तानुबाई बिर्जे (१८७६-१९१३) या शतकभरापूर्वीच्या ‘दीनबंधू’ या सत्यशोधकी नियतकालिकाच्या स्त्री-संपादक. संपादक पतीच्या- वासुदेव बिर्जे यांच्या मृत्यूनंतर काही वर्षे त्यांनी या पत्राचे संपादकपद समर्थपणे निभावले. त्यांनी समाजप्रबोधनपर व परिवर्तनशील लेखनही केले.

तानुबाई वासुदेवराव बिर्जे यांचा जन्म इ. स. १८७६ चा असावा. देवराव कृष्णराव ठोसर यांची ती मुलगी. ठोसर हे नाशिक जिल्ह्यतील गंगापूरचे खानदानी मराठा होत. त्यांचे शिक्षण इंग्रजी व मराठी माध्यमातून पुणे येथे झाले. पुढे त्यांनी पोलीस खात्यात नोकरी केली. महात्मा फुले यांचे ते जवळचे व विश्वासू सहकारी होते. आपल्या मुलामुलींची लग्ने त्यांनी सत्यशोधकी पद्धतीने लावली.

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Pusad Naik family, Indranil Naik , Vasantrao Naik,
अजित पवारांसोबत गेलेल्या नाईक घराण्याला मंत्रिपदाची भेट ?
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी
Raghunath More, Raghunath More passed away,
शिवसेनेचे रघुनाथ मोरे यांचे निधन, दिघे यांच्या निधनानंतर साभांळली होती ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी
diarrhea, Badlapur, girl died diarrhea Badlapur,
अतिसाराने चिमुकलीचा मृत्यू, बदलापुरातील दुर्दैवी घटना, अंधश्रद्धेचा संशय

ठोसरांचे तिन्ही जावई कट्टर सत्यशोधक होते. तानुबाईंचा विवाह वासुदेवराव लिंगोजी बिर्जे (१८६४-१९०८) यांच्याशी झाला. वासुदेवरावांचा जन्म बेळगावचा. ते त्या काळात मॅट्रिक झालेले बुद्धिमान विद्यार्थी होते. त्यांना संस्कृत, इंग्रजी, गुजराती व हिंदी भाषा अवगत होत्या. रा. ब. नारायण मेघाजी लोखंडे, गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुसकर, रामय्या आय्यावारू यांच्याबरोबर विविध सामाजिक चळवळींत ते सहभागी होत असत. मुंबईतील ‘दीनबंधू’, ‘शेतकऱ्यांचा कैवारी’ या पत्रांत ते नियमित अभ्यासपूर्ण लेखन करीत. परिस्थितीमुळे विल्सन कॉलेजमधून शिक्षण अर्धवट सोडून ते बाहेर पडले होते. नारायण मेघाजी लोखंडे ‘दीनबंधू’चे संपादक असताना बिर्जे यांनी उपसंपादक म्हणून त्यात काम केले. पुढे रामजी संतुजी आवटे व दामोदर सावळाराम यंदे यांनी सुरू केलेल्या ‘शेतकऱ्यांचा कैवारी’ या इंग्रजी-मराठी साप्ताहिकात इंग्रजी मजकूर लिहिण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. १८९४ मध्ये बडोद्याच्या लक्ष्मीविलास ग्रंथालयात त्यांना ग्रंथपाल म्हणून नेमण्यात आले. त्यांची या पदासाठीची पारख व निवड राजे सयाजीरावांनी केली होती.

सारांश, तानुबाईंवर माहेरी व पतिगृही पुरोगामी विचार व आचारांचे संस्कार झाले होते. सत्यशोधक चळवळीशी जवळून संबंध होता. त्यांचे स्वत:चे शिक्षण सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत झाले होते. ही शाळा वेताळपेठेत होती. २६ जानेवारी १८९३ रोजी त्यांचा विवाह पुण्यात वासुदेवरावांबरोबर झाला. वासुदेवराव १८९४ ते १९०५ अशी अकरा वर्षे बडोदा सरकारच्या ग्रंथालयात ग्रंथपाल म्हणून कार्यरत होते.

वासुदेवराव बिर्जे यांचा ‘क्षत्रिय आणि त्यांचे अस्तित्व’ हा महत्त्वाचा ग्रंथ १९०३ साली प्रकाशित झाला. सयाजी-विजय छापखान्याचे मालक दामोदर सावळाराम यंदे यांच्या सहकार्याने तो प्रसिद्ध झाला. कोल्हापूरच्या वेदोक्त प्रकरणाचा वाद रंगात असतानाच हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. या ग्रंथावर भारताचार्य चिंतामणराव वैद्य यांनी १९०५ च्या ‘विविधज्ञानविस्तार’मध्ये परीक्षण केले. ३५६ पृष्ठांच्या या ग्रंथात २९ प्रकरणे आहेत. आजही तो एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ मानला जातो. ग्रंथाची पहिली आवृत्ती दुर्मीळ झाली तरी ग्रंथाची मागणी वाढत होती. त्यामुळे बापूराव रामचंद्र आवटे, सब-जज्ज, बडोदे राज्य यांनी नवीन आवृत्ती सुधारून वाढवली व तानुबाई बिर्जे यांनी इंदुप्रकाश छापखाना, मुंबई येथे १९१२ मध्ये प्रकाशित केली. वासुदेवराव बिर्जे यांनी ‘हू वेअर द मराठाज्’ हे इंग्रजी पुस्तकही लिहिले आहे.

बडोद्याला बिर्जे यांना चांगल्या पगाराची नोकरी होती. पण ती सोडून १९०३ ला ते मुंबईला आले व सत्यशोधक समाजाचे मुखपत्र ‘दीनबंधू’ त्यांनी चालवायला घेतले. कृष्णराव भालेकरांनी ‘दीनबंधू’ १ जानेवारी १८७७ रोजी बुधवार पेठ, पुणे येथून सुरू केले होते. भालेकरांनी जवळजवळ एकहाती ते पत्र १८८० च्या एप्रिलपर्यंत पुण्यातून चालवले. त्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे यांनी ते मुंबईतून सुरू केले. १८९७ ला लोखंडे यांच्या मृत्यूनंतर वासुदेवराव बिर्जे यांनी ‘दीनबंधू’ची जबाबदारी घेतली. १९०३ मध्ये बडोदे सोडून मुंबईला आल्यावर तर त्यांनी संपादक म्हणून जिद्दीने काम सुरू केले. पत्राचा खप वाढला. १९०८ मध्ये नाशिक येथे दुसरी मराठा शिक्षण परिषद आयोजित केली गेली होती. त्यासाठी नाशिकला गेले असताना कॉलऱ्याने त्यांचा अकाली अंत झाला.

पतीच्या आकस्मिक निधनानंतर तानुबाईंनी ‘दीनबंधू’ची जबाबदारी स्वीकारली. त्यावेळी त्या ३२ वर्षांच्या होत्या. त्यांनी संपादकपदाची जबाबदारी समर्थपणे पेलली. मुंबईतील सीताराम बिल्डिंगमध्ये १२ ७ ८ इंच आकाराच्या ट्रेडल मशीनवर ‘दीनबंधू’ छापला जाई. सुरुवातीला भगवंतराव पाळेकर यांनी काही महिने संपादनाचे काम केले. परंतु तानुबाईंचे बंधू लक्ष्मणराव ठोसर आणि मेहुणे बापूराव आवटे यांना त्यांचे लेखनविषयक धोरण पसंत पडले नाही. मग तानुबाईंनीच संपादकपद सांभाळले. १९०८ ते १९१२ पर्यंत त्यांनी या पत्राचे संपादन केले. दरम्यान ‘दीनबंधू’ आर्थिक अडचणीत सापडले तेव्हा त्यांनी आपल्या अंगावरचे दागिने विकले, पण ते बंद पडू दिले नाही.

त्यांनी ‘दीनबंधू’मध्ये शिक्षण, कृषी, राजकारण, समारंभ, सत्यशोधक समाज, मराठा आदी जातींच्या शिक्षण परिषदा यांचे सविस्तर वृत्तान्त प्रसिद्ध केले. सत्यशोधक चळवळीच्या वृत्तांवर त्या विशेष भर देत असत. तुकाराम महाराजांचे अभंग अग्रलेखांच्या शीरोस्थानी प्रसिद्ध करून त्या ‘दीनबंधू’चे उद्दिष्ट व्यक्त करीत असत.

त्यांच्या संपादकीय कारकीर्दीत स्फुटलेख छापले गेले. महत्त्वाच्या व्यक्तींचे मृत्यू, अपघाताच्या बातम्या यांचाही समावेश असे. त्यात टायटॅनिक बोट बुडून झालेल्या अपघाताची बातमीही छापली गेली होती. त्या काळातल्या महत्त्वाच्या ग्रंथांवर, नाटकांवर व नाटय़प्रयोगांवर केलेले परीक्षणात्मक लिखाण या पत्रात आढळते. पुणे येथील मराठा विद्यार्थ्यांचे दुसरे संमेलनाध्यक्ष तुकोजीराव पवार यांचे अध्यक्षीय भाषण (६-४-१९१२), नाशिक येथील सत्यशोधक समाजाचे दुसरे अधिवेशन (१३-४-१९१२), मराठा शिक्षण परिषदेस सूचना, माळी शिक्षण परिषद, अहमदनगर येथील ठराव आणि सर ससून डेव्हिड यांनी शेतकीच्या प्राथमिक शिक्षणाच्या शाळा स्थापन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन (२०-४-१९१२), बहुमतानुसारी राज्यपद्धतीवर लेख (१० व २४- ८-१९१२), मुस्लीम शिक्षण परिषद, बंगलोर; मासिक मनोरंजन व चित्रमय जगतची पोहोच (३- ८- १९१२), भीमराव महामुनी यांच्या विद्याप्रकाश व बालबोधची पोहोच, सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त शेट धोंडिबा बनकर यांनी पुराण सांगितले (१७- ८- १९१२) इ. त्यातल्या बातम्या महत्त्वाच्या आहेत.

१९१२ च्या ‘दीनबंधू’मध्ये एक नावीन्यपूर्ण विषय हाताळण्यात आला. भारतासारख्या खंडप्राय देशात लोकशाही शासनप्रणाली अमलात आणण्यासाठी आपला देश लायक आहे का? या विषयावरची अभ्यासू लेखमाला  प्रसिद्ध करण्यात आली. २७ जुलै १९१२ च्या अंकात ‘मुंबई इलाख्यात लेजिस्लेटिव्ह कौन्सिल आणि बहुजन समाज’ हे तानुबाईंचे असाधारण संपादकीय आहे. या संपादकीयामध्ये तानुबाई लिहितात- ‘कायदे कौन्सिलात बहुजन समाजाच्या हिताविषयी अनास्था दिसून येत आहे. या अनास्थेचे कारण शोधण्यास दूर जावयास नको. मराठीत एक म्हण आहे की, ज्याचे पोट दुखेल तो ओवा मागेल. बहुजन समाजाच्या दु:खांनी हल्लीच्या कौन्सिलातील लोकनियुक्त अथवा सरकारी सभासदांचे पोट दुखत नाही. कारण त्यांचा बहुजन समाजाशी निकटचा संबंध नाही. श्रीमंत आणि गरीब या भेदांशिवाय हिंदुस्थानात नाना जाती आणि पंथ आणि धर्म यांचे जाळे पसरलेले आहे. या अनेक भेदांनी बहुजन समाजास या देशात राजकीय अस्तित्वच नाही असे म्हटले असता चालेल. याप्रमाणे कायदे कौन्सिलात, किंबहुना सरकारदरबारात ज्या लोकांचा प्रवेश होऊ शकतो अथवा होत आहे, त्या लोकांच्या आणि बहुजन समाजाच्या चालीरीती व आचार-विचार यांमध्ये महदंतर असल्यामुळे कौन्सिलात सभासदांस या मुक्या समाजाची ओरड ऐकू जावी कशी, आणि त्यांनी सरकारपाशी या मुक्या समाजाचे पोट दुखते आहे म्हणून ओवा मागावा कसा, हा एक मोठा प्रश्न आहे. याचे कारण काय? याचे कारण हेच की, ‘तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येरागबाळाचे काम नाही, न ये नेत्रांजळ, नाही अंतरी कळवळा.’

तानुबाईंनी समाजातील विषमतेवर प्रहार करून त्याची चांगलीच चिरफाड आपल्या अग्रलेखातून केली. ‘सत्ता चिरंतन राहावी म्हणून चार वर्णाचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीला राजघराण्यांनी आपलेसे केले. त्यामुळे समाजात विषमता निर्माण झाली.’ मात्र, गौतम बुद्धाच्या कालखंडात समता प्रस्थापित झाल्याचे नमूद करून त्यांनी पुढे म्हटले आहे- ‘शंकराचार्यानी मंडनमिश्रावर मिळवलेल्या विजयानंतर पुनश्च वेदांत बोकाळला. ब्राह्मण हा देवांचाही देव समजला जावा, अशा प्रकारची योजना ब्राह्मण हिंदू शास्त्रकारांनी करून ठेवलेली आहे. परंतु फार पुढे इंग्रजांचे राज्य देशावर चालून आले. इंग्रजांनी समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी केलेल्या सुधारणांचा आढावा घेऊन याविरोधात येथील उच्चवर्णीयांनी समान हक्कांची मागणी करून स्वहितासाठी ‘राष्ट्रीय सभा’ (काँग्रेस) स्थापन केली.’ यावरून तानुबाईंची तत्कालीन सामाजिक व राजकीय परिस्थितीची जाण ध्यानात येते. वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याची तळमळ व आच लक्षात येते.

३ ऑगस्ट १९१२ च्या अंकात राजापूरकर नाटक मंडळीच्या ‘संत तुकाराम’ या नाटय़प्रयोगाची महिती दिलेली आहे. ‘हे नाटक पाहिल्यावर तत्कालीन ब्राह्मणेतरांची परिस्थिती, तुकारामांचे चरित्र याबाबत माहिती मिळते,’ अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. हे नाटक बाबाजीराव दौलतराव राणे यांनी लिहिले होते.  राणे यांनी या नाटकात तुकारामांचे विद्रोही स्वरूप चित्रित केले आहे. नववसाहत काळातील सत्यशोधकी आशयाचे हे नाटक असल्यामुळे ‘दीनबंधू’ने त्याची दखल घेतली. समकालीन पत्रकारितेत सत्यशोधकी नाटकांबद्दलच्या अभिप्रायांना जागा मिळत नसावी. बाबाजी दौलतराव राणे (१८७४ ते १९१३) यांची बरीच नाटके त्या काळात महाराष्ट्रभर लोकप्रिय ठरली होती.

तानुबाई बिर्जे यांची संपादकीय कारकीर्द उण्यापुऱ्या चार वर्षांची (१९०८-१९१२) आहे. १९१३ साली त्यांचे निधन झाले. बहुजन समाजातील एका स्त्रीचे हे कर्तृत्व फारसे प्रकाशात आले नसावे असे वाटते. पुढील काळात शांताबाई कशाळकर, मालतीबाई तेंडुलकर, अवंतिकाबाई गोखले, माई वरेरकर अशा काही स्त्रिया संपादन क्षेत्रात आढळतात. तानुबाईंच्या आगेमागे बेळगावच्या गंगुबाई पाटील यांच्या ‘सरस्वती’ मासिकाच्या संपादनकामाचा पुसटसा उल्लेख आढळतो.

डॉ. श्रीराम गुंदेकरांनी तानुबाईंबद्दल लिहिताना म्हटले आहे की, ‘त्या ब्राह्मणेतर पत्रकारितेतील पहिल्या स्त्री-संपादक आहेत. कदाचित मराठी पत्रकारितेतील पहिलेपणाचा मानही त्यांच्याकडे जाऊ शकेल.’ (सत्यशोधकी साहित्याचा इतिहास, खंड पहिला. १ मे २०१०)

Story img Loader