सुजाता देशमुख editormenakaprakashan.com
‘शुद्ध वेदनांची गाणी’ ही सुप्रिया अय्यर या प्रथितयश आणि संवेदनशील लेखिकेची नवी कादंबरी वाचनात आली. लेखिकेची नाळ विसाव्या शतकाशी जुळलेली असल्यामुळे त्या शतकाच्या पूर्वार्धाचे संदर्भ घेऊनच तिनं कादंबरी लिहिली आहे आणि तसं आपल्या प्रास्ताविकात स्पष्टपणे नमूदही केलं आहे. या कालखंडाची ओळख, स्त्रीच्या वेदनेची असणारी सखोल जाण आणि सामाजिक परिस्थितीवरचं त्याला वेढून येणारं भाष्य यातनं ही कादंबरी आकार घेत जाते.
अप्पासाहेब ऊर्फ आदिनाथ तालुकदार या ‘सोनगढी’च्या मालकाचा मालगुजारी आणि शेकडो एकर शेतीच्या श्रीमंतीतून आलेला पैशांचा माज, दबदबा आणि रंगेल वृत्ती. विकेशा मामींनी (अवंतिका) जाणीवपूर्वक राबराब राबून निर्माण केलेली आपल्या अस्तित्वाची अपरिहार्यता. अप्पासाहेबांच्या पत्नीचं- कालिंदीचं कणाकणानं मरत जाणं. अप्पांनी वाडय़ावर आणून ठेवलेल्या राधेचं तिच्या वकुबाप्रमाणे स्वत:वरच्या अन्यायाविरुद्धचं बंड आणि थकून शेवटी केलेला आत्मघात. गावकी-भावकीच्या उद्विग्न घडामोडींमध्ये अप्पासाहेब आणि कालिंदीचा भरडून निघणारा मुलगा भास्कर. सुमन, शकू, मंगल या त्याच्या लहानग्या बहिणींची होणारी परवड आणि आईच्या मरणानं भास्करवर पडलेली अकाली जबाबदारी. वडिलांच्या धाकानं त्याचं शिक्षणासाठी दूर जाणं. जाताना आईच्या मदतीला येणाऱ्या सरस्वतीच्या मुलीबद्दल- अंबिकेबद्दल वाटू लागणारं सुप्त आकर्षण. अंबिकेनं त्याला त्याच्या पश्चात तान्ह्य मंगलचा सांभाळ करण्याचं दिलेलं आश्वासन. मामींनी अंबिकेपाशी उघड केलेलं भीषण गुपित. त्यामुळे मामींच्या वागण्यातली अंबिकेला नंतर लागत गेलेली सुसंगती. अंबिकेची या वडवानलात पडलेली आहुती.. आणि या सगळ्या माणसांचं इतर माणसांशी निगडित घडत जाणारं महाभारत!
देवव्रतानं वेढलेल्या शापित भीष्मासारखा भास्कर व्रतस्थ आहे. यातल्या मामी आणि अवंतिका यांना वरकरणी निवडीचं स्वातंत्र्य कधीकाळी मिळालेलं आहे. परंतु ते विहीर आड करायची, रस्त्यावर उतरून देह विकायचा, विधवाश्रमात जायचं, की वाडय़ाच्या छपराखाली तोंड मिटून अन्यायाची गपगुमान साथ करायची- यापैकीच एकातल्या निवडीचं स्वातंत्र्य आहे. अशी वाडा संस्कृती, मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणे, बाईच्या यातनांची वाडय़ाच्या विटेविटेची मूक साक्ष, भास्करसारख्या संवेदनक्षम पुरुषाची होणारी घुसमट, सामाजिक विषमता आणि तिथले तद्नुषंगानं येणारे प्रश्न, प्रतिष्ठितांचे पैशांच्या दबावानं सरसकटपणे दाबले जाणारे गुन्हे हे १९ व्या शतकातले प्रश्न आज वेगळे आयाम घेऊन आपल्यासमोर उभे आहेत. त्यामुळे कालौघात त्यातल्या काही मिटत जाणाऱ्या गोष्टींबाबत आपण नि:श्वास टाकत असतानाही समाजात फार काही मोठे मूलगामी बदल घडलेले नाहीत या विचारानं कादंबरी वाचताना जीव कासावीस होत जातो. त्यामुळे आज अप्पासाहेबांच्या बायकोनं, मामींनी, अंबिकेनं, भास्करनं आणि अगदी राधेनंसुद्धा पुढय़ात असलेल्या पर्यायांपलीकडचं कोणतं निवडस्वातंत्र्य घ्यायला हवं होतं, घेतलं असतं, याची मनामध्ये उगाचच उलघाल सुरू होते. परंतु त्या विशिष्ट कालखंडात लेखिकेनं विचारपूर्वक ही व्यक्तिचित्रं बांधलेली असल्यामुळे त्या महाभारताचे आपण मूक साक्षीदार असल्यासारखी आपली तगमग होत राहते. सुप्रिया अय्यर असे दिसणारे, न दिसणारे पापुद्रे फार अलगदपणे सोडवत जातात.
अप्पासाहेबांसारखी माणसं बिनदिक्कतपणे, निर्लज्जपणे आयुष्यात सुखं वाजवून घेत जगतात. त्यांच्या भीतीनं आजूबाजूची माणसं वशीकरण झाल्यासारखी त्यांच्यापुढे नाचत राहतात. भास्करसारखे कोणी अश्वत्थाम्याची वेदना स्वीकारतात. आयुष्यभर भळभळती जखम वागवत राहतात. कालिंदीसारखं कोणी वेदना कुरवाळत कुढत राहतात. श्वास असेपर्यंत आणि शरीर दुसऱ्यासाठी झिजतंय तोपर्यंत आपल्या अस्तित्वाची किंमत आहे असं जाणणाऱ्या मामी जिवंत नरकयातना भोगत राहतात. अंबिका कोणत्याही अभिनिवेशाशिवाय आयुष्याला सामोरं जाताना इतरांच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न करत वाहत राहते. ‘कादंबरी’ या साहित्य प्रकाराचं पुरुषांना किती प्रेम/ वावडं आहे, याचा खरं तर एक पाहणी अभ्यास करायला हवा. अशासाठी, की माहितीच नसल्यामुळे समजू न शकलेली बाई आणि तिच्या अथांग वेदनेची पातळी ‘माणूस म्हणून’ पुरुषांना जर समजली, तर समाजातल्या कित्येक प्रश्नांची दाहकता कमी व्हायला मदत होईल. इथे ‘माणूस’ हा शब्द बाईला आणि पुरुषाला दोघांनाही उद्देशून आहे.
सुप्रिया अय्यर यांच्यावरचा वैदर्भीय भाषासंस्कार फार लोभस आहे. मात्र, स्त्री-पात्रांमध्ये त्या ज्या सहजपणे परकाया प्रवेश करतात, ती सहजता पुरुष-पात्रांच्या बाबतीत ‘तटस्थ अवलोकन’ अशा प्रकारची होऊन जाते. थोडक्यात, पुरुष-पात्रांची गुणदोषांसकट सार्थ व्यक्तिमत्त्वं उभी राहतात खरी, परंतु ती एका स्त्रीच्या अवलोकनातून.
ही टीका नव्हे, परंतु वैयक्तिकदृष्टय़ा मला कोणत्याही लेखनात भावनांची विस्तृत स्पष्टीकरणं रुचत नाहीत. वाचकांच्या कुवतीला आव्हान दिल्यासारखं ते वाटतं. या कादंबरीत तशी ती काहीवेळा आली आहेत, जी टाळता आली असती. कदाचित वेदनेची व्याप्ती, खोली दाखवण्याच्या नादात लेखिकेची आर्तता त्यात परावर्तित होत असावी. कारण ही सगळी स्पष्टीकरणं काळजाचा ठाव घेणारी आहेत, एवढं मात्र नक्की!
कादंबरीत काही ठिकाणी मनातल्या विचारांच्या आवर्तनांची पुनरावृत्तीही जाणवते. त्यानं कादंबरीच्या ओघाला किंचित बाधा येते. आणखी एक, आपल्या मुलाचा- भास्करचा आणि अंबिकेचा संग झालेला माहीत असूनही पाठोपाठ बलात्कार करणारे अप्पासाहेब, तिच्याशी लग्न केल्यानंतर पहिल्या रात्रीच्या तिच्या बोलण्यानं तिला कायमची दूर राहण्याची मुभा देतात हे पटणारं नाही. फार तर फार ते काही दिवस होऊ शकेल; परंतु ज्या प्रकारची ही पुरुषी, सरंजामी, अन्यायाबाबत विधिनिषेध नसणारी व्यक्तिरेखा आहे, तिच्याबाबतीत असा एका क्षणातला मृदू बदल खटकतो. अर्थात, या काही ‘का’चे ऊहापोह आता निर्थक आहेत.
वास्तविक या आणि अशा आनुषंगिक विषयावर मराठीमध्ये बऱ्यापैकी लिखाण झालेलं आहे. त्यामुळे विषयाच्या बाबतीत ‘मोअर ऑफ द सेम’ अशी भावना निर्माण होते. परंतु लेखिकेची निरीक्षणशक्ती, अभ्यासू वृत्ती, आशयघन लेखनशैली आणि संवेदनशीलता यांच्या मनोहारी संगमामुळे विषयाचा न-नावीन्यपणा मागे पडतो आणि कादंबरीतनं जे काही ‘अधिक’ मिळत राहतं, त्यानं लेखिकेच्या पुढच्या लिखाणाची उत्सुकता निर्माण होते. हेच या कादंबरीचं यश मानता येईल.
‘शुद्ध वेदनांची गाणी’ – सुप्रिया अय्यर
देशमुख आणि कंपनी पब्लिशर्स प्रा. लि.,
पृष्ठे – ३५८, मूल्य – ४०० रुपये