सत्तरच्या दशकाचा उत्तरार्ध आणि ऐंशीच्या दशकात समांतर हिंदी सिनेमातल्या वेगळ्या धाटणीच्या भूमिका आणि सहजसुंदर अभिनय यामुळे िहदी चित्रपटसृष्टीवर आपला वैशिष्टय़पूर्ण ठसा उमटवणाऱ्या दीप्ती नवल यांनी आपली संवेदनशीलता लेखनाद्वारेही प्रकट केली आहे. ‘लम्हा लम्हा’ आणि ‘द ब्लॅक विंड अ‍ॅण्ड अदर पोएम्स’ या दोन कवितासंग्रहांनंतर ‘द मॅड तिबेटियन – स्टोरीज फ्रॉम देन अ‍ॅण्ड नाऊ’ हा त्यांचा इंग्रजी कथासंग्रह २०११ साली प्रकाशित झाला. त्याचा मराठी अनुवाद अलीकडेच प्रसिद्ध झाला आहे. ‘द मॅड तिबेटियन- गोष्टी तेव्हाच्या आणि आत्ताच्या!’ हा अकरा कथांचा संग्रह आहे. खरं तर रूढार्थानं या कथा नाहीतच. एखाद् दुसऱ्या कथेचा अपवाद वगळता फार ठळक, सशक्त असं कथाबीज नाही, वेगवान घटनाक्रम नाही, प्रचंड नाटय़मयता नाही. हे आपले स्वत:चे आणि आपल्या जवळच्या मंडळींचे अनुभव आहेत, असं लेखिकेनं स्वत:च सांगितलं आहे. त्यामुळेच पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एरवी असतं तसं एखाद्या कथेवर आधारलेलं रेखाटन नसून दीप्ती नवल यांचं स्वत:चं छायाचित्र आहे. त्यांच्या संवेदनशील मनानं टिपलेले जगण्याचे रंग या कथांमधून उमटले आहेत.

‘बलराज सहानी’, ‘द.. द.. दामन’ किंवा ‘पाखरं’, ‘द मॅड तिबेटियन- न्योनबा’, ‘थुल्ली’ या दीप्ती नवल यांच्या आठवणी आहेत. त्यामुळे स्वत:च्या नावाचा उल्लेख करत त्या प्रथमपुरुषी  एकवचनी रूपातच लिहिल्या आहेत. चारेक वर्षांपूर्वी एका विदेशी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत या पुस्तकातल्या कथांमागची प्रेरणा स्पष्ट करताना त्या म्हणाल्या होत्या.. ‘‘काही कल्पना मांडायला कविता अपुरी पडते. काही अनुभव सगळ्या तपशिलांनिशी विस्तारपूर्वक व्यक्त करावेसे वाटतात. अशा वेळी कथेचा फॉर्म माझ्या मदतीला आला.’’ खूप खोलवर जाणवलेल्या, सतत झिरपत राहिलेल्या, बोचलेल्या, लागलेल्या, पोळलेल्या अशा अनेक अनुभवांची, पाहिलेल्या/ ऐकलेल्या प्रसंगांची त्यांनी अनेक र्वष टिपणं करून ठेवली होती. त्याआधारे लिहिलेल्या या कथा आहेत.

Numerology number 8
Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते शनीची कृपादृष्टी, मान-सन्मानासह कमावतात प्रचंड संपत्ती; भाग्यापेक्षा असतो कर्मावर विश्वास
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
Paithani web series on Zee 5 OTT entertainment news
आई मुलीच्या नात्याची ‘पैठणी’
Musical dance drama Urmilayan Aryans Group of Companies Kamesh Modi
सांगीतिक नृत्यनाट्य ‘ऊर्मिलायन’

या कथा फक्त सुखान्त सांगणाऱ्या, आशावादी नाहीत. अवतीभोवतीच्या जगण्यातलं अगदी लहानसं वास्तवही पुष्कळदा आपल्या आत खोलवर रुतून बसतं. दुर्लक्ष करताच येत नाही त्याच्याकडे. कधी ते आपल्या घराच्या कोपऱ्यात घरटं बांधून राहणाऱ्या पक्ष्यांशी बांधलेलं असतं, कधी खूप वर्षांनी रस्त्यात भेटलेल्या शाळेतल्या मत्रिणीच्या नावाशी जोडलेलं असतं, तर कधी ते माणसाच्या मनातल्या आदिम वासनेचा उग्र आविष्कार प्रकट करणारं असतं. कधी ते दुखावणारं असतं, कधी कळ उठवणारं असतं, कधी खंतावून सोडणारं असतं, तर कधी एखाद्याला आपल्यामधल्या पुरुषाची किंवा स्त्रीची नवी ओळख करून देणारं असतं. अशा लहान लहान वास्तवांची चिमूट या कथांमधून नवल यांनी पकडली आहे. सुस्थिर, संपन्न आयुष्य जगतानाही अवतीभोवतीचा काळोख या संवेदनशील लेखकाला जाणवतो, अस्वस्थ करतो. आपल्या आयुष्यातला उजेड बाजूला ठेवून इतरांच्या जगण्यातला हा अंधार दीप्ती नवल यांनी त्याच्यावरचे पापुद्रे बाजूला करत अतिशय उत्कटतेनं या कथांमधून मांडलेला आहे. या मांडणीत साचेबद्धपणा नाही; पण फार मोठी आशयघनताही नाही. त्यांची शैली प्रवाही आणि चित्रमय आहे. शहरी आयुष्याचं वर्णन असू दे, बसमधून दिसणाऱ्या निसर्गाचं वर्णन असू दे, किंवा पात्रांच्या रूप-रंगाचे तपशील असू देत; कथेतलं निवेदन वाचकाला गुंतवून ठेवणारं आहे. नवल यांच्या या कथांचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्या जिथे जिथे िहडल्या आहेत, तो- तो प्रदेश त्यांनी या कथांमधून जिवंत उभा केला आहे. मुंबईतल्या कामाठीपुऱ्यापासून लडाखपर्यंत आणि दिल्लीपासून मॅनहॅटनपर्यंत अनेक ठिकाणं त्यांनी कथेतल्या पात्रांइतक्याच उत्कटतेनं शब्दबद्ध केली आहेत.

‘थुल्ली’, ‘द मॅड तिबेटियन’ या कथांमध्ये नवल यांनी जे अनुभव रेखाटले आहेत ते जगावेगळे म्हणावेत असे नाहीत; पण जगण्याकडे, भवतालाकडे आणि कुठल्याही नात्याखेरीज समोर येणाऱ्या माणसांकडे आतल्या ओल्या नजरेनं पाहणारी नवल यांच्यातली स्त्री या अनुभवांमधून प्रकर्षांनं समोर येते. आपल्या नजरेवरचे आणि मनावरचेही सगळे भलेबुरे लेप उतरवून समोर आलेल्या माणसांकडे पाहणारी त्यांची दृष्टी या कथांमधून अधोरेखित झाली आहे. ‘मुंबई सेन्ट्रल’ आणि ‘रूथ मेबेरी’ या कथांमध्ये मात्र एक विलक्षण वेग आणि नाटय़मयता आहे. वासनेला धुमारे फुटायच्या आतच तिचा अकल्पित अनुभव अंगावर येऊन कोसळल्यामुळे जगाशी दोन हात करायला सज्ज झालेला एक १९-२० वर्षांचा तरुण ‘मुंबई सेन्ट्रल’ या कथेत भेटतो. तर एका अपयशी पटकथाकार स्त्रीची घुसमट आणि नियतीनं तिच्याशी केलेला करुण खेळ ‘रूथ मेबेरी’ या कथेत दिसतो. ‘पियानो टय़ूनर’ ही पहिलीच कथा तर एखादा संथ, शांत मूकपट पाहावा, तशी एकेका दृश्यातून वाचकाच्या डोळ्यांसमोर उलगडत जाते.

या सगळ्याच कथांमधल्या व्यक्तिरेखा अतिशय वास्तव आहेत. त्यांच्या भलेपणाचं ग्लॅमरायझेशन जसं या कथांमध्ये नाही, तशीच जीवघेणी नकारात्मकताही त्यात नाही. इथला काळोख निल्रेप असला तरी तो िहस्र जनावराप्रमाणे अंगावर येणारा नाही. तो वाचकाला जगण्याच्या अधिक जवळ नेणारा आहे. त्याची जगण्याविषयीची समजूत वाढवणारा आहे. एकूण या सगळ्या कथांमध्ये- मग त्या प्रथमपुरुषी एकवचनी असोत किंवा तृतीयपुरुषी असोत- दीप्ती नवल यांच्या उत्कट संवेदनशीलतेचं अस्तर त्यांना आहे याची जाणीव वाचकाला अखंड होत राहते.

सुनंदा अमरापूरकर यांनी या कथांचा मराठीत अनुवाद केला आहे. एक-दोन ठळक चुका वगळता अनुवाद उत्तम उतरला आहे. फक्त आभार प्रदर्शनाच्या मोजून चार ओळींना ‘अनुवादिकेचे मनोगत’ हे शीर्षक का दिलं असावं, हे कळत नाही.

या पुस्तकातील शेवटच्या कथेतला निवेदक म्हणतो तसं- ‘‘काही गोष्टी सांगण्यासाठी नसतात. काही कहाण्या कधीच कुणी कुणाला सांगत नाही. त्या फक्त घडतात.’’अशा आपल्या अवतीभोवती नेहमी घडणाऱ्या सर्वसामान्य घटना, अनुभवांना आपल्या भावनेचं बोट लावून वर उचलून धरणाऱ्या या कथा वाचकांना नक्की आवडाव्यात!

द मॅड तिबेटियन- गोष्टी तेव्हाच्या आणि आत्ताच्या!’ – दीप्ती नवल,

  • अनुवाद- सुनंदा अमरापूरकर,
  • मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे</li>
  • पृष्ठे- १३०, मूल्य- १५० रुपये.