‘The Time of the Assassins’ या हेन्री मिलर यांच्या ललितबंधाचा ज्येष्ठ नाटककार- साहित्यिक महेश एलकुंचवार यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला प्रवाही अनुवाद..
अस्वस्थतेचा पाया काय असतो? तो ‘hydre intime’- बहुमुखी सर्प एखाद्याला असं आतपर्यंत तोडून खातो की आपल्या अस्तित्वाचा गाभाही भुसा होतो आणि सगळं शरीर, स्वत:चं व जगाचं, विध्वंसाचं मंदिर बनतं. ‘कसलाही भ्रम माझ्याजवळ उरला नाही!’ असं रँबो तळतळून म्हणाला होता. पण त्याचं स्वत:चं आयुष्य हाच एक विराट भ्रम होता. आपल्या अस्तित्वाचं मर्म त्याला कधी कळलंच नाही. त्याच्यावर त्याला ताबाही मिळवता आला नाही. वास्तव त्याच्या चेहऱ्याला मुखवटय़ासारखं घट्ट चिकटलं होतं आणि तो ते तीक्ष्ण नखांनी ओढून काढण्याचा प्रयत्न करीत होता. एक कधी न भागणारी तहान त्याच्यात होती.
Legendes ni figures
Ne me desalterent.
भव्य माणसं, व्यक्ती
कोणी माझी तहान भागवू शकत नाही.
नाही, कशानंच त्याची तहान शमली जाऊ शकत नव्हती. त्याच्या आतडय़ातच ती होती आणि त्याला सतत कुरतडत होती. हेलपाटणाऱ्या नावेप्रमाणे तो त्याच्या नेणिवेतून आलेल्या कवितांच्या समुद्रावर फेकला जाताना दिसतो. जिथे म्हणून प्रकाश पोचतो तिथे तो प्रकाश जखम करतो. आत्म्याच्या प्रखर प्रकाशानं त्यानं आपल्याभोवती बांधलेल्या कबरीला भेगा पडतात. तो अशा प्राचीन आश्रयस्थानात राहतोय, की ते दिवसाच्या प्रकाशात ढासळायला लागतं. एखाद्या आर्ष पुरुषासारखा तो प्राकृत तत्त्वांबरोबर आनंदानं राहू शकत होता; पण सर्व फ्रेंचांपेक्षा अधिक फ्रेंच असलेला हा त्यांच्यात मात्र एकांडा, परका होता. सर्वानी मिळून जे जे निर्मिलेलं होतं ते त्यानं कायम नाकारलं. कथ्रिडल्स आणि धर्मप्रचार ह्य़ांना आिलगन देणारी त्याची स्मृती वांशिक स्मृती आहे. जणू जन्मत: त्याला स्वतंत्र व्यक्तित्वच मिळालेलं होतं. त्याचे स्वत:चे स्वतंत्र नियम आहेत, काम करण्याची स्वतंत्र तत्त्वं, स्वत:ची स्वतंत्र जीवनदृष्टी. परंपरेनं वारसा मिळालेला खानदानीपणा मिरवणारा तो जीव आहे. सगळ्या बाबतीत अत्युत्कृष्ट असा. स्वत:चं उणं झाकण्यात कुशल. तो जन्मत:च वेगळा. मेधावी. माणसांच्या रक्तामांसानी बनलेला, पण लांडग्यांच्या स्तन्यावर वाढलेला. सांकेतिक विश्लेषणानं हे भूत समजायचंच नाही कधी. तो यशस्वी झाला नाही माहीत आहे आपल्याला; पण स्वत:शी प्रामाणिक राहण्यासाठी त्यानं काय करायला हवं होतं हे कोण सांगू शकणार? त्याच्यासारख्या गूढाशी झुंज घ्यायची तर समजावून घेण्याचे आपले नियम आपल्याला बदलावे लागतील.
आता एकदम खूप माणसं उपटली आहेत, की जी काही समजून घेण्याच्या आपल्या पद्धती बदलवण्याची जबरी करीत आहेत. आश्रयस्थानं जुनी सगळी ढासळतायत आपली. विरोधी आवाज काढणारा आता प्रत्येक जण उघडय़ावर येणार. लपायला जागा नाही आता कोणाहीसाठी. आपली सगळ्यांचीच ही दशा; तर बंडखोरीनं जणू ग्रासलेल्याच रँबोला त्याच्या खास खंदकातून हुसकावून लावण्यात येणारच. सगळं जगच धरपकडून न्यायासनासमोर खेचलं जातंय. अशा परिस्थितीत एखादा दुर्मीळ अशांत आत्मा आपल्या दु:खातून सुगंधाचं अत्तर काढतही असला तरी त्याची काय तमा? सगळा मानववंशच ह्य़ा दिव्यातून जाण्याची तयारी करीत आहे. लवकरच आणि धाडकन. आपण सगळेच- द्रष्टा असो की सामान्य माणूस- छातीला माती लावून जगणार आहोत. एक संपूर्णपणे नवं, भयभीत करणारं, अवाक् करणारं जग आपल्या उंबरठय़ावर उभं आहे. एका सकाळी उठून आपण बाहेर बघू तर आकलनात येणार नाही असं दृश्य आपल्याला दिसेल. हे नवं जग येणार म्हणून कवी आणि द्रष्टे किती पिढय़ांपासून आपल्याला सांगताहेत, पण आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायलाच नकार दिला. आपण एकाच जागी खुंटय़ासारखे खिळलेले. आपल्याला आकाशभ्रमण करणाऱ्यांचा संदेश स्वीकारता येत नाही. त्यांच्याकडे आपण दिवाभीत म्हणूनच कायम पाह्य़लंय का?
कवी किती आकाशात भटकणाऱ्या ग्रह-ताऱ्यांसारखे असतात! ग्रहांप्रमाणेच तेसुद्धा दुसऱ्या जगांशी संवाद साधतायत की नाही? वांशिक स्मृतींमध्ये गाडल्या गेलेल्या भूतकाळाच्या गोष्टी आणि पुढे काय येऊ घातलंय ते, हे सगळं तेच नाही का आपल्याला सांगत? ह्य़ा धरणीवर लपतछपत ते दिवस काढतात; व त्यांना आपण स्वर्गातले देवदूत म्हणतो. त्यांच्यापेक्षा उन्नत काय असेल? आपण मेलेल्या वास्तवात जगतो, तर ते जगतात चिन्हं आणि प्रतिमांच्या जगात. आपल्या मुळांपासून विलग करू पाहतायत आपल्याला ते; त्यांच्याबरोबर आपल्या आत्म्यांना पंख लावून आपण भरारी मारावी असं त्यांना वाटतं. आपल्यासमोर उद्या काय येऊन उभं राहणार आहे हे ते सतत सांगत असतात; पण अज्ञाताचं भय आपल्या पोटी इतकं, की ते हे सांगतात म्हणून आपण त्यांना सुळी देतो. कवीमध्ये जगण्याचे झरे लपलेले असतात. तो आपण सर्वापेक्षा उत्क्रांत असतो. इथे मी कवी म्हणतो तेव्हा स्पिरिट, कल्पना ह्य़ात रमलेलेही आले. त्याचं जग आपल्या जगासारखं नसतं. चार आयाम असलेल्या जगातल्या माणसाला तीन आयाम असलेल्या जगात जगताना जे भय वाटतं तेच त्याच्या मनात असतं. तो आमच्या जगात राहतो, पण इथला नसतो; त्याचं इमान दुसरीकडेच असतं. त्याचं कामच मुळी आपल्याला छेडायचं आणि ज्या क्षुद्र जगात आपण राहतो तिथे आपलं जगणं असह्य़ करून टाकायचं हेच आहे. पण जे ह्य़ा तीनआयामी जगात राहूनही भ्रममुक्त झाले आहेत, इथल्या शक्यता ज्यांच्यासाठी संपलेल्या आहेत, तीच माणसं कवीच्या हाकेमागे जाऊ शकतात.
जे संकेत व प्रतिमा कवी वापरतो तो एक हय़ाचा पुरावाच आहे, की ज्या गोष्टी शब्दबद्ध करता येत नाहीत अशा अनुभवांशी भाषा सामना करत असते. सर्व पातळ्यांवर ह्य प्रतिमा आकलनीय होऊ लागल्या रे लागल्या की त्यांची वैधता, त्यांची परिणामकारकता नष्ट होते. कवीनं चारचौघांसारखी भाषा बोलावी असं म्हणणं म्हणजे द्रष्टय़ाला त्याची भविष्यवाणी सोपी करायला सांगणं. फार उंचीवरून, दूरवरच्या प्रदेशातून जे आपल्याकडे येतं ते गुप्तता आणि रहस्याच्या अवगुंठनातून येतं. आपल्या जगात जे कायम अघळपघळ करून, शृंगारून स्पष्ट केलं जातं ते इथे त्याचवेळी घट्ट आटवलं जातं. स्टेनोग्राफरनं चित्रशैलीत लिहावं तसं. जे चिरंतन आहे, आत्म्याच्या जगातलं आहे, ते कुठल्याही स्पष्टीकरणापलीकडचं आहे. कवीची भाषा लक्षणायुक्त असते. आत्म्याच्या अनंततेकडे कवी वळतो तेव्हा ती त्याच्या आतल्या आवाजाच्या लयीबरोबर चालते. ज्याच्याजवळ भाषाच नाही असा सामान्य माणूस ह्य आतल्या जाणीवेतून कवीशी संवाद साधतो. इथे साक्षरतेचा काही संबंध नाही. हा आत्मिक विकासाचा मामला आहे. तडजोड न करण्याची रग रँबोमध्ये सर्वात स्पष्ट दिसते आणि त्याच्या सगळ्या साहित्यात तिचं प्रतििबब पडलेलं आहे. परस्परांपेक्षा अगदी भिन्न असणाऱ्यांनाही तो कळतो तसाच अनेक लोकांना तो दुबरेधही वाटतो. त्याची नक्कल कोणी केली की ती चटकन् लक्षात येते. प्रतीकं वापरणाऱ्या कवींशी त्याचं काही नातं नाही. अतिवास्तववाद्यांशीही नाही. तो खूप घराण्यांचा बाप आहे, पण कोणाचाच पिता नाही. प्रतीकांचा वापर केलाच, तर तो खास त्याच्या पद्धतीनं करतो; आणि ती त्याच्या प्रतिभेची खूण आहे. त्याची प्रतिमासृष्टी त्यानं रक्त आणि यातना ह्यतून निर्माण केली होती. ती एकाच वेळी निषेध करणारी आणि आत्म्याचे झरेच बुजवून टाकणाऱ्या अभद्र ज्ञानाच्या प्रसाराविरुद्ध होती. ती त्याचवेळी जुन्या चिन्हलिपीत जे करता येणार नाही ते करीत होती- म्हणजे संकीर्ण वास्तवाची खिडकी उघडत होती. समकालीन कवींपेक्षा इथे तो गणिती किंवा शास्त्रज्ञ ह्यंच्या अधिक जवळचा आहे. एक लक्षात घ्या पण- आपल्या उत्तरकालीन कवींनी गणिती आणि शास्त्रज्ञ ह्यंची प्रतीकं जशी वापरली तशी त्यानं कधी वापरली नाही. त्याची भाषा ही आत्म्याची भाषा आहे; वजनं, मापं ह्यंची नाही. तो किती ‘आधुनिक’ होता हे एवढय़ा एका गोष्टीनंच कळतं.
आधी मी ज्याचं सूतोवाच केलं त्या मुद्दय़ाचं अधिक स्पष्टीकरण मला इथे करायला हवं. कवी आणि त्याचे वाचक ह्यंच्यातला संवाद. प्रतीकांचा रँबोनं जसा उपयोग केलाय त्याचं कौतुक करताना ह्य कवीची जातकुळी मला दाखवायचीय. माझ्या मते, अत्यंत संकीर्ण प्रतीकात्म संहिता आणि जार्गन, ज्याला मी व्यर्थ बडबड म्हणतो, ह्यत महदंतर आहे. आजचा कवी लोकांकडे पाठच फिरवताना दिसतो. जशी काही त्याला लोकांबद्दल तुच्छता वाटतेय. स्वत:चा बचाव करायला तो म्हणेलही, की मी गणिती व शास्त्रज्ञांजवळचा आहे. अतिशय शिकलेल्या लोकांनाही आकलन होणार नाही अशी गूढ भाषा हे वापरतात. ती फक्त त्यांच्यासारख्यांनाच कळते! कवी हे विसरतो की, त्याचं काम भौतिक किंवा अमूर्त जगाबद्दल प्रमेयं मांडणाऱ्या ह्य लोकांपेक्षा पूर्ण वेगळं आहे. त्याचं माध्यम आत्मा आहे आणि त्याचं जगातल्या स्त्री-पुरुषांशी असलेलं नातं मूलभूत आहे. त्याची भाषा प्रयोगशाळांसाठी नाही; ती अंत:करणाच्या गहन कानाकोपऱ्यासाठी आहे. आपल्याला हलवण्याची शक्ती त्यानं त्यागली तर त्याच्या माध्यमाची किंमत शून्य. पुनर्जन्म होतो तो अंत:करणात. आणि तिथेच कवीनं आपला नांगर टाकला पाहिजे. ह्यच्या उलट शास्त्रज्ञ ह्य भ्रांतिविश्वाशीच जुळलेला असतो. भौतिक जगाशी- जिथे गोष्टी ‘घडवल्या जातात.’ ज्या शक्तींचा उपयोग करायला हा शास्त्रज्ञ निघालाय त्यांचाच तो आता बळी होतोय. त्याचे दिवस भरत आले आता. कवीची अशी अवस्था कधी होणार नाही. जीवनाबद्दलची त्याची प्रेरणा शास्त्रज्ञासारखीच असली तर तो कवीच नाही मग. पण त्याला सगळ्यात धोका आहे त्याची सत्ता कोणीतरी नष्ट करण्याचा. कवितेचा त्याग करून त्यानं त्याच्यावर विश्वास टाकलेल्यांचा विश्वासघात केलाय आणि अगणित माणसांची नियती त्यानं फक्त स्वत:ची तुंबडी भरणं एवढंच ज्यांचं ध्येय आहे अशा लोकांच्या हवाली केलीय. कवितेचा त्याग रँबोनं केला त्याची जातकुळी स्वत:ला संपवून टाकणाऱ्या आजच्या कवींपेक्षा वेगळी आहे. कवी म्हणून आपण आहोत तसे आहोत हे त्यानं स्वीकारलं. निव्वळ जिवंत राहायचं म्हणून दुसऱ्या कशाशीही तडजोड करणं त्यानं नाकारलं. आपल्या कवींना त्याचा हेवा वाटतो, पण कवीपणाची जबाबदारी घेण्याची कोणाची तयारी नाही. त्यांनी आपला कवीपणा सिद्ध नाही केलेला; फक्त कवी म्हणून घ्यायला त्यांना आवडतं, एवढंच. सगळं जग त्यांच्या शब्दांवर ओठंगून आहे, पण त्या जगासाठी ते लिहीत नाहीत. ते एकमेकांसाठी लिहितात. स्वत:ला मुद्दाम दुबरेध करून स्वत:च्या नपुंसकपणाचं ते समर्थनही करतात. आपल्याच फुगवलेल्या अहंकाराचे कैदी आहेत ते. जगापासून ते फटकून वागतात. न जाणो त्या जगाशी थोडाही संबंध आल्याने हे शतखंड झाले तर? ते फक्त आत्मपर बोलतात असंही नाही; असते तर त्यांच्या ज्या काय वैयक्तिक व्यथावेदना असतील त्या तरी कळल्या असत्या. शास्त्रज्ञांच्या प्रमेयांइतकं स्वत:ला अमूर्त करून ठेवलंय त्यांनी. त्यांना आस लागलीय ‘शुद्ध’ कवितेच्या जगाची; जिथे परस्परसंवादाची शक्यता शून्य आहे.
रँबोला समकालीन असलेल्या थोर व्यक्तिमत्त्वांचा मी विचार करतो. नित्शे, स्टिंड्रबर्ग, दोस्तोयवस्की, त्यांनी भोगलेल्या यातनांचा मी विचार करतो. अशा यातना- की ज्या आमच्या प्रतिभावंतांना कधी भोगाव्या लागल्या नाहीत. तेव्हा मला असं वाटतं की, मानवी इतिहासात एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध सर्वात जास्त शापित आहे. भवितव्याची चाहूल लागलेल्या ह्य सर्व हुतात्म्यांमध्ये रँबोच्या दुर्दैवाशी कोणी बरोबरी करत असेल तर व्हिन्सेण्ट व्हॅन गो. रँबोनंतर एक वर्षांनं हा जन्मला आणि रँबो गेला तेव्हा त्याच वयात त्यानं आत्महत्या केली. रँबोसारखीच त्याच्याजवळही निकराची हट्टी इच्छाशक्ती होती, अमानुष धर्य होतं, अलौकिक ऊर्जा आणि चिकाटी होती. सगळ्या दरुलघ्य संकटांशी लढणं त्याला ह्य आयुधांमुळे शक्य झालं. पण रँबोसारखाच हासुद्धा जीवनाच्या ऐन भरात असताना त्या संघर्षांनं अखेर हतबल होतो; त्याच्या प्रतिभेनं परमोत्कर्ष गाठलेला असताना हा मातीत अंग टाकतो.
दिशाहीन भ्रमंती, सारखा व्यवसायबदल, संकटं, निराशा आणि मानखंडना व अज्ञात भवितव्यानं त्यांची मनं काळ्याकुट्ट ढगानं झाकोळावी तशी झाकोळली होती. दोघांच्याही बाबतीत हे इतकं एकसारखं आहे की वाटतं- जुळी भावंडं आहेत दोघं. आधुनिक काळात त्यांच्याइतकं दुखमय आयुष्य कोणाच्या वाटेला आलं नाही. तरीसुद्धा दोघांमधे एक मोठाच फरक आहे. व्हॅन गोच्या आयुष्यानं प्रेरणा मिळते. त्याच्या मृत्यूनंतर लगेचच डॉ. गाशे, ज्यांना आपला हा पेशंट खोलवर कळला होता, थिओला- व्हिन्सेण्टच्या भावाला लिहितात, ‘‘त्याच्या बाबतीत त्याला कलेचं प्रेम होतं म्हणणं पुरेसं नाही. कला त्याची धर्मश्रद्धा होती. ह्य कलेसाठी व्हिन्सेण्ट हुतात्मा झाला.’’ ही वृत्ती रँबोमध्ये मात्र थोडीशीही दिसत नाही. श्रद्धा- मग ती ईश्वरावर असो की माणसावर, की कलेवर; ती रँबोमध्ये नाही. ह्य श्रद्धेच्या अभावामुळेच त्याचं आयुष्य कधी राखाडी, तर कधी काळंकुट्ट दिसतं. तरीसुद्धा दोघांच्या स्वभावातही साम्यं अगणित आहेत आणि लक्षणीयही. त्या दोघांना जोडणारं काय असेल, तर त्यांची आपापल्या कलेतली विशुद्धता. ही विशुद्धता त्यांच्या यातनांमधून येते. हे शतक संपलं आणि आता ह्य प्रकारचं भोगणं कुठे दिसत नाही. पर्यावरण बदललंय आता. अधिक चांगलं झालंय म्हणत नाही मी; पण नवं पर्यावरण आलंय- की जिथे कलावंत अलिप्त, भावनाशून्य झालाय. ह्य दोघांसारखं भोगणारा कोणी असला आणि त्यानं ते दाखवलं, की झालंच! ‘असाध्य रोमँटिक’ अशी चिठ्ठी डकवलीच गेली त्याच्या कपाळावर. आता त्या प्रकारचं भोगणं अपेक्षितच नाही राहिलेलं.
(क्रमश:)
महेश एलकुंचवार
1946-1949-1956 by New Directions Publishing Corporation

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Sarangi maestro Pt Ram Narayan passes away
व्यक्तिवेध : पं. रामनारायण