|| राखी चव्हाण

वाढते व्याघ्रकेंद्रित पर्यटन, तसेच अति मानवी सहवास यामुळे वाघांच्या नैसर्गिक वर्तणुकीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. अलीकडच्या काळात घडलेल्या काही घटना वाघांच्या मानसिकतेतील आणि त्यांच्या जीवनशैलीतील हे बदल टिपणाऱ्या आहेत. या पाश्र्वभूमीवर या बदलांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास होण्याची निकड आहे.. जागतिक व्याघ्रदिनानिमित्ताने विशेष लेख..

भारतात आणि जगभरातही पर्यटनाचा किंवा अति मानवी सहवासाचा वाघाच्या नैसर्गिक वर्तणुकीवर होणाऱ्या परिणामांवर वैज्ञानिकदृष्टय़ा ठोस असा अभ्यास झालेला नाही. मात्र, अलीकडच्या काही वर्षांत वाघांच्या अनैसर्गिक वर्तणुकीच्या काही घटना समोर आल्या आहेत. उदा. वाघाने मजुराची शिदोरी पळवणे किंवा पर्यटकांनी भरलेल्या जिप्सीची काच चाटणे, इत्यादी. या घटनांनी निश्चितच विचार करण्यास भाग पाडले आहे. मानवी हक्कांवर गदा आणली गेली तर लागलीच त्याच्या रक्षणासाठी कायदा आणला जातो. परंतु तोच माणूस वाघाच्या नैसर्गिक जगण्यावर गदा आणतो तेव्हा काय? गेल्या ५० वर्षांत वाघांच्या वर्तणुकीत अशी अस्थिरता कधी आढळली नव्हती. मात्र, गेल्या पाच वर्षांतील घटना वाघांच्या मनोवृत्तीतील अस्थिरता अधोरेखित करत आहेत. वाघांच्या या बदललेल्या मानसिकतेसाठी कुठेतरी व्याघ्रकेंद्रित पर्यटनही जबाबदार असल्याची जाणीव आता हळूहळू होऊ लागली आहे.

व्याघ्र पर्यटनाची दिशा भरकटल्याचं अरण्यऋषी मारुती चितमपल्लीदेखील सांगतात. किंबहुना व्याघ्रकेंद्रित पर्यटनालाच त्यांची ‘ना’ आहे. त्यामुळे पर्यावरणाचे चक्र बिघडते असे त्यांचे म्हणणे. आता बहुतांशी ते पटायला लागले आहे. कारण वाघांच्या नैसर्गिक वर्तणुकीत बदल घडल्याचे दाखवून देणाऱ्या अनेक घटना अलीकडच्या वर्षांत घडल्या आहेत. त्यातील काही वानगीदाखल उदाहरणे..

जानेवारी २०१६ मध्ये उमरेड-करांडला अभयारण्यात वाघाने तब्बल पाच ते दहा मिनिटे पर्यटकांनी भरलेल्या जिप्सीजवळ ठाण मांडले होते. जिप्सीतील पर्यटकांचा गंध घेण्यापासून जिप्सीच्या आरशाशी खेळण्याचा प्रकारही त्याने केला. जिप्सीच्या चालकासह पर्यटकांचे श्वास त्याने तेवढा वेळ रोखून धरले होते! काही वेळाने तो निघून गेला म्हणून ठीक; परंतु वाघाने आपली खरी ओळख दाखवली असती तर..?

२०१७ च्या डिसेंबरातल्या एके दिवशी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात काम करणाऱ्या मजुरांनी त्यांचे डबे एका ठिकाणी ठेवले आणि ते कामाला निघून गेले. थोडय़ा वेळाने सव्वा वर्षांचा एक वाघाचा बछडा त्या ठिकाणी आला. बराच वेळ तो तिथे घुटमळला आणि डबा असलेली एक पिशवी तोंडात पकडून तो निघून गेला. त्याच महिन्यात मध्य प्रदेशातील मनुसखापा गावात एक वाघ लग्नमंडपात शिरला होता. त्याने कुणावर हल्ला केला नाही, परंतु लग्नातील वऱ्हाडय़ांची मात्र चांगलीच पाचावर धारण बसली. एका महिलेजवळ जाऊन तो उभा राहिला. पण त्याने तिच्यावर हल्ला मात्र केला नाही.

यंदाच फेब्रुवारीत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात रस्त्यावर बसलेल्या दोन वाघांच्या दर्शनासाठी चहुबाजूने पर्यटकांच्या जिप्सींचा ताफा पोहोचला. त्यातला एक वाघ पर्यटक जिप्सीच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला. अर्थात त्याने काही केले नाही म्हणून ठीक.

वाघ हा खरं तर माणसाला टाळणारा प्राणी. माणसापासून दूर राहत स्वत:ची स्वतंत्र वाट चोखाळणारा. परंतु आता तो माणसाळायला लागला आहे. त्याच्या नैसर्गिक सवयी बदलू लागल्या आहेत. माणसाला सहसा टाळणारा वाघ आता माणसांच्या सहवासात वावरायला लागला आहे. पर्यटकांसाठी व्याघ्रदर्शन, व्याघ्र-सहवास सुखावह असला तरीही पर्यटक आणि वाघ या दोघांसाठीही तो तेवढाच धोकादायकही आहे. त्याच्या बदलत्या मानसिकतेचे परिणाम कधीतरी पर्यटकांवरील हल्ल्यातही होऊ शकते. परंतु याची जाणीव माणसाला नाही. एकदा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात वाघ पर्यटकांच्या एका जिप्सीवर हल्ल्याच्या पवित्र्यात होता. १० एप्रिल २०१८ रोजी माया नावाच्या वाघिणीने जिप्सीतील पर्यटकांना निरखून बघत दोन पावले मागे जात चक्क चढाईची तयारी केलेली होती. आईपासून वेगळे होण्याच्या प्रक्रियेत असलेल्या वाघांच्या बाबतीत तर हे प्रकार अधिक होत आहेत. कारण तरुणाईला ज्याप्रमाणे नवीन काहीतरी करून पाहण्याची इच्छा असते, तशीच ती वाघांमध्येही आढळते. या प्रकारात एखाद् वेळी वाघाने हल्ला केला तर अकारण वाघच बदनाम होतो. त्याला कायमचा तुरुंगवासदेखील भोगावा लागतो.

माणसाला काही दिवस, महिने, वर्षे नेहमीपेक्षा वेगळ्या वातावरणात ठेवले तर तो सैरभर होतो. त्याच्या वर्तणुकीत बदल होतो. मग हा तर प्राणी आहे. त्याच्या या बदलणाऱ्या मूड्सना व्याघ्रकेंद्रित पर्यटन जबाबदार आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अरण्य पर्यटनात यापूर्वी वाघ माणसांपासून विशिष्ट अंतर राखून असायचा. अवघ्या काही क्षणांचे त्याचे दर्शन होत असे. पर्यटकांनी दोन पावले त्याच्या दिशेने जास्त टाकली तर तो दाट झाडीत निघून जायचा. आता जंगल पर्यटनाचे प्रमाण वाढल्यामुळे आणि पर्यटकांच्या वाहनांच्या जवळ जाण्यामुळे वाघांची माणूस आणि वाहनांप्रतिची भीती कमी होत आहे. वाघ माणसाला घाबरतो, हे वैज्ञानिकदृष्टय़ा खरे आहे. परंतु आता मात्र त्याच्या मनोवृत्तीत बदल होत आहे. त्याच्या नैसर्गिक सवयी बदलत आहेत.

जिम कॉर्बेटमधील उस्ताद हा वाघ अवघ्या सहा महिन्यांचा होता तेव्हा उपचारासाठी त्याला बेशुद्ध करण्यात आले होते. त्यानंतर काही महिन्यांनी पुन्हा एकदा त्याला बेशुद्ध करून त्याच्यावर उपचार करण्यात आले. हा प्रकार तीनदा घडल्यानंतर जेव्हा त्याला जंगलात सोडण्यात आले तेव्हा त्याच्या निकट आलेल्या वनमजुरावर त्याने हल्ला केला होता. हा माणूस आपल्याला काहीतरी टोचणार, ही भीती त्याच्या मनात उद्भवली होती आणि स्वसंरक्षणार्थ त्याने त्या माणसावर हल्ला केला होता. वाघ हल्ला करतो तो मुळात स्वसंरक्षणार्थ. एरवी स्वत:हून वाघ कधीच हल्ला करत नाही, हे आपले निरीक्षण मारुती चितमपल्ली नेहमीच सांगत असतात.

वाहनांतून निघणाऱ्या धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा जसा मानवी शरीरावर परिणाम होतो तसाच वाघांवरसुद्धा होतो. त्याची रोगप्रतिकारक्षमता कमी होते, हृदयाचे ठोके वाढतात. आणि मुख्य म्हणजे त्याच्या प्रजननक्षमतेवर याचा विपरीत परिणाम होतो. अमरावती विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख आणि वन्यजीव अभ्यासक दिवंगत डॉ. गणेश वानखेडे यांनी वाघांच्या संदर्भात एक अभ्यास केला होता. माणूस आणि प्राणी यांची निसर्गयंत्रणा वेगवेगळी असते. त्या एकत्र आल्या तर प्रभावित होतात. एकाच पाणवठय़ावर वन्यप्राणी आणि गावातील गुरेढोरे एकत्र पाणी पितात तेव्हा त्या जनावरांच्या शरीरावरील जिवाणू वन्यप्राण्यांच्या शरीरातही आढळून येतात. डॉ. वानखेडे यांनी केलेल्या अभ्यासात वाघाच्या विष्ठेत जनावरांच्या शरीरावरील जिवाणू दिसून आले होते.

वाघ व सिंह या वेगळ्या प्रजाती असल्या तरी दोघेही मार्जार कुळातीलच प्राणी आहेत. त्यामुळे दोघांवर होणारे परिणामदेखील सारखेच आढळतात. म्हणूनच या विषयाच्या सखोल अभ्यासाची गरज व्यक्त होत आहे. कारण वाघांच्या बाबतीत घडून येणारा हा अनैसर्गिक बदल भविष्यातील मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षांची नांदी ठरणार आहे. भारतात वाघांच्या बाबतीत अलीकडच्या वर्षांत हे जे काही अनुभवास येत आहे ते काही वर्षांपूर्वी आफ्रिकेच्या जंगलातील सिंहांच्या बाबतीतही घडले होते. सिंहांच्या नैसर्गिक वर्तणुकीत झालेल्या बदलांमागील कारणे शोधून काढण्यासाठी तेव्हा अभ्यास करण्यात आला. मॅट हायवर्ड आणि जिना हायवर्ड यांनी पर्यटनामुळे सिंहांच्या मानसिक व शारीरिक स्थितीवर काय परिणाम होतो, यासंबंधात २००८ साली संशोधन केले. या अभ्यासात त्यांना माणसाच्या सततच्या अस्तित्वामुळे जंगलातील सिंह प्रचंड तणावात असल्याचे दिसून आले. त्यांच्या जांभई देण्यापासून बसणे, उठणे, फिरणे, लोळणे, चाटणे; एवढेच नव्हे तर पिलांना प्रशिक्षण देण्यावरही कमालीचा प्रतिकूल परिणाम झाल्याचे त्यात आढळून आले. पर्यटकांचा भोवती वावर नसताना शारीरिक व मानसिकदृष्टय़ा ते स्थिर असत. परंतु पर्यटकांच्या अस्तित्वामुळे ते कमालीचे अस्वस्थ झाल्याचे या संशोधनात स्पष्ट झाले होते. माणसांप्रमाणेच सिंहांच्या हृदयाची स्पंदने वाढून ते अस्वस्थ होतात आणि त्यांची शारीरिक ऊर्जा कमी होते, ही बाब त्यांनी नोंदवली. ज्या भागात मनुष्याचा वावर वा पर्यटन अधिक आहे त्या भागातल्या सिंहांच्या नैसर्गिक जीवनशैलीत मोठय़ा प्रमाणात अडथळे निर्माण झाल्याचे आणि या गोष्टीचा परिणाम त्यांच्या शारीरिक व मानसिक क्षमतेवर होत असल्याचे आढळून आले. याउलट, ज्या भागात मनुष्याचा वावर कमी आहे किंवा नाहीए, अशा ठिकाणी सिंह त्यांच्या नैसर्गिक अधिवासाशी समरस झालेले आणि त्यांची नैसर्गिक जीवनशैली शांतचित्ताने जगताना दिसतात असे या अभ्यासात आढळून आले.

असा अभ्यास भारतातही होणे गरजेचे आहे. एरवी वाघाला कॉलर आयडी लावली जाते. त्याचे अस्तित्व शोधण्यासाठी कॅमेरा ट्रॅप लावले जातात. मात्र, वाघाच्या बदलत चाललेल्या नैसर्गिक वर्तणुकीचा अभ्यास करण्यासाठी एकही संस्था वा संशोधक पुढे आलेले नाहीत. याबाबतीत आपण हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत संस्थांवर अवलंबून आहोत. त्याव्यतिरिक्तही असे अनेक संशोधक आहेत, जे हा अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकतील.

व्याघ्रकेंद्रित पर्यटनावर भर देताना वाघाच्या नैसर्गिक हक्कांवर माणूस गदा आणत असतो, त्याचे काय? अगदी वाघाच्या मीलन प्रक्रियेचीही छायाचित्रे काढून त्यात बाधा आणली जाते. मीलनकाळात वाघाची मानसिकता वेगळी असते. अशा वेळी त्यात व्यत्यय आला तर त्याच्या शारीरिक क्रियेवरदेखील याचा दुष्परिणाम होतो. मे २०११ मध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पांगडी गेटमधून आत गेल्यानंतर ४५ अंश सेल्सिअस तापमानात एका वाघाने आपली उन्हाच्या तल्खलीपासून सुटका करवून घेण्यासाठी पाणवठय़ाचा आसरा घेतला. त्याचवेळी पर्यटकांची एक जिप्सी पाणवठय़ाजवळ आली आणि त्याला कॅमेऱ्यात छायाचित्रबद्ध करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू झाले. त्यामुळे पाणवठय़ावर बसायला आलेला तो वाघ तिथून निघून गेला. उन्हापासून स्वत:ची सुटका करण्यासाठी वाघ पाणवठय़ात जाऊन बसतो. परंतु त्याच्या या नैसर्गिक क्रियेतही अडथळा उत्पन्न केला जातो. वाघाने केलेली शिकारदेखील त्याला खाऊ दिली जात नाही. त्यामुळे ती शिकार ओढत नेऊन त्याला कुठेतरी लपवावी लागते.

पेंच व्याघ्र प्रकल्पात एका वाघिणीला तीन पिल्ले होती. त्यामुळे प्रशासनाने तो भाग पर्यटकांसाठी बंद केला. तरीही एक जिप्सी वाटेतले अडथळे तोडून आत शिरली. तिथे वाघीण पिलांना दूध पाजत होती. मात्र, जिप्सी पाहताच वाघिणीची पिले दूध पिता पिता तिथून दूर पळाली आणि वाघिणीलाही तिथून काढता पाय घ्यावा लागला.

वाघांच्या नैसर्गिक वर्तणुकीतील बदलासाठी कारणीभूत ठरणाऱ्या घटना अशा प्रकारे सतत घडत आहेत. त्यातून वाघाच्या बदललेल्या सवयीही दिसून येत आहेत. परंतु त्याविषयीच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाची तसदी मात्र अजून घेतली गेलेली नाही, ही खेदाची गोष्ट आहे.

rakhi.chavhan@expressindia.com

Story img Loader