|| मीना गोखले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

परंपरेचा स्वीकार करून नवतेच्या दिशा शोधणारे ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कवी, विचारक गो. वि. अर्थात विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दीची सांगता २३ ऑगस्ट रोजी होत आहे. त्यानिमित्ताने विंदांच्या विविधांगी प्रतिभाशक्तीचा वेध..

८ जानेवारी २००६ या दिवशी कविवर्य विंदा करंदीकरांना साहित्यासाठी दिला जाणारा राष्ट्रीय स्तरावरचा सर्वोच्च बहुमान अर्थात ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. त्याने अवघा मराठी आसमंत आनंदाने भरून गेला होता. तशाच उत्साहाने २०१७-२०१८ हे करंदीकरांचे जन्मशताब्दी वर्षही साहित्य संस्था, प्रसार माध्यमे आणि करंदीकरप्रेमी रसिक या सर्वानीच विविध कार्यक्रम व उपक्रम आयोजित करून साजरे केले. येत्या २३ ऑगस्टला करंदीकरांच्या जन्मशताब्दीची सांगता होत आहे. जीवनाच्या समग्रतेचा वेध घेणाऱ्या या प्रतिभावंताच्या कर्तृत्वाचे यानिमित्ताने कृतज्ञतापूर्वक स्मरण करणे औचित्यपूर्ण ठरेल.

करंदीकरांच्या निर्मितीचा आवाका अत्यंत मोठा आहे. कवी, लघुनिबंधकार, भाषांतरकार, समीक्षक आणि विचारवंत अशा विविध नात्यांनी त्यांची कामगिरी मौलिक स्वरूपाची आहे. त्यांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व व्युत्पन्न, बहुश्रुत आणि अनेकविध संस्कारांनी संपन्न आहे. ‘परंपरे’चा स्वीकार करून ‘नवते’च्या दिशा शोधणे, हा करंदीकरांच्या जाणिवेचा स्वभाव आहे. महान साहित्याच्या प्रभावातून वाङ्मयाची अत्यंत व्यापक जाणीव त्यांच्यात निर्माण झाली. शेक्सपिअर, टॉलस्टॉय, दोस्तोव्हस्की, जेम्स जॉइस, हॉपकिन्स, ब्राऊनिंग, टी. एस्. एलियट या पाश्चात्त्य साहित्यिकांना त्यांनी मौलिक मानले. केशवसुत, माधव ज्युलियन आणि बा. सी. मर्ढेकर हे त्यांच्यावर परिणाम करणारे महत्त्वाचे मराठी कवी. ‘महाभारत’ हा त्यांना वाङ्मयीन श्रेष्ठतेचा मानदंड वाटतो. ते म्हणतात, ‘महाभारताच्या तुलनेत पाश्चात्त्य महाकाव्यं ही केवळ चांगली दीर्घकाव्यं ठरतात. प्रत्येकाला स्वतंत्र वैशिष्टय़ं आहेत, पण महाभारताची परिमाणं कोणालाच नाहीत. महाभारत सातव्या वर्षांपासून सत्तराव्या वर्षांपर्यंत कधीही वाचा, त्यातलं काही ना काही कायमचं देऊन जातं. होमर, दान्ते, मिल्टन- कुणीही हे करू शकत नाही. कुणीही जीवनाचं इतकं व्यापक, सखोल आणि संमिश्र दर्शन अजून घडवलेलं नाही. व्यासांशी लगट करणारे होमर, दान्ते, मिल्टन हे नाहीत, तर शेक्सपिअर, टॉलस्टॉय आणि दोस्तोव्हस्की हे आहेत.’ (विजया राजाध्यक्ष यांच्या ‘बहुपेडी विंदा’ खंड- १ मधील करंदीकरांच्या मुलाखतीमधून.) या साहित्यिक संस्कारांबरोबरच वेगवेगळ्या विचारप्रणाली (प्रबोधनाचा उदार मानवतावाद, ईहवाद, मार्क्‍सवाद), अनेक विचारवंत आणि तत्त्वज्ञ (फ्रॉइड, रसेल), प्राचीन पाश्चात्त्य (विशेषत: ग्रीक) तत्त्वज्ञान आणि प्राचीन भारतीय दर्शने यांचाही त्यांच्यावर प्रभाव असलेला दिसून येतो.

करंदीकरांची रसिकांच्या मनातील मुख्य प्रतिमा ‘कवी विंदा’ अशी आहे. त्यांच्या ‘स्वेदगंगा’ , ‘मृद्गंध’, ‘धृपद’, ‘जातक’, ‘विरूपिका’ आणि ‘अष्टदर्शने’ या सहा कवितासंग्रहांत मिळून साडेचारशेच्या आसपास कविता समाविष्ट आहेत. करंदीकरांच्या प्रारंभीच्या अनेक कवितांवर मार्क्‍सवादाचा निश्चित स्वरूपाचा संस्कार झालेला आहे. ‘स्वेदगंगा’, ‘मुंबई’, ‘लोकशक्ति ही’, ‘विश्वरूप’, ‘मजूर’ इत्यादी कवितांमध्ये वक्तृत्वपूर्णता आहे. ‘माझ्या मना, बन दगड’, ‘ती जनता अमर आहे!’, ‘दातापासून दाताकडे’ या करंदीकरांच्या प्रसिद्ध आणि परिणामकारक कविता आहेत. नंतरच्या काळात विचारप्रणालींच्या मर्यादा जाणवल्यावर  (‘दंतकथा’सारखी कविता) समाजातील सामान्य माणसाविषयीची, उपेक्षितांविषयीची त्यांची आस्था आणि त्यांच्या चांगुलपणाविषयीचा त्यांचा विश्वास कधीही क्षीण झालेला दिसत नाही. तसेच प्रस्थापित व्यवस्थेचे समर्थन वा पूर्वपरंपरेचा गौरवही त्यांनी केलेला नाही. सामाजिक अन्याय, शोषण, सामाजिक विषमता आणि विसंगती इत्यादींना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे विरोध करणाऱ्या पुरोगामी जाणिवांचा आविष्कार करंदीकरांच्या कवितेत अखेपर्यंत पाहावयास मिळतो. हे त्यांच्या सामाजिक जाणिवेचे वैशिष्टय़ आहे. उदा. ‘विरूपिका’मधील ‘२८ जानेवारी १९८०’ ही कविता-

‘आज आर. के. लक्ष्मणने लिहिली

आधुनिक भारताची सर्वश्रेष्ठ विद्रोही कविता

अर्धी रेषांत, अर्धी शब्दांत :

‘‘नगरपालिकेने स्वच्छतेपोटी

कचऱ्याचे ढीग इथून हालवले

तर आम्ही भुकेने मरू..’’

आजचा दिवस मला साजरा करू दे’

त्याचबरोबर ‘निर्वाणीचे गझल’ (१९९९) यातही समकालीन जीवनावर भाष्य आहे, आशावादी दृष्टिकोन आहे.

करंदीकरांच्या कवितेतील प्रेमविषयक आणि स्त्रीविषयक जाणिवेच्या संदर्भात ‘रक्तसमाधि’, ‘त्रिवेणी’, ‘मुक्तीमधलें मोल हरवलें’, ‘सनातनी’, ‘संहिता’, ‘रूपक’, ‘दादरा’, ‘दीपचंदी’ ही तालचित्रे, ‘झपताल’, ‘भारतीय कविता’, ‘स्त्रियांसाठी स्थानगीत’ या कविता वैशिष्टय़पूर्ण आहेत. ‘सरोज नवानगरवाली’, ‘बकी’, ‘मथूआत्ते’, ‘कावेरी डोंगरे’ ही व्यक्तिचित्रेही प्रत्ययकारी आहेत.

करंदीकरांच्या बालकवितांचे अकरा संग्रह आहेत. पारंपरिक बालगीतांपेक्षा ही कविता वेगळी, अनोखी आहे. त्यात आघातयुक्त छंदांचा वापर असून, नाद आणि अर्थ यांची गंमतशीर गुंफण केली आहे. बालकांच्या भावविश्वाशी समरसता, नावीन्यपूर्ण कल्पनाशक्ती यांच्यासोबतच अभिजात आणि प्रसन्न विनोद, मिस्कीलपणा या बालकवितांत आढळतो. टोक न मोडण्याचा, पडसे न येण्याचा, सुटी न मिळण्याचा, पतंग गुल करण्याचा असे विविध मंत्र मुलांना आकर्षित करणारे आहेत.

‘स्पर्शाची पालवी’ आणि ‘आकाशाचा अर्थ’ हे करंदीकरांचे लघुनिबंधसंग्रहही एकसाची नाहीत. नवकविता आणि नवकथा यांच्याशी नाते सांगणारे हे ‘नवलघुनिबंध’ आहेत. व्रतकथांचा घाट, स्वैर आठवणी, ठाशीव युक्तिवाद आणि काव्यात्म लय असे शैलीचे विविध नमुने त्यात आहेत. सामान्याशी सहभाव हे करंदीकरांचे वैशिष्टय़ इथेही आहे. ‘आकाशाचा अर्थ’, ‘आम्रयोग’, ‘स्पर्शाची पालवी’, ‘सुखी होण्याचा हक्क’, ‘पुरुष आणि पिशव्या’ असे विविधतापूर्ण, चैतन्यदायी लघुनिबंध करंदीकरांनी लिहिले आहेत.

जीवनाकडे आणि काव्याकडे पाहण्याचा खुला, बहुतत्त्ववादी दृष्टिकोन हे करंदीकरांचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. मानवी जीवन हे कोणत्याही एका सिद्धान्ताच्या चिमटय़ात पकडता येत नाही; प्रत्येक सिद्धान्तातील सत्यांश आणि मिथ्यांश उघड करीत जाणे हा जीवनातील गतिशील प्रवाहाचा स्वभावधर्म आहे अशी त्यांची धारणा आहे. काव्याने जीवनाशी समकक्ष होण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जीवनातील अंगभूत विविधतेचा व व्यामिश्रतेचा वेध घेतला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. हा खुला दृष्टिकोन निरनिराळ्या प्रकारचे अनुभव, शैली, घाट, परंपरा आणि प्रयोग यांचा साक्षेपी शोध घेतो. हा दृष्टिकोन स्वीकारणाऱ्याच्या निर्मितीत कलावंताच्या मूलभूत स्वातंत्र्याची आपोआपच जपणूक होत असते. मानवी जीवनाविषयीच्या मूल्यांचा आणि विश्वाविषयीच्या सत्यांचा शोध हा कधीही न संपणारा असा प्रवास आहे असे करंदीकर मानतात. या दृष्टिकोनामुळे बौद्धिकता आणि भावनात्मकता, व्यक्ती आणि समाज, मानवतावाद, साम्यवाद आणि आधुनिकवाद, जुने आणि नवे, एकीकडे ईहनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, इंद्रियनिष्ठा, तर दुसरीकडे अतीताची ओढ आणि अतींद्रियता अशा अनेक द्वंद्वांना, ताणांना सामावून घेत करंदीकरांची वाटचाल झालेली दिसून येते. ‘मार्क्‍सवाद आणि गांधीवाद, रसेलचा संशयवाद आणि भारतीय गूढवाद यांच्या प्रभावामुळे माझ्या काव्यातील विचारांना आंतरविरोध निर्माण झाले आहेत,’ असे विधान स्वत: करंदीकरांनीच केले आहे. या विशेषामुळे त्यांच्या निर्मितीला व्यामिश्रता प्राप्त झाली आहे, समग्र जीवनशोधाचे परिमाण लाभले आहे. समाज, प्रेम, अध्यात्म, निसर्ग, काव्य, स्त्रीदर्शन अशा अनेक संदर्भातील जाणिवा करंदीकरांची कविता व्यक्त करीत असल्यामुळे तिच्यात आशयसूत्रांची विविधता आली आहे. तसेच अभंग, मुक्त सुनीत, गझल, तालचित्रे, सूक्ते, विरूपिका असे विविध आकृतिबंधही करंदीकरांनी योजले आहेत. कसलाही साचा पुढे न ठेवता जाणिवेचा मुक्त शोध घेत जाणारी करंदीकरांची कविता ही मराठी कवितेच्या विकासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरली आहे. करंदीकरांनी मर्ढेकरोत्तर कवितेला अनेकविध आयाम आणि परिमाणे दिली हे त्यांचे महत्त्वाचे श्रेय होय.

‘अ‍ॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्र’ आणि ‘राजा लिअर’ या करंदीकरांच्या भाषांतरित ग्रंथांमागे जगातील मौलिक ग्रंथ मराठीत आणून मराठीला  समृद्ध करणे आणि उच्च शिक्षणाचे माध्यम होण्याचे तिचे सामथ्र्य वाढवणे ही कर्तव्यनिष्ठ प्रेरणा होती. ‘ज्ञानदेवविरचित अनुभवामृताचे विंदाकृत अर्वाचिनीकरण : संत ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव’ हा करंदीकरांनी केलेला एक अभिनव प्रयोग आहे. ‘अहो ज्ञानेश्वर’ या शीर्षकाची या थाची प्रस्तावना अप्रतिम आहे. अमृतानुभवाकडे त्यांनी आध्यात्मिक आत्मचरित्र आणि पृथगात्म, अव्वल दर्जाचे तत्त्वकाव्य या दृष्टिकोनातून पाहिले आहे.

‘अर्वाचिनीकरण’ करताना भारतीय तत्त्वज्ञानातील मुख्य प्रवाहाशी करंदीकरांचा परिचय झाला. त्याआधी इंग्रजी वाङ्मयाचा व्यासंग करताना बेकनपासून रसेलपर्यंतच्या अनेक थोर इंग्लिश तत्त्वज्ञांच्या विचारांशी त्यांचा परिचय झालेला होताच. देकार्त, स्पिनोझा, काण्ट, हेगेल, शोपेनहौएर, नित्शे, बर्गसाँ या सात युरोपीय / पाश्चात्त्य आणि चार्वाक या भारतीय तत्त्वज्ञाबद्दल करंदीकरांना फार कुतूहल होते. त्यांची दर्शने समजून घेण्याच्या प्रयत्नातून आणि मराठी वाचकांना त्यांची ओळख करून देण्याच्या हेतूने ‘अष्टदर्शने’ हे अभंगात्मक पुस्तक सिद्ध झाले.

कवी-समीक्षक असणाऱ्या करंदीकरांनी मराठी समीक्षेला एका नव्या कलाविषयक वर्गीकरणाचे देणे दिले. कलांची तोवर प्रचलित असलेली वर्गीकरणे टाळून त्यांनी कलांचे ‘जीवनवेधी’, ‘रूपवेधी’ आणि ‘व्यवहारवेधी’ असे नवे वर्गीकरण मांडले. त्यांच्या समग्र समीक्षेला या वर्गीकरणाचा सतत संदर्भ राहिला. साहित्यकृतीतील ‘कल्पनाप्राप्त’ (कल्पित) जीवनदर्शनाच्या संबंधात साहित्याची व्याप्ती आणि खोली हे दोन महत्त्वाचे निकष असल्याचे त्यांनी वेगवेगळ्या संदर्भात सांगितले. करंदीकरांचे तात्त्विक समीक्षेच्या क्षेत्रातील आणखी एक कार्य असे की- त्यांनी परंपरा आणि नवता, लौकिक आणि वाङ्मयीन व्यक्तित्व, सामाजिक जाणीव, विशुद्ध कविता, बालकविता, दुबरेधता, वाङ्मयाची सांस्कृतिक फलश्रुती अशा काही महत्त्वाच्या वाङ्मयीन प्रश्नांचा पृथगात्म दृष्टीने विचार करून चर्चेला वेगळी परिमाणे दिली. शोकांतिकेविषयीचे आणि अर्वाचिनीकरण या प्रक्रियेविषयीचे त्यांचे विवेचनही अभ्यासपूर्ण आणि वैशिष्टय़पूर्ण आहे. त्यांची इंग्रजीतील तात्त्विक समीक्षाही लक्षवेधी आहे. तिच्यात वास्तवतावाद, विशुद्धता, आत्मनिष्ठा, उत्स्फूर्तता, सौंदर्य अशा विविध वाङ्मयीन संकल्पनांविषयीची स्वतंत्र भूमिका आहे.

स्वत:च्या काव्यनिर्मितीच्या संदर्भात करंदीकरांनी केलेली स्पष्टीकरणे काव्यनिर्मिती प्रक्रियेच्या अभ्यासाला उपकारक ठरावीत इतक्या मोलाची आहेत. प्रत्यक्ष समीक्षेच्या क्षेत्रात अ‍ॅरिस्टॉटल, शेक्सपिअर, हेमिंग्वे हे पाश्चात्त्य लेखक आणि ज्ञानेश्वर, केशवसुत, माधव ज्यूलियन व मर्ढेकर हे मराठी कवी यांच्या वाङ्मयीन व्यक्तित्वाच्या विशेषांची करंदीकरांनी सखोल मांडणी केली आहे.

लिहिले त्याहून अधिक चांगले लिहिले जाण्याची शक्यता दिसेनाशी झाल्यामुळे १९६५ साली करंदीकरांनी त्यांचे लघुनिबंधलेखन थांबवले आणि १९८० नंतर काव्यलेखन थांबवले. (अपवाद- ‘तुकोबाच्या भेटी शेक्सपिअर आला’ आणि ‘अगा हुतात्म्यांनो’ या कविता, ‘निर्वाणीचे अभंग’ आणि ‘अष्टदर्शने’ हा संग्रह) परंतु करंदीकरांच्या व्यक्तित्वात  रुजलेल्या सामाजिक भोवतालाला प्रतिसाद देण्याच्या मूळ वृत्तीचा आविष्कार वेगवेगळ्या गौरव समारंभांत केलेल्या भाषणांतून होत राहिला. ही भाषणे ‘उद्गार’मध्ये (१९९६) संग्रहित झालेली आहेत. त्यातून करंदीकरांची समकालीन सामाजिक जीवनाविषयीची प्रतिक्रिया धारदारपणे व्यक्त झाली आहे. ‘कबीर सन्मान’ (१९९२) स्वीकारताना केलेल्या भाषणात करंदीकर म्हणतात : ‘कबीरजी, तुम्ही आपल्या युगातील सर्वात पुरोगामी असे संतकवी. कारण तुम्ही पांथिक कटुता, धार्मिक कडवेपणा आणि आचार-विचारांतील अंधश्रद्धा या गोष्टींविरुद्ध खंबीरपणे उभे राहिलात. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे तर तुम्ही मूर्तिमंत प्रतीक. पण तुम्ही दिलेला वारसा आम्ही धुळीला मिळवला, हे कबूल कताना मला लाज वाटते. तुमच्या लगतच्या अनुयायांनी तुमच्याच नावाने नवे पंथभेद सुरू केले. एवढेच नव्हे, तर त्यांच्याहून अधिक सुशिक्षित असूनही आज आम्ही अधिक जातीयवादी, धार्मिकदृष्टय़ा अधिक विभागलेले आणि त्या भेदांचे भांडवल करून स्वत:चा वैयक्तिक किंवा राजकीय स्वार्थ साधण्यात अधिक हुशार झालो आहोत.’

‘सुसंस्कृतता आणि सृजनशीलता’ यावरील परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी (१९९४) केलेल्या भाषणातही अस्वस्थ करणारे  सांस्कृतिक प्रश्न करंदीकरांनी मांडले आहेत. ते म्हणतात, ‘स्वातंत्र्यानंतर पन्नास वर्षे लोटली तरी बहुजन समाजाची सुसंस्कृतता आणि आम्ही ज्या वर्गात मोडतो त्याची सुसंस्कृतता यांतील दरी तशीच शाबूत आहे. दोन्ही सुसंस्कृतता रोगग्रस्तच आहेत; त्यांची जातिभेद, निरक्षरता, दैववाद आणि अंधश्रद्धा यांनी ग्रस्त आहे, तर आमची व्यक्तिवाद, भ्रष्टाचार, बाजारीकरण आणि मूल्यहीनता यांनी ग्रस्त आहे.. विविध क्षेत्रांतील सृजनशीलतेपुढे ही दरी हे एक मोठे आव्हान आहे.’

डॉ. लाभसेटवार प्रन्यासातर्फे दिला जाणारा साहित्य पुरस्कार स्वीकारताना केलेल्या (असंग्रहित) भाषणात करंदीकरांनी ‘अस्मिते’विषयी मर्मदृष्टी व्यक्त केली आहे- ‘महाराष्ट्रातील प्रत्येक प्रदेशाने आपल्या अस्मितेला जरूर जपावे; पण त्याचबरोबर अज्ञान, अंधश्रद्धा, धर्माधता, दारिद्रय़, पिळवणूक आणि दहशतवाद या समाजाच्या षड्रिपूंशी मुकाबला करताना प्रत्येकाने आवश्यकतेनुसार आपली अस्मिता महाराष्ट्राच्या अस्मितेत, महाराष्ट्राची अस्मिता भारताच्या अस्मितेत आणि भारताची अस्मिता मानवाच्या जागतिक अस्मितेत विलीन करण्याची किमया आत्मसात करणे हेही फार जरुरीचे आहे.’

‘रक्तारक्तातील। कोसळोत भिंती। मानवाचे अंती। एक गोत्र।।’ असे स्वप्न पाहणाऱ्या कवी विंदांचेच हे उद्गार आहेत! या भाषणांतून वैचारिक भूमिका घेणाऱ्या भाष्यकार करंदीकरांचे जे दर्शन घडते ते आज विशेष प्रस्तुत ठरणारे असे आहे.

विजया राजाध्यक्ष यांनी करंदीकरांच्या प्रतिभाशक्तीचे ‘बहुपेडी आणि बहुपिंडी’ असे वर्णन केले आहे. करंदीकरांच्या (बहु)रूपाने मराठी साहित्य आणि संस्कृतीला तिचा एक मानदंड लाभला असे म्हणावेसे वाटते.

gokhalemeena@gmail.com