वत्र हेच चित्र दिसते.) हळूहळू कार्यक्रमाला येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या घटत गेली व सोसायटी बंद पडली. ती बंद पडण्यामागे वर दिलेली कारणे तर होतीच, पण या सर्व कारणांपेक्षा सर्वाधिक महत्त्वाचे कारण म्हणजे एखादी संस्था उभी करण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो तो मी देऊ  शकत नव्हतो. माझ्या ध्यानात आले, की अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यासाठी त्यांच्यामागे झपाटलेली आणि निष्ठेने, मिशनरी वृत्तीने पूर्ण वेळ कार्य करणारी एखादी- नांदगावकर किंवा जकातदार यांच्यासारखी व्यक्ती हवी असते. अन्यथा प्रयत्न होतात व अडचणी आल्या म्हणून थांबतातही.

वास्तविक आज चित्रपट कलेचा अभ्यास करण्यासाठी आणि जाणीवपूर्वक आस्वाद घेण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. जगभरचे चित्रपट आता सी.डी. व इंटरनेटच्या माध्यमातून सहज उपलब्ध होऊ  शकतात. त्यांच्याविषयी माहिती, त्यांचे परीक्षण नेटवर शोधता येते. इतरही बऱ्याच सोयी उपलब्ध झाल्या आहेत. गरज आहे ती अशा अथक प्रयत्नांची.

विजय पाडळकर vvpadalkar@gmail.com