‘The Time of the Assassins’ या हेन्री मिलर यांच्या ललितबंधाचा ज्येष्ठ नाटककार आणि साहित्यिक महेश एलकुंचवार यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला प्रवाही अनुवाद.. ‘विनाशवेळा’! भाग १
१९२७ साली ब्रुकलीनमधल्या एका दमट-कोंदट घराला असलेल्या तळघरात रँबोचं नाव घेतलेलं मी प्रथम ऐकलं. मी तेव्हा छत्तीस वर्षांचा होतो आणि अंत नसलेल्या अशा स्वत:च्याच नरकवासात खोल पुरला गेलो होतो. रँबोवरचं एक वाचनीय पुस्तक घरातच होतं; पण त्यावर मी साधी नजरही टाकली नाही. कारण एकच. जी बाई तेव्हा आमच्याबरोबर राहत होती व जिची मला अगदी पोटातून घृणा वाटत होती, त्या बाईचं ते पुस्तक होतं. पुढे मला शोध लागायचा होता, की ती दिसायला, वागायला, स्वभावानं, आपल्याला जेवढी म्हणून कल्पना करता येईल तेवढी अगदी रँबोसारखी होती.
थेल्मा आणि माझी बायको, दोघींसाठीही रँबो म्हणजे भान हरपून बोलत राहण्याचा विषय होता. मी मात्र त्याच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. उलट, त्याची माझ्या मनाबाहेर हकालपट्टी करण्याचेच मी शर्थीनं प्रयत्न केले. मला वाटायचं की, अजाणतेपणानं का असेना; पण हाच प्रतिभावंत दुष्टात्मा माझ्या तडफडीला व दु:खाला कारण आहे. जिची मला घृणा होती ती थेल्मा तर त्याच्याशी जशी एकरूपच झाली होती. इतकी, की ती जमेल तितकं त्याच्याचसारखं वागण्याचा प्रयत्न करायची. त्याचं नाव, त्याचा प्रभाव, त्याचं अगदी अस्तित्वसुद्धा मी झटकून टाकावं अशाच सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या होत्या. त्या काळात मी अगदी तळ गाठला होता आपल्या कारकीर्दीचा. माझ्या मनोधर्याच्या ठिकऱ्या उडालेल्या होत्या. मला आठवतंय की कसा मी गारठलेल्या, ओल आलेल्या तळघरात फडफडणाऱ्या मेणबत्तीच्या प्रकाशात पेन्सिलनी काही लिहिण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या स्वत:च्याच दु:खान्तिकेचं नाटक लिहिण्याचा मी प्रयत्न करीत होतो. पहिल्या अंकानंतरच ते मी सोडून दिलं होतं.
अशा नराश्यानं ग्रासलेल्या वांझोटय़ा मन:स्थितीत ह्य सतरा वर्षांच्या कवीच्या प्रतिभेबद्दल मी कमालीचा साशंक होतो. त्याच्याबद्दल मी जे सगळं ऐकत होतो ते सगळं त्या महागाढव थेल्माच्या अकलेचे तारे असणार. मला खात्रीच होती की, मला छळण्यासाठीच ती सूक्ष्म बारकेसारके उपद्रव शोधून काढतीय म्हणून. कारण मला तिच्याबद्दल जेवढा द्वेष वाटे, तेवढाच तिला माझ्याबद्दल. आम्ही तिघं मिळून जे जगत होतो ते म्हणजे दोस्तोयवस्कीच्या एखाद्या कहाणीतल्या तुकडय़ासारखं होतं. ‘द रोझी क्रुसिबल’मध्ये विस्तारानं मी बोललोय त्याबद्दल. आता ते खरं वाटत नाही; अविश्वसनीय वाटतं अगदी.
तरीसुद्धा मुद्दा असा की, रँबोचं नाव मनात घट्ट राहिलं. पुढली सहा-सात वष्रे त्याच्या कामाकडे मी साधा कटाक्षही टाकणार नव्हतो; पण आने नॅनच्या लुव्हसॅनच्या घरात त्याचं अस्तित्व मला सतत जाणवे. अतिशय अस्वस्थ करणारं होतं त्याचंअस्तित्व. ‘केव्हा न् केव्हा करावेच लागतील माझ्याशी दोन हात तुला!’ त्याचा आवाज सतत माझ्या कानात. रँबोची पहिली ओळ ज्या दिवशी मी प्रथम वाचली त्या दिवशी मला एकदम आठवलं की, ज्या कवितेबद्दल थेल्मा भरभरून बोलायची ती हीच कविता होती. छी इं३ीं४ क४१ी. ‘बुडणारी बोट’. नंतर मी जे काही भोगणार होतो त्याला किती अन्वर्थक होतं हे शीर्षक. एवढय़ात मग थेल्मा मेली वेडय़ांच्या इस्पितळात; आणि मी पॅरिसला गेलो नसतो, तिथे उत्कटपणानी काम करीत रालो नसतो तर माझी तीच गत झाली असती.
ब्रुकलीन हाईट्सच्या त्या तळघरात माझी बोट फुटली होती. तिचे तुकडे तुकडे झाले व मी अफाट समुद्रात फेकला गेलो तेव्हा मला कळलं- आपण मुक्त झालो. ज्या मरणभोगातून मी जात होतो त्यानंच मला मुक्ती मिळाली होती.
ब्रुकलीनमधलं माझं आयुष्य ‘सीझन इन हेल’चं प्रतिनिधित्व करत असलं, तर मग पॅरिसमधला काळ, विशेषत: १९३२ ते १९३४ च्या दरम्यानचा, माझं अंतरंग प्रकाशित होण्याचा काळ होता.
मी ह्य (पॅरिसमधल्या) वास्तव्यात कधी नव्हे इतका बहुप्रसव, आनंदानं उसळत असलेला, अगदी वेगळ्याच भव्योदात्त उंचीवर असताना हा रँबो माझ्या वाटय़ाला आला तेव्हा त्याला मी बाजूला ढकलूनच दिलं. माझीच निर्मिती ह्यवेळी मला कशाहीपेक्षा अधिक महत्त्वाची होती. त्याच्या लेखनावर मी नुसती नजर टाकली मात्र; आणि आपल्या पुढय़ात काय वाढून ठेवलंय ते मला कळलंच. स्फोटक बारुदच होता तो, निभ्रेळ अगदी; पण आधी मला माझी काडी फेकणं आवश्यक होतं. त्यावेळी मला त्याच्या जीवनाबद्दल काही माहिती नव्हती. खूप वर्षांपूर्वी थेल्मानं त्याच्याबद्दल काय दोन-चार तुकडे माझ्यासमोर टाकले असतील तेवढेच. त्याच्या चरित्राची एक ओळही मी वाचलेली नव्हती. मग १९४३ मध्ये जॉन डडलीबरोबर बीव्हर्ली ग्लेनला राहत असताना मी प्रथम रँबोबद्दल वाचलं. मी ज्याँ मारी कारेचं ‘अ सीझन ऑफ हेल’ वाचलं व त्यानंतर एनिड स्टार्कीचं लेखन. मी कासावीसच झालो. वाचाच गेली माझी. मला वाटलं की, रँबोच्या शापित जीवनाइतकं दु:खद मी दुसरं काही वाचलेलं नाही. त्याच्यापेक्षा माझा भोगवटा मोठा होता, तरी तोसुद्धा मी विसरलो पूर्ण. मला आलेलं नराश्य, मी सोसलेली मानखंडना, ज्या विषण्णतेच्या व नाकत्रेपणाच्या गाळात मी रुतलो गेलो होतो वारंवार, ते सगळं मी विसरलो. पूर्वी थेल्मा बोलायची तसा मीसुद्धा आता रँबोशिवाय दुसऱ्या कशावर बोलू शकत नव्हतो. जो कोणी माझ्या घरी येई त्याला माझं रँबोबद्दलचं गाणं ऐकावं लागेच लागे.
आता आता, त्याचं नाव ऐकून अठरा वष्रे झाल्यानंतर तो मला स्पष्ट दिसतोय आणि एखाद्या द्रष्टय़ासारखं मला त्याला समजून घेता येतंय. आता मला कळतंय- त्याचं योगदान किती मोठं होतं, त्याची होणारी फरफट किती भयंकर होती. त्याच्या आयुष्याचा व साहित्याचा अर्थ मला आता कळतोय. म्हणजे एखाद्याला दुसऱ्याच्या आयुष्याचा व कामाचा अर्थ जितपत कळू शकेल तेवढाच, अर्थात. पण मला स्पष्ट जाणवतेय ती एक गोष्ट. नियतीनं त्याच्या वाटय़ाला दुर्दैवाचे जे दशावतार आणले त्यातून माझं भाग्य मोठं म्हणूनच मी सुटलो.
वयाच्या अठराव्या वर्षी रँबोच्या आयुष्यात अटीतटीचा क्षण आला. वेड लागण्याच्या काठावर तो ह्यवेळी पोचलेलाही होता. इथून पुढे मग त्याचं आयुष्य म्हणजे एक असीम वाळवंटच आहे. माझ्या आयुष्यात अशी अटीतटी यायला माझं छत्तीसावं वर्ष यावं लागलं. रँबो त्या वयात हे जग सोडूनही गेला होता. मी मात्र ह्य वळणावर आल्यावर उमलू लागलो. रँबो साहित्याकडून जगण्याकडे वळला; माझं उलटं झालं. रँबो आपण स्वत:च निर्माण केलेल्या भ्रमजालापासून दूर पळाला; मी त्यांना गळामिठी घातली. चुका करून, आयुष्याचा अनुभव उधळून मी ताळ्यावर आलो होतो. पण मग मी थांबलो आणि माझी ऊर्जा निर्मितीसाठी खर्चली. जीवनात ज्या उत्कटतेनं मी स्वत:ला झोकून दिलं होतं, त्याच उत्कटतेनं व उत्साहानं मी स्वत:ला लिहिण्यात झोकून दिलं. आयुष्य वाया घालवण्याऐवजी मी ते मिळवलं. चमत्कारामागून चमत्कार घडले. प्रत्येक दुर्दैवी घटना चांगल्यातच परिवíतत झाली. रँबोनं विश्वास बसणार नाही आपला- अशा हवामानात, प्रदेशात, त्याच्या कवितेइतक्याच अपूर्व आणि चमत्कारिक फँटसी वाटेल अशा जगात उडी घेतली. तो अधिकाधिक कडवट, अबोल, रिकामा आणि दु:खी झाला.
रँबोनं जीवनाला साहित्याची प्रतिष्ठा दिली; मी साहित्याला जीवनाची प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न केला. आम्हा दोघांमध्येही कबुलीजबाब देण्याची प्रवृत्ती तीव्र आहे, आमचा नतिक आध्यात्मिक ध्यास अग्रक्रमावर आहे. भाषेबद्दलची खास प्रेरणा, साहित्यापेक्षा संगीत अधिक आवडणं- हा दुसरा आम्हाला जोडणारा दुवा. रँबोमध्ये आदिम असं काहीतरी आहे आणि ते विचित्र पद्धतीनं अभिव्यक्त होतं असं मला कायम वाटत आलेलं आहे. ‘ओसाडीतला योगी’ असं क्लॉडेल रँबोबद्दल म्हणतो. ह्यच्याहून त्याचं अधिक समर्पक वर्णन करता येणार नाही. तो कुणाचाही नव्हता. कधीही, कुठेही. मलाही स्वत:बद्दल नेहमीच तसं वाटत आलेलं आहे. ह्य तुलनेला अंत नाही. मी त्याच्याबद्दल तपशीलवार बोलणार आहे, कारण त्याची चरित्रं आणि पत्रं वाचताना हे साधम्र्य मला इतकं स्वच्छ दिसलं, की ते नोंदवून ठेवण्याचा मोह मला आवरता येत नाहीए. असं वाटणारा मी एकच खास आहे असं नाही. मला वाटतं, ह्य जगात अनेक रँबो आहेत आणि दिवसागणिक ते वाढतच जाणार आहेत. येणाऱ्या जगात, मला वाटतं, हॅम्लेट आणि फाऊस्टपेक्षा रँबोच जास्त असणार आहेत. अधिकाधिक दुभंगत जाणं हाच आताचा युगधर्म. जुनं जग पूर्णपणे मेल्याशिवाय, ‘अॅब्नॉर्मल’ असणं माणूस म्हणून, हीच एक रीत अधिकाधिक घट्ट होईल. समूह व व्यक्ती ह्यंच्यातली लढाई संपेल तेव्हाच माणसाला त्याचं स्वत:पण सापडेल. असं होईल तेव्हाच ‘मानुष’ आपल्या परिपूर्णतेनं व तेजानं झळाळून उठेल.
अठरा र्वष जो नरकवास रँबोनं भोगला त्याचा गूढार्थ पूर्णपणे कळायचा, तर त्याची पत्रं वाचायला पाहिजेत. ह्य काळात सोमाली आणि एडन इथं बरीच वर्षे त्यानं व्यतीत केली. त्यानं आईला लिहिलेल्या एका पत्रात पृथ्वीवरच्या ह्य नरकाचं वर्णन आहे.
‘‘तुला ह्य जागेची कल्पनाही करता येणार नाही. एकसुद्धा झाड, अगदी कोळपून गेलेलंसुद्धा, इथं नाही; मातीचं एक ढेकूळ नाही. एडन म्हणजे विझलेल्या ज्वालामुखीनं तयार झालेलं विवर आहे, आणि ते समुद्रातल्या वाळूनं भरलेलं आहे. त्यातून काही उगवणं शक्यच नाही. सगळीकडे लाव्हा आणि रेती. आणि त्याचा भवतालही वाळवंटाच्या रेतीनं भरलेला. ह्य विवराच्या कडांमुळे हवा आत येतच नाही आणि आम्ही चुनाभट्टीत भाजल्यासारखे भाजून निघतो.’’
एवढी प्रतिभा असलेला, प्रचंड ऊर्जा असलेला, प्रचंड निर्मितीक्षमता असलेला हा माणूस अशा भयानक बिळात स्वत:ला कोंडून घेऊन स्वत:ला भाजत, तळमळत कसा ठेवू शकला? ह्य पृथ्वीवरची अद्भुतं शोधायला हजार आयुष्यं मिळाली असती तरी ज्याला कमी पडली असती असा हा माणूस. जीवन तुडुंब अनुभवता यावं म्हणून ह्यनं मित्रांचे, आप्तांचे बंध अगदी कोवळ्या वयात तोडले. आणि हाच माणूस वर्षांनुवष्रे ह्य विवरातल्या नरकवासात स्वत:ला कोंडून घेतो? ह्यचा अर्थ लावायचा कसा? आपल्याला माहिती आहे म्हणा, की त्याच्या गळ्याभोवती जी तात लागली होती तिला तो सतत हिसके देत होता, स्वत:ला मुक्त करण्याच्या अनंत योजना आखत होता. आणि ही मुक्ती फक्त एडनपासूनच नाही, तर घाम गाळाव्या लागणाऱ्या व धडपडीनं भरलेल्या आयुष्यापासूनही. धाडसी होताच तो; पण प्रथमपासूनच स्वतंत्र होण्याच्या ध्यासानं पछाडलेला होता. ही स्वातंत्र्याची कल्पना त्यानं मग आíथक सुरक्षिततेमध्ये परिवíतत केली. वयाच्या अठ्ठाविसाव्या घरी तो पत्र टाकतो, की त्याच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात निकडीची गोष्ट काय असेल, तर काहीही झालं तरी ‘स्वतंत्र’ होणं. ‘अगदी कुठल्याही तऱ्हेनं’ हे व असं मात्र तो लिहीत नाही. आगाऊपणा व भित्रेपणा ह्यंचं विचित्र मिश्रण आहे त्याच्यात. जिथे गोरा माणूस चुकूनसुद्धा पाऊल टाकणार नाही अशा जागी बेधडक जाण्याइतकं धर्य त्याच्याजवळ आहे; पण नियमित आमदानीशिवाय जगण्याची हिंमत मात्र त्याच्याजवळ नाही. त्याला नरमांसभक्षकांचं भय नाही; पण आपल्याच गोऱ्या भावंडांना तो घाबरतो. जगभर रमतगमत, आरामानं भटकता यावं म्हणून, आणि योग्य जागा सापडली तर तिथेच स्थिर व्हावं म्हणून तो भरपूर धन मिळवण्याच्या मागे असला तरी तो खरं म्हणजे मूलत: कवीमाणूस आहे, स्वप्नाळू आहे; ज्याला आयुष्याशी जमवून घेता येत नाही असा, चमत्कारांवर ज्याचा विश्वास आहे असा, कुठल्यातरी स्वर्गाचा शोध घेणारा असा. पन्नास हजार फ्रँक्स जमले की हे सगळं करता येईलसं त्याला वाटतं; पण तेवढे जमत आल्याबरोबर तो ठरवतो की एक लाख फ्रँक्स मिळवणं जास्त बरं! त्याचे ते चाळीस हजार फ्रँक्स त्यानं जमवलेले! ही सगळी ठेव सतत बरोबर वागवताना त्याची कसली भयंकर तगमग. ह्यच्यामुळेच खरं तर त्याचं नुकसान झालं. हरारपासून कोस्टवर त्याला दोन बांबूंच्या शिडीवर जेव्हा आणलं गेलं तेव्हाही त्याचे विचार त्याच्या कमरबंदामध्ये असलेल्या सोन्याबद्दलच होते. मास्रेयच्या इस्पितळातसुद्धा, जिथे त्याचा पाय कापला गेला, त्याच्या डोक्यात त्याचाच विचार. शारीर यातनांनी त्याला रात्रभर डोळ्याला डोळा लागत नाही असं होत नव्हतं, तर ह्य विचारानं मात्र तो जागरणं करी. आपले पसे चोरीला जाऊ नयेत म्हणून कुठं लपवू ते आता? बँकेत ते पसे ठेवायला त्याला आवडलं असतं; पण चालताच येत नव्हतं, तर बँकेत तो जाणार कसा? ‘कोणीतरी इथं या आणि ह्य धनाची काळजी घ्या’ असं तो घरच्यांना लिहितो. हा सगळाच प्रकार एकाच वेळी इतका करुण आणि हास्यास्पद आहे की हसावं की रडावं कळत नाही.
सुरक्षिततेच्या ह्य मनपछाड भावनेच्या मुळाशी होतं तरी काय? भीती. प्रत्येक सर्जनशील कलावंताला वाटणारी भीती; की तो कुणालाच नको आहे, त्याचा जगाला काही उपयोग नाही. आपण फ्रान्सला परत येण्याच्या लायकीचे कसे नाही, आणि सर्वसाधारण माणसासारखं आपल्याला कसं जगता येणार नाही, असं कितीदा तो पत्रात लिहितो. मला व्यापारउदीम नाही, व्यवसाय नाही की तिथे मित्र नाहीत, असं तो म्हणतो. सगळ्या कवींप्रमाणे सुसंस्कृत जग त्याला जंगलासारखं वाटतं; आणि ह्य जंगलात स्वत:ला सुरक्षित कसं ठेवायचं, ते त्याला कळत नाही. कधी तो म्हणतो की, परतीचा विचार करायलासुद्धा खूप उशीर झालाय. एखाद्या खूप वय झालेल्या माणसाची भाषा आहे त्याची. स्वतंत्र, बेबंद, धाडसी आयुष्याची त्याला इतकी सवय झालेली आहे, की पुन्हा कोण त्या जोखडात स्वत:ला बांधून घेणार? खरी गोष्ट अशी की, शारीर कष्टांचा त्याला अति तिरस्कार; पण हाच गडी सायप्रसमध्ये, अरेबियामध्ये, आफ्रिकेमध्ये ढोरासारखा राबतो, स्वत:ला सगळ्या गोष्टी नाकारतो. अगदी कॉफी, तंबाखूसुद्धा. एकच एक सुती कपडा वर्षभर घालून, मिळवलेली प्रत्येक प शिल्लक टाकून आशा करत राहतो, की एक दिवस त्याला त्याचं स्वातंत्र्य विकत घेता येईल. आपल्याला कळतं, की हे सगळं त्याला जमलंही असतं तरीसुद्धा स्वतंत्र झालो असं त्याला कधी वाटलं नसतं, की तो कधी सुखी झाला नसता, की ना कंटाळ्याचं जू त्याला मानेवरून कधी काढता आलं असतं. तारुण्यातल्या अविवेकीपणाकडून तो म्हाताऱ्यांच्या सावधपणाकडेच गेला एकदम; पण तो इतका वाळीत टाकला गेलेला, इतका बंडखोर, इतका शापित होता, की काही म्हणता काही त्याचा विनाश थांबवू शकत नव्हतं.
त्याच्या स्वभावाचा हा भाग मी मुद्दाम सांगतोय, कारण त्याच्या नावाला चिकटलेल्या अनेक दरुगधी वृत्तींचं स्पष्टीकरण व्हावं म्हणून. तो कद्रू नव्हता की गावरान मजूर नव्हता- काही त्याचे चरित्रकार म्हणतात त्याप्रमाणे. खरं तर उदार मनाचा होता तो. बार्डी- त्याचा जुना मालक म्हणतो, ‘त्याचं करणं ऐसपस, पण मर्यादशील, अंगावर न येणारं असायचं. एवढी एक गोष्ट तो तुच्छतेनं न हसता, घृणा न दाखवता करायचा.’
आणखी एका बागुलबुवानं त्याला पछाडलेलं होतं. लष्करातली सक्तीची नोकरी. त्याची दिशाहीन भ्रमंती सुरू झाली तेव्हापासून तर त्याच्या मृत्यूपर्यंत, लष्करी अधिकाऱ्यांशी आपलं जुळायचं नाही, ही भीती त्याला छळत होती. मरणाआधी थोडेच दिवस, इस्पितळात पाय कापून पडलेला हा, दिवसागणिक वेदना वाढत असलेला हा; ह्यच्या मनावर ओझं कशाचं असेल, तर आपला अतापता सापडून लष्कर आपल्याला तुरुंगात टाकेल, हे. ‘एकदा तुरुंगवास झाला की नंतर दु:खाशिवाय आहे काय? त्यापेक्षा मरण बरं!’ अगदी आणीबाणीचाच प्रसंग असेल तरच तू मला पत्र लिही, ऑर्थर रँबो असं नाव लिहू नकोस पत्त्यावर, आणि पत्र टाकताना शेजारच्या कुठल्यातरी गावाहून टाक, अशी गयावया तो बहिणीला करतो.
ह्य पत्रांमधून त्याच्या स्वभावाचा संपूर्ण पटच उघडा पडतो. त्या पत्रांमध्ये साहित्यिक, सुंदर असं काही नाही. त्यात दिसते ती त्याची अनुभवांची प्रचंड भूक, त्याचं तृप्त न होणारं औत्सुक्य, अनिवार इच्छा, धर्य, चिकाटी, आत्मच्छल, त्याचा बरागीपणा, त्याचं भय, पछाडलेपण, वाळीत टाकलं गेल्याची भावना आणि त्याच्या मनातला अथांग भकासपणा. पण ह्य सगळ्यापेक्षा, सगळ्याच सर्जनशील लोकांप्रमाणे, अनुभवातून काहीच न शिकता येणं. त्या पत्रांमध्ये त्याच त्या कष्टांचं आणि यातनांचं आवर्तन ह्यशिवाय काही नाही. बा उपायांनी मुक्ती मिळू शकते, ह्य भ्रमातच तो आहे. त्या भ्रमाचा बळी असलेला हा जन्मभर पौगंडावस्थेतच राहिला; दु:ख नाकारत, त्याला अर्थ न देताच. त्याच्या उत्तरायुष्यातल्या पराभूततेचा अंदाज करायचा झाला तर त्याचा काबेज द व्हाझाबरोबरचा प्रवास पाहावा.
स्वत:च निर्माण केलेल्या त्याच्या वाळवंटात त्याला आपण सोडून देऊ या. माझा हेतू आमच्यातलं साधम्र्य, समांतरपणा आणि आम्ही त्यापायी भोगलेले परिणाम दाखवणं हा आहे. मादाम रँबोप्रमाणेच माझीही आई नॉर्दर्न टाईप- म्हणजे मनानं गारठलेली, सारखं उणं बघणारी, अहंकारी, कधीही क्षमा न करणारी, महाकर्मठ होती. माझे वडील दक्षिणेतले, बव्हेरियन आई-वडील असलेले, तर रँबोचे र्बगडीमधले. आई-वडिलांमध्ये कायम बेबनाव, भांडाभांडी; आणि त्याचा मुलांवर नेहमी होतो तसा आमच्यावरही परिणाम. ज्याच्यावर ताबाच मिळवता येत नाही त्या आमच्या बंडखोर स्वभावाचा उगम इथे आहे. रँबोप्रमाणे मीसुद्धा अगदी लहानपणीच ओरडायचो, ‘मरो तो देव!’ आई-वडिलांना संमत असलेली, पसंत असलेली गोष्ट, प्रत्येक बाब माझ्यासाठी ‘मरो’! ही भावना अशी टोकाची, की मी अंगठय़ाएवढा असतानासुद्धा त्यांच्या मित्रांचा त्यांच्यादेखत उघड अपमान करीत असे. माझे वडील अगदी मरणपंथाला टेकेपर्यंत हे वैर संपलं नाही. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं, की किती मी त्यांच्यासारखा होतो ते.
जिथे मी जन्मलो त्या जागेचा मला तिरस्कार वाटायचा. हे अगदी रँबोप्रमाणेच. मरेपर्यंत मी हा तिरस्कार करीन. सगळ्या घरदारापासून तुटून, त्या तिरस्करणीय शहरापासून, देशापासून, ज्यांच्या-माझ्यामध्ये तिळमात्र साधम्र्य नव्हतं अशा त्यातल्या माणसांपासून दूर जाणं, ही माझी सगळ्यात पहिली प्रेरणा होती. त्याच्यासारखाच मीही मेधावी. खुर्चीत बसल्यावर पाय लटकत राहण्याच्या वयातच परदेशी भाषांमधल्या कविता मी म्हणायचो. मी चाला-बोलायलाही फारच लवकर लागलो. तुकडीत जाण्याच्या आधीच मी वर्तमानपत्र वाचायला लागलो होतो. वर्गात कायम मी सगळ्यात लहान; पण सर्वामध्ये हुशार आणि शिक्षकांचा आणि सवंगडय़ांचा लाडका. पण इथेही, अगदी रँबोप्रमाणेच, बक्षीसंबिक्षिसं मला मिळाली की मला त्याची घृणाच यायची. शाळेतून माझी हकालपट्टी पण व्हायची- हा कोणाला जुमानत नाही म्हणून. शाळेत असताना माझं आपलं एकच ध्येय- शिक्षकांची आणि अभ्यासाची टवाळी करायची. तो सगळा प्रकारच मला इतका बाळबोध आणि मूर्खपणाचा वाटायचा म्हणून सांगू. शिकवलेलं माकड आहोत आपण असंच वाटायचं मला.
(क्रमश:) – 1946-1949-1956 by New Directions Publishing Corporation
विनाशवेळा-१
१९२७ साली ब्रुकलीनमधल्या एका दमट-कोंदट घराला असलेल्या तळघरात रँबोचं नाव घेतलेलं मी प्रथम ऐकलं
Written by महेश एलकुंचवार
आणखी वाचा
First published on: 17-04-2016 at 02:20 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The time of the assassins