२३ एप्रिल या दिवशी श्रेष्ठता व लोकप्रियता यांचा अद्भुत संगम असलेला नाटककार शेक्सपिअरची चारशेवी पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने जागतिक सिनेमाचे अभ्यासक विजय पाडळकर लिखित ‘शेक्सपिअर आणि सिनेमा’ या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. मौज प्रकाशनाने हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकाच्या प्रास्ताविकातील काही भाग..
शेक्सपिअरला इंग्रजी भाषेतील सर्वश्रेष्ठ लेखक आणि जगातील असामान्य नाटककारांपकी एक मानले जाते. सर्वसामान्यपणे प्रत्येक सुशिक्षित वाचकाला त्याचे किमान नाव तरी ठाऊक असते व तो मोठा नाटककार आहे हेही. जगातील महत्त्वाच्या बहुतेक भाषांत त्याची नाटके अनुवादित झालेली आहेत, रूपांतरित झाली आहेत आणि त्यांचे प्रयोगही विविध देशांतील रंगभूमीवर, वेगवेगळ्या शैलींत सतत होत राहतात. श्रेष्ठता व लोकप्रियता यांचा अद्भुत संगम झालेला हा नाटककार आहे. शेक्सपिअरच्या नाटकांचा प्रभाव वाचकांवर किंवा प्रेक्षकांवरच पडला आहे असे नाही, तर असंख्य कलावंत (कलेच्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील), लेखक आणि तत्त्वचिंतकांवरही त्याचा तेवढाच प्रभाव आहे. गेल्या चारशे वर्षांपासून त्याच्या नाटकांचा अर्थ लावण्याची समीक्षकांची, अभ्यासकांची धडपड चालूच आहे आणि अजूनही शेक्सपिअर पूर्णपणे कळला आहे असे कुणी म्हणू शकत नाही. त्याच्या नाटकातील अनेक वाक्ये इंग्रजी भाषेत सुभाषितांप्रमाणे रुळली आहेत. प्रतिवर्षी त्याच्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या अंगाने अभ्यास करणारी पुस्तके निघतच असतात. अनेक आधुनिक नाटककारांनी त्याचे ऋण मान्य केलेले आहे. तसेच अनेक चित्रपट दिग्दर्शकांवरही त्याचा प्रभाव पडलेला आहेच. चित्रपटाच्या क्षेत्रात शेक्सपिअरचे एक खास स्थान आहे. त्याच्या नावावर आजवर जगातील वेगवेगळ्या भाषांत सुमारे चारशे दहा चित्रपट निर्माण झाले आहेत. इतर कोणत्याही लेखकांपेक्षा त्याच्या साहित्यकृतींच्या चित्रपटीकरणाची संख्या जास्त आहे.
शेक्सपिअरचा जन्म २३ एप्रिल १५६४ रोजी झाला. त्याच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध नाही. पण सर्वसाधारणपणे १५८५ पासून त्याची नाटय़कारकीर्द सुरू झाली असे म्हणता येते. त्याने पहिले नाटक केव्हा लिहिले याबद्दल अभ्यासकांत एकमत नाही. काही काळ नाटकात नट, लेखक अशी उमेदवारी केल्यावर १५९४ साली शेक्सपिअरने आपल्या काही मित्रांसमवेत Lord Chamberlain’s Men या नावाची एक नाटय़संस्था निर्माण केली. या संस्थोतर्फेच त्याची नाटके प्रथम रंगमंचावर आली. लवकरच तो अतिशय लोकप्रिय नाटककार म्हणून ओळखला जाऊ लागला. या काळात तो अधूनमधून नाटकात भूमिकाही करीत असे. नाटकाने त्याला केवळ कीर्ती व लोकप्रियताच मिळवून दिली असे नव्हे, तर भरपूर पसाही मिळवून दिला. इ.स. १६०५ पर्यंत तो स्टॅटफोर्डमधील अत्यंत श्रीमंत व्यक्तींपकी एक म्हणून ओळखला जाऊ लागला होता. त्याने एकंदरीत अडतीस नाटके लिहिली. याशिवाय सुनीते, दोन दीर्घ कविता आणि काही स्फुट कविता अशी त्याची साहित्यसंपदा आहे. २३ एप्रिल १६१६ रोजी शेक्सपिअरचे निधन झाले. योगायोगाची गोष्ट म्हणजे जगातील सर्वश्रेष्ठ कादंबरीकारांपकी एक- डॉन किहोते व सॅको पांझा या प्रसिद्ध जोडगोळीचा कर्ता म्युगुएल डी. सर्वातिस याचे निधनदेखील याच दिवशी झाले. शेक्सपिअरच्या नाटकांची सर्वसाधारणपणे तीन विभागांत विभागणी केली जाते. त्याच्या ३८ नाटकांपकी १० ऐतिहासिक नाटके आहेत, १६ सुखात्मिका आहेत तर १२ शोकात्म नाटके आहेत. त्याची अगदी प्रारंभीची नाटके म्हणून ‘रिचर्ड तिसरा’ व ‘हेन्री सहावा’ ही ऐतिहासिक नाटके ओळखली जातात. त्याच्या अनेक नाटकांच्या नेमक्या लेखनवर्षांबद्दल मतभेद असले तरी सर्वसाधारणपणे ‘टायटस अॅड्रोनिकस’, ‘कॉमेडी ऑफ एर्स’ व ‘तेिमग ऑफ द श्रू’ ही नाटके त्याच्या उमेदवारीच्या काळातील मानली जातात. या सुरुवातीच्या नाटकावर थॉमस किड आणि ख्रिस्तोफर मार्लो या त्या काळी अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या नाटककारांचा प्रभाव दिसून येतो आणि ते स्वाभाविकच होते. मात्र लवकरच शेक्सपिअर या प्रभावातून मुक्त झाला. या काळातच त्याने लिहिलेल्या ‘रोमिओ अँड ज्युलिएट’ या शोकांतिकेपासूनच त्याला नवीन वाट सापडली असे म्हणता येते. कोवळ्या प्रेमाचे हृदयाला हात घालणारे, अत्यंत प्रभावी व उत्कट दर्शन, काव्यसौंदर्य आणि चटका लावणारा दैवदुर्विलास वर्णन करणारी कथा यामुळे हे नाटक अत्यंत लोकप्रिय ठरले. या नाटकाचा प्रभाव एवढा होता, की काही काळानंतर लोक रोमिओ व ज्युलिएट या खऱ्या व्यक्ती आहेत असेच समजू लागले. १५९९च्या सुमारास शेक्सपिअरने लिहिलेली आणखी एक श्रेष्ठ शोकांतिका ‘ज्युलियस सीझर’ ही आहे. नायकाच्या मनातील आंतरिक संघार्षांतच शोकात्मिकेचे बीजारोपण होते हे तत्त्व शेक्सपिअरने याच नाटकात प्रथम मांडले व नंतर त्याचा विस्तार अनेक नाटकांतून केला. ब्रूट्सच्या मनात मित्रप्रेम मोठे की स्वातंत्र्यप्रेम हा संघर्ष निकराला आला होता. यातूनच नाटकामधील पुढील शोकांतिका घडली. सतराव्या शतकातील शेक्सपिअरने लिहिलेल्या नाटकांपकी प्रारंभीच्या तीन सुखात्मिका सोडल्यास बहुतेक सर्व नाटके शोकात्मिकाच आहेत असे आढळते. नाटककाराच्या शोकात्म प्रतिभेचे परिपक्व स्वरूप आपल्याला या नाटकांत पाहावयास मिळते. ‘हॅम्लेट’, ‘अॅथेल्लो’, ‘किंग लिअर’, ‘मॅकबेथ’ आणि ‘अॅन्टनी अँड क्लिओपात्रा’ या नाटकांतून त्याच्या प्रतिभेचे अत्युच्च दर्शन घडते. १६०१ ते १६०८ या दरम्यान लिहिलेल्या या शोकात्मिका एकाहून एक अधिक भीषण व यातनांचे वर्णन करणाऱ्या आहेत. विश्वासघात, कपटकारस्थाने, सूड, मत्सर, व्यभिचार, राक्षसी महत्त्वाकांक्षा यांचे विकराल दर्शन त्याने या नाटकांतून घडविले आहे. पण त्याबरोबर श्रेष्ठ मानवी मूल्ये, नियती, ईश्वरी न्याय व मृत्युचिंतन यांचाही नाटककाराने येथे सूक्ष्म विचार केला आहे असे जाणवते. व्यक्ती आणि तिचे प्रमाण यांच्या पलीकडे जाऊन काही चिरंतन वैश्विक मूल्ये मांडण्याचा त्याने प्रयत्न केला. एका समीक्षकाने म्हटले आहे की या काळात शेक्सपिअरला शोकात्म ज्वर (ळ१ंॠ्रू ऋी५ी१) झाला होता. सुरुवातीच्या नाटकात योगायोग, अद्भुतरम्य व कल्पनाप्रचुर घटना, शाब्दिक कोटय़ा व करामती यांच्यावर असलेला नाटककाराचा भर हळूहळू कमी झाला. त्याची प्रतिभा जसजशी परिपक्व होत गेली तसतसे मानवी जीवनाचे त्याने घडविलेले चित्रणही अधिकाधिक सखोल व परिपक्व होत गेले. मानवी स्वभावांतर्गत गुणदोषांवर त्याने आपले लक्ष केंद्रित केले.
शेक्सपिअरने लिहिलेल्या शोकात्मिका या ग्रीक शोकात्म नाटकांपेक्षा अतिशय वेगळ्या प्रकारच्या होत्या. ग्रीक नाटकांत देवदेवता, नियती, शाप व वरदान यांना अतिशय महत्त्व होते. प्रबोधन काळामध्ये या देवदेवतांचे महत्त्व कमी झाले. माणसाची विचारसरणी ‘मानवकेंद्रित’ होण्यालाही याच काळात सुरुवात झाली. यातून मग नियती, पूर्वसंचित, देवताकोप वा वरदान यापेक्षा माणसाचा स्वभाव व त्या अनुषंगाने तो जी कृत्ये करतो यातूनच त्याच्या जीवनाचा ‘शेवट’ ठरतो ही विचारसरणी हळूहळू प्रबळ होऊ लागली. माणसाला निवड करण्याचे मर्यादित का होईना स्वातंत्र्य आहे, त्यानुसार तो निवड करतो व या कृतीतून जर आपत्ती येणार असतील तर त्यांना तो धर्याने तोंड देतो. प्रसंगी मृत्यूला सामोरा जातो, यातना भोगतो. या यातनाभोगामुळे त्याच्या मृत्यूलाही भव्योद्दात्तता मिळते. नियतीऐवजी मानवाच्या स्वभावदोषातून ही शोकांतिका घडते हे शेक्सपिअरने त्याच्या शोकात्मिकांतून प्रभावीपणे दाखविले. नायकाच्या मनात जो नतिक संघर्ष उभा राहतो त्यामुळे त्याचे मनच रणांगण बनते. याच आंतरिक संघर्षांला शेक्सपिअरचे श्रेष्ठ समीक्षक बड्रले यांनी ‘स्पिरिच्युअल कॉन्फ्लिक्ट’ असे नाव दिलेले आहे. शेक्सपिअरच्या या शोकात्मिकांचे नायक सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा अगदी वेगळ्या पातळीवरचे असतात. ते सर्वगुणसंपन्न असतात असे नव्हे, ते आदर्श व दोषविरहित असतात असेही नव्हे. पण ते अति संवेदनशील, भावनाप्रधान, उत्कट व कधी कधी विकाराच्या आहारी गेलेले असतात. हॅम्लेट, मॅकबेथ, लिअर, ऑथेल्लो यांचे स्वभाव वेगळे असले तरी त्यांच्यात ‘झपाटलेपण’ हा समान गुण आहे. या झपाटलेपणामुळे बहुतेक वेळा ते सारासार विचार करू शकत नाहीत व त्यामुळे त्यांच्या हातून प्रमाद होतात आणि त्यांची झपाटय़ाने विनाशाकडे वाटचाल सुरू होते. मात्र त्या नायकांच्या अंगी असलेल्या गुणांमुळे त्यांच्याबद्दल त्यांची कृती ध्यानात घेऊनही करुणाच वाटते. शेक्सपिअरच्या या शोकात्म नाटकांपकी ‘मॅकबेथ’ आणि ‘किंग लिअर’ या दोन नाटकांचा व त्यातील शोकात्मभावाचा आपण पुढे तपशीलवार विचार करणार आहोतच.
शेक्सपिअरच्या नाटकातील प्रभावी व समर्थ अशा कथावस्तू, गुणावगुणांनी नटलेली ठसठशीत तरीही गुंतागुंतीची मनोरचना असणारी पात्रे व त्यांचे अप्रतिम स्वभावरेखाटन याबरोबरच मानवी जीवनाविषयीचे सखोल तत्त्वचिंतन आणि विलक्षण काव्यात्म भाषा यांच्यामुळे त्याच्या नाटय़कृती या अभिजात बनल्या आहेत. ‘हॅम्लेट’, ‘किंग लिअर’ व ‘मॅकबेथ’ यांतून शेक्सपिअरने चिंतनाचा जो अभूतपूर्व पट रेखाटला आहे तो विलक्षण आहे. मानवी अस्तित्वाच्या सर्वच पलूंना कवेत घेऊ पाहणारे व त्यापलीकडे जाऊन विश्वाच्या मूलभूत रचनेचा गाभा शोधू पाहणारे असे हे महाकवीचे चिंतन आहे. शेक्सपिअरच्या नाटकातील काव्यात्म भाषेबद्दल थोडक्यात काही मांडणे अन्यायकारक ठरेल. त्याची भाषा ही महाकवीची भाषा आहे. चारशे वर्षांपासून असंख्य आस्वादक, अभ्यासक त्या भाषेचे विश्लेषण करीत आहेत. तिच्यातील काव्यगुणांवर असंख्य ग्रंथ लिहिले गेले आहेत. एक मुद्दा या ठिकाणी मांडणे आवश्यक आहे, तो म्हणजे शेक्सपिअरच्या नाटकांची जी काही चित्रपटीकरणे झाली त्यापकी बहुतेक साऱ्यात, त्याचे काव्य हा दिग्दर्शकांना मोठाच अडथळा वाटत गेले आहे.
शब्दांच्या नजाकतीवर, त्यांच्या सामर्थ्यांवर लक्ष द्यावे तर प्रसंगाचे दृश्यरूप उणावते आणि जर दृश्यरूपावर भर द्यावा तर शब्दातील काव्य झाकोळते असा हा दुहेरीचेच प्रसंग दिग्दर्शकांना पडलेला आहे. या संदर्भात गटेने शेक्सपिअरबद्दल केलेले भाष्य फार बोलके व अर्थपूर्ण आहे. तो म्हणतो – ‘डोळे मिटून एखाद्या जातिवंत आवाजात शेक्सपिअरचे नाटक ऐकणे यासारखा दुसरा आनंद नाही.’ त्याच्या भाषेचा हा गुणधर्म चित्रपट दिग्दर्शकांना अडचणीत टाकणारा आहे हे निश्चित. शेक्सपिअरच्या भाषेतील भरजरीपणा कमी करून तिला सर्वसाधारण भाषेच्या पातळीवर आणण्याचेही अनेकांनी प्रयत्न केले. पण त्यामुळे अंतिम परिणामातील भव्यता उणावलीच.
विजय पाडळकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा