स्वाती केतकर-पंडित swati.pandit@expressindia.com
भारतीय अभिजात संगीतातल्या श्रेष्ठ कलावंत, किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पद्मश्री डॉ. प्रभा अत्रे यांच्याशी ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमात संवाद साधला गेला. त्याचा हा स्वरवृत्तांत.
लहानपणी घरात कुणी अनोळखी आलं तरी स्वयंपाकघरात पळून जाणारी एक बुजरी मुलगी पुढे संगीतातली एक प्रभावी गायिका बनते. घरात कोणताही संगीत वारसा नसताना किराणा घराण्यासारख्या मातब्बर संगीत घराण्याची ती एक आघाडीची शिलेदार होते. विज्ञान व कायद्यातलं शिक्षण घेऊन पुढे गाण्यात डॉक्टरेट मिळवते.. डॉ. प्रभा अत्रे या कलावतीचा सारा प्रवासच असा वळणवाटांचा आणि थक्क करणारा! त्यांच्या या प्रवासाची स्वरलड उलगडली ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमात!
डॉ. प्रभा अत्रे या केवळ उत्कृष्ट गायिकाच नाहीत; तर त्या अतिशय उत्तम शिक्षक आहेत, गुरू आहेत, संगीताच्या अभ्यासक आहेत आणि उत्कृष्ट लेखिका व कवयित्रीही आहेत. प्रभाताईंच्या या साऱ्याच प्रतिमांचं भावदर्शन घडलंच, पण त्याचा शुभारंभ झाला त्यांच्या कवितेतून. आपलं संगीत कसं असावं, याविषयीचं त्यांनी केलेलं चिंतन या कवितेतून मांडलं आहे..
‘एखादा सूर असा यावा,
क्षितिजाचा पार दिसावा
एखादा आलाप असा खुलावा,
सारा आसमंत उजळून जावा
एखादी तान अशी बरसावी,
सारी तृष्णा मिटून जावी
एखादी सरगम अशी लहरावी,
वाऱ्यालाही भूल पडावी
एखादी लय अशी जुळावी,
सारी जाणीव विरून जावी
एखादा ताल असा भरावा,
अंतापर्यंत तोल राहावा
एखादी सम अशी पडावी,
जिवाशिवाची गाठ व्हावी
एखादा राग असा फुलावा,
अनंताला जाऊन भिडावा
एखादा ख्याल असा मांडावा,
यमुनातिरी ताज बनावा
एखादी ठुमरी अशी रंगावी,
इंद्रधनुची कमाल व्हावी,
एखादं गीत असं छेडावं,
शब्दांपलीकडे बोलकं व्हावं
एखादं भजन असं गावं,
निर्गुणाचं कोडं सुटावं
एखादा श्रोता असा मिळावा,
अद्वैताचा स्पर्श घडावा
एखादा संवाद असा जुळावा,
गंगेवरती चंद्र झुलावा
एखादी मैफील अशी जमावी,
गाभाऱ्यागत पुनीत व्हावी’
नेहमी आपल्या सुरांच्या सान्निध्यात रसिक श्रोत्यांना चिंब करणाऱ्या प्रभाताईंनी गप्पांचा कार्यक्रम आहे म्हणूनच की काय, आपल्या शब्दाचं सामर्थ्यही रसिकांपुढे सादर केलं, तेही त्यांच्या नेहमीच्या सोज्ज्वळ शैलीत!
शब्दसुरांचं इतकं वैभव वागवणाऱ्या या कलावतीची गाण्याशी ओळख झाली तरी कशी, हा प्रश्न साऱ्यांच्याच मनात होता. प्रभाताई म्हणाल्या, ‘‘आमच्या घरात काही गाण्याची परंपरा नाही. खरं तर गाण्याची ओळखही नव्हती कुणाला. पण एक गोड अपघात म्हणून गाणं माझ्या आयुष्यात आलं. माझे वडील शाळेत हेडमास्तर होते. अतिशय हौशी. गाण्यापासून खाण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचं त्यांना कौतुक. ते क्रिकेट उत्तम खेळायचे. चित्र, खेळ, गाणं, नाटक असे अनेक उपक्रम शाळेत जोरदार असायचे. आपल्या, म्हणजे हेडमास्तरांच्या मुलीनं सगळंच करावं असं त्यांना वाटायचं. तेव्हा वडिलांना नाही म्हणण्याचं धाष्टर्य़ नव्हतं. एकदा गाण्याच्या एका स्पर्धेत माझं गाणं कुणीसं ऐकलं नि वडिलांना सांगितलं, ‘मुलीचा आवाज चांगला आहे. तिला गाणं शिकवा.’ वडील म्हणाले, ‘शाळेत शिकवतील की!’ अन् तो विषय ते विसरूनही गेले. पुढे माझी आई आजारी पडली आणि तिचं मन रमण्यासाठी तिला घरीच हार्मोनिअमची शिकवणी लावली. पण आठच दिवसांत आई त्याला कंटाळली. आता त्या हार्मोनिअमच्या शिक्षकांना नाही कसं म्हणायचं, म्हणून मग आईच्या ऐवजी मी शिकू लागले. गाण्याशी ओळख ही अशी. सुरुवातीला भावगीत वगैरे गाणारी मी हळूहळू शास्त्रीय संगीताकडे येत होते. एकदा वडिलांचे मित्र दत्तोपंत वैद्य देशपांडे यांनी माझं गाणं ऐकलं. ते वडिलांना म्हणाले, ‘हिला सुरेशबाबूंकडे गाणं शिकायला पाठव.’ माझ्या नशिबाने तीही संधी मिळाली. हिराबाई बडोदेकर, कमलाबाई बडोदेकर, सुरेशबाबू माने यांच्यासमोर माझी तयारी किती आहे, याची परीक्षा झाली आणि सुरेशबाबूंकडे शिकायला सुरुवात झाली.’’
हे सुरेशबाबू म्हणजे हिराबाई बडोदेकरांचे मोठे बंधू. ‘किराणा’ घराण्याचे संस्थापक अब्दुल करीम खाँ साहेबांचे आणि ताराबाई माने यांचे ज्येष्ठ चिरंजीव. प्रचंड तेज:पुंज आणि देखणी गायकी. पं. भीमसेन जोशी म्हणायचे, ‘‘सुरेशबाबूंचं गाणं ऐकायला मिळणं म्हणजे अद्भुत अनुभव. ते गायले तर असं काही गात, की त्याहून देखणं, प्रचंड गाणं तुम्ही कधी ऐकलंच नसेल.’’ सुरेशबाबू ‘प्रभात’मध्ये संगीत दिग्दर्शक होते. त्यांनी उत्तरेकडील ठुमरी हा गायनप्रकार मराठीत आणला. मराठी ठुमरीचा एक वेगळा बाजच निर्माण केला. त्यांचं गाणं अतिशय सुंदर, पण ते मैफिली गायक नव्हते. संगीतातील एक अवलिया अशीच त्यांची ओळख. सुरेशबाबूंकडे चार-पाच वर्ष प्रभाताई गाणं शिकत होत्या. सुरेशबाबूंची शिकवण्याची पद्धतही वेगळी होती. ते काही गाऊन दाखवायचे आणि सांगायचे, ‘‘याच्यापेक्षा वेगळं गाऊन दाखव.’’ ही एक वेगळीच कसोटी असायची. प्रभाताईंनी एक गंमत सांगितली. त्यांचा ‘यमन’ हा राग जवळपास वर्षभर सुरू होता. त्याचा कंटाळा येऊ लागला. म्हणून मग ‘‘आणखी किती दिवस हाच राग चालणार’’ असं प्रभाताईंनी विचारलं, तर त्यावर सुरेशबाबू म्हणाले, ‘‘तुला येतो का यमन? मग गाऊन दाखव.’’ यावर काय बोलणार? पण या वर्षभर चाललेल्या यमन पुराणाने प्रभाताईंना आयुष्यभर पुरेल अशी शिदोरी दिली. त्याचंच फलस्वरूप म्हणून प्रभाताईंचे पुढचे पाच-सहा राग जेमतेम सहा महिन्यांत पक्के झाले. सुरेशबाबूंनी दिलेला मोठा धडा म्हणजे- स्वत:ची गायकी सिद्ध करण्याचा! ते नेहमी सांगत, ‘‘तू तुझ्यासारखं गायलं पाहिजेस. कोणाचीही नक्कल करायची नाही, अगदी आपल्या गुरूचीही नाही. आपल्याच नाही तर सगळ्याच घराण्यांचं गाणं ऐकायचं. सगळ्या प्रकारचं गाणं ऐकायचं आणि त्यातलं चांगलं तेवढंच टिपून घ्यायचं.’’ आपल्या गुरूंचा हा धडा ताईंनी तंतोतंत गिरवला. त्या आजही सर्व प्रकारचं संगीत ऐकतात. सुरेशबाबूंचं १९५३ साली निधन झालं; परंतु त्यांच्या त्या अलौकिक शिकवणुकीमुळे, त्यांच्या गायकीतल्या तेजामुळे, प्रभावामुळे प्रभाताईंनी गुरू म्हणून त्यांच्या स्थानी नंतर कुणालाच बसवलं नाही.
सुरेशबाबूंच्या जाण्यानंतर प्रभाताईंना दोन वर्षांची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यांना किराणा घराण्यातीलच कुणीतरी गुरू हवा होता. अर्थातच, सुरेशबाबूंनंतर त्यांची बहीण आणि ज्येष्ठ गायिका हिराबाई बडोदेकरांकडे शिकवणी सुरू झाली. त्या वेळी हिराबाई लोकप्रियतेच्या अगदी शिखरावर होत्या. भारतभर त्यांचे दौरे होत. मग त्या साऱ्या दौऱ्यांत मैफिलीत त्यांच्यामागे तंबोरा धरत प्रभाताईंच्याही अभ्यासाला सुरुवात झाली.
हिराबाई बडोदेकर हे भारतीय संगीतातलं मानाचं सुवर्णपान. हिराबाई या संगीत मैफिलींमध्ये गाणाऱ्या पहिल्या स्त्री कलाकार. संगीत ऐकायलाही स्त्रीला उभं केलं जात नसण्याच्या त्या काळात हिराबाईंनी देशभर मैफिली केल्या. हिराबाईंसोबतच्या या भटकंतीने, मैफिलींनी प्रभाताईंना संगीताचं शिक्षण दिलंच; पण मैफिलीत गाणं कसं सादर करायचं, याचा वस्तुपाठही दिला. रियाजातलं मैफिलीमध्ये नेमकं काय सादर करायचं, कसं सादर करायचं, काय मांडायचं, लोकांना काय आवडेल, याचं एक प्रात्यक्षिकच या दोन वर्षांत प्रभाताईंना मिळत गेलं. या मैफिलींमुळे आणखीही एक गोष्ट होत होती. हिराबाईंना मिळणारी वाहव्वा, लोकप्रियता पाहून आपणही अशा मैफिली गाजवाव्या असं प्रभाताईंच्या मनात येत होतं. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर गणेशोत्सवांतून त्या सगळ्या सुरेल सिलसिल्याला सुरुवात झालीच!
अशा अनेक मैफिली गाजवणाऱ्या प्रभाताईंनी कोणाचं गाणं ऐकलं होतं, त्यांच्या कानांवर पहिले संस्कार कोणाच्या मैफिलींचे झाले, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. त्याचं उत्तर देताना त्या म्हणतात, ‘‘मी फार मैफिली ऐकल्याच नाहीत सुरुवातीला; कारण त्या काळात माझ्यासोबत गाण्याला येणार कोण? वडिलांना वेळ असेल तर ते नेणार. अशा वेळी मदतीला धावून आला तो रेडिओ. आकाशवाणीवर नूरजहाँ, रोशनआरा, बडे गुलाम अली खाँ, अब्दुल करीम खाँ यांच्यासारख्यांची गाणी मी ऐकली. त्यातही नूरजहाँचं गाणं मला विशेष आवडायचं!’’
प्रभाताईंची पहिली मैफिल झाली ती गणेशोत्सवात. हळूहळू या गायिकेची लोकांना ओळख होऊ लागली. त्यांची ‘मारूबिहाग’, ‘कलावती’ आणि ‘खमाज’ ठुमरीची ध्वनिमुद्रिका आली आणि एकच धम्माल उडाली. जिकडे तिकडे ‘प्रभा अत्रे’ हे नाव गाजू लागलं. त्यांची ती ध्वनिमुद्रिका त्याकाळी अनेकांना जणू तोंडपाठ झाली होती.
परंतु ती इतकी गाजूनही प्रभाताईंच्या मैफिली मात्र फारशा होत नव्हत्या. त्यांचं गाणं हवं तितकं समोर येत नव्हतं. याचं कारण विचारल्यावर प्रभाताई म्हणाल्या, ‘‘अहो, मुळात मी कधी गाण्यात करिअर करायचं हे ठरवून काही केलं नाही. त्यात माझा स्वभाव थोडासा लाजराबुजरा होता. त्यामुळे कधीही मी स्वत:हून कुणाला सांगितलं नाही, की माझ्या मैफिली करा. कुणी कार्यक्रम आणला आणि मनात असेल, तर मी जात असे. कधी कधी नाहीही म्हणत असे. माझ्या पहिल्या रेकॉर्डनंतरही अनेकांनी आणखी रेकॉर्ड काढण्याचा प्रस्ताव पुढे ठेवला होता. पण मी त्यांना सांगायचे, ‘थांबा, मला अधिक तयारी करू दे.’ असं करता करता त्या गोष्टी राहूनच गेल्या.’’
प्रभाताई किराणा घराण्याच्या गायिका. या घराण्याची खासियत म्हणजे गाण्यातील भावदर्शन. परंतु घराण्यातल्या केवळ काहीच गायकांनी या भावदर्शनाचं सोनं केलं. प्रभाताई या त्यापैकीच एक! त्यांचं गाणं ललित सुंदर भावगर्भ आहे.
हे सगळं गाण्यात कसं आणलं, जपलं? प्रभाताई म्हणाल्या, ‘‘मी जरी किराणा घराण्याची शिष्या असले, तरी इतर घराण्यांचं गाणंही खूप ऐकलं. झालं असं की, मी लॉ केल्यानंतर कोर्टात जायचा विचार केला. पण लवकरच मला कळलं, की हे काही आपल्याला जमायचं नाही. मग मी आकाशवाणीमध्ये मुलाखत दिली. तिथे माझी निवडही झाली. त्या वेळी आम्ही नागपूरला होतो. जेव्हा माझं रेकॉर्डिग नसेल आणि वेळ असेल तेव्हा मी आकाशवाणीच्या संग्रहातील अनेक गाणी ऐकायचे. त्यामध्ये मी अनेक गायक ऐकले. त्यांच्या शैलीचा अभ्यास केला. त्यातही अमीर खाँसाहेबांचं गाणं मला विशेष भावलं. या गाण्याने जणू भुरळच घातली. त्यातही त्यांनी गाण्यातली सरगम ज्या पद्धतीने गायली आहे, त्यांचं जे सादरीकरण केलं आहे, त्यामुळे तर मी भलतीच प्रभावित झाले. या नव्या स्वरप्रकाराची संपूर्ण ओळख मला झाली. आलाप, ताना तर माहीत असतातच; पण अमीर खाँसाहेबांनी ज्या कलात्मकतेने सरगम गायली आहे, ते माझ्यासाठी विशेष होतं. आलाप, ताना, सरगम हे सगळे वेगवेगळे अलंकार आहेत. त्यांची मांडणी वेगळी आहे, परिणाम वेगळा आहे. बांधणी वेगळी आहे. या सगळ्या गोष्टी मला समजत गेल्या. मग हा इतका समृद्ध प्रकार आपण अभ्यासातून का वगळायचा, असा विचार करून मी सरगमचा खूप अभ्यास केला. तो गायला लागले. आमच्या किराणा घराण्यात अब्दुल करीम खाँ यांच्यानंतर कुणीच सरगम गात नसत. तो मी गायला. पुढे त्यातच पीएच.डी. केली. कारण सरगममधले, मुळातच स्वरांची अक्षरं उपयोगात आणून एक वेगळी संगीताकृती बनवणे हेच मला खास वाटत होते.
संगीत ही एक अमूर्त कला आहे. ‘ख्याल’ हा एकच असा संगीतप्रकार आहे, जो संगीताचं अमूर्तपण टिकवून ठेवू शकतो. ‘धृपद धमार’मध्ये शब्दांचा वापर करावाच लागतो. सुरुवातीचे आलाप झाले, की नंतर जे गाणं सुरू होतं ते शब्दांमार्फतच मांडावं लागतं. ख्यालामध्ये शब्दांचा मोह टाळला तरी चालतं. एक मुखडा घेतला तरी त्याने सगळं काम होतं. सुरुवातीला राग संकल्पना अस्तित्वात आली तेव्हा ती हळूहळू विकसित होत होती. तिला बांधून ठेवण्यासाठी बंदिश आली. बंदिशीमुळे राग काय आहे, ते लोकांना कळलं. बंदिश जितकी लांब तितकं लोकांना लक्षात ठेवायला उपयोग होतो. पण ही बंदिश नंतर कमी कमी होत गेली. बंदिशीत दोन भाग असतात. स्थायी आणि अंतरा. काही ठिकाणी आम्ही विस्तार करून स्थायी भाग म्हणजे अंतरा वापरतो. शब्द जितके कमी करता येतील तेवढं त्या तालाचं अमूर्तपण टिकवून ठेवता येईल. मी प्रत्यक्ष मैफिलीत मुखडा ठेवून बंदिश कमी केली. याकरता माझ्यावर खूप टीका होते. पण आपण एक लक्षात घ्यायला हवं की, अष्टपदीपासून बंदिशीची लांबी कमी कमी होत गेली. ती का गेली? तर, त्याची गरजच कमी होत गेल्याने! संगीतामध्ये तुम्हाला जे व्यक्त करायचंय, ते स्वरांच्या माध्यमातूनच व्यक्त करत करायचं आहे. तालासाठी हवी बंदिश. ताल चालू राहावा म्हणून बंदिश हवी. ती एक ओळ पुरते तुम्हाला. राग उभा राहतो तो स्वरांच्या माध्यमातून. तालामधून उभा राहत नाही. ताल बाजूला ठेवला तरी राग उभा राहतो. पण हेही खरं आहे की, सामान्य श्रोत्यांपर्यंत पोहोचायचं असेल तर बंदिशीचा छान वापर करता येतो. त्यातले शब्द छान हवेत, धून छान हवी. तालाचं त्यातलं अंग चांगलं, आकर्षक हवं. एखाद्या व्यक्तीला पाहता नि चेहरा सुंदर असेल असं वाटतं, तसं बंदिशीचं आहे.
राहता राहिला प्रश्न भावदर्शनाचा. माझ्या गाण्यात भावदर्शन विशेष दिसतं, याचं कारण कदाचित माझ्या चित्रपटसंगीताच्या आवडीत असेल. त्यात पाहा ना, अगदी थोडक्या वेळाच्या गाण्यात संपूर्ण भावदर्शन घडवलं जातं. त्यामुळे ते अधिक छान वाटतं. पण यातही गंमत आहे बरं का! आपल्या संगीतात असा काहीसा ग्रह तयार करून दिला आहे, की जितकं गाणं रुक्ष तितकं ते शास्त्रीय आणि चांगलं. त्यामुळेच जेव्हा माझं गाणं अधिक भावप्रधान होतं तेव्हा लोकांना वाटतं, की मी शास्त्रीय गात नाही.
मुद्दा आलाच आहे तर चित्रपटसंगीताबद्दल मला विशेष सांगायला आवडेल. या संगीताने आपल्याला खूप काही शिकवलं आहे. पण आपण ते कबूल करत नाही. आवाज किती चांगला असावा, तो कसा वेगवेगळा असावा, त्याची जात, पोत, नादगुण या सगळ्याबद्दलचा एक वेगळा विचार चित्रपटसंगीतात दिसतो. पातळ, जाड, भरदार अशा अनेक आवाजांतून वेगवेगळी गाणी आपल्यापुढे येतात. त्यातली विविधता आपल्याला भावते. आणखी त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे शब्दोच्चार! त्यांचे शब्द स्पष्ट असतात. ते कळतात. शास्त्रीय संगीत गाणाऱ्या किती गायकांचे शब्द आपल्याला कळतात, हा एक संशोधनाचाच मुद्दा आहे. आपल्या चित्रपटसंगीताने आपल्याला ‘इंडियन हार्मनी’ अर्थात भारतीय स्वरमेळ दिला.’’
भारतीय संगीताने आजवर अनेक मातब्बर कलाकार पाहिले. त्यांची कला समजून घेतली. संगीतामध्ये त्यानुसार बदल होत गेले. अनेकांनी आपल्या प्रतिभेने संगीत पुढे नेलेलं आहे. पण यापुढे काय, असा प्रश्न कायम पडतो. शास्त्रीय संगीतात पुढे काय होणार, या प्रश्नावर आपसूकच मुद्दा येतो- मग या गाण्याने बदलायला हवं का?
या सगळ्या मुद्दय़ांविषयी छेडल्यावर प्रभाताई म्हणतात, ‘‘शास्त्रीय संगीत अनेक लोकांना कळत नाही. याचं कारण ते त्यांना आवडत नाही. हे म्हणजे काहीतरी कठीण असाच काही ग्रह त्यांचा झालेला असतो. त्यामुळे मला कधी कधी वाटतं की, शाळेपासूनच संगीताचे संस्कार मुलांवर व्हायला हवेत. एकदा ते आवडायला लागलं, की पुढे जाऊन मुलांना नेमकं कळू शकेल आपल्याला एखादं संगीत आवडतं आहे का, समजतं आहे का? पण ही जाणीव येण्यासाठी आधी त्यांची त्याच्याशी ओळख तरी व्हायला हवी.
गाणं काही संपूर्ण बदलायला नको. पण त्यात वैविध्य आणण्यासाठी सर्व प्रकारचं संगीत आपण ऐकायला हवं. आज आपण जगातलं कोणतंही संगीत ऐकू शकतो. तेही आपलं संगीत ऐकू शकतात. ती सुविधा तंत्रज्ञानाने दिली आहे. पण आपण खरंच जाणीव ठेवून गाणं ऐकतो का? जगातलं संगीत ऐकण्याआधी आपलंच असलेलं कर्नाटकी संगीत किती जण ऐकतात? मन लावून, लक्ष देऊन अभ्यासपूर्ण पद्धतीने ऐकलं, तर प्रत्येक संगीतातलं माधुर्य, पद्धत सारं लक्षात येईल. संगीतामध्ये प्रबंध, धृपद धमार, ख्याल असे अनेक फॉर्मस् बदलत गेले. तर असा एखादा नवा आकृतिबंध आणि त्याहीपेक्षा नव्या दृष्टिकोनाची गरज आहे.
आज आपण हे लक्षात घ्यायला हवं की, रागाची संकल्पना अधिकाधिक विकसित होते आहे. ती शब्दांपासून स्वत:ला सोडवून घेते आहे. बंदिशीची लांबी कमी होतेय ती त्यामुळे. रागाला स्वत:चं अस्तित्व दाखवायचं आहे. तो त्या नियमांतून अधिक बाहेर येतोय.
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात ठोस ‘स्ट्रक्चर्ड’ नाही. कर्नाटकी संगीतात ते आहे. पण हेसुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की, ‘स्ट्रक्चर्ड’ नसणे हेच प्रतिभेला आव्हानात्मक असते असे नव्हे. नियम नसताना मोडण्यासाठी चौकटीच नसतात. पण नियम असताना त्या चौकटीपलीकडे जाऊन नावीन्य दाखवणं कठीण आहे आणि तेच अधिक आव्हानात्मक आहे. त्यामुळेच संगीत अधिक काळ टिकून राहण्यासाठी त्याकडे पाहण्याचा, समजून घेण्याचा दृष्टिकोन बदलण्याची खूप गरज आहे. मी कर्नाटकी संगीताचा म्हणूनच खूप अभ्यास केला. ते कुणाकडून शिकले नाही. अभ्यास करतच शिकले. आकाशवाणी मुंबई इथे काम करताना माझ्याकडे कर्नाटकी संगीताचा विभाग होता. त्या वेळी मी अनेक रेकॉर्डिग करून घेतली. त्या वेळी कर्नाटकी संगीतातील अनेक गायकांचं गाणं मी ऐकलं. त्यांचे गमक, स्वर म्हणण्याची पद्धत, स्वर हलवणं हे सारं सारं बारकाईने ऐकून मी त्याचा खूप अभ्यास केला. मग त्यावर काही पुस्तकं वाचली, सीडीज् ऐकल्या. यापुढच्या काळात अभिजात संगीतात हिंदुस्तानी आणि कर्नाटकी संगीताचं एक देखणं फ्युजन दिसेल आणि गाणं नक्कीच अधिक चांगलं होईल.’’
शास्त्रीय संगीताचा एक अविभाज्य भाग म्हणजे या संगीतातील विविध घराणी. त्यांचे नियम, त्यांच्या चौकटी. या साऱ्यांबद्दल जनमानसात अनेक आख्यायिका आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात नवीन घराणं निर्माण झालं नाही. जी आहे तीच टिकून राहिली. प्रभाताईंनी किराणा घराण्याची उज्ज्वल परंपरा जपताना वेगळे प्रयोगही केले. परंतु घराण्याच्या शिकवणुकीचा केंद्रबिंदू हलू दिला नाही. अशा वेळी या घराण्यांच्या परंपरेबद्दल प्रभाताईंकडून जाणून घेण्याची अनेकांची इच्छा होतीच. त्याबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रभाताई म्हणाल्या, ‘‘नक्कीच! सुरुवातीची शिकवण ही एका घराण्याच्या गुरूकडे निश्चित करायला हवी. पण आजकाल काय झालं आहे की, दोन-दोन दिवसांनी गुरू बदलतात. एक बंदिश शिकून लोक त्या गुरूचं नाव लावतात. तसं होऊ नये. एका घराण्याकडे सुरुवातीचे शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यावे. त्यानंतर मग तुम्ही तुम्हाला आवडेल, रुचेल ते करण्यासाठी मोकळे असाल. पण पाया कुठेतरी पक्का हवाच. घराण्याच्या नियमांच्या पलीकडे जायचं, तरीही आधी पाया पक्का हवा.’’
प्रभाताईंनी जुन्या सांगीतिक परंपरांचा अभ्यास केला आहे. ‘त्रिवट’, ‘चतुरंग’ यांसारख्या विस्मृतीत चाललेल्या प्रकारांचाही त्यांनी अभ्यास केला. या साऱ्या अभ्यासाविषयी त्या सांगतात, ‘‘आपली सांगीतिक परंपरा एवढी महान आहे. मग त्यातील जेवढय़ा जमेल तितक्या अंगांचा आपण अभ्यास करायला हवा, हे लक्षात घेऊनच मी अगदी आवडीने या साऱ्याचा अभ्यास करत गेले. ‘चतुरंग’ या संगीत प्रकारामध्ये बंदिशीचे चार भाग असतात. एकात तराण्याचे शब्द, एकात अर्थपूर्ण शब्द, एकात अर्थ नसलेले शब्द आणि एकात सरगम. स्वत:ला कळण्यासाठी चतुरंग रचलाही. माझ्या मते, जेव्हा हा प्रकार आला होता तेव्हा प्रत्येक कडव्यागणिक स्वरविस्तार व्हायला हवा होता. कदाचित तो झालाही असेल, पण परंपरेतून पुढे आला नाही. माझं असं म्हणणं आहे की, तराण्याचे बोल सुरू झाले की त्याच अंगाने त्याची वाढ झाली पाहिजे. ‘त्रिवट’मध्ये तबल्याचे बोल असतात. ते ऐकायला छान वाटतं, पण तेही बंदिशीपुरतंच मर्यादित असतं. असे निराळे प्रयोग करायला, संगीत आणखी समजून घ्यायला मला फार आवडतं. माझी ठुमरीही थोडी वेगळी आहे. त्याचीही एक गंमत आहे. एकदा पंढरपूरला एका परिचितांच्या शेतावर गेलो होतो. तिथे काम करणारा माणूस माझ्याकडे आला नि मला म्हणाला, ‘ताई, तुमची ‘कौन गली श्याम’ ही ठुमरी मला फार आवडते हो! त्यामध्ये ‘श्याम’ हा शब्द तुम्ही प्रत्येक वेळी किती वेगवेगळ्या पद्धतीने आणि किती छान म्हटलाय!’ त्याचं बोलणं ऐकून मी अवाक् झाले. हा किती बारकाईने ऐकतोय आपलं गाणं, असं वाटलं. आणि त्याच वेळी असा श्रोता मिळाल्याचा आनंदही झाला. ठुमरी, दादऱ्यामध्ये शब्द कसे उच्चारायचे, आवाज कसा लावायचा, स्वराकृती कशा बांधायच्या, हे सगळं फार महत्त्वाचं असतं. हे ख्यालापेक्षा वेगळं आहे. खरं तर प्रत्येक संगीतप्रकार वेगळा आहे. त्याचे संस्कार, सामग्री, पेशकश सारंच वेगळं असतं. ते कळायला हवं. रसिकांनाही ते कळायला हवं.
मी गाणाऱ्यांना आणि ऐकणाऱ्यांनाही सांगते- प्रत्येक गोष्ट करताना परंपरा म्हणा वा शास्त्र, ते तपासून घ्या. डोळे उघडे ठेवा. अनेकदा त्यात अनेक गोष्टी घुसडल्या जातात, त्या दूर करायला हव्यात. ‘स्वरमयी गुरुकुल’ या उपक्रमामध्ये मी तेच करण्याचा प्रयत्न करत असते.
कलेमध्ये जे गरजेचं असतं तेच टिकून राहतं. ज्याची गरज नसते ते कमी होत जातं. ख्यालामध्ये आता अभाव आणि संचारी कुणी फारशी गातच नाही. त्यात केवळ स्थायी आणि अंतरा असे दोनच प्रकार आता गायले जातात. कारण ख्यालामध्ये रागाचं महत्त्व सांगितलं जातं. मग केवळ राग मांडताना त्यातील शब्द गौण आहेत. तो सुरांच्या आधारे उत्तम अंगाने मांडला तरी चालतं. नुसत्या मुखडय़ावर तुम्हाला राग उभा करता येतो ना! अगोदर राग लक्षात ठेवण्यासाठी बंदिशीची गरज होती. रागाचं सौंदर्य वगैरे मांडायचं असेल तर शब्दांची नक्कीच गरज आहे. पण त्यासाठी भावगीतासारखे प्रकार आहेत. अर्थात, रागाचं महत्त्व मांडतानाही तुम्ही शब्दोच्चार उत्तम केलेत तर दुधात साखरच आहे. पण मूळ रागमांडणी, विस्ताराच्या सामग्रीत शब्द येत नाहीत. माझ्या बाबतीत सांगायचं, तर माझा रागाकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांना बंदिशीतून समजून सांगायचा होता. त्यामुळे मी स्वत:च्या बंदिशी करायला लागले. नव्या रागाची निर्मिती करणं मला थोडं सोपं वाटतं. कारण अनेक प्रकारचं संगीत ऐकत असतो. एखादी धून मनात रुजते आणि राग करता येतो.
आणखी एक गोष्ट मी जरूर सांगेन. आपल्याला येणारं शास्त्र आणि मैफिलीत मांडण्याची कला या दोन्ही गोष्टींत फरक आहे. शास्त्र नक्कीच चांगलं शिकून घ्यावं. पण रंगमंचावर बसल्यावर ते विसरावं. कारण संगीत ही कला आपण पेश करणार आहोत. शास्त्र शिकण्यासाठी असतं, मंचावर मांडण्यासाठी नाही. मंचावर शास्त्रातला आनंद, त्यातली सर्जनशीलता दाखवायची असते. दोन्ही करता आलं तर उत्तमच!
या सगळ्या गोष्टींत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला श्रोत्यांना सांगायला आवडेल. ती म्हणजे चांगल्या गायकाइतकाच चांगला श्रोताही असणं गरजेचं आहे. तानसेनासोबत कानसेन असतील तरच त्यात खरी मजा आहे. कदाचित श्रोत्यांनी संगीताचं शिक्षण घेतलेलं नसेल, त्यांना त्यातलं शास्त्र कळत नसेल, पण कोणता स्वर किती हललाय, त्याला कुणाचा स्पर्श झालाय अशा गोष्टी तर कळूच शकतात. त्यासाठी गरज आहे ती बारकाईने संगीत ऐकण्याची. अनेक चांगल्या कलाकारांनाही गाणं ऐकता येत नाही. कारण गाणं म्हणणं ही जशी कला आहे तशीच गाणं ऐकणं हीसुद्धा आहे. ती सगळ्यांनाच अवगत असते असं नाही. म्हणून मला वाटतं, श्रोत्यांनीही आम्हा कलाकारांसोबत चालायला हवं. अभ्यासू श्रोते असतील, तर आम्हालाही गाणं सादर करायला अधिक आनंद मिळेल. आम्ही कुठे चुकतोय तिथे हे जाणकार श्रोते अंकुश ठेवतील. या साऱ्यातून अंतिमत: आपलं संगीत, आपलं गाणं अधिक फुलत जाईल.’’