कवयित्री संगीता अरबुने यांचे आजवर तीन कवितासंग्रह प्रकाशित झाले असून ‘चौकट’ या कथासंग्रहाद्वारे त्यांनी साहित्यातील अजून एक टप्पा पार केला आहे. ‘चौकट’ कथासंग्रहाला पदार्पणातच अमरावतीचा ‘सूर्यकांतादेवी पोटे पुरस्कार’ही मिळाला आहे. ही त्यांच्या कथालेखनाला मिळालेली दाद आहे. नऊ कथा असलेल्या या कथासंग्रहाचा स्थायीभाव हा ‘प्रेम’ आहे. या कथांमधील संयतपणा, पात्रांचे संवाद, त्यांचे मनोकायिक विश्लेषण, त्यांतील अनपेक्षित घटना, त्या घटनांना मिळालेले सहजसुंदर वळण माणसाच्या चांगुलपणावर श्रद्धा ठेवण्यास भाग पाडते.
खरे तर कला ही मानवाच्या जीवनाचा मूलाधार आहे. कलासक्त मन हे कलेचं पोषण करत असतं. योग्य वेळ येताच कला बहरून येते. मग तुम्ही शिल्पकार असाल तर ती कला सुंदर मूर्तीत परावर्तित होते. अथवा तुम्ही लेखक असाल तर तुमची अभिव्यक्ती कविता, कथा किंवा कादंबरीचे रूप घेऊन अवतरते. कथा हे असेच कलेचा स्रोत प्रवाहित करणारे, तसेच भावभावनांच्या प्रकटीकरणाचे उत्तम माध्यम आहे. संगीता अरबुने यांनी आपल्या ‘चौकट’ या कथासंग्रहाद्वारे स्त्री-पुरुष नातेसंबंधांकडे पाहण्याची नवीन परिभाषा लाभलेली चौकट दिली असून, या कथांमध्ये त्यांनी प्रेम या उदात्त भावनेच्या विविध छटांचे वेगळेपण टिपले आहे. कारण प्रेम ही जरी एक सहजसुंदर भावना असली, तरी माणूस मात्र त्या भावनेचे बाजारीकरण करतो, कधी कधी तिला वासनेचे रूप देतो. तथापि माणसातील माणूसपणाला हळुवार भावनांची, संवेदनशीलतेची खोली लाभली असेल तर त्या प्रेमाला खऱ्या अर्थाने निखळ उदात्ततेची चौकट लाभते. ही उदात्तता, त्यातला निखळ भाव तसेच त्यातली मानसिक आंदोलनं जाणून घ्यायला जी नजर लागते ती लेखिका संगीता अरबुने यांना निश्चितपणे लाभलेली आहे. ‘चौकट’ कथासंग्रहाच्या मनोगतात त्या म्हणतात, ‘परिस्थितीकडे आणि स्त्री-पुरुषांच्या मनोकायिक जाणिवांकडे, त्यांच्या नैसर्गिक ऊर्मीकडे एक स्त्री म्हणून पाहता पाहता त्रयस्थाच्या नजरेतून, तर कधी सामाजिक परिप्रेक्ष्यातून पाहायची सवय लागली. त्यातून अनेक प्रश्न मनात दाटी करू लागले. उत्तरे शोधताना भोवंडून जायची वेळ आली. काहींची उत्तरे मिळाली, काही प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहिले.’
आज पुरुषांकडून स्त्रीवर अन्याय-अत्याचार होताना दिसत असताना आणि पुरुषजीवनाची काळी बाजूच सातत्याने सामोरी येत असताना या लेखिकेने आपल्या संवेदनशीलतेने आणि सृजनशीलतेने कथेमध्ये केवळ स्त्रीच्याच नव्हे, तर पुरुषांच्याही जीवनातील चांगली बाजू सहृदयतेने उलगडून दाखविली आहे. हे संगीता अरबुने या लेखिकेचे यश आहे. त्यांचा हा कथासंग्रह डिंपल पब्लिकेशनने प्रसिद्ध केला आहे. सरदार जाधव यांनी काढलेले पुस्तकाचे मुखपृष्ठ प्रथमदर्शनीच ते हाती घेण्यास प्रवृत्त करणारे आहे. ‘चौकट’ला डॉ. रवींद्र शोभणे यांची प्रस्तावना लाभली असून त्यात त्यांनी लिहिले आहे की, ‘कथानकांची जाणीवपूर्वक निवड करून ते व्यक्तिचित्रणाच्या माध्यमातून पुरेशा भानाने व्यक्त करण्याचा संगीता अरबुने यांचा या कथांमधून दिसणारा प्रयत्न त्यांच्या गद्यलेखनाच्या संदर्भातील वाचकांच्या, जाणकारांच्या आशा पल्लवित करणारा असा आहे.’ उत्कंटावर्धक कथानके, सहजसुंदर भाषाशैली आणि भावगर्भ संवाद यामुळे वाचक या कथांमध्ये नकळतपणे गुंतत जातो आणि या कथांचा तो स्वत:च एक हिस्सा बनून जातो. संगीता अरबुने यापुढील काळात अशाच प्रकारे मानवी जीवनातील विविध कंगोऱ्यांचा अभ्यासपूर्ण लेखाजोखा घेऊन वाचकांच्या भेटीस येत राहतील अशी अपेक्षा आहे.
‘चौकट’- संगीता अरबुने,
डिंपल पब्लिकेशन,
पृष्ठे- १८४ , मूल्य- २०० रु पये.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा