‘भारतीय भाषांतील स्त्रीवादी साहित्य’ या महाराष्ट्र साहित्य परिषद प्रकाशित डॉ. अश्विनी धोंगडे संपादित ग्रंथातील ‘समाज, स्त्रीवाद आणि स्त्रीवादी साहित्य’ या प्रकरणातील संपादित अंश..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्त्रीवाद या शब्दाबद्दल अनेकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे स्त्रीवादी लेखन करणाऱ्या काही स्त्रियाही आपण स्त्रीवादी नाही, असे सांगतात. स्त्रीवाद म्हणजे काय आहे आणि काय नाही, याबद्दलच्या संकल्पना स्पष्ट असल्या तर स्त्रीवादी असल्याचे अभिमानाने सांगता येईल.
१) स्त्रियांचे आंदोलन म्हणजे पुरुषांविरुद्ध सूड उगवणे नाही. स्त्रियांना न्याय हवा आहे; पण अन्यायाचा प्रतिकार अन्यायाने करता येत नाही याची त्यांना जाणीव आहे. एका दमनचक्राचे उत्तर दुसरे दमनचक्र नाही.
२) स्त्रीवाद पुरुषांना दोष देत नाही, तर पुरुषसत्ताक व्यवस्थेला दोष देतो. पुरुषसत्ताकामुळे पुरुष हा स्त्रीपेक्षा श्रेष्ठ आहे, स्त्री ही खालच्या स्तरावर आहे, आणि स्त्री हे
पुरुषाच्या भोगाचे स्थान आहे, अशी शिकवण पुरुषांच्या मनात बिंबवली जाते.
३) दोन वर्ग, दोन देश, दोन जाती, दोन धर्म या लढायांप्रमाणे स्त्री-पुरुष ही लढाई नाही. कारण अशा लढाईत एकाची हार व दुसऱ्याची जीत अपेक्षित नाही. इथे दोघांचे हितसंबंध एकच आहेत. कुटुंबातील सदस्यत्व व मुले यांच्या संबंधाने दोघांची कर्तव्ये सारखीच आहेत. म्हणून सत्तेचे हस्तांतर हा स्त्रीवादात मुद्दाच नाही. उलट, शांततापूर्ण सहअस्तित्व व सामंजस्य अधिक महत्त्वाचे आहे. परस्परांचा सन्मान राखून व समतेच्या पायावर आधारलेल्या नात्याने हे घडू शकते.
४) स्त्रियांना पुरुष व्हायचे नाही. स्त्रियांचे जे जे नैसर्गिक वैशिष्टय़ आहे, त्यात लाज वाटण्यासारखे काही नाही. स्त्रियांवर निसर्गाने सोपवलेल्या जबाबदाऱ्या स्त्रिया नाकारत नाहीत. स्त्रिया व पुरुष यांच्यात शारीरिक भिन्नता असली तरी व्यक्ती म्हणून दोघांत समता नांदू शकते. सुरुवातीला पुरुष
हे स्वातंत्र्याचे प्रारूप होते, म्हणून सुरुवातीचा काळ अनुकरणाचा होता.
५) स्त्रीवाद म्हणजे साहित्यातील सवतासुभा वा वेगळी चूल नव्हे. पण साहित्याच्या मुख्य प्रवाहात स्त्रियांच्या साहित्याकडे सतत दुर्लक्ष झाल्यामुळे स्त्रियांच्या साहित्यातील वैशिष्टय़ अधोरेखित करणे, ही स्त्रीवादाची गरज आहे.
६) स्त्रीवाद हा आंदोलनातील वा लेखनातील काही स्त्रियांपुरता मर्यादित नाही. आणि केवळ ‘स्त्रीवादी’ या विशेषणापुरताही सीमित नाही. तळागाळातील स्त्रियांच्या स्तरापर्यंतचा त्याचा विस्तार आहे. स्त्रीवादाला अपेक्षित असलेला भगिनीभाव देश, काल, जाती, धर्म, वर्ग यांच्या पलीकडे निर्देश करतो. स्त्रियांचे भावनिक, मानसिक, नैतिक, आर्थिक, भाषिक आणि अस्मितेसंबंधीचे प्रश्न जगात सगळीकडे सारखेच आहेत.
७) स्त्रीवादी म्हणजे कुटुंब मोडणाऱ्या, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार मान्य असणाऱ्या, किंवा स्वत:च्या वैवाहिक आयुष्यात नैराश्य आलेल्या स्त्रियांनी अंगीकारलेली विचारसरणी नव्हे. असे मानणे हा स्त्रीवादाचा अपप्रचार आहे. नवे कोणतेही विचार समजून घेण्यातील भीती यामागे आहे. कुटुंब व समाज यातील आपले वर्चस्व कमी होईल अशी भीती पुरुषांना वाटते. स्त्रीवाद हा प्रत्येक स्त्रीचा व्यक्ती म्हणून विचार करतो. त्यामुळे स्त्रीवाद ही जगातल्या प्रत्येक स्त्रीशी जोडली गेलेली कल्पना आहे असे गांधीजी म्हणत. त्याचप्रमाणे स्त्रीवादी चळवळ हा फक्त स्त्रियांचा प्रश्न नसून, पुरुषांची मानसिकता बदलण्याचा तो प्रयत्न आहे.
८) स्त्रीवादी विचारसरणी फक्त पाश्चात्य नव्हे. खरे तर आपली आजची जीवनशैलीच पाश्चात्त्य आहे. एकोणिसाव्या शतकापासूनच सुधारणांचा एक प्रवाह स्त्रियांना ब्रिटिश महिलांप्रमाणे ‘लेडी’ बनवू इच्छिणाऱ्यांचा होता. आता तर जग इतके जवळ आले आहे, की प्रभावी विचारसरणीचे अनुकरण होणे सहज आहे. पण भारतीय संदर्भात हा पूर्णपणे पाश्चात्त्य विचार नाही. महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, प्राचार्य गोपाळ कृष्ण आगरकर, महात्मा गांधी, दादा धर्माधिकारी, वि. का. राजवाडे आदींनी शतकापूर्वीपासून स्त्री-पुरुष समता व स्त्रीचे स्वातंत्र्य याबद्दल अतिशय उदारमतवादी विचारांची मांडणी केली आहे. ती आपण आचरणात आणली नाही, एवढेच.

९) स्त्रीवादाच्या कल्पना फक्त शहरी भागापुरत्या मर्यादित नाहीत. भारत हा आजही बहुसंख्य खेडय़ांचा देश आहे. ग्रामीण भागातील गरिबी, अज्ञान, शिक्षणाचा अभाव, जातीची बंधने, परंपरा, चालीरीतींचे अंधानुकरण, अंधश्रद्धा यांच्या प्रभावामुळे स्त्रीवादी विचारसरणी सगळ्या स्त्रियांपर्यंत पोहोचायला अजून काही वर्षे जावी लागतील. पण स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के आरक्षण मिळाल्यापासून स्त्री-हक्कांबद्दलची जाणीव वाढते आहे. बचत गटांच्या माध्यमातून त्यांना आपल्या आर्थिक सामर्थ्यांची जाण आली आहे. मुलींना शिकवण्याची धडपड दिसून येत आहे. दलित, आदिवासी, ग्रामीण आणि लोकसाहित्यातून स्त्रियांनी पुरुषसत्ताकविरोधी मांडणी मोठय़ा प्रमाणावर केली आहे.
साहित्य आणि समाज यांचे संबंध अत्यंत व्यामिश्र आणि गुंतागुंतीचे आहेत. कोणत्याही साहित्यकृतीवर ज्याप्रमाणे त्या कालखंडात घडणाऱ्या सामाजिक उलथापालथींचा आणि सामाजिक परंपरेच्या भानाचा परिणाम स्पष्ट दिसतो; त्याचप्रमाणे काही साहित्यकृती समाजातील विकृतींवर नेमकेपणाने प्रहार करून सामाजिक बदलाचे भान देतात. ‘आहे ते जग समताधिष्ठित, स्वस्थ व सुंदर व्हावे’ या सामाजिक जाणिवेतून प्रस्थापित समाजरचनेच्या विरोधात उभे राहून स्त्रियांच्या सर्व प्रकारच्या हक्कांची पुनस्र्थापना करण्याच्या हेतूने प्रेरित होऊन स्त्रीवादी साहित्य निर्माण झाले आणि त्याने एक नवा क्रांतिकारी इतिहास घडवला.
सन १९७५ हे आंतरराष्ट्रीय स्त्रीवर्ष म्हणून घोषित झाले आणि त्यानंतरचे १९८५ पर्यंतचे दशक हे स्त्रीप्रश्नांना प्राधान्य देणारे ठरवले गेल्यावर स्त्रीमुक्ती चळवळींच्या माध्यमातून स्त्रियांसंबंधीचे शतकानुशतके दडपले गेलेले प्रश्न पृष्ठभागावर येऊ लागले. स्त्रीमुक्ती, स्त्री-स्वातंत्र्य, स्त्रीवाद वगैरे पारिभाषिक संकल्पना याच काळात रूढ झाल्या. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम-तिय्यम दर्जाचे स्थान दिल्याने आणि रूढ समाजव्यवस्थेत धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक, भाषिक, बौद्धिक अशा सर्व व्यवस्था स्त्रियांचे शोषण करतात याची जाणीव झाल्याने, त्या व्यवस्थेविरोधात बंड करण्याच्या उद्देशाने स्त्रीमुक्ती चळवळ अस्तित्वात आली. स्त्रीचे माणूसपण नाकारून तिला जी पशुतुल्य स्थिती प्राप्त करून दिली जाते, त्याविरुद्ध लढा देत व्यक्ती म्हणून स्त्रीचे असलेले स्थान प्रस्थापित करण्यासाठी विकसित झालेली ‘स्त्रीवाद’ ही एक विचारप्रणाली आहे. स्त्रियांचे क्षमताधिष्ठित हक्क प्राप्त करून समाजपरिवर्तन घडवू बघणारी ही एक राजकीय जाणीव आहे. ‘मानव म्हणजे पुरुष, तर स्त्री हे त्याचे उपांग’ या पारंपरिक विचारसरणीला प्रश्न करत स्त्रीवादी साहित्य घडत गेले आणि स्त्रियांच्या हक्कांचे व अधिकारांचे विविध अंगांनी समर्थन करत त्याचा प्रवास झाला. मोर्चे, आंदोलने, चळवळी, धरणे, निवेदने, बैठका, सभा, साहित्य, पथनाटय़े, भाषणे, चर्चासत्रे, अधिवेशने, कार्यशाळा, विद्यापीठीय स्त्री-अभ्यास केंद्रे इत्यांदींच्या माध्यमातून स्त्रियांनी पुरुषप्रधान मानसिकतेला जगभर धक्के देत आपले न्याय हक्क मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. स्त्रीवादी सिद्धान्ताने कालानुरुप बदल केले आहेत; तसेच धार्मिक समजुती, जातीय परंपरा, व्यक्तीची जडणघडण, मानसिकता, लैंगिकता, शिक्षण, संस्कार यानुसारदेखील स्त्रीवादाचे स्वरूप वरवर बदलते. मात्र, स्त्रीवादाचा गाभा स्त्री- पुरुष समता हाच आहे आणि तो देश-काल यांच्या पलीकडे एकच आहे. स्त्रीवादी विचारसरणीचा जन्म ज्या अनेक धार्मिक, सामाजिक, राजकीय अन्यायांमुळे झाला; त्यात धर्माने स्त्रियांवर केलेल्या दुजाभावाचा मोठाच प्रभाव आहे.
‘स्त्रीभोवती एक गूढ वलय आहे.. स्त्रियांच्या वर्तनाचं तार्किक स्पष्टीकरण देता येत नाही.. स्त्री ही लहरी आहे.. स्त्री हे कोडे आहे..’ अशा स्वरूपाची विधाने साहित्यिकांपासून मानसशास्त्रज्ञानांपर्यंत आणि बुद्धिवाद्यांपासून तत्त्वज्ञांपर्यंत अनेकांनी केली आहेत. फ्रॉइडलाही स्त्री ही पुरुषापेक्षा अधिक गूढ वाटते. ‘स्त्रीला काय हवे आहे, याचे उत्तर माझ्या तीस वर्षांच्या संशोधनानंतरही मी देऊ शकलो नाही, अशी कबुली त्याने दिली आहे. मात्र स्त्री-स्वभावाविषयीचे अस्पष्टीकरणात्मक वर्णन ही पुरुषांची एक खेळी आहे, असे सिमॉन दी बुवाला वाटते. स्त्रीस्वभावाबद्दलचे अज्ञान मान्य न करता गूढ वलय निर्माण करणे, म्हणजे स्त्रीस्वभाव समजून न घेणे आहे. तो कळला, तर पुरुषाचा भ्रमनिरास होईल आणि वास्तव कळून येईल, की स्त्री जशी एकटी आहे, तसा तोही एकटा आहे. स्वत:ची स्वप्ने, आशा-आकांक्षा, भीती, प्रेम, पोकळ गर्व या सर्व बाबतींत तो एकाकी आहे. जोपर्यंत स्त्री समजत नाही, तोपर्यंत तिच्याशी परिपूर्ण संबंध जोडले जाणे अशक्य आहे.
स्त्रीभोवती निर्माण झालेल्या या गूढाचे कारण स्त्रीचे आर्थिक व सामाजिक परावलंबन हेही असू शकते. जसे सर्व परावलंबी लोक आपल्या मालकापासून काही ना काही लपवून ठेवतात, तशी परावलंबी स्त्री पुरुषापासून स्वत:ला लपवून ठेवते. पुरुषाने निर्माण केलेल्या स्वत:च्या मोठेपणाच्या भूमिकेमुळे त्यालाही स्त्री समजून घेणे म्हणजे स्वत:ची दडपशाही मान्य करणे असते. एकाच समान परिस्थितीत स्त्री व पुरुषांच्या प्रतिक्रिया सारख्याच असतात असे मानसशास्त्राला वाटते. त्यात लिंगसापेक्ष फरक पडत नाही. तरी प्रत्येक गोष्टीचे मूल्यमापन साम्यावर न करता भेदांवर आधारित करण्याची एकूण वृत्ती दिसते. या भेदास सामाजिक घटक कारणीभूत आहेत. पुरुषांच्या हाती सर्व प्रकारची सत्ता आहे. सत्तेमुळे पैसा, श्रेष्ठत्व, पुढारीपण मिळते. दुसऱ्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवता येते. सत्ता म्हणजेच वर्चस्व व स्वामित्व गाजवणे. पुरुष सत्ताधीश आहे आणि स्त्रीकडे काहीही नाही. स्त्रियांच्या अस्तित्वावरच सतत नियंत्रण येत असल्यामुळे अनुभव, भावना, विचार, प्राधान्यकल्पना यांत फरक पडू शकतो. लिंगभेदामुळे पडणाऱ्या फरकांचा स्त्रियांच्या चळवळीने पुनश्च अभ्यास केला. त्यामध्ये पुरुष हाच मापदंड धरून त्यावरून तुलनेने स्त्रीचे मोजमाप करायचे आणि त्यावरून स्त्रीमध्ये असलेला फरक ही तिची कमतरता व कमकुवतपणा मानायचा, हाच व्यवहार मानसशास्त्रात रूढ होता असे त्यांना दिसून आले. जे जे काही पुरुषांचे आहे ते सवरेत्कृष्ट आहे; जे स्त्रीचे आहे ते दुय्यम आहे, मुले व मुली यांना कशा रीतीने वाढवले जाते, लैंगिक संबंध, गर्भारपण, पाळी, मुलाचा जन्म हे स्त्रीविशिष्ट अनुभव स्त्रियांना कसे वाटतात, बाई, आई, बायको या वेगवेगळ्या भूमिका निभावताना त्यांचे भावनिक अनुभव काय असतात, बलात्कार, लैंगिक छळ, कौटुंबिक अत्याचार यांचा त्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो, असा स्त्रीनिष्ठ अभ्यास स्त्री- अभ्यासकांनी सुरू केला. हा अभ्यास फक्त स्त्रियांचा न राहता स्त्रियांकडे कसं पाहिलं जातं, ते त्यामुळे समजून आलं. यातून स्त्रीच्या नव्या मानसशास्त्राची गरज निर्माण झाली. स्त्रीचे म्हणून खास अनुभव ती कशी अनुभवते, दंतकथांमधून चितारली जाणारी स्त्रीची प्रतिमा स्त्रियांच्या मानसिकतेवर काय परिणाम करते, गेल्या पन्नास वर्षांत स्त्रीचे जीवन कसे बदलत गेले, स्त्रीच्या जीवनाचे जुने आदर्श त्यांनी कसे धिक्कारले, याचा अभ्यास जसा मानसशास्त्रात नव्याने सुरू झाला; त्याप्रमाणे स्त्रीवादी साहित्यातही या विषयावरच्या समस्यांचे जोरकस चित्रण आले आहे.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Society feminist and feminist literature