‘महारोगी सेवा समिती, वरोरा’ या संस्थेची ओळख समाजापुढे कुष्ठक्षेत्रात कार्यरत एक संस्था म्हणून न येता ‘आनंदवन’ या गावाच्या रूपाने आली याची अनेक कारणं आहेत. त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आरोग्य, शेती, पाणी, उद्योग, पर्यावरण या क्षेत्रांत निर्माण झालेल्या परस्परपूरक आणि सक्षम व्यवस्था. या व्यवस्था आनंदवनात निर्माण होऊ  शकल्या, कारण ‘महारोगी सेवा समिती, वरोरा’ हे नाव कायम संस्थेच्या कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यापुरतंच मर्यादित राहिलं. प्रत्येक क्षेत्रातली आव्हानं जसजशी पुढे येत गेली तसतशी त्यावर उत्तरं शोधत आनंदवनाची वाटचाल एक गाव म्हणून सुरू राहिली.

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपेक्षित घटकांना समान प्रतलावर आणणारा बाबा आमटेंचा प्रवास खूप जवळून बघत आणि अनुभवत होतो. माझ्यातला प्रयोगशील माणूस घडला तो यातनंच. प्रयोगांना बाबांचा विरोध असे तो केवळ समाजाचा पैसा अकारण वाया जाऊ  नये, या भूमिकेतूनच. त्यामुळे या प्रयोगांकडे एक दक्ष व्यक्ती म्हणून बारीक लक्ष ठेवतानाच प्रयोगांची वाटचाल सुलभ कशी होईल यासाठीही बाबा प्रयत्नशील असत. अर्थात हे सर्व आमच्या अपरोक्ष घडत असलं तरी बाबांचा अदृश्य सहभाग पदोपदी जाणवत असे. शक्यतो स्थानिक पातळीवर उपलब्ध साधनांचा वापर करून आणि त्याला योग्य तंत्रज्ञानाची जोड देत आम्ही आनंदवनात विविध क्षेत्रांत प्रयोग केले आणि चुका करत, त्यातून शिकत यशस्वीतेची पायरी गाठली. क्षेत्र कुठलंही असो; कमीत कमी खर्चात उत्तम दर्जाचं, टिकाऊ  उत्पादन कसं घेता येईल यावर आमचा सतत भर असे.

Cylinder explosion on a handcart in front of Shivajinagar court pune news
शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाडीवर सिलिंडरचा स्फोट; तीनजण किरकोळ भाजून जखमी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
nashik municipal corporation taken steps towards making water from borewells available in certain locations
नाशिक शहरात विंधन विहिरींतील पाण्याचा पर्याय; टंचाई निवारणार्थ महापालिकेची व्यवस्था
Graded Response Action Plan project to monitor air pollution Pune news
पिंपरी: हवा प्रदूषणावर आता ‘ग्रॅप’ची नजर; प्रदूषण करणारे उद्योग…
white onion Alibaug, Raigad, white onion,
रायगड : अलिबागच्या पांढऱ्या कांद्याच्या कक्षा रुंदावणार, एक हजार हेक्टरवर पांढऱ्या कांद्याच्या लागवडीचे उद्दिष्ट
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
amazon smbhav 2024 nitin gadkari
देशातील वाहतूक खर्च निम्म्यावर आणणार – नितीन गडकरी
Sale of fake oil Bhiwandi, fake oil Bhiwandi,
ठाणे : ब्रँडचे नाव वापरून बनावट तेलाची विक्री

स्वयंपाकाच्या इंधनासाठी आमचे सर्वच प्रकल्प लाकडं आणि दगडी कोळसा यावर अवलंबून होते. मानवी उपयोगासाठी निसर्गसंपत्तीचं मोठय़ा प्रमाणावर ज्वलन होताना पाहून आमची मनंही जळत. पण अपरिहार्यता होती. यावर काय उपाय करावा, असा विचार करताना लक्षात आलं की, आनंदवनात रोजघडीला मोठय़ा प्रमाणात निर्माण होणारं शेण, मलमूत्र यांचा वापर करून बायोगॅसच्या माध्यमातून इंधनाची निर्मिती करता येऊ  शकेल. मग मी बायोगॅसच्या प्रकल्पांविषयी माहिती घेतली, डिझाइन ठरवलं आणि १९७८ मध्ये आनंदवनातील मुख्य भोजनगृहास इंधन पुरवणारा, पत्र्याचं वर्तुळाकार छत असलेला भारतीय पद्धतीचा बायोगॅस आमचा आम्हीच बांधून काढला. त्यानंतर अर्धवर्तुळाकार छत असलेले चायनीज पद्धतीचे बायोगॅसही आम्ही बांधून काढले. रोजच्या रोज चुलीवर हजारेक लोकांचा स्वयंपाक करताना प्रचंड धुराने गांजलेल्या आमच्या मावश्यांचे ढेर सारे आशीर्वाद आम्हाला या निर्धूर इंधनामुळे मिळाले! आमच्या सर्व प्रकल्पांत प्रत्येक सामुदायिक स्वयंपाकघरामध्ये बायोगॅस होता. पुढे ऐंशीच्या दशकापासून बायोगॅससोबत आम्ही काही प्रमाणात एलपीजीचा वापरही सुरू केला. पुढे कालांतराने लाकूड आणि दगडी कोळशाचा वापर पूर्णत: थांबला.

सत्तरच्या दशकाच्या शेवटापर्यंत आनंदवन आणि सोमनाथमध्ये ज्या कम्युन्स आणि इतर बांधकामं उभी राहिली ती सगळी कौलारू स्वरूपाची होती. त्यामुळे यासाठी लाकूडफाटा प्रचंड लागत असे. अर्थात ते सिमेंट-काँक्रीटपेक्षा परवडू शकणारं असल्याने बाबांपुढे दुसरा पर्यायही नव्हता. पण ही निवासस्थानं कुष्ठरुग्णांच्या संवेदनाहीन हातापायांना चावा घेण्यास चटावलेल्या उंदरांना लपण्यासाठी अगदी सोयीची होती. त्यामुळे हा प्रश्न कसा मार्गी लावावा, या विवंचनेत मी होतो. उंदरांना लपायला जागाच मिळू नये असं घर कुणी बांधलंय का, याची शोधाशोध करत असताना अचानक एक दिवस माझ्या डोक्यात प्रकाश पडला की, घराचं छत जर चायनीज पद्धतीचं बायोगॅसचं असतं तसं अर्धवर्तुळाकार असेल तर उंदीर लपणार कुठे? मग या दिशेने शोधाशोध सुरू केली असता मला मध्यपूर्व आफ्रिकेतील अर्धवर्तुळाकार छत असलेल्या घरांबद्दल कळलं. इजिप्तचे आर्किटेक्ट हसन फाथी यांनी तिथल्या घरबांधणीतील पारंपरिक पद्धतीत सुधारणा करत अर्धवर्तुळाकार छताची मातीची घरं वसवली. विशेष म्हणजे ‘न्युबीयन व्हॉल्ट’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या घरांच्या बांधकामात लोखंड किंवा लाकूड अजिबात आवश्यक नसल्याने ही घरं स्वस्त आणि मस्त होती. या बांधकाम तंत्राचा अभ्यास करताना मी घरबांधणीचं पारंपरिक ज्ञान वापरण्यासाठी प्रसिद्ध असलेले स्थापत्यविशारद लॉरी बेकर आणि बकमिन्स्टर फुलर यांचे प्रयोगही अभ्यासले. भारतात असे प्रयोग करणारे औरंगाबादचे बांधकाम व्यावसायिक माजीद जमाल यांचंही अमूल्य मार्गदर्शन मला मिळालं. आमचा प्रयोग सुरू झाला. सम प्रमाणात माती आणि रेती घेतली. त्यात फक्त पाच टक्के सिमेंट मिसळलं. सिमेंट ब्लॉक्स पाडण्याच्या मशीनमधून विटा पाडल्या. दोन आठवडे भिजवून त्या वाळू घातल्या. मग भीतभीतच मातीच्या या विटांची चाचणी घेतली. पण आश्चर्य म्हणजे त्या एवढय़ा पक्क्या झाल्या, की पार खाली आपटूनही तुटत नव्हत्या! मग काय, अशा विटांची रासच तयार झाली. गिरीधर आणि चंद्रमणी महाराणा यांच्या टीमने मी दिलेलं घराचं डिझाइन अभ्यासलं आणि महिनाभरात अर्धवर्तुळाकार छत असलेलं (अर्ध्या कापलेल्या बॅरलच्या आकाराचं), वीस फूट लांब, दहा फूट रुंद घर तयार झालं. पुढे या विटांसाठीच्या मसाल्यात आम्ही फ्लाय अ‍ॅशचाही वापर केला. सुरुवातीला छत उभारणीचा जो कालावधी महिनाभराचा होता, तो नंतर फक्त तीन तासांवर आला! याचं कारण छतात वापरल्या जाणाऱ्या विटा ‘हेरिंग बोन बाँड’ पद्धतीने (म्हणजे हृदयावरील बायपास शस्त्रक्रियेनंतर छातीच्या पिंजऱ्याला जसे टाके घालतात तसे) जोडलेल्या असत. कुठे ते २१ दिवसांचं फउउ घरांचं सेंटरिंग आणि कुठे आमचं ‘आनंदवन मेड’ कोलॅप्सिबल लोखंडी शटरिंग वापरून फक्त तीन तासांत तयार होणारं सेंटरिंग! या घराचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे याचं छत उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात गरम असतं. प्रयोग यशस्वी झाला तसं आम्ही ६४ घरांचं ‘मित्रांगण’ हे कम्यूनच बांधून काढलं. सोमनाथ आणि लोक-बिरादरीतही अशा घरांचं बांधकाम करून आम्ही कम्यून्स बांधून काढल्या. घरबांधणीत आमचे प्रयोग सुरूच राहिले. पुढे लाकूड, लोखंड तर सोडाच; छताच्या सेंटरिंगसाठी आवश्यक शटरिंगही न वापरता बांधल्या जाणाऱ्या घराबद्दलचं ज्ञान आमचे कुष्ठमुक्त बांधकाम अभियंते राजप्पा, दामू आणि दत्तू यांनी दिल्लीचे आर्किटेक्ट जे. डी. जेठी यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसात केलं. अशी सात ‘सेंटरिंग-फ्री’ घरं आज आनंदवनात आहेत.

गुजरातचे कालिदास पटेल आणि विठूभाई पटेल ही ‘सामाजिक वनीकरण’ क्षेत्रातली दादा माणसं. त्यांनी गुजरातमध्ये ‘मल्टिटियर सिल्व्हिपाश्चरल सिस्टीम’च्या माध्यमातून- म्हणजे जागेची उपलब्धता नसताना कमी जागेत नाना प्रकारच्या वनस्पतींची लागवड करून जैवविविधतेने परिपूर्ण अशी जंगलं निर्माण केली होती. त्याबद्दल माहिती घेऊन मी असंच जंगल आनंदवनात तयार करण्याचं ठरवलं. आनंद निकेतन महाविद्यालयात बॉटनीला शिकवणारे प्रा. विश्वास काळपांडे माझे मित्र आणि गुरुजीही. जैवविविधतेबद्दल असलेल्या समान आवडीतून आम्ही आनंदवनात १९८५ साली सुबाभूळ, सिसम, कडुनिंब, आपटा, शिरीष, अंजन, बांबू अशा नाना जाती-प्रजातींची एक हेक्टरमध्ये लागवड केली. आमचा ‘ग्रीन थम्ब’ महम्मद अरबने ही परिसंस्था वसवली होती. याच सुमारास ‘Rehabilitation of Mines’- म्हणजे खाणींच्या पुनर्वसनाबाबतीतला ‘रीडर्स डायजेस्ट’मध्ये प्रकाशित एक लेख माझ्या वाचनात आला. तो वाचून मी वेडाच झालो. रेने हलर नावाच्या स्विस निसर्गतज्ज्ञाने केनियातल्या मोंबासाजवळील चुनखडीच्या उघडय़ाबोडक्या खाणींमध्ये स्थानिक प्रजातींची दहा लाखांहून जास्त झाडं लावली व जगवली होती आणि त्यातून किडे, पक्षी, माकडं व इतर प्राण्यांचं वास्तव्य असलेलं घनदाट जंगलच तयार झालं होतं. खाणींच्या पुनर्वसनाचा किडा तेव्हापासूनच माझ्या डोक्यात वळवळत होता. निमित्त झालं- आनंदवनालगत असलेल्या स्टोन क्रशर्सच्या उघडय़ा खाणींचं. या जागेच्या दुरवस्थेचं रूपांतर सगळ्यात सुंदर जागेत करायचं असं मी ठरवलं. प्रा. काळपांडे, महम्मद सोबत होतेच. टाटा ट्रस्टकडून नुकत्याच मिळालेल्या एक्स्कॅव्हेटरद्वारे तलाव खोल करणं सुरू होतं. त्याच मटेरिअलने हे भलेमोठे खड्डे भरायचे असं ठरलं. खड्डे भरतोच आहोत तर विटांमध्ये चिरडतो तसा टाकाऊ  प्लास्टिकचा भस्मासुरही यात चिरडून टाकू म्हणून आधी खड्डय़ांमध्ये प्लास्टिक टाकलं आणि वर माती टाकून हे खड्डे बुजवले. सुरुवातीला आम्ही इथे सुबाभूळीचं ‘हाय डेन्सिटी प्लान्टेशन’ केलं; ज्याचं प्रचंड मोठं उत्पन्न आम्हाला विक्रीतून मिळालं. १९९७ मध्ये ही जागा आमचा कार्यकर्ता सुधाकर कडूने ताब्यात घेतली आणि आनंदवनातील अंध, अपंग, कर्णबधिर मुलांना हाताशी घेत विविध प्रजातींच्या फळाफुलांच्या झाडांची मोठय़ा प्रमाणावर लागवड केली. या जागेत एक्स्कॅव्हेटरने दोन तलावही खोदून घेतले. सुधाकर आणि या मुलांच्या कष्टांतून निर्माण झालेलं हे ‘अभयारण्य’ आज आनंदवनातील सर्वात सुंदर जागा आहे.

एखाद्या गोष्टीचा वापर करू नका, एखादी गोष्ट खाऊ  नका, कारण ती हानीकारक आहे, हे सांगणं आपल्याकडे लागू पडत नाही. मग ते प्लास्टिक असो की तंबाखू! या प्लास्टिकमुळे काय काय हानी झाली हे आपण पाहिलं आहे, अनुभवलं आहे. टाकाऊ  प्लास्टिकचं म्हणायचं तर याला भस्मासुराची उपमा देणंही मिळमिळीत वाटावं इतकं ते हानीकारक. नव्वदच्या दशकाच्या सुमारास आपल्या देशात कापडी पिशव्या जाऊन प्लास्टिकच्या पिशव्यांचा संचार वाढू लागला. ‘उँचे लोग.. उँची पसंद’वाला गुटखा जसा समाजाच्या शारीरिक स्वास्थ्याला पोखरू लागला, तशाच त्याच्या रिकाम्या प्लास्टिक पुडय़ा पर्यावरणास पोखरू लागल्या. जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी फक्त हे टाकाऊ  प्लास्टिक दिसू लागलं. बरं, याचं आयुष्यही किमान ६०० र्वष! जाळून जळतही नाही. मग आपल्या हयातीत आपण आपल्या स्तरावर याचं काय करू शकतो, तर फक्त ‘Reuse’ हे माझ्या लक्षात आलं. खाणीमध्ये आम्ही याला चिरडलं होतंच. आणखी काय करता येईल, हा विचार करताना एकदा चुकून माझ्या ऑफिसमधल्या पेपर श्रेडर मशीनमध्ये प्लास्टिकची पिशवी घुसली. खाली डब्यात पाहिलं तर छान बारीक झालेलं मऊसर प्लास्टिक बाहेर पडलं होतं. मग डोक्यात एक विचार आला. मी अजून पाच-सहा पिशव्या त्या मशीनमध्ये घातल्या आणि बाहेर आलेलं बारीक झालेलं प्लास्टिक एका पाकिटात भरून घेतलं. दुसऱ्या दिवशी मी अशोक बोलगुंडेवर आणि गजानन वसूला बोलावलं. जसं आनंदवनातील पाण्याचं ड्रायव्हिंग व्हील अशोककडे आहे, तसं प्रयोगांचं गजाननकडे. कुष्ठरोगामुळे नातेवाईकांकडून घरातनं बेदखल झालेला विशीतला गजानन सत्तरच्या दशकात आनंदवनात आला तेव्हा रोगापेक्षा तो मनाने जास्त हलला होता. उपचार घेऊन बरा झाल्यानंतर मात्र गजाननने मागे वळून पाहिलं नाही. आधी सुधाकरसोबत सतरंजी, मग दिलीपच्या मार्गदर्शनाखाली हातमाग-यंत्रमाग शिकून त्याने कौशल्य प्राप्त केलं. काही काळ त्याने आनंदवन पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमन म्हणूनही काम केलं. गजानन जेमतेम चौथी की सातवी शिकलेला. पण त्याची ग्रहणक्षमता, कामाचा वेग आणि दिलेली  जबाबदारी पूर्ण करण्याची जिद्द मी हेरली होती. ‘Always On’ असणाऱ्या गजाननच्या डिक्शनरीत ‘नाही’ हा शब्दच नव्हता! बारीक झालेल्या प्लास्टिकच्या बाबतीत गजाननची विचारचकंर जोराने फिरू लागली. वरोरा गावात त्याने आनंदवनातल्या शाळांतील पोरांना सोबत घेत ‘प्लास्टिक हटाव’ रॅली काढली आणि घंटागाडीवर चांगला ढीगभर प्लास्टिक कचरा गोळा करून आनंदवनात आणला. त्यानंतर आनंदवनात प्लास्टिकचा ओघच सुरू झाला. प्लास्टिक स्वच्छ करून त्याचं वर्गीकरण कर, मग हे प्लास्टिक कापसाच्या मशीनमध्ये पिंजून काढ, बांधकामाच्या पायात घाल, वगैरे प्रयोग सुरू झाले. दरम्यान, प्लास्टिक उत्तमरीत्या बारीक करू शकणाऱ्या इंडस्ट्रिअल श्रेडिंग मशीनचा आम्हाला शोध लागला. त्यातनं बाहेर येणारं प्लास्टिक खूपच फाइन होतं. हे प्लास्टिक आम्ही विटांमध्ये वापरलं, पॉलिएस्टर फायबर वेस्टसोबत गाद्या-उशांमध्ये वापरलं आणि रस्त्यांमधले खड्डे भरण्यासही वापरलं! पुढे आनंदवनातील पुनर्वसित दृष्टीअधू, अपंग, कर्णबधिर पोरांना सोबत घेत गजाननने ‘लँड आर्मी’ बांधली. गजाननने ‘लँड आर्मी’च्या साथीने यशस्वी केलेल्या प्रयोगांचा कळस म्हणजे आमचे ‘टायर-प्लास्टिक-काँक्रीट’ बंधारे! सिमेंट, वाळू आणि लोखंडी सळ्यांसोबत बारीक केलेलं प्लास्टिक आणि वाहनांचे जुने टायर्स वापरून गजाननने आमच्या प्रकल्पांच्या परिसरात आणि बाहेर असे ‘नॉन-थर्मल’, ‘नॉन-केमिकल’ सहा बंधारे उभे केले! यातला सर्वात लांब १४० फुटी बंधारा सोमनाथला आहे.

सध्या गजाननची यशोगाथा ‘आनंदवन डेअरी’पर्यंत येऊन स्थिरावली आहे. २००९ साली आमच्या डेअरीचं उत्पादन ४०-५० लिटर प्रतिदिन एवढं खाली आलं होतं. पण नुसत्या गाई-म्हशींची संख्या वाढवून दुग्धोत्पादन वाढणार नाही; त्यांना अधिक प्रथिने देणाऱ्या गवताचा चारा मिळाला पाहिजे याची मला जाणीव होती. तसंही शेताच्या बांधावरचं तणकट मला खुपायचं. मी गजाननकडे विषय छेडला आणि म्हणालो, ‘एवढा चारा लाव की तणकट दिसायलाच नको.’ त्याने हे आव्हानही स्वीकारलं. झाशीच्या गवत व चारा संशोधन संस्थेकडून, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांतून उच्च प्रथिने देणाऱ्या गवतांच्या जाती आणून त्याने पंचवीस एकरांवर चाराशेती उभी केली. हळूहळू गाई-म्हशींची संख्या वाढवत नेली आणि केवळ तीन वर्षांतच- म्हणजे २०१२ साली ‘आनंदवन डेअरी’चं रोजचं उत्पादन वाढून १००० लिटर्स प्रतिदिन एवढं झालं! अव्वल दर्जाची हमी असलेलं हे दूध साठ रुपये लिटर एवढा भाव असूनही वरोरा परिसरातील लोक रांगा लावून विकत घेऊ  लागले. शिवाय तूप, लोणी, दही, पनीर अशा पदार्थानाही प्रचंड मागणी येऊ  लागली. गजानन आणि त्याच्या ‘लँड आर्मी’ची ही प्रयोगगाथा शब्दांमध्ये मावणारी नाही. खरं तर प्रत्येकाने ती आनंदवन डेअरीच्या माध्यमातून दोन कोटींची वार्षिक उलाढाल करणाऱ्या गजाननच्या तोंडूनच अनुभवायला हवी!

या सगळ्या प्रयोगांचं रूपांतर व्यवस्थांमध्ये होण्यात गजाननसारख्या अनेक किमयागारांचे अफाट कष्ट कारणीभूत ठरले. समाजाने नाकारलेल्या या माणसांनी सामूहिक प्रयत्नांतून आनंदवनात एक बळकट आणि स्थिर अर्थव्यवस्था निर्माण  केली. बाबांनाही हेच तर अपेक्षित होतं!

– विकास आमटे

vikasamte@gmail.com

Story img Loader