‘The Time of the Assassins’ या हेन्री मिलर यांच्या ललितबंधाचा ज्येष्ठ नाटककार- साहित्यिक महेश एलकुंचवार यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला प्रवाही अनुवाद..
स्वत:च्या खाजगी वैयक्तिक नरकाची कहाणी त्यानं संपवलीय. तो आता रामराम म्हणून निरोप घेणार. तो घेताना वाळवंटाची प्रतिमा पुन्हा सामोरी येते. ही त्याची कायम पुनरावृत्त होणारी प्रतिमा. आता त्याचा स्फूíतस्रोत कोरडा पडलाय. ल्युसिफरप्रमाणे त्याच्या वाटय़ाला आलेला प्रकाश त्यानं वापरून संपवून टाकला आहे. आता ओढ उरली आहे ती फक्त अज्ञाताची, त्या अथांग पोकळीची. त्या अनावर ओढीला म्हणूनच तो उत्तर देतोय जणू वाळवंटाची प्रतिमा निर्माण करून. तिनं त्याला पछाडलंय. ‘‘केव्हा जाणार आपण..?’’ तो विचारतो. ‘‘केव्हा जाणार ? नव्या जगाचं स्वागत, नवं शहाणपण, पृथ्वीवरचा ख्रिसमस- हे केव्हा बघणार आपण?’’ (हे शब्द नित्शेची किती आठवण करून देतात! रँबोला तो समकालीन; पण दोघांनाही एकमेकांची काही माहिती नव्हती.)
आपल्या कर्तव्याचा मार्ग ह्यपेक्षा अधिक स्पष्ट व अधिक खोलपणे दुसऱ्या कुठल्या क्रांतिकारकानं सांगितला आहे? ख्रिसमसचा इतका दैवी अर्थ कुठल्या संतानं लावला आहे? त्याचे शब्द बंडखोराचे आहेत हे खरं, पण हा बंडखोर अपवित्र नाहीए. हा आवाज द्रष्टय़ाचा आहे. परिश्रम करायला लावणाऱ्या गुरूचा आहे. परिपक्व शिष्याचा आणि शिष्यत्व नुकतंच पत्करलंय अशाचा आहे. हा धर्मगुरू मूíतभंजक, अंधश्रद्ध, मठ्ठ असला तरी त्यानं त्या ख्रिसमसला स्वीकारायला पाहिजे. ‘‘गुलामांनो, आपण जीवनाला शापू या नको!’’ तो विद्ध स्वरात म्हणतो, ‘‘आता रडण्याकढण्याचा शेवट, आत्मच्छलाचा, शारीर छळाचा शेवट. उगीचच नम्र होण्याचा आणि शरणभावाचा शेवट. पोरकट श्रद्धा आणि पोरकट प्रार्थनांचा शेवट. खोटारडय़ा मूíतपूजनाचा आणि विज्ञानाच्या नकली अलंकारांचा शेवट. हुकूमशहा, तानाशाह आणि उपद्रवी नेत्यांचा धिक्कार असो. जीवनाला शापू या नको आपण. आपण त्याची भक्ती करू या. हा सगळा ख्रिश्चन कालखंड जीवनाला नाकारणारा होता, परमेश्वराला नाकारणारा होता. आत्म्याला नाकारणारा होता. मुक्तीचं अगदी स्वप्नसुद्धा अजून कोणी पाहिलेलं नाही. मनाला, हृदयाला, शरीराला मुक्त करा. त्याला निर्वेध राज्य करता यावं म्हणून आत्म्यालाही मुक्त करा. पृथ्वीवर ख्रिसमस हवाय, ख्रिश्चॅनिटी नाही. मी कधीच ख्रिश्चन नव्हतो. मी कधीच तुमच्या वंशाचा नव्हतो. हो.. हो, तुम्ही ज्याला प्रकाश म्हणता ना, तिकडे डोळे बंद करूनच मी पाहतो. हो, मी अगदी पशू आहे, निगर आहे.. पण मीही तारला जाऊ शकतो. तुम्हीच खोटे निगर्स आहात. कंजुषांनो, माथेफिरूंनो, राक्षसांनो! मी खराखुरा जातिवंत निगर आहे आणि हे माझं ‘निगरबुक’ आहे. मी म्हणतो, ह्य पृथ्वीवर ख्रिसमस साजरा करू आपण.’’
असा सुटलाय रँबो. कधी कधी नि:श्वास टाकून तो म्हणतो, ‘‘कधी कधी मला आकाशात अथांग पुळणीवर पांढरेशुभ्र, आनंदात नहाणारे देश रांगोळीच्या ठिपक्यांसारखे ठेवलेले दिसतात.’’ त्याच्या स्वप्नांच्या निश्चितपणाशी तो एकरूप झालाय. येणारा भविष्यकाळ मानवाच्या अतिखोल इच्छांची अनिवार्य परिपूर्ती आहे असं त्याला वाटतं. त्या भविष्यकाळाचं येणं आता कोणी थांबवू शकत नाही. कायदा आणि सुव्यवस्था म्हणत म्हणत जगाची मारणाऱ्या खोटय़ा निगर्सनाही ते शक्य नाही. आपलं स्वप्न टोकापर्यंत नेऊन पाहू शकतो तो. सगळ्या भयानक, बोलूसुद्धा नये अशा आठवणी मावळल्या आहेत. पश्चात्ताप संपला आहे. मी ओसाडीत निघालोय. माझ्या आयुष्याचं मी वाळवंट केलंय. ह्यपुढे माझ्याबद्दल काही म्हणून कोणाच्या कानावर पडणार नाही. तरीसुद्धा एक लक्षात ठेवा सगळ्यांनो; शरीरात, मनात दडलेलं सत्य मला सापडलेलं असेल. सत्याचं वेषांतर करण्याचे तुम्ही निकराचे प्रयत्न केलेत, माझा आत्मा विंधून टाकण्याचा प्रयत्न केलात, आणि शेवटी माझं शरीरही तुम्ही मोडून-तोडून टाकाल.. पण तरीही मला सत्य सापडलेलं असेल, ते माझं हक्काचं असेल. अगदी ह्य शरीरात, ह्य आत्म्यात..’’ ही आवेगी वाणी एका ऋषिमुनीची आहे, ‘परमेश्वराच्या सुहृदाची’; हे अभिधान तो नाकारतो ते सोडा.
रँबो म्हणतो, ‘‘भाषा म्हणजे मूलत: एक विचारच असतो. एक दिवस वैश्विक भाषा निर्माण होईल. ह्य नवीन भाषेत सगळे आत्मे एकमेकांशी बोलतील. सगळे सुगंध, ध्वनी, रंग नव्यानं निर्माण होतील. सगळे विचार एकसूत्रात बांधले जातील. आता हे सांगायला नकोच, की ह्य नव्या भाषेची चावी असं प्रतीक राहील, की जे फक्त ती भाषा निर्माण करणाऱ्याजवळच असेल. हे प्रतीक जणू आत्म्याचं मुळाक्षर असेल. शुद्ध आणि अविनाशी असं. त्याच्या साहाय्यानं कवी- जो कल्पनाविश्वाचा स्वामी आहे आणि ह्य जगाचा शास्ता आहे- संवाद साधतो, आपल्या बांधवांचं कम्यून जमवतो.’’ सर्वामध्ये हा सेतू बांधता यावा म्हणून तर तरुण रँबो ह्य प्रयोगात गुंतून जातो. आणि काय त्याचं यश! त्याच्या मृत्यूनंतरही तो संवाद साधतोय. वर्षांमागून र्वष जातायत तसतसा हा संवादही अधिकाधिक समर्थ होतोय. तो जेवढा गूढ वाटतो, तेवढं त्याचं बोलणं सोपं, प्रवाही वाटतं. विरोधाभास वाटतो नं? नाहीय तो तसा. जी भविष्यवाणी असते ती तिच्या ठरलेल्या वेळी, ठरलेल्या घटनेनंच सिद्ध होते. अशावेळी मागचं, पुढचं स्वच्छ दिसतं. काळाच्या कुठल्याही टप्प्यावर, भूतकाळ व भविष्यकाळ ह्यंच्यात तर्कशुद्ध सुसंवाद साधता येणं म्हणजे संवादाची कला. इथे सर्व असतं, सर्व चालतं; फक्त त्याच्यासाठी आत्म्याची भाषा वापरावी लागते. इथं मुळाक्षरं नाहीत, व्याकरण नाही, वैय्याकरणीही नाहीत. मनं फक्त उघडता येणं जमलं पाहिजे, सगळ्या साहित्यिक पूर्वकल्पना वाऱ्यावर उडवून देता आल्या पाहिजेत. थोडक्यात, नग्नमनस्क होता आलं पाहिजे. हे जवळजवळ धर्मातरच आहे. हा एक निर्णायक उपाय आहे. आणि इथे येण्यापूर्वी विषादाची अंतिम अवस्था आलेली असली पाहिजे. पण इतर सगळे मार्ग खुंटले आहेत; ते खुंटतातच; तर मग हा टोकाचा उपाय का नाही? धर्मातराचा. नरकाच्या दारापाशीच तर मोक्ष रेंगाळत असतो. माणूस अनुत्तीर्ण झालाय- अगदी सगळ्या दिशांनी. कितीदा अगदी, वारंवार त्याला आपलं पाऊल मागे घ्यावं लागलंय. जड ओझं उचलावं लागलंय. शिखराकडे जाणारा कठीण चढाव चढावा लागलाय. त्यापेक्षा आत्म्याचं आव्हान स्वीकारून त्याला शरण का नये जाऊ? असं शरण जाऊन एका नव्या जीवनाची सुरुवात का नाही करू? तो पुराणपुरुष कायम वाट पाहतोय. कोणी त्याला उद्गाता म्हणतात, कोणी आहुती..
रँबोची नक्कल करणारे काय की त्याचे टीकाकार काय, त्यांच्या हे लक्षात येत नाही, की तो जगण्याची एक नवी शैलीच अंगीकारा म्हणून सांगत होता. तो कुठलीही कलाशाळा सुरू करत नव्हता, न त्याला शब्दांची टकळी फिरवत राहणाऱ्यांचं चित्त विचलित करायचं होतं. तो कला आणि जीवन ह्यंच्या अद्वैताकडे अंगुलीनिर्देश करीत होता. त्यायोगेच कला व जीवनातली दरार सांधली जाणार होती. एक ठणकणारी जखम बरी होणार होती. तो म्हणतो, ज्ञानाची चावी काय असेल, तर दैवी सहानुभाव. ‘अ सीझन ऑफ हेल’च्या आरंभाला तो लिहितो : ‘‘..परवा मला वाटलं, आपण उलथणार आता; म्हणून म्हटलं- चला जुन्याकडे वळू, तिथे परत आपली भूक आपल्याला सापडेल. ह्यची चावी काय? सहानुकंपा.’’ पुढे तो म्हणतो, ‘‘ही स्फूर्तीच सांगतेय स्पष्ट, की मी स्वप्न पाहत असणार!’’ हो, त्या अंतहीन, तळ नसलेल्या सुषुप्तीमध्ये पाहिलेलं स्वप्न, खोल नरकातलं स्वप्न. ज्यानं सगळे उत्सव, सगळे विजय, सगळं नाटय़ निर्माण केलं, त्याला त्याच्या ग्रहणकाळात आता त्याची कल्पनाशक्ती गाडून टाकावी लागतेय. ज्यानं स्वत:ला किमयागार आणि देवदूत म्हणून संबोधिलं, ज्यानं सगळ्या बंधनांपासून स्वत:ला सोडवून घेतलं, त्याला आता दिसतंय की तो पृथ्वीवर परत आणला गेलाय. आणि इथे त्याला कठोर वास्तव नुसतं स्वीकारावं लागणार नाही, तर त्याला आिलगन द्यावं लागणार आहे. बिगार, त्याचं तेच करणार आहेत ते. तो स्वदेशी आला तरी निर्धन ठेवतील त्याला ते. त्याच्या फुगवलेल्या स्वप्नांमध्ये कुठली असत्यं त्यानं पचवली असतील? (‘‘मी असत्यांवर स्वत:ला पुष्ट करीत राहिलो म्हणून सरतेशेवटी मी क्षमायाचना करीन.’’) पण क्षमा तो मागणार कोणाची? त्याला ज्यांनी छळलं त्यांची नक्कीच नाही. त्यानं जे युग नाकारलं त्याचीही नाही. त्याला जेरबंद करून ठेवणाऱ्या त्याच्या दुराग्रही, मठ्ठ आईचीही नाही. मग? कोणाची क्षमा? मला वाटतं, त्याच्या समकालीनांची. त्याच्यामागून येऊन हे युद्ध चालू ठेवणाऱ्यांची. आपली क्षमा नाही मागत आहे तो, न की परमेश्वराची. तो क्षमा मागतो आहे भविष्याची, त्यातल्या माणसांची; जे बाहू पसरून त्याचं स्वागत करतील त्यांच्या वैभवी नगरांमध्ये. ही माणसं ‘दूरवरच्या वंशाची’ आहेत आणि त्यानं आपली निष्ठा त्यांना वाहिली आहे, कारण तेच त्याचे खरे पूर्वज आहेत. काळानं त्याला त्यांच्यापासून दूर केलं आहे; पण त्यांचं रक्त एकच आहे. छळ चालू असतानाही गाणं गावं कसं, हे समजणारी ही माणसं आहेत. आधी काय घडलं त्यामुळे तो त्यांच्याशी जोडला गेला नाहीए. निखळ आत्मे आहेत ते. त्यांच्याशी त्याचं आत्म्याचंच नातं आहे. पोकळीत तो जन्मला आणि ह्य पोकळीपल्याडच्या त्यांच्याशी हा संवाद तो साधतोय. त्या संवादाचे झंकार फक्त आपल्याला ऐकू येताहेत. ह्य विचित्र भाषेच्या ध्वनीनं आपण मोहून जातो. त्यांचं हे मानवी नसलेलं एकत्व आणि त्यातला आनंद आणि आत्मविश्वास- दोन्हींशी आपली ओळख नाही.
किती वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांना त्यानं झपाटलंय, बदललंय, आपला गुलाम करून टाकलंय! किती कौतुक त्याच्या वाटय़ाला आलंय! तेसुद्धा व्हॅलेरी, क्लॉडेल, आन्द्रे ब्रेताँ असल्या वेगवेगळ्या स्वभावांच्या, वेगवेगळ्या इयत्तांच्या माणसांकडून. त्याच्यात आणि ह्य थोरांमध्ये साम्य काय? प्रतिभेचं साम्य म्हणावं तर ह्यनं आपली प्रतिभा वयाच्या एकोणिसाव्याच वर्षी काही विचित्र, गूढ ध्यासापोटी गहाण टाकली होती. प्रत्येक परित्यागाचा एकच हेतू असतो : अधिक वरच्या पायरीवर जाणं. (रँबोच्या बाबतीत- अधिक खालच्या पायरीवर येणं!) गाणारा गाणं म्हणणं थांबवतो तेव्हाच त्याला गाणं जगता येतं. आणि गाणं म्हणजे प्रतिरोध असला तर? तर मग हिंसा आणि सर्वापत्ति. पण आमिएल म्हणालाय त्याप्रमाणे सर्वापत्ति वादळी पद्धतीनेच समधातता प्रस्थापित करतात. आणि रँबो, ज्याचा जन्मच ‘समतोला’च्या नक्षत्रावर झालाय- तुला रास त्याची- तो निवडतो कुठलीही टोकाचीच गोष्ट शांततावाद्याच्या आवेगानं.
असं नेहमीच झालंय, की कुठलीतरी अदृश्य ‘जादू की पुडिया’, जादुई तारा आपल्याला खुणावतो आणि मन जुनं शहाणपण, जुनी जादू, राम म्हणते. मृत्यू आणि पुनर्भवन, हेच गाणं चिरंतन आहे. काही त्यांना हवाय तसा मृत्यू शोधून निवडतात : शरीराचा, शहाणपणाचा, आत्म्याचा. काही लोक वळसे घालून गुपचुप त्याला सामोरे जातात. पृथ्वीतलावरून नाहीसं होऊन हे नाटय़ काही लोक रंगवतात- मागे काही खूण, काही धागादोरा न ठेवता. तर काही लोक त्यांनी दिलेल्या आत्मनिवेदनापेक्षाही आपलं जीवन अधिक देखणं, अधिक भव्य करतात मरणामध्ये. रँबोनं मात्र आपलं मरण यातनामय करून घेतलं. स्वतची वाताहत त्यानं आपल्या अवतीभोवती सर्वत्र पसरवली ती अशी, की कोणाला म्हणून त्याच्या जगण्याचं वैयथ्र्य कळल्याशिवाय राहणार नाही. ‘कुठेही, ह्य जगाबाहेर कुठेही!’ ज्यांच्यासाठी आता आयुष्याला काही अर्थ राहिलेला नाही त्या सगळ्यांची ही किंकाळी आहे. रँबोनं ह्य जगाचा धांडोळा लहानपणी घेतला, तरुणपणी त्यानं त्याची द्वाही फिरवली, जाणता पुरुष झाल्यावर त्यानं ह्य जगाचा विश्वासघात केला. प्रेमाचा अनुभव त्याला मिळू नये अशी बंदीच घातली गेलेला हा, त्याची सगळी गुणसंपदा वाया गेली. तो त्याच्या नरकात पुरेसा बुडलाच नाही, मधल्याच बोगद्यात भाजला गेला. हा फार लहान काळ होता हे सर्व भोगण्याचा; कारण आपल्याला माहिताय- त्याचं पुढचं सर्व आयुष्य म्हणजे साक्षात् परगेटरी. असं झालं का, की जीवनाची गहराई पोहून जाण्याइतकं धर्यच त्याच्याजवळ नव्हतं? कोणास ठाऊक. एकच गोष्ट आपल्याला माहीत आहे. आपलं सर्व वैभव तो टाकून देतो; जणू काय ते एक ओझंच असल्याप्रमाणे. पण ज्या अपराधभावनेनं त्याला कायम छळलं, तीपासून कोणाचीही सुटका नाही. अगदी आत्मप्रकाशातच जे जन्मले, त्यांचीही. त्याची अपयशं जबर आहेत, तरी तो त्यामधून विजयाकडे आला. इथं विजय होतो तो रँबोचा नाही, तर त्याच्यातल्या कशानंही न शमणाऱ्या त्याच्या आत्म्याचा. व्हिक्टर गोनं म्हटलंय, ‘कुठल्याही भाषेत देवदूत हा एकच शब्द आहे- जो कधी जुना होत नाही.’
‘‘परमेश्वरापासून दुरावण्याचं दुख भोगल्यानंतरच सृजन सुरू होतं. स्वतंत्र, दुर्दम्य इच्छाशक्तीचं हे सृजन आहे. ह्यच्याचमुळे आपल्यातला व परमेश्वरातला दुरावा नाहीसा होईल आणि एका उच्चतम एकात्मतेकडे आपण पोहोचू.’’
त्याचा एक चरित्रकार म्हणतो, ‘‘त्याच्या स्वप्नांबरोबरच त्याची कवित्वशक्तीही मरण पावली.’’ असं असलं तरी बालपणीच तो स्वयंभू होता आणि त्याच्या तीन वर्षांच्या लिहिण्याच्या काळात कलेचं संपूर्ण आवर्तन त्यानं पुरं केलं अशी भावना होते. जाक् रिव्हिएर म्हणतो, ‘‘जणू सर्व कवित्व त्याच्या आत एकवटलं होतं.’’ त्याला मॅथ्यू जोसेफसन पुष्टी जोडतात, ‘‘त्यानं कविता धोकादायक केली!’’ त्याच्या ‘सीझन’मध्ये रँबो स्वत:च म्हणतो की, तो एक थोर संगीतिका झाला. असेल-नसेल तसं; पण तो थोर नक्कीच होता. त्याच्या आयुष्याचे दोनही भाग थोर होते, ही विस्मयकारक गोष्ट. तो स्वप्न पाहणारा आहे आणि उत्पात गाजवणाराही. एकाच वेळी दोन्ही आहे तो. एकाच माणसामध्ये शेक्सपीयर व बोनापार्ट एकवटले असावेत तसा तो आहे. त्याचेच शब्द ऐका आता.. ‘‘मी पाहिलं, की सगळ्या मनुष्यमात्राला सुखाचं भयानक आकर्षण. त्यासाठी धडपड करत राहणं म्हणजे जगणं नाही काही; उलट स्वत:ची शक्ती वाया घालवणं आहे ते.’’ आणि जणू काय हे सिद्ध करायचं म्हणूनच जगण्याच्या चक्रीवादळात तो घुसतो. युरोपात पायी पायी फिरतो सगळ्या. एका बोटीतून दुसरीत किती वेळा प्रवास करतो, आणि वारंवार आजारी पडून भणंगावस्थेत परततो. हजार वेठबिगारीची कामं करतो. डझनावारी भाषा शिकतो. कॉफी, मसाले, हस्तिदंत, चामडं, सोनं, गुलाम ह्यंचा व्यापारही करून पाहतो. धाडसं, नवी क्षितीजं धुंडाळणं, अभ्यास; तरतऱ्हेच्या वंशांच्या, देशांच्या माणसांशी संबंध, आणि काय काय कामं- ज्याचा ह्यला तिटकारा. आणि सर्वापेक्षा जास्त मानसिक सुन्नपणा. हा कायम कंटाळलेला. ह्यचा कंटाळा कुठल्याही उपायाबाहेरचा. पण धावपळ किती ह्यची! अनुभवांचं केवढं भांडार! आणि काय शून्यपणा! त्याची आईला पत्रं आहेत तीमध्ये भरल्या आहेत लांबलचक तक्रारी- ज्या निर्भर्त्सनेबरोबरच येतात; आणि जोडीला किरकिर, विनंत्या, आर्जवं. हा शापित, अखंड भोगवटा भोगणारा! शेवटी तो ‘अलौकिक अधू’ होतो. अर्थ काय त्याच्या ह्य जीव घेऊन पळण्याचा, त्याच्या अंतहीन रुदनाचा, त्याच्या आत्मच्छलाचा? नुसती धावपळ म्हणजे जगणं नव्हे, हे किती खरंय. पण जगणं कुठे आहे मग? आणि ‘खरं’ वास्तव कोणतं? हे तर नक्कीच, की वास्तव म्हणजे कष्ट, वणवण आणि परिग्रहाची घाणेरडी वखवख.
त्याच्या Illuminations मध्ये, त्यानं उदास लंडनमध्ये असताना लिहिलेलं, तो जाहीर करतो : मी तर सगळ्या थडग्यांच्या जगापल्याडहून आलोय. हे तो कवी म्हणून म्हणतो. आता त्याला भोगावंच लागतंय ते. प्रेमाची चावी सापडलेल्या वादकानं ती आता हरवलीय असं तोच म्हणतो. त्याची चावीही हरवलीय आणि वाद्यही. सगळे दरवाजे एकदा बंदच करून टाकल्यावर- अगदी मत्रीचेही, सगळे दोर कायमचे कापून टाकल्यावर आता तो प्रेमाच्या राज्यात कधीच पाऊल टाकणार नाही. पाप-पुण्याच्या गाडून टाकलेल्या वृक्षाखाली आता फक्त सन्नाटय़ानं भरलेला एकांत.
त्याला स्वातंत्र्य म्हणजेच मोक्ष वाटला. त्याला कधी कळलं नाही, की मोक्ष शरणागतीतून येतो, स्वीकारातून येतो. रँबोसाठी अनुभूती व सृजन ह्य एकाच वेळी घडणाऱ्या गोष्टी होत्या. गीतं गायला त्याला फारशा अनुभवाची गरजच नव्हती. बालकवी असला तरी संगीतकारांच्या किंवा गणिती लोकांच्या तो जास्त जवळचा होता; तेवढा साहित्यिकांच्या जवळचा नव्हता. त्याची स्मृती अफलातून. घाम गाळून त्याला काही निर्माण करावं लागत नाही. सगळं तयारच असतं तिथे. टकटक करायचा अवकाश; अवतीभोवतीच्या दुर्धर वास्तवाशी थोडाही संबंध आला की ते सगळं जागं होण्याची वाटच पाहत असतं. एखाद्या श्रेष्ठ कलावंताचं कौशल्य नाही; त्याला दुख आपलंसं करायचं आहे. ह्यसाठी फार काळ त्याला वाट पाहावी लागली नाही म्हणा.
तो बीज म्हणून जन्मला व बीजच राहिला. त्याला वेढून असलेल्या काळोख्या रात्रीचा तो अर्थ आहे. त्याच्या आत प्रकाश होता. अद्भुत प्रकाश. पण त्याचे किरण तो नष्ट झाल्याशिवाय बाहेर पडणार नव्हते. तो मृत्यूपल्याडच्या प्रदेशातून आला होता. एका दूरस्थ वंशाचा तो. त्यानं आपल्याबरोबर एक नवी वृत्ती व एक नवी जाणीव आणली. तोच नाही का म्हणत, की मी विचार करतो म्हणणं चूक आहे; ‘तो’ माझा विचार करतो म्हणायला पाहिजे. आणि तोच म्हणतो ना, ‘‘प्रतिभा म्हणजे प्रेम आणि भविष्य.’’ प्रतिभावंताच्या ‘अहम्’, ‘मी’ संदर्भात तो जे जे बोलतो ते प्रकाश दाखवणारं, साक्षात्कार घडवणारं आहे.
रँबोच्या लिखाणात तिथे नसलेल्या गहन जागा मला दिसतायत म्हणाल तुम्ही. आपण लिहितोय ते शब्दश: आणि सर्वार्थानी घ्यायचं, असं तोच आईला लिहिलेल्या एका पत्रात म्हणाला होता. ब्लेक आणि जेकब बोमच्या संदर्भात बोलायचं तर त्यांचा प्रत्येक शब्द खरा आणि उत्स्फूर्त होता. अगदी हेच रँबोला लागू पडतं. ह्य सगळ्यांचं मुळी निवासस्थानच कल्पनाजगत होतं. त्यांची स्वप्नंच वास्तव होती. असं वास्तव, की जे आपण अजून अनुभवलं नाहीए. जेकब बोम एका ठिकाणी म्हणतो : ‘‘मी स्वत:चं लिहिलेलं वाचतो तेव्हा मी परमेश्वराचं पुस्तक वाचत असतो. आणि माझ्या बांधवांनो, तुम्ही माझी मुळाक्षरं आहात, जी मी माझ्यात वाचतो. कारण माझ्या मनाला, इच्छेला तुम्ही माझ्यातच सापडता. तुम्हाला मी तुमच्यात तसाच सापडो असं मला वाटतं.’’ रँबोनंही आपल्यासाठी जो वैराणपणा निर्माण करून ठेवला होता त्यातून हीच मूक प्रार्थना तो सगळ्यांना करत होता. त्याचा अहंकार ‘कृपाळू’ का असेना, छिन्न करणं आवश्यक होतं. मुक्ततेचं रहस्य सर्वाप्रती प्रेम असण्यात आहे. तीच चावी आहे. रँबोला एका स्वप्नसदृश अवस्थेत हे भान आलं व हे स्वप्न त्याच्यासाठी वास्तवच आहे. तो मृत्यूशय्येवर असताना हे भान पुन्हा जागं झालं आणि हे विश्वप्रेम त्याचं बोट धरून त्याला ‘पल्याड’ नेतं. मोडलेला, पण पापमुक्त झालेला.
‘‘माझं दुर्दैव आणि तुमचंही..’’ तो आई-वडिलांच्या नावानं कळवळतो- जेव्हा त्याला कळतं, की तो बाप्तिस्मा झालेला आहे. अंधारानं भरलेल्या त्याच्या आत्म्याच्या काळ्या रात्रीमध्ये तो द्वाही फिरवतो, की सगळी गूढं, रहस्यं आता तो उलगडणार आहे, आणि ह्य युगाशी व त्याच्या मातृभूमीशी असलेले संबंध तो कायमचे तोडून टाकत आहे. ‘‘माझी परिपूर्णतावस्थेसाठी तयारी झालेली आहे,’’ तो म्हणतो. आणि एका अर्थानं ते खरंही आहे. तो स्वत:च ह्य दिव्यात शिरला, त्या भयंकर दिव्यातून बाहेर पडला, आणि ज्या रात्रीत तो जन्मला होता त्यात पुन्हा परत गेला.
त्याला नेणिवेच्या पातळीवर जाणवलं होतं की, कलेच्या पलीकडेही एक अवस्था आहे; त्यानं तिच्या उंबरठय़ावर पाऊल ठेवलं आणि भयानं, वेड लागेल ह्य धास्तीनं ते मागे घेतलं. नव्या जीवनाची त्याची सुरुवात एकतर अपुरी होती, किंवा चुकीच्या पद्धतीनं केलेली होती. त्याच्या संबंधात एक गोष्ट इतक्या वेळा बोलली गेली आहे- ‘‘प्रदीर्घ, प्रचंड, अनिवार्य अशी सर्व पातळ्यांवरची भ्रांति.’ त्याच्या आधीच्या भ्रष्ट स्वैराचारी जीवनाबद्दल, त्याच्या बोहेमियन जगण्याबद्दल इतकं काही लिहिलं गेलं आहे. लोक विसरतात की, कुठल्यातरी खेडय़ातल्या अस झालेल्या घरातून पळालेल्या, कल्पनांनी उर फुटत असलेल्या ह्य मेधावी तरुणासाठी ते किती स्वाभाविक होतं. दुर्मीळच होता तो. पॅरिससारख्या जबर आवाहन असलेल्या शहराला त्यानं बळी पडणं हेच मुळी अनसíगक झालं असतं. तो फार काळ काही पॅरिसमध्ये वा लंडनमध्ये राहिला नाही. शेतकऱ्याच्या धडधाकट, निरोगी पोराला ते शहर नासवील, एवढा काळ नक्कीच नाही. सगळ्याच गोष्टींविरुद्ध बंड करून उठलेल्या ह्य पोरासाठी तर तो फायद्याचाच अनुभव होता. स्वर्गाचा रस्ता नरकातूनच जातो, नाही का? मोक्ष मिळवायचा असेल तर आधी पापाची लस टोचून घ्यावी लागते. सगळ्या पापांचा- मोठय़ा-छोटय़ा- आस्वाद घ्यावा लागतो. मृत्यूसुद्धा सगळ्या भुकांसकट कमवावा लागतो. कुठलंही विष नाकारता येत नाही. कुठलाही अनुभव- मग तो कितीही र्ग, अधपाताकडे नेणारा असला तरी नाकारता येत नाही. आता आपल्या सर्व शक्ती संपल्या, हे भान यावं लागतं. मोक्षाची तृष्णा मनात जागी होण्यासाठी आधी आपण गुलाम आहोत हे कळावं लागतं. आई-बापांनी दिलेल्या नकारात्मक इच्छाशक्तीला नमवावं लागतं; जर तिला सकारात्मक करून हृदय-मनाशी तिचा संयोग करायचा असेल तर. सर्व वस्तुजातात प्रतिष्ठित असलेल्या विश्वपित्याला त्याच्या सिंहासनावरून पदच्युत करावं लागतं. त्याशिवाय त्याच्या मानवपुत्राला राज्य करता येत नाही. विश्वपिता शनीसारखा आहे. तो कठोर जुलूमशहा आहे. तो अर्थहीन आंधळा कायदा आहे. निषिद्ध ग्रह आहे तो. आपण हात-पाय झाडतो, मोकाट सुटतो, आपल्यात मूर्ख अहंकार आणि पोकळ सामथ्र्य ठासून भरलेलं असतं आणि मग आपण फुटतो, शतखंड होतो आणि ‘मी’ जो मी नाही, तो शरण जातो. रँबो मात्र फुटला नाही की शतखंड झाला नाही. तो विश्वपित्याला पदच्युत करीत नाही, तो स्वत:ला त्याच्याच बरोबरीचा समजतो. त्याचे अतिरेक, त्याचं भरकटणं, त्याचा अनियंत्रित बेजबाबदारपणा आलाय तो ह्य त्याच्या परमेश्वरी सत्ताच आहोत आपण, ह्य धारणेनं. रँबोचा सगळा प्रवासच उलट दिशेनं. ज्यांचा तो तिरस्कार करतो त्या शत्रूंसारखाच तो होतो. थोडक्यात, तो राज्य सोडतो आणि खऱ्या राज्याच्या शोधात फिरणारा उनाड देव होतो. ‘‘स्वत:चं खच्चीकरण करून घेणं म्हणजे स्वत:ला कायमचं नरकात लोटणं नाही का?’’ असं तो आकांतानं म्हणतो आणि स्वत:बाबत नेमकं तेच करून घेतो. ज्या कामासाठी त्याची निवड झाली होती त्या कामाचा परित्याग करून स्वतला खच्चीच करून घेतोय तो. रँबो अनावर अपराधभावनेनं जखडला गेला होता, ही शक्यता आहे का? (क्रमश:)
महेश एलकुंचवार

(C)(1946-1949-1956 by New Directions Publishing Corporation

vasai municipal schools
“बजेट वाढवा पण शाळा सुरू करा”, स्नेहा दुबेंकडून पालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Sunny Deol Confirms His Role in Ramayana
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात काम करण्याबाबत सनी देओलकडून भूमिका स्पष्ट; म्हणाला, “हा चित्रपट ‘अवतार’प्रमाणे…”
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी
Hafiz Assad statue vandalized
असाद घराण्याची पाच दशकांची सत्ता संपुष्टात
Story img Loader