अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून महाराष्ट्रात सामाजिक आणि सेवाकार्यात आपले सर्वस्व पणाला लावणाऱ्या अनेक तळमळीच्या कार्यकर्त्यांनी आणि संस्थांनी आपल्या कार्याने एक आदर्श निर्माण केला आहे. एवढेच नव्हे तर ‘महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचे मोहोळ’ असे वर्णन खुद्द महात्मा गांधींनी करून ठेवलेले आहे. समाजातील रंजल्या-गांजलेल्यांचे दु:ख दूर करण्यासाठी धडपडणारे, त्यासाठी व्यवस्थात्मक, संस्थात्मक कार्य उभारणारे हे कार्यकर्ते म्हणजे संतत्वाचे आधुनिक रूपच होय. अशा सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थांमध्ये ज्यांचे नाव अलीकडच्या काळात अग्रक्रमाने घ्यावे लागेल, ते म्हणजे अहमदनगर येथील डॉ. गिरीश कुलकर्णी व त्यांची ‘स्नेहालय’ ही संस्था, यांचे. गेले सुमारे पाव शतक महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात नि:स्वार्थीपणे सुरू असलेल्या त्यांच्या या सेवाकार्याची ओळख करून देणारे शुभांगी कोपरकरलिखित ‘परिवर्तनाची पहाट : स्नेहालय, अहमदनगर’ हे पुस्तक उन्मेष प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.
मुंबईतील कामाठीपुरा तसेच पुण्यातील बुधवार पेठेप्रमाणेच अहमदनगरमध्येही चित्रा गल्ली, भगत गल्ली, ममता गल्ली हा लालबत्ती विभाग म्हणून ओळखला जातो. येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून मोठय़ा प्रमाणावर वेश्याव्यवसाय चालतो. चेहऱ्याला रंगरंगोटी करून दारादारांत उभ्या असणाऱ्या बायका, मुली, त्यांच्या मालकिणी, त्यांच्यासाठी सावज हेरणारे दलाल, हाणामाऱ्या करणारे गुंड अशी ही वस्ती आणि त्यात बालपण हरवलेली, आपल्या आया-बहिणींना गिऱ्हाईकं आणून देणारी, सिगारेटी-दारूच्या बाटल्या आणून देणारी लहान लहान मुले हे चित्र येथे नेहमीचे होते. वयाच्या विशीत असणाऱ्या एका तरुणाला चित्रा गल्लीत राहणाऱ्या आपल्या एका मित्रामुळे या भयाण समाजवास्तवाची ओळख होते आणि ही परिस्थिती बदलण्याची, येथील शोषित-वंचितांची समाजाशी तुटलेली नाळ पुन्हा जोडण्याची ऊर्मी त्याच्या मनात निर्माण होते आणि त्या ऊर्मीला न रोखता सुमारे २८ वर्षांपूर्वी तो तरुण आपल्या सहकाऱ्यांसह या भागात सेवाकार्याचा अखंड यज्ञ सुरू करतो. हा यज्ञ म्हणजेच ‘स्नेहालय’ ही संस्था. आणि त्यात आपले अथक प्रयत्न, अभ्यास, कष्ट अन् आशावादाच्या समिधा वाहणारा तरुण म्हणजे डॉ. गिरीश कुलकर्णी होय. देहविक्रय करणाऱ्या महिला व मुलींसाठी, अनैतिक मानवी वाहतूक आणि लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिला तसेच बालकांसाठी, एचआयव्हीबाधितांसाठी कार्य करणाऱ्या ‘स्नेहालय’ संस्थेच्या कार्याची महती आता देशविदेशात पोहोचली आहे. परंतु २८ वर्षांपूर्वी नगरच्या चित्रा गल्लीतील वेश्या-व्यवसाय करणाऱ्या महिला व त्यांच्या मुला-मुलींसाठी या कार्याची सुरुवात करताना डॉ. गिरीश कुलकर्णी यांना करावी लागलेली प्रचंड धडपड, वस्तीतल्या कांताबाई या मालकिणीची त्यासाठी घ्यावी लागलेली मदत, तेथील लहान मुलामुलींसाठी सुरू केलेली ‘पावशाळा’, स्वत:च्या घरी या मुलांना ठेवताना घरच्यांनी दिलेली साथ, त्यानंतर गावात उभारलेलं रात्रघर, दिवसाचं सांभाळगृह तसेच निवासी प्रकल्प असा कामाचा व्याप व आवाका वाढवत नेताना डॉ. कुलकर्णी यांच्या या प्रयत्नांना मिळत गेलेले यश पुस्तकाच्या सुरुवातीच्या भागात मुळातून वाचावे असे उतरले आहे. याचबरोबर डॉ. कुलकर्णी यांच्या लहानपणीच्या, शाळेतल्या आठवणी जाग्या करणारे एक प्रकरण त्यांचे व्यक्तिमत्त्व जाणून घेण्यास उपयोगी पडणारे आहे.
यानंतरच्या भागात ‘स्नेहालय’च्या कार्याचा वृक्ष कसा बहरत गेला याचे वर्णन आले आहे. गेल्या सुमारे २५ वर्षांच्या काळात ‘स्नेहालय’ने वंचितांच्या दु:ख- निवारणासाठी सुरू केलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यातून मिळते. स्नेहांकुर, चाइल्डलाईन प्रकल्प आदींची सविस्तर माहिती या पुस्तकात दिलेली आहे. सामाजिक प्रश्नांवर काम करत असताना कल्पक उपक्रम राबवत कामाचा व्याप वाढता ठेवून ते पूर्णत्वाला पोहोचविण्याची डॉ. कुलकर्णी यांच्या कार्याची पद्धत त्यातून आपल्यासमोर येते. परंतु हे करण्यासाठी डॉ. कुलकर्णी यांना कार्यकर्ते व सहकारीही तसेच खमके, कष्टाळू मिळत गेले. यशवंत, कुंदन यांच्यासारख्या त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांचे व त्यांनी केलेल्या कामाचे यात आलेले वर्णनही आपल्याला म्हणूनच प्रभावित करते. यानंतर डॉ. कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी निरनिराळ्या ठिकाणी लहान मुलींची होणारी विक्री रोखण्यासाठी, तत्संबंधित कायद्याच्या योग्य त्या अंमलबजावणीसाठी केलेल्या प्रयत्नांचे अनेक प्रसंग पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात आले आहे. या प्रसंगांमधून समोर येणारे वास्तव आपल्याच समाजातले आहे याची कठोर जाणीव या पुस्तकाने होते. कार्यकर्त्यांच्या जीवनाचे व त्यांच्या संस्थात्मक कार्याचे अनुभव आवर्जून वाचले जाण्याचा काळ सध्या राहिलेला नसला तरी किमान बांधिलकी, संवेदना व सहवेदना या शब्दांचे मूर्त रूप जाणून घेण्याची इच्छा असलेल्यांसाठी ‘परिवर्तनाची पहाट’ नक्कीच वाचनीय आहे.
‘परिवर्तनाची पहाट : स्नेहालय, अहमदनगर’- शुभांगी कोपरकर, उन्मेष प्रकाशन,
पृष्ठे- २३०, किंमत- २५० रुपये.
प्रसाद हावळे