‘The Time of the Assassins’ या हेन्री मिलर यांच्या ललितबंधाचा ज्येष्ठ नाटककार- साहित्यिक महेश एलकुंचवार यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला प्रवाही अनुवाद..
परमेश्वरी वरदहस्त मिळालेले सर्वत्रच सुखी असतात. त्यांना नरक म्हणजे काय, माहीत असतं. पण त्याला पृथ्वीवर राहत असतानासुद्धा ते कायमची अवस्था समजत नाहीत. ते मुक्तात्मे असतात. अस्तित्वांच्या दोन अवस्थांमधल्या मध्यंतरातही ते आनंदातच असतात. पण ज्यांनी बंधनं नाकारली आहेत अशी माणसं तडफडतच असतात. काळाच्या आणि त्याच्या लयीच्या बाहेर ते जन्मतात आणि ह्य मधल्याच अवस्थेला नरक समजतात. रँबो ह्य़ातलाच होता. ज्या असहनीय कंटाळ्याचा भोगवटा तो भोगत होता, तो कंटाळा ज्या शून्य पोकळीत तो जगत होता त्याचंच प्रतिबिंब होता. आता ही पोकळी त्यानंच निर्माण केली होती की नाही, हे इथे गरलागू आहे. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे इथं. रँबो आपल्या शक्तींचा उपयोग करू शकला नाही. हे अर्धसत्य असेल; पण आपल्या शक्तींचा उपयोग न करता येणं हे एक ऐतिहासिक सत्य आहे, आणि इतिहास माणसाची नियती घडवतो.
जीवनाच्या खोल, गुप्त सरितेमधून थोर आत्मे अधूनमधून वर येतात, समोर काय धोका, संकटं आहेत त्याची जाणीव करून देतात. पण त्याचा काही उपयोग होत नाही. ही महाकाय माणसं त्यांना आवरता येत नाही अशा वादळी भावनांनी झपाटलेली असतात आणि रात्रीच्या अंधारात राखणदारांसारखी अकस्मात् उद्भवतात. पण त्यांचा आवाज कोणी ऐकत नाही. अगदी तळच्या मन:स्थितीत तो असताना झोपेत बरळावं तसा रँबो म्हणतो, ‘‘पुन्हा हे आयुष्य!’’ आयुष्य तर आहेच हे, शंकाच नाही; फक्त आयुष्याच्या दुसऱ्या नाण्याची बाजू पाहतोय तो. आणि कितीही टिंगलीचा सूर त्यानं लावला, तरी काहीतरी सत्य त्याच्याजवळ आहे; त्याच्यासहच त्याला जगायचं आहे, आणि त्याचं स्वरूपही त्याला समजून घ्यायचं आहे. आता दुसरं आयुष्य काही मिळणार नाही त्याला ह्य़ा आयुष्याशिवाय. मृत्यूच्या प्रदेशाच्या पलीकडूनच त्यानंच निवडलंय ते. तो जन्मला तेव्हाच त्याच्या आयुष्याचे घटकही ठरले गेले. त्यांच्यामुळेच त्याच्या नियतीला यातना येऊन मिळाल्या. त्याच्या आई-वडिलांची तशी इच्छा होती म्हणूनच फक्त तो दु:ख भोगत होता असं नाही; त्याच्या युगाचीच त्याच्याकडून ती मागणी होती म्हणूनच फक्त नाही; तर समस्त मानवजात ज्या उत्क्रांतीच्या अवस्थेतून जात आहे त्यामुळं. तो दु:ख भोगतो, कारण समस्त मानवजातच ते दु:ख भोगते आहे. बंजर जमिनीवर पडलेल्या बीजाचे भोग तो भोगतो.
असा सगळा विचार केला की वाटतं, की त्याच्या आयुष्याचा दुसरा भाग पहिल्या भागापेक्षा जास्त गूढ, रहस्यमय का वाटतो? माणसाची नियती त्याच्या स्वभावानंच नाही ठरत का? आपण आहोत तसे आपण घडतो. माणूस सुसंगतच वागतो. पण एरव्ही आदर्श वाटणाऱ्या आयुष्यात कुठल्यातरी बेसावध क्षणी तो काहीतरी भयंकर गुन्हा करून बसतो. (हे सुसंगतच असतं.) असले अपघात एखाद्याच्या जीवनात घडतात त्याला काही दैवी अर्थ आहे. आपण पाहतोच की नेहमी- की आदर्श माणसाच्याच हातून गर्हणीय गुन्हा घडतो.
त्याच्यातल्या वाईटाकडे रँबो आपलं लक्ष सारखं वेधून घेतो. ते अधोरेखितच करतो तो. त्याच्या आयुष्याच्या उत्तरार्धाबद्दल मी आधी बोललो तेव्हा त्याचं आयुष्य कॅलव्हरी आहे असं मी म्हटलं. इथं ख्रिस्ताला सुळी दिलं होतं ह्य टेकाडावर. रँबोला सुळी देण्यात आलं ते त्याच्यातल्या असाधारण गुणांमुळे नाही- त्यांच्या साहाय्यानं तो कुठल्याही अग्निदिव्यातून पार पडला असता- तर तो कायम आपल्या प्रेरणांना वश होतो, त्यांना मोकाट सोडतो म्हणून. प्रेरणांना शरण जाणं म्हणजे परित्याग असं रँबोला वाटायचं. त्याच्याऐवजी मग त्याचा उधळलेला वारुच लगाम हातात घेतो. पुन्हा योग्य मार्गावर यायचं म्हणजे आता कोण कष्ट! आता अंतहीन कष्ट. कशावर काही ताबा नसलेला साधा माणूस आणि तो ह्यच्यात काही फारसा फरक दिसत नाही. त्याच्यातला कवी तरीही डोकावतोच- जरी त्याची वाटचाल वेडय़ावाकडय़ा वळणांनी चाललीय. कुठल्या कुठल्या जागी तो स्वत:ला फरपटत नेतो बघा तरी. युरोपमधल्या सगळ्या बंदरांमधून तो ये-जा करतो, इकडे तिकडे, कधी सायप्रस, नॉर्वे, इजिप्त, जावा, अरेबिया, अबिसिनिया. त्याचे ध्यास, त्याचा अभ्यास, त्याची चिंतनं ह्यंचा विचार करा. सगळ्यांवर ‘एक्झॉटिक’ असा शिक्का मारलेला. त्याच्या कवित्वशक्तीच्या भरारीइतकेच त्याचे हे उद्योग धाडसी, पूर्वनियोजित नसलेले असे आहेत. त्याला स्वत:ला आपलं आयुष्य कंटाळवाणं, यातनामय वाटत असलं तरी ते गद्य कधी बनत नाही. कितीतरी नेमस्त नाकासमोर चालणारे लोक- कवींचं तर सोडाच- रँबोच्या धाडसी जगण्यासारखं जगता यावं म्हणून आपला हात किंवा पाय कापून देतील. आपल्या वीतभर बागेत रुटुखुटु करणाऱ्या फ्रेंचांना मात्र हा ठार वेडेपणा वाटला असणार. उपाशीपोटी सगळ्या जगभर पायपीट करणं म्हणजे भयानकच. त्यांना सगळंच आणखी भयंकर, आणखी वेडेपणाचं वाटलं असेल हे सगळं; जेव्हा त्यांना कळलं- ४०,००० फ्रँक्स लपवून ठेवलेला त्याचा कसा त्याच्या उपाशी पोटावर घासून घासून त्याला हगवण लागली होती. त्याचं सगळं करणं विचित्र, विक्षिप्त. त्याचं फिरणं म्हणजे स्वप्नांची एक साखळीच. हे खरंच, की त्यातही एक आवेग होता, विचित्र कल्पनाशक्ती होती; जी त्याच्या लेखनात दिसली की तिचं आपण कौतुक करतो. प्रश्नच नाही त्याबाबत. पण कवी म्हणून त्याच्यात जे एक प्रकारचं गारठलेपण होतं, ते त्याच्या ह्य़ा वागण्यातही दिसतं. त्याच्या कवितेतसुद्धा ही थंड आग आहे.. उब न देणारा प्रकाश. हा प्रसाद त्याला त्याच्या आईसाहेबांनी दिलेला. आणि आपल्या वागण्यानं त्या तो अधिकच चिघळवतात. तिला त्याचं वागणं कधी कळलं नाही. तिच्यासाठी तो म्हणजे एका प्रेमहीन लग्नबंधनातून केलेल्या क्रीडेचं वाईट्ट फळ होता. तिच्या कक्षेच्या बाहेर पडण्याचा त्यानं कितीही आटापिटा केला तरीही ती त्याला मागेच ओढते. वाङ्मयीन जगतातल्या प्रसिद्धीपासून तो स्वतला सोडवून घेऊ शकतो; पण आईपासून कधीही नाही. ती एखाद्या काळ्याकुट्ट ताऱ्यासारखी आहे आणि त्याचं त्याला विनाशी आकर्षण आहे. सगळ्यांना
तो विसरला तसं तिलाही तो पूर्णपणे का विसरला नाही? जो सोडून देता येणार नाही अशा
भूतकाळाचा ती दुवा होती, हे उघड आहे. खरं तर तीच साक्षात् भूतकाळ होते. त्याच्या वडिलांनाही भटकंतीचा हा रोग होता. आणि रँबो जन्मल्यानंतर ते जे भटकायला गेले ते पुन्हा परत आलेच नाहीत. पण त्यांच्या मुलाला मात्र घरापासून असं तोडून घेणं जमत नाही; मग तो कितीही दूर जावो. तो आता आपल्या वडिलांचं स्थान घेतो, त्यांच्याशी मनानं एकरूप होतो आणि आपल्या आईच्या कष्टभोगांमध्ये भर घालीत राहतो. तो भटकायला निघतो, भटकत मेंढपाळांच्या प्रदेशात येतो. इथंही तो स्वप्नच पाहतो. पण त्याची स्वप्नं सुंदर आहेत की दु:स्वप्न, ते मात्र आपल्याला ठाऊक नाही. त्यानं त्यांच्याबद्दल काही लिहिलेलं नाहीए. क्वचित एखाद् दुसरी टिप्पणी फक्त; सूचना म्हणून, विनंती, मागणी, तक्रार म्हणून. स्वप्नांची आता नोंद ठेवण्याची गरज नाही अशा टप्प्याला तो आला होता का? एक गोष्ट फक्त स्वच्छ आहे. तो आनंदात नाही. अजून तो झपाटलेलाच आहे, फरपटला जातोय. त्याच्यात अजून ऊर्जा आहे; पण ज्याचं अंतर्मन समधात अवस्थेत आहे अशा माणसाची ही ऊर्जा नाही.
त्याचं हे रहस्य आहे तरी काय मग? त्याच्या बाह्य़ वर्तनावरून काही कळत नाही. कारण त्याच्या तिरपागडेपणातही सुसंगती आहे. आपल्याला एक पोरगा झालाय आणि तो इंजिनीअर होणाराय, हे त्याचं स्वप्नही आपण समजू शकतो. त्याचं हे स्वप्न आपल्या गळ्यात आवंढा आणतं. पण आपण गिळू शकतो तो आवंढा. तो काहीही करू शकतो, हे आपण कधीच नाही का स्वीकारलेलं? तो पण माणूसच आहे. लग्न, संसार, पोरंबाळं अशा कल्पनांशी खेळण्याचा त्याला अधिकार नाहीए का? जो कवी हत्तीच्या शिकारीला जातो, जो आपल्या घरी ‘Theoretical and Practical Mannual of Exploration’ हे पुस्तक मागवू शकतो, जिऑग्राफिकल सोसायटीला प्रबंध सादर करण्याची जो स्वप्नं पाहू शकतो, त्यानं आपल्याला व्हाइट बायको आणि पोर हवं अशी भूक ठेवली तर त्यात एवढं दचकण्यासारखं काय आहे? त्यानं आपल्या अबिसिनियन रखेलीला इतकं चांगलं वागवलं ह्यचं लोकांना आश्चर्य वाटतं. का नाही वागवणार तो तसं? तो सभ्य, सुसंस्कृत, काळजी घेणारा असावा, हे इतकं विचित्र आहे का? शायलॉकचं भाषण आठवून पाहा.
हे सर्व ठीक आहे; पण गळ्यात आवंढा कशानं येत असेल, तर त्यानं आपल्या कलेशी घेतलेली फारकत. त्याचा गुन्हा हा आहे, असं म्हणू शकतो आपण. त्याच्यातल्या सगळ्या दोषांना, दुर्गुणांना, अतिरेकांना आपण क्षमा करू शकतो; पण ह्यला नाही. ह्य उद्दंडतेला क्षमा नाही. नाही का?
कसे आपण स्वत:लाच फसवतो! आपल्याला सगळ्यांना कधीतरी असा पळ काढावासा वाटतो. नाही वाटत? आपल्याला वैताग आलेला असतो, कामाची ओकारी आलेली असते. पण आपण त्याला नेटानी चिकटून राहतो. आणि चिकटून राहतो, कारण मनात आलं त्याप्रमाणे वागण्याचं धर्य आपल्याजवळ नसतं. कामाशी आपली एकनिष्ठा असते म्हणून नाही आपण आपल्या कामाला चिकटून राहत. सोडा भाऊ! एकनिष्ठा हे मिथक आहे- निदान ह्य काळात. एकनिष्ठा गुलामांसाठी असते; जोपर्यंत सगळं जग भुकेल्या लांडग्यांनी भरत नाही तोपर्यंत. तसं झालं की ते सगळे मिळून तुटून पडतात आणि हिंस्र पशूंप्रमाणे फाडून खातात. रँबो हा एकांडा लांडगा होता. पण एकांडा असला तरी मागच्या पायात शेपूट घालून मागल्या दारानी तो सटकला नाही. त्यानी अंगठा दाखवला : न्यायाधीश, धर्मगुरू, शाळामास्तर, टीकाकार, तानाशाह, ढेरपोटे धनिक- सगळ्यांना. आपल्या आदरणीय सांस्कृतिक समाजातल्या ह्य सगळ्या आधारस्तंभांना. रँबो ज्या काळात जन्मला तो काळ आपल्या काळापेक्षा वाईट होता असं समजून खूश होऊ नका. ते कंजूष, माथेफिरू, लांडगे, सगळ्या बाबतीत खोटारडे लोक आता नष्ट झालेयत असं क्षणभरही समजू नका! ही त्याची जेवढी होती तेवढीच तुमची पण समस्या आहे. आपल्याला कोणी स्वीकारत नाहीए, ह्यचा त्रास तो स्वत:ला करूनच घेत नव्हता. आपण ज्याच्यासाठी जीव टाकतो त्या ह्य क्षुद्र समाधानाचा त्याला तिरस्कार होता. अवतीभोवतीची सगळी बजबजपुरी, त्यातल्या माळेतला मणी होण्यानं आपलं काही कल्याण व्हायचं नाही, हे त्याला कळत होतं. त्याला खऱ्या अर्थानं जगायचं होतं. त्याला नीट श्वास घ्यायचा होता. अधिक स्वातंत्र्य हवं होतं. अगदी कुठल्याही तऱ्हेनं का होईना, त्याला स्वतला व्यक्त करायचं होतं. म्हणून तो म्हणाला, ‘‘बा झवत गेला तुमचा!’’ असं म्हणून त्यानं बटनं काढली आणि तो त्यांच्या पुस्तकांवर चक्क मुतला. तेही बऱ्यापकी उंचीवरून- असं सेलँनं म्हणून ठेवलंय. मग जगण्याच्या गुलामांनो, हे किती अक्षम्य आहे; हो की नाही? हाच त्याचा गुन्हा; हो की नाही? चला मग. आपण न्यायदान करून टाकू. ‘‘रँबो, तू अपराधी आहेस. ह्य सुसंस्कृत जगातल्या असंतुष्ट कलावंतांच्या नावानं तुझं डोकं भर चौकात छाटलं जाईल.’’ मग काय! लोक ज्या अत्यानंदानं झुंडीनं धावतात- कोणी भरचौकात गिलोटिनखाली येणार असलं की- विशेषत: हा बळी कोणी ‘खास’ असला तर! हे पालं की मला अल्बेर कामूच्या ‘द स्ट्रेंजर’मधले शब्द आठवतात. आपण भर लोकात परके असणं म्हणजे काय, ते कळतं आतून. ‘ह्य राक्षसाचा’ खटला चालत असताना वकील वक्तृत्वबाजी करतो- ‘‘ह्यनं थोडा तरी पश्चात्ताप दाखवलाय का? चुकूनही नाही- सभ्य गृहस्थांनो. ही चौकशी चाललेली असताना ह्य माणसाला आपण केलेल्या भयंकर गुन्ह्यबद्दल एकदासुद्धा वाईट वाटलेलं नाही. म्हणजे खरा गुन्हा हा आहे! केलेल्या अपराधापेक्षा त्याचा पश्चात्ताप होत नाहीए, हा खरा गुन्हा.’’ ह्यवर मग कामूच्या नायकाचं स्वत:शीच स्वगत सुरू होतं.. ‘‘इथे तो वकील माझ्याकडे वळला व माझ्याकडे बोट दाखवून माझ्यावर दोषारोपण करत राहिला. का, ते मला कळलंच नाही. कदाचित त्याचं बरोबरही असेल.. काय नेम! मला मी काही केल्याचं फारसं वाईट वाटत नव्हतं. पण त्याच्या आपला मुद्दा हट्टानं रेटत राहण्याचं मला आश्चर्य वाटलं. मला कधीच कशाचबद्दल पश्चात्ताप होत नाही, असं त्याला स्नेहशीलपणे, प्रेमानं सांगावं, असा प्रयत्न करावासा मला वाटला. उद्या काय घडणार, किंवा परवाही- त्याचं मला फार आकर्षण आहे. पण ज्या अवस्थेत मी ओढला गेलो होतो त्यामुळे मी कुणाशीही अशा पद्धतीनं बोलू शकत नव्हतो. माझे सद्हेतू दाखवतानासुद्धा मला प्रेमळ व्हायला पाबंदी होती. मी मग पुढचं ऐकायला सुरुवात केली, कारण वकीलसाहेबांनी आता माझ्या आत्म्याबद्दल बोलायला सुरुवात केली होती.’’
वॉलेस फॉवली रँबोच्या ह्य दुर्मीळ गुणावर बरोबर बोट ठेवतो. ‘‘प्रतिभावंत हा शांततेचा स्वामी असतो आणि गुलामही. स्वत:ची सही असलेल्या शब्दांमध्येच कवी असतो असं नाही, कागदावरच्या कोऱ्या जागांमध्येही तो असतो. त्याचा प्रामाणिकपणा, त्याचा अभंगपणा.. आणि रँबोमध्ये ह्य गोष्टी शिगोशीग होत्या.’’
रँबोला मालक आणि गुलाम, न्यायाधीश आणि गुन्हेगार, बंडखोर व रुढीवादी हे सगळेच एका जोखडाखाली बांधलेले दिसतात. हा त्यांचा नरक आहे; आपण एकमेकांपेक्षा वेगळे आहोत, हा भ्रम मनात ठेवलेले हे एकत्रच जुंपलेले असतात. रँबो सुचवतो, की कवी पण त्याच तिढय़ामध्ये अडकलेला असतो. तो पण जखडलेला असतो; त्याचा आत्मा मुक्त नसतो, त्याची कल्पनाशक्ती मुक्तपणे विहार करू शकत नाही. हे कळलं म्हणून त्याविरुद्ध मग रँबो बंड करीत नाही; तो कवितेचा परित्यागच करतो. त्याचा त्यात काही हेतू नसला तरी त्याचा प्रभाव जाणवून देण्याचा तो खात्रीचा मार्ग होता. एक हट्टी शांतता ठेवून त्याचं अस्तित्व तो जाणवून देतो. दुसऱ्याच कुठल्यातरी आवाजात बोलण्यापेक्षा कवी स्वत:च आवाज होतो. मौनाचा आवाज.
तुम्ही जगात आहात, जगाचा भाग आहात तोपर्यंत म्हणा काय तुम्हाला म्हणायचं ते. मग थोबाड बंद करा कायमचं! पण शरणागती पत्करू नका, वाकू नका! ह्यची शिक्षा? हकालपट्टी. जगाला तुम्ही नाकारता काय! मग हकालपट्टी. हे इतकं भयंकर आहे का? ज्यांना प्रसिद्धीचा झगमगाट हवा असतो त्यांच्यासाठी आहे. पण असेही काही आहेत, की जे अंधारात मौन राखून राज्य करतात. ह्य जगात द्वैत नांदतं; भौतिक आणि आध्यात्मिकही जीवनात. चांगल्याइतकीच वाईटालाही इथं जागा आहे. प्रकाशाबरोबर अंधारालाही आहे- घनता आणि सावली. परमेश्वराचा ध्यास ज्यानं घेतलाय त्या माणसाला संधिप्रकाशाचं जग राहायला योग्य वाटत नाही, कारण ते संदिग्धतेनी भरलेलं आहे. नित्शेनं ह्यच जगात ढासळलेल्या देवांना जागा दिली. ह्य प्रदेशात न देव ओळखू येत, न सतान. ही मृत्यूची दरी आहे- जी आत्मा उल्लंघून जातो आणि ह्य काळात माणसाचं विश्वाशी असलेलं नातं हरवतं. ही मारेकऱ्याची वेळा आहे; विनाशवेळा. ह्यवेळी माणसं आनंदानं कंपित होत नाहीत; ती मत्सरानं, द्वेषानं तळमळतात, तडफडतात. नि:शस्त्र असल्यानं वर कसं जायचं, ते त्यांना कळत नाही; ते फक्त प्रतिक्रिया देत राहतात. मध्ययुगीन माणसाला ह्य ‘अंधाराच्या राजपुत्राची’ चांगली ओळख होती. त्यांनी दुष्ट शक्तींनाही अध्र्य दिलं, हे शिलालेख व पुराणं ह्यंच्यात स्पष्टच दिसतं. पण ह्यच मध्ययुगीन माणसानं परमेश्वरालाही ओळखलंही आणि मानलंही. त्याचं जीवन
त्यामुळे उत्कट आणि समृद्ध होतं. तुलनेनं आधुनिक माणसाचं जीवन फिकुटलेलं, पोकळ आहे. आधीच्या लोकांना माहीत असलेल्या भयावर मात करील असं भय त्याला माहीत आहे. कारण धमक्यांनी घेरलेल्या अवास्तव जगातच तो राहत आहे. जुन्या जगातल्या गुलामांना सुटकेची, आनंदाची शक्यता असायची, तीही आताच्या माणसाजवळ नाही. स्वत:मध्ये असलेल्या शून्यपणाची तो शिकार झाला आहे. त्याच्या यातना निर्बीज, वांझ माणसाच्या यातना आहेत. अमिएलला हे युग चांगलंच परिचयाचं होतं आणि तो त्याचा बळीही होता. त्यानं नीटच वर्णन केलंय- ‘प्रतिभावंताच्या वांझपणाचं.’
ह्यपेक्षा भयकंपित करणारे शब्द माणूस उच्चारू शकणार नाही. शेवट दृष्टीच्या टप्प्यात आलाय असा आहे त्याचा अर्थ.
शेवटाबद्दल बोलताना अमिएलच्या शब्दांची आठवण आल्यावाचून राहत नाही. टेन ह्य लेखकाची शैली त्याला कसा उबग आणते त्याबद्दल बोलतोय तो. ‘‘आत काहीही हलत नाही त्याचं वाचून. नुसती माहिती मिळते. ह्य़ालाच भविष्यकाळात साहित्य म्हणतील बहुधा. अमेरिकन स्टायलीतलं. ग्रीक कलांपेक्षा जितकं वेगळं म्हणून असू शकेल तितकं वेगळं, जीवनाऐवजी बीजगणित देणारं, प्रतिमेऐवजी फॉम्र्युला देणारं, अपोलोच्या दैवी वेडापेक्षा भट्टीतून निघणाऱ्या आवाजासारखं. विचारांचा आनंद जाऊन तिथे गारठलेली दृष्टी येईल. आणि आपण कवितेचा मृत्यू पाहू; विज्ञानानं तिचं विच्छेदन केलं असेल.’’
कोणी आत्महत्या केली तर आपण हे नाही पाहत, की त्या माणसाला मरण तात्काळ आलं की रेंगाळत; त्याला खूप यातना झाल्या की कमी. त्याचं ‘कृत्य’ आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं. त्या एका कृत्यानं ‘जगावं की मरावं’ हे एक कृत्य आहे, ह्यचं भान एकदम आपल्याला येतं. इथे अस्तित्व आणि मृत्यू एकार्थ होतात. आत्महत्येमध्ये नेहमीच स्फोटक शक्ती असते. ती दचकून आपल्याला भानावर आणते. तिच्यामुळे आपल्याला कळतं, की ‘आपण’ आंधळे आहोत, मेलेले आहोत. आत्महत्येचा प्रयत्न आपला कायदा कमालीच्या कठोरपणानं दंडित करतो, हे आपल्या रोगट समाजाला शोभण्यासारखंच आहे. आपण करण्यासारखं असून काय काय केलेलं नाही, ह्यची जाणीव करून देणारं आपल्याला काही नकोसं असतं. आपल्यातून निसटलेला हा माणूस मृत्यूपल्याडच्या प्रदेशातून आपल्याकडे कायम बोट दाखवेल, ह्य कल्पनेनंही आपण भेदरतो. (क्रमश:)
(c) 1946-1949-1956 by New Directions Publishing Corporation

Financial misappropriation case, acquittal ,
आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण : भावना गवळी यांच्या निकटवर्तीयाची दोषमुक्तीची मागणी फेटाळली
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Torres case, police , accused, High Court,
आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल
district court granted valmik karad get 7 days police custody
‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय
Torres
Torres Scam : टोरेस फसवणूकप्रकरणी आरोप असलेले सीए अभिषेक गुप्तांची न्यायालयात धाव; वकील म्हणाले, “युक्रेनिअन माफिया…”
accused ran away, Jaripatka police, Nagpur ,
नागपूर पोलिसांवर नामुष्की, पळून गेलेला आरोपी गेला कुठे?
Dabholkar murder case Objection to Dabholkar familys appeal against release of accused
दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपींच्या सुटकेविरोधातील दाभोलकर कुटुंबीयांच्या अपिलाला आक्षेप
Businessman arrested for demanding Rs 70 lakh ransom Pune print news
व्यावसायिकाकडे ७० लाखांची खंडणी मागणारा गजाआड; कामावरून काढल्याने कामगाराकडून खंडणीची मागणी
Story img Loader