अतुल दाते
ज्येष्ठ गायक अरुण दाते यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्या मुलाने जागविलेल्या हृद्य आठवणी..
अरुण दाते.. सर्वासाठी मखमली आवाजाचा एक सुरेल गायक, पण माझ्यासाठी त्यांची ओळख फक्त तेवढीच नव्हती. ‘माणूस’ म्हणून असलेलं त्यांचं मोठेपण माझ्या वयाच्या वाढीबरोबर अधिकच अधोरेखित होत गेलं. माझे बाबा म्हणून मला ते नेहमीच जवळचे होतेच, पण एक उत्तम माणूस म्हणूनही ते मला नेहमीच भावले. आणि ते गेल्यानंतर त्यांची हीच ‘उत्तम माणूस’ म्हणून समाजमानसात असलेली ओळख अधिकच गडद होत जातेय.. कलाकार म्हणून तुम्ही उत्तम असालही, पण त्याचबरोबर माणूस म्हणून उत्तम असणं, हे मिश्रण दुर्मीळच; जे बाबांमध्ये होतं. त्यांनी ते शेवटपर्यंत कायम राखलं..
बाबा गेल्यानंतर डोंबिवलीचे काटदरे नावाचे गृहस्थ मला आवर्जून भेटायला आले. मला म्हणाले, ‘‘तुमच्याशी फक्त दोन मिनिटं बोलायचंय. मला दातेंचे आणि तुमचे आभार मानायचे आहेत. सोळा वर्षांपूर्वी ठाण्यात श्रीधर फडके यांच्या गाण्यांच्या सीडीचं प्रकाशन अरुण दातेंच्या हस्ते झालं होतं. तिथे मी त्यांना भेटलो. वाकून नमस्कार केला. दातेंनी मला जवळ घेतलं आणि विचारलं, ‘तू काय करतोस?’ मला आश्चर्य वाटलं, की इतका मोठा माणूस आपली चौकशी करतोय. त्या वेळेस मी नोकरी करत नव्हतो. मी सध्या नोकरीच्या शोधात असल्याचं त्यांना सांगितलं. त्यांनी लगेचच मला सीव्ही देण्यास सांगितलं.. पण पुढचे सहा महिने एवढय़ा मोठय़ा माणसाने आपल्याला नोकरीसाठी सीव्ही मागितला, याच विचारात गेले. त्यानंतर माझा सीव्ही घेऊन मी तुमच्याकडे आलो. तुम्ही घराच्या बाहेरच भेटल्याने तो तुमच्याकडे दिला आणि तुम्ही तो बाबांना दिला असावा. आठवडय़ाभरात मला एका मोठय़ा कंपनीतून कॉल आला आणि दातेसाहेबांच्या शिफारशीवरून तुम्हाला नोकरी मिळाल्याचं सांगण्यात आलं.’’ बाबांमुळे त्यांना नोकरी मिळाल्याचा कृतज्ञभाव त्यांच्या डोळय़ांत दिसत होता. ही आठवण सांगत असताना त्यांचे डोळे पाणावले होते आणि मला पुन्हा एकदा बाबांच्या ‘मोठेपणा’ची तीव्र जाणीव झाली. ही गोष्ट मला फार मोठी वाटली, कारण सामान्य माणसं अरुण दातेंना केवळ एक गायक म्हणूनच नाही तर उत्तम माणूस म्हणूनही ओळखत होते. नकळत माझेही डोळे पाणावले. असे किती तरी लोक आहेत.
बाबांनी त्यांच्यातला ‘माणूस’ अखेपर्यंत जपला. शेवटच्या दिवसांत- आजारपणातही ते त्यांना भेटायला येणाऱ्या मित्रमंडळींचे आदरातिथ्य करायला सांगत. बाबांनी देवापेक्षाही माणसांना जपलं. पैशांपेक्षाही त्यांनी माणसं मोठी मानली. ते गेल्यावर माणसांचा जो ओघ सुरू आहे त्यावरून त्याची प्रचीती येत आहे. ते गायक म्हणून मोठे होतेच, पण माणूस म्हणूनही किती ‘ग्रेट’ होते हे आज प्रामुख्याने जाणवतंय.
मला आठवतंय, एकदा मला माझ्या प्रोजेक्टमध्ये फारसा आर्थिक फायदा झाला नाही. ही खंत मी त्यांच्याकडे बोलून दाखवली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘हे बघ अतुल, तुझ्या आजोबांनी आणि मीही पैसा कधी मोठा मानला नाही. आपण खूप चांगले शिकलो आहोत, त्यामुळे आपण चांगले पैसे कमावू शकतो. पण यापेक्षाही आयुष्यात माणसं कमावणं महत्त्वाचं!’’
त्यांच्याविषयीची एक आठवण माझ्या मनात कायम घर करून आहे. कार्टर रोडवरील जॉगर्स पार्कजवळ आमचं शेवटच्या मजल्यावर प्रशस्त घर होतं. कोणालाही हेवा वाटावा असंच ते घर. एक तर तिथे लागू, बासू भट्टाचार्यासारख्या बडय़ा मंडळींचा सहवास आम्हाला लाभत होता. आणि दुसरं म्हणजे, गॅलरीत उभं राहिल्यावर मालाडपासून अगदी कुलाब्यापर्यंतच्या समुद्राचं दर्शन व्हायचं. काही कारणास्तव ते घर विकावं लागलं. बाबांनाही पुण्यात स्थायिक व्हायचं होतं. घर विकण्याआधी इंदूरवरून त्यांची काही मित्रमंडळी आमच्याकडे आली होती. त्यांना ही गोष्ट कळली तेव्हा ते बाबांना म्हणाले, ‘‘अरे अरू, इतकं चांगलं घर विकावं लागणार याचं तुला वाईट वाटत नाही का?’’ त्यावर बाबा एवढंच म्हणाले, ‘‘भिंतींवर प्रेम करायचं नसतं, माणसांवर प्रेम करायचं असतं. तुम्ही मला सोडून गेलात तर मला वाईट वाटेल.’’ जीवनाचं सारच त्यांनी या एका वाक्यातून सांगितलं होतं. अर्थात, प्रश्नकर्तेही त्यांच्या या वाक्यावर निरुत्तर झाले होते. आयुष्यात आलेली माणसं जपा, हेच ते सांगत असत. त्याचा हा किस्सा आठवला की मला नेहमी मंगेश पाडगांवकरांची ‘कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी’ ही कविता आठवते.
माणसातलं माणूूसपण न जाणून घेता केवळ देव देव करणं त्यांना कदापि मान्य नव्हतं. त्यांच्या कृतीतून हाच संस्कार त्यांनी आमच्यात रुजवला. माझ्या आजोबांचीच ही शिकवण होती आणि बाबांनी ती हृदयापासून जपली.. आम्हीही जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. माझे आजोबा रामुभय्या दाते यांना पु. ल. देशपांडेनी ‘रसिकाग्रणी’ ही पदवी बहाल केली होती. त्यांच्या पोटी बाबा जन्माला आले आणि त्यांचं जीवन सार्थकी लागलं. रामूभय्या दाते यांनी रसिक म्हणून नावलौकिक मिळवला. बाबांनी जगभर गायक म्हणून वाहवा मिळवली आणि आता काही प्रमाणात मला लोक ओळखत असतील; तरीही आम्हा दाते पुरुषांना खऱ्या अर्थाने साथ दिली ती माझी आजी माणिक दाते, आई मीना दाते आणि माझी बायको मंजू दाते यांनी. या तिघींशिवाय आमच्या तीन पिढय़ांची कधीच प्रगती झाली नसती.
पाडगांवकरांनी माझ्या आजोबांवर एक गाणं लिहिलं होतं. ‘शुक्रतारा’मध्ये सहा-सात वर्षांपूर्वी खुद्द पाडगांवकरांकडून ऐकण्याचा योग आला. ते गाणं होतं-
‘आत आपल्या झरा झुळझुळे,
निळा निळा स्वच्छंद
जगणे म्हणजे उधळीत जाणे,
हृदयातील आनंद..’
‘शुक्रतारा’ला यंदा ५५ र्वष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने ते गाणं स्वरबद्ध व्हावं आणि ते बाबांनी गावं अशी यशवंत देवांची इच्छा होती. पण प्रकृती साथ देत नव्हती. खुद्द यशवंत देवांनीच ते गाणं स्वरबद्ध केलं आहे. मग ते गाणं मंदार आपटेने गावं असं ठरलं. कारण मंदार ‘शुक्रतारा’च्या माध्यमातून आमच्याशी कायमचा जोडला गेलाय. अलीकडेच ते यूटय़ूबवर प्रसिद्ध झालंय. ‘शुक्रतारा’च्या ५५ व्या वर्षांत माझं हे स्वप्न मी पूर्ण करू शकलो आणि बाबांच्या वाढदिवसाला त्यांना आवडेल अशी संगीतरूपी भेट देऊ शकलो, याचं मला खूप समाधान आहे. पण आजही पाडगांवकरांचे शब्द माझ्या कानात घुमतायत. मला ते स्वत:हून म्हणाले की, ‘‘मी ते गाणं जरी तुझ्या आजोबांवर लिहिलं असलं तरी अरुणसुद्धा हे गाणं खऱ्या अर्थाने जगला आहे.’’
बाबांसाठी पाडगांवकर, यशवंत देव आणि श्रीनिवास खळे हे ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रिमूर्तीसारखे होते. आई-वडिलांनंतर ते या तिघांना मानत. बाबा कुठल्याही कार्यक्रमाला जाण्यापूर्वी आणि कार्यक्रमावरून आल्यावर आई-वडिलांना नमस्कार करत. त्यांनी देवघरात जाऊन नमस्कार केलेला मला आठवत नाही. पण अशीच एक घटना आहे बाबांच्या माझ्या मनातील या प्रतिमेला छेद देणारी.. तीस वर्षांपूर्वी माझ्या मानेवर गाठ आली होती. ती गाठ कॅन्सरची असण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली होती. बायप्सी झाली. शस्त्रक्रियाही झाली. सुदैवाने ती गाठ कॅन्सरची नव्हती. या दरम्यान घरातली सगळी मंडळी घाबरली होती. बाबांची अस्वस्थताही जाणवत होती. त्याच दरम्यान वसईला बाबांचा एक कार्यक्रम होता. कार्यक्रमाहून घरी परत आल्यानंतर बाबांनी कार्यक्रमाचं मानधन माझ्या हातात दिलं. त्या वेळी बाबांचे व्यवहार मी सांभाळायला सुरुवात केली होती. मी सवयीप्रमाणे ‘पैसे बँकेत टाकू का?’ असं विचारलं. ते म्हणाले, ‘‘नको. ते सिद्धिविनायक ट्रस्टला देऊन टाक.’’ मी म्हटलं, ‘‘कशाला?’’ तर म्हणाले, ‘‘अरे यार, तू आजारपणातून बरा झालास ना. मग ते पैसे ट्रस्टला देऊन टाक.’’ फारसं देव देव न करणाऱ्या या माणसाने मुलाच्या आरोग्यासाठी मात्र मनात कुठेतरी त्याची करुणा भाकली असणार. त्याच वेळी मला त्यांच्यातील हळवा बाप आणि सुहृदयी माणूस अशी दोन रूपं दिसली. त्यांनी देवाचे ऋण फेडले ते दानातून. आमच्याकडे गणेशोत्सवात गणपतीची स्थापना होते. बाबा फारसे देव वगैरे मानणारे नसले तरीही या सणानिमित्ताने मित्रमंडळींना घरी बोलावून छान अंगत-पंगत असे.
बाबांशी माझी खऱ्या अर्थाने नाळ जुळली ती माझी लाडकी आजी गेल्यावर. कारण मी वाढलो तो आजीजवळच. मी तिचा फार लाडका. तिच्या छत्रछायेखालीच माझं बालपण गेलं. तिने नेहमीच माझ्यावर मायेची पखरण केली. कायम माझ्याभोवती प्रेमाचं संरक्षण कवच उभारलं होतं आणि ते छेदण्याची कोणाचीच हिंमत नसे. आजी गेल्यावर ते प्रेम, ते संरक्षण कवच माझ्या बाबांनी दिलं. तिची उणीव बाबांनी भरून काढली. त्या वेळी त्यांच्याशी जुळलेला ऋणानुबंध शेवटपर्यंत राहिला. माझी आजीही भन्नाट होती. त्या काळीही मुलींनी शिक्षणाबरोबरच स्विमिंग, बॅडमिंटन, स्वसंरक्षणाचे धडे घ्यावेत याविषयी ती आग्रही असे. बाबांनाही तिने ‘आधी शिक्षण, नंतर गाणं’ असा आग्रह धरला होता. कारण पैशाअभावी अनेक कलाकारांचे हाल तिने पाहिले होते. बाबा टेक्स्टाइल इंजिनीअर होते आणि उत्तम गायकही! मी बाबांना एकाच वेळी दुपारी टेक्स्टाइलवर उत्तम व्याख्यान देताना पाहिलंय आणि संध्याकाळी सुरेल मैफल सजवताना! आणि दोन्हीही अप्रतिमच! बाबा कामानिमित्त कंपन्यांमध्ये जायचे तेव्हा गायक म्हणून तिथले लोक उठून त्यांना मान देत. खऱ्या अर्थाने दाते घराणं प्रसिद्धी पावलं ते ‘अरुण दाते’ यांच्यामुळेच!
गायकाचा मुलगा गायक, वादकाचा मुलगा वादक अशी अनेक घराण्यांची परंपरा असते. माझा गळा गाता नाही, पण मला तबला खूप आवडायचा. बाबांनीही मला कधीच ‘गाणंच गा’ अशी सक्ती केली नाही. गाण्यातून त्यांचा वारसा मी पुढे नेला नसला तरी त्यांच्या गाण्याचं संचित लोकांपर्यंत पोहाचविण्याचं काम मी इमानेइतबारे करत राहणार आहे. हा वारसा वेगळय़ा पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय.
बाबांची कौतुकाची थाप पहिल्यांदा पडली तो प्रसंग आजही लख्ख आठवतोय. काही कामानिमित्त बाबा दिल्लीत गेले होते. त्यांच्या एका मित्राकडेच ते उतरले होते. ते कुटुंब पंजाबी होतं. त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांची यजमानांनी ओळख करून दिली, ‘ये अरुण दाते, बहोत बडे गायक हैं.’ त्यावर त्या पाहुण्यांनी विचारलं, ‘‘सारेगमप’ के अतुल दाते आपके कौन लगते है?’ बाबांना पाहुण्यांच्या प्रश्नाचं खूप कौतुक वाटलं. घरी आल्यावर बाबा म्हणाले, ‘अरे यार (आमच्याकडे कौतुकाने मुलाला यार म्हणतात), आज मला तू खूप आनंद दिलास. मला तुझा खूप अभिमान वाटतोय.’
उंचपुऱ्या बाबांचं व्यक्तिमत्त्वच असं होतं, की त्यांच्या नजरेला नजर भिडवायची हिंमत होत नसे. पण एकदा का त्यांनी समोरच्या माणसाला आपलंसं केलं, की ते त्या माणसाचेच होऊन जात. त्यांच्यातील माणुसकीचा झरा अखंड वाहत असे.
सध्या मी एक पुस्तक लिहितोय. बाबांना ही गोष्ट माहीत होती. पुस्तक लिहितानाही त्यात कोणत्याही सुहृदाचे नाव राहू नये याबाबत ते मला नेहमी बजावत. माणूस दुखावला जाऊ नये हीच त्यामागची धारणा होती. बाबांना आजतागायत कोणताही सरकारी पुरस्कार मिळाला नाही. अनेक जण त्याविषयीची खंत बाबांकडे बोलून दाखवीत. पण बाबा म्हणत, ‘‘लोकांनी मला जो मान-सन्मान दिला आहे तोच माझा खरा पुरस्कार!’’ यासाठी खरंच मोठं मन असावं लागतं.
गाणं हेच बाबांचा ध्यास होता. आपल्याला तब्येतीमुळे गाता येत नाही, याची खंत त्यांना वाटत असे. गाण्याच्या सरावाला ते अत्यंत महत्त्व देत. मैफिलीच्या आधी सराव ठरलेला असे. ते म्हणत, ‘‘सराव नसलेली मैफल ही जितकी गायकाला कळते तितकीच चोखंदळ श्रोत्यालाही!’’ त्यामुळे सरावाला ते फार महत्त्व देत. मला आठवतं, सकाळी रियाज झाला नाही तर ते वेळ मिळेल तेव्हा रियाज करीत; रियाजाला कधीही सुट्टी नसे. बाबांना तब्येतीमुळे शेवटी शेवटी गाता येत नसे. त्याची त्यांना खंत वाटे. म्हणून आम्ही त्यांना त्यांची गाणी ऐकवत असू. शेवटी ‘या जन्मावर..’ हे गाणं ऐकतानाही त्यांच्या तोंडी ‘क्या बात है!’ हेच शब्द होते.
बाबांनी फक्त ११५-१२० गाणी गायली असतील, पण हा ऐवज हजारो गाण्यांइतका आहे. त्यांना कुठल्या कवितेचे शब्द आवडले नाहीत, तर ते गाणे ते गात नसत. पाडगांवकर हे त्यांचं दैवत. त्यांच्यावर आणि त्यांच्या कवितांवर त्यांचं नितांत प्रेम होतं. त्यांच्याऐवजी कुसुमाग्रज, शंकर वैद्य, सुरेश भट अशा मोजक्याच कवींच्या कविता ते गायले. नव्या कवींमध्ये ते सौमित्रची कविता गायले. एकदिवस मी, सौमित्र, मिलिंद इंगळे आणि मित्रमंडळी गाणं गात बसलो होतो, बाबा कुठून तरी बाहेरून आले होते. त्यांनी ‘दिस नकळत जाई’ ही कविता ऐकली. त्यांना ती खूप आवडली. त्यांनी विचारलं, ‘‘हे रेकॉर्ड का करत नाही?’’ ‘‘नवीन कवीचं गाणं कोण गाईल?’’ असं म्हटल्यावर ते ‘‘मी गाईन!’’ असे ते पटकन् म्हणाले. नवीन कलाकारांनाही ते प्रोत्साहन देत असत. उत्तम खाणं, उत्तम गाणं आणि उत्तम कला यांचे ते भोक्ते होते.
बाबांनी आयुष्यभर कोणालाही दुखावलं नाही. शेवटपर्यंत हे व्रत त्यांनी सांभाळलं. म्हणूनच मनाने ते कायम शुद्ध राहिले. कायम ताठ मानेने जगले. ते शेवटपर्यंत असेच राहिले.. शांत, अम्लान..
atul.date@gmail.com