‘द बुद्ध अ‍ॅण्ड हिज धम्म’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अखेरचा इंग्रजी ग्रंथ त्यांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ महाविद्यालयाने १९५७ साली प्रकाशित केला. त्यात ‘उपोद्घात’ म्हणून डॉ. आंबेडकरांनी लिहिलेला मजकूर पहिल्या आवृत्तीत छापला नव्हता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९९२ साली महाराष्ट्र शासनाने आंबेडकर वाङ्मयाचा ११ वा खंड म्हणून हा ग्रंथ पुनर्मुद्रित केला. त्यातही डॉ. आंबेडकरांच्या हातचा उपोद्घात समाविष्ट केलेला नाही. पण भगवानदास यांनी सप्टेंबर १९८० मध्ये प्रकाशित केलेल्या ‘रेअर प्रीफेसेस’ या इंग्रजी पुस्तिकेत १५ मार्च १९५६ या तारखेस डॉ. आंबेडकरांनी तयार केलेला उपोद्घात छापलेला आढळतो. उपोद्घाताच्या या पहिल्या मसुद्यात डॉ. आंबेडकरांनी ५ एप्रिल १९५६ रोजी काही दुरूस्त्या केल्या. ५ डिसेंबर १९५६ च्या रात्री- म्हणजे मृत्यूपूर्वी काही तास आधी डॉ. आंबेडकरांनी काही किरकोळ दुरूस्त्या करून मसुद्यास अंतिम रूप दिले. डॉ. आंबेडकरांच्या पत्नी डॉ. सविता आंबेडकर यांनी आत्मकथेत हा उपोद्घात छापलेला आहे. (‘डॉ. आंबेडकरांच्या सहवासात’- सविता आंबेडकर- १९९०.. पृ. २७९-२८३)

६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. आंबेडकरांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी भदंत आनंद कौसल्यायन दिल्लीतील डॉ. आंबेडकरांच्या निवासस्थानी गेले तेव्हा मेजावर ‘द बुद्ध अ‍ॅण्ड हिज धम्म’ या ग्रंथाचा डॉ. आंबेडकरांनी दुरूस्त केलेला उपोद्घात (भूमिका) त्यांना आढळला. (‘बोधि-द्रुम के कुछ पन्ने’- भदंत आनंद कौसल्यायन.. १९८६, पृ. ४८)

डॉ. आंबेडकरांनी हस्ताक्षरात दुरूस्त केलेला मूळ इंग्रजी उपोद्घात उपलब्ध असतानाही डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सूत्रधारांनी तो पहिल्या आवृत्तीत आणि नंतरच्या आवृत्त्यांत, तसेच हिंदी व मराठी अनुवादातही छापला नाही.

डॉ. आंबेडकरांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी डॉ. सविता ऊर्फ माईसाहेब आणि डॉ. आंबेडकरांचे एकुलते एक पुत्र यशवंत ऊर्फ भय्यासाहेब यांच्यामधील गृहकलह वाढीस लागला. डॉ. आंबेडकरांच्या हयातीतच त्यांचा पुत्र आणि त्याची सावत्र आई यांच्यामध्ये तेढ निर्माण झाली होती. ‘डॉ. आंबेडकरांचे आकस्मिक निधन झाले ते त्यांच्यावर विषप्रयोग केला गेल्यामुळे..’ असे आरोप केले जाऊ लागले. हा आरोप म्हणजे डॉ. आंबेडकरांच्या भक्तगणांपैकी एका गटाने पद्धतशीररीत्या डॉ. सविता (माईसाहेब) आंबेडकरांविरुद्ध चालवलेल्या मोहिमेचा भाग होता. डॉ. आंबेडकरांचा मृत्यू नैसर्गिक होता किंवा नाही, याविषयी संसदेतही प्रश्न विचारण्यात आल्यामुळे भारत सरकारने या प्रकरणाची चौकशी केली. डॉ. आंबेडकरांचा मृत्यू विषप्रयोगामुळे किंवा कटकारस्थानामुळे झाला नसून तो नैसर्गिक होता, असा या चौकशी अहवालाचा निष्कर्ष होता.

ही पाश्र्वभूमी लक्षात घेतली तर डॉ. आंबेडकरांनी इंग्रजीत लिहिलेला उपोद्घात ‘द बुद्ध अ‍ॅण्ड हिज धम्म’ या ग्रंथात समाविष्ट करण्याऐवजी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष न्या. आर. आर. भोळे यांनी पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत त्यातील एक-दोन परिच्छेदांचा आधार घेऊन बाकी महत्त्वाचा मजकूर का गाळला असावा, याचे काहीसे स्पष्टीकरण देता येते.

मूळ इंग्रजी उपोद्घातामध्ये ऋणनिर्देश करताना डॉ. आंबेडकरांनी लिहिले होते, ‘या ग्रंथाच्या लेखनाचे काम सुरू केले तेव्हा मी आजारी होतो आणि आजही आजारीच आहे. गेल्या पाच वर्षांत माझ्या प्रकृतीत बरेच चढउतार झालेले आहेत. काही वेळा माझी प्रकृती इतकी चिंताजनक झाली होती, की ‘मालवती प्राणज्योत’ अशा शब्दांत माझ्याबद्दल डॉक्टर बोलत असत. ही मालवती प्राणज्योत आजतागायत तेवत राहिली ती माझी पत्नी व डॉ. मालवणकर यांच्या कौशल्यामुळे. डॉ. मालवणकर माझ्यावर वैद्यकीय उपचार करीत असतात. माझी पत्नी व डॉ. मालवणकर या दोघांचाही मी अत्यंत ऋणी आहे. त्यांनीच मला ग्रंथलेखनाचे काम पूर्ण करण्यास मदत केली.’

डॉ. सविता ऊर्फ माईसाहेब आंबेडकर यांच्या आठवणींनुसार, ५ डिसेंबर १९५६ च्या रात्री- म्हणजे निधन झाले त्याआधी काही तासच अगोदर डॉ. आंबेडकरांनी टंकलिखित उपोद्घातात भर घातली होती.. तीही त्यांच्या हस्ताक्षरात. गृहकलह लक्षात घेता डॉ. आंबेडकरांनी लिहिलेला उपोद्घात १९५७ सालच्या पहिल्या आवृत्तीत समाविष्ट केला गेला असता तरच ते नवल ठरले असते. मात्र, चौकशी अहवालाचे निष्कर्ष जाहीर झाल्यावरही तो उपोद्घात नंतरच्या आवृत्त्यांत, तसेच अनुवादात छापला गेला नाही हे गैरच झाले असे अभ्यासकांना वाटते.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The buddha and his dhamma dr b r ambedkar