महाराष्ट्रापासून कोसो दूर तंजावरमध्ये गेली कित्येक शतके मराठी संस्कृती आकार घेत राहिली, ही नि:संशय विस्मयचकित करणारी बाब. याचे सारे श्रेय तंजावरच्या मराठय़ांकडे जाते. यात तंजावरचे राजे सरफोजी दुसरे यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
तंजावर म्हणताच आपणास आठवतात ते व्यंकोजीराजे, सरफोजीराजे दुसरे, सरस्वती महाल ग्रंथालय, मराठी नाटक, भरतनाटय़म् आणि आणखी बरंच काही. शिवाजीराजांचे सावत्रबंधू व्यंकोजीराजे यांनी कावेरीच्या खोऱ्यात तंजावरी मराठी राज्य स्थापन केले. या राज्याचा पुढे फारसा विस्तार झाला नाही, परंतु इ. स. १८५६ पर्यंत- म्हणजे सुमारे १७५ वर्षे तंजावरचे राज्य अस्तित्व राखून होते. तंजावरमध्ये मराठी संस्कृतीचा प्रवाह वाहता ठेवण्याचे श्रेय तंजावरच्या या राज्यकर्त्यांना जाते.
तंजावरच्या मराठय़ांचा दरबार विद्वान आणि कलावंतांनी गजबजलेला होता. तंजावरचे राज्यकर्ते स्वत: विद्वान व कलासक्त होते. परिणामी तिथे मराठी वाङ्मय, नाटक, नृत्य, कला, संगीत आदींची विस्मयकारक प्रगती झाली. याचे सारे श्रेय तंजावरच्या मराठय़ांकडे जाते. यात तंजावरचे राजे सरफोजी दुसरे यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.
तंजावरला पूर्वेचे व्हेनिस किंवा दक्षिणेचे एडन म्हणतात. ही एक यक्षनगरी होती. कावेरीचे सुपीक खोरे, आल्हाददायक हवा आणि उंचच उंच नारळांची झाडे असलेले तंजावर हे संस्थान फारच लहान होते. भारताच्या नकाशात तर ते टिपूसभरच भासे. परंतु या चिमुकल्या संस्थानामुळे महाराष्ट्राच्या शौर्यशाली इतिहासाला प्रतिभाशाली इतिहासाची जोड लाभली. तंजावर संस्थानाला प्राचीन काळापासून उच्च अभिरुचीचा वारसा लाभला होता. तंजावरच्या मराठय़ांनी पूर्वसुरींपासून चालत आलेल्या या वारशाला मराठी संस्कृती व कलेची जोड दिली.
इ. स. १७९८ मध्ये सरफोजीराजांचे राज्यारोहण झाले. परंतु राज्याची सर्व सूत्रे इंग्रजांकडे होती. सरफोजीराजांची एकूण कारकीर्द ३४ वर्षांची! या राजाने कला, संगीत, नृत्य, शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून देणारे, त्यांनीच नावारूपाला आणलेले सरस्वती महाल ग्रंथालय आजही दिमाखात उभे आहे. पर्यटकांचेच नव्हे, तर पौर्वात्य व पाश्चात्य अभ्यासकांचे केंद्र असलेले हे सरस्वती महाल ग्रंथालय व मराठय़ांचा इतिहास सांगणारा बृहदीश्वराच्या मंदिरातील कोरीव लेख हे राजांचे खरेखुरे स्मारक होय.
सरफोजीराजांचा जन्म २४ सप्टेंबर १७७७ रोजी झाला. तंजावरचे राजे तुळजेन्द्रराजे दुसरे यांना अपत्य नसल्याने २३ जानेवारी १७८७ रोजी त्यांनी सरफोजीराजांना दत्तक घेतले. तुळजेन्द्रराजांचे बंधू अमरसिंह यांनी सत्तेच्या राजकारणात सरफोजीराजांना राजगादीपासून दूर ठेवण्यासाठी त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले. परंतु डच मिशनरी शॉर्झ यांच्या प्रयत्नांनी त्यांचे चेन्नई येथील मिशनरी शाळेत शिक्षण झाले. तसेच त्यांना संस्कृत व मराठी शिकवण्यासाठी त्या, त्या भाषेच्या पंडितांची नेमणूक करण्यात आली होती. सरफोजीराजांची आई, गुरू शॉर्झ व इंग्रजांच्या मदतीने सरफोजीराजे गादीवर बसले. तथापि राज्याची सर्व व्यवस्था इंग्रजांकडेच होती. राजांची एकंदर कारकीर्द शांततेत गेली. त्यामुळेच त्यांनी आपली कारकीर्द शारदादेवीच्या सेवेत रुजू केली.
उंचपुरे, गोरे, झुबकेदार मिशा असलेल्या सरफोजीराजांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत संपन्न होते. गुरू शॉर्झ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उत्तम संस्कार झाले. सरफोजीराजे ज्ञानी, ज्ञानप्रेमी, उदार, सुसंस्कृत व सर्वगुणसंपन्न होते. विद्याप्रसार, ग्रंथसंग्रह व विद्वानांची संगत यातच त्यांनी आपली सर्व हयात व्यतित केली. चित्रकला, बागकाम, नाणेसंग्रह, ग्रंथसंग्रह, रथांच्या शर्यती, शिकार, बैलांच्या झुंजी या सगळ्याची त्यांना आवड होती. तसेच संगीत, नृत्य, नाटय़ व विज्ञान यात त्यांना विशेष रुची होती. सरफोजीराजे खऱ्या अर्थाने भाषापंडित होते. मातृभाषेव्यतिरिक्त त्यांना संस्कृत, तामिळ, तेलगू, इंग्रजी, जर्मन, इटालियन, फ्रेंच, लॅटिन, अरेबिक इत्यादी भाषाही अवगत होत्या. राजे अतिशय कल्पक बुद्धिमत्तेचे व नावीन्याचे चाहते होते. पौर्वात्य व पाश्चिमात्य संस्कृतीतील अनेक चांगल्या गोष्टींचा मेळ घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या उदार, व्यासंगी व कलासक्त राजाने विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी करून आपल्या कार्याचा कायमस्वरूपी ठसा तंजावरच्या इतिहासावर उमटविला. वाङ्मय, नृत्य व संगीत यांची अजोड सेवा राजांनी केली.
तामिळ, मराठी, तेलगु भाषेतून विपुल वाङ्मयीन रचना सरफोजीराजांनी स्वत: केल्या आणि दरबारी पंडितांकडूनही करून घेतल्या. गोविंदकवी, विरुपाक्षकवी, गंगाधरकवी, अंबाजी पंडित, अवधूतकवी हे त्यांचे दरबारी होते. सरफोजींच्या आश्रयामुळे व आज्ञेमुळे आपण ग्रंथरचना करू शकलो, अशी कृतज्ञता गोविंदकवी व विरुपाक्षकवी यांनी आपल्या ग्रंथांतून प्रकट केली आहे. ‘उमा-शंकरसंवाद निरूपण’, ‘श्री हरिलीला निरूपण’ ही आख्यानपर प्रकरणे, स्फुटपदे आणि कितीतरी साहित्य गोविंदकवी यांच्या नावावर पाहावयास मिळते. श्रावणमाहात्म्य, आदिकैलासमाहात्म्य आणि इतर अनेक पौराणिक विषयांवर विरुपाक्षकवीने रचना करून, ‘शरभेंद्रने (सरफोजी) सुरू केलेल्या शाळेत शिकून आपण ही काव्यरचना केली,’ अशी विनम्र कृतज्ञता त्यांनी व्यक्त केलेली आढळते.
सरफोजीराजांनी पुराणकथा रचल्या. या रचना पद, श्लोक, ओव्या, आर्या, दिंडी, सवाई, छंद, लावणी, दोहा, गोपीगीत इत्यादी प्रबंधांत केल्या आहेत. या रचना नृत्य, नाटय़ व संगीतमय आहेत. प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असा मराठय़ांचा इतिहास सांगणारा आशिया खंडातील सर्वात मोठा मराठी भाषेतील कोरीव लेख बृहदीश्वराच्या मंदिरात कोरून मराठय़ांचा इतिहास त्यांनी अजरामर केला. वाङ्मयाबरोबरच नाटय़कलेचीही सेवा सरफोजीराजांनी केली.
‘गंगाविश्वेश्वर परिणय’, ‘मोहिनी-महेश परिणय’, ‘देवेंद्र कोरवन्झी’, ‘सुभद्रा कल्याण’ आदी अनेक नाटके राजांच्या नावावर आहेत. ‘सुभद्रा कल्याण’ हे नाटक ताडपत्रावर तेलगु लिपीत लिहिलेले आहे. ही नाटकं त्याकाळी सादरही केली जात. ती पाहण्यास विद्वान व रसिक येत असत. ही नाटकं तीन अंकी, चार अंकी वा पाच अंकी आहेत. त्याकाळी नाटय़तंत्रही चांगलेच विकसित झाले होते. या नाटकांतून स्थळ व काळाच्या सूचना दिलेल्या दिसतात. तसेच दोन अंकांतील घटना नाटय़ांतर्गत नाटक दाखवून सादर केलेल्या आहेत. या नाटकांतून नृत्य व गीते आहेतच; परंतु पद्यापेक्षा गद्याचा भाग अधिक असल्याने ही नाटकं वास्तवदर्शी वाटतात. ‘देवेंद्र कोरवन्झी’ हे वैशिष्टय़पूर्ण नाटक जगाचा भूगोल सांगण्यासाठी लिहिले गेले आहे. या नाटकात सूर्यमालेची माहिती, दिवस-रात्र कशी होते, पृथ्वीवरील पाचही खंडांची माहिती, पृथ्वीची गती इत्यादी गोष्टी आहेत. नाटय़ाबरोबरच संगीत व नृत्याची जाणही राजांना उत्तम होती.
सरफोजीराजांचा काळ हा संगीताचा सुवर्णकाळ मानला जातो. त्यांच्या दरबारात ३६० संगीत-तज्ज्ञ होते. कर्नाटक संगीताला विकसित कलेचा दर्जा प्राप्त करून देणारे प्रसिद्ध संगीतकार त्यागराज, शामशास्त्री व मुथुस्वामी दीक्षितार हे तिघेही सरफोजींचे दरबारी गायक होते. आजही सहा जानेवारीला त्यागराजाच्या स्मरणार्थ तिरुवारुर येथे संगीत मैफल आयोजित केली जाते. त्यांच्या दरबारात पाश्चिमात्य संगीतकारही होते. तंजोर बँडची स्थापना त्यांनी केली. इंग्लिश वाद्यवृंदासाठी हिंदुस्थानी राग व बंदिशी त्यांनी इंग्लिश नोटेशन पद्धतीत बसविली. यावरून त्यांचे कल्पनाचातुर्य दिसते. हेच कल्पनाचातुर्य त्यांच्या नृत्यरचनांमध्येही आढळते. अठरा रचनांचे गुच्छ (निरूपण) करून त्या अठरा रागांमधून एकच कथासूत्र त्यांनी गुंफलेले दिसते.
नृत्य, नाटय़, संगीत यांचा विकास होत असताना शिक्षण व ग्रंथालयांकडेही त्यांनी विशेष लक्ष पुरवले. देशी भाषेबरोबरच इंग्रजी भाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळा सरफोजीराजांनी सुरू केल्या. तंजावरपासून वीस किलोमीटर अंतरावर मायावरम् येथे त्यांनी इंग्रजी शाळा सुरू केली. ख्रिश्चन शाळांना छत्रम्चाच भाग समजून आर्थिक साहाय्य दिले जात असे. चर्चच्या शेजारी शिक्षकांच्या राहण्याची सोय होती. त्या त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्ती शिक्षक म्हणून नियुक्त केल्या जात. स्त्री-शिक्षक नेमून मुलींसाठी शाळा सुरू करून त्यांनी समाजक्रांतीच्या दिशेने फार मोठे पाऊल उचलले. भूगोल व इतिहासाच्या पाठय़पुस्तकांचे मराठी व तामिळ भाषेत भाषांतर केले. विज्ञान, वेदशास्त्र, खगोलशास्त्र, संगीत, शिल्पकला अशा विविध विषयांचे अध्यापन त्यांत केले जात असे. लोकांना हसत-खेळत भूगोलाचे ज्ञान देण्यासाठी ‘देवेंद्र कोरवन्झी’ हे वैशिष्टय़पूर्ण नाटकही त्यांनी लिहिल्याचे आधी सांगितलेच आहे.
शिक्षणासाठी ग्रंथालयांची आवश्यकता ओळखून आणि सरफोजीराजांना ग्रंथवाचन आणि ग्रंथसंग्रह यांच्या असलेल्या आवडीतून तंजावरचे प्रसिद्ध ‘सरस्वती महाल ग्रंथालय’ आकाराला आले. मराठी मोडीतील असंख्य हस्तलिखितांचा संग्रह, तेलगु, तमिळ, संस्कृत व इंग्रजी भाषेतील ग्रंथ, ताडपत्रांवरचे संग्रह हे या ग्रंथालयाचे खास वैशिष्टय़ आहे. सरफोजीराजांना यात्रेची खूप आवड होती. त्यांनी अनेक धार्मिक स्थळांना भेटी देताना त्या, त्या ठिकाणच्या विद्याकेंद्रांनाही भेटी देऊन तेथून ग्रंथ खरेदी करून आणले. इतकेच नव्हे तर त्या ग्रंथांचे प्रतलेखन करण्यासाठी त्या, त्या भाषेतील पंडितांची नियुक्ती केली. एकदा तर त्यांनी दूरच्या प्रदेशातून आलेल्या गृहस्थांकडून हस्तलिखिते विकत घेण्यासाठी आवश्यक निधीच्या अभावामुळे आपल्या गळ्यातील रत्नहारच त्याला देऊन ती हस्तलिखिते ताब्यात घेतली. स्वाभाविकपणेच या ग्रंथालयास ‘राजा सरफोजी सरस्वती महाल ग्रंथालय’ हे नाव अत्यंत सार्थ ठरले आहे. इतिहास, संगीत, वैद्यकशास्त्र, वाङ्मय अशा विविध विषयांतील संशोधकांसाठी हे ग्रंथालय तीर्थक्षेत्रच आहे. या ग्रंथालयाच्या रूपाने सरफोजीराजांनी मिळवलेले हे अक्षरसाम्राज्य अक्षय टिकणारे आहे.
या आवडींबरोबरच सरफोजीराजांना वैद्यकशास्त्राचीही आवड होती. सरफोजीराजांनी वैद्यकशास्त्राच्या अभ्यासासाठी व संशोधनासाठी ‘धन्वंतरी महाल’ची स्थापना केली. मानवी रुग्ण व प्राणी या दोहोंच्या औषधोपचाराची सोय व संशोधन या महालात चालत असे. आधुनिक वैद्यकशास्त्र, युनानी, आयुर्वेद या तिन्ही शाखांचे संशोधन येथे होत असे. विविध औषधे व जडीबुटी यांचे उपयोग सांगणारे अठरा खंड सरस्वती महाल ग्रंथालयात उपलब्ध आहेत. रुग्णांवर केलेल्या उपचारांसंबंधीची कागदपत्रे (केस पेपर) या ग्रंथालयात जतन करून ठेवलेली आहेत. धन्वंतरी महालात रुग्णाला सांगितलेल्या उपचारांसंबंधीची एक कविता उपलब्ध आहे. त्या कवितेला ‘शरभेंद्र वैद्य मुरईगल’ असे म्हणतात. यात विविध आजारांवर केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची तपशीलवार माहिती आहे.
सरफोजीराजांना नेत्रचिकित्सेत रस होता. ते स्वत: नेत्रचिकित्सा करून डोळ्यांवर शस्त्रक्रिया करीत. राजांनी केलेल्या नेत्रचिकित्सेसंबंधीची कागदपत्रेही उपलब्ध आहेत. त्यात अनेक आकृत्या आहेत. त्यातील काही नोंदी मोडीत, तर काही इंग्रजीत आहेत. राजे स्वत: मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेत पारंगत होते. रुग्णांवर औषधोपचार करण्यासाठी ते आयुर्वेद, युनानी व इंग्रजी औषधांचा उपयोग करीत असत. गर्भवती स्त्री व तिचे आरोग्य, मुलांचे आरोग्य, बालरोग, नेत्ररोग, वातरोग, कावीळ, हगवण, दमा, सर्दीपडसे, अॅनिमिया, क्षयरोग, कर्करोग, इत्यादी रोगांची माहिती ‘शरभेंद्र वैद्य मुरईगल’ या काव्यग्रंथात आढळते. धन्वंतरी महालात युरोपीय व भारतीय डॉक्टरांची नियुक्ती केली जात असे. नवीन औषधांचा उपयोग करण्यापूर्वी त्या औषधांची चाचणी केली जात असे. औषधे तयार करण्याची पद्धती, त्या औषधांची यादी, स्त्रियांच्या मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या त्रासावर औषधे ‘स्त्रियांचे दोषास्पद’ या हस्तलिखितात आहेत. ‘अस्थिविद्या’ किंवा ‘अस्थिवर्णन’ हा द्वैभाषिक कोश स्वत: सरफोजीराजांच्या हस्ताक्षरात आहे. हा कोश राजांनी स्वत:च्या माहितीसाठी केला असावा. मुख्य नोंद इंग्रजी भाषेत व तिचा अर्थ मोडी लिपीत दिला आहे.
राजांनी पशुवैद्यकाचा अभ्यास करून पशुवैद्यक विभाग धन्वंतरी महालात सुरू केला. सरफोजीराजे अश्वपरीक्षेतही पारंगत होते. कोणता घोडा जय मिळवून देणार व कोणता नाही, घोडय़ाची शुभ व अशुभ चिन्हे, अश्वाची गती, उंची, तसेच अश्वांच्या आयुष्याविषयीचा राजांचा अभ्यास दांडगा होता. यातूनच त्यांच्या ‘गजशास्त्र प्रबंध’, ‘गजशास्त्र सार’ या ग्रंथांची निर्मिती झाली. राजांनी पक्षीजगताचा अभ्यासही केल्याचे आढळते. पक्षीलक्षण व चिकित्सा यांसंबंधीचे ग्रंथ या ग्रंथालयात आहेत. हे सर्व ग्रंथ त्या, त्या विषयातील तज्ज्ञांकडून माहिती घेऊन लिहून घेतले असावेत. या त्यांच्या वैविध्यपूर्ण कार्याबरोबरच राजे वैयक्तिक आयुष्यात अत्यंत धार्मिक व जनकल्याणकारी होते.
राजे वैयक्तिक आयुष्यात धार्मिक व धर्मसहिष्णु होते. त्यांनी हिंदू धर्माबरोबरच ख्रिश्चन धर्माचाही आदर केला. अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. अनेक यज्ञयाग केले. काशी, गया, प्रयाग या त्रिस्थळी यात्रा केल्या. तंजावर-रामेश्वरम् मार्गावर तंजावरपासून चौदा मैलांवर मुक्तंबापूर छत्रम् उभारले. या छत्रम्ला लागून शाळा होती. त्यात तमीळ, तेलगु व इंग्रजी भाषेतून शिक्षण दिले जात असे. या छत्रम्ला जोडून आरोग्यशाळा होती. एखादा यात्रेकरू तेथे वास्तव्याला असताना आजारी पडल्यास त्याला बरे वाटेपर्यंत त्याच्यावर सरकारी औषध-कोठीतून मोफत औषधोपचाराची व्यवस्था होती. यात्रेकरूंपैकी एखादी स्त्री गर्भवती असल्यास तिच्याकडे विशेष लक्ष दिले जात असे. योगायोगाने ती स्त्री तिथेच प्रसूत झाल्यास तिच्याकडे व बाळाकडे तीन महिने लक्ष पुरविले जात असे.
तंजावरातील पाण्याची अडचण लक्षात घेऊन शिवगंगा तलावातून पिण्याचे पाणी जलसूत्राद्वारे घरोघरी पोहोचविले जात असे. स्वच्छतेच्या दृष्टीने भुयारी गटारांची बांधणी केली गेली होती. त्यांच्या कारकीर्दीत अनेक विहिरी व तलाव बांधले गेले. राजे वारंवार राज्यात दौरे करून रयतेची काळजी घेत असत. त्यांनी मनोरला जहाजांसाठी गोदी व बंदर बांधले. तंजावरपासून ५० कि. मी. अंतरावर हवामान खात्याचे केंद्र त्यांनी उभारले; जे व्यापारासाठी अत्यंत उपयुक्त होते. याशिवाय त्यांच्या कार्यकाळात नौकानयन ग्रंथालय तसेच नौकानयन भांडार उभारून नौकानयनाचे तंत्र विकसित केले गेले.
तंजावरच्या कर्तृत्वशाली राजपरंपरेतील अत्यंत लोकप्रिय राजे सरफोजी यांनी आपली कारकीर्द शारदेच्या सेवेत तसेच जनकल्याणार्थ व्यतीत केली. ‘पेरियकोविल’ (मोठे देऊळ)च्या प्रांगणातील भिंतीवर मराठी रियासत कोरून त्यांनी दगडांना बोलके केले! राजांच्या या सर्व कर्तृत्वातून कल्पकता व दूरदृष्टी जाणवते. या बहुआयामी नृपतीची कीर्ती हिंदुस्थानपुरतीच सीमित नव्हती, तर ती इंग्लंडमध्येही पोहोचली होती. इंग्लंडमधील रॉयल एशियाटिक सोसायटीने सरफोजीराजांची विद्वत्ता व संशोधनवृत्तीचे अवलोकन करून त्यांना आपल्या संस्थेचे सन्मान्य सभासदत्व बहाल केले. राजांचे विचार अतिशय उदार आणि उदात्त होते. त्यांनी अनेक अज्ञानी व धर्मभोळ्या समजुती बाजूस सारून राज्यात अनेक सामाजिक व शैक्षणिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. काळाची पावले ओळखून आधुनिकतेची कास धरली. अशा या द्रष्टय़ा राजाच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण चिरकाल लोकांच्या मनात कायम न राहते तरच नवल.