राज कपूर यांच्या ‘श्री ४२०’ या चित्रपटास नुकतीच साठ वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्योत्तर काळातील समाजाच्या स्वप्नभंगाचे चित्रण करणारा चित्रपट म्हणून या चित्रपटाकडे पाहता येते. या चित्रपटाचे मूल्यमापन त्या काळात कसे झाले, याचे दर्शन घडवणारा लेखही सोबत देत आहोत..
‘श्री ४२०’ या चित्रपटाला हिंदी सिनेमाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. ‘आवारा’ या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर राज कपूरने ‘आह’ व ‘बूट पॉलिश’ हे दोन चित्रपट निर्माण केले, पण त्यांचे दिग्दर्शन त्याने स्वत: केले नाही. कारण त्याच्या मनात एक वेगळाच विषय घोळत होता. राज कपूर निदान त्याच्या सुरुवातीच्या काळात तरी सामाजिक बांधीलकी मानणारा आणि भोवतालच्या सामाजिक परिस्थितीचे भान असणारा कलावंत होता. या नव्या चित्रपटासाठी राजने के. ए. अब्बास यांची कथा निवडली. ‘आवारा’पासून त्यांचे उत्तम टय़ूनिंग जमले होते. भारताला स्वातंत्र्य मिळून नुकतीच साताठ वर्षे झाली होती. स्वातंत्र्य म्हणजे केवळ मुक्त होणे नव्हे, तर त्याबरोबर एक जबाबदारीही आपल्यावर येऊन पडते याचे भान तरुणांना येऊ लागले होते. त्याबरोबरच स्वातंत्र्य आले म्हणजे सगळे प्रश्न आपोआप मिटतील, अशा स्वप्नात असणाऱ्यांचा भ्रमनिरास होणेही सुरू झाले होते. दुष्प्रवृत्ती केवळ परकीयांतच नव्हत्या तर ‘आपल्या’ माणसांतही त्या आहेत, असणारच, याची जाणीवही तरुणांना होऊ लागली होती. आणखी एक बदल देशात घडला होता. शहरांना नव्या अर्थव्यवस्थेत अधिक महत्त्व येऊ लागले होते. तरुणांचे लोंढे आशेने महानगराकडे वळू लागले होते. या तरुणांच्या मनात भव्य स्वप्ने होती. त्यापैकी काही जणांच्या संदर्भात तरी ती स्वप्ने केवळ व्यक्तिगत नव्हती. त्यांना व्यापक सामाजिक संदर्भही होता. समाजाच्या, सामान्य माणसाच्या भल्यातच आपलेही भले आहे याची जाणीवदेखील त्यांच्याजवळ होती. स्वप्ने घेऊन महानगरात दाखल होणाऱ्या अशाच तरुणांपैकी एक ‘श्री ४२०’चा नायक राज होता.
राज हा अनाथालयात वाढलेला सुशिक्षित, पण बेकार तरुण काम शोधण्यासाठी अलाहाबादहून मुंबईला येतो. नायक राज कपूरची सिनेमातील एंट्री शैलेंद्रचे शब्द, मुकेशचा आवाज व शंकर जयकिशनचे संगीत घेऊनच व्हायची असा त्या काळी संकेतच ठरून गेला होता. ‘मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी’.. भारतीय तरुणाईचे चित्र शैलेंद्रने अत्यंत साध्या, सोप्या शब्दात रेखाटले होते..
‘होंगे राजे राजकुंवर हम, बिगडे दिल शहजादे
हम सिंहासन पर जा बैठे, जब जब करें इरादे..’ अशी रचना करावी ती शैलेन्द्रनेच. ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ हे हिंदी चित्रपटगीताचे आदर्श उदाहरण आहे असे प्रख्यात दिग्दर्शक गुलजार यांनी एकदा म्हटले होते. जनसामान्यांइतकेच हे गाणे जाणकारांच्याही आवडीचे आहे. श्रेष्ठ लेखिका महाश्वेता देवी यांनी फ्रँकफर्ट येथील पुस्तकमेळ्याचे उद्घाटन करताना या गाण्यातल्याच ओळी म्हणून दाखविल्या होत्या.
राज मुंबईला आल्यावर त्याला बक्षीस मिळालेले सोन्याचे पदक गिरवी ठेवून चाळीस रुपये उचलतो. (त्याच्या सोन्याच्या पदकाला, त्याच्या संस्कारांना, येथे काही मोल नाही, येथे येथलीच नाणी चालतात.) ‘पाहा आता, मी मुंबई खरेदी करीन’ त्याच्या मनातला शेखचिल्ली जागा होतो, पण काही वेळातच पत्ते खेळणाऱ्या जुगाऱ्यांकडून तो लुटला जातो. पुन्हा कंगाल बनतो. स्वप्न आणि वास्तव यांच्यातील दरीचे पहिले दर्शन त्याला होते. या नगरात काम तर सोडाच, पण रात्री झोपण्यासाठी त्याला जागाही भेटत नाही. भटकत भटकत तो फुटपाथवरील एका गरीब वस्तीपाशी येतो. शेठ सोनाचंद धरमचंदच्या बंगल्यासमोर फुटपाथवर राहणाऱ्या गरिबांची एक अफलातून वस्ती राज कपूरने या चित्रपटात दाखविली होती. या वस्तीतील अनेक माणसांना राहायला जागा नाही, काम नाही, तरीही ही माणसे नशिबाला हसत-जगत राहतात. दु:ख, विवंचना, कष्ट, हे विसरण्यासाठी या माणसाजवळ आहे फक्त हसणे, नाचणे आणि गाणे. ‘दिल का हाल सुने दिल वाला, सीधी सी बात न मिर्च मसाला’ या गाण्यातून राज कपूर त्यांच्या जीवनाचे अंतरंगच उलगडून दाखवितो.
या माणसाची मुखिया आहे एक केळेवाली. (ललिता पवार यांनी केळेवालीच्या छोटय़ा भूमिकेत धमाल केली होती.) राज आसरा शोधत या फुटपाथवर आल्यावर येथील माणसे त्याच्याकडे प्रथम अविश्वासानेच पाहतात. पण या केळेवालीला जाणवते की राज मनाचा भाबडा आहे. ती वस्तीवाल्यांना समजावून सांगते, त्याला वस्तीत सामावून घेते.
एकदा समुद्रकाठी भटकत असताना राजची विद्या (नर्गीस)शी गाठ पडते. विद्या झोपडपट्टीत लहान मुलांची शाळा भरवून त्यांना शिकवीत असते. तिचे व तिच्या अपंग वडिलांचे उत्पन्नाचे ते एकमेव साधन आहे. ती गरीब असली तरी स्वाभिमानी व नैतिक मूल्ये जपणारी आहे. (साठ वर्षांपूर्वी अशीही माणसे समाजात होती.) राज हा तिला पहिल्या भेटीत थापाडय़ा व भंपक वाटतो. पण हळूहळू तिच्या ध्यानात त्याचा चांगुलपणा येतो. त्याची जगण्याची जिद्द तिला जाणवते. लौकरच राजला एका लाँड्रीमध्ये ४५ रुपये महिना पगारावर नोकरी लागते. वरवरचा देखावा आणि आतील सत्य (Appearance and reality) ही या चित्रपटाची एक महत्त्वाची थीम आहे. राज एकदा लाँड्रीमधला (गिऱ्हाइकाचा) भारीचा सूट घालून विद्याकडे जातो. तिला आपल्या श्रीमंतीच्या गप्पा मारतो. ती हळूच खाली पाहते तेव्हा तिला राजच्या पायातील फाटके बूट दिसतात. ती मिस्कीलपणे हसते, राज शरमेने चूर होऊन पळून जातो.
एके दिवशी राज दुकानात कपडय़ांना इस्त्री करीत असताना विद्या तेथे येते. आपण कमावतो आहो हे दाखवून तिच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी राज तिला चहा पिण्यासाठी घेऊन जातो. एकमेकांवर आकंठ प्रेम करणारे दोन जीव, पावसाळी हवा आणि मनासारखी सोबत. दोघांच्याही ओठावर अनायासे गाण्याचे शब्द येतात.. ‘प्यार हुआ एकरार हुआ -’ हे लता व मन्ना डे यांनी गायिलेले गीत गाण्याच्या चित्रीकरणाचा बेजोड नमुना म्हणून ‘A’ ‘time great’ पैकी एक मानले जाते. प्रख्यात संगीतकार भास्कर चंदावरकर यांनी चित्रीकरणाची हिंदी सिनेमातील सर्वोत्कृष्ट तीन गाणी म्हणून जी निवडली होती, त्यात या गाण्याचा समावेश होता.
‘राते दसो दिसाओ से, कहेंगी अपनी कहानियां
गीत हमारे प्यार के, दोहरायेगी जवानियां..’
आज आपली प्रेमकहाणी केवळ आपल्यापुरती राहिलेली नाही, साऱ्या विश्वाची बनली आहे, आज आपण गात आहोत, उद्या आणखी कुणी गाईल. प्रेमाची मंझिल तीच राहील, मुसाफिम्र बदलत जातील.. रस्त्याच्या कडेला तीन मुले पावसाचा आनंद घेत मजेत चालताना दिसतात, त्यांच्याकडे अंगुलिनिर्देश करीत विद्या म्हणते,
‘‘मैं न रहूंगी, तुम न रहोगे, फिर भी रहेंगी निशानियां ..’’
लताने ही ओळ एवढय़ा हळुवारपणे म्हटली होती, की ती ऐकताना व पाहताना अंगावर शहारा उमटला होता. असंख्य वेळा हे गाणे ऐकले, पाहिले, पण ही ओळ ओलांडून आजही मी सहज पुढे जाऊ शकत नाही. प्रणयभावनेची नैसर्गिक परिणती म्हणजे जीवनसातत्य टिकवून ठेवणारी पुनर्निर्मिती. या भावनेचा एवढा लोभस आविष्कार पडद्यावर फार क्वचित दिसला आहे. आज राज नाही, नर्गिसही नाही, त्यांच्या कहाणीची निशाणी मात्र टिकून आहे.
राजची धोब्याकडली ही नोकरीच एके दिवशी राजला माया या नावाच्या श्रीमंत सौंदर्यवतीच्या संपर्कात आणते. फावल्या वेळात गंमत म्हणून राजने पत्त्याची जादू शिकलेली असते. केवळ अमाप पैसा कमावणे एवढेच उद्दिष्ट असलेली माया भोळ्या राजच्या हातात असलेली पत्त्यांची जादू पाहून हरखून जाते. या जादूचा धूर्त उपयोग आपल्याला मालामाल करील, हे तिच्या ध्यानात येते व ती राजला अलगद आपल्या मोहपाशात ओढते. राजला आपल्या मायेत ओढणाऱ्या रूपगर्विता मायाची भूमिका नादिराने मोठय़ा झोकात केली होती. तिचे मादकपण, तिचा रुबाब व तिचा अहंकार या साऱ्यांचे दर्शन नादिराच्या देहबोलीतून होत होते. ही माया राजची, गर्भश्रीमंतांच्या वरच्या वर्तुळात राज कुमार म्हणून ओळख करून देते. संपत्तीचा पूर वाहत असलेली दुनिया त्याला इथे पाहावयास मिळते. त्याच्या ध्यानात येते, की आपले हात आणि डोके चालविले तर ही संपती आपल्याही पायाशी लोळण घालू लागेल. एका गाफम्ील क्षणी वैभवाचा, ऐषारामाचा त्यालाही मोह पडतो व संपत्तीसाठी काळे धंदे करणाऱ्यांच्या टोळीत तो अडकतो.
विद्या त्याला या मार्गापासून दूर करू पाहते, पण त्याला आता पैशांची चटक लागलेली असते. वैभवाकडे जाणाऱ्या पहिल्या पायरीवर माया त्याला उभे करते व वरच्या पायऱ्या त्याला खुणावू लागतात. मग आपोआप आपल्या स्खलनाचेही तो एक तत्त्वज्ञान बनवू पाहतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर फार लवकर या विचारधारेने लोकांच्या मनात प्रवेश केला. ‘मी गरीब असताना या जगात सुखाने राहावयाचे असेल तर पैसा हवा, असे जगानेच मला शिकविले. आता मी तो मिळविला तर काय बिघडले? शिवाय ज्यांच्याजवळ अमाप श्रीमंती आहे त्यांनाच मी फसवितो आहे. त्यांनी ही संपत्ती इतरांना फसवूनच कमावली आहे ना?’ इतरांची फसवणूक करता करता राज आता स्वत:चीही फसवणूक करू लागतो.
या वेळी विद्या त्याच्याशी असलेला संबंध पूर्णपणे तोडून टाकते तेव्हा त्याला धक्का बसतो. असाच धक्का तिलापण बसला आहे, हे मात्र त्याला जाणवत नाही. राजकडून एवढा मोठा अपेक्षाभंग झाल्यानंतर विद्याची मन:स्थिती कशी झाली आहे याचे दर्शन राज कपूरने एका उत्कट प्रसंगातून घडविले आहे. एके दिवशी दारू पिऊन राज विद्याच्या घरी जातो. त्याचे हे रूप पाहून ती दगडासारखी बनून जाते, पण त्याच वेळी तिच्यामधून एक दुसरी विद्या प्रकटते.
पहिल्या विद्याच्या चेहऱ्यावर दगडलेपण, तर दुसऱ्या विद्याच्या चेहऱ्यावर दु:ख, विनवणी.. तिचे मन दुभंगले आहे. एकीकडे मनाशी जपलेल्या मूल्यामुळे राजच्या जगण्याबद्दल वाटत असणारा तिरस्कार आहे, पण दुसरीकडे तिचे त्याच्यावर अपार प्रेमही आहे. मात्र ती कठोरपणे त्याला तोडण्याचा निर्णय घेते. राजची परिस्थितीही वेगळी नाही. ही कहाणी आता प्रेम आणि मोह यांच्या द्वंद्वात ज्याचे मन रणांगण बनले आहे, अशा प्रत्येक माणसाची बनते. हा क्षण निर्णायक आहे. कोणता निर्णय घेणार? कुणाकडे जाणार? विद्याकडे की मायाकडे? शेवटी राजला जाणवते की तो विद्याशिवाय जगू शकत नाही, पैसा हा प्रेमाला पर्याय होऊ शकत नाही. तो परत आपल्या माणसात येतो.
एक हवीहवीशी लोभस काल्पनिका (Fantasy) राज कपूरने या चित्रपटात उभी केली आहे. सुस्वभावी नायक, सद्गुणी नायिका, विपरीत परिस्थितीशी त्यांचे झगडणे, माणसातील स्खलनशीलता व पश्चात्तापातून मुक्तीची वाट सापडणे हे सारे काल्पनिकेचे गुणविशेष राजने कौशल्याने वापरले होते. राजने आपले नाव सांगितल्यावर फुटपाथवरचा एक माणूस उत्स्फूर्तपणे म्हणतो, ‘‘मैंने कहा था न, एक दिन हम गरीबों का राज जरूर आयेगा.’’ सद्गुणी नायिकेचे नाव विद्या व नायकाला मोहाकडे नेणाऱ्या स्त्रीचे नाव माया हे तपशीलही चित्रपटाची जातकुळी स्पष्ट करतात.
श्रीमंतीच्या वरवरच्या चकचकीतपणाला राजही भुलतो, पण नंतर त्याला तिचे भयावह वास्तव रूप कळून चुकते. (हे रूप त्या काळच्या सामान्य माणसाला लवकर समजले नाही आणि जेव्हा समजले तेव्हा त्याने अक्राळविक्राळ रूप धारण केले होते ही आपल्या समाजाची शोकांतिका.) तो ज्या सेठच्या हातचे खेळणे बनलेला असतो. त्याच्या डोक्यातून एक सुपीक कल्पना निघते. गरिबांना १०० रुपयांत घर देण्याची. ‘हे कसे शक्य आहे?’ असे राज विचारतो, तेव्हा सेठ म्हणतो, ‘मी घर विकत नाही, मी स्वप्न विकतो आहे.’ शेठ राजच्या नावाने एक कंपनी काढतो व त्याच्यातर्फेच वर्तमानपत्रात जाहिरात देतो, ‘फक्त शंभर रुपये भरा व घर मिळवा.’ असंख्य गोरगरीब ह्या जाहिरातीला भुलून राजच्या कंपनीत पैसे गुंतवितात. या माणसात अनेक जण ‘त्या’ वस्तीवरलेही असतात. अमाप पैसा गोळा होतो. राजवरील विश्वासाने अनेकांनी आपली सारी कमाई गुंतविलेली असते. राजला जेव्हा हे कळते तेव्हा तो हादरतो. या दीनदुबळ्याच्या तोंडातील अर्धाकच्चा घास आपण हिरावून घेत आहो हे ध्यानात येऊन तो व्यथित होतो. त्याला वस्तीवरल्या आपल्या माणसांची आठवण येऊ लागते.
शेवटी तो आपल्या माणसांकडे परत येतो. साऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू येतात. आसवात सारे धुवून जाते. मने पुन्हा एकमेकांजवळ येतात.
गरिबांकडून जमविलेला सारा पैसा घेऊन पळून जाण्याचा डाव शेठ आणि त्याचे सहकारी आखतात. पण आता राजचा निर्णय झालेला असतो. पोलिसांना खबर देऊन तो हा डाव उघडकीला आणतो, सेठ व त्याचे दोस्त तुरुंगात जातात. राज पुन्हा रस्त्यावर येतो. पुन्हा पायात फाटके बूट, ठिगळ लावलेले कपडे व डोक्यावर रुसी टोपी! शहर सोडून तो निघतो. ओठावर ते पहिलेच गाणे असते,
‘‘निकल पडे है खुल्लि सडक पर अपना सीना ताने’’ ..
तेवढय़ात त्याच्या मागून त्याला विद्याचा आवाज ऐकू येतो. तीही त्याच्या सुरात सूर मिसळून गात येते. त्याची पावले उलट दिशेने, शहराकडे वळविते व दोघे हातात हात घालून शहराकडे चालू लागतात.
‘एक अप्रतिम सिनेमा’ अशी ‘श्री ४२०’ची साऱ्यांनी स्तुती केली. या चित्रपटात काय नव्हते? प्रभावी कथा, कल्पक सादरीकरण, उत्कट नाटय़, विनोद, सामाजिक आशय, सुमधुर संगीत, श्रेष्ठ अभिनय हे सारे घटक इथे एकत्रित आले होते. भारतीय प्रेक्षकांना तर हे संयुग अतिशय आवडलेच, पण परदेशी रसिकांनीही त्याची स्तुती केली. बेल्जियमच्या Bartman या सिनेरसिकाने लिहिले आहे, ‘A movie like Shree 420 mixes musical comedy, drama, thriller, and social message into one and the clash of all these elements results in a movie that is greater than the sum of its parts.’
रसिकांनी ‘श्री ४२०’ वर भरभरून प्रेम केले. आजही या चित्रपटाचे असंख्य चाहते त्याची आठवण काढतात, तो पुन:पुन्हा बघतात…
विजय पाडळकर – vvpadalkar@gmail.com
‘श्री ४२०’
राज कपूर यांच्या ‘श्री ४२०’ या चित्रपटास नुकतीच साठ वर्षे पूर्ण झाली.
Written by दीपक मराठे
आणखी वाचा
First published on: 27-09-2015 at 01:04 IST
TOPICSराज कपूर
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj kapoor movie shree 420 completed 60 years