‘The Time of the Assassins’ या हेन्री मिलर यांच्या ललितबंधाचा ज्येष्ठ नाटककार- साहित्यिक महेश एलकुंचवार यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला प्रवाही अनुवाद..
‘आपण अद्ययावत असलं पाहिजे..’ रँबो म्हणायचा. म्हणजे आपल्या अंधश्रद्धा, वेडगळ समजुती, पंथ, संप्रदाय, तत्त्वांबाबतचा हट्टाग्रह ह्य़ा ज्या गोष्टींमुळे आपली सभ्यता बनली आहे, त्या सर्व गोष्टींचा त्याग करणं. आपण प्रकाश आणायला हवा आहे; कृत्रिम रोषणाई नाही. १८८० च्या एका पत्रात रँबो लिहितो, ‘पशानं सगळ्याचं अवमूल्यन होतं.’ आताच्या युरोपात पशाला कवडीची किंमत उरलेली नाही. लोकांना हवं आहे अन्न, वस्त्र, निवारा- मूलभूत गोष्टी; पसा नकोय. मानवी सभ्यतेचं हे पोखरलेलं स्मारक आपल्या डोळ्यांदेखत जमीनदोस्त झालंय; पण आपल्याला आपल्याच डोळ्यांवर विश्वास ठेवायचा नाहीए. सर्व काही पूर्वीसारखं असेल अशी आशा आपल्याला आहे. आपलं काय गमावलं गेलंय ते आपल्याला कळत नाही आणि पुनर्जन्माची शक्यताही आपल्याला कळत नाही. अजून पाषाणयुगाचीच भाषा वापरतोय आपण. सध्याच्या वास्तवाचं जगड्व्याळ स्वरूप जर आपल्या पकडीत येत नाहीए तर भविष्यकाळाबद्दल कुठल्या प्रकारे विचार करू शकणार आहोत आपण? गेली हजार वष्रे भूतकाळातल्या संज्ञांनुसारच आपण विचार करतोय; आणि आता तर एका फटक्यात सगळा भूतकाळ नामोनिशाण झालाय. आता उरलाय आपल्याजवळ आपल्याकडे टवकारून पाहणारा भविष्यकाळ फक्त. त्याचा जबडा दरीसारखा उघडलाय. सगळे कबूल करताहेत की तो भीतिदायक आहे आणि भविष्यकाळात आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय ह्य़ाची नुसती कल्पनाही झोप उडवते भल्याभल्यांची. भविष्यकाळ भूतकाळापेक्षा महाभयंकर असणार आहे हे मात्र निश्चित. पूर्वी राक्षसांचा आकार माणसांच्या आकाराएवढाच असायचा. तुम्ही शूरवीर असलात तर दोन हात करता यायचे त्यांच्याशी. आता राक्षस दिसत नाही. अदृश्य आहे. धुळीच्या प्रत्येक कणाकणात आता अब्जावधी राक्षस आहेत. तुमच्या लक्षात येतंय का मी पाषाणयुगाचीच भाषा वापरतोय ते? मी असं बोलतोय, की जणू काही अणू स्वतच एक राक्षस आहे. जणू तोच विध्वंस करतो; आपण माणसं नाही. विचार करायला माणसानं सुरुवात केली तेव्हापासून आपण आपली ही फसवणूक चालवलीय. हाही भ्रमच आहे म्हणा की फार केव्हातरी भूतकाळात माणसानं विचार करायला सुरुवात केली. मनानं म्हणाल तर माणूस अजूनही चार पायांनीच चालतोय. हृदय भीतीनं धाडधाड उडत असताना डोळे बंद करून धुक्यात चाचपडतोय तो. आणि त्याला सगळ्यात भीती कशाची वाटतेय माहिताए? त्याला स्वत:च्याच प्रतिभेची भीती वाटतेय. देवा!
एक क्षुद्र अणू जर एवढी ऊर्जा पोटात बाळगत असेल तर ज्याच्या अंगात अणूंची विश्वंच वसतीला आहेत, त्या माणसाचं काय? ऊर्जेचीच भक्ती करायची तर तो स्वत:कडेच का नाही बघत? एका क्षुद्रातिक्षुद्र अणूमध्ये काय अमर्याद शक्ती दडली आहे त्याची माणूस कल्पना करू शकतो व ते दाखवूनही देतो, तर त्याच्यामध्ये वसतीला असलेल्या असंख्य नायगऱ्यांचं काय? आणि म्हटलं तर मग पृथ्वीवरची ऊर्जा तरी जड द्रव्यांचं एकत्र येणं अनंत प्रकारे, असंच की नाही? आपण वेसण घालायला राक्षसच शोधत असलो तर बुद्धी पांगळी पडेल भीतीनं, इतके अनंत राक्षस आपल्या अवतीभोवती आहेत. किंवा त्यांचं असणं इतकं हर्षभरित करणारं आहे, की सर्वानी श्वासही न घेता धावाधाव करून घराघरात उन्माद आणि गोंधळ पसरवला पाहिजे. सतानानं पापाचे दरवाजे ज्या अत्युत्साहानं इथं उघडले आहेत त्याचं कौतुक मगच आपल्याला करता येईल. इतिहासातल्या माणसांना खरं राक्षसी काय, ते खरं म्हणजे माहीतच नाहीए. हलकं हलकं डहुळल्या जाणाऱ्या छायाजगतातच माणूस आजवर राहत आलेला आहे. चांगलं आणि वाईट हय़ांचा न्यायनिवाडा पूर्वीच झालेला आहे. पाप, भासजगत, अंधश्रद्धा मरोत आता. ह्य़ा मायाजगतापलीकडे पाहता यावं म्हणून माणसाला दुसरी दृष्टी दिली गेली आहे. आता त्याच्याकडून एवढीच अपेक्षा करायची आहे की आता त्यानं आपल्या आत्म्याचे डोळे उघडावे, सत्याच्या अंतर्गाभ्यापर्यंत पोचावं आणि भ्रमाच्या, भ्रांतीच्या प्रदेशात भटकू नये.
रँबोच्या आयुष्याचा अन्वयार्थ लावताना एक छोटासा बदल मला करावासा वाटतोय, आणि त्याचा संबंध नियती ह्य़ा कल्पनेशी आहे. आपल्या युगाचा, त्या युगाच्या विध्वंसक शक्तींचा- ज्या आता दृग्गोचर होत आहेत- कवी होणं ही त्याची नियती होती. मला वाटायचं की रँबोची नियती हीच की, गुंतागुंतीच्या आयुष्यात जेरबंद होऊन लाजिरवाणी अखेर त्याच्या कपाळी लिहिली असणं. आपलं नशीब कवितेवर अवलंबून आहे असं तो म्हणाला तेव्हा मला वाटलं, तो आपल्या पुढच्या जीवनातल्या घटनांबद्दल बोलत होता. असं तो बोलत होता तेव्हा मला वाटलं की स्वत:च्या आत्म्यावरची सगळी वस्त्रं त्यानं उतरवली होती आणि आत्माविष्कारासाठी त्याला कलेची गरजच उरलेली नव्हती. कवी म्हणून जे सांगा-बोलायचं होतं ते सांगून, बोलून झालं होतं. त्यालाही हे कळत असावं. म्हणूनच त्यानं ठरवून कवितेकडे पाठ फिरवली. त्याच्या आयुष्याच्या उत्तरार्धाचं वर्णन काहींनी ‘कुंभकर्णाची झोप’ असं केलं आहे. पण जगाला विसरून कलावंत झोपी गेलाय असं काही प्रथमच घडत नव्हतं. पॉल व्हॅलेरीचं उदाहरण पटकन डोळ्यासमोर येतं. गणितात तो इतका रमला की जवळजवळ वीस र्वष त्यानं कविता अगदी सोडूनच दिली होती. पण असं असलं तरी माणसं घरी परततात, जागी होतात. रँबोला जाग आली ती त्याच्या मृत्यूमध्ये. त्याच्या मृत्यूचं वास्तव जसजसं लोकांना आकळू लागलं तसतसा त्याच्या मृत्यूनं मालवलेला त्याचा क्षीण प्रकाश अधिकाधिक तीव्र, प्रखर होऊ लागला. तो प्रत्यक्षात जगला नसेल इतकं लोकविलक्षण, नेत्रदीपक जीवन तो त्याच्या मृत्यूनंतर जगला. वाटतं की समजा, ह्य़ा जीवनात तो परतला असता तर कुठल्या प्रकारची कविता त्यानं लिहिली असती, कुठला संदेश त्यानं दिला असता. तारुण्याच्या ऐन भरात तो असताना त्याचं जीवन अध्र्यावर कळीसारखं खुडलं गेलं आणि त्यामुळे ज्याच्यापासून आतल्या युद्धांना विराम मिळतो असा विकासाचा टप्पा त्याच्याकडून हिरावूनच घेण्यात आला. त्याच्या आयुष्याचा बहुतांश शापित होता. आत्म्याच्या निरभ्र, स्वच्छ अवकाशाची विश्रब्धता शोधत तो निकरानं लढला, आणि आता अभ्रं दूर होतायतच अशा नेमक्या वेळी तो जमीनदोस्त झाला. डी. एच. लॉरेन्स आणि इतर काही लेखकांप्रमाणेच त्याचीही ज्वर चढल्यासारखी झालेली धावपळ अल्पायुषी माणसाच्या जाणिवेवर नेमकं बोट ठेवते. आपण स्वत:ला विचारलं की, ह्य़ा माणसांनी पूर्णत्वानं आविष्कृत केलं का स्वत:ला, तर उत्तर होकारार्थी येतं. पण ह्य़ांना पूर्ण आयुष्य जगणंच नाकारलं गेलं होतं, आणि त्यांच्याबद्दल समजुतीनं बोलायचं तर त्यांनी न जगलेला भविष्यकाळही विचारात घ्यावाच लागतो. मी लॉरेन्स आणि रँबो- दोघांबद्दलही म्हटलंय की, त्यांना तीस र्वष अधिक मिळाली असती तर अगदी वेगळी गाणी ते गायले असते. त्यांची नियती व ते अभिन्न होते. त्यांचा विश्वासघात केला त्यांच्या नशिबानं. हे आपल्याला कळत नाही म्हणून त्यांचं वागणं, त्यांचे हेतू ह्य़ांचा अर्थ लावताना आपला घोटाळा होतो.
वाढाळूपणाचं, उत्क्रांतीचं उत्तम उदाहरण होता रँबो. त्याच्या आयुष्याच्या पूर्वार्धातला त्याचा विकास उत्तरार्धातल्या विकासाइतकाच स्तिमित करणारा आहे. कुठल्या देदीप्यमान टप्प्यावर तो पोचणाराय ह्य़ाचा आपल्यालाच अंदाज नाही. त्याच्यातला चळवळ्या माणूस आणि कवी एकरूप होण्याची वेळ येऊन एका वेगळ्या सर्जनशील टप्प्यावर तो येतो तेव्हाच नेमका तो आपल्या क्षितिजांच्या खाली उतरतो. त्याला पराभूत माणूस म्हणून मरताना आपण पाहतो; पण अनेक वष्रे त्यानं ह्य़ा जगाचा अनुभव घेतला असता तर त्याला काय फळ आलं असतं ह्य़ाचा वेध आपल्याला घेता येतच नाही. दोन परस्परविरोधी व्यक्तित्वं त्याच्यात एकवटलेली दिसतात. त्यांच्यातला संघर्ष आपल्याला दिसतो; पण त्याच्यातली संभाव्य एकता किंवा सिद्धता आपण पाहू शकत नाही. त्याच्या जीवनाचं महत्त्व ज्यांना समजलेलं आहे असेच लोक अशा प्रकारचे अंदाज स्वत:शी बांधू शकतील. एखाद्या थोर कलावंताच्या कामाच्या संदर्भात त्याच्या जीवनाकडे आपण जातो ते त्याच्यात लपलेलं आणि दुबरेध काय आणि ते कसं अपुरं राह्य़लंय, ते पाहायला. आपल्याला खऱ्या लॉरेन्सबद्दल किंवा खऱ्या रँबोबद्दल बोलावंसं वाटतं म्हणजेच हे सत्य कबूल करणं, की काही अज्ञात लॉरेन्स म्हणून, काही अज्ञात रँबो म्हणून आहेत. ते स्वत:ला पूर्ण आविष्कृत करू शकले असते तर मग त्यांच्याबद्दल काही वाद झालेच नसते. मजा अशी आहे की, स्वत:ला प्रकट करण्यासाठी निघालेल्या माणसांबद्दलच गूढं असतात. ते ह्य़ा जगात जन्मतात तेच जणू त्यांना आपलं खोलातलं रहस्य सांगायचं असतं म्हणून. काहीतरी असं गूढ आहे, की ते त्यांच्या मनाला कुरतडतंय. ह्य़ाबद्दल शंकाच नाही अगदी. ते आणि इतर थोर माणसं ह्य़ांच्यातला फरक कळायला आपल्याला काही दिव्यदृष्टीच हवी असं नाही. ते आपले प्रश्न कसे हाताळतात ह्य़ासाठीही आपल्याला काही दिव्यचक्षू नकोत. त्यांच्या त्यांच्या काळाच्या वृत्तींशी, स्वभावाशी, त्या काळात छळणाऱ्या, त्या काळाला वैशिष्टय़, रंगरूप देणाऱ्या सगळ्याच गोष्टींशी त्यांचा नाळेचा संबंध असतो. त्यांच्यात द्वैत असतं, विरोधाभास असतात, हे तर उघडच आहे; पण त्याचं कारण ते जुन्याचं त्याचबरोबर नव्याचंही मूíतमंत रूप असतात म्हणून. त्यांचे समकालीन कितीही थोर असले तरी ते असे प्रश्न उभे करीत नाहीत. पण ह्य़ांचा मात्र आस्वाद घ्यायचा, ह्य़ांचं मूल्यमापन करायचं तर थोडा काळ जावा लागतो, थोडा दूरस्थपणा यायला लागतो. रँबोसारख्यांची मूळं भूतकाळात नाही तर अशा भविष्यकाळात असतात, की ज्याच्यामुळं आपण खोलवर अस्वस्थ होतो. ह्य़ा माणसांना दोन लयी, दोन चेहरे, दोन अन्वय असतात. ते अभिसरणाशी, नित्यबदलाशी एकात्म झालेले असतात. एक नवीनच शहाणपण त्यांच्याजवळ असतं, ज्याच्यामुळे त्यांची भाषा आपल्याला तुटक आणि विरोधाभासांनी भरलेली वाटते.
मन कुरतडणाऱ्या रहस्याबद्दल मी आता बोललो त्याचा निर्देश रँबोच्या एका कवितेत आहे.
Hydre intime,sons gueules,
Qui mine et lesole
तोंड नसलेली खोलवरची हैद्रा
शोषण करते नी अपार दु:खी.
हे एक दुखणंच होतं, ज्याच्यामुळे तो उत्कर्षांच्या शिखरावर असताना काय, की स्खलनाच्या खोल विवरात, तो कायम विषाची बाधा झाल्यासारखा असे. त्याच्यामध्ये चंद्र आणि सूर्य दोन्ही प्रखर होते आणि दोन्हींना ग्रहण लागलं होतं. त्याच्या अस्तित्वाचा गाभाच छिन्न झालेला होता ह्य़ा विषानं; ते कॅन्सरसारखं पसरत गेलं आणि पुढे त्यानं अगदी शारीर पातळीवर त्याचा गुडघा पकडला. कवी म्हणून त्याचा जो कालखंड होता, जो आपल्याला त्याचा चांद्रमास म्हणता येईल, त्यात जे ग्रहण आपल्याला दिसतं तेच ग्रहण कविता सोडून तो मुशाफिरीला निघाला, निरनिराळ्या उपद्व्यापांत गुंतला तेव्हाही त्याला ग्रासताना दिसतं. हा त्याचा सूर्यमास होता. तरुणपणी वेडा होता होता हा थोडक्यात वाचला होता. आता मृत्यूनं त्याची सुटका केली त्यापासून. मृत्यूनं त्याच्या आयुष्याची दोरी अशी तोडली नसती तर एकच मार्ग त्याला उपलब्ध होता. ध्यानधारणेचं, योग्याचं जीवन. त्याच्या आयुष्याची सगळी सदतीस वष्रे ह्य़ाचीच तयारी होती असं मला वाटतं.
त्याच्या ह्य़ा न जगलेल्या आयुष्याबद्दल मी स्वत:ला इतक्या ठाम विश्वासानं का बोलू देतोय? कारण मला आमच्या जीवनातली साम्य पुन:पुन्हा दिसतात, आमच्या विकासातली साम्यं दिसतात. रँबो गेला त्या वयात मी गेलो असतो तर माझ्या धडपडीबद्दल, माझ्या प्रयत्नांबद्दल कोणाला काय कळलं असतं? कोणालाच नाही. मी एक कमालीचा पराभूत माणूस; एवढंच राह्य़लं असतं मागे. माझं पहिलं पुस्तक प्रसिद्ध व्हायला मला माझं त्रेचाळीसावं येण्याची वाट पाहावी लागली.‘रं्र२ल्ल’चं प्रकाशन रँबोसाठी निर्णायक क्षण होता, तसा हा माझ्यासाठी. त्या पुस्तकाच्या आगमनानं माझ्या आयुष्यातल्या नराश्याचं आणि पराभवाचं दुष्टचक्र संपलं. माझ्यासाठी ते माझं ‘निगर बुक’ होतं. विषाद, बंडखोरपणा, अशांत मन ह्य़ांचा अर्क आहे ते पुस्तक म्हणजे. पण त्याचवेळी त्यात द्रष्टेपण आहे आणि मनाच्या जखमा भरून येतील असंही काही. फक्त वाचकांच्याच नव्हे; माझ्याही. भूतकाळापासून विच्छेदून घेतलेल्या पुस्तकात हे सापडतं, त्याचं ते व्यवच्छेदक लक्षणच आहे. हे त्याला प्राप्त होतं ते कलेच्या अमृतस्पर्शानं. त्या पुस्तकामुळं मी भूतकाळाच्या तोंडावर दरवाजा आपटू शकलो व पुन्हा मागच्या दारानं आत येऊ शकलो. मनाला सतत कुरतडणारं ते गूढ अजूनही माझे लचके तोडतच असतं; पण ते आता उघड गुपित- ‘Open secret’आहे आणि मला त्याच्याशी जमवून घेता येतंय.
ह्य़ा गुपिताचं नक्की स्वरूप काय? मला वाटतं त्याचा संबंध आपल्या आयांशी आहे. लॉरेन्स आणि रँबो- दोघांचंही एकसारखंच ह्य़ाबाबत. मला आपलासा वाटणारा हा त्यांच्यातला विप्लव म्हणजे ‘मानवतेशी असलेल्या आपल्या नाळसंबंधाचा शोध’ असं सोप्यात सोपं करून म्हणता येईल. आपण ह्य़ा दोघांच्या जातीतले असलो तर आपला नाळसंबंध ना सामुदायिक पातळीवर राहत, न वैयक्तिक. जुळवून घेणारच नाही असा वेडेपणा स्वभावात असला तर असंच होणार. आपल्यात नम्रता नसते की संयम की लवचिकपणा- जो शिष्यात असावा लागतो. सर्वश्रेष्ठ आत्म्यांच्या सहवासातही आपण स्वस्थचित्त नसतो, कारण तेही आपल्याला संशयास्पद वाटतात किंवा दोषांनी भरलेले. आणि तरी आपलं नातं असतं ते ह्य़ा उत्क्रांत आत्म्यांशीच. हा एक मोठाच तिढा आहे बघा; आणि तरी त्यात खोल अर्थ दडलाय. आपण आहोत तसे, आपलं वेगळेपण आहे तसं स्वीकारून मगच आपल्याला मानवतेशी नातं जोडावं लागतं; अगदी त्यातल्या हीन-दीनांशीही हे नातं जोडावं लागतं. स्वीकार हाच कळीचा शब्द. पण ह्य़ा शब्दापाशीच तर ठेच लागून अडखळायला होतं. पण स्वीकार म्हणजे संकेतांना, रूढींना, लोकाचाराला शरण जाणं असं नाही, तर स्वीकार म्हणजे सर्वस्वानं स्वीकार.
जगाचा स्वीकार करणं एवढं कठीण का जातं ह्य़ा प्रकारच्या लोकांना? मला समजतंय ते असं की, आयुष्याच्या सुरुवातीची काही बाजू आणि स्वत:चं व्यक्तित्व ह्य़ांनी दडपून टाकलेलं असतं; आणि ते इतकं, की त्यांचं त्यांना ते ओळखता येत नाही. आपण अशीही कारणमीमांसा करतो की, त्यांनी हे केलं नसतं तर त्यांनी त्यांचं व्यक्तित्व, स्वातंत्र्य सगळं गमावलं असतं. ज्या जगात सगळ्यांना एकाच मुशीत घालून एकसारखं केलं जातं, त्या जगात आपली स्वत:ची खास ओळख जपणं म्हणजे मुक्ती असं त्यांना वाटतं. भीतीचं खरं मूळ- आपलं अस्तित्व ह्य़ा एकसाची लोकव्यवहारात हरवलं जाईल, ह्य़ा भावनेत आहे. रँबोनं आग्रहानं सांगितलंय की, मोक्षामध्ये त्याला स्वातंत्र्य हवं होतं. पण हे भ्रामक स्वातंत्र्य सोडून देऊनच ‘मुक्त’ होता येतं. रँबो मागत होता त्या स्वातंत्र्याचा अर्थ स्वत:ला बेबंदपणे सिद्ध करणाऱ्या अहंकाराचं स्वातंत्र्य. हे स्वातंत्र्य नव्हे. एखादा माणूस खूप जगूनही त्याच भ्रमात राहिला आणि त्यानं स्वत:ला सर्वागानं व्यक्त केलंही, तरी त्याला तक्रारीला कारण राहीलच, बंडखोरीला जागा असेलच. ह्य़ा प्रकारच्या स्वातंत्र्यात आक्षेप घेण्याचा, प्रसंगी देशद्रोह करण्याचा अधिकार गृहीत धरलाय. ह्य़ात इतरांच्या मतांचा, मतविरोधांचा विचारच नाही. विचार फक्त स्वत:चा. असं आपण वागलो तर आपल्याला समस्त मानवजातीशी न कुठला अनुबंध जोडता येणार की कुठला संवाद करता येणार. आपण कायम एकटे, ेएकांडे, कायम तुटलेले राहू.
ह्य़ाचा एकच अर्थ दिसतोय मला; की आपली आईशी असलेली नाळ तुटलेली नाहीए अजून. आपली सगळी बंडंबिंम्हणजे नुसती धूळफेक आहे, हा भावबंध झाकण्याची निकराची धडपड. ह्य़ा प्रकारची माणसं कायम विरोधात असतात. दुसरं काही त्यांना जगणंच शक्य नाही. गुलामी- मग ती देशाची असो, धर्माची असो की समाजाची; ह्य़ांच्या दृष्टीनं ती बागुलबुवा. शृंखला तोडण्यात त्यांची जीवनं जातात. पण त्यांनी लपवलेला हा भावबंध त्यांच्या मर्माला आतून सतत कुरतडत असतो. ‘आपली आई’ ह्य़ा प्रश्नाशी त्यांनी समझोता केला तर मग इतर शृंखला तोडण्याच्या त्यांना असलेल्या ध्यासातून त्यांची सुटका होईल. ‘बाहेर ! कायम बाहेर! आईच्या कुशीच्या पायरीवर कायम बसलेला!’ मला वाटतं, माझेच शब्द आहेत हे. ‘ब्लॅक िस्प्रग’मधले. हा माझा सुवर्णकाळ होता आणि माझं हे गुपित माझ्या पूर्ण ताब्यात होतं. आईशी एवढे बांधलेले असतो आपण; म्हणून तर तिच्यापासून दुरावतोही आपण. तिचं अस्तित्व खिजगणतीतही नसतं आपल्या. असलंच तर एक ब्याद म्हणून. तिच्या गर्भातली सुरक्षितता, आराम, काळोख मात्र आपल्याला हवा असतो. समाजही बंद दरवाजांचा, विधिनिषेधांचा, कायदे, दडपशाही, कुचलणं ह्य़ांचा असतो. समाज ह्य़ांनी बनतो आणि त्यांच्याशी जुळूवन घेण्याचा काही मार्ग दिसत नाही; पण ह्य़ातूनच ‘खरा समाज’ निर्माण करणं एखाद्याला जमलं तर जमलं. एखाद्या खाईच्या कडय़ावर न थांबता नाच करण्यासारखं आहे हे. हे केलंत तर जग तुम्हाला ‘महान क्रांतिकारक’ म्हणेल, पण तुम्हाला प्रेम मिळणार नाही. आणि सगळ्या माणसांपेक्षा विप्लवी माणसाला सगळ्यात जास्त काय हवं असतं, तर प्रेम. प्रेम मिळावं, आपल्याला मिळेल त्यापेक्षा अधिक ते द्यावं आणि आपणच साक्षात् प्रेम बनावं.
‘विराट गर्भाशय’ असा निबंध मी एकदा लिहिला. त्यात हे जग म्हणजेच एक गर्भाशय, सृजनाची जागा अशी कल्पना होती. स्वीकाराचा तो एक शूर आणि रास्त प्रयत्न होता. पुढे येऊ घातलेल्या सर्वस्व स्वीकाराची ही सुरुवात होती. असा स्वीकार, की जो माझ्या अस्तित्वाला पूर्णपणे कळला होता. पण जग हे गर्भाशय, सृजनगृह आहे, हे माझं म्हणणं इतर विप्लवी लोकांना आवडलं नाही. त्यामुळे मी आणखी तुटून वेगळा झालो. एका बंडखोराचं दुसऱ्या बंडखोराशी भांडण होतं- आणि बहुधा होतंच ते- तेव्हा पायाखालची जमीन निसटते. कम्यूनच्या प्रयोगात आपण बुडून रसातळाला जातोय, हा अनुभव रँबोनं घेतला. व्यावसायिक बंडखोरही असतात आणि त्यांना विरोधाची गोळी गिळता येत नाही. विरोधाला एक कुरूप नाव त्यांच्याकडे आहे. द्रोह. पण कळपांपासून बंडखोर वेगळा होतो तेच मुळी त्याच्या द्रोहामुळे. त्याचा स्वभावच तो. तो द्रोही असतो, विटंबना करणारा असतो; आत्म्यानं नाही तरी निदान शब्दांनी. त्याला भय असतं, की त्याच्यात जे मानवी आहे त्यामुळे तो इतरांशी बांधला जाईल. म्हणून मग तो द्रोह करतो. तो मूíतभंजक होतो, कारण त्याच्यात मूíतपूजेची भावना इतकी उत्कट असते, की तिलाच तो घाबरतो. त्याला सगळ्यात जास्त काय हवं असतं, तर त्याचं सामान्य माणूसपण, कौतुक आणि परमादर करण्याची शक्ती. त्याला एकाकीपण नकोसं झालंय आता. पाण्याबाहेरच्या माशासारखं कसं राहायचं त्यानी? त्याचे आदर्श कोणीतरी स्वीकारल्याशिवाय त्याला त्या आदर्शासोबत जगता येत नाही. पण आपल्या समकालीनांची भाषाच तो बोलत नसला तर स्वत:च्या कल्पना आणि आदर्श तो त्यांच्यापर्यंत पोचवणार कसा? प्रेम म्हणजे काय, हेच त्याला माहीत नसलं तर तो त्यांची मनं कशी जिंकणार? स्वत:चं सगळं आयुष्य विध्वंस करण्यात घालवल्यावर तो इतरांना नवनिर्माणाची प्रेरणा कशी देणार?
(क्रमश:)
1946-1949-1956 by New Directions Publishing Corporation
महेश एलकुंचवार