सकस अभिनयाबरोबरच प्रायोगिक आणि बालरंगभूमीची नाटय़चळवळ जिवंत ठेवण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे अलीकडेच निधन झाले, त्यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी..
दु:खद बातम्या खोटय़ा का ठरत नाहीत? ‘सुलभा देशपांडे गेल्या!’ ही बातमी ऐकली. मन भिरभिरलं. किती वेळ कोणास ठाऊक! बेणारेबाईंच्या शब्दांनी कानाभोवती उद्रेक मांडला!
‘‘मिलॉर्ड, जीवन ही एक महाभयंकर गोष्ट आहे. जीवनाला फाशी दिलं पाहिजे! न जीवनं जीवनमर्हती.’’ जीवनाची चौकशी करून त्याला नोकरीवरून काढून टाकलं पाहिजे.. या जीवनात फक्त एकच गोष्ट सर्वमान्य आहे.. शरीर! तुम्ही नाही म्हटलंत तरी तेच सर्वमान्य! भावना.. ही सर्वाचं मन फक्त हळवं होऊन बोलण्याची गोष्ट.. हे विसाव्या शतकातील सुसंस्कृत माणसाचे अवशेष. पहा, कसे एकेकाचे चेहरे रानटी दिसत आहेत ते. त्यांच्या ओठांवर थिजलेले सुंदर सुंदर शब्द आहेत. पोटात अतृप्त वासना आहेत.. हे शरीर सगळा घात करीत आहे. या शरीराची किळस येते मला. आणि फार फार प्रेम वाटते त्याच्याबद्दल. आता त्यात आहे, त्या क्षणाचा साक्षी- एक कोवळा अंकुर- उद्याच्या बागडत्या, हसत्या-नाचत्या जिवाचा.. माझ्या मुलाचा.. माझ्या प्राणाचा.. त्याच्यासाठी आता हा देह मला हवा आहे. त्याच्यासाठी! त्याला आई हवी.. त्याला हक्काचे वडील हवेत.. त्याला घर हवं.. संरक्षण हवं.. प्रतिष्ठा हवी..’’
जिवाच्या आवेगानं बेणारेबाई अवघ्या स्त्रीजातीचं आक्रंदन प्रकट करतात. दोन पानांच्या या दीर्घ स्वगतानंतर साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बेणारेबाई निपचित पडतात. प्रेक्षक सुन्न होतात.. थिजतात..
विलक्षण अनुभव होता तो. आयुष्यभराच्या आठवणींत रुतून बसलेला हा प्रसंग ‘त्या’ बातमीने उफाळून आला. जगभरातील नाटय़साहित्यातील हे एक श्रेष्ठ स्वगत.. ते अभिव्यक्त करायला तितकीच समर्थ अभिनेत्री हवी. सुलभाताईंनी हे मरण खांद्यावर घेऊन यशस्वीपणे वाहून नेलं. कुठल्याही नाटय़विद्यालयाच्या शिक्षणाविना त्यांनी हे साध्य केलं. कारण त्यांची अभिनयशक्ती ही उपजतच होती आणि अभ्यासाने, अवलोकनाने त्यांनी त्या शक्तीला आकार दिला. सुलभाताई हाडाच्या शिक्षिकाच होत्या. मुलांच्या शाळेत शिक्षिका होत्या. तिथेच त्यांना त्यांच्या बेणारेबाईंच्या अभिनयाला आवश्यक ती सामुग्री मिळाली असणार. टिपकागद होऊन त्यांनी सगळं टिपूनच घेतलं. संपुटात साठवून ठेवलं.. आणि वेळ येताच झाकण उघडलं.. जणू सगळ्यांना विस्मयचकित करण्यासाठीच!
त्यांच्या एका नाटकातल्या भूमिकेबद्दल लिहिताना मी म्हटलं होतं, ‘‘त्यांच्या अभिनयात विजयाबाई (मेहता) डोकावतात.’’ त्या माझ्यावर खूप रागावल्या, पण मनातूनच. त्यानंतर अनेक जाणकारांनी तीच प्रतिक्रिया दिली; तेव्हा मात्र सुलभाताईंनी मनावर घेतलं. अरविंद देशपांडे, दामू केंकरे यांचं मार्गदर्शन घेतलं आणि त्या प्रयत्नपूर्वक मेहतामुक्त झाल्या. सुलभायीन राहिल्या. त्याचं प्रत्यंतर म्हणजेच बहुधा बेणारेबाई.
‘शांतता..’मधलं शेवटचं बेणारेबाईंचं स्वगत हे नाटक पूर्ण झाल्यानंतर लिहिलेलं आहे. सुलभाताईंनी ही भूमिका किती खणली होती हे कळलं म्हणजे भूमिकेच्या यशाचं गमक उमगते. त्या म्हणतात, ‘‘तेंडुलकरांनी मनाविरुद्ध आणि नाटक लिहून संपल्यावर स्वतंत्रपणे लिहिलेलं हे स्वगत- तसं खरंच स्वतंत्र, उपरं होतं काय? बेणारेची स्वगतातून उमटलेली ती तडफड, तिची जीवनदृष्टी, तिचा बंडखोरपणा, तिचा चाकोरीबद्ध दिशाहीन जगणाऱ्या समाजाविरुद्धचा संताप, समाजाने तिची केलेली ससेहोलपट, त्यामुळे आलेला अगतिकपणा, एका उद्याच्या हसत्या-नाचत्या-बागडत्या जीवनाविषयीची ओढ आणि त्याला जन्माला घालायचा निर्धार.. हे सगळं ज्या स्वगतात एकवटलेलं आहे, ते काय नाइलाजाने लिहून प्रकटलंय?’’
व्यक्तिरेखेचे हे सर्व भावविशेष सुलभाताई आपल्या मुद्राभिनयातून, देहबोलीतून, आवाजाच्या आरोह-अवरोहातून पूर्णपणे प्रकट करीत असत. शंभू मित्रा आणि त्यांची पत्नी- तृप्ती मित्रा हे दिग्गज बंगाली नाटय़कलावंत. तृप्ती मित्रांनी बंगाली ‘शांतता..’ मधील ‘बेणारेबाई’ साकार केली होती. ती भूमिका पाहून साहित्यिका तारा पंडित यांनी तृप्तीजींचं जोरदार कौतुक केलं. शेजारीच शंभूदा उभे होते. ते म्हणाले, ‘‘तुम्ही सुलभाताईंची ‘बेणारे’ पाहिलीत का? बेणारेला त्या जो न्याय देतात, तो अजून दुसऱ्या कोणत्याच ‘बेणारे’ने दिलेला नाही.’’ यापेक्षा मोठा पुरस्कार दुसरा कोणता?
सुलभाताईंनी ‘सखाराम बाईंडर’ हिंदीत केलं होतं. त्या नाटकाचं दिग्दर्शन सुलभाताईंचं होतं. त्या नाटकातील ‘चंपा’ ही व्यक्तिरेखा त्या स्वत:च साकारणार असल्याचं त्यांनी सत्यदेव दुबे यांना सांगितलं. त्यावर सत्यदेव दुबे म्हणाले, ‘‘तुझ्या प्रकृतीला चंपा कशी मानवणार?’’ त्यावर सुलभाताई उत्तरल्या, ‘‘माझी प्रकृती अभिनेत्रीची आहे, सुलभा देशपांडेची नाही. ‘चंपा’ समजून घेता आली तर करेन..’’ सुलभाताईंच्या ‘चंपा’च्या पहिल्या एन्ट्रीलाच कडाडून टाळ्या पडल्या.
नाटय़निर्माता मोहन वाघांनी आपल्या ‘चंद्रलेखा’ या नाटय़संस्थेतर्फे ‘नटसम्राट’ नाटक नव्याने रंगमंचावर आणलं होतं. ‘चंद्रलेखा’च्या ‘नटसम्राट’मध्ये यशवंत दत्त ‘आप्पासाहेब बेलवलकर’ होते, तर सुलभाताई होत्या ‘कावेरी’. शांता जोग या नामांकित अभिनेत्रीची ‘कावेरी’ या भूमिकेवर जबरदस्त छाप होती. त्यामुळे सुलभाताईंसमोर एक आव्हानच होतं. पण सुलभाताई व्यावसायिक नाटकाच्या प्रेक्षकाला घाबरणाऱ्या नव्हत्या. (ही तर प्रायोगिक रंगभूमीचीच देणगी).
त्या म्हणाल्या, ‘‘नटसम्राट’मधली कावेरी बुद्धिमान आहे. पण स्वत:चं स्वत:जवळ ठेवणारी आहे. आजारी असताना ती नवऱ्याला विचारते, ‘‘ती’ कशी होती?’’ हे काही ती भाबडेपणाने विचारणार नाही. मग हा वेगळेपणा दाखवायचा असेल तर ती भूमिका करून बघायला हवी. मला माहीत होतं, शांताबाईंबरोबर लोक माझी तुलना करतील. टीकाटिप्पणी होईल; पण ‘अगदीच फालतू काहीतरी केलं’, असं तरी कुणी म्हणणार नाही! वेगळेपणा ज्यांना समजेल, त्यांना समजेल. नाहीतर म्हणतील, ‘‘सुलभाची ‘कावेरी’ अगदीच वाईट नव्हती. शांताबाईंची ‘कावेरी’ ग्रेट होती!’ ’’
यावर ‘नटसम्राट’चे नाटककार शिरवाडकरांचं पत्र आलं. त्यांनी म्हटलं होतं की, ‘‘तुम्ही सांगू पाहात आहात ते मला जाणवलं व ते छान होतं.’’
‘चंद्रलेखा’चं ‘नटसम्राट’ २७ मे १९८२ रोजी रंगमंचावर आलं. त्यात सुलभाताईंबरोबर ठमी झाली होती माझी मुलगी नमिता. त्यावेळी ती आठ वर्षांची होती. दौऱ्यात तिचं लालनपालन केलं सुलभाताईंनीच. त्या तिच्या आईच झाल्या होत्या. दौऱ्यावरून घरी परतल्यावर नमिताच्या तोंडून सुलभाताईंची माया आम्हाला ऐकावी लागत असे. याच वात्सल्यातून आविष्कारची ‘चंद्रशाला’ ही बालरंगभूमीची शाखा निर्माण झाली. बालरंगभूमीबाबत त्यांच्याकडे वेगवेगळ्या योजना होत्या. त्यासाठी त्यांनी तयार केलेल्या कमिटीत बालरंगभूमीवरचा जुना कार्यकर्ता म्हणून मलाही खेचलं होतं. मुलांच्या आणि शिक्षकांच्या कलाजाणिवा संपन्न व्हाव्यात म्हणून खेडय़ापाडय़ातील शाळांतून ‘दुर्गा झाली गौरी’ या नृत्यनाटकाच्या ध्वनीचित्रफिती स्वखर्चाने वाटणार होत्या त्या. शाळाशाळांतून ‘बाहुलीनाटय़ा’चे प्रयोग त्यांना करायचे होते. पण..
त्यांना कॅन्सर झाला. कसला होता तो? कुठल्या वेदना त्यांना जाळीत होत्या?
– सतत काम करूनही प्रायोगिक रंगभूमीला हक्काचं छोटं घर मिळत नाही.
– नाटय़ परिषदेला त्याचे सोयर नाही. सरकारला त्याचे सुतक नाही.
– मुंबईत आशयघन, खऱ्याखुऱ्या प्रायोगिक नाटकांचा तुटवडा.
– सगळे पैशामागे.
– नाटकासाठी नाटक करणारे कुणी उरलेच नाही.
– उथळ बालनाटय़े उदंड आणि सशक्त बालनाटय़े दुर्मीळ!
अशाच प्रकारच्या वेदना असतील का त्या? त्यांना त्या अस झाल्या असतील! आणि ज्योत निघून गेली अचानक.. कुणालाही काही न सांगतासवरता.
(‘शांतता कोर्ट चालू आहे’ या नाटकाची अखेर )-
रंगमंचावर निपचित बेणारे.. दाराशी हे पाहात सामंत. तो अवघडलेल्या अवस्थेतच मर्यादेने एका बाजूने आत येऊन त्याने आधी ठेवून दिलेला कापडाचा हिरवाजर्द पोपट व्यासपीठावरील सामानातून हळूच उचलतो. परत जाऊ लागतो, दाराच्या दिशेने.. न राहवून निपचित बेणारेपासून काही अंतरावर अडतो. तिच्याकडे पाहताना त्याला भरून येते. काय करावे त्याला सुचत नाही. तो अस्पष्ट हाक मारतो, ‘‘बाई.’’ पण ती तिला ऐकू जात नाही. तो आणखीच अवघडतो. आणि दुसरे काही न सुचून जवळचा हिरवाजर्द कापडी पोपट एका अंतरावरून अदबीने, वात्सल्याने तिच्यापुढे हळुवारपणे ठेवतो. निघून जातो. बेणारे नि:शक्तपणे किंचित चाळवते. पुन्हा नि:श्र्च्ोष्ट. जवळ तो हिरवाजर्द कापडी पोपट..
रंगमचावरील ही घटना आता वर्तमानात उतरली आहे. सुलभाताईंच्या निकटवर्तीयांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. माझ्या कानामनात बेणारेबाईंचे सूर घुमताहेत..
चिमणीला मग पोपट बोले,
का गं तुझे डोळे ओले
काय सांगू बाबा तुला?
माझा घरटा कुणी नेला?
माझा घरटा कुणी नेला?
कमलाकर नाडकर्णी – Kamalakarn74@gmail.com
संदर्भ :
तें. आणि आम्ही (आविष्कार प्रकाशन)
रंगमुद्रा- माधव वझे (राजहंस प्रकाशन )
शांतता कोर्ट चालू आहे- विजय तेंडुलकर (मौज प्रकाशन १९६८ )

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा