प्रथमच सांगून टाकलं पाहिजे, की ‘उजव्या सोंडेंच्या बाहुल्या’ ही प्रवीण दशरथ बांदेकर यांची कादंबरी अन्य चाकोरीबद्ध कादंबऱ्यांपेक्षा विलक्षण वेगळी आहे. या कादंबरीला सरळ कथानक नाही. टोकदार व्यक्तिरेखा नाहीत. कटकारस्थाने नाहीत. कादंबरीकार कोकणातला आहे म्हणून निसर्गाच्या सौंदर्याचे मायाजाल नाही. भुताखेतांचे भय नाही की काळोखाचे रहस्य नाही. परंपरेचा पोकळ कळवळा नाही की स्मरणरंजन नाही. आणि तरीही ही कादंबरी गुंतवून टाकते. नव्हे, संमोहित करते. ती एकाच वेळी मूर्त आहे; आणि अमूर्तही आहे. फॅन्टसी आहे; आणि जळजळीत वास्तवही आहे. भगवी आहे; आणि रंगीबेरंगीही आहे. ती अरेबियन नाइट्समधल्या गोष्टींतील गोष्टीची आणि उत्कंठावर्धक गोंधळाची कादंबरी आहे. ती लोककलांची आहे, तशीच ती माणसांच्या नाना कळा दाखवणारीही आहे. रूपक आणि प्रत्यक्ष यांच्यामधली रेषा अत्यंत धूसर असलेली अशी ही कादंबरी आहे. ती ब्रेख्तियन तंत्रानुसार एका बाजूला गोष्टीत गुंगवते आणि दुसऱ्या बाजूने गोष्टीतून बाहेर काढून विचार करायला लावणारीही आहे.

या कादंबरीतील प्रमुख व्यक्तिरेखा पांढरपेशी नाहीत. परशराम ठाकर, मल्हार पाटील, गोिवद परब, गीता ठाकर ही त्यांची नावेच ती प्रस्थापित पांढरपेशी माणसं नाहीत हे सिद्ध करतात. अर्थात या कादंबरीत पांढरपेशे आहेत; पण ते वेगळ्या संदर्भात येतात. विविध घटनांमधला एक भाग म्हणून ते वावरतात. पोर्तुगीज लेखक सारोमागो, त्याचा नातू नोएल आणि हारुकी मुराकामी असे परदेशी पाहुणेदेखील यात आहेत. मोगाबाय तर महत्त्वाची आहेच.

Hemant Dhome Post About Rahul Solapurkar
Hemant Dhome : राहुल सोलापूरकरांच्या शिवरायांविषयीच्या वक्तव्याबाबत हेमंत ढोमेची पोस्ट, “स्वस्तातल्या इतिहासाचार्यांकडे सूज्ञांनी…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
crime Uttar pradesh
क्रूरतेची परिसीमा! तरुणीवर बलात्कार करून निर्घृण हत्या, डोळेही काढले; कुटुंबीयांचा पोलिसांवर गंभीर आरोप!
Myra Vaikul Upcoming Movie Mukkam Post Devach Ghar review
छोट्यांची मोठी गोष्ट
Loksatta book mark Patriot Alexei Navalny Russian security forces
बुकमार्क: अकाली मावळलेला झुंजार तारा
laxmi narayan tripathi on mamta kulkarni
ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर केलं अन् तिच्यासह झाली हकालपट्टी; त्रिपाठी म्हणाल्या, “तिने इस्लाम…”
Black magic fear , women senior citizen cheated,
काळ्या जादूची भीती घालून ज्येष्ठ महिलेची २९ लाखांची फसवणूक
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”

परशा ठाकरच्या घराण्यातच बाहुल्यांच्या खेळाची कला आहे. आता तो प्राध्यापक क्षाला असला तरी आपला हा वारसा धरून आहे. प्रबोधनासाठी तो बाहुल्यांचे खेळ स्वत: लिहून करतो. एके दिवशी तो अचानक गायब होतो आणि त्याचा शोध घेण्याच्या निमित्ताने अनेक घटनांचा, दृश्यांचा, आठवणींचा विशाल पट उलगडत जातो. माळ्यावरच्या बाहुल्या मोकळ्या केल्या जातात. त्याबद्दलच्या संगणकावरच्या नोंदी तपासल्या जातात. आणि बाहुल्यांतल्या माणसांचा एक चित्तचक्षुचमत्कारिक खेळ वेगाने घडत जातो. कशा आहेत या परशाच्या बाहुल्या? एका बाहुलीच्या पोटात दुसरी बाहुली, तिच्या पोटात आणखी एक बाहुली.. अशा एकमेकांत मिसळलेल्या बाहुल्या. बाहुल्यांना कपडे चढवले की त्याप्रमाणे व्यक्तिरेखा उभी राहते. आज जो बाहुला परशा असेल, तो उद्या परशा असेलच असं नाही. बाहुल्यांचं हेच वैशिष्टय़ कादंबरीकाराने सबंध नाटकभर खेळवलं आहे. अनेकानेक गोष्टींच्या कथनातून बाहुल्या झालेल्या माणसांचा पाठशिवणीचा हा खेळ चालू आहे. मुंग्यांची गोष्ट आहे, सटवाईची आहे, आदिनाथाची आहे, योगानंदाची आहे.. तशाच आणखीन काही. अर्थात, आशयाला पूरक अशीच त्यांची योजना आहे. पण या कथाकथनाची गंमत अशी की, कथेत वाचक बुडतो- न बुडतो तोच ती कथा पुरी न करता कादंबरीकार वाचकाला मूळ मार्गावर आणतो. अगदी ब्रेख्तियन तंत्र. पात्रं वेगळ्या वातावरणात आल्यावर आपली ओळखच विसरतात. अगदी कपडे नसलेल्या बाहुल्यांसारखी. स्वत:ला दुसऱ्यात बघतात. एवढंच नव्हे, तर आपली पूर्वीची भूमिका विसरून उलटीच भूमिका घेतात. काळाचा, तसाच मूर्त आणि अमूर्ताचा, फॅन्टसीचा आणि प्रत्यक्षाचा, पुराणकाळाचा आणि वर्तमानकाळाचा, स्वप्नांचा आणि जागेपणाचा लपंडाव तर अखेपर्यंत चालूच राहतो. कधी स्वर्गीय सुखाचे ‘अच्छे दिन’ दिसतात, तर कधी भेदक वास्तव ‘भगवे’ होऊन पुढे उभे राहते. वेगवेगळ्या भाषा आणि बोलीभाषा या कादंबरीतून प्रकट होतात. वेगवेगळ्या बाहुल्यांप्रमाणेच वेदोक्त गीर्वाण भाषा आहे. प्रमाण मराठी आहे. मालवणी आहे. कोंकणी आहे. बाहुल्यांचे वेश वेगवेगळे असतातच ना! बाहुल्यांची लोककला हे येथे आविष्काराचे एक साधन असले तरी त्याचबरोबर चित्रकथी आहे, दशावतार आहे. शिमग्यात ‘शबय.. शबय’ ओरडणारी, नाचणारी सोंगे आहेत. बाहुलेवाल्याला कोकणातल्या या अन्य लोककला थोडा विसावा देतात.

या कादंबरीतील मोगा आजीची व्यक्तिरेखा तर विलक्षण लोभसवाणी आहे. ती प्रेमळ आहे. अडलेल्या बाईला रातोरात जाऊन सोडवणारी तर आहेच; शिवाय ती अद्भुत आहे. तिला मिट्ट काळोखात दिसतं. आणि म्हणतात, तिला अदृश्य होता येतं आणि पाण्यावरूनही चालता येतं.

ही कादंबरी बहुपेडी असली तरी प्रामुख्याने ती दोन विश्वांत संचार करते. फॅन्टसीचं जग आणि प्रत्यक्षातलं जग. आलटूनपालटून या दोन स्थळांच्या आटय़ापाटय़ा वाचकाला खेळवत राहते. गोिवद परबला बळी देण्यासाठी नेले जात आहे. जवळच पेटलेल्या यज्ञात प्रा. ठाकर यांचे पाखंडी विचारांचे पुस्तक अग्नीच्या भक्ष्यस्थानी दिले जात आहे. प्रा. ठाकर वर्गात धर्म व संस्कृतीच्या विरोधात बोलतात. ‘त्यांनी वर्गात माया देसाईला राधा म्हणून हाक मारली’ असा त्यांच्यावर आरोप आहे. या आरोपाने प्राध्यापक अस्वस्थ होतात. त्यांना काही ऐकू आल्याचा भास होतो.. ‘तुम्ही आमच्या आनंदासाठी काहीही करा; आम्ही काहीही मनावर घेणार नाही. चिखलातलं कमळ आमच्या सांस्कृतिक विचारांचं प्रतीक. तर आम्ही कधी शोध घेतो का- कुठल्या चिखलात रुजून आलीत त्याची मुळं? मात्र, तुम्ही तुमचे पाखंडी विचार आम्हाला देऊ पाहत असाल तर.. आमचे सनातनी मेंदू भलतं सांगून शिणवू पाहत असाल तर मात्र आम्ही सावध होऊ.. चवताळून सामूहिकपणे तुमच्यावर तुटून पडू.. दिवसाढवळ्या भररस्त्यात तुम्हाला नागडं करू.’

आणि झालंही तसंच. सनातन धर्मरक्षकचे कार्यकत्रे प्राध्यापकांच्या घरात घुसतात, मोडतोड करतात आणि निघून जातात. सनातन आश्रमातील प. पू. डॉक्टरांजवळ कुठल्याही आजारावर आध्यात्मिक पातळी वाढवणे हा एकमेव उपाय असतो. देवाधर्माची चेष्टा होते म्हणून शिमग्यात राधेचं सोंग घेणाऱ्या पोराला आश्रमवाले मारझोड करतात. मूíतविसर्जन आणि प्रदूषण याबाबत त्यांचे म्हणणे आहे- ‘प्राणप्रतिष्ठा केलेल्या मूर्तीत चतन्य आलेले असते. वाहत्या पाण्यात निर्माल्यासह मूर्तीचेही विसर्जन केल्यामुळे हे चतन्य सर्वदूर पसरत जाते. सर्वानाच त्याचा आध्यात्मिक लाभ होतो.’

प्रा. ठाकर गायब होतात. इतरांचीही तीच अवस्था. सगळ्यांना डोळ्याला पट्टी बांधून डोंगराजवळ आणलं जातं. त्यात लेखक असतात, कवी असतात, समीक्षक असतात, चित्रकार असतात. सगळे डावे बुद्धिजीवी असतात. येथे आल्यावर सगळे स्वत:ची ओळखच विसरतात. स्वत:ला दुसऱ्यात पाहतात. जणू आंधळे होतात.

जंगलात आलेला गोिवद परब तरुणांपुढे वेगळंच काही सांगत असतो- ‘आपल्या परंपरा, आपला इतिहास, आपली संस्कृती आपण प्राणपणाने जपली पाहिजे. देवाधर्मासाठी जो हा देह झिजवेल तो थेट स्वर्गात जाईल.’ दुसरीकडे काही तरुण शस्त्र चालवण्याचं शिक्षण घेत होते. एकजण विचारतो, ‘दुर्जनांचा नाश केल्याशिवाय पृथ्वीवरचा पापाचा भार हलका होणार नाही हे खरं; पण पापाचरण करणाऱ्यांना संपवलं तर तेही एक पापाचरण ठरणार नाही काय?’ यावर उत्तर आहे- ‘कुप्रवृत्तीच्या लोकांना ठार मारले तर तो मारणारा ठरत नाही आणि त्या कर्माने तो बद्धही होत नाही. (असे भगवंतांनी गीतेत सांगितले आहे.) आपला जन्म याच कर्मासाठी झाला आहे. सगळे काही तोच करतोय. त्यानेच तुमची निवड केलीय.’

..आध्यात्मिक आश्रमात वैदिक धर्मजागृतीचं शिक्षण दिलं जातंय. क्षात्रतेज वाढवलं जातंय. साधक आपापल्या अनुभूती कथन करीत आहेत. परमपूज्य डॉक्टरांकडे कुठल्याही अडचणीवर, आजारावर आध्यात्मिक पातळी वाढवणे हा एकमात्र उपाय आहे. एके ठिकाणी सकलक्लेशकारक शनिदेवाची मंदिरे गावोगावी उभारण्याविषयी चर्चा चालू होती. दुसरीकडे धर्मरक्षणासाठी मानसिकता तयार केली जात होती. पौराणिकतेचा भास होणाऱ्या जगात सुंदर ललना पेयांचे चषक आणि मांसाचे तुकडे पाहुण्यांसाठी घेऊन फिरत होत्या. त्यात मल्हारच्या, गोिवदच्या पूर्वीच्या मत्रिणी आहेत. येथे कुणाचीही बायको कुणाच्याही नवऱ्याबरोबर रत होताना दिसते. आणि त्याबद्दल कुणालाच काही वाटत नाही. घटकंचुकीसारखे खेळ खेळले जात आहेत. व्यभिचारच येथे मंगलमय झाला आहे. वीर्यदान महोत्सव भरवले जात आहेत. हे सगळं बघून, ऐकून नोएलसारखा परधर्मी लेखक भारावून जातो. ही आभासी दुनिया लेखकानं इतक्या समर्थपणे उभी केली आहे, की वाचकही त्यात हरवून जातो.

जपानी लेखक हारुकी मुराकामी रामाच्या देवळाकडे जायला निघतो. त्याला सीतेच्या खडकातला सहा फुटी बेडूक बघायचा असतो. (टोकियोला एका भयानक भूकंपापासून अशाच एका मंडुकानं वाचवलं होतं आणि हारुकीनं त्याच्यावर कथा लिहिली होती.) तिथपर्यंतची मल्हारबरोबरची त्याची सफर आणि हारुकीवर गुदरलेला प्रसंग (त्याच्या अंगात वारे येते) आणि त्याच्यावर गावकऱ्यांकडून झालेले अद्भुत उपचार.. ही सगळीच घटना एवढी नाटय़पूर्ण आहे, की ती प्रत्यक्षातूनच वाचायला हवी. येथे निसर्ग शोभा म्हणून येत नाही, की अंगात येणे श्रद्धा-अंधश्रद्धांच्या संदर्भात येत नाहीत. ती वस्तुस्थिती असते. गावकऱ्यांच्या जगण्यातला तो एक अविभाज्य घटक असतो.

प्रा. ठाकर यांची बायको गीता ठाकर बाहुल्यांच्या माध्यमातून आपल्या गायब झालेल्या नवऱ्याचा शोध घेते आणि भयानक सत्य तिच्या हाती लागते. तिच्या मनात येते- ‘आणि आता तर हे सोंडवाले म्हणतात तसंच व्हायला लागलेय, ते तर अधिकच भयावह आहे. या सनातनी वृत्तीच्या उजव्या सोंडवाल्या बाहुल्यांची धर्म-संस्कृती, स्त्रिया आणि त्यांच्यावरची बंधने, जातीपाती, कर्मकांडं, रूढी-परंपरा वगरेविषयीची प्रतिगामी भूमिकाच कशी योग्य आहे, हे सर्वसामान्यांना पटवून द्यायला आता हे बुद्धिजीवीच पुढे सरसावू लागलेत. म्हणजे हे खरंच असावं, की यांना पुरतं विस्मरण झालंय आपल्या आजवरच्या जगण्याचं, आपल्या शेणामातीत राबलेल्या आया-बहिणींचं, वाडवडलांच्या कलांचं, आपल्या सामाजिक कर्तव्याचं, आपण केलेल्या कामाचं, सुधारणावादी विचारांचं, आपल्या आयडेंटिटीचं.. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाचा भौतिक सुखासाठी फायदा घ्यायचा; पण आधुनिक विज्ञाननिष्ठ विचार मात्र स्वीकारायचे नाहीत.. चिकित्सा करणारे धर्मबुडवे, वैज्ञानिक कसोटय़ांवर विश्लेषण करू धजावणारे बुद्धिभ्रष्ट, परंपरेला वगळून काही नवा विचार मांडणारे धर्मद्रोही, जातीपाती नि कर्मकांडाला विरोध करून विवेकाचा आग्रह धरणारे पाखंडी. सोंडवाल्यांचे हे शत्रू. हे कसे?’ गीता ठाकर एकटी पडते. कारण ती एकटीच डोळस असते. काळोखात दिसणाऱ्या फक्त एकटय़ा मोगामावशीसारखी.

काही प्रवृत्ती या आदिम असतात. वरचे दबाव नष्ट झाले की उफाळून वर येतात. आहे ते असंच चालणार, या निर्णयाला कादंबरीकार येतो. कादंबरीची अखेरची पृष्ठे चिंतनपर झाली आहेत. त्यामुळे कादंबरीला एक वेगळेच उंचीचे परिमाण लाभले आहे. कादंबरीत कोकणातल्या राजकारणाचे धावते संदर्भ येतात. हत्ती गावात घुसतात. माकडं घुसतात. सोंडवाले डोंगरावरून आक्रमण करतात. गावाची नासाडी करतात. (येथे मला आयनेस्कोच्या ‘ऱ्हिनोसेरस’ या प्रायोगिक नाटकाची आठवण उगाचच झाली.) कोकणची पाश्र्वभूमी लाभलेल्या या कादंबरीत काही ठिकाणी अपरिहार्य म्हणून कोकणी भाषेचा वापरही केला गेला आहे. पण एवढय़ाच कारणासाठी ही कादंबरी प्रादेशिक ठरू नये. प्रामुख्याने जे चित्र ती काढू पाहते ते मुख्यत्वेकरून आजच्या सत्ताधिष्ठित राजकीय मनोवृत्तीचे आहे. आणि म्हणून ही कादंबरी राष्ट्रीय, राजकीय आहे. अन्य भाषेत ती अनुवादित व्हायला पाहिजे. लेखक ‘चाळेगत’ या आपल्या पहिल्या कादंबरीत कोकणातल्या राजकारणाला थेट भिडला होता. या कादंबरंीत त्याने आपल्या राजकीय कक्षा अधिक विस्तारल्या आहेत.

सुजाण आणि सुविद्य समजले जाणारे नेते नंतर माफी मागायची पाळी यावी अशी निर्बुद्ध विधाने करतातच कसे? त्यांच्या डोक्यात अमानुष विचार येतातच कसे? या प्रश्नांच्या उत्तरासाठीही ही कादंबरी वाचायला हरकत नाही. धार्मिक दहशतवादी संघटना कशा प्रकारे काम करतात याची कल्पना यावरून येऊ शकते. कादंबरीत कुठेही अतिशयोक्ती नाही, किंवा ती अतिरंजितही केलेली नाही. सोंडवाले प्रतीक म्हणून येतात. लेखकाने संयमाने आणि यथार्थ पद्धतीने सारं काही प्रकट केलंय. कलात्मक पातळीवर एखादा आशय कसा प्रभावी करावा यासाठी ही कादंबरी अभ्यासायला हरकत नाही. या कादंबरीतील कोकण कालचे नाही. ते आजचे- अगदी अलीकडचे आहे.

लेखक अर्पणपत्रिकेत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या आठवणींना उजाळा देत म्हणतो, ‘डाव्या, उजव्या, सोंडवाल्या, बिनसोंडवाल्या सगळ्या प्रकारच्या बाहुल्यांना समजून घेता आलं पाहिजे. शत्रू-मित्र विवेक जपला पाहिजे.. तुमच्या अखेरच्या दिवसांत हे एवढंच शिकता आलं. शिष्याने हे आपले उद्गार सार्थ केले याची साक्ष म्हणजेच ही कादंबरी.

दिनकर मनवर यांचे मुखपृष्ठ कादंबरीच्या शीर्षकाचे नेमके चित्र उमटवणारे आहे.

‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’

– प्रवीण दशरथ बांदेकर,

शब्द प्रकाशन, पृष्ठे- ३४३, मूल्य- ३८० रुपये.

कमलाकर नाडकर्णी kamalakarn74@gmail.com

Story img Loader