रामरहीमच्या शिक्षेनंतर कलम-१४४ का लावले नाही, पुरेसे पोलीस दल का तैनात केले गेले नाही, वगैरे प्रश्न उथळ ‘बँड-एड’ उपाय ठरतात. त्यापेक्षा भारतीय राज्यशासन शिक्षण-रोजगाराबद्दल उदासीन का आहे, अर्ध्या लोकांना रोजगार पुरवणाऱ्या शेतीक्षेत्राकडे अक्षम्य दुर्लक्ष का करते आहे, हे प्रश्न विचारावे. ते ‘खरे’ प्रश्न ठरतील. अन्यथा वर्तन-डोहात बुडून मरायला आपण तयार व्हावे!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एखाद्या क्षेत्रातली एखाद्या प्राण्याची लोकसंख्या वाढत गेली तर नेमके काय होते? अमेरिकेतल्या ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ मेंटल हेल्थ’ने (NIMH) यावर बरेच प्रयोग केले. यापैकी जॉन बी. कॅल्हूनचा (John B. Calhoun) ‘विश्व-२५’ हा प्रयोग प्रसिद्ध किंवा बदनाम (!) आहे. या प्रयोगाचा जरा तपशील पाहू..
एक नऊ फूट चौरस, चार फूट उंच हौद आहे. त्याच्या प्रत्येक भिंतीवर जाळीचे बसवलेले बोगदे आहेत आणि प्रत्येक बोगद्याला जोडलेली उंदरांना राहण्याजोगी ‘बिळे’ आहेत. भरपूर अन्नपाणी पुरवायची आणि हौद स्वच्छ ठेवण्याची सोय आहे. आधी केलेले प्रयोग सांगतात की, या हौदात ३ हजार ८४० उंदीर जगू शकतात. या हौदात चार नर, चार मादी असे आठ उंदीर सोडले. सुरुवातीला उंदरांची प्रजा वेगाने वाढू लागली. दर ५०-५५ दिवसांनी उंदरांची संख्या दुप्पट होत होती. सुमारे ६६० उंदीर झाल्यावर मात्र वाढीचा हा वेग मंदावला. उंदरांची वागणूकही बदलली. माद्यांमध्ये गर्भगळीत होण्याचे प्रमाण वाढले. आया पिल्लांची काळजीही घेईनात. काही बिळांमधले उंदीर इतरांपासून स्वत:ला तोडून घेऊ लागले. ते बिळातच राहत आणि इतर उंदीर झोपल्यावर बाहेर पडून अन्न खात. त्यांचा इतर सगळा वेळ केवळ स्वत:ला चाटूनपुसून स्वच्छ ठेवण्यात जात असे. सामाजिक व्यवहार.. अगदी लैंगिक व्यवहारही पूर्णपणे बंद पडले. या उंदरांना कॅल्हून ‘सुंदर लोक’ (The Beautiful Ones) म्हणत असे! इतर जागी मात्र उंदरांची दाटी अपार वाढली. या जागांमधले उंदीर सतत काहीशे उंदरांसोबत असत. त्यांच्यात लैंगिक विकृती (उंदरांमध्ये समलिंगी व्यवहार ही विकृती ठरते.) दिसू लागल्या. एकमेकांना खाण्यापर्यंतच्या हिंस्र मारामाऱ्या होऊ लागल्या. बलात्कार वाढले. उलट, काही उंदीर स्वत:चा जीव वाचवायचा प्रयत्नही टाळू लागले..
अखेर ५६० व्या दिवशी उंदीरसंख्या २ हजार २०० ला पोहोचली. त्यानंतर मात्र एकेक उंदीर मरत अखेर सर्व उंदीर संपून गेले. अगदी ‘सुंदर लोकां’सकट!
विषमता!
या १९७२ सालच्या प्रयोगावर आजवर चर्चा होत आहेत. तेव्हा असे मानले गेले की माल्थस या आद्य जनसंख्या शास्त्रज्ञाचे मत खरे ठरते आहे की.. फार वेगाने वाढलेल्या लोकसंख्या कोलमडून नष्ट होतात. आज मात्र जरा वेगळा विचारही केला जातो. हौदाची क्षमता होती ३ हजार ८४० उंदरांइतकी. प्रत्यक्षात मात्र २ हजार २०० ला (जेमतेम क्षमतेच्या ५७ टक्के) संख्या पोहोचली आणि कोलमडली. याचे कारण आज विषमतेत शोधले जाते. ‘सुंदर लोक’ प्रमाणाबाहेर जागा बळकावतात म्हणून उरलेले उंदीर दाटीगर्दीत लोटले जातात. ते आपली सामाजिकता, आपले उंदीरपणच गमावून बसतात. म्हणजे कोलमडण्याचे मूळ ‘सरासरी’ दाटीमध्ये नाही; ते विषमतेत आहे!
सामाजिकता हरवण्याला कॅल्हूनने ‘वर्तन-डोह’.. ‘बिहेवियरल सिंक’ असे नाव सुचवले होते. नीचपणाच्या गर्तेत जाऊन प्रजा गटांगळ्या खाऊ लागते. अशा डुबक्यांवर इलाज झाला नाही तर सर्वच प्रजा सर्वनाशात बुडून जाते.
आज मला तरी अनेकानेक पातळ्यांवर विषमता वाढताना दिसते आहे. सोबतच ‘सुंदर लोक’ही वाढताना दिसतात. देशांच्या पातळीवर आपली लोकसंख्येची दाटी अमेरिकेच्या दहा-अकरा पट आहे. बांगलादेशातली दाटी आपल्याही वरताण आहे. मुंबई-नागपूर-गडचिरोली असाही एक दाटीचा ‘रंगपट’ रेखता येतो. प्रत्येक गावात, महानगरात ‘एन्क्लेव्ह’ आणि ‘गेटेड कम्युनिटी’पासून झुग्गी-झोपडय़ांपर्यंत दाटी-पट दिसतात.. आणि आपल्या दाण्यापाण्याची सोय लावणारा कोणी कॅल्हूनही नाही!
..आणि माणूस!
वसंतराव गोवारीकर (अवकाशशास्त्री, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू) सांगत, की भारताची लोकसंख्या १७५ कोटींना जाऊन स्थिरावेल. तेवढी माणसे पोसायला भारत सक्षम आहे. मला खरोखरच फार भीती वाटते. गोवारीकरांच्या आकडय़ाच्या ५७ टक्के म्हणजे जेमतेम शंभर कोटी होतात. आपण आजच १३५ कोटींवर पोहोचलो आहोत.
विषमता तर चहूकडेच दिसते. नागपूरसारख्या मध्यम शहरात दहाएक वर्षांपूर्वी सुमारे शंभर कोटय़धीश होते. आज दहाएक हजार असतील. सोबतच चौका-चौकातल्या ‘लेबर मार्केटा’त महिना पंधराच दिवस तीनशे रुपये रोजीची वाट पाहणारेही वाढत आहेत. कौशल्यविकासाच्या कितीही बाता मारल्या तरी रोजगाराच्या संधी वाढण्याऐवजी घटतच आहेत.
जातिव्यवस्था ही आपली खासियत आहे. मुळात समतावादी असणारे ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मही भारतात जातींमध्ये वाटले जाताना दिसतात. बुटासिंग, झैलसिंग यांच्यासारखे शीखही प्रकाशसिंग बादलांसारख्या, कॅप्टन अमरिंदरसिंगांसारख्या ‘उच्चवर्णी’ शिखांची बरोबरी साधू शकले नाहीत. गटारे साफ करणारे, डोक्यावर मानवी ‘मैला’ वाहून नेणारे आजही त्या कामातून मुक्ती मिळवू शकत नाहीत. पाकिस्तानात कराचीत ही गटारे साफ करणारे हिंदू दलितच आहेत. त्यांना ‘इकडे’ आणू म्हणता? मग आधी इथल्यांना गटारमुक्ती द्या की!
देव आणि देवदूत!
साहिर लुधियानवी हा नास्तिक, साम्यवादी गीतकार होता. पण त्यांचे ‘नया दौर’ चित्रपटातले भक्तिगीत माणसे देवाधर्माकडे का वळतात याचे उत्तम चित्र रेखाटते. चारच ओळी देतो- असहाय माणसांना सुखावणाऱ्या..
‘जब तुझसे न सुलझे तेरे उलझे हुए धंधे !
भगवान के इन्साफ पे सब छोड दे बंदे!!
खुदही तेरी मुश्किल को वो आसान करेगा!
जो तू नहीं कर पाया वो भगवान करेगा!!’
तेव्हा ‘सुंदर लोकां’नी गर्दीत लोटलेले, क्षमतेच्या सत्तावन टक्क्यांवरच्या वर्तन-डोहात गटांगळ्या खाणारे धडपडून ईशकृपेकडे जायचे मार्ग शोधतात यात काहीही नवल नाही.
‘सुंदर लोकां’च्या जरासेच खाली असलेले लोकही एकीकृत होऊन मार्ग शोधताहेत. रेड्डी, मराठा, पटेल, मीणा, गुज्जर, जाट.. अन् त्यांच्यातले काही वरचे-खालचे काही बाबा, बापू, गुरू, स्वामींच्या मठांत आणि डेऱ्यात सामील होताहेत.
तीव्रतम भीती
विषमतेचे परिणाम आणि त्यावर उपाय सुचवणारे एक मत जेम्स मिल्च्या ‘राज्य शासनाबद्दल’ (अॅन एसे ऑन गव्हर्नमेन्ट) या निबंधात भेटते :
‘‘माणसांचा आपल्या आकांक्षाच्या पूर्तीसाठी दुसऱ्याचे हिरावून घेण्याकडे कल असतो.. ज्यांचे हिरावून घेतले जाते त्यांना जेमतेम जगता येईल अशा स्थितीत लोटले जाते.. त्यांना तीव्रतम भीतीला सामोरे जावे लागेल असे क्रौर्य दाखवले जाते. हे माणसांच्या स्वभावातले तत्त्व हा राज्यशासनाच्या आवश्यकतेचा पाया आहे.’’
म्हणजे मिल् म्हणतो की, दुसऱ्याचे ‘हिरावून घेणे’ टाळणे, ज्यातून विषमता वाढते त्यावर अंकुश ठेवणे हे सरकारचे पहिले आणि अत्यावश्यक काम आहे! आणि हे काम स्वतंत्र भारताच्या सरकारांनी (काही अपवाद वगळता) केलेले नाही. एकेकाळी श्रीमंतांना भरावे लागणारे संपत्ती कर (Wealth Tax), वारसा कर (Estate Duty) आज सोडून दिले गेले आहेत. उलट, जराशी श्रीमंती भोगणाऱ्यांना करांच्या जाळ्यात- टॅक्स नेटमध्ये- कसे ओढावे, ते शोधले जात आहे.
शिक्षणव्यवस्थेची लक्तरे वृत्तपत्रे रोज वेशीवर टांगत आहेत. नको तिथे यांत्रिकीकरण केल्याने अर्थव्यवस्थेतली वाढ (म्हणजे जे काय असेल ते!) आणि रोजगार यांच्यात फारकत झाली आहे. तिला ‘जॉबलेस ग्रोथ’ असे गोंडस नाव दिले जाते.
साठेक वर्षांपूर्वी (पुन्हा!) साहिर लुधियानवीने ‘फिर सुबह होगी’ या चित्रपटासाठी एक गाणे लिहिले. ‘सारे जहाँ से अच्छा’चे विडंबन होते ते. त्यातल्या ‘तालीम है अधूरी! मिलती नहीं मजूरी’ या ओळी आजही खऱ्या ठरताहेत. उपजीविकेची साधनेच वाढत नसणे हेच ‘तीव्रतम क्रौर्य’ नाही का?
मरायला तयार व्हावे!
अशा स्थितीत एका वाह्यत माणसाने शीख व हिंदू दलितांना, तरुणांना जुजबी शिक्षण व रोजगाराचे आमिष दाखवून एक मोठा भक्तगण वाढवला. त्याचा गाभा होता- एक सशस्त्र निमलष्करी दल हा! अनेक माफिया, डॉन असे गुंड पोसतात. आणि हो.. अनेक राजकारणीही! त्या जोरावर बाबा, बापू, स्वामी, दादा, साहेब लोक ‘सुंदर’ होतात. त्यांची बिळे छान ‘डेरेदार’ होतात.
तेव्हा रामरहीमच्या शिक्षेनंतर कलम-१४४ का लावले नाही, पुरेसे पोलीस दल का नेमले नाही, वगैरे प्रश्न उथळ ‘बँड-एड’ उपाय ठरतात. भारतीय राज्यशासन शिक्षण-रोजगाराबद्दल उदासीन का आहे, अर्ध्या लोकांना रोजगार पुरवणाऱ्या शेतीक्षेत्राकडे अक्षम्य दुर्लक्ष का करते आहे, हे प्रश्न विचारावे. ते ‘खरे’ प्रश्न ठरतील.
नाहीतर ‘वर्तन-डोहा’त बुडून मरायला तयार व्हावे!
नंदा खरे nandakhare46@gmail.com