‘The Time of the Assassins’ या हेन्री मिलर यांच्या ललितबंधाचा ज्येष्ठ नाटककार- साहित्यिक महेश एलकुंचवार यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला प्रवाही अनुवाद..
एकटय़ा, समाजापासून तुटून पडलेल्या माणसाचं स्वातंत्र्य म्हणजे मृगजळ आहे. ह्यचं रँबो हे मूíतमंत उदाहरण आहे. फक्त मुक्तात्म्यालाच स्वातंत्र्य कळतं. स्वातंत्र्य ‘मिळवावं’ लागतं. ही हळूहळू होणारी घटना आहे. आणि जुन्या भुतांशी ही कष्टाची लढाई आहे. भुतं नाहीशी होतात असं नाही. जेवढी भीती खरी, तेवढीच भुतं खरी. ती भीती गेल्यावर कुठली भुतं? मनाला, आत्म्याला ग्रासणारी भीती काही चर्चनी निर्माण केली नाहीए. एक धर्म जाऊन दुसरा येतो, एक समाजव्यवस्था टाकून देऊन दुसरी तयार केली जाते. पण सत्ता शिल्लकच राहते. क्रांतिकारक फक्त जुलूमशाहीची नवी तऱ्हा निर्माण करतात. एक माणूस जे भोगतो तेच समाजातल्या सर्व माणसांना भोगावं लागतं.
‘आपल्याला जे जे शिकवलं गेलं ते सगळं खोटं आहे..’ रँबो त्याच्या तरुणपणी म्हणाला होता. त्याचं म्हणणं अगदी खरं होतं. पण आपल्यात काय सत्य आहे ते आविष्कृत करूनच पृथ्वीवर जे जे असत्य आहे त्याच्याशी मुकाबला करायचा, हे आपलं ध्येय आहे. हा चमत्कार अगदी एकटय़ालासुद्धा करता येतो. पण खरा चमत्कार सर्व माणसांना एकत्र आणणं. सगळा खोटेपणा, फसवाफसवी, क्रौर्य, सगळं भोगून, ते मागे टाकून सगळ्यांनी एकसंध झालं पाहिजे. ह्यलाच त्याग म्हणतात.
बाहेरचं वास्तव स्वीकारून रँबोनं आतलं वास्तव नाकारलं तेव्हाच ह्य जगाला नियंत्रित करणाऱ्या कृष्णशक्तींच्या हाती तो पडला. ज्या परिस्थितीत तो जन्मला त्याच्या पलीकडे त्यानं जाण्याचं नाकारलं आणि परिणामत: एका साचलेल्या डबक्यात राहणं त्याच्या नशिबी आलं. त्याच्याबाबतीत काळ खरोखरच थांबला. त्यानंतर त्यानं फक्त ‘वेळ काढला.’ त्यानं उद्योग खूप केले, पण त्याचा कंटाळा जाईना; इतका तो कंटाळा मूलभूत. त्याचं सारखं कशात तरी स्वतला गुंतवून घेणंच सांगतं- तो किती तुटलेला होता ते. जी पोकळी परिपूर्णतेच्या इंद्रधनुषी कल्पनांच्या साहाय्यानं उल्लंघून जाण्याचा प्रयत्न त्यानं केला, त्याच पोकळीचा तो अखेर भाग बनला. त्याचा स्वप्नसोपान नाहीसा झाला. भुतांना शरीर मिळालं. ती वास्तवच बनली. ती आता कल्पनाविश्वातली फक्त राहिली नाही; तर भ्रमभ्रांत करणाऱ्या शक्ती म्हणून वास्तवात आली. त्यानं अशा शक्तींना जागवलं आहे की त्या आता धुक्यानं भरलेल्या आपल्या मूलस्रोताकडे परतायला तयार नाहीत. त्यांनी त्याचाच ताबा घेतलाय. तो आता ‘कर्ता’ राहिलेला नाही. तो आहे आता फक्त वाहक. कल्पनाजगतात त्याला अमर्याद स्वातंत्र्य होतं; प्रत्यक्ष ऐहिक वास्तवात त्याच्या शक्ती पोकळ आहेत. तो आता परमेश्वराच्या दरबारात नाही; तो दु:शक्तींच्या जाळ्यात अडकला आहे. आता सुखशांती नाही, कष्टांपासून सुटका नाही. एकाकीपण आणि गुलामीच आता त्याच्या नशिबी. कुठल्यातरी लष्कराला रायफल्स हव्या आहेत? तो देईल नफा घेऊन. कोणाचं लष्कर, कुठलं लष्कर; काही विधिनिषेध नाही. ज्याला कुणाला हत्या करायची आहे अशा कुणालाही तो शस्त्र विकणार. मारणं काय, मरणं काय, दोन्ही एकच आहे त्याच्यासाठी. गुलामांचा बाजार आहे म्हणता? निघाला हा तिथेही. आपण कॉफी, मसाले, शहामृगाची पिसं विकली; मग गुलाम का नाही विकायचे? एकमेकांना ठार मारा असं ‘त्यानं’ कधी म्हटलंय का? की ‘त्यानं’ म्हटलंय- गुलाम व्हा म्हणून त्यांना? पण इतर करतायतच ते, तर त्यानं का नाही त्याचा फायदा घेऊ? छानपकी घसघशीत फायदा घेऊन, पसे जमवून तो एक दिवस कदाचित छान निवांत होईल, एखाद्या अनाथ मुलीशी लग्न करील.
व्यापारामध्ये आता त्याच्यासाठी काहीही निषेधार्ह, अभद्र उरलेलं नाही. काय फरक पडतो? हे आता त्याचं जग राहिलेलं थोडंच आहे! नक्कीच नाही. ह्य जगातनं तर तो बाहेर पडला ते मागल्या दारानं पुन्हा आत येण्यासाठी. सगळंच किती ओळखीचं वाटतं नाही? काही सडल्याचा गंध तर जुन्या आठवणी जागवतो. घोडय़ाच्या मांसाचा जळका वास (की त्याचंच मांस आहे ते?) त्याच्या नाकपुडय़ांच्या ओळखीचा आहे. अशा रीतीनं ज्याच्या ज्याच्याबद्दल त्याला घृणा होती त्या सगळ्यांची भुतं त्याच्या डोळ्यांसमोर आता नाचताहेत. त्यानं कधी कुणाला दुखवलं नाही. कधीच नाही. जमलं तसं त्यानं थोडंफार बरंच केलं. पण त्याला बदल्यात मिळालं काय, तर घाण. आता त्यानं थोडं स्वत:साठी काही घेतलं, मिळवलं, तर तुम्ही काय त्याच्या नावानं बोटं मोडणार? असं त्याचं स्वगत चाललेलं अबिसिनियामध्ये. तो सर्वश्रेष्ठ का, तर आता तो हृदयशून्य आहे म्हणून. अशीच सही तो करायचा- ‘हृदयशून्य’ अशी. आणि त्यानं आपल्या आयुष्याची अठरा र्वष स्वतचं काळीज तोडण्यात घालवावी? बोदलेरनं आपलं काळीज फक्त दाखवलं; रँबो ते तोडूनच बाहेर काढतो आणि सावकाश ते खातो.
आणि मग जग शापभस्म झाल्यासारखं दिसतं. आकाशातून मेलेले पक्षी धरणीवर पडतात. जंगली श्वापदं धावत समुद्राकडे जातात व त्यात बुडतात. गवत वाळतं. बीज कुजतं. निसर्ग कंगालासारखा वांझ, उनाड दिसतो. आणि आकाशात पृथ्वीवरचीच ओसाडी दिसते. उकळणाऱ्या डांबराच्या तळ्यांवरून रानटी घोडय़ावर आलेला कवी त्या घोडय़ाचाच गळा चिरतो. त्याचे जुजबी पंख तो व्यर्थ फडफडवतो. एक अतिसुंदर संगीतिका संपून कर्कश्श ओरडणारे वारे धावू लागतात. अतिप्राचीन अशा चेटकिणी सोडल्या तर माळरानावर कोणीही आता राहिलेलं नाही. हातातल्या आकडय़ांनिशी त्या त्याच्यावर तुटून पडतात व ते त्याच्या अंगात रुतवतात. नरकातली संगीतसभा त्याला हवी होती, ती आता परिपूर्णतेनं त्याच्या वाटय़ाला आली आहे. ‘हे जीवन आहे का? कोणास ठाऊक. आपण अखेराला आलो, एवढंच खरं.’
स्वत:मधले दैत्य नष्ट करण्याच्या लढाईत त्याच्या शत्रूलासुद्धा सुचणार नाही असं आयुष्य रँबो जगला. त्याचं जगणं त्याच्या निरागसपणातून आलेलं होतं. त्याच्या मनाच्या अनाघ्रातपणानंच त्याला असं हट्टी केलं होतं. त्याच्यातलं देवदूत-दैत्य हे द्वैत त्याला अखेपर्यंत दूर करता आलं नाही. त्याला स्वत:पण सापडलं नाही, म्हणून तो अनेक रूपं घेता झाला. आधुनिक माणसाचं हेच नशीब आहे. तो मरत नाही. तो एखादा पुतळा ढासळावा तसा ढासळतो, वितळतो, शून्यात नाहीसा होतो.
पण रँबोच्या अतिशयोक्त ऐहिकतेला आणखी एक आयाम आहे. शरीरानं, मनानं सत्य धारण करण्याची त्याची इच्छा ही एका वेगळ्या स्वर्गाची इच्छा आहे. स्वतचा नरक ज्यानं विनाशर्त स्वीकारला आहे तो एका अनुग्रहित अवस्थेला पोचतो आणि स्वतच निर्माण केलेला स्वर्ग शोधून काढतो. हे एक प्रकारचं पुनरुत्थान आहे. माणसाची नियती तोच घडवतो असा त्याचा अर्थ आहे. रँबोनं माणसाला पृथ्वीवर- ह्य पृथ्वीवर पुनस्र्थापित करण्याचा प्रयत्न केला. पूर्णार्थानं. मृत शरीराहून वेगळं असं आत्म्याचं चिरंतनत्व स्वीकारायचं त्यानी नाकारलं. त्याचवेळी आत्मे नसलेल्या माणसांचा, जीवनाला फक्त राजकीय आणि आर्थिक केंद्रिबदूच असलेल्या माणसांचा समाजही नाकारला. त्याच्या सर्व कारकीर्दीत त्यानं जी भयचकित करणारी ऊर्जा दाखवली ती त्याच्या माध्यमातून काम करीत होती. तो आकाशातील बाप आणि त्याचा पुत्र नाकारतो, पण तो ‘होली घोस्ट’ नाकारत नाही. तो सृजनाची भक्ती करणारा आहे. सृजनाला उन्नत करणारा आहे. त्याला हा ज्वरच चढला आहे, आणि त्यातून ‘विनाशाची गरज’ निर्माण होते. हा विनाश काही बेबंद, सूडानं पेटलेला विनाश नाही; तर नवं पीक तरारून यावं म्हणून आधी जमीन जाळावी लागते तसा आहे. त्याचा हेतूच मुळी आत्मसूत्राला अर्निबध स्वातंत्र्य हा आहे. त्यानं देवाला काही नाव दिलं नाही, त्याची व्याख्या केली नाही, की त्याला अमर्याद केलं नाही. त्यानं फक्त असा प्रदेश निर्माण करण्याचा प्रयत्न केला, की जिथे देवकल्पना रुजेल. त्याच्याजवळ परमेश्वराशी सलगी दाखवणाऱ्या, त्याच्याशी रोज बोलणाऱ्या धर्मगुरूंचा सवंगपणा नव्हता. एक उन्नत असा आत्म्यांचा संवाद असतो हे रँबोला ठाऊक होतं. हा संवाद संपूर्ण स्तब्धतेत, परमादरानं, नम्रतेनं होतो, असं म्हणणारा रँबो पाखंडानं नाही, तर भक्तीभावनेनंच भरलेला आहे.
‘‘केवढा कंटाळा! मी काय करतोय इथं?’’ अबिसिनियामधून तो लिहितो. मातीत गाडल्या गेलेल्याची ती किंकाळी आहे. आपण विजनवासी होणार, असं आपलं भविष्य त्यानं आधीच वर्तवलं होतं. त्याच्या त्या विजनवासाबद्दल बोलताना रिकवर्ड म्हणतो : ‘‘शरीराचा सापळा सोडल्यानंतर एका दैवी निष्कलंकपणामध्ये राहता यावं, एक निíलप्त अवस्था यावी अशाचा तो शोध घेत होता.’’ रँबो मात्र विझलेल्या ज्वालामुखीसारखा होता. ह्यतून तो बाहेर पडला ते स्वत:ला त्याच्या किशोरावस्थेत संपवून टाकण्यासाठीच. तिथेच तो आता आहे युवा सूर्यासारखा.
परिपक्व न होण्याची त्याची ही वृत्ती; तीमध्येसुद्धा एक करुण भव्यता आहे. त्यानं विचारलं असतं, ‘परिपक्व’ कशात? माणूस होऊन गुलामी करण्यासाठी, खच्चीकरणासाठी? त्याला रसरसून मोहोर आला होता; पण फुलं? फुलं होणं म्हणजे गळून पडणं.. एक प्रकारचं अध:पतन. कळी असतानाच नाहीसं होणं तो निवडतो. त्याच्या स्वप्नांचा विच्छेद झाला तरी चालेल, पण ती डागाळता कामा नयेत. झगमगणाऱ्या, पूर्णत्व असलेल्या जीवनाची झलक त्यानं पाहिली होती. आता खालमान्या नागरिक होऊन तो त्या क्षणभर दिसलेल्या वैभवाचा विश्वासघात करणार नव्हता.
एकटा, दिशाहीन; तो टोकालाच जातो. अनुभवाचे प्रदेश- निदान आपल्याला माहीत असलेले- तो भोगून संपवून टाकतो. त्याचे पंख तो कोषात असतानाच सडतात आणि त्या कोषाच्या बाहेर यायलाच तो तयार नाही. तो त्याच्या सृजनाच्या गर्भातच मृत्यू पावतो. परित्यागाचं हे एक अनसíगक रूप हे त्याचं खास योगदान आहे. आत्मरती हा ह्य चित्राचा दुसरा आयाम आहे- नार्सिसिंझम. आणि तो एक मोठीच भीती उभी करतो- व्यक्तित्वहीन होण्याची. ज्या विस्मृतीच्या प्रदेशात विरघळून जाण्याची आस त्यानं एकेकाळी धरली, त्याच प्रदेशात त्याचा आत्मा शापित होऊन तळमळत राहिला. त्याचीच स्वप्नसृष्टी त्याला गिळंकृत करते, गुदमरवते, त्याचा गळा दाबते. त्यानंच निर्मिलेल्या साधनांनी तो प्राणहीन पेंढा भरलेला ‘ममी’ होतो.
मी त्याला तरुणांचा कोलंबस म्हणतो. अर्धवटच शोधलेल्या प्रदेशाच्या कक्षा त्यानं विस्तारल्या. प्रौढपणा सुरू झाला की तारुण्य संपतं म्हणतात. तसा ह्यला काही अर्थ नाही. इतिहास जेव्हापासून आपल्याला ज्ञात आहे तेव्हापासून माणसानं ना तारुण्य शिगोशीग भोगलं, ना त्यानं प्रौढपणात अनुस्यूत असलेल्या अनंत शक्यता अनुभवल्या. जर एखाद्याची सर्व ऊर्जा त्याच्या पूर्वजांच्या व मातापित्यांच्या चुकांशी, खोटेपणाशी लढण्यातच खर्च झाली, तर त्याला यौवनाचा भरघोसपणा व वैभव कधी अनुभवता येणार? मृत्यूची पकड सोडवण्यातच तरुणांनी आपली शक्ती वाया घालवायची का? बंड करणं, नाश करणं, हत्या करणं हे का तरुणांचं ह्य पृथ्वीवरचं ध्येय असू शकतं? तरुणांचं फक्त बलिदानच व्हायला हवं का? ह्य तरुणांच्या ‘स्वप्नांचं’ काय? ही स्वप्नं म्हणजे वेडेपणा असं समजायचं का? स्वप्नं म्हणजे कल्पनाशक्तीला आलेला फुलोरा आहे. त्यांना पण विशुद्धपणे जगण्याचा हक्क आहे. तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा कराल तेव्हा सर्जनशील माणसाचीच हत्या तुम्ही करता. जिथे जातिवंत तरुण नाहीत, तिथे जातिवंत प्रौढही नाहीत. समाज म्हणजे मोडक्यातोडक्या गोष्टींचं संमेलन असेल तर हा उद्योग आपल्या शिक्षकांचा- आपल्याला वळण लावणाऱ्यांनी करून ठेवलाय, असा नाही का त्याचा अर्थ होत? काल काय किंवा आज काय, आपल्या मनासारखं जगणाऱ्या तरुणाला तसं जगावं अशी जागाच नाही; म्हणून तो आपल्याच स्वनिर्मित कबरीत स्वत:ला जिवंत गाडून घेतो. रँबोबद्दल म्हटलं गेलंय की, जगातल्या सर्व सुखांना त्यानं धिक्कारलं. त्याचं कौतुक नको का वाटायला आपल्याला ह्यसाठी? रँबोचं हे हट्टी वागणं होतं. त्याचा अर्थ होता : कशाला आपण कुजणं आणि मरणं फक्त- ह्यत भर घालायची? नकाराचे व व्यर्थतेचे नवीन राक्षस कशाला जन्माला घालायचे? समाजानं आपलं कुजणारं प्रेत आता नष्ट करावं. आपण नवी धरणी, नवा स्वर्ग मिळवू या. कोलंबसाची होती तशी रँबोची ‘प्रॉमिझ्ड लँड’ होती व तिच्याकडे जाण्याचा तो रस्ता शोधत होता. त्याच्या वैतागवाण्या तारुण्यात तो बायबल आणि रॉबिनसन क्रुसो असल्या पुस्तकांवर पोसला गेला होता. त्याचं एक विशेष आवडतं पुस्तक होतं- ‘L’Habitation en Delsert’- वाळवंटातला निवास. हा एक खासच योगायोग, की बालपणीसुद्धा तो वाळवंटात राहिला, जे पुढे त्याच्या जीवनाचाच ऐवज झालं. इतक्या लहानपणीसुद्धा त्यानं स्वत:ला असं इतरांपासून तुटलेला, एकाकी, सभ्यतेपासून फारकत घेतलेला म्हणून पाहिलं होतं का?
रँबोला डाव्या डोळ्यानी व उजव्या डोळ्यानी पाहता येत होतं. मी अर्थातच आत्म्याच्या डोळ्यांबद्दल बोलतोय. एका डोळ्यानं तो चिरंतनाकडे पाहू शकत होता, दुसऱ्यानं काळ आणि चराचर ह्यंच्याकडे. The Little Book of the Perfect Life ह्य पुस्तकात लिहिलंय तसं. ‘पण आत्म्याचे हे दोन्ही डोळे एकाच वेळी पाहू शकत नाहीत. उजव्या डोळ्यानं चिरंतनावर दृष्टी लावली तर डावा डोळा मिटावा लागतो आणि त्याचं काम थांबतं.’
रँबोनं चुकीचा डोळा बंद केला का? नाहीतर त्याच्या स्मृतिभ्रंशाचा अर्थ आपण लावायचा कसा? जगाशी लढण्यासाठी त्यानं एक दुसरं व्यक्तित्व चिलखतासारखं घातलं खरं; पण त्यानं तो अभेद्य झाला का? खेकडय़ासारखं कठीण कवच होतं त्याचं; पण न तो नरकासाठी योग्य झाला, न स्वर्गासाठी. कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही प्रदेशात नांगर टाकणं त्याला जमलं नाही. त्याला पाय टेकवायलाही जागा मिळत नाही; फार तर अंगठा टेकवायला मिळते. ‘फ्यूरीज’नं पाठलाग केल्यासारखा तो एका अतिरेकाकडून दुसऱ्या अतिरेकाकडे निर्ममपणे ढकलला जातो.
काही बाबतीत त्याच्यामध्ये थोडंही ‘फ्रेंचपण’ नव्हतं. त्याच्या तरुणपणात तर नव्हताच त्याच्यात तो ‘फ्रेंचपणा’! सगळ्या फ्रेंचांना ज्याचा तिटकारा आहे तो अवघडलेपणा, अडाणीपणा त्याच्यात जबरदस्तपणे एकत्र झालाय. चौदाव्या लुईच्या दरबारात एखादा व्हायकिंग जेवढा विचित्र दिसला असता तितका तो विचित्र दिसायचा. त्याच्या दोन महत्त्वाकांक्षा- ‘नवीन पर्यावरण निर्माण करायचं आणि त्याला सुसंवादी अशा नवीन कला.’ त्याच्या काळात एखाद्या मूíतभंजकाला मूर्तिपूजन जेवढं जवळचं वाटेल, तेवढय़ाच ह्य कल्पना वैध होत्या. आफ्रिकेहून लिहिलेल्या त्याच्या पत्रांमध्ये रँबो सांगतो, की युरोपियन माणसासारखं जगणं त्याला किती अशक्य आहे ते. तो तर कबूल करतो, की युरोपियन भाषाही त्याला परक्या झालेल्या आहेत. लहानपणापासून त्याच्यात असलेला उग्र हिंस्रपणा त्याच्या वयाबरोबर वाढतच गेला; आणि तो त्याच्या बंडखोरीऐवजी त्यानं ज्या तडजोडी केल्या त्यात जास्त दिसला. तो कायमचा बाहेरचा राहतो, एकटा जगतो, त्याला मुकाटय़ाने ज्या गोष्टी अंगीकाराव्या लागल्या त्याच्याबद्दल तुच्छता बाळगतो. जग जिंकण्याच्या मनीषेपेक्षा ते तुडवण्याची मनीषा त्याच्यात अधिक आहे.
झेबू स्वप्न पाहतं तेव्हा त्यानंही पाहिली. कसली, ती मात्र आपल्याला माहीत नाही. आपण फक्त त्याच्या तक्रारी व मागण्या ऐकतो; त्याच्या आशाआकांक्षा आणि प्रार्थना मात्र नाही. त्याचा संताप व कडूझारपणा आपल्याला दिसतो; पण त्याचा कोमलपणा, त्याची तृष्णा दिसत नाही. रोजच्या जगण्यातल्या अनंत तपशिलांत तो मनानं अडकलेला आपल्याला दिसतो आणि आपल्याला वाटतं की, त्याच्यातला स्वप्न पाहणारा मारला गेलाय. हे खरंय, की त्याच्या स्वप्नांचा गळा दाबला गेला होता. ती होतीच तशी अवास्तव. भव्य. हेही शक्य आहे, की अस्सल वेडा असून वेडा नसल्याचं त्यानं हुशारीनं दाखवलं; त्या झळाळणाऱ्या, त्यानंच निर्माण केलेल्या क्षितिजावर तो मावळू नये म्हणून. त्याच्या उत्तरायुष्यातल्या त्याच्या आंतरजीवनाबद्दल आपल्याला काही माहीत नाही. काही म्हणजे काहीच नाही. त्यानं स्वत:ला मिटवून टाकलं होतं. तो कधी उकललाच, तर फक्त गुरगुरण्यासाठी, कण्हण्यासाठी, शाप देण्यासाठीच. तारुण्याच्या आक्रमकपणाविरोधात त्यानं वेडाची शरणागती उभी केली. ह्य दोन प्रदेशांमध्ये एकच गोष्ट होती- सुसंस्कृत माणसाचा फसवा परिपक्वपणा. हा मधला प्रदेश डरपोक मर्यादांचाही होता. त्याला संत सामथ्र्यवान वाटत, आश्रमवासी कलावंत वाटत, ह्यत काहीच आश्चर्य नाही. जगापासून स्वतंत्र राहण्याची, परमेश्वर सोडून सगळ्याला विरोध करण्याची त्यांची ताकद होती. झुकणारे, सरपटणारे, आपली सुखशांती नष्ट होईल म्हणून प्रत्येक खोटय़ाला हो म्हणणारे ते किडे नव्हते. आणि संपूर्णपणे नव्यानं जगायलाही ते भीत नव्हते. असं असलं तरी जगापासून तुटून अलग राहावं अशी काही रँबोची इच्छा नव्हती. कोणी केलं नसेल एवढं प्रेम तो जगावर करीत होता. जिथे जिथे तो गेला तिथे तिथे त्याची कल्पनाशक्ती त्याच्या आधीच पोचलेली असे व तिनं तिथे स्वर्गसुंदर प्रदेश पाहिलेले असत व जे अंतिमत: कायम मृगजळ असत. त्याचं घेणंदेणं फक्त अज्ञाताशी होतं. त्याच्यासाठी पृथ्वी म्हणजे पश्चात्तापदग्ध, दु:खी आत्म्यांचं निवासस्थान नव्हतं, तर जिथे माणसं त्यांनी ठरवलं तर राजासारखी राहू शकतात अशी जिवंत, चतन्यमयी, रहस्यमयी जागा होती. ह्य सगळ्याचं ख्रिश्चानिटीनं बिनसवलं होतं. आणि प्रगतीची वाटचाल मेलेली वाटचाल होती. मागं वळा! पौर्वात्यांनी जे वैभव मागे सोडलं आहे तिथून सुरुवात करा! सूर्यावर दृष्टी खिळवा, जीवनाला प्रणाम करा, ह्य जीवनरहस्याचा सन्मान करा! त्यानं पाहिलं होतं की विज्ञान ही धर्माइतकीच मोठी फसवणूक झालेली होती, राष्ट्रवाद हा विनोद होता, देशभक्ती म्हणजे फसवणूक, शिक्षण महारोग आणि नीती नरमांसभक्षक झालेली होती. प्रत्येक तीक्ष्ण बाण त्यानं लक्ष्यावर अचूक मारला. ह्य सोनेरी केसांच्या, निळ्या डोळ्यांच्या सतरा वर्षांच्या पोराइतकी कोणाचीही दृष्टी स्पष्ट नव्हती, कोणाचंही ध्येय अधिक खरं नव्हतं. ‘मरोत ते म्हातारे! सगळे कुजले आहेत!’ चारीदिशाला ह्यची फैर सुरू. पण तो त्यांना जरा जमिनीवर लोळवत नाही तर ते पुन्हा त्याच्याकडे टवकारून पाहायला लागतात. तो स्वत:शीच विचार करतो की, मातीची कबुतरं मारण्यात काही अर्थ नाही. नाही, हे उद्ध्वस्त करायचं तर जास्त मारक हत्यारं हवीत. पण ती त्याला मिळणार कुठे?
इथे सतानानं आपला पाय रोवला असणार. तो रँबोला काय म्हणाला असेल त्याची कल्पना करू शकतो आपण.. ‘‘असंच चालत रालास तर किडय़ामकोडय़ांच्या जगात पोचशील. मेलेल्यांना आपण मारू शकू असं तुला वाटतं का? ते माझ्यावर सोड तू. मी मेलेलेच खातो. दुसरं असं की, तू अजून पालंच काय आहेस ? इतके गुण तुझ्यात.. तू नुसतं म्हणायचा अवकाश, की जग लोळण घेईल तुझ्या पायावर. अरे, तू सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहेस, कारण तू हृदयशून्य आहेस. कशासाठी तू ह्य सडणाऱ्या, चालत्याबोलत्या अस्थिपंजरांसोबत रेंगाळतोयस्?’’ त्यावर रँबो म्हणाला असणार, ‘बरं!’ ह्यपेक्षा कमी नाही की जास्ती नाही. फॉस्ट त्याचं स्फूíतस्थान होता. पण फॉस्टनं किंमत मागितली तशी किंमत मागायचं हा विसरला. किंवा हा इतका उतावीळ झाला होता, की ह्य सौद्याच्या अटी ऐकण्यापुरताही त्याला धीर नव्हता. हीही शक्यता आहे, की हा इतका भाबडा होता, की असा काही सौदा इथं आहे हेही त्याच्या लक्षात आलं नाही. निष्पाप होताच तो; हरवलेला निष्पाप. त्याच्या ह्य निष्पापपणामुळंच तर त्याला वाटत होतं की, अशी एक प्रॉमिझ्ड लँड आहे, की जिथे तरुणांचं राज्य आहे. त्याचे केस पांढरे झाले तरी त्याचा हाच विश्वास होता. रोशे सोडतानाही मास्रेयला जाऊन आपण मरणार हे त्याला ठाऊक नव्हतं. तो निघणार होता नव्या जगाच्या मुशाफिरीला. त्याचं मुख सदोदित सूर्याकडे वळलेलं..
..आणि दूरवर, एखाद्या मागे सरकणाऱ्या मृगजळासारखी ती सुंदर गावं. आणि वरच्या निळाईत पृथ्वीवरची माणसं चालतायत. सगळीकडे संगीतिकाच संगीतिका- त्याची, इतरांची; सृजनातून सृजन, कमले कमलोत्पत्ति: होतेय, अनंतता आपल्या पोटात अनंतता घेतेय.
स्वत:ची इतकी घोर फसवणूक आणखी कोणी करून घेतल्याचं मला माहीत नाही. इतर कोणा माणसाची हिंमत होणार नाही इतकं आणि असं त्यानं मागितलं आणि त्याच्या लायकीपेक्षा त्याला अतिशय कमी मिळालं. स्वत:च्याच कडवटपणानं, निराशेनं त्याची स्वप्नं जंगून गेली. पण आपल्यासाठी मात्र ती नवजातासारखी शुद्ध, निष्कलंक आहेत. ज्या भ्रष्टतेतून तो स्वत: गेला, त्याचा एवढाही व्रण आता शिल्लक नाही राहिलेला. अग्नीनं शुद्ध झालेलं सगळं- पांढरंशुभ्र, तळपणारं, थरथरणारं, चतन्यमय असं फक्त उरलेलं आहे. हृदय नावाच्या अतिकोवळ्या जागी रँबोचा निवास आहे. जे जे भग्न झालेलं आहे- विचार, आचार, काम, जीवन- त्या सगळ्यात हा आर्देनीचा अभिमानी राजपुत्र आहेच.
त्याच्या आत्म्याला शांती मिळो!(समाप्त)
महेश एलकुंचवार
(c) 1946-1949-1956 by New Directions Publishing Corporation
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा