श्रीकांत मोघे

३० ऑक्टोबर १९६६ रोजी धि गोवा हिंदू असोसिएशननिर्मित, वसंत कानेटकर लिखित आणि मो. . रांगणेकर दिग्दर्शित लेकुरे उदंड जालीया म्युझिकल नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मुंबईच्या रवींद्र नाटय़ मंदिरात सादर झाला. या घटनेस आज रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने मराठी रंगभूमीवरील या आगळ्यावेगळ्या संगीतक नाटय़प्रयोगाबद्दल.. तो अजरामर करणाऱ्या श्रीकांत मोघे आणि दया डोंगरे या कलाकारांनी सांगितलेल्या या नाटकाच्या हृद्य आठवणी.. तसेच नंतरच्या काळात सुयोगने पुनश्च रंगभूमीवर आणलेल्या लेकुरेमध्ये राजशेखरची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या प्रशांत दामले यांचे या नाटकाबद्दलचे मनोगत..

actor Sudip Pandey died of heart attack
प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, इंजिनिअरींग सोडून आलेला सिनेविश्वात
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
kangana ranaut emergency movie ban in bangladesh
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बांगलादेशने घातली बंदी, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
jaideep ahlawat father died before paatal lok 2 release
‘पाताल लोक २’ प्रदर्शित होण्याआधी अभिनेता जयदीप अहलावतच्या वडिलांचे निधन
IIT Mumbai launched e postgraduate degree course for advanced education
आयआयटी मुंबईचा ‘ई-मोबिलिटी’अंतर्गत ई-पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू
renowned flautist pandit ronu majumdar creates guinness world record by performing at indian classical music event with 546 musicians
५४६ संगीतकारांचा सांगीतिक आविष्कार; ज्येष्ठ बासरीवादक पंडित रोणू मजुमदार यांचा विश्वविक्रम; ‘गिनीज बुक’मध्ये नोंद
Arvind Pilgaonkar passed away, Veteran singer-actor Arvind Pilgaonkar, Arvind Pilgaonkar ,
ज्येष्ठ गायक – अभिनेते अरविंद पिळगावकर यांचे निधन
Rajesh Khanna
सात वर्षे लिव्ह इन, अभिनेत्रींबरोबर अफेअर्सच्या चर्चा अन् डिंपल कपाडियांशी लग्न; राजेश खन्ना-अंजू महेंद्रूच्या लव्ह स्टोरीचा ‘असा’ झालेला शेवट

वसंत कानेटकर यांच्यासारखा श्रेष्ठ नाटककार, मो. ग. रांगणेकर यांच्यासारखा प्रतिभावंत दिग्दर्शक, बोलता बोलता गाण्यात शिरणं आणि गाता गाता चटकन् संवाद बोलणं हे लीलया साध्य करता येईल असे पं. जितेंद्र अभिषेकी यांचे नावीन्यपूर्ण संगीत अशा अनोख्या संगमातून रंगभूमीवर साकारलेल्या ‘लेकुरे उदंड जाली’ या नाटकाने माझ्या कारकीर्दीवर ‘चार चाँद’ लावले. एखादी भूमिका वाटय़ाला येणं आणि प्रेक्षकांच्या मनात त्याचा मोती होणं हा नटाच्या आयुष्यातील मोठा भाग्ययोग असतो. हा भाग्ययोग ‘लेकुरे’च्या माध्यमातून माझ्या वाटय़ाला आला.

‘नमस्कार.. श्रीकांत मोघे आपल्याला बातम्या देत आहे..’ हा दिल्ली आकाशवाणीवरून प्रसारित होणारा आवाज अनेकांच्या स्मरणात असेल. ही आकाशवाणीची नोकरी सोडून मी १९६१ साली मुंबईला आलो. मुंबईला आल्यानंतर मला लगेचच ‘वाऱ्यावरची वरात’ करायला मिळाले. हे नाटक खूपच जोरात चालले. त्या नाटकात मी भाईबरोबर (पु. ल. देशपांडे) अभिनय करीत होतो. ‘उगीच का कांता’ हे पद आणि पोवाडा म्हणत होतो. भाईची आणि माझी ओळख सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातली. मी किलरेस्करवाडीचा असल्याने शिक्षणासाठी सांगलीला आलो होतो. विज्ञान शाखेच्या पहिल्या वर्षांला असताना विलिंग्डन महाविद्यालयामध्ये एम. ए. करायला आलेल्या भाईशी माझी ओळख झाली. पुढे मी त्याच्या ‘अंमलदार’ नाटकाचा प्रयोग पुण्याच्या स. प. महाविद्यालयात केला होता. त्या नाटकाला वाळवेकर ट्रॉफी मिळाली होती. चित्रपट, नाटक आणि साहित्याबद्दलचे झपाटलेपण हे भाईचे आणि माझे मैत्रीचे सूत्र. ‘वाऱ्यावरची वरात’ने मला एकदम प्रकाशझोतामध्ये आणले.

१९६५ च्या सुरुवातीचा तो काळ. एकदा मी दादरच्या शिवाजी मंदिरहून निघून सध्या जेथे शिवसेना भवन आहे त्या रस्त्यावरून चहाची तल्लफ भागविण्यासाठी निघालो होतो. तेवढय़ात समोरून शिवाजी पार्कच्या दिशेने वसंतराव- म्हणजे प्रा. वसंत कानेटकर आले. शंतनुराव किलरेस्कर यांच्याप्रमाणे वसंतराव हे शिस्तीचे आणि टापटिपीचे व्यक्तिमत्त्व होते. त्यावेळी माझे ‘वाऱ्यावरची वरात’ खूप गाजत होते हे त्यांनाही माहीत होते. ते म्हणाले, ‘माझ्या डोक्यात एक नवं, वेगळंच नाटक घोळतंय- जे ‘लाइफ स्टोरी इन दि डिस्गाइज ऑफ म्युझिकल सटायर’ या पठडीतलं आहे. ‘वाऱ्यावरची वरात’मध्ये ते ‘उगीच का कांता’ वगैरे गातोस. पोवाडा गातोस. तेव्हा या नाटकात तू मुख्य भूमिका करावीस असं माझ्या डोक्यात आलंय. हे नाटक एका लेखकाच्या जीवनावर बेतलं आहे. एक अशी व्यक्तिरेखा- जिच्याकडे यश, पैसा, नाव आहे. समाजाला तिचं कौतुक आहे. असं सगळं आहे. भौतिक सुखांमध्ये सामान्यत: ज्या गोष्टी अत्यंत असोशीने हव्यात असं वाटतं त्या सगळ्या आहेत. पण खूप आवड असूनही अजून पदरी मूल नाही. अशी व्यक्तिरेखा माझ्या डोक्यात आकार घेते आहे. हे नाटक म्हणजेच ‘लेकुरे उदंड जाली’!

‘जीवन कुठंतरी अपूर्ण असल्याचं शल्य उराशी घेऊन जगणारं राजा-राणीचं हे कुटुंब. एकमेकांवर ती दोघं अपार प्रेम करतात. परंतु तरीही समाजाच्या दृष्टीने ती अपूर्णच असतात. हे अपूर्णत्व घेऊन जगणं त्या कुटुंबातील स्त्रीला फार अवघड जातं. पुरुष हा विषय हसून सोडून देऊ शकतो. परंतु त्या स्त्रीला समाज असं हसून सोडून देऊ शकत नाही. आसपासची माणसं तिला मूल नसण्यावरून टोचून बोलतात. मात्र, हे नाटक अत्यंत खेळकर पद्धतीनं रंगमंचावर सादर होईल. यातला ‘तो’ सगळी परिस्थिती हसण्यावारी नेत मिश्किलपणे हाताळतो आणि त्यातून त्या दोघांचं प्रेम अधिकच गहिरं होतं. नाटकाचा शेवट बाळाच्या आगमनाची चाहूल देत होतो..’ अशी या नाटकाची कथाच कानेटकरांनी मला सांगितली. त्यावर मी त्यांना म्हणालो, ‘मी आता कुठे ऐन तिशीत प्रवेश करतो आहे. समजा, माझ्यासारखा एखादा माणूस विशी-पंचविशीत प्रेमात पडला आणि त्याचं लग्न झालं. पुढे दहा वर्षे गेली तरी पस्तिशीत त्याने आपल्याला मूल नाही म्हणून गळा काढायचं काही कारण नाही. मूल न झाल्याने हताश होण्याच्या वयाला मी पोचलेलो नाही.’

‘गोवा हिंदूू असोसिएशन’मध्ये या नाटकाचे वाचन झाले. नाटकाच्या जुळवाजुळवीच्या धामधुमीत कानेटकरांनी मला, तू ‘माय फेअर लेडी’ हा चित्रपट नीट पाहून घे, असे सांगितले. त्यांच्या मनात युरोपियन स्टेजवरचं म्युझिकल पद्धतीचं नाटक होतं. मुळात संगीत नाटक हे मराठी रंगभूमीसाठी वैभवाचं लेणंच आहे. त्याची परंपरा अण्णासाहेब किलरेस्करांच्यापर्यंत मागे जाते. ‘संगीत शाकुंतल’मधील ‘अरे वेडय़ा मना तळमळसी’ हे गाणं आज भावगीत वाटावं इतकं सुरेल आहे. सहज, सोपी, मनाला भिडणारी रचना करणं अण्णासाहेबांना साध्य झालं होतं, असं ग. दि. माडगूळकर म्हणत. अशी संगीत नाटकाची उज्ज्वल परंपरा असलेल्या मराठी रंगभूमीवर ‘लेकुरे उदंड जाली’ करण्याचं आव्हान संगीतकार म्हणून पं. जितेंद्र अभिषेकी यांनी समर्थपणे पेललं. रंगमंचासाठी नव्या पद्धतीचं संगीत देताना ‘रेकॉर्डेड म्युझिक’वर (ध्वनिमुद्रित संगीत) गाणं म्हणायचं अशा पद्धतीचा मराठीमध्ये पहिल्यांदा प्रयोग या नाटकाने केला. भास्करबुवा बखले आणि गोिवदराव टेंबे यांच्यानंतर असा अभिनव प्रयोग करणारे सर्जनशील संगीतकार म्हणून अभिषेकीबुवांचे नाव घ्यावे लागेल. त्यांचे वडील आणि माझे वडील दोघेही कीर्तनकार. कीर्तनातून मांडली जाणारी गाणी ही गाणी नसायची, तर ते संवादच असत. कीर्तनाचे संस्कार माझ्यावर झाले असल्याने नकळत मला हा बाज माहीत होता. फक्त त्याचा साक्षात्कार व्हायला ‘माय फेअर लेडी’ कारणीभूत ठरला. त्यातच अभिषेकी आल्यामुळे ते अधिकच उत्कट होऊन माझ्यात मुरलं. आणि यातूनच ‘लेकुरे’चा फॉर्म तयार झाला. नाटकाचा नायक राजा ऊर्फ राजशेखर रंगमंचावर तोच मुळी पत्नी-मधुराणीला हाक मारत. मग जणू प्रेक्षक आणि मी यांतली भिंतच कोसळून पडते. हा सगळा प्रेक्षकवर्ग माझ्या घरातच बसला आहे हे लक्षात येऊन राजा त्यांना म्हणतो, ‘हॅलो, आज तुम्ही एकदम इतकी मंडळी आमच्याकडे?’

इथूनच म्युझिक ऱ्हिदमही सुरू होतो.

या नाटकानं मला काय दिलं, असा विचार केला तर असं सांगता येईल की, या नाटकानं नट आणि प्रेक्षक यांच्यातली दरी खरोखरच नाहीशी केली. प्रेक्षकांच्या मनात परकेपणा राहूच दिला नाही. प्रेक्षकांना केवळ नाटकातील कथानकानं आपलंसं न करता त्यांनाच नाटकाचा एक भाग करत त्यांना आपलंसं केलं. बोलता बोलता गाण्यात शिरणं किंवा गाता गाता संवाद सुरू करणं या पद्धतीचं नाटक यापूर्वी कधी झालंच नव्हतं. संगीतमय गद्य आणि हृद्य संगीत असं वेगळं मिश्रण या नाटकानं रंगभूमीला दिलं. नाटकाची मांडणी काव्यात्म ठेवण्याचं कसब मो. ग. रांगणेकर यांचं आहे. प्रेक्षकांना कह्य़ात घेणारं हे नाटक फार्सिकल अंगाने जाणारे आहे. प्रेक्षक धो-धो हसता हसता एक तरल अनुभव घेऊन जातात, हे रांगणेकर यांचं दिग्दर्शकीय कौशल्य ठरलं.

‘लेकुरे उदंड जाली’ नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग ३० ऑक्टोबर १९६६ रोजी झाला. या नाटकात माझ्या पत्नीची- म्हणजेच राणी ऊर्फ मधुराणी ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी कल्पना देशपांडे ही अभिनेत्री निवडली गेली. एम. ए.ची विद्यार्थिनी असलेली कल्पना लोभसवाणी होती. मुख्य म्हणजे या नाटकाद्वारे तिने रंगमंचावर पदार्पण केलं. मात्र, गाणारी असल्याने तिचा आवाज चांगला होता. ती थोडी संकोची स्वभावाची होती. एका दृश्यात मी तिचा हात हातात घेतो आणि संवाद म्हणू लागतो. पण तिने कधी माझ्या हातातून आपला हात सोडवून घेतला ते मलाच कळलं नाही. तिचं लग्न झाल्यामुळे नाटक बंद पडलं. पुढे दया डोंगरे हिने माझ्याबरोबर यात काम केलं. ती ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’तून (एनएसडी) शिकून आलेली. त्यामुळे तिचा अभिनय उत्तम होता. आमची जोडी जमली आणि या नाटकाचे हजाराहून अधिक प्रयोग झाले. या दोन्ही वेगळ्या स्वभावाच्या कलावंत नाटकात असल्याने मलाही माझ्या अभिनयाचा बाज त्यांच्या रंगमंचीय स्वभावाप्रमाणे बदलावा लागला. हे मला ‘लेकुरे’मुळे करायला मिळालं. १९७८ मध्ये ‘लेकुरे उदंड जाली’चा अमेरिका दौरा झाला. त्यात न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया, बोस्टन, शिकागो, वॉशिंग्टन आणि टोरँटो येथे या नाटकाचे प्रयोग झाले. माझ्यानंतर हे नाटक पुन्हा रंगमंचावर आलं. त्यात प्रशांत दामले आणि सुकन्या कुलकर्णी यांनी काम केलं होतं. पुढे सुमीत राघवन आणि त्याची पत्नी चिन्मयी यांनीही यातल्या प्रमुख भूमिका साकारल्या. प्रेक्षकांचा सहभाग हे या नाटकाचे बलस्थान आहे.

प्रा. वसंत कानेटकर या नाटककाराने दोन कलाकारांचे रंगमंचीय आयुष्य घडवलं. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’मध्ये काशीनाथ घाणेकर आणि ‘लेकुरे उदंड जाली’मध्ये श्रीकांत मोघे- म्हणजे मला घडवण्यात कानेटकरांची लेखणी साहाय्यभूत ठरली. एकाच कालखंडात ही दोन्ही नाटकं अगदी तुफान चालत होती. नट म्हणजे कोण असतो? कुणीतरी लिहिलेले शब्द जे त्याच्या हाती येतात आणि जिव्हारी जडतात, त्या शब्दांना तो रंगमंचावर किंवा चित्रपटात प्राण फुंकून सादर करतो. प्राण फुंकणं म्हणजेच त्या नटाचं आयुष्य जगणं असतं. फूल उमलतं, सुगंधित होतं, सुवास पसरवतं आणि एका क्षणी कोमेजून जातं. फुलणं, उमलणं, सुगंधित होणं हे खोटं कसं? ही वस्तुस्थिती आहे. श्रीकांत मोघे या नटाच्या आयुष्यात ‘लेकुरे उदंड जाली’ची भूमिका ही त्याचं साररूप अस्तित्व आहे.

Story img Loader