चित्रकार एस. एम. पंडित यांच्या जन्मशताब्दी वर्षांचे औचित्य साधून गुलबर्गा येथील एस. एम. पंडित ट्रस्टतर्फे त्यांच्या संग्रहित चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर कलादालनात ७ ते १३ जून या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ७ वा. पर्यंत भरविण्यात येत आहे. त्यात त्यांची रेखाटने, पेंटिंग्ज, छापिल चित्रे मिळून १५० हून अधिक चित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत.
‘मी चित्रकार व्हायचे पहिल्यापासून ठरवले होते. आणि मी चित्रकार झालो तो या हेतूने, की समाजाला आपल्या कलेतून काही मार्गदर्शन व्हावे. आपल्याला भारतीय चित्रकलेचा मोठा वारसा लाभला आहे. तो वारसा आपण पुढच्या पिढीसाठी ठेवला पाहिजे. मला तरी वाटते की, पुढच्या पिढीला मार्गदर्शन व्हावे म्हणूनच ही चित्रे माझ्याकडून करवून घेतली गेली, अशी माझी श्रद्धा आहे..’ हे विचार आहेत विख्यात चित्रकार कै. एस. एम. पंडित यांचे!
चित्रकार राजा रविवर्मा हा त्यांचा आदर्श होता. तरीही त्यांची हुबेहूब नक्कल न करता पंडितांनी आपल्या स्वत:च्या शैलीत त्यांच्या कलेचे पुनरुज्जीवन केले. तिचे आधुनिकीकरण केले. तिला काव्यात्म पातळीवर नेऊन ठेवले. एका शब्दात सांगायचे तर त्यांनी चित्रकलेला ‘पंडित टच्’ दिला आणि बघणाऱ्याला आनंद मिळावा हा आपला हेतू साध्य केला.
त्यांची चित्र काढण्याची पद्धत म्हणजे विषयाचा विचार, त्यावर वाचन, त्याविषयक वर्णनाची चर्चा करणे. आपल्या चित्रातील परिसर कसा पाहिजे यावर पंडितजी चिंतन करीत आणि मग त्यांना साक्षात् ते दृश्यस्वरूपात दिसू लागे. अशा प्रकारे उत्स्फूर्तपणे केलेल्या चित्रात ते बदल करीत नसत. एखादे चित्र हुबेहूब काढणे म्हणजे फोटो काढणे नव्हे. पंडितजींनी फोटोवरून कधीच चित्र केले नाही. ‘मी निसर्गाची नुसतीच नक्कल केली नाही. मी इथे बसून अचूक कल्पना करू शकतो की हिमालय पर्वत कसा असेल! माझं चित्र दुसऱ्याच्या हृदयाला जोपर्यंत भिडत नाही तोपर्यंत मला समाधान मिळत नाही,’ असे ते म्हणत.
साबानंद मोनप्पा पंडित अर्थात एस. एम. पंडित यांचा जन्म २५ मार्च १९१६ रोजी कर्नाटकातील गुलबर्गा येथे झाला. त्यांचे वडील धातुकलेमध्ये अत्यंत प्रवीण असल्यामुळे छोटय़ा साबानंदवर लहानपणीच चित्रकलेचे संस्कार झाले. मद्रास स्कूल ऑफ आर्टमधून वयाच्या तेराव्या वर्षी कलाशिक्षक पदविका उत्तीर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी मुंबईला जाण्यासाठी त्यांच्या आत्याने आपल्या सोन्याच्या बांगडय़ा पन्नास रुपयांना विकून त्यांच्या प्रवासखर्चाची सोय केली. परंतु जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश न मिळाल्याने पंडितांनी नूतन कलामंदिर येथे प्रवेश घेतला. या संस्थेत ते रेखाटन आणि रंगकला शिकले. दिवसभर नोकरी करून ते संध्याकाळी चित्रकला वर्गात जात. त्याकाळी चित्रकला परीक्षा बाहेरून देण्याची व्यवस्था असल्यामुळे जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये तृतीय वर्षांसाठी त्यांनी प्रवेश मिळवला १९३६ मध्ये ते जे. जे. मधून पहिल्या वर्गात प्रथम क्रमांकाने परीक्षा उत्तीर्ण झाले. १९३६ ते १९३८ या काळात म्युरल पेंटिंगसाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. याच काळात त्यांनी महालक्ष्मी स्टेशनचे केलेले पेंटिंग खूप गाजले. १९३७ मध्ये त्यांना मेट्रो सिनेमागृहात पोस्टर रंगविण्याचे काम मिळाले. पंडितांनी प्रथमच तैलरंगाऐवजी पोस्टर कलर वापरून प्रसिद्ध नटय़ांची चित्रे रंगविली. रेल्वे तसेच खटाव व कोहिनूर मिल या कापड गिरण्यांची उत्कृष्ट पोस्टर्स रंगविली. हॉलीवूडसाठी होर्डिग्ज तयार करणारे आणि पोस्टर कलाप्रकाराला उत्तम कलेचा दर्जा देणारे पंडित हे पहिले भारतीय चित्रकार होत. त्याकाळी रंगीत छायाचित्रणकलेचा वापर मुखपृष्ठासाठी जवळजवळ होतच नव्हता. पंडितांनी पोस्टर रंगात सुरैया, मधुबाला आदी अभिनेत्रींची सुंदर व्यक्तिचित्रे सिनेमासिकांसाठी रंगविली. मुंबईत १९३८ मध्ये पंडितांची चित्रकार म्हणून कारकीर्दीला सुरुवात झाली.
अगदी सामान्य माणसापर्यंत आपली कला पोहोचली पाहिजे हे पंडित यांचे स्वप्न साकार झाले ते कॅलेंडर-पर्वामुळे! बाबुराव धनवटे आणि बॉम्बे फाइन आर्टचे रामभाऊ धोटे या दोन मित्रांमुळे पंडित कॅलेंडर जगतातील सम्राट बनले. पंडितजींची चित्रे घरोघरी पोहोचली. त्यांचे पहिले कॅलेंडर बॉम्बे फाइन आर्टमध्ये छापले गेले. सकाळी शकुंतला पत्रलेखन हा चित्राचा विषय त्यांनी ठरविला आणि त्याच रात्री जागून हे चित्र केवळ कल्पनाशक्तीने- कोणतेही मॉडेल न घेता त्यांनी रंगविले होते. त्यांनी व्यक्तिचित्रे वगळता अन्य चित्रांत कधीच मॉडेलचा वापर केला नाही. पूर्ण समाधान होईपर्यंत ते काम करीत. त्यामुळे सलग सोळा सोळा तास ते पेंटिंग करत.
पुढे पंडितजींना लोकांच्या बाजारू वृत्तीचा उबग येऊ लागला. त्यांच्या चित्रांची भ्रष्ट नक्कल होऊ लागली. ते म्हणत, ‘माझ्या रामाचा कृष्ण होई, तर कृष्णाचा राम.’ कधी कधी पंडितजींचे चित्र छापण्यापूर्वीच त्याची दुसऱ्याने केलेली नक्कल प्रसिद्ध होई. अशा अनुभवांमुळे त्यांचे मन विषण्ण होऊ लागले. कॅलेंडर फक्त एक वर्ष घरात टिकते व नंतर ते फेकून दिले जाते. आपली कला याहून अधिक टिकली पाहिजे असे वाटू लागल्याने त्यांनी कॅलेंडरची कामे कमी कमी करत नंतर ती बंदच केली. तरीसुद्धा त्यांची कॅलेंडरवरची चित्रे जपून ठेवणारी अनेक माणसे त्यांना नंतर भेटली. आधुनिक चित्रकलेच्या लाटेमध्येसुद्धा पंडितजींच्या वास्तववादी चित्रकलेला जराही धक्का पोहोचला नाही. निव्वळ कॅलेंडर आर्टिस्ट असा त्यांचा उल्लेख करणाऱ्या टीकाकार मंडळींची मात्र कींव करावीशी वाटते. वास्तविक कॅलेंडर आर्टला खरा दर्जा आणि सन्मान पंडितजींनीच मिळवून दिला.
१९४४ साली पंडितांनी स्वत:च्या घरी आर्ट स्टुडिओ उभा केला आणि ते स्वतंत्रपणे काम करू लागले. १९५६ सालापासून त्यांचा कल धार्मिकतेकडे झुकू लागला. त्याचवेळी त्यांनी गुलबग्र्याला जाऊन कालीमातेच्या मंदिराची स्थापना (पान १ वरून) केली आणि तिथे स्वत:चे घर बांधून घरातच कलादालन सुरू केले. त्यांचे कॅलेंडर पर्व जोरात सुरू असताना ते गुलबग्र्यास होते तरीही मुंबई, नागपूर, दिल्ली, कलकत्ता इथून त्यांच्याकडे कामे येत असत. यात विषयनिवडीचे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य असे. ‘माझ्या बोटांत आलेली एक शक्ती माझ्याकडून चित्र करवून घेते. आजपर्यंत माझ्या गुरूंनी जे सांगितले आणि माझ्या अंतरात्म्याला जे पटले, तेच मी करत आलोय,’ असे ते म्हणत.
पंडितजींना कलेतील अनेक मानसन्मान मिळाले. त्यांत १९७८ मध्ये लंडनच्या ‘रॉयल सोसायटी ऑफ आर्ट’च्या फेलोशिपचाही समावेश आहे. १९८४ साली ललित कला अकादमी, तर १९८६ साली कर्नाटक राज्याकडून त्यांना बहुमान मिळाला. त्याच वर्षी गुलबर्गा विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट बहाल केली. १९७८ ला त्यांचे कलाप्रदर्शन लंडन येथे भरविण्यात आले. त्यामागील हेतू हा, की तिथल्या सामान्य माणसांना तसेच चित्रकारांना वास्तववादी पद्धतीने रंगविलेल्या चित्रांबद्दल काय वाटते ते आजमावून पाहावे. भारतात वास्तववादी चित्रकलेला महत्त्व दिले जात नाही, असे पंडित यांचे मत होते. नानासाहेब गोरे यांच्या निमंत्रणावरून इंडिया हाऊसमध्ये त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवले गेले तेव्हा लंडनच्या वृत्तपत्रांनी मुक्तकंठाने त्यांची प्रशंसा केली. गेल्या २०-२५वर्षांत आम्ही अशी चित्रे पाहिली नव्हती. हल्ली या पद्धतीने कोणी चित्रे रंगवीत नाहीत, असे त्यांनी म्हटले होते.
व्यक्तिचित्रण हा त्यांचा हातखंडा होता. मार्गारेट थॅचर, इंदिरा गांधी, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, नानासाहेब गोरे, दीनानाथ मंगेशकर, स्वामी विवेकानंद ही त्यातील काही. कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकासाठी पेंटिंग करताना निवांत शांतता हवी म्हणून बांद्रा येथे समुद्रकिनारी त्यांनी स्टुडिओ घेतला. विवेकानंदांच्या गुरूंचा आशीर्वाद मिळावा म्हणून रामकृष्ण परमहंस आणि शारदामाता यांची व्यक्तिचित्रे त्यांनी केली. ज्या खडकावर विवेकानंद ध्यान करीत त्या खडकावर उभी असलेली विवेकानंदांची प्रतिमा एका रात्री पंडितांच्या डोळ्यांसमोर प्रकट झाली. त्याबरोबर जलदगतीने त्यांची कच्ची रेखाटने करून साडेआठ फूट बाय सहा फूट एवढय़ा आकाराचे त्यांचे चित्र त्यांनी तयार केले. हे पेन्टिंग त्यांनी स्वत:च्या समाधानासाठी केले. प्रत्यक्षात लहान आकाराच्या चित्राची मागणी होती. याच चित्रावरून पुढे शिल्पकार सोनावडेकर यांनी विवेकानंदांचा पुतळा बनवला.
त्यांनी केलेल्या श्रीमती धोटे यांच्या व्यक्तिचित्रात त्यांची कांती, वस्त्र, अलंकार यांच्या पोतातील भिन्नता तर जाणवतेच; पण या माऊलीच्या डोळ्यांतील वात्सल्य आणि स्मितहास्य मन मोहून घेते. विश्वामित्र आणि मेनकेच्या चित्रातील विश्वामित्र संतप्त, विरक्त, तपश्चर्येकडे जाणारा न वाटता प्रणयातुर पुरुष वाटतो. योगसाधनेच्या मृगाजिनावर मेनकेच्या सुंदर शरीरावरील झिरझिरीत रंगीत वस्त्रे ओघळून पडली आहेत. आणि या नाजूक क्षणाची साक्षीदार आहे पाषाणाची ओबडधोबड भिंत. ही चित्रे पाहिल्यावर पंडितांच्या वास्तववादी चित्राकृती अत्युच्च्य शिखरावर विराजमान झालेल्या आहेत याची खात्री पटेल. स्प्रे गनचा वापर न करता ड्राय ब्रशने केलेले नितळ रंगकाम तसेच स्त्री आणि पुरुष यांच्या कांतीतील फरक दाखवणे त्यांना उत्कृष्टपणे साध्य झाल्याचे प्रत्ययाला येते. तैलरंगात पारदर्शकता दाखविणारे ते पहिलेच चित्रकार होत. उपयोजित कला व ललित कला यांच्या सर्व मर्यादा त्यांनी ओलांडल्या होत्या. एस. एम. पंडितांचे चित्रकलेतील पांडित्य विस्मयकारक आहे.
प्रतिभा वाघ