‘The Time of the Assassins’ या हेन्री मिलर यांच्या ललितबंधाचा ज्येष्ठ नाटककार- साहित्यिक महेश एलकुंचवार यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला प्रवाही अनुवाद..
‘त्याचं कधी समाधान व्हायचं नाही!’ त्याचा एक चरित्रकार म्हणतो, ‘त्याची क्लान्त दृष्टी पडली की फुलं बावतात, तारे निष्प्रभ होतात.’ हो, कणभर सत्य आहे त्या म्हणण्यात. मला माहीत आहे. कारण मलाही त्याच दुखण्यानं पछाडलंय नं. पण एखाद्याची स्वप्नं साम्राज्याची असली, माणसांचं साम्राज्य, आणि ते प्रत्यक्षात आणताना माणसांची गती गोगलगाईची असली तर माणसांचं कर्तृत्व अगदी तेजोहीन वाटू लागतं. मला क्षणभरही असं वाटत नाही की, रँबोच्या डोळ्यांना फुलं कधी कोमेजलेली दिसली की तारे फिकुटलेले दिसले. मला तर वाटतं, त्याचा अंतरात्मा ह्य़ा सगळ्यांशी थेट उत्कट संवाद साधून होता. रोज लोकव्यवहारात मात्र त्याला सगळंच मरगळलेलं, निस्तेज दिसत होतं. त्याची तृष्णाच मुळी ‘सगळं पाहायचं, सगळं भोगायचं, सगळं भोगून संपवायचं, सगळं शोधायचं, सगळं सांगायचं’ अशी होती. फारच थोडय़ा काळात त्याला कळलं, की त्याच्या तोंडात लगामाचा आकडा आहे, अंगाभोवती रिकिबी आणि पाठीवर चाबकाचे फटकारे. एखाद्या माणसाला नुसतं इतरांपेक्षा जरा वेगळे कपडे घालू द्या; तो लगेच टवाळीचा विषय होतो. सर्व लोक एकच नियम अगदी मनापासून, हट्टाग्रहानं आचरणात आणतात. तो म्हणजे रूढ लोकाचार निष्ठेनं पाळणं. अशा परिस्थितीत मग आश्चर्य वाटायला नको की ह्य़ा मुलानं ठरवून टाकलं, की आपण दैवी अस्वस्थतेनं भरलेले आहोत. मग त्यानं स्वत:ला द्रष्टा ठरवूनच टाकलं. पण लोक मात्र त्याला विदूषक, गाढव समजत होते, हे त्याच्या लवकरच लक्षात आलं. मग मात्र जिथपर्यंत आपण आलो आहोत, तिथून न हलण्यासाठी जन्मभर झगडणं किंवा हा संघर्षच सोडून देणं, एवढेच पर्याय त्याच्यापाशी उरले. का नाही त्याला थोडीसुद्धा तडजोड करता आली? कारण हा शब्दच त्याच्या कोशात नव्हता. जन्मला तो कडवाच. एकतर टोकापर्यंत जायचं किंवा मृत्यू कवटाळायचा. पण ह्य़ातच तर त्याचा निष्कलंकपणा आहे. निरागसपणा.
माझी स्वतचीच लढाई सापडतेय मला ह्य़ात. माझी तीच अवस्था होती. मी लढणं कधी सोडलं नाही; पण केवढी किंमत देऊन! सगळी लढाई गनिमी काव्याची. एक व्यर्थ लढाई- जी एका शेंडी तुटो की पारंबी अशा निकडीतून येते. जे मला लिहायचं आहे ते अजून लिहिलं गेलं नाहीए. असलंच, तर फार थोडं. नुसतं उंच आवाजात मला माझ्या पद्धतीनं बोलायचं आहे तर त्यासाठी केवढा लढा पावला-पावलाला. त्यात माझं गाणं जवळजवळ नाहीसंच झालं आहे. कसली क्लान्त दृष्टी, कसली बावणारी फुलं आणि कसले निष्प्रभ तारे! माझी दृष्टी निश्चितपणेच जाळत जाणारी झाली आहे. हे एक आश्चर्यच आहे, की सगळे लोक माझ्या निर्दय दृष्टिक्षेपानं जागच्या जागी जळून खाक होत नाहीएत. हा असा माझा अंतरात्मा! बाह्य़ांग म्हणाल, तर त्यानं हळूहळू जगाची वागण्या-बोलण्याची तऱ्हा शिकायचं ठरवून टाकलंय. ह्य़ा जगात असून नसल्यासारखं राहायचं. छान दयाळू, सभ्य, परोपकारी, अगत्यशील वगरे. हो नं. का नाही? रँबो म्हणतो, ‘खरी अडचण आपला आत्मा राक्षसी कसा करायचा, ही आहे!’ राक्षसी म्हणजे कुरूप नाही; सर्वभक्षक. राक्षसीचा अर्थ काय नाही तर. शब्दकोशात बघा. ‘काही अवयवांची अतिवाढ, कमी वाढ, चुकीच्या जागी त्यांनी असणं, वेडंवाकडं असणं, ह्य़ा कारणांनी जो जीव विकृत झालेला असतो तो. काहीही घृणास्पद, असंगत, विरूप.’ पुराणातले राक्षस बघा. हार्पी, गोरगोन, स्फिंक्स, सेंटॉर, ड्रायड, मेरमेड. ते सगळे लोकविलक्षण प्राणी होते. लोकविलक्षण. तोच खरा अर्थ आहे ‘राक्षस’चा. ते लोकाचाराला, समाजाच्या स्थर्याला धक्काच देतात. क्षुद्र माणसांच्या मनातल्या भीतीचं ते प्रत्यक्षरूप. घाबरटांना आपल्या वाटेत नेहमी हे राक्षस दिसतात. माणसाला सर्वात जास्त धास्ती कशाची वाटत असेल, तर त्याची जाणीव- कॉन्शसनेस- विस्तारेल, ह्य़ाची. पुराणातल्या सगळ्या भयप्रद गोष्टी ह्य़ा भयातून जन्मतात. क्षुद्र लोक एकच भीक मागत असतात- ‘जगू द्या नं आम्हाला सुखानं!’ पण ह्य़ा विश्वचेतनेचा कायदा असं सांगतो की, माणसाला आंर्तसघर्षांनंतरच सुखशांती मिळते. ही किंमत- अगदी सुखशांतीसाठीही देणं क्षुद्रांना मंजूर नसतं. त्यांना ती शांती हवी असते; पण घरबसल्या रेडिमेड कपडे मिळावेत तशी हवी असते.
एखादा लेखक पछाडल्याप्रमाणे काही शब्द वारंवार वापरतो, आणि ते शब्द आपल्याला जे सांगून जातात ते त्याच्या चरित्रकारांनी गोळा केलेल्या त्याच्याबाबतच्या घटनांमधूनही कधीच हाती लागत नाही. रँबोच्या साहित्यात वारंवार येणारे हे शब्द पाहा : अनंत, असीम, दया, एकांत, यातना, प्रथा, सूर्य, प्रेम, सौंदर्य, हताशपणा, करुणा, स्वर्ग.
त्याच्या आंतरव्यक्तित्वाचे ताणेबाणे आहेत हे. त्याचा निरागसपणा, त्याची भूक, त्याची बेचनी, त्याचा कडवेपणा, त्याची असहिष्णुता, त्याचा ठामपणा- सगळ्या गोष्टी आपल्याला ह्य़ा शब्दांमधून कळतात. पापाचा तळ ज्याने गाठला तो बोदलेर ह्य़ाचा प्रतिपरमेश्वर. मी आधीही म्हटलंय- आणि हे पुन्हा म्हणण्याइतकं महत्त्वाचं आहे, की सगळं एकोणीसावं शतक देव ह्य़ा कल्पनेमुळे तडफडत होतं. बाहेरून ह्य़ा काळाकडे पाहिलं की दिसतं, की हा काळ ऐहिक प्रगतीचा, नवीन शोधांचा होता; जे शोध सगळे माणसाच्या ऐहिक सुखाशी निबद्ध होते. पण अशाही समाजाच्या हृदयस्थानी कलावंत आणि विचारवंत असतात व ते क्षुब्ध असतात असं आपण बघतो. रँबो म्हणजे मूíतमंत हा संघर्ष. त्यानं नुसतं तसं लिहिलंच नाही, तर ह्य़ा युगाच्या लक्षणांचा त्यानं आपल्या आयुष्यावरही गूढ ठसा उमटवला. त्याच्या काळाचा प्रतिनिधी कोणी असेल तर तोच. अगदी गोएते, शेली, ब्लेक, नित्शे, हेगेल, मार्क्स, दोस्तोयवस्की ह्य़ा सर्वापेक्षा अधिक. त्याच्या व्यक्तित्वाच्या सर्व बाजू डोक्यापासून पायापर्यंत दुभंगल्या आहेत. कालचक्राच्या गतीनं घुसळून निघत तो शतखंड होतो. तोच बळी आणि तोच जल्लाद. त्याचं नाव घेतलं की काळ, वेळ, घटना सगळं एकवटतं. अणूचं विभाजन करण्यात आपल्याला आता यश मिळालंय आणि ब्रह्मांड फाटलंय. एकाच वेळी दशदिशा आपण पाहू शकतो. पुराणातल्या देवांनाही दुर्लभ असं सामथ्र्य आता आपण मिळवलंय. नरकाच्या महाद्वारापर्यंत पोचलोयत आपण. त्या दारावर धडका मारून सगळा नरक उघडून ठेवणारोत का आपण? लक्षणं तशीच दिसतायत. मला वाटतं, भविष्यकाळात एकच काम राहणार आहे आपल्याला. पापाचा प्रदेश असा धुंडाळायचा, की त्याबद्दल काही म्हणता काही गूढ म्हणून शिल्लक उरू नये. सौंदर्याची मुळं कडूजहर असतात. त्याची पानं, फुलं, कळ्या सगळं स्वीकारू आपण. आता पापाला टाळता यायचं नाही. त्याचा स्वीकार केलाच पाहिजे आपल्याला.
तो त्याचं ‘निगर बुक’ (Une Saison en Enfer) लिहित होता तेव्हा म्हणतात की रँबो म्हणाला होता, की माझं भवितव्य ह्य़ा पुस्तकावर अवलंबून आहे. त्याची ही उक्ती किती खरी होती, हे त्यालाही ठाऊक नव्हतं. आपल्याला आपलं हतभागीपण जसजसं कळत जातं तसतसं त्याला काय म्हणायचं होतं त्याचा अर्थ आपल्याला उलगडत जातो. माणसाला ज्ञात असलेल्या आतापर्यंतच्या सर्वात निर्णायक अशा ह्य़ा युगाशी त्यानं आपल्या नशिबाला एकरूप केलं होतं. आता आपण एकतर रँबोप्रमाणेच आपली संस्कृती ज्या ज्या गोष्टींच्या बाजूनं उभी राहिली त्या पूर्ण त्यागून नवनिर्माण करणार आहोत, किंवा आपल्या हातांनी तिचा विध्वंस करणार आहोत. जेव्हा कवीच रसातळाला जातो तेव्हा मग हे जगच उलटंसुलटं असणार. जर कवीला समाजाच्या वतीनं बोलता येत नसेल, फक्त स्वत:बद्दलच बोलता येत असेल तर मग सगळंच संपलं म्हणायचं. रँबोच्या कवितांच्या कलेवरावर आम्ही ताजमहाल बांधतोय. आपल्यात अजूनही कवी आहेत आणि त्यातले काही आकलन होण्यासारखेही आहेत, ह्य़ाला काही अर्थ नाही. कविता जातेय कुठल्या दिशेनं? कवी आणि वाचक ह्य़ाचं आज नातं काय? कविता सांगते काय? हे विचारू आधी आपण आपल्याला. आता दाद कोणाच्या आवाजाला मिळते? कवीच्या की शास्त्रज्ञाच्या? कितीही कडूजहर असलं तरी सौंदर्यच आपल्याला हवंय की अणुशक्ती? ह्य़ा महान शोधामुळे कुठली भावना जागी होते आपल्या मनात? तर भीती. आपल्याजवळ ज्ञान आहे, पण शहाणपण नाही. आराम आहे, पण सुरक्षितता नाही. विश्वास आहे, पण श्रद्धा नाही. जीवनाचं काव्य आता गणिती, ऐहिक, रासायनिक संज्ञा वापरून आविष्कृत होतं. आता कवी हा गावकुसाबाहेर, जातिबहिष्कृत. तो म्हणजे जणू एक विसंगती. सर्वनाशाच्या वाटेवर तो आहे आता. तो किती ‘राक्षसी’ होतोय ह्य़ाची फिकीर कोण करतंय? फिरतोय तो आपला जगभर. तो ह्य़ाच्या प्रयोगशाळेतून निसटलाय; जो त्याला भाकर देईल त्याच्या सेवेला तो आता सिद्ध आहे. आज सगळ्या विरोधाभासांप्रमाणे नतिक विरोधाभासही ढासळून पडले आहेत. हा संक्रमणाचा, संकटाचा काळ आहे. प्रचंड परिवर्तन होऊ घातलंय.
आणि मूर्ख बोलतायत- प्रायश्चित्तं, चौकशा, पश्चात्ताप, सहसंगत आणि संयुक्त सरकारं, मुक्त व्यापार आणि आíथक स्थर्य व पुनर्वसन. कोणालाही मनातून वाटत नाहीए, की जगातला घोळ दुरूस्त करता येईल. सगळेजण त्या महाघटनेची वाट पाहतायत जणू. आपल्या मनांचा जिनं दिवसरात्र कब्जा घेतलाय अशी ती एकमेव महाघटना. पुढचं महायुद्ध. सगळी उलथापालथ आपण करून ठेवलीए आणि आता कळत नाहीए- केव्हा, कुठे, कसा ह्य़ाला आळा घालायचा ते. ब्रेक्स आहेत; पण ते लागणार आहेत का? नाही लागणार; हे माहीत आहे आपल्याला. नाही नाही; दैत्य मोकाट सुटलाय. विजेचं युग पाषाणयुगाइतकं दूर झालंय आपल्याला. हे सत्तेचं युग आहे. निभ्रेळ, सरळसरळ सत्ता. आता एकतर स्वर्ग किंवा नरक- अधलंमधलं काही शक्यच नाही आता. आणि सगळी लक्षणं असंच सांगतायत की आपण नरकच निवडणार. कवी नरकात जगतो तेव्हा सर्वसामान्य माणसाचीही त्यातून सुटका नसते. रँबोला मी द्रोही म्हटलं का? आपण सगळेच द्रोही आहोत. काळाच्या प्रारंभापासून आपण द्रोही आहोत आणि त्याची परिणामस्वरूप नियती आपल्याला आता गाठू लागलीय. ह्य़ा सभ्यतेशी नाळ जुळलेल्या प्रत्येक स्त्री, पुरुष, मुलामुलीला आता त्यांचा त्यांचा नरकवास प्राप्त होणार. ह्य़ाचीच भीक मागत होतो ना आपण? घ्या आता. ह्य़ाच्यासमोर रँबोचं एडन आरामदायी वाटेल. त्याच्या काळी एडनहून जरा बरं अशा हरारेला जाता येई; पण आणखी पन्नास वर्षांनी सगळी धरणीच एक विशालकाय भगदाड बनलेलं असेल. विज्ञान व शास्त्रज्ञ कितीही नाकबूल करू देत, पण आपल्या हातातली सत्ता किरणोत्सर्गी आहे व सर्वकाळासाठी सर्वविनाशी आहे. काही भलं व्हावं अशा संदर्भात सत्ता आपण कधी पाहिलीच नाही. तिला कायम विनाशासाठी वापरलं आपण. अणूमध्ये रहस्य असं काही नाहीए; रहस्य आहे ते माणसाच्या मनात. अणुऊर्जेच्या शोधामुळे एक होणार आहे मात्र; आता आपण कधीही एकमेकांवर विश्वास ठेवू शकणार नाही. हाच मोठा घात आहे. आपल्या मनातली ही भीती कुठलाही अणुबॉम्ब नष्ट करू शकणार नाही. आपल्या बांधवांचा विश्वास ज्यानं पूर्ण गमावलाय तोच खरा द्रोही. श्रद्धेचा लोप आता सार्वत्रिक आहे. प्रत्यक्ष परमेश्वरही इथं हतबल आहे. आपण आपली श्रद्धा अणुबॉम्बला वाहिली आहे; आपल्या प्रार्थनांना आता अणुबॉम्बच उत्तर देईल.
रँबोला कवितेची हाक ऐकू आली होती. तिला त्यानं पाठ दाखवली ही गोष्ट कविजनांना धक्का देणारीच आहे. जणू काय त्यानं प्रेमालाच पाठ दाखवली. त्याचा हेतू काहीही असो हे करताना; पण मुख्य कारण त्याची श्रद्धा उडाली होती हेच होतं. त्याची भयभ्रांतता, आपण फसवले गेलोय, आपला विश्वासघात झालाय अशी त्याची भावना ह्य़ाची तुलनाच करायची झाली तर आपण लावलेल्या शोधांचा जो उपयोग आता होतोय ते पाहिल्यानंतर शास्त्रज्ञांना जे वाटलं असेल त्याच्याशीच होईल. रँबोनं कवितेचा त्याग करणं आणि अणुबॉम्बची निर्मिती ह्य़ांची तुलना करण्याचा मोह होतो. त्यांचे परिणाम एकसारखेच भयंकर. सर्व शरीराला धक्का बसण्याआधी हृदयाला तो बसतो प्रथम. संस्कृतीच्या नसानसांतून विनाश पोचायला तसाच वेळ लागतो. रँबो जेव्हा कविता त्यागून मागल्या दारानं घराबाहेर पडला तेव्हा विनाश गर्जना करीत चारही दिशांनी आलेला होता.
रँबोबाबत मला काय कळलं, सापडलं ते इतके दिवस मी बोललो नाही ते किती बरं झालं. ख्रिस्ताच्या आगमनानंतर दहा संतांनी दहा प्रकारे त्याचा विलक्षण अन्वय लावला. तसाच अनेक कवींनी रँबोचं ह्य़ा पृथ्वीतलावरचं असणं आणि आविष्कृत होणं ह्य़ाचा वेगवेगळा अर्थ लावला. मानवी इतिहासात अशी अर्थनिष्पत्ती करणं एकतर मूलभूत महत्त्वाचं आहे किंवा मग अन्वय लावण्याची धडपडच पोकळ आहे. एक ना एक दिवस ख्रिस्त जगला तसे आपण सगळे जगू, ह्य़ाबद्दल मला तीळमात्र शंका नाही. अण्वस्त्रनिर्मिती हे आपल्या अहंकाराचं परमोच्च शिखर आहे. आपण आपल्या लहानशा क्षुद्र व्यक्तित्वाच्या मृत्यूची तयारी करतोय; तो होईल तेव्हा आपलं खरं मूल व्यक्तित्व प्रस्फुटित होईल. आपल्या नकळत, बेसावधपणे आपण जग एकत्र आणलंय खरं; पण ही एकता म्हणजे नुसती पोकळी आहे. आपल्याला निखळ, नितळ व्यक्ती म्हणून जन्माला यायचं तर आपण सर्वानी आता सामुदायिक मृत्यू पत्करला पाहिजे. लोत्रमों म्हणाला ते जर खरं असेल, की ‘सगळ्यांनी कविता करावी’ तर त्याचा अर्थ जीतून एकमेकांशी हृदयसंवाद कोणाच्याही मध्यस्थीशिवाय आपल्याला साधता येईल अशी भाषा आपण शोधायला हवी. संतांचा देवाशी जसा थेट संवाद असतो तसा थेट आणि तत्काळ संवाद आपल्यामध्ये व्हायला हवा. आज कवीला आपला जीवनधर्म सोडून देणं भाग पडतंय, कारण त्याला नराश्यानं कधीचं ग्रासलंय. संवाद साधायला तो आता असमर्थ आहे हे त्यानं कधीच कबूल केलंय. एक काळ असा होता की, कवी होणं म्हणजे भव्यतम जीवनधर्माचा उद्गाता होणं. आज मात्र कवी होणं हे एक अर्थहीन घटित आहे. असं झालंय ह्य़ाचं कारण जग कवीच्या आर्जवाबद्दल बधीर झालंय म्हणून नाही; तर कवीचाच स्वत:च्या दैवी ध्येयावर विश्वास राहिलेला नाही. गेलं शतकभर तरी तो बेसूर गातोय आणि आता आपल्याला त्याच्या सुरात सूर मिसळून गाता येत नाहीए. बॉम्बच्या स्फोटाला आता अर्थ प्राप्त झालाय आपल्यासाठी; पण कवीचा उत्कट आविष्कार आता आपल्याला अर्थहीन वाटतो. आणि जगातल्या सातशे कोटी लोकांमधून जर फक्त काही मूठभर हजारांनाच हा कवी काय म्हणतोय हे कळत असेल, आणि हे मूठभर लोकसुद्धा आपल्याला हे कळतंय असं फक्त दाखवणारेच असतील, तर कवी काय म्हणतोय ती एक अर्थहीन बडबडच म्हणायची. मूठभर लोकांसाठी व लोकांपुरतंच जेव्हा कलेचं अस्तित्व असतं तेव्हा तिची परंपरा नष्ट होते. ती मग कला उरत नाही, तर अर्थहीन व्यक्तिवादाचा प्रसार करणाऱ्या गुप्त सोसायटय़ांची ती संकेतभाषा होते. मानवाच्या भावना हलवणं, त्याला दृष्टी देणं, प्रवाहीपण, धर्य, श्रद्धा देणं हे करते ती कला. हिटलरनं जग जसं हलवून सोडलं तसं कुणी कलावंतानी केलंय का अलीकडच्या काळात? अणुबॉम्बनं जसा हादरा दिलाय तसा हादरा दिलाय का एखाद्या तरी कवितेनं आपल्याला एवढय़ात? ख्रिस्तागमनानंतरच्या अलीकडच्या काळात रोज नवीन दृश्यं, नवीन पट उलगडणं हे जसं दिसतंय आपल्याला, तसं पूर्वी कधी झालं नव्हतं. ह्य़ा सगळ्याच्या तुलनेत कवीची हत्यारं ती काय! आणि स्वप्नं ती काय! खूप बोलबाला झालेली त्याची ती कल्पनाशक्ती कुठे गेलीय आता? इथे आपल्या डोळ्यांसमोर साक्षात उभं आहे, ते आहे वास्तव, पूर्ण नागडं वास्तव; पण त्याचं गाणं गाणारा आहे कुठे आपल्यात! अगदी पाचव्या दर्जाचा कवी तरी दिसतोय का कुठे? मला तर काही तो दिसत नाही. र ला र, ट ला ट करणाऱ्यांना मी कवी म्हणतच नाही. जग तळापासून बदलून टाकण्याची शक्ती व क्षमता असलेल्या माणसाला मी कवी म्हणतो. असा कोणी असलाच आपल्यात- तर त्यानं फिरवावी द्वाही आपल्या नावाची, उठवावा त्यानं आपला आवाज. पण बॉम्बचीही महागर्जना बुडवून टाकेल असा तो आवाज असावा लागेल. माणसांची हृदयं वितळतील, रक्त उसळेल अशी भाषा त्याच्याजवळ असायला लागेल.
लोकांना जागं करणं हे कवितेचं ईप्सित असेल, तर फारच पूर्वी आपल्याला जाग यायला हवी होती. काहींना ती आलीय खरी; पण सगळ्या मानवजातीला ती तत्काळ यायला हवीय, नाहीतर आपला सर्वनाश अटळ आहे. पण एक खात्री ठेवा. माणूस नष्ट व्हायचा नाही. संस्कृती, सभ्यता, जगण्याच्या शैली नष्ट होतील; पण केव्हा ना केव्हा ह्य़ा मृत गोष्टी पुन्हा जन्मतील, नक्कीच जन्मतील. आणि त्या जन्मतील तेव्हा कविता हे जीवनाचं चतन्य असेल. कविता आपल्याला जपायची असेल तर आपण कवी गमावला तरी चालण्यासारखं आहे. कविता करायची म्हणजे कागद, शाई, लेखणीच वापरावी लागते असं नाही. आदिवासी लोक बघा- ते किती जीवनाचे, कर्तृत्वाचे कवी असतात. ते अजून कविता निर्माण करतात, जगतात. आपल्या आत त्यामुळे काही हलत नाही, हे सोडा. आपण कवितेबाबत संवेदनक्षम राहिलो असतो तर त्यांच्या जीवनशैलीबद्दल एवढे बधीर राहिलो नसतो. त्यांच्या जगण्याचं काव्य आपलंसं करून आपल्या जीवनात आम्ही आणलं असतं. त्यांच्या जीवनातून स्रवत असलेलं सौंदर्य आम्ही आमच्या जीवनात एकरस केलं असतं. आम्हा नागर, उच्चभ्रू, सुसंस्कृत माणसाची कविता कायमच फटकून वागणारी, गूढं पोटात लपवणारी राहिली आहे. ह्य़ात आपलंच मरण तिनं ओढवून घेतलं आहे.(क्रमश:)
महेश एलकुंचवार
1946-1949-1956 by New Directions Publishing Corporation

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
drought-prone villages Pune, works in drought-prone villages pune, drought-prone villages fund,
पुणे : दरडप्रवण गावातील कामांना गती, २०० कोटींचा निधी मंजूर
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
Navri Mile Hirlarla
Video : “आज मी सगळी गडबड…”, दु:खात असलेल्या लीलाला आली एजेची आठवण; मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Story img Loader