रावबहादूर म. वि. धुरंधर यांच्या ‘कलामंदिरातील एकेचाळीस वर्षे’ या पुस्तकाची नवी आवृत्ती मॅजेस्टिक प्रकाशनतर्फे दीर्घ कालावधीनंतर प्रसिद्ध होत आहे. या पुस्तकाला दीपक घारे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील संपादित अंश..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध आधुनिक सामाजिक, राजकीय विचारांच्या दृष्टीने महत्त्वाचा कालखंड मानला जातो. याच काळात वास्तुकला, चित्रकला अशा कलेच्या क्षेत्रांतही बरेच बदल घडून आले. कलाविचारांचा प्रभाव व भारतीय कलावंत व कारागिरांची एकोणिसाव्या शतकातील परिस्थिती यातून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टची निर्मिती झाली. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून सुरू झालेल्या या कलापरंपरेचा १८९० नंतरचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर रावबहादूर म. वि. धुरंधर यांचं ‘कलामंदिरातील एकेचाळीस वर्षे’ हे आत्मकथन वाचायलाच हवं.
या हकिकतीमध्ये जे. जे.चा अभ्यासक्रम, तिथलं वातावरण, तिथली कलानिर्मिती याबद्दल सविस्तर माहिती आहे आणि धुरंधरांची विद्यार्थीदशेपासून प्रतिष्ठित चित्रकारापर्यंतची होत गेलेली यशस्वी वाटचालही आहे. चित्रकलेवरील निष्ठा, कौटुंबिक जिव्हाळा आणि निवेदनातला प्रांजळपणा यामुळे हे आत्मकथन रंजक आणि उद्बोधक झालं आहे. शिवाय या आत्मकथनाला काही पत्रांची, छायाचित्रांची जोड दिलेली आहे. शेवटी तर अनेक समकालीन चित्रकारांची छायाचित्रं दिलेली आहेत. त्यातली काही प्रसिद्ध नावं सोडली तर इतरांची माहितीही आज उपलब्ध नाही. आत्मवृत्ताच्या दृष्टीने या जंत्रीवजा संदर्भ साहित्याला फारसं महत्त्व नसलं तरी त्या काळचा दस्तावेज म्हणून त्याला निश्चितच वेगळं महत्त्व आहे. अनुभवाची सत्यता आणि महत्त्वाच्या घटनांची, व्यक्तींची नोंद असाही एक उद्देश या आत्मवृत्तामागे दिसतो. धुरंधरांच्या या दृष्टिकोनामुळे या पुस्तकाला एक विश्वासार्हता प्राप्त झालेली आहे.
या पुस्तकातला आशय दोन प्रकारचा आहे. कौटुंबिक पातळीवरचा, विद्यार्थीदशा, गृहस्थाश्रम आणि व्यक्तिगत यश यांचा वेध घेणारा स्मरणरंजनात्मक आशय हा पहिल्या प्रकारचा, तर दुसरा प्रकार म्हणजे दृश्यकलेचं तत्कालीन वातावरण जिवंत करणारा सामाजिक आशय.
धुरंधरांचा काळ हा पहिल्या महायुद्धाचा काळ होता. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी अशा दोन्ही युगांमधली स्वातंत्र्य चळवळ धुरंधरांच्या काळातच घडली. पण या आत्मकथनात स्वातंत्र्यलढय़ाचा ओझरता उल्लेख येतो. ‘१९३० सालची असहकारिता’ या शीर्षकाखाली काँग्रेसच्या चळवळीचा उल्लेख आला आहे. या काळात शाळा-कॉलेजेस् विद्यार्थ्यांनी हरताळ पाळल्यामुळे बंद पडली, अनेक विद्यार्थी चळवळीत सामील झाले. पण इतर शाळा-कॉलेजांसारखा स्कूल ऑफ आर्टवर, एक दोन विद्यार्थ्यांनी प्रयत्न करूनही त्याचा परिणाम झाला नाही ही बाब धुरंधरांनी संतोषाने नमूद केली आहे. कौन्सिलच्या निवडणुकीसाठी मतदान करायला जाताना ‘काँग्रेसच्या भाडोत्री लोकांनी’ मोटार कशी अडवली आणि मतदान न करताच कसं परतावं लागलं त्याची हकिकत धुरंधरांनी सांगितली आहे. ‘असहकारितेचा एक नमुना आणि काँग्रेसच्या नावावर लोकांकडून होणारा वाटेल तो मुर्खपणा’ अशी या प्रसंगाची संभावना धुरंधर यांनी केलेली आहे.
धुरंधर वृत्तीने नेमस्त होते. कलेच्या प्रांतात ज्ञानदानाचं आणि चित्रनिर्मितीचं काम निष्ठापूर्वक करत राहावं अशी त्यांची वृत्ती होती. धार्मिक वृत्तीच्या धुरंधरांनी ब्रिटिशांनी आणलेल्या यथार्थवादी शैलीचा व्रतस्थपणे स्वीकार केला. धुरंधरांचं कलाशिक्षण पूर्ण झालं त्याच सुमारास १८९६ मध्ये कलकत्ता स्कूल ऑफ आर्टमधून प्रिन्सिपॉल हॅवेल यांनी पाश्चिमात्य पद्धतीचे ग्रीक व रोमन पुतळे हटवले आणि भारतीय कलामूल्यं रुजवण्याचा प्रयत्न केला. अशाच प्रकारच्या पुतळ्यांनी धुरंधरांना जे. जे.च्या प्रथम भेटीत प्रभावित केलं होतं आणि त्यांच्या आधारेच त्यांनी कलाशिक्षण घेतलं होतं. भारतीयत्वाचा पुरस्कार करणारी बंगाल आणि मुंबईमधील पुनरुज्जीवनवादी चळवळ त्यांच्या डोळ्यांसमोर झाली, पण धुरंधरांनी त्याबद्दल अथवा नंतरच्या आधुनिक कलाप्रवाहांबद्दल फारशी उत्सुकता दाखवली नाही. बॉम्बे स्कूलच्या आधीच्या परंपरेत ते रमले आणि पौराणिक, ऐतिहासिक प्रसंगांवरची चित्रं ते रंगवीत राहिले. धुरंधरांच्या काळातील स्कूल ऑफ आर्ट म्हणजे एखाद्या कुटुंबासारखं होतं. शिक्षक व विद्यार्थी यांच्यात भावनिक नातं होतं. त्यांच्या आत्मवृत्तात ग्रीनवूड, ग्रिफिथ्स यांच्याबद्दलचे अशा प्रकारचे प्रसंग आलेले आहेत. धुरंधरांचे त्यांच्या विद्यार्थ्यांशी असेच जिव्हाळ्याचे संबंध होते.
या पुस्तकाचा संदर्भ दृश्यकलेच्या इतिहासाच्या संदर्भात बरेचदा दिला जातो. आबालाल रहिमान, शिल्पकार म्हात्रे, सॉलोमन यांची कारकीर्द, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टवर आलेलं गंडांतर, दिल्ली डेकोरेशन यांबद्दलची माहिती या पुस्तकानिमित्ताने प्रथम ग्रंथबद्ध झाली. जे. जे.चा अभ्यासक्रम, त्यात झालेले बदल याचीही माहिती धुरंधरांनी दिलेली आहे.
जे. जे.ची स्थापना कला आणि कारागिरीचे शिक्षण देण्यासाठी झाली. कालांतराने चित्र, शिल्प विषयांना प्राधान्य देण्यात आलं आणि त्यातून व्यक्तिचित्रं, प्रसंगचित्रं, निसर्गचित्रं या प्रकारात प्रावीण्य मिळवणारे चित्रकार निर्माण झाले. धुरंधर शिकले त्या काळात रेखांकनातील कौशल्य विकसित करण्यावर भर होता. त्यामुळे फ्री-हँड, पस्प्रेक्टिव्ह, शेडिंग फ्रॉम कास्ट (पुतळ्यावरून रेखांकन करणं), फॉलीएज (पानाफुलांचं रेखांकन) असे विषय होते. यातून इमारतींच्या सुशोभीकरणाला लागणारं अलंकरणात्मक काम करणाऱ्या क्राफ्ट्समन्सची निर्मिती होण्याचीच शक्यता अधिक होती.
मानवी देहाची चित्रं काढण्याचा अभ्यास सुरुवातीला ग्रीक, रोमन पुतळ्यांवरून केला जात असे. नंतर लाइफ स्टडीसाठी मॉडेल बसविण्यात येऊ लागलं. कॅप्टन ग्लॅडस्टन सॉलोमन यांनी जे. जे.मध्ये न्यूड क्लास सुरू केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे मानवी देहाचं चित्रण सुधारलं आणि त्याचा चांगला परिणाम एकूणच चित्रनिर्मितीवर दिसून आला. त्यानंतर म्युरल क्लास सुरू करण्यात आला. धुरंधरांनी या साऱ्या घडामोडींबद्दल लिहिलेलं आहे.
या पुस्तकातील लक्षात राहणाऱ्या व्यक्तिरेखा म्हणजे जॉन ग्रिफिथ्स आणि ग्लॅडस्टन सॉलोमन. बॉम्बे स्कूलच्या इतिहासात या दोघांनाही महत्त्व आहे. ग्रिफिथ्स यांनी केलेलं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे विद्यार्थ्यांकडून करून घेतलेल्या अजिंठा चित्रांच्या प्रतिकृती. सुमारे बारा वर्षे हे काम चाललं होतं. पेस्तनजी बोमनजी यांचा या कामात मोठा सहभाग होता. धुरंधरांनी अजिंठा टूरचा किस्सा आपल्या आत्मवृत्तात सांगितला आहे. १८९५ मध्ये विद्यार्थ्यांची अभ्यास सहल अजिंठय़ास गेली होती. तेव्हा ग्रिफिथ्स यांनी धुरंधरांना अजिंठा गुंफांचा पॅनोरमा (विहंगम दृश्य) काढण्यास सांगितलं. टेकडीच्या कडय़ावर जाऊन ते चित्र काढायचं होतं. ग्रिफिथ्स यांनी सोबतीला चार भालेवाले दिले होते. कडाक्याच्या थंडीत त्या एकांत जागी धुरंधरांनी तीन दिवस काम केलं. एके दिवशी दुपारी बारा वाजता वाघाची आरोळी ऐकू आली. धुरंधरांची भीतीने गाळण उडाली आणि चित्र अर्धवट पुरं करून ते परतले. मुंबईला आल्यावर ग्रिफिथ्स त्यांच्यावर रागावले आणि कृतक कोपाने म्हणाले, ‘‘तुला वाघाने खाल्ले असते, तरी काही कमी झाले नसते! जा, आता मी ते पुरे करीन.’’ एवढं बोलून ते हसले.
सर्वच इंग्रज अधिकारी चांगल्या स्वभावाचे होते असं नाही. इंग्रज अधिकाऱ्यांमधील हेवेदावे, संशयी वृत्तीचे नमुनेही धुरंधरांनी दिले आहेत. कलाशिक्षक व चित्रकार आगासकरांनी सेसिल बर्न्स यांचं उत्तम व्यक्तिचित्र केलं. त्यासाठी सीटिंग देऊन सुधारणा करण्याच्या मिषाने बर्न्स यांनी ते चित्र ब्रशने निकामी करून ठेवलं. शिवाय एक िहदी चित्रकार आपलं व्यक्तिचित्र प्रदर्शनात ठेवत आहे हे कमीपणाचं समजून बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात ते लावलं जाणार नाही अशी बर्न्स यांनी व्यवस्था केली. स्वत: सॉलोमन यांनाही ब्रिटिश शासनातील संबंधितांच्या राजकीय डावपेचांचा त्रास झाला. पण धुरंधरांचं आत्मकथन वाचून शेवटी संस्कार उरतो तो कलामंदिराचा आणि त्यात व्रतस्थपणे आणि आत्मीयतेने काम करत राहिलेल्या कलाशिक्षकांचा.
सर्वात अधिक महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व म्हणजे कॅप्टन ग्लॅडस्टन सॉलोमन. सॉलोमन यांच्या काळात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. भारतीयत्व जपणारी कलाचळवळ मुंबईत सुरू झाली ती प्रिन्सिपॉल सॉलोमन यांच्यामुळे. जे. जे.च्या विद्यार्थ्यांनी केलेल्या म्युरल्सच्या कामामुळे जे. जे.ला नाव मिळालं. वेम्बले, लंडन येथील प्रदर्शनात इंडियन रूम भारतीय कलाकृतींसह सादर करून भारतीय कलेचा पाश्चात्त्यांना परिचय करून दिला गेला तो सॉलोमन यांच्याच काळात. यानिमित्ताने सॉलोमन यांनी ‘रिव्हायव्हल ऑफ इंडियन आर्ट’ नावाचं पुस्तक प्रसिद्ध केलं.
सॉलोमन यांच्यावर संकटंही अनेक आली. प्रशासकीय आणि धोरणात्मक अशा दोन्ही प्रकारची ही संकटं होती. १९२१ मध्ये स्कूल ऑफ आर्ट दुसरीकडे हलवून ती जागा लिलावात काढावी असा मुंबई सरकारचा प्रस्ताव होता. या विरोधात स्कूल ऑफ आर्टची बाजू मांडण्यास धुरंधरांनी सर्वतोपरी मदत केली आणि हा प्रस्ताव हाणून पाडण्यात आला. १९३२ मध्ये थॉमस रिपोर्टचा आधार घेऊन स्कूल ऑफ आर्ट बंद करण्याचा घाट घालण्यात आला, पण नामदार जयकर यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक सभा बोलावण्यात येऊन हा निर्णय लोकांनी सरकारला मागे घ्यायला लावला.
धुरंधर यांनी पेंटिंग्जव्यतिरिक्त दिनदर्शिका, पोस्टर्स, पुस्तके-मासिकांची मुखपृष्ठे यासाठीही चित्रं केली. राजा रविवर्मा यांच्याप्रमाणे धुरंधरांची चित्रं मुद्रित स्वरूपात घरोघरी पोचली. रेल्वेसाठी त्यांनी पोस्टर्स केली. पुस्तकात धुरंधरांनी संपादक मित्रांचा परिचयदेखील दिला आहे. त्यात शं. वा. किर्लोस्कर, ‘विविधवृत्त’ साप्ताहिकाचे रा. का. तटनीस, ‘विसवी सदी’चे संपादक महम्मद अल्लारखीया शिवजी यांचा समावेश आहे. या सर्वासाठी धुरंधरांनी आपली चित्रं दिली. ग्रिफिथ्स यांच्या ‘मोनोग्राम ऑन कॉपर अॅण्ड ब्रास पॉटरी’ या लेखासाठी धुरंधरांनी जवळपास शंभर चित्रं काढली होती. सी. ए. किंकेड यांच्या ‘डेक्कन नर्सरी टेल्स’, ‘टेल्स ऑफ किंग विक्रमादित्य’ या पुस्तकांसाठी त्यांनी चित्रं काढली. ‘मेघदूत’, उमर खय्यामच्या रुबाया यांसाठीही धुरंधरांनी चित्रं करून दिली.
‘कलामंदिरातील एकेचाळीस वर्षे’मध्ये जे.जे. आणि पर्यायाने बॉम्बे स्कूलचा आलेला इतिहास पाहिला आणि म. वि. धुरंधर यांचा चित्रकार, कलाशिक्षक म्हणून झालेला व्यक्तिगत प्रवासही पाहिला. आज आपण जेव्हा हे पुस्तक वाचतो तेव्हा त्याबद्दल काय वाटतं? एकतर त्याची रचना, पुस्तकाच्या शेवटी दिलेली छायाचित्रं, पत्रव्यवहार आणि गौरवग्रंथात असावीत तशी धुरंधरांच्या चाहत्यांनी केलेली पद्यरचना हा घाट आता कालबा झालेला आहे. पण या घाटामुळे ग्रंथबद्ध झालेली माहिती ही धुरंधरांचा काळ, त्यांचे समकालीन चित्रकार आदी समजून घेण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. धुरंधरांनी साऱ्या घटना तारीखवार आणि नेमकेपणाने दिलेल्या आहेत. त्यामुळे एक संदर्भग्रंथ म्हणून त्याचं मोल मोठं आहे. अन्यथा ग्रिफिथ्स, सॉलोमन अशा महत्त्वपूर्ण व्यक्तींची माहिती, त्यांची छायाचित्रं अन्यत्र कुठे मिळाली असती? त्याकाळच्या कलाशिक्षणाचा एक दस्तावेज म्हणून त्याचं महत्त्व वादातीत आहे.
हे पुस्तक वाचत असताना आपण व्हिक्टोरियन संवेदनशीलतेवर पोसलेल्या, ब्रिटिशांच्या वासाहतिक साम्राज्यातल्या स्वप्निल जगात वावरत आहोत असं वाटत राहतं. आपण आपल्या कलानिर्मितीत मग्न राहावं, कलासक्त राज्यकर्त्यांची मर्जी संपादन करावी आणि समाजात चित्रकार म्हणून मान्यता मिळवावी इतकंच उद्दिष्ट या काळातल्या चित्रकारांसमोर होतं. भोवतालचं जग झपाटय़ाने बदललं तरी धुरंधर मात्र या जगातच कायम राहिले. ‘कलामंदिर..’ हा त्याचा बिनतोड पुरावा आहे.