‘ओल्ड लेडी ऑफ थ्रेडनीडल स्ट्रीट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगातल्या सर्वात पहिल्या मध्यवर्ती बँकेचा- ‘बँक ऑफ इंग्लंड’चा रंजक इतिहास..
नावात ‘ओल्ड लेडी’ आहे म्हणून दुर्लक्ष नका करू. तिच्याबद्दल जाणून घेणं खूप रोचक आहे. हे टोपणनाव आहे ३०० वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या जगातल्या सर्वात पहिल्या मध्यवर्ती बँकेचं.. ‘बँक ऑफ इंग्लंड’चं! आपली जशी रिझव्र्ह बँक आहे, तशी ही इंग्लंडची. पण आपली आहे ‘यंग लेडी’.. अवघे ऐंशी वयोमान.
..तर साल १६९४! म्हणजे साधारण शिवाजी महाराजांच्या थोडासा नंतरचा काळ. इंग्लंडचा राजा तिसऱ्या विल्यमचा फ्रान्सने दारुण पराभव केला होता. आपलं नौदल सुधारलं तरच भविष्यात आपला निभाव लागेल असं राजाला वाटलं. पण त्यासाठी खूप मोठय़ा रकमेची गरज होती. राजाकडे एवढा पैसा नव्हता. कर्जाऊ रक्कम मिळवण्याएवढी बाजारात त्याची पतही नव्हती. म्हणून ही बँक स्थापन करायचं त्यानं ठरवलं. खाजगी भागधारकांच्या या बँकेला चांगला प्रतिसाद मिळाला आणि अवघ्या चार आठवडय़ांत हवी असणारी रक्कम जमा झाली. भागधारकांना आठ टक्के लाभांश देण्याचे ठरले. आणि ही बँक सरकारी झाली. राजानं (सरकारनं) बँकेला सोन्याच्या नाण्यांच्या बदल्यात चलनी नोटा इश्यू करण्याचे अधिकार दिले. बँकेनं राजाला अर्थसहाय्य दिलं. त्या जोरावर राजाने नौदल सक्षम केलं. अनुषंगानं शेती व उद्योगधंद्यांचीही भरभराट झाली. इंग्लंड बलशाली बनलं. सरकारची बँक, आर्थिक विकासाला चालना आणि चलनी नोटांचं वितरण या आधुनिक काळातल्या मध्यवर्ती बँकेच्या कार्याची बीजं इंग्लंडमध्ये १७ क्लार्क आणि दोन चपराशांनिशी सुरू झालेल्या या बँकेनं अशा तऱ्हेने सुमारे सव्वातीनशे वर्षांपूर्वीच रोवली.
सोन्याच्या किंवा चांदीच्या नाण्यांच्या बदल्यात त्याकाळी ज्या नोटा इश्यू केल्या जात ती प्रत्येक नोट हाताने लिहिलेली असे. आणि तीवर कॅशिअर सही करत असे. त्या काळात सर्वात लहान नोट होती पन्नास पौंडांची! अर्थात तेव्हा तिथल्या जनतेचं सर्वसाधारण वार्षिक उत्पन्न होतं फक्त वीस पौंड. त्यामुळे कित्येकांना उभ्या आयुष्यात एकदाही ही नोट हाताळायला मिळत नसे.
नंतरच्या काळात अंशत: छापील नोटा आल्या. १७४४ साली पहिली शंभर टक्के छापील नोट बाजारात आली. कालांतरानं गरजेनुसार तीत अनेक बदल होऊन आपण आजच्या आधुनिक चलनी नोटेपर्यंत येऊन पोहचलो आहोत. त्याकाळी चलनी नोटा बँक ऑफ इंग्लंडबरोबर इतर बँकाही इश्यू करत असत. पण हळूहळू इतर बँकांचे नोटा इश्यू करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले आणि ती बँक ऑफ इंग्लंडची मक्तेदारी झाली.
लंडनच्या सिटी ऑफ लंडन या प्रभागात १७३४ पासून या बॅंकेचे मुख्य कार्यालय आहे आणि हा सारा परिसर ही बँक म्हणूनच ओळखला जातो. इथे बँक नावाचं एक खूप मोठं टय़ूब स्टेशनही आहे. बॅंकेची इमारत एखाद्या गढीसारखी आहे. तिच्या चारही बाजूला ठराविक अंतरावर मोठमोठय़ा रुंद खांबांची तटबंदी आहे. आणि तिला रस्त्यावर उघडणारी एकही खिडकी नाही. इमारतीच्या चारही बाजूंना प्रत्येकी एक असे आपल्याकडे किल्ल्याला असतात तसे बुलंद दरवाजे आहेत. त्यामुळे बाहेरून आत काय असेल याची जराही कल्पना येत नाही. आत बँकेचं सात-मजली कार्यालय आहे. विशेष म्हणजे इथल्या व्हॉल्टमध्ये इंग्लंडचं आणि इतर काही देशांचं सुमारे ४७०० टन सोनं बारच्या रूपात सुरक्षित आहे. एखाद्या मॉलमध्ये चॉकलेटचे बार ठेवावेत तसे प्रत्येकी १२.४ किलो वजनाचे हे बार शेल्फवर विराजमान आहेत. सुरक्षेच्या कारणासाठी या व्हॉल्टचे कर्मचारी कोण आहेत, याचीही गुप्तता राखली जाते. अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा इथे तैनात आहे. एक मजेशीर गोष्ट म्हणजे या व्हॉल्टच्या चाव्या सुमारे तीन फूट लांब आहेत. लंडनच्या अतिशय गजबजलेल्या भागात या इमारतीच्या तळघरात ही एक अतिशय अवाढव्य अशी सोन्याची खाणच आहे म्हणा ना! तुलनेसाठी सांगता येईल की, भारताकडे आहे फक्त (?) ५५७ टन सोनं! आपणापैकी काहींना आठवतही असेल की १९९१ च्या आर्थिक आणीबाणीत परकीय चलन मिळवण्यासाठी आपणही आपलं सुमारे ४० टन सोनं बँक ऑफ इंग्लंडकडे तारण ठेवलं होतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा