सई परांजपे.. आकाशवाणी, दूरदर्शन, नाटक, चित्रपट, लेखन असा चौफेर कर्तृत्वाचा पसारा मांडणारं व्यक्तित्व. त्यांचं लेखन जसं धारदार, तशीच वाणीदेखील! कुणाचीही भीडभाड न बाळगता आपली मतं व्यक्त करताना स्वत:कडेही तितक्याच चिकित्सक नजरेनं पाहू शकण्याची तटस्थ वृत्ती त्यांच्यापाशी आहे. स्वत:वरही विनोद करण्याचा मिश्कील स्वभावही त्यांच्यात आहे.
अशा या चतुरस्र व्यक्तिमत्त्वाने ‘लोकसत्ता गप्पा’त गाजवलेली मैफल.. त्यांच्याच शब्दांत..
माझ्या बालपणातली काही र्वष ऑस्ट्रेलियात गेली. म्हणजे मी साधारण आठ ते बारा वर्षांची असताना! साहजिकच इंग्रजीचा वापर तिथे होता. मात्र अगदी लहानपणापासून आमच्या घरामध्ये मराठीतच बोलायचा दंडक होता. घरात आम्हाला इंग्रजीत बोलायची मनाई होती. किंबहुना, बोलताना अनावश्यक इंग्रजी शब्द वापरला तर दंड होई. अशा शिस्तीमध्ये मी वाढले. त्यामुळे भाषेविषयी प्रेम- जे मला सुरुवातीपासून वाटत आलंय- ते कायम आहे. लहानपणी मी लहान मुलांची पुस्तकं तर वाचलीच; शिवाय सानेगुरुजी, लक्ष्मीबाई टिळक, हरि नारायण आपटे यांची सगळी पुस्तकं मी वाचून काढली. आईजवळ.. आप्पांजवळ (माझे आजोबा रँग्लर परांजपे) मी वाचत असे. त्यामुळे माझी मराठी भाषा घट्ट होत गेली. त्याला पूरक म्हणून आईनं मला संस्कृतचंही वळण लावलं. संस्कृत श्लोक आणि स्तोत्रं अगदी लहानपणापासून म्हणायला शिकवलं. आमचं घराणं नास्तिक. आमच्या घरी देवघर नव्हतं. पण मला असंख्य स्तोत्रं आजदेखील मुखोद्गत आहेत. या संस्कृत शिकवणीमुळे माझी भाषा समृद्ध होत गेली. उच्चार स्वच्छ झाले. त्यामुळे पुढे मला अगदी फ्रेंच असो किंवा इंग्रजी असो; कुठलीही भाषा शिकायला सोपी गेली. संस्कृतमध्ये अबोध ज्ञान आपल्याला मिळतंच; परंतु त्याखेरीज संस्कृत भाषेमध्ये प्रचंड विनोदसुद्धा आहे. लोक माझ्या विनोदाचं कौतुक करतात. त्याचं बरंचसं श्रेय मी आईला देते. पण त्यातलं काही श्रेय मी संस्कृत भाषेलाही देऊ इच्छिते.
०
माझी आई होतीच विचित्र.. कॉम्लेक्स कॅरेक्टर. तिच्यामध्ये इतक्या तऱ्हेतऱ्हेच्या छटा होत्या, की क्षणात ती अवखळ असायची, तर क्षणात रागीट. इतकी रागीट.. की तिच्या वाऱ्यालाही उभं राहू नये. विलक्षण मनुष्यस्वभाव होता तो. मला तिचा मार बसला नाही असा दिवस विरळाच. आणि मारसुद्धा असा तसा नाही.. यथेच्छ बडवून काढायची. पण त्याचबरोबर लाडालाही परिसीमा नाही. खाण्यापिण्याचे लाड तर काही म्हणू नका. लाडावरून आठवते ती बाहुलीच्या लग्नाची गोष्ट. त्याकाळी लहान मुलींमध्ये आपल्या बाहुल्यांचं लग्न करण्याची एक प्रथा होती. मी कायम जायचे इतरांकडे लग्नाला. पण माझ्या घरी मात्र लग्नाची बात नाही. मी आईला बाहुलीच्या लग्नाबद्दल विचारलं की ती म्हणायची, ‘छॅ! कसलं बाहुलीचं लग्न? काही नाही. उगीचच आचरटपणा.’ त्यामुळे मुली मला चिडवायला लागल्या. एके दिवशी मी हट्टाला पेटले. कधी नव्हे तो माझ्या हट्टाचा परिणाम झाला. आई म्हणाली, ‘काय टुरटुर लावलीयेस? चल, बाहुलीचं लग्न करायचं ना? करू यात.’ मग चक्क मुहूर्त पाहिला गेला. आम्ही तुळशीबागेत गेलो आणि बाहुला-बाहुलीचा कापडी सुंदर जोड घेतला. मला अजूनही डोळ्यांसमोर तो जोड आहे. पोपटी, जरीच्या काठांची साडी नेसलेली, अंबाडा घातलेली नवरी होती आणि नवरदेवाला गांधी टोपी, नेहरू जाकीट आणि धोतर होतं. ज्या दिवशी लग्न होतं त्या दिवशी स्काऊटचा बॅण्ड.. गुलाबी फेटे घातलेली स्काऊटची पोरं.. त्यांची सगळी वाद्यं आणि एक पांढरी अबलक घोडी.. काका हलवायाकडून आणलेले कागदात गुंडाळलेले पेढे.. बोलावलेली १०० मुलं आणि न बोलावलेले २०० जण! आमचा सबंध पुरुषोत्तमाश्रमाचा परिसर भरून गेला होता. अगदी धामधुमीत लग्न झालं. घोडय़ावरून बाहुला-बाहुलीची वरात निघाली. मी अर्थातच सगळ्यात पुढे. आपटे रोडने वळसा घालून निघून फग्र्युसन रोडने परत परांजपे रोडवरून घरी. असं ते लग्न. माझ्या आईने केलेले हे लाड.. अगदी छप्पर फाड के. माझ्या लग्नाला मात्र ती आली नाही.
०
‘मुलांचा मेवा’ हे वयाच्या आठव्या वर्षी लिहिलेलं पुस्तक म्हणजे सगळी आईचीच कृपा. मी लहान असताना आई रोज मला गोष्ट सांगायची. आप्पा फिरायला जाताना सांगायचे- ग्रीम्स किंवा अँडरसनच्या फेअरी टेल्स. आणि आई कुठल्या कुठल्या अरेबियन नाइट्स. रोज रात्री झोपताना छान गोष्ट सांगून मला ती झोपवायची. एके दिवशी आई मला म्हणाली, ‘मला कंटाळा आलाय आज. तूच सांग बरं गोष्ट.’ मग मी तिला गोष्ट सांगितली. त्यात सोनेरी बदक आणि निळ्या दाढीचा साधू वगैरे असं काहीबाही होतं. ती म्हणाली, ‘बरी आहे की गं गोष्ट! कुणी सांगितली तुला?’ मी तिला म्हटलं, ‘कुणी नाही. मीच जुळवली गोष्ट.’ मग ती म्हणाली, ‘चल, काहीतरीच सांगतेस.’ मी तिला म्हटलं, ‘अगं हो, मीच जुळवली. आणखी पण आहेत.’ मग मी तिला आणखी एक गोष्ट सांगितली. नंतर तिला पटलं. तिनं मला त्या लिहून काढायला सांगितल्या. रोज तीन पानं लिहिल्याशिवाय खेळायला जायला परवानगी नव्हती. रोज मी तीन पानं बसून लिहायची. तिच्यामुळेच बसून लिहायची सवय लागली. मी ज्या गोष्टी लिहिल्या त्या एकत्र करून आईने पुस्तक छापलं.. ‘मुलांचा मेवा’! तेव्हा मी आठ वर्षांची होते. आता मला आग्रहानं सांगावंसं वाटतं, की मी फार मोठी ‘चाइल्ड प्रॉडिजी’ होते म्हणून आठव्या वर्षी हे पुस्तक छापलं असं नाही; तर कितीतरी हुशार, लेखनकला असणारी मुलं असतात, पण त्यांना शकुंतला परांजपे नावाची आई मिळत नाही.
०
आई अतिशय मोकळेपणाने पप्पाविषयी (सई परांजपे यांचे रशियन चित्रकार वडील) बोलायची. ती कधी त्याच्याबद्दल वाईट बोलली नाही. फक्त म्हणाली की, ‘आमचे स्वभाव जुळण्यासारखे नव्हते. खूप तफावत होती.’ ती अत्यंत तल्लख बुद्धिमत्ता असणारी बाई आणि पप्पा हा अतिशय स्वप्नाळू चित्रकार. कायम स्वप्नरंजनात वावरणारा. मी माझ्या पप्पाच्या वळणावर गेले. दुर्दैवाने माझ्या आजोबांचं (रॅँग्लर परांजपे) गणित काही माझ्या वाटय़ाला आलं नाही.
०
शास्त्रोक्त गाण्याची शिकवणी, नृत्य, भाषाउच्चाराबाबतची दक्षता, सर्व कलागुणनिपुण करण्याच्या आईच्या अट्टहासाचा मला प्रचंड कंटाळा यायचा. अर्थात यातले काही विषय माझ्या आवडीचे होते. मी वयाच्या नवव्या वर्षी घोडय़ावर बसायला शिकले. सगळ्यात कहर म्हणजे मला गाण्याची- आणि तीसुद्धा शास्त्रोक्त गाण्याची शिकवणी आईने लावली! शिकवणारे असे तसे नव्हे, तर पंडित मिराशीबुवा. पुण्याचे मान्यवर प्रसिद्ध गायक. तर बुवा आमच्या घरी यायचे. मी त्यावेळी सहा-सात वर्षांची असेन. आमच्या घरातल्या मोठय़ा पलंगावर बुवा तंबोरा घेऊन बसायचे. मीही त्यांच्यासमोर मांडी ठोकून बसे. आमची सकाळी तासभर शिकवणी चाले. पण मला आठवतं, की आमची मजल कधी आसावरी रागाच्या पलीकडे गेली नाही. कारण शिकवणी म्हणजे काय, तर बुवा गायचे, ताना घ्यायचे आणि मी वाकून वाकून त्यांची पडजीभ बघायचे. शास्त्रोक्त संगीताचा केवढा हा अपमान अजाणतेपणी होत असे! शेवटी बुवांनी आईला हात जोडून सांगितलं, ‘‘शकुंतलाबाई, सईला गाण्याचा सुतराम गंध नाही. नस्ता आग्रह धरू नये.’’ आणि माझी शिकवणी थांबली.
०
ध्यानीमनी नसताना मला आकाशवाणीचं आमंत्रण आलं आणि अकस्मातपणे रेडिओकडे माझी पावलं वळली.
तेव्हा रेडिओ सप्ताह होत असे. अजूनही आकाशवाणी सप्ताह साजरा होतो. तेव्हा रेडिओ नुसताच श्राव्य न राहता दृश्यही होत असे. आकाशवाणी केंद्राच्या आवारातच छोटेसे स्टेज वगैरे बांधून हा कार्यक्रम होत असे. एकदा विठाबाई नारायणगावकरांचा नृत्याचा कार्यक्रम होता. लावणीचा. मी त्या कार्यक्रमाची निवेदिका होते. स्टेजच्या एका बाजूला टेबल मांडून बसले होते. एक गाणं झालं आणि दुसरं सुरू होणार होतं. कान्ह्य़ाच्या मनधरणी वगैरेचं होतं ते. आणि ते गाणं सुरू झाल्यावर विठाबाईंनी मलाच कान्हा बनवलं. मला त्याक्षणी धरणी दुभंगेल तर बरं असं वाटलं. कारण मला कान्हा मानून त्या सगळे हावभाव माझ्याकडेच पाहत करत होत्या. मी इकडे बघू की तिकडे बघू- अशी माझी स्थिती झालेली. सगळ्यांना माझी ती स्थिती कळून सर्वत्र हशा पिकला. पुढचे निवेदन करताना मला माझे हसू दाबता येईना आणि मी हसत हसतच कशीबशी पुढची अनाऊन्समेंट केली. पुढे कितीतरी दिवस आकाशवाणीला पत्रं येत होती, की कार्यक्रमात निवेदिका हसत होती की रडत होती? मी कधीच हा प्रसंग विसरणार नाही.
आकाशवाणीत काम करत असतानाच ‘गीत रामायण’ मी ऐकलं.. याचि देही, याचि डोळा. ‘गीत रामायणा’च्या रिहर्सल्स चालायच्या. सुधीर फडके चाल बांधायचे. ग. दि. माडगूळकर गीत वाचून दाखवायचे. आणि पुरुषोत्तम जोशी निवेदक होते. अप्रतिम, घनगंभीर आवाज. त्यांचे रेकॉर्डिग व्हायचे आणि मी अधाशासारखी ते ऐकायची.
०
अरुण जोगळेकर आणि मी ‘बालोद्यान’पासून एकत्र काम करायचो. पुढे आम्ही पुण्यामध्ये चिल्ड्रन्स थिएटर सुरू केलं. आम्ही- म्हणजे गोपीनाथ तळवलकर, भालबा केळकर, श्रीधर राजगुरू, अरुण आणि मी असे पाच जण. तिथे आमची दोस्ती झाली, स्नेह जुळला आणि पुढे आम्ही लग्न करायचं ठरवलं. आधी आईला अरुण खूप आवडायचा. पण जावई म्हणून सगळं चित्र बदललं. तिने लग्नाला खूप विरोध केला. पण खरं सांगायचं तर मला ब्रह्मदेव जरी सांगून आला असता तरी आईने त्यालाही नापसंतच केलं असतं. कारण तिला अवघ्या जगात आपल्या मुलीच्या तोडीचं कुणी आहे असं वाटत नव्हतं. ती काही माझ्या लग्नाला आली नाही. पुढे विनी झाली आणि मग टिपिकली सगळा विरोध मावळला.
०
तेंडुलकरांचं ‘गिधाडे’ नाटक मी केलं तेव्हा मी दिल्लीला होते. ‘यात्रिक’ नावाच्या संस्थेमध्ये मी काम करत असे. ते मला अधूनमधून हिंदी नाटक कर म्हणून आग्रह करीत होते. जॉय मायकेल ‘यात्रिक’ची सर्वेसर्वा होती. ती मला म्हणाली, ‘‘काहीतरी सनसनाटी असं मराठी नाटक कर.’’ मराठीमध्ये सनसनाटी तसं कमीच असतं. पण म्हटलं, अरेच्चा! असं कसं आपण विसरलो? विजय तेंडुलकर! मी विजय तेंडुलकरला फोन केला. विजय माझा चांगला मित्र होता. म्हटलं, ‘‘विजय, एक नाटक हवंय. मात्र, पूर्वी न झालेलं. काही आहे का?’’ विजय म्हणाला, ‘‘बघतो. दोन दिवसांनी फोन करतो.’’ त्याप्रमाणे दोन दिवसांनी त्याचा फोन आला. ‘‘अगं, एक सापडलंय माझं जुन्या बासनामध्ये. पण अगदी पत्रावळ्या झाल्यात त्याच्या. पडून होतं. ते जरा जास्तच भडक आहे म्हणून मी बाजूला ठेवलं होतं.’’ मी म्हटलं, ‘‘पाठवून दे.’’ आणि मनात म्हटलं, तेंडुलकर स्वत: भडक आहे म्हणतात म्हणजे आहे तरी काय? तर ते नाटक मी करायला घेतलं. त्या नाटकात मोठमोठे कलाकार होते. कुलभूषण खरबंदा, बी. व्ही. कारंथ, शाम अरोरा, आदी. त्यानंतर माणिकचं काम करायला कोणी अभिनेत्री मिळेना. कारण ती अशी अवदसा बाई! कोण काम करणार? शेवटी मीच ती भूमिका केली. ते नाटक मी मन लावून केलं नाही म्हणा किंवा तो माझा पिंडच नव्हता म्हणा, किंवा मी स्टेजवर होते म्हणून असेल.. मला जी ऑब्जेक्टिव्ह दृष्टी (सॉरी! इंग्रजी शब्द वापरतेय.) लागते ती नव्हती म्हणून म्हणा.. तो प्रयोग ठीकच झाला. विशेष काही झाला नाही. पण ‘गिधाडे’ वाचल्यावर मात्र मला कोणीतरी सणसणीत चपराक मारली असं वाटलं होतं. पुढे कैक वर्षांनी त्या नाटकाचा प्रयोग आतिशा नाईकने केला. अलीकडे.. म्हणजे तीन-चार वर्षे झाली असतील. त्यात माझ्या मुलाने- गौतमने रमाकांतची भूमिका केली होती. अप्रतिम. माझा मुलगा उत्तम नट आहे, याचा त्या दिवशी मला साक्षात्कार झाला. त्याने फारच सुंदर भूमिका केली. हे मी आई म्हणून नाही सांगत. किंबहुना, मी त्याच्या कामावर कायम टीका करत असते असा त्याचा आक्षेप आहे. त्याने अतिशय उत्कृष्ट काम केलं होतं. ते नाटक आतिशा नाईकने इतकं सुंदर बसवलं होतं, की पुन्हा एकदा मला तोंडात चपराक मारल्याचा अनुभव आला. तेव्हा माझ्या मनात विचार आला.. मग मी बसवलेलं नाटक सानेगुरुजींनी लिहिलं होतं की काय?
०
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये (एनएसडी) मला एकच वर्ष अल्काझींची साथ मिळाली. मी तिथे गेले तेव्हा वेगळाच कारभार सुरू होता. नेमिचंद जैन म्हणून संचालक होते. एकूणच निराशाजनक वातावरण होतं तिथं. शिकवण्याची पद्धत, स्टाफ वगैरे. पण एक वर्षांनंतर अल्काझी आले. तोवर आमचं लग्न झालं होतं आणि अरुणही एनएसडीत आला होता. अल्काझी आल्यावर जादूची कांडी फिरावी तसं सबंध वातावरण पालटलं. त्यांनी ध्यास घेतल्यासारखं सबंध चित्र पालटून टाकलं. पाहता पाहता एनएसडी खडबडून जागं झालं. खरोखर, आम्ही जे कुणी अल्काझींच्या हाताखाली शिकलो, त्यांना जन्मभर त्यांची शिकवणी पुरेशी ठरली. अल्काझींची शिकवणी कधीही विसरता येणार नाही. पुण्या-मुंबईत आल्यावर, व्यावसायिक पद्धतीचं नाटक करायला लागल्यावर इथली परिस्थिती पाहून खूप दु:ख व्हायचं. मराठी रंगभूमीवरील शिस्तीचा अभाव पाहिला, की अल्काझी पदोपदी आठवायचे. ‘कसं काय होणार मराठी रंगभूमीचं?’ असं वाटायचं. पण मराठी रंगभूमीचं आजही काहीच बिघडलेलं नाहीये.
०
मी पुण्याच्या फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये एक वर्ष शिकवायला होते. तिथे मी ‘अॅक्टिंग आणि स्पीच’ शिकवायचे. तिथे तशा प्रकारचा कोर्स नव्हता त्यापूर्वी. इन्स्टिटय़ूटतर्फे मलाच अभ्यासक्रम बनवायला सांगितलं गेलं. दिवसाला एक-दोन तासच शिकवायचं असे. माझ्या वर्गामध्ये रेहाना सुलताना, जलाल आगा, साधू मेहेर असे विद्यार्थी होते. मी जरी फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये शिकले नाही तरी तिथली लायब्ररी एवढी मोठी.. समृद्ध होती, की तिथे सिनेमा तंत्रापासून स्क्रीन प्लेपर्यंत काय म्हणाल ते होतं. त्यामुळे आपण जेवढं वाचू तेवढं थोडंच होतं. शिवाय जगातले आणि भारतातलेसुद्धा उत्तमोत्तम चित्रपट पाहण्यासाठी उपलब्ध होते. हे चित्रपट बघून कुणी समृद्ध न झालं असतं तरच नवल होतं. मी खूप घेतलं त्यातून. मला लोक विचारायचे- की मी चित्रपटाकडे कशी वळले? मग मी सांगायचे, फिल्म इन्स्टिटय़ूटमुळे! त्यांना सांगावं लागे, की मी तिथं शिकले नाही, तर शिकवलं!
०
स्मिता पाटीलचा माझ्याबद्दल झालेला गैरसमज आठवला की मला फार वाईट वाटतं. केवळ गैरसमजूत आणि मनातलं बोलून न दाखवण्याची वृत्ती यामुळे हा सगळा गोंधळ झाला. दिल्लीत मी ‘वासनाकांड’ हे नाटक बसवलं होतं.. महेश एलकुंचवारांचं. कुसुम बेहेल आणि नीलम प्रकाश असे दोघे जण त्यात होते. खूप छान नाटक झालं होतं. अतिशय उत्कृष्ट प्रयोग झाला होता त्याचा. माझ्या नाटय़कृतींमध्ये मी या नाटकाला अतिशय उत्कृष्ट नाटय़कृती म्हणून मानते. इकडे (मुंबईला) आल्यावर ते पुन्हा करू या असं मला वाटलं. ओम पुरी आणि स्मिता पाटील त्यात मुख्य भूमिकेत होते. दोघंही तितकेच उत्साही. त्यामुळे तालमींना बहार यायची. तिथे माझी आणि स्मिताची खूप जवळीक झाली. एकतर दोघींना मांजरं प्रचंड आवडायची. भेटलो की आधी आमची दहा-पंधरा मिनिटं आपापल्या मांजरींचं कौतुक करण्यातच जायची. एकदा ती मला म्हणाली की, ‘‘सई, माझी एक मैत्रीण आहे, ती फार कठीण मानसिक परिस्थितीतून जातेय, तर तिला तू घे ना आपल्या नाटकात. आपण तिला काहीतरी काम देऊयात. तिला त्याचा फार उपयोग होईल.’’ मी म्हटलं, ‘अगं स्मिता! या नाटकात दोनच पात्रं आहेत. तिसरं कुणी नाही. आणि मी याची नाटककारही नाही. माझ्या नाटकात कुणी असं केलं तर ते मला खपणार नाही. मग मी दुसऱ्याच्या नाटकात असं कसं करू?’’ ती म्हणाली, ‘‘काहीतरी कर. तिला खूप गरज आहे. ती गाते खूप सुंदर.’’ स्मिताची ही मैत्रीण म्हणजे वर्षां भोसले. आशाबाईंची मुलगी. मी खूप विचार केला. त्या नाटकात स्मशानाचा भयानक प्रवेश आहे. त्यात मी असं दाखवलं की स्मशानाच्या भिंतीवर एक वेडी मुलगी केस मोकळे सोडून बसलेली आहे आणि ती गातेय. आर्त सूर. वर्षांच्या त्या गाण्याने तो प्रवेश अधिकच अंगावर आला. त्यामुळे स्मिता खूश. वर्षां खूश. स्मिताशी माझी खूप जवळीक झाली. त्या काळात मी ‘स्पर्श’ची चित्रावृत्ती लिहिली होती. एक दिवस स्मिताला मी सहजच म्हटलं की, ‘‘एक चित्रपट करायचं माझ्या मनात आहे. स्क्रिप्ट आहे माझ्याकडे. तू वाचशील का?’’ ‘‘हो, हो, वाचेन ना मी!’’ असं स्मिता म्हणाली. फारसं उत्साहानं नाही, पण सौजन्यानं तिनं म्हटलं. परत काही तो विषय नाही निघाला. मला वाटलं, की ती विचारेल. परत एकदा विषय निघाला तेव्हा ती पुन्हा मला म्हणाली, ‘हो. वाचेन की मी.’ मला असं वाटलं, की तिला असं तर वाटत नाहीए ना, की आपली मैत्री आहे आणि आपल्या मैत्रीचा फायदा घेऊन ही आपल्या गळ्यात तर पडत नाहीये. कारण तेव्हा माझं चित्रपटांत शून्य नाव होतं. नाटकात थोडंफार झालं होतं. स्मिताचं तेव्हा सिनेमात नाव होऊ लागलं होतं. मला कुठंतरी जबरदस्त संकोच वाटला. मग मी पुढे तो विषय नाही काढला. स्मितानेही तो विषय काढला नाही. आधी या चित्रपटासाठी संजीवकुमार आणि तनुजा ही जोडी ठरली होती. मात्र, संजीवकुमारने बासू भट्टाचार्याचं नाव ऐकल्यावर काढता पाय घेतला. संजीवकुमार नाही म्हटल्यावर त्याच्या जोडीची तनुजा नसीरुद्दीनबरोबर शोभली नसती म्हणून तनुजाही नाही असं ठरलं. स्मिताचं ते वागणं आठवून म्हटलं, तिलाही नको विचारूयात. तिलाही दडपण नको. मी शबानाला विचारलं. तिने स्क्रिप्ट वाचलं आणि तिने आनंदानं चित्कारत उडय़ाच मारल्या. मला मिठी मारली. गोल गोल फिरवलं. दोघी दोन टोकांची व्यक्तिमत्त्वं.. एक अतिशय आत मिटलेली, अंतर्मुख. आणि दुसरी प्रचंड उत्साही. शबानाचा उत्साह पाहिल्यावर मी खूश झाले. अर्थात शबाना अभिनेत्री म्हणून अप्रतिमच होती. ‘स्पर्श’ तयार झाला. पुढे समजलं, की स्मिता खूप दुखावलीये. त्यानंतर एकदा सुभाष अवचटच्या पार्टीमध्ये आम्ही भेटलो. ती खूप दिवसांनी भेटली होती. तिला म्हटलं, ‘‘स्मिता, तू रागावलीयेस का माझ्यावर?’’ तिने माझ्याकडे पाहिलं आणि ‘हो’ असं म्हणाली आणि तोंड वळवलं. त्यानंतर आम्ही कधीच भेटलो नाही. नंतर ती गेलीच. मला खूप दु:ख होतं या गोष्टीचं. तिच्या आप्तांचाही माझ्यावर राग आहे. तो अतिशय स्वाभाविकही आहे. पण मला तिला हे सांगण्याची संधीच नाही मिळाली. आता वाटतं- माझंच चुकलं का, की मी फारच संकोचाने वागले?
०
प्लस फिल्म्स नावाची चित्रपट बनवणारी एक कंपनी सुरू झाली होती. जावेद अख्तर त्याच्या कार्यकारिणीमध्ये होता. एकदा शबाना माझ्या घरी आली. म्हणाली की, प्लसला एक सिनेमा करायचाय. तो तू करावास अशी त्यांची इच्छा आहे. त्यात माझी मुख्य भूमिका असेल, असं तिने सांगितलं. तुझ्याकडे काही विषय आहे का? मी त्यावेळी जबालीची गोष्ट वाचली होती. त्यावर केरळमधील प्रसिद्ध नाटककार व दिग्दर्शक पण्णिकर यांनी नाटक लिहिलं होतं. ती गोष्ट आणि सध्याच्या कॉलगर्लला धरून कथेचा गोफ विणला होता. मेरील स्ट्रिपचा ‘फ्रेंच लेफ्टनंट्स वुमन’ या चित्रपटात अशीच कल्पना मांडली आहे. ती कल्पना मी शबानाला सांगितली. तिला ती खूपच आवडली. ती म्हणाली की, पण्णिकरांशी संपर्क साधून तू ते नाटक मागव आणि पटकथा लिही. आमचं बोलणं वगैरे झालं आणि ती निघाली म्हणून तिला सोडायला मी लिफ्टपर्यंत गेले. ती मला म्हणाली, मी परवा एक लेख वाचला. वर्षां भोसलेने लिहिलेला. आपलं बालपण आणि संगीतप्रेमी घराण्यात वाढताना आलेले अनुभव, त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम, तिच्यावर काय काय दडपण आलं, वगैरे वगैरे. खूप चांगला लेख आहे. मी तुला वाचायला देईन. बोलता बोलता हा विषय निघाला होता. मी तिला म्हटलं, ‘‘एवढी मोठी आपली भारतीय सिनेसृष्टी! त्यात पाश्र्वगायनाचा केवढा मोठा सहभाग आहे. परंतु एकाही पाश्र्वगायकावर चित्रपट झालेला नाही.’’ ती म्हणाली, ‘‘आपण करू या का? आशा भोसलेंवर काही करायचं का?’’ आधी असं ठरलं की, आशा भोसले यांना समोर ठेवून चित्रपट करायचा. मात्र, नंतर लक्षात आलं की, असं नाही करता येणार. जिवंत व्यक्तीच्या बाबतीत तुम्ही चित्रपटात स्वातंत्र्य घेऊ शकत नाही. मी शबानाला सांगितलं, ‘‘आशा भोसलेंवर चित्रपट करणं अवघड आहे. पण मला नेहमी वाटत आलंय, की आशाबाई आणि लताबाई या दोघी बहिणी असल्यानं त्यांच्यात खूप सलोखा, प्रेम असणारच. लताबाईंनी संपूर्ण कुटुंबासाठी खूप काही केलेलं. पण पुढे प्रतिस्पर्धी म्हणून जेव्हा त्या एकमेकींसमोर उभ्या राहतात तेव्हा काय होत असेल? त्यांची मन:स्थिती तेव्हा कशी असेल? एकीकडे प्रेम, माया, सलोखा आणि दुसरीकडे संघर्ष.. कशा काय त्या हे सारं निभावत असतील?’’ शबाना म्हणाली, ‘‘खरंच, अप्रतिम आहे हा विषय. तू लिही.’’ त्यानुसार मी ‘साज’चं स्क्रिप्ट लिहिलं. पण मी शपथपूर्वक सांगायला तयार आहे की, ‘साज’मधील कथा ही या दोघा बहिणींची कथा नाहीए. हं, मला कथेची स्फूर्ती मिळाली ती या बहिणींमुळे हे नाकारण्यात अर्थ नाही आणि मी ते नाकारतही नाही. मात्र, चित्रपटात मी ज्या दोन बहिणी उभ्या केल्या आहेत- मानसी आणि बन्सी- त्या स्वतंत्र आहेत. कथानक स्वतंत्र आहे. पण लोकांना वाटलं की या बहिणींवरच चित्रपट आहे. त्यांचे अनेक चाहते नाराज झाले.
०
पुण्यात असताना मी शं. गो. साठेंचं एक नाटक बसवलं होतं. अर्थात नाटक म्हणून मला ते तितकंसं आवडलं नव्हतं. मात्र त्यातली कल्पना अप्रतिम होती.. ससा आणि कासवाची. आजकालच्या युगामध्ये सचोटीने वागणारा माणूसच- म्हणजे कासव- पुढे जातो, ही गोष्ट लागू पडत नाही. हुशार, लांडय़ालबाडय़ा करणारा ससाच पुढे जातो.. अशी ती कल्पना होती. मी त्यांना विचारलं, ‘‘मी तुमची कल्पना घेतली तर चालेल का?’’ त्यांनी खूप उदार मनानं त्याला परवानगी दिली. त्यानुसार मी ‘कथा’ चित्रपट लिहिला. त्याला दोन अप्रतिम नट मिळाले- फारुख शेख आणि नसीरुद्दीन शाह. गंमत म्हणजे दोघांना स्क्रिप्ट वाचायला दिलं तेव्हा ते वाचल्यावर नसीरुद्दीन म्हणाला, ‘‘मी सशाचं काम करायचं ना?’’ आणि फारुख म्हणाला, ‘‘मी कासवाचं काम करायचं ना?’’ मी म्हटलं, ‘‘नाही.’’ नसिरुद्दीन म्हणाला, ‘‘म्हणजे मी त्या बावळट माणसाचं काम करायचं?’’ तर फारूख म्हणाला, ‘‘आप मुझे बदमाश बता रहे है. मै कितना सिधासाधा हूँ.’’ मी म्हटलं, ‘‘तुम्हाला काही आव्हाने नकोत का?’’ तेव्हा कुठं ते त्यांच्या मूळ प्रवृत्तीच्या उलट असलेल्या भूमिका साकारायला राजी झाले. आणि चित्रपट पूर्ण झाल्यानंतर बेहद्द खूश झाले.
मी दूरदर्शनवर असताना ‘धुवाँ धुवाँ’ हा टेलि-प्ले केला होता. त्यावरून मला ‘चष्मे बद्दूर’ चित्रपट सुचला. अलीकडच्या तरुणांच्या मौजमजा करण्याच्या प्रवृत्तीवर आधारीत हा चित्रपट होता.
०
नाटकात दिग्दर्शकाने लेखकाच्या शब्दांत फेरफार करावा का, त्यात काही मोडतोड करावी का, याविषयी पु. ल. देशपांडे फार सुंदर बोलले होते.. ‘माझ्या नाटकात कुणी मेहेरबानी करून सुधारणा करू नये. अन्यथा त्यांनी आपलं स्वतंत्र नाटक लिहावं.’ मलाही ठामपणे तसंच वाटतं. नाटककाराने लिहिलेल्या नाटकात दिग्दर्शकाने लुडबुड करायचं काम नाही. काहीतरी मामुली फेरफार करायचेच झाले तर तिथे तारतम्य वापरावं.
०
स्त्री-दिग्दर्शक वा पुरुष दिग्दर्शक अशी विभागणी करणं मला बिलकूल मंजूर नाही. दिग्दर्शक हा दिग्दर्शक असतो. मग ती स्त्री आहे की पुरुष, या उठाठेवी कशाला हव्यात? माझ्यावर नेहमी आरोप केला जायचा- की तुम्ही स्त्री असून स्त्रीप्रधान काहीच का केलं नाही? अर्थात ‘माझा खेळ मांडू दे’ लिहून मी सगळ्यांना गप्प केलं. मी म्हणायचे की, मी स्त्री आहे, पण मी माणूसदेखील आहे की! मी ‘माणसा’च्या भूमिकेतून लिहिलं तर काही चुकलं का? कुठल्याही क्रियाशील कलाकाराने दुसऱ्याच्या भूमिकेत शिरायची कला अवगत केली पाहिजे, म्हणजे मग तुम्ही त्या विषयाला न्याय देऊ शकता. मला स्त्री-पुरुष ही विभागणीच पसंत नाही.
०
हल्लीच्या कलाजगतापासून आपण तुटलोय वगैरे असं काही मला वाटत नाही. अलीकडे मी फारसं काही बघत नाही. सध्या कितीतरी मराठी चांगले चित्रपटही येताहेत. मात्र, यापैकी एखादा चित्रपट वा नाटक आपण करायला हवं होतं असं काही मला वाटत नाही. आजकाल मराठी नाटकांना इंग्रजी नावं द्यायची टुम निघाली आहे. मला ती बिलकूल मान्य नाही. आपल्या मराठीची इतकी दैना झाली आहे का, की आपल्याला मराठीत शब्द सापडू नयेत? मराठी नाटकांचे इंग्रजी मथळे पाहिले की माझा मस्तकशूळ उठतो. मी इंग्रजी मथळे असलेलं मराठी नाटक पाहत नाही. माझा माझ्या परीनं केलेला हा छोटासा निषेध. त्यानं कुणाला काही फरक पडत नाही. मात्र, मला समाधान! मी मराठी मालिका तर चुकूनही बघत नाही. चॅनेल बदलताना चुकून मराठी वा हिंदीसुद्धा मालिका लागल्या तरी विंचू चावल्यासारखं मी ते चॅनेल बदलते.
पुढे कैक वर्षांनी ‘गिधाडे ’ नाटकाचा प्रयोग आतिशा नाईकने केला. अलीकडे.. म्हणजे तीन-चार वर्षे झाली असतील. त्यात माझ्या मुलाने- गौतमने रमाकांतची भूमिका केली होती. अप्रतिम. माझा मुलगा उत्तम नट आहे, याचा त्या दिवशी मला साक्षात्कार झाला. त्याने फारच सुंदर भूमिका केली. हे मी आई म्हणून नाही सांगत. किंबहुना, मी त्याच्या कामावर कायम टीका करत असते असा त्याचा आक्षेप आहे. ते नाटक आतिशा नाईकने इतकं सुंदर बसवलं होतं, की पुन्हा एकदा मला तोंडात चपराक मारल्याचा अनुभव आला. तेव्हा माझ्या मनात विचार आला.. मग मी बसवलेलं नाटक सानेगुरुजींनी लिहिलं होतं की काय?
शब्दांकन : रेश्मा भुजबळ