‘The Time of the Assassins’ या हेन्री मिलर यांच्या ललितबंधाचा ज्येष्ठ नाटककार- साहित्यिक महेश एलकुंचवार यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला प्रवाही अनुवाद..
रँबो जिवंत आत्महत्या होता. हे म्हणजे आणखीच असह्य़ आपल्यासाठी! हा गडी सभ्य असता तर त्याने ती वयाच्या एकोणिसाव्या वर्षीच केली असती. पण नाही. त्यानं ती ओढत नेली. आपल्याला तिचा साक्षीदार बनवलं. वाया गेलेल्या जीवनाचा जिवंत मृत्यू; जो आपणही सदासर्वकाळ भोगतच असतो. स्वत:च्या भव्यतेचं त्यानं व्यंगचित्र केलं ते जणू काय आपण आपल्या क्षुद्र आनंदात लडबडत राहावं म्हणूनच. तो निग्रो गुलामासारखा कष्टला ते आपण स्वीकारलेल्या गुलामगिरीच्या आयुष्यात आनंद मनवावा म्हणूनच. आयुष्यातल्या अठरा वर्षांच्या धडपडीमध्ये त्यानं जे गुण दाखवले ते सगळे गुण ज्याला आपण ‘यश’ म्हणतो त्यासाठी अचूक योग्य होते. पण आपलं यश कडूजहर अपयशात बदलवणं हा तर त्याचा खरा विजय होता. ह्य़ाच्यासाठी सतानासारखी शक्ती लागते, ती त्याच्याजवळ होती. आपण आत्महत्या पाहिली की हळहळतो तेव्हा खरं म्हणजे स्वत:साठी हळहळतो. कारण त्याचं उदाहरण गिरवण्याची ताकद आपल्यात नसते. आपल्यामधून फार लोकांनी असं केलं तर आपण ढेपाळलेच जाऊ. आपल्याला काय हवं असेल, तर आपल्याला सोबत करत राहतील असे आयुष्याचे बळी. आपण एकमेकांना इतकं चांगलं ओळखतो; एकमेकांची घृणा करतो आपण. पण एकमेकांशी वागताना जंतूंचा औपचारिक सभ्यपणा आपण पाळतो.ओळखीचे वाटतात नं शब्द? त्यांचा पुनरुच्चार लॉरेन्स, सेलँ, मालाक्वे आणि इतर पुन्हा करणार आहेत. आणि जी माणसं ह्य़ा शब्दांचा उपयोग करतील त्यांचा द्रोही, पलायनवादी, बुडत्या बोटीवरून पळणारे उंदीर असा करण्यात येईल. (जणू काय उंदरांना बुद्धी नसते!) पण बोट बुडते आहे हे तर नक्कीच. त्याबद्दल दुमत नाही. लॉरेन्स त्याच्या पत्रांमधून- ‘मॉबी डिक’वर त्यानं लिहिलंय त्यामधून- त्यावर बोललाय.
त्याच दिशेनं निघालोय आपण, ह्य़ात शंकाच नाही. पण तो नोहाचा आर्क कुठाय आपल्याला ह्य़ा महापुरातून वाचवायला? आणि असलाही तो आर्क, तरी कुठल्या साधनांनी बनलेला असेल? आता परमेश्वराचे लाडकेच जे आहेत, ते निश्चितच ‘हे’ जग ज्यांनी घडवलं त्या माणसांपेक्षा वेगळ्या पोताचे असणार. आपला शेवट जवळ आलाय आणि तो भयंकर विनाशकारी असणार. नुसत्या शब्दांनी धोक्याची सूचना दिली तर आपल्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. आता ठोस कृती हवीय. आत्महत्येची कृती कदाचित; पण अर्थगर्भ अशी कृती.
रँबोचा सर्वसंगपरित्याग ही अशीच कृती होती. त्यानं साहित्य ढवळलं गेलं. पण त्यानं जीवन ढवळलं जाईल? मला शंका आहे. आपल्याला गिळंकृत करणाऱ्या ह्य़ा महापुराचा लोंढा थोपवणारं काही असेल ह्य़ाबद्दल मला शंका आहे. पण तरीही रँबोच्या आगमनानं एक मात्र झालं. आमच्यातल्या जागल्यांचं ‘पल्याडच्या किनाऱ्यावर’ जाऊ पाहणाऱ्यांमध्ये परिवर्तन केलं.
मृत्यूबाबत एक महत्त्वाची गोष्ट अशी की, ती घटना माणसानं नुसतं विरघळून नाहीसं होण्यापेक्षा वेगळी आहे. माणूस मरतच असेल तर ‘कशासाठी तरी’ मरतो. सुरुवातीच्या आदिम गोंधळातून नियमबद्धता आणि सुसंगती आली असं मिथकं आपल्याला सांगतात. ह्य़ा दोन गोष्टींमुळे आपल्या कवेत येणार नाही असा जीवनहेतू आपल्याला मिळतो; आणि आपल्याला जाग येते तेव्हा आपण ह्य़ा हेतूसाठी स्वत:ची आहुती देतो. ही आहुती सृजनाच्या वेदीवर दिली जाते. आपण आपल्या हातांनी, जिभेनं काय निर्माण करतो ते बिनमहत्त्वाचं आहे. आपण सृजनाचे भागीदार होतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं जगायला सुरुवात करतो.
प्रत्येक पावलाला आपल्याला आव्हान मिळतं- ते मृत्यू देत नाही; जीवन देतं. मृत्यूला कवटाळणाऱ्यांचं शिसारी येईपर्यंत आपण कौतुक केलंय; पण जीवनाचं आव्हान स्वीकारणाऱ्यांचं काय? कुठल्या प्रकारे आपण त्यांचा सन्मान करतो? आपल्याला मृत्यू म्हणजे काय, ते समजून घेऊन त्याला आिलगन द्यायचं असेल तर जगण्याच्या आगीतून आपल्याला चालायलाच लागेल. बंडखोराची शक्ती त्याच्या कशाहीपुढे न वाकण्यात असते. पण खरी शक्ती शरणभावात आहे. ह्य़ा भावामुळे आपल्या पल्याड जे आहे त्याच्यासाठी आपण भक्तीनं आपलं आयुष्य समíपत करतो. पहिल्याची शक्ती त्याला समस्तापासून तोडून विलग करते, दुसऱ्याची त्याला एकात्मतेकडे नेते. पहिली खच्चीकरण करते, तर दुसरी सृजन.
कुठल्याही झपाटलेपणाला कारण असतं आणि सृजनशीलांचं झपाटलेपण तीव्र सप्तकात कसं गातं, हे पाहायचं असेल तर ख्रिस्ताच्या झपाटलेपणाकडे पाहावं. तो मूíतमंत मानवी दुखच आहे. कवीचं झपाटलेपण येतं ते त्याच्या खास दृष्टीमुळे. जीवन अर्करूपानं आणि पूर्णत्वानं बघू शकण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे. एकदा का ही दृष्टी ढळली किंवा भंगली, की झपाटलेपण ओसरून जातं. कलेच्या क्षेत्रात म्हणाल तर आपण अगदी खात्रीनं झपाटलेपण नाहीसं होताना पाहतोय. कधी कधी भव्य माणसं दिसतात इथंही- नाही असं नाही; पण अजून तरी टिकलेल्या प्राचीन वैभवामध्ये कबरीचे दगड पडल्यासारखे ते दिसतात. समाज कितीही सामथ्र्यशाली असो, कलावंताची दृष्टी त्या समाजाला प्रभावित करीत नसेल तर अशा समाजात कलावंत टिकू शकत नाही. फार काळापासून आपल्या समाजाला कलावंत काय म्हणतोय त्याच्याशी काही देणंघेणं राहिलेलं नाही. जो आवाज दुर्लक्षित राहतो तो सरतेशेवटी मौनात जातो. समाजातल्या बेबंदशाहीला कलावंत उत्तर देतो मग बहिरपेणानी. असं वागणारा रँबो पहिला. त्याची भुरळच पडलीय आपल्याला. हल्लीच्या काळातल्या लेखकांमध्ये त्याचे शिष्य दिसतायत का कोणी, हे नको शोधू या आपण; तर विसरले गेलेल्या, ग्रहण लागलेल्या आणि तारुण्यातच ज्यांना आपल्या प्रतिभेचा आवाज दडपावा लागला त्यांच्यात शोधू या त्याचे शिष्य. सगळ्यात आधी आपण आपल्याच देशाकडे बघू या. अमेरिका. इथे सर्वात जास्त बळी आहेत. असं असणं म्हणजे मुळातच पोखरलेल्या डळमळीत इमारतीखाली सुरुंग पेरणं. कवीला नवनिर्माणात जागाच नसेल, त्यात त्याला भाग घेता येत नसेल तर तो ते निर्माण गाभ्यापासून उडवणार. ही काही काल्पनिक धमकी नाही; वस्तुस्थिती आहे. मध्ययुगानं पाहिलं नसेल अशा मृत्यूच्या थमानाची ही सुरुवात आहे.
आधुनिक काळात खरेखुरे सृजनशील लोक दैत्यांसारखे होते. त्यांच्यात जे झपाटलेपण होतं ते आता ओसरतंय. त्यांनी आयुष्याचा मूलस्रोत पुन्हा नव्यानं शोधला, पण त्यांची संवाद करण्याची साधनं मात्र कापून काढण्यात आली. लोक आता संवाद करीत नाहीत. ही आजच्या जीवनाची शोकांतिका आहे. आता माणसांचा जमाव आहे; समाज नाही राहिलेला. अनेक असहाय अणूंमध्ये त्याचं विभाजन झालेलं आहे. त्याला एकसंध करू शकणारी एकमेव गोष्ट आहे. परमेश्वराचं असणं व त्याची भक्ती; ती मात्र उरलेली नाही.
रँबोनं अगदी उमलत्या तारुण्यातच चर्चच्या दरवाजांवर ‘देव मेला!’ असं जेव्हा लिहून ठेवलं तेव्हा चर्चवर राज्य करणाऱ्या शक्तींपेक्षा तोच देवाच्या अधिक जवळ होता. त्याचा उर्मटपणा आणि प्रतिरोध गरीबांच्या, अभाग्यांच्या, खऱ्याखुऱ्या भक्तांच्या वाटेला कधी गेला नाही. त्याची लढाई होती बळकावणारे, दांभिक लोक, जे जे म्हणून खोटं असेल, ढोंगी असेल, आयुष्याला विनाशकारी असेल, त्याच्याशी. त्याला पृथ्वीचा स्वर्ग करायचा होता. मुळात स्वर्ग आहेच पृथ्वी; पण ती भ्रम, भ्रांती ह्य़ांच्या अवगुंठनाखाली आहे. कुठल्यातरी मिथकीय भुताटलेल्या स्वर्गामध्ये त्याला सुतराम रस नव्हता. आता, इथे, हाडामासांची माणसं जिथे जीवनोत्साहानं उसळत आहेत अशा ख्रिसमसची तो कल्पना करत होता.
मृत्यू वियोगात आहे, विलग राहण्यात आहे. गोठलेलं असणं म्हणजे मृत्यू नाही. ज्या जीवनाला काही अर्थ नाही त्याला मरणोत्तरही काही अर्थ नाही. रँबोला हे पूर्णपणे कळलं होतं. एका पातळीवरचा लढा त्यानं सोडला, तो त्यानं दुसऱ्या पातळीवर सुरू केला. ह्य़ा अर्थानं पाहिलं तर त्याचा सर्वसंगपरित्याग दुसरं काही स्वीकारत होता. त्याला कळलं, की कलेची मूलद्रव्यं फक्त मौनात व अंधारातच पुनस्र्थापित होऊ शकतात. त्याच्या व्यक्तित्वाचे स्वत:चे कायदे होते, ते शेवटपर्यंत त्याने पाळले. हे करताना त्यानं सगळ्या गोष्टींची तोडमोड केली. अगदी स्वतचीही. इतरांना आयुष्याची अखेर आल्यानंतरच जे कळतं- म्हणजे कळलंच तर- ते त्याला प्रथमपासूनच आकळलं होतं; ते म्हणजे पवित्र शब्दांना आता काही वैधता उरलेली नाही. सत्य आणि सौंदर्य ह्य़ा दोन्ही गोष्टींना संस्कृतीनं विषाक्त करून त्यांच्या जागी कृत्रिमपणा व फसवणूक आणली आहे. रँबो आपल्या गुडघ्यावर सौंदर्य जोजवतो आणि त्याला ते कडूजहर प्रतीत होतं. तो त्याला सोडून देतो. असं करूनच तो त्याचा सन्मान करू शकतो. आपल्याजवळ सर्व प्रकारची प्रतिभा आहे अशी बढाई तो मारतो तेव्हा ‘ह्य़ा पोकळ अर्थानं’ असं त्याला म्हणायचं असतं. शिवाय त्याचा तो ‘खोटारडा सांस्कृतिक मुखवटा’ आहेच. ह्य़ाबाबत तो अगदी दादामाणूस होता. पण हा सगळा गोंधळाचा प्रदेश आहे. इथं सगळ्यांची किंमत एकसारखी. म्हणजे कशालाच किंमत नाही.
आपल्या सगळ्या लिखाणात रँबोनं एक सत्य उच्चरवानं सांगितलं आहे. ‘आपण घटनांच्या मध्ये नाही राहत. आपण प्रतीकांच्या आणि गूढार्थाच्या मध्ये राहतो.’ त्याच्या लिखाणातलं रहस्य त्याच्या जीवनातही पाझरतं. त्याच्या वागण्याचं स्पष्टीकरण आपल्याला काही देता येत नाही. आपल्याला हवं असलेलंच त्याचं वागणं प्रकट करतं. तो इतरांसाठी जेवढा गूढ होता, तितकाच स्वत:साठी होता. त्याला स्वत:लाच आपल्या कवितेचं आणि नंतर उत्तरायुष्याचं गूढ वाटत होतं. बाह्य़ जगणंच त्याचं आश्रयस्थान होतं? पारदर्शकपणाच्या भयापासून तो पळत होता का? उलटय़ा दिशेनं प्रवास करणारा तो संत होता. त्याच्या दृष्टीनं आधी आत्मप्रकाश येतो, मग ज्ञान आणि मग पापाचा अनुभव. पाप त्याच्यासाठी मोठंच रहस्य होतं. पश्चात्तापदग्ध लोक पूर्वी अंगाला बोचणारे कपडे घालायचे, तसं त्यानं पाप स्वत:वर पांघरलं.
आपण म्हणतो, तो पळून गेला. पण तो कशापासून पळून गेला नाही; कशाकडे तरी पळून गेला. एक प्रकारचं वेड लागू नये म्हणताना तो दुसऱ्या प्रकारे वेडा झाला. एका दुर्घटनेपासून तो बचावत नाही, तर दुसरी तयारच त्याचा पाठलाग करायला. तो लक्ष्य आहे आणि ‘ते’ सगळे त्याच्या मागावर आहेत. त्याच्या कवित्वाच्या भराऱ्या उन्मनावस्थेच्या चढत्या पायऱ्या आहेत; आणि उत्तरायुष्यात तो जगाच्या ह्य़ा कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत आंधळेपणानं धावला त्यांच्याशी त्या समांतर आहेत. कितीदा त्याला ठेचलेल्या, पराभूत अवस्थेत परत आणलंय! जरा बरा झाला की निघाला हा. कशात तरी उडी घ्यायला तयार. घेतलीच ह्य़ानं झेप सूर्याकडे. तो प्रकाश शोधतोय आणि मानवी ऊब. त्याला आलेल्या भानानं त्याच्यातली सर्व नसíगक ऊब जणू गळून गेलीय; त्याच्या रक्तात बर्फ वितळतंय. पण तो जो जो दूर जातो, तो तो काळोख आणखी वाढतो. सर्व पृथ्वी रक्तानं आणि अंधारानं वेढली गेलीय. हिमाचा गारठा पृथ्वीच्या केंद्रस्थानी येऊ लागलाय.
असं वाटतं की, त्याला पंख असून तो धरणीला साखळ्यांनी बांधून ठेवलेला असणं ही त्याची नियती होती. दूरस्थ ताऱ्यांकडे जाण्यासाठी तो ह्य़ा बेडय़ांना हिसके देतो आणि चिखलात खोल रुतत जातो. आपले पंख तो जितके जास्त फडफडवतो तितका तो पृथ्वीच्या तुरुंगात ढकलला जातो. त्याच्यामध्ये असलेल्या अग्नी आणि वायू ह्य़ांचं जल आणि पृथ्वी ह्य़ांच्याशी सतत युद्ध चालू आहे. खडकाला बांधून ठेवलेला गरुड आहे तो. आणि अवतीभोवतीचे क्षुद्र पक्षी त्याचं मांस तोडून खात आहेत.
त्याची वेळ आलेली नव्हती अजून. काळाच्या पुढे होता तो फार. पृथ्वीवरचा ख्रिसमस; त्यानं फार घाईनं त्याची कल्पना केली. खोटे देव, रानटी अंधश्रद्धा, सस्ते तोडगे जावे ह्य़ाची त्यानं फार घाई केली. ह्य़ा पृथ्वीतलावर राहणाऱ्यांना प्रभातीच्या शुभ्र प्रकाशात नहाण्याआधी एक खूप मोठा कष्टदायक काळ घालवायचा आहे. ‘प्रभात’ हा त्याच्यासाठी अर्थगर्भ शब्द आहे. रँबोला त्याचा अर्थ आतूनच कळलेला असावा. त्याची स्वातंत्र्याकांक्षा म्हणजे वैयक्तिक मुक्तीची कांक्षा होती, आणि ही एका शापित माणसाची कांक्षा होती. चिरंतन जीवन माहीत असून मृत्यूच्या ज्ञानाशी सौदा करणाऱ्या माणसांच्या वतीनं तो बोलतो. रुसोप्रमाणे तो निसर्गाकडे वळत नाहीए. तो कृपाप्रसाद शोधतोय. त्याच्याजवळ श्रद्धा असती तर त्यानं कधीच अशरणता स्वीकारली असती. त्याचं मन दुर्दैवानं पक्षाघाताची शिकार झालंय. इस्पितळात असताना त्याच्या बहिणीशी त्यानं केलेली चर्चा! ती इतक्या खरेपणानं, खात्रीपूर्वक श्रद्धा ठेवते; आणि तो का नाही ठेवू शकत? दोघांमध्ये एकच रक्त धावतंय नं? ही झेप घ्यायला त्याला आपलं सगळं धर्य गोळा करावं लागतंय. सगळी बंधनं तोडून, स्वत:बाहेर पडूनच ही झेप घेता येईल. कशावर आपण श्रद्धा ठेवायची ह्य़ाला आता महत्त्व नाही उरलेलं. फक्त आता श्रद्धा ठेवायचीय. बस!
त्याच्या ‘Season in hell’ मध्ये त्याची भावस्थिती सारखी हेलावताना आपण पाहतो. एका उत्कट क्षणी तो म्हणतो की, विचारशक्ती त्याच्यात पुन्हा जन्मली आहे, जग फार चांगलं आहे, माझं माणसांवर प्रेम आहे, मी जगाचं शुभ चिंतितो. त्याचा हा देव माणसाचं सामथ्र्य आहे. पण हा देव ना ख्रिश्चन आहे की कुठल्या आदिवासी लोकांचा. तो फक्त देव आहे. स्वत:च्या वंशांच्या, सगळ्या संस्कृतींच्या लोकांना त्याच्याकडे जाता येतं. तो सगळ्यांना उपलब्ध आहे. तो कुठेही, केव्हाही सापडू शकतो व त्याला भेटण्यासाठी मध्यस्थाची गरज नाही. तो देव स्वत:च साक्षात् निर्मिती आहे. आणि माणूस श्रद्धा ठेवो की न ठेवो, तो कायमच अस्तित्वात राहणार आहे.
माणूस जेवढा जास्त सृजनशील, तेवढा परमेश्वर आपल्याला सापडेल हा त्याला जास्त विश्वास. जे त्याला हट्टानं जितकं नाकारतात, ते तितकं असं वागून त्याच्या असण्याचाच पुरावा देतात. कशाच्या तरी साठी लढण्याइतकंच कशातरी विरुद्ध लढणं शूरपणाचं आहे. फरक एवढाच आहे, की विरुद्ध लढणाऱ्याची प्रकाशाकडे नेहमी पाठ असते. स्वत:च्या सावलीशीच तो लढत असतो. अखेर त्याच्या ‘शॅडो प्ले’नं तो जेव्हा पूर्ण थकतो आणि धरणीवर अंग टाकतो, तेव्हा त्याला हा प्रकाश आपलं वैभव दाखवतो. लहान असा की मोठे तुम्ही- गर्व आणि अहंकाराची आयुधं तुम्हाला खाली ठेवावीच लागतात.
आपण फक्त माध्यम आहोत असं स्वत:शी कबूल केल्यावरच कुठल्याही कलावंताला आपण सर्जक आहोत असं म्हणण्याचा अधिकार प्राप्त होतो. ‘लेखक, निर्माता, कवी! यायचा आहे तो अस्तित्वात अजून!’ असं रँबो आपल्या तारुण्यातल्या औद्धत्याने म्हणाला होता. पण असं म्हणताना तो एका मूलभूत सत्याचा उच्चार करीत होता. माणूस स्वत: आणि स्वतमधून काहीही निर्माण करीत नाही. सगळं निर्माण झालेलंच आहे, सगळं पाहिलं गेलेलं आहे.. आणि तरीही कलावंताला स्वातंत्र्य आहे. परमेश्वराचं स्तवन करण्याचं स्वातंत्र्य. हे माणसाचं सर्वश्रेष्ठ कृत्य आहे. तो हे करतो तेव्हा तो परमेश्वराच्या शेजारी बसतो. हेच त्याचं स्वातंत्र्य आणि हाच त्याचा मोक्ष. जीवनाला होकार देण्याची ही एकमेव पद्धत आहे. देवानं संगीत निर्माण केलं. तोच संगीत; वाजवणारा तोच. माणूस हे फक्त त्याचं वाद्य.
त्याचं अस्थिपंजर झालेलं प्रेत घरी आणलं- न आणलं तो त्याची आई त्याच्या प्रेतयात्रेच्या तयारीला लागलीही. त्याचं झिजून गेलेलं, विशीर्ण झालेलं, यातनांच्या खुणांनी क्षतविक्षत झालेलं शरीर मातीच्या ढिगाऱ्याखाली तत्परतेनं ढकललं गेलं. त्याची आई जणू साथीचा रोग पसरवणाऱ्या जंतूपासून स्वतला सोडवून घेत होती. तिनं एखादे वेळेस आपलं घर धुरी देऊन शुद्धही केलं असेल. कबरस्तानात शवपेटीच्या मागे त्या दोघीच गेल्या होत्या. ती आणि रँबोची बहीण. दोघींचीच प्रेतयात्रा. तिसरं माणूस नाही. ह्य़ा ‘प्रतिभावंता’च्या तावडीतून एकदाचं सुटल्यावर मादाम रँबो आता सुखानं आपलं आयुष्य, आपली गुरंढोरं, आपली शेतं-पिकं, आपलं आडगावातलं क्षुद्र आयुष्य व्यतीत करू शकणार होत्या. पीडा गेली!
काय पण आई! मूíतमंत मठ्ठपणा, कडवेपणा, अहंकार, दुराग्रहीपणा. जेव्हा जेव्हा तिचा हा प्रतिभाशाली मुलगा अनंत यातना भोगून, थकून जाऊन आपल्या नरकाशी मिळतं घेण्याचा प्रयत्न करी, जेव्हा जेव्हा त्याचं फाटलेलं मन लोळागोळा होऊन कोसळे, तेव्हा तेव्हा त्याला सळईनं ढोसायला किंवा त्याच्या जखमांवर उकळतं तेल टाकायला ही बाई सज्जच असे. तिनं त्याला घराबाहेर ढोसून काढलं. तिनं त्याला नाकारलं. फसवलं. छळलं. प्रत्येक फ्रेंच माणसाला ज्याची खोल इच्छा असते तो त्याचा एकमेव हक्कही तिनं छिनावून घेतला- एका सुंदर अंत्ययात्रेचा हक्क.
एकदा त्याचं शरीर कीटकांच्या हवाली झाल्यानंतर मग रँबो त्याच्या अंधारानं भरलेल्या साम्राज्यात परततो. तिथे तो आपली खरी आई शोधणार आहे. जिवंत असताना त्यानं फक्त ही चेटकीणच पाहिली होती. ही राक्षसी- जिच्या उदरातून तो आला होता. त्याचा बंडखोरपणा तिच्या छळामुळे, आठमुठय़ा मठ्ठपणामुळे आला आणि त्याला एकांडा करून गेला. त्याचा मुळातला प्रेमळ स्वभाव पूर्ण जायबंदी झाला. प्रेम देण्याची किंवा स्वीकारण्याची शक्तीच तो घालवून बसला. दुसऱ्याला विरोध कसा करायचा, एवढंच तो शिकला. त्याला फार तर दया वाटे; प्रेम कधीच नाही.
त्याच्या तरुणपणी तो कडवा, आतंकवादीच होता. तडजोड म्हणून नाही. कायम सगळ्याचा विरोध. क्रांती करायला निघालेला हा एका आदर्श समाजाच्या अनिवार शोधात होता. अशा समाजातच त्याची दुरावल्याची भळभळती जखम बरी झाली असती. त्याची ही जखम कायम ताजी राहिली आणि ती कधीही भरून आली नाही. तो कायम पूर्णत्वाच्या शोधात राहिला. कारण वास्तव आणि आदर्श ह्यांच्यामध्ये पसरलेल्या शून्य प्रदेशावर सेतू टाकायचा तर कुठलाही खोटेपणा, कुठल्याही चुका चालणार नव्हत्या. त्याला झालेली जखम जीवनाच्या नदीपेक्षाही खोल आहे आणि परिपूर्णता हाच तिच्यावरचा एक उतारा आहे.
जमवून घेणं, जुळवून घेणं त्याला कधी जमलं नाही. म्हणून तो कायम शोधत राहिला आणि त्याला कळलं, की ‘ते’ इथे नाही, तिथे नाही, ते ‘हे’ नाही, ‘ते’ नाही. सगळ्याचं वैय्यथ्र्य त्याला कळलं. नकाराच्या ह्य पोकळीत तो धडपडत असताना एकच सकारात्मक गोष्ट त्याच्याजवळ आहे, आणि ती म्हणजे प्रतिरोध. पण प्रतिरोध निष्फळ असतो. त्यानं आपल्या आतली शक्ती शोषली जाते.
त्याचा नकार ऐहिकतेपुरताच मर्यादित राहतो. त्याचा जीवनानुभव प्रचंड आहे, पण आयुष्याला अर्थ प्राप्त व्हावा इतका तो खोल नाही. त्याची वल्ही गेली, नांगर गेला. आता तो जीवनसागरावर अस्ताव्यस्त दिशाहीन हिंदकळत राहणार. सगळ्या खडकांवर, प्रवाळांवर आपटणारी त्याची नाव- अंगावर येणाऱ्या प्रत्येक वादळात भेलकांडणारी- सरतेशेवटी तिच्या ठिकऱ्या उडणार आणि तिचे अनंत तुकडे सागराच्या पृष्ठभागावर इतस्तत: तरंगत राहणार. ज्याला दर्यावर्दी व्हायचंय जीवनसागरावर- त्याला सुकाणू नीट धरता आलं पाहिजे, वाऱ्या-पावसाला कसं तोंड द्यायचं ते त्यानं शिकलेलं असलं पाहिजे, समुद्राचे नियम आणि स्वत:च्या मर्यादांचं पूर्ण ज्ञान त्याला असायला पाहिजे. कोलंबस कायदे धुडकावून लावत नाही, त्यांची व्याप्ती तो वाढवतो. तो काल्पनिक जगाच्या शोधात आपली बोट हाकारत नाही. त्याला नवीन जग सापडतं ते अपघातानं. पण असे अपघात हे धाडसाला येणारं वैध फळ आहे. धाडस म्हणजे अविचारीपणा नाही; ते येतं आपल्या शंभर टक्के खात्रीतून.
तरुणपणी जे जग रँबो शोधत होता ते अशक्याच्या कोटीतलं होतं. ते परिपूर्ण, समृद्ध, गूढ, चतन्यानं भरलेलं होतं. ज्या जगात तो जन्मला होता तिथे नसलेल्या गोष्टींची भरपाई तो करू पाहत होता. हे ‘अशक्य’ जग असं जग आहे, की तिथे देवांनीही कधी निवास केलेला नाही. हे जग सुषुप्तीचं आहे. स्तन्य मिळालं नाही की अर्भकं ह्य जगात आश्रय शोधतात. आणि जागृतीमध्ये हल्ला करूनच हे जग प्राप्त होतं आणि ह्य हल्ल्याला वेड म्हणतात. ह्य सर्वातून रँबो एकदम बाजूला होतो; जसं काही सर्व मायाजालाच्या आरपार त्यानं पाहिलं आहे. सोडाच ते. तो काही आता फसवला जाणार नाही. क्रांतीिबती सगळ्या पोकळ गोष्टी आहेत. रोजच्या रूढीग्रस्त आयुष्याइतक्याच. समाज- समाज म्हणजे चोर, लुटारू, उचक्के ह्यंचं संमेलन. स्वत:शिवाय आता तो कशावर विश्वास ठेवणार नाही. हे एकदा कळल्यावर सुरू होते त्याची भ्रमंती, दिशाहीन पळापळ, धरबंद नसलेलं वाहवत जाणं. ज्या गलिच्छ, तिरस्करणीय वास्तवाशी त्यानं संबंध तोडला तेच वास्तव
रोज त्याच्या पुढय़ात येऊन बसू लागलं. त्याची अवनती सुरू झालीय आणि ह्य काळोख्या भूलभुलैय्यातून बाहेर पडणारा मार्ग दाखवणारं त्याच्यासमोर काही नाही.
एकच गोष्ट तो ओळखतो- स्वातंत्र्य. आणि त्याला लवकरच कळणाराय, की मृत्यूमध्येच तो स्वतंत्र
होणार आहे. (क्रमश:)
महेश एलकुंचवार
(c) 1946-1949-1956 by New Directions Publishing Corporation
विनाशवेळा-११
आधुनिक काळात खरेखुरे सृजनशील लोक दैत्यांसारखे होते. त्यांच्यात जे झपाटलेपण होतं ते आता ओसरतंय.
Written by महेश एलकुंचवार
आणखी वाचा
First published on: 26-06-2016 at 01:42 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The time of the assassins