प्रोग्रेसिव्ह ग्रुपचे एक संस्थापक आणि आधुनिक भारतीय चित्रकलेचे बिनीचे शिलेदार सय्यद हैदर रझा यांच्या कला-योगदानाच्या मीमांसेविषयी..
काही व्यक्तिमत्त्वांमध्ये जादू असते असं म्हणतात, तशी सय्यद हैदर रझा यांच्या व्यक्तिमत्त्वात नक्कीच होती. एरवी मितभाषी, पण काही वेळ एकत्र घालवल्यानंतर बोलताना खुलणारे, नेहमीच मृदुभाषी, स्वतकडे परस्थपणे पाहू शकणारे आणि संस्कृत, हिंदी, मराठी, उर्दू, फ्रेंच या भाषांमधलं साहित्यिक आणि आध्यात्मिक वैभव माहीत असणारे असे हे एक ज्येष्ठ चित्रकार होते. या साऱ्या वैशिष्टय़ांच्या मिश्रणातून ही जादू सिद्ध झाली होती. दिसण्यातही रुबाब होता.. उंचीमुळे अधिकच जाणवणारा! पण या व्यक्तिमत्त्वातलं आणि त्या ‘जादू’तलं सर्वात महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे रझा ‘ज्येष्ठ चित्रकार’ होते, हेच. तशी ख्याती आणि तसा मान त्यांनी गेल्या सुमारे तीस वर्षांत मिळवला आणि टिकवला नसता, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वातल्या अन्य साऱ्या वैशिष्टय़ांना ते जादूमय वलय आलं नसतं.
रझा गेले, त्यानंतर काय काय आणि किती परींनी लिहिलं जाईल.. त्यात रझांशी झालेल्या भेटीगाठींची वर्णनं (आणि पर्यायानं त्या ‘जादू’चे त्या- त्या वेळचे तपशील!) असतील, रझा हे सुमारे ७० वर्षांपूर्वी ज्या ‘प्रोग्रेसिव्ह ग्रुप’ या त्यामानानं विसविशीत कलासमूहाचे घटक होते, त्या समूहाबद्दल आणि त्यातल्या रझांच्या त्यावेळच्या स्थानाबद्दलच्या आठवणी असतील.. कदाचित, रझा अखेरच्या काळात कसे एकाकी राजहंसासारखे होते याबद्दलचं एखादं मुक्तचिंतन असेल.. हे सारं रझांशी आणि ‘प्रोग्रेसिव्ह’ इतिहासाशी जवळीक असलेल्या मंडळींना सहज जमेल. रझा गेले, उरल्या त्या आठवणीच.. आणि त्याही फक्त आमच्याकडेच आहेत, असा एक भास या साऱ्यामुळे उत्पन्न होईल.
पण हे अर्धसत्य आहे. रझा तर गेले, पण त्यांची चित्रं उरली आहेत. त्यातल्या काही चित्रांना येत्या काही वर्षांत- किंवा महिन्यांतसुद्धा- लिलावांमध्ये विक्रमी बोली मिळाल्याच्या बातम्या येऊ शकतील. लिलावात नव्हे, पण एखाद्या कुठल्याशा प्रदर्शनात लागलेलं रझा यांचं चित्र बनावट असल्याचा बभ्रासुद्धा झाल्यास नवल नाही. अगदी शेवटच्या काही वर्षांत रझा यांची काळजी घेणाऱ्या ‘वढेरा आर्ट गॅलरी’नं त्यांच्या आजवरच्या सर्व चित्रांची सचित्र अधिकृत पुस्तिका- म्हणजे ‘कॅटलॉग राझोने’ बनवण्याचं ठरवून त्याचा पहिला खंड तयारही केला आहे. परंतु अन्य खंड अद्याप प्रकाशित झाले नसल्याचा गैरफायदा घेऊन रझांच्या नावानं भलतंच कुणीतरी लबाडी करू शकतं. जे चित्रकार ‘ब्रँडनेम’सारखे झालेले असतात, ज्यांच्या ‘सहीला किंमत’ असते, अशा कुणाही चित्रकाराला बनावट चित्रांचा धोका असतोच; तो दिवंगत रझांनाही राहील.
पण रझा गेल्यानंतर आणखीही काही होईल.. ‘रझा फाऊंडेशन’चे खुद्द रझांखेरीज अन्य दोघे विश्वस्त (कवी/कलासंघटक अशोक वाजपेयी आणि कलादालन-संचालक अरुण वढेरा) तरुण कलाकारांसाठीच्या पुरस्कारात कदाचित वाढही करतील. या फाऊंडेशनचे बाकीचे उपक्रमही अव्याहत सुरूच राहतील. सामान्यजनांना रझांची बालपणापासूनची माहिती विकिपीडियावर इंग्रजीप्रमाणेच हिंदीतही सध्या वाचता येते. त्यात कदाचित रझांवरल्या आदरांजलीपर लेखांमुळे आणखी भर पडेल.
प्रश्न हा आहे की, यावर आपण समाधानी राहायचं का? रझा यांच्या मूल्यमापनावर नेहमीच त्यांच्या ‘व्यक्तिमत्त्वातल्या जादू’चा एक अदृश्य पगडा राहिला आहे. त्यामुळे इंग्रजीत त्यांच्याबद्दल लिहिणारे बऱ्याचदा ‘प्रोग्रेसिव्ह ग्रुप’बद्दल गळे काढायचे (हे करताना याच ग्रुपमधले एक चित्रकार मकबूल फिदा हुसेन यांची मृत्यूपर्यंत कशी ससेहोलपट चालू ठेवली गेली होती आणि त्यावर रझांनी जवळपास १५ वर्षांत किंवा हुसेनच्या मृत्यूनंतरही जाहीरपणे चकार शब्द काढलेला नाही, हे मात्र सोयीस्करपणे विसरलं जायचं.), किंवा मग रझा हे कुणीतरी फार भारतीय आहेत आणि म्हणून त्यांची चित्रं बघा कशी आध्यात्मिक आनंद देणारी आहेत, असं गूढ-गहनीकरण इंग्रजीतही असायचं. हिंदी कलासमीक्षेत तर या गूढ-गहन काव्यमय गुंजनाला ‘गरिमा’च चढायची. आपल्या मराठीतही एक-दोघे समीक्षक तसंच लिहायचे. हे सारे आता आणखी लिहितील. रझा यांच्या मूल्यमापनाचा प्रश्न बाजूलाच राहील आणि थोर अमूर्त चित्रकार वासुदेव (व्ही. एस.) गायतोंडे यांच्याबाबत जग मात्र जसं अगदी अलीकडेपर्यंत अलिप्तच राहिलं होतं, तसं रझांबद्दलही होईल. गायतोंडे यांचं प्रदर्शन ‘गुगेनहाइम म्युझियम’नं अमेरिका आणि इटलीत भरवलं. त्यानंतर इंग्रजीत त्यांच्या समीक्षेचा सूर बदलण्याच्या, तो अधिक अभ्यासू होण्याच्या शक्यता वाढल्या; तसं रझांबद्दलही व्हायला हवं.
ते होणार नसेल, तर रझांची चित्रं आणि भारतीय फॅशन डिझायनर्सच्या (उदाहरणार्थ अनिता डोंगरे) रंगसंगती, रझांची चित्रं आणि भारतीय राजकारणातली (मंडल ते कमंडल) स्थित्यंतरं, रझा आणि अनीश कपूर यांची सुरुवातीची (१९९० चं दशक) शिल्पं यांमधल्या ‘भारतीयते’तले दृश्य साम्य-भेद, रझांनी ‘बॉम्बे स्कूल’ला अंतर देऊन भोपाळमध्ये स्वतचा पंथ स्थापन करण्यापर्यंतच्या प्रवासाची कला-आधारित मीमांसा, त्या पंथातल्या यूसुफ, सीमा घुरय्या, मनीष पुष्कळे आदी चित्रकारांच्या गेल्या दोन दशकांहून अधिक कला-कारकीर्दीतून दिसणाऱ्या रझा-प्रभावाची बदलती रूपं यांची चर्चा कधी होणार? ती होणं आता तरी आवश्यक आहे.
जादू ओसरल्यावर आपण भानावर यायचं असतं. रझा नावाच्या जादुई व्यक्तिमत्त्वावर आता काळाचा पडदा पडला आहे. त्यानंतर तरी आपल्या कला-इतिहासकारांनी रझांचा विचार करताना काव्यमय स्तुतिस्तोत्रांऐवजी अभ्यासू गांभीर्य धारण करायला हवं. हिंदीत ते कदाचित होणार नाही. पण मराठी आणि इंग्रजीत तरी हे गांभीर्य रझांबद्दल यायला हवं.
अभिजीत ताम्हणे abhijit.tamhane@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा