डॉ. विठ्ठल वाघ

सर्वसामान्यांना तत्त्वज्ञान हा गूढ, रूक्ष, बोजड विषय वाटतो, तसा तो असतोदेखील. पण तोही किती काव्यात्म पद्धतीने लीलया मांडता येतो, याचा प्रत्यय शरद ‘रेशमेय’ यांच्या ‘ताओगाथा’ या पुस्तकामुळे येतो. ‘ताओ’चा अर्थ आहे मार्ग. पण त्याचा अर्थ केवळ पंथ किंवा रस्ता एवढाच मर्यादित नसून हे विश्व चालण्यामागे जे अविनाशी तत्त्व, ऊर्जा, शक्ती अथवा नियम आहेत, ते म्हणजे ताओ! यालाच उपनिषदे ‘ब्रह्म’ म्हणतात, गौतम बुद्ध ‘धम्म’ म्हणतात, तर जग ईश्वर म्हणते. ताओगाथा त्याचे वर्णन असे करते :

‘ताओ हेचि ब्रह्म। ताओ हाचि धम्म। ताओ हेचि प्रेम। चिरंतन।।

जन अगणित। ईश ज्या म्हणती। नावांची गणती। त्याच्या नाही।।’

सर्वसामान्य मराठी माणसाला त्याच्या भाषेत ताओ तत्त्वज्ञानाचा परिचय करून द्यायचा आणि आपल्याला आलेला ‘एकं सत् विप्रा, बहुधा वदन्ति..’चा प्रत्यय त्यांच्यासोबत वाटायचा हा आपला उद्देश असल्याचे रेशमेय त्यांच्या प्रस्तावनेत म्हणतात. एका सहकारी महिलेने ‘ताओ ऑफ लीडरशिप’ हे पुस्तक त्यांना दिलं. त्या पुस्तकाने त्यांना झपाटून टाकलं. हे पुस्तक प्राचीन चिनी विचारवंत लाओ त्झु याच्या २५०० वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘ताओ ते चिंग’ या पुस्तकावर आधारित होतं. हे तत्त्वज्ञान अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं म्हणून शोध घेतला असता या ग्रंथाच्या आठ भाषांतरांचा समांतर संग्रह त्यांना सापडला. हे तत्त्वज्ञान गूढ मानलं गेलं असलं तरी ते मराठी माणसाला कळायला हवं म्हणून ते साध्या, सोप्या भाषेत मांडायला हवं, मराठमोळ्या रंगाढंगानं यायला हवं असं त्यांना वाटलं.

मराठी संतांनी ओवी-अभंगांतून आपलं विचारधन प्रासादिक, सोप्या भाषेतून मांडलं. आपणही ‘भाष्यकारांते वाट पुसतू..’ जाऊन अभंगच वापरावा असं कवीला वाटलं. तुकाराम सोपा सुटसुटीत असल्याने आजही जनमानसात रुळलेला आहे. ज्ञानोबांचे ‘हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी..’ अजूनही गावोगावी म्हटले जाते. आधुनिक काळात मधुकर केचेंनी अभंगाचे पुनरुज्जीवन केले. त्यानंतर इतक्या सशक्तपणे अभंगशैलीचा वापर रेशमेय यांनीच केलेला आढळून आला.  पौर्णिमेचे चांदणे आपल्या ओंजळीत सहजपणे पडावे तसा ताओ या अभंगांतून आपल्या मनात सहजासहजी पाझरू लागतो. कुठेही क्लिष्टता, गूढता, दुबरेधतेचे धुके नाही.

आपल्याला सांगायचं आहे ते सामान्यालाही सहज कळायला हवं ही अंतरी तळमळ असेल तरच असं सोपं लिहिलं जाऊ  शकतं. हे करतानाही एक अडचण उभी राहतेच. आपल्याला जाणवलं, भावलं ते जसंच्या तसं शब्दांत मांडता येईलच असं नसतं. रेशमेयांना याची पूर्ण जाणीव आहे. त्यांच्या मते, ताओ हे एक असीम, अफाट आभाळ आहे. ते आपल्या मुठीत कसं येणार? घराच्या कौलातील कुणा छिद्रातून आभाळ दिसतं, तेवढाच ताओ आपण बघतो. त्याहून त्याची व्याप्ती कितीतरी- अगदी आभाळाएवढी – मोठी आहे. ‘ताओगाथा’ वाचल्यावर कळतं, की रेशमेयांनी हे आभाळ आपल्या प्रतिभेनं लीलया पेललेलं आहे. एवढंच नव्हे तर त्याला मराठी साजशृंगारही चढवलेला आहे.

मराठी संतांनी अद्वैत तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला आहे. ‘ताओगाथा’देखील याच अद्वैताची मांडणी अशा प्रकारे करते :

‘ताओसी पातला।

ताओ तोचि झाला।

साक्षात्कार त्याला।

अद्वैताचा।।’

कुरूप-सुंदर, चांगले-वाईट, पुण्य-पाप.. दिसायला भिन्न; पण ताओगाथा म्हणते-

‘दोहोंचे अस्तित्व।

एकमेकांमुळे।

परस्परां बाळे।

जन्म देती।।’

संत वाङ्मयात कर्मयोगी, स्थितप्रज्ञ, ज्ञानी यांची जी लक्षणे सांगितली आहेत, ती सारी ‘ताओगाथा’त आलेली आहेत. ज्ञानाविषयी त्यात म्हटले आहे-

‘जे काही वाचले। आणिक ऐकिले। भोगिले देखिले। जीवनात।

त्याचे रुपांतर। होते ते ज्ञानात। व्यक्तीच्या मनात। संचय हो।।’

मात्र ते खरे ज्ञान नसून छद्मज्ञान आहे! ज्ञान हे स्वानुभवातून येते-

‘‘स्व’ला जो जाणतो। तोच खरा ज्ञानी।

बाकी अभिमानी। रमणारे।।’

ज्ञानी हा फलाशा न ठेवता निष्काम कर्म करीत असतो. कसलीही अपेक्षा न ठेवता कर्म केल्याने त्याचे मन विकाररहित, पूर्णत: रिते असते, शांत असते. आसक्ती आहे तिथेच भय, भीती, अस्वस्थता आहे. म्हणून ज्ञानी अनासक्त असतो. ताओचा ज्ञानी पुरुष भूत आणि भविष्यकाळात जगत नाही. तो वर्तमानात जगतो. ‘रेशमेय म्हणे। जगा वर्तमान। आनंदभुवन। दुजे कोठे?’ ते इथेच आहे. ताओतून आलेला ज्ञानी पुरुष समदृष्टी ठेवतो. आपला-परका असा भेद मानत नाही. त्याचा भर परस्परांतील प्रेमावर असतो. ‘त्यास हेचि ठावे। देतचि रहावे। प्रेमातचि न्हावे। जग सारे।’ आपले संतही याहून वेगळे पसायदान मागत नाहीत.

भारतीय संस्कृती आणि परंपरा परोपकारावर भर देते, ताओही देतो : ‘रेशमेय म्हणे। कोणी कैसा पर। सारे विश्व जर। जोडलेले।।’ भारतीय आणि चिनी अंतरातील ही विश्वात्मकता दोन्ही देशांतील अद्वैतच दर्शवीत असते.

शासक, राज्यकर्ते आणि राजधर्म कसा असावा याचंही विवेचन ‘ताओगाथा’त आहे. लहान राज्यांचा पुरस्कार ताओ हितावह मानतो. आर्य चाणक्याची आठवण यावी असा चतुर तरीही सरळ, साधा राजधर्म येथे पाहावयास मिळतो. आदर्श शासकाबद्दलचे पुढील अभंग मासलेवाईक ठरतील :

‘प्रजेप्रती आहे। प्रेम का अमाप।

धूर्ततेचे पाप। नाही मनी?

त्यांच्यासाठी सारी। कार्ये तो करितो।

नच अपेक्षितो। श्रेय कधी।।

सैन्याच्या तंबूंनी। भूमी जेथे रंगे।

तेथे निवडुंगे। उगविती।।

म्हणून भीतीचा। वापर ना करी।

हृदयात धरी। विवेकासी।।’

या गाथेतून प्रकट होणारं अवघं ताओ तत्त्वज्ञान हे कल्याणकारी, मानवतावादी, मानवी हिताचं आहे. शिवाय जगण्याची उचित दिशा दाखविणारंही आहे. तिच्या वाचनाने आलेला अनुभव अभंगाच्याच रूपात व्यक्त करावास वाटतो-

‘शरदा लाभले। प्रतिभेचे देणे। ताओगाथा लेणे। साकारले।। चीनी मातीला दे। मराठी आकार। तोच विश्वाकार। होत जाय।।’

‘ताओगाथा’- शरद ‘रेशमेय’,

पद्मगंधा प्रकाशन,

मूल्य- २०० रुपये.

Story img Loader