टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा हे येत्या २८ डिसेंबर रोजी वयाची पंचाहत्तरी पूर्ण होत असल्याने टाटा समूहाच्या जबाबदारीतून निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी सायरस मिस्त्री टाटा समूहाची सूत्रे हाती घेत आहेत. त्यानिमित्ताने उद्याच्या समर्थ भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकेल अशा रतन टाटा यांच्या समृद्ध औद्योगिक आणि मूल्यात्मक वारशाचे मार्मिक विश्लेषण करणारे लेख..
बॉम्बे हाऊसमध्ये- म्हणजे टाटा समूहाचं मुंबईतलं मुख्यालय- इथं काम करणारे सांगतात- भारतातल्या सगळय़ात मोठय़ा उद्योगसमूहाचे अध्यक्ष रतन टाटा जेव्हा या इमारतीत आपल्या कार्यालयात येण्यासाठी शिरतात..
तेव्हा काहीही वेगळं होत नाही!
म्हणजे एरवी एखाद्या छोटय़ा-मोठय़ा उद्योगपतीच्या कार्यालयात त्याच्यासाठी स्वतंत्र लिफ्ट असते. तो यायच्या आधी त्याचे भालदार-चोपदार ‘बाजू व्हा.. बाजू व्हा’ असं म्हणत तिथे असलेल्या इतरांना उगाचच लहान वाटायला लावत असतात. पण रतन टाटा जेव्हा बॉम्बे हाऊसमध्ये शिरतात तेव्हा यातलं काहीही होत नाही. त्यांची गाडी आली की पहिल्यांदा दारात बसलेल्या कुत्र्यांना आनंद होतो. आता एवढय़ा मोठय़ा उद्योगपतीच्या दारी कुत्रे असणं नवीन नाही. पण बॉम्बे हाऊसमधले कुत्रे म्हणजे खरे कुत्रे. चार पायांचे. समस्त टाटा कुटुंबियांना त्यांचं प्रचंड प्रेम. रतन टाटा यांची गाडी आली की हा सारमेय संप्रदाय त्यांच्या गाडीभोवती जमतो. गाडीतून उतरले की लोक काय म्हणतील वगैरे विचार न करता रतन टाटा त्यातल्या काहींना थोपटतात. लाड करतात. ‘दीज इंडियन डॉग्ज..’ वगैरे शब्द त्यांच्या तोंडात काय, मनातही येत नाहीत. आणि मग ते लिफ्टच्या रांगेत उभे राहतात. इतर कर्मचाऱ्यांसारखे. म्हणजे त्यांच्यासाठी लिफ्ट राखून वगैरे ठेवली जात नाही. आपण कोण आहोत, काय आहोत, हे हा माणूस कधीही  मिरवत नाही. पेज-थ्रीच्या उथळ आणि उठवळ पाटर्य़ात पाचकळपणा करताना दिसत नाही. आणि उद्योगपतींच्या मतलबी गराडय़ातून स्वत:ला अलगद वेगळं ठेवू शकतो. स्वत:च्या घरासाठी २०-२५ मजल्यांचा इमला उभारणं टाटांना सहज शक्य आहे. पण ज्या शहरात ६५ टक्के जनतेच्या डोक्यावर आभाळाशिवाय काहीच नाही, त्या शहरात असं राहणं बरं नाही, हे त्यांना जाणवतं. त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्यासारखे ते फ्लॅटमध्ये राहतात. आणि शनिवारी आपले दोन जर्मन शेफर्ड कुत्रे आणि ते स्वत:च्या छोटय़ा यंत्रहोडीतून अलिबागला जातात.
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात टाटा उद्योगसमूहाचा कंठहार असलेल्या ताज हॉटेलला लक्ष्य करण्यात आलं होतं. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियासमोर असलेल्या या हॉटेलच्या व्यवस्थापकाचं कुटुंबच्या कुटुंब या हल्ल्यात बळी पडलं. त्यांना तर टाटा यांनी मदतीचा हात दिलाच; पण या हॉटेलच्या परिसरातले जे जे जायबंदी झाले वा बळी पडले, त्या सगळ्यांच्या घरी जाऊन रतन टाटा यांनी जातीनं त्यांना मदत केली. हे करायची त्यांना काहीच गरज नव्हती. आणि ते केलं नसतं तरी त्यांना कोणी काहीही म्हणालं नसतं. पण तरी त्यांनी ही मदत केली. हे खास टाटापण! त्यांचे पूर्वसुरी जेआरडी हे बेस्टच्या रांगेत आपल्या कार्यालयातलं कोणी उभं असलेलं दिसलं तर त्याला चक्क आपल्या गाडीतूनच घेऊन यायचे बरोबर. त्यात कोणी ओशाळं वाटून म्हणालंच की, तुमच्या गाडीत कशाला? त्याला जेआरडींचं उत्तर असायचं : गाडी माझी नाहीए. कंपनीची आहे. तेव्हा कंपनीतल्याच कोणाला बरोबर घेतलं तर बिघडलं काय?
जेआरडी किंवा रतन टाटा यांच्या दृष्टीनं त्यात काही बिघडलेलं नाही. बिघडलेलं असलंच, तर आपल्याकडचं वातावरण! ज्या देशात नियम, कायदेकानू वगैरे न पाळणं हे पुरुषार्थाचं, सामर्थ्यांचं लक्षण मानलं जातं, त्या देशात टाटा यांच्यासारखे उद्योगपती हे अल्पसंख्याकांत जमा असतात. आणि ज्या देशात उच्च विचारसरणीसाठी साधी राहणी हा अत्यावश्यक घटक ठरतो, त्या देशात टाटा हे गौरवशाली अपवाद ठरतात. येत्या २८ डिसेंबरला रतन टाटा आपल्या उद्योगसमूहाची धुरा खाली ठेवतील. १४४ वर्षीय उद्योग घराण्याची ही पाचवी पाती! उद्योगसमूह म्हणून टाटांनी देशाला महसुलाशिवाय दुसरं जे काही आणि जेवढं दिलंय, ते अन्य उद्योगसमूहांच्या सामूहिक परतफेडीच्या दुप्पट असेल. खायचं मीठ ते चालवायची मोटार.. इतका मोठा अवकाश टाटांनी व्यापलाय. भारतातल्या शेअरबाजारात जी काही उलाढाल होते, त्यातला जवळपास सात टक्के वाटा एकटय़ा टाटा कंपन्यांचा असतो. देशाला मिळणाऱ्या एकूण कंपनी करांतला तीन टक्के वाटा टाटा समूहाच्या कंपन्यांचा असतो आणि या गटाकडून भरला जाणारा अबकारी कर देशाच्या एकत्रित कराच्या पाच टक्के इतका असतो.
या आकडय़ांचा संदर्भ अनेकांना नीटसा लागणार नाही. काहींना अन्य काही उद्योग यापेक्षाही मोठे आहेत, हे जाणवेल. मग टाटांचंच महत्त्व इतकं का?
त्यासाठी वेगवेगळय़ा अंगांनी विचार करायला हवा. रतन टाटा यांनी १९९१ साली कंपनीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. टाटा समूहाच्या परंपरेप्रमाणे तसे ते आधीपासून- म्हणजे १९६२ पासूनच कंपन्यांच्या विविध शाखांत काम करीत होते.. अनुभव घेत होते. लोभस, राजस जेआरडींचा तो काळ. टाटा समूह अनेकांगांनी वाढला होता आणि या प्रत्येक वळणावर एकेक ढुढ्ढाचार्य आपापली मठी सांभाळत होता. ही सगळीच मोठी माणसं होती. परंतु ती सगळी मिळून समूहाला मोठं करण्याऐवजी स्वत:च्या मोठेपणात रंगली होती. एखादा उद्योग हा समूह म्हणून जागतिक पातळीवर वाढू इच्छित असेल तर नुसत्या फांद्या मजबूत होऊन चालणार नाही, त्याचं खोडही तितकंच सशक्त आणि निरोगी असायला हवं.. हे पहिल्यांदा रतन टाटा यांनी ओळखलं. त्यामुळे सूत्रं हाती घेतल्यावर त्यांनी पहिल्यांदा काय केलं, तर या बेढब प्रमाणात वाढलेल्या फांद्या छाटायला सुरुवात केली. तसं करताना अगदी रूसी मोदी यांच्यासारख्या मजबूत फांदीची कापणी करायलाही त्यांनी मागेपुढे पाहिलं नाही. आपल्यासारख्या व्यक्तिपूजक देशात त्यावेळी अनेकजण हळहळले. ही व्यक्तिपूजा आणि नवीन काही करायला आलेला जुन्याचं संचित जणू खड्डय़ात घालायला आलेला आहे असं मानण्याची दळभद्री वृत्ती यामुळे मोदी यांना बाजूला सारण्याचा निर्णय रतन टाटा यांनी घेतल्यावर अनेकांनी ‘आता या समूहाचं काही खरं नाही,’ असं म्हणत सुस्कारे सोडायला सुरुवात केली. वयाच्या मोठेपणाचा वापरही आपल्याकडे दडपण आणण्यासाठीच केला जातो. म्हणजे ‘अमुकच्या वयाकडे तरी पाहायचं त्यांनी..’ अशा प्रतिक्रिया सरसकटपणे व्यक्त होतात. त्यामुळे मोदी यांच्यासारख्याच्या बाजूने आणि अर्थातच रतन टाटा यांच्या विरोधात समाजमन तयार झालं होतं. हे वयाचं मोठेपण वैयक्तिक पातळीवर मानणं ठीक आहे एक वेळ; पण सामाजिक पातळीवर वयानं मोठी व्यक्ती मोठय़ा माणसासारखी वागत नसेल तर तिला तिची जागा दाखवून देण्यात काहीच चुकीचं नाही. मोदी त्यावेळी इतके सटकलेले होते, की रतन टाटांविरोधातल्या लढाईत त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्यासारख्या ओवाळून टाकलेल्याचीही मदत घ्यायचा प्रयत्न केला होता. हे पाहिल्यावर मग रतन टाटा किती बरोबर होते, याची जाणीव अनेकांना व्हायला लागली. तेव्हा मोदी यांना टाटा स्टीलची जमीनदारी अखेर सोडावी लागली. परंतु रतन टाटा यांचा मोठेपणा हा, की त्यांनी एका चकार शब्दाने कधी मोदी यांचा अपमान केला नाही, की आपण जिंकल्याचा आनंद साजरा केला नाही.
त्यानंतरचं त्यांचं दुसरं पाऊल म्हणजे टाटा हा ब्रँड म्हणून अधिक कसदार आणि सकस कसा होईल, यासाठी त्यांनी पावलं उचलायला सुरुवात केली. टाटा सन्स ही टाटा समूहातल्या अनेक कंपन्यांची मूळ कंपनी. त्यामुळे टाटा सन्सचा जो अध्यक्ष असतो, तोच टाटा समूहाचाही अध्यक्ष होतो. या कंपनीत टाटा यांची आणि समूहाची म्हणून अशी फार कमी मालकी होती. म्हणजे एखाद्यानं टाटा समूहाचे समभाग बाजारातून मोठय़ा प्रमाणावर विकत घेतले असते तर त्याला या समूहाचं नियंत्रण करता आलं असतं. हा धोका रतन टाटा यांनी ओळखला. त्यामुळे त्यांनी प्रथम टाटा सन्सची तटबंदी मजबूत केली. नंतर त्यांच्या आणखीन एका निर्णयावर त्यावेळी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तो निर्णय होता- ‘टाटा’ हे नाव वापरत असल्याबद्दल इतर कंपन्यांनी टाटा सन्सला स्वामित्व हक्क शुल्क देण्याचा! त्यालाही सुरुवातीला विरोध झाला. ज्या देशात घराण्याचं नाव फुकटात वापरायची सवय आहे, त्या देशात हे असं शुल्क वाजवून घेण्याची कुणालाच सवय नव्हती. ती टाटा यांनी लावली. त्याचबरोबर पूर्वी टाटा समूहातल्या अनेक कंपन्या या स्वतंत्र घराण्यासारख्या वागू लागल्या होत्या. म्हणजे त्यांची प्रतीकं, मानचिन्हं वगैरे वेगवेगळी होती. आधुनिक जगात कंपन्यांची मानचिन्हं कशी दिसावीत याचंही एक शास्त्र आहे. मर्सिडीजच्या नाकावरच्या वर्तुळातल्या त्या तीन टोकांच्या चांदणीला आतल्या इंजिनाइतकंच महत्त्व आहे. उलटय़ा बाणाची क्लिप ही पार्कर पेनांची ओळख आहे. आणि लॅमी कंपनीच्या उत्तम दर्जाच्या लेखण्या टोपणांच्या बंद यु-पिन्ससारख्या क्लिप्समुळे ओळखल्या जात असतात. अ‍ॅपलचं सफरचंद हे विशिष्ट कोनातूनच कापलं गेलं पाहिजे, हा कंपनीचा आग्रह असतो. आणि फेसबुकमधलं ‘एफ’ हे अक्षर कसं लिहिलं जावं याविषयी ती कंपनी आग्रही असते. टाटांनी हा आग्रह आपल्या समूहाच्या कंपन्यांमध्ये आणला. टेल्को, टिस्को वगैरे नावांनी या समूहातल्या कंपन्या ओळखल्या जायला लागल्या होत्या. काही काळानंतर ही विशेषनामंच त्यांची ओळख झाली असती. तो गुंता रतन टाटा यांनी सोडवला आणि या कंपन्यांना टाटा मोटर्स, टाटा स्टील वगैरे अशी सुटसुटीत नावं दिली. ब्रँडिगसाठी भारतीय कंपन्या तशा कधी ओळखल्या जात नव्हत्याच. ब्रँडचं व नावाचं महत्त्व आपल्याला होतं. परंतु त्याचं बाजारपेठीय मूल्य आणि शास्त्र आपण कधी लक्षात घेतलं नव्हतं. ते टाटांनी भारतीय बाजाराला दाखवून दिलं. शेवटी नावातच सगळं काही असतं.
याहीपेक्षा एक मोठी कामगिरी रतन टाटा यांच्या नावावर आहे. ज्या काळात भारतीय उद्योग ‘गडय़ा आपुला गाव बरा..’ अशा मानसिकतेत जगत होते, त्या काळात रतन टाटा यांनी अनेक बडय़ा परदेशी कंपन्यांना हात घातला. इंग्लंडमधली कोरस ही पोलाद कंपनी, आलिशान मोटारी बनविणारी जग्वार लँड रोव्हर, टेटली चहा कंपनी असे अनेक उद्योग टाटा कुटुंबात रतन टाटांमुळे सहभागी झाले. तोपर्यंत ‘टाटा’ हा ब्रँड फक्त भारतापुरताच मर्यादित होता. रतन टाटा यांनी तो जगाच्या पातळीवर नेला. एकेकाळी भारतीय कंपन्या या जागतिक कंपन्यांच्या शिकार म्हणून ओळखल्या जायच्या. स्वराज पॉल यांनी त्याबाबत केलेला प्रयत्न अनेकांना आठवत असेल. टाटा यांनी या प्रवाहाची दिशा बदलली. भारतीय कंपन्या आता परदेशी कंपन्यांना सामावून घेण्यासाठी सिद्ध आहेत, असा संदेश त्यांच्याच काळात बाहेर गेला. तो टाटा यांच्याचकडून गेला ते बरं झालं. त्यामुळे विश्वासार्हता इतकी वाढली, की ब्रिटनमधे स्थानिक कंपनीला दुसरी कोणती कंपनी विकत घेणार आहे अशी हवा तयार झाल्यावर तिथली कामगार मंडळी ‘आम्हाला टाटांनी घ्यावं..’ अशी मागणी करू लागली.
१९९१ नंतर भारतात आर्थिक उदारीकरणाचे वारे वाहू लागले. आज ना उद्या भारताला हे करावंच लागेल, याची रतन टाटा यांना जाणीव होती. त्यासाठी ते सज्ज होते. जागतिकीकरणाच्या काळात परदेशी कंपन्या भारतीय बाजारपेठेत शिरत असताना हीच वेळ त्यांच्याही बाजारात मुशाफिरीसाठी जाण्याची- हे फक्त आपल्याकडच्या रतन टाटा यांनीच ओळखलं. अन्य मंडळी स्पर्धेबाबत अंगचोरी करत असताना टाटा स्वत:हून जागतिक बाजारपेठेत पूर्ण ताकदीनिशी शिरले. रतन टाटा मुळात आरेखनकलेचे विद्यार्थी. डिझाइन हा त्यांच्या आवडीचा विषय. अजूनही उद्योगाच्या आकडेमोडीपेक्षा नवनवीन डिझाइन्स करत बसणं त्यांना भावतं. इंडिका आणि नॅनो या मोटारी या त्यांच्या रेखांकनातून जन्माला आल्यात. या सगळय़ाच्या आधारे रतन टाटा यांनी भारतीयपणाच्या म्हणून ज्या काही मर्यादा अप्रत्यक्षपणे असतात, त्या त्यांनी सहजपणे ओलांडल्या आणि मग त्यांच्या रस्त्यानं जाणाऱ्यांची रांगच लागली. आता परिस्थिती अशी आहे की, टाटांच्या १०,००० कोटी डॉलर्सच्या महसुलापैकी निम्म्यापेक्षा अधिक महसूल हा भारताबाहेरून येतो, ही बाब अधोरेखित करायला हवी. संपूर्ण भारतीय अशा या उद्योगाचं निम्म्याहून अधिक उत्पन्न हे अभारतीय आहे.
अर्थात या काळातली रतन टाटा यांची सगळीच खरेदी काही योग्य होती असं म्हणता यायचं नाही. कोरसचा व्यवहार आतबट्टय़ाचा ठरला असं आता म्हणता येईल. त्यामागाने जग्वार लँड रोव्हर हा आतबट्टय़ाचा ठरेल असं वाटूनही तो तसा ठरला नाही. पण हे असं होणारच. यशस्वी व्हायचं असेल तर माणसानं थोडं धोकादायकच जगायला पाहिजे, असं जेआरडी म्हणायचे. रतन टाटा यांनी तेच केलं. पण तसं करताना धोकादायक म्हणजे नियम तोडून नाही, याचीही जाणीव ठेवली. त्याचमुळे इतर उद्योगपतींच्या मागे- आणि पुढेही- वेगवेगळे भ्रष्टाचार चिकटले तसे रतन टाटांच्याबाबत झालं नाही. एक नीरा राडिया बाईंचं टेप प्रकरण सोडलं तर टाटा कधी वादग्रस्त झालेत असं झालं नाही. त्याही प्रकरणात तपशील पाहिला तर लक्षात येईल की, दूरसंचार क्षेत्र अनेकजण लुटून नेत असताना नियमाप्रमाणे जगू पाहणाऱ्यांची मोठी कुचंबणा होत होती. टाटांच्या कृतीनं त्या कुचंबणेलाच एक प्रकारे वाट फुटली.
वयाच्या पंच्याहत्तरीनंतर आपण ही उद्योगधुरा सांभाळणार नाही, असं त्यांनी आधीच जाहीर केलं होतं. त्यानंतर मोठय़ा शोधमोहिमेतनं सायरस मिस्त्री या पन्नाशीला तीन-चार वर्षे असणाऱ्या तरुणाकडे टाटा समूहाचं नेतृत्व आता जाईल. टीसीएस, टाटा इंडिकॉम वगैरे विस्कळीत म्हणता येतील अशा कंपन्यांचं काय करायचं, हे आता आप्रो सायरस यांना ठरवावं लागेल. जेआरडींकडून राहून गेलेलं काम रतन टाटांनी पूर्ण केलं. त्यांचं राहिलेलं काम आता सायरस करेल अशी आशा आहे. संक्रमण म्हणतात ते हेच असतं. पुढे जाताना अनावश्यक ते मागे टाकत जावंच लागतं याची जाण या उद्योगातल्या धुरिणांना आहे.
या सगळय़ा काळात या उद्योगसमूहाचं एक महत्त्वाचं वैशिष्टय़ नोंदवायलाच हवं. ते म्हणजे ‘दुनिया मुठ्ठी में’ घेऊ पाहणारे नवोद्योगी या काळात आले, भराभरा वाढले ते सरकारधार्जिण्या, परवानाप्रेमी उद्योगांमुळे! अशा उद्योगांत सरकारची भूमिका महत्त्वाची असते आणि हात ओले करून ती आपल्या सोयीनं बदलता येते. अनेक उद्योगांनी तशी ती बदलली. परंतु टाटा वाढले, विस्तारले ते सरकारी वरदहस्त नसलेल्या उद्योग आणि सेवाक्षेत्रांत! आणि हेच त्यांचं मोठेपण आहे. ही बाब अनेकांकडून दुर्लक्षित राहते म्हणून मुद्दाम इथं नमूद केली.
अशा धोरणाचे काही तात्कालिक तोटेही असतात. फायद्या-तोटय़ाच्या रहाटगाडग्यात बऱ्याचदा तोटा पदरी येतो. आपण मागे पडलो आहोत की काय, असं वाटायला लागतं. कारण अन्य काही अफाट, धोकादायक अशा वेगाने पुढे जात असतात. अशावेळी थांबायचं असतं आणि स्वत:वरचा विश्वास ढळू द्यायचा नसतो. जेआरडी यांनी तेच केलं. त्यांना जेव्हा- एका दुसऱ्या उद्योगाची खूप प्रगती होतेय, तुम्ही मागे पडला आहात, याबद्दल विचारलं होतं तेव्हा जेआरडी उत्तरले होते : फॉर्म इज टेंपररी, क्लास इज पर्मनंट.
रतन टाटा यांनी हे सिद्ध केलंय. एरवी मोठमोठी कर्तबगार, विक्रमी मंडळी कधी पायउतार होणार, असा प्रश्न पडतो. रतन टाटा यांनी ती वेळ स्वत:वर येऊच दिली नाही. स्वत:च्या मस्तीत, आनंदात ते निवृत्त होताहेत.
समर्थ रामदासांनी आदर्श राजा हा उपभोगशून्य स्वामी असायला हवा असं म्हटलं होतं. रतन नवल टाटा यांची कारकीर्द ती उपाधी आठवणारीच आहे.

Morya Gosavi Sanjeev Samadhi Festival begins in chinchwad Pune news
पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
PM Narendra Modi interaction with Chief Secretaries across country for two days
पंतप्रधान मोदी देशभरातील मुख्य सचिवांशी साधणार दोन दिवस संवाद
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
Thane, Chitrarath, Constitution, New Year Swagat Yatra,
ठाणे : यंदाच्या नववर्षे स्वागत यात्रेत ‘संविधान’ विषयावर चित्ररथ
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Story img Loader