ब्रेग्झिटमुळे इंग्लंडमध्ये ब्रिटिश तसेच अन्यदेशीय लोकांमध्ये प्रचंड कल्लोळ उसळला आहे. त्याबद्दलचा ऑंखों देखा हाल..
२४ जूनच्या पहाटेची सूर्यकिरणे आदल्या दिवशीचा बेसुमार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाच्या पाश्र्वभूमीवर अधिकच प्रखर वाटणारी.. सगळे ब्रिटनवासी निराशा, आवेग, हतबलता आणि आनंद अशा संमिश्र भावनांच्या सीमेवर हिंदकळत होते. गेले काही महिने केवळ ब्रिटिश नागरिकांनाच नव्हे, तर जगभरातील लोकांना चिंतातुर करणाऱ्या विषयाचा एकदाचा ‘निकाल’ लागला होता. ५२ टक्के ब्रिटिश जनतेने युरोपियन युनियनशी चार दशकांहूनही अधिक काळ असलेले नाते तोडण्याचा निर्णय घेतला होता.
ब्रेग्झिट (Brexit) आणि ब्रिमेन (Bremain) या शब्दांवर पब, पार्कस्, बर्थ-डे पाटर्य़ा, लग्न, ऑफिस कॅन्टीन अशा सर्व ठिकाणी मोठीच वादावादी होत होती. राजकारणी, वर्तमानपत्रे, टीव्ही, इंटरनेट आणि सोशल मीडियावर या वादावादीला चांगलेच खतपाणी मिळत होते. इंग्लंडमध्ये राहणारे सर्वच युरोपियन या जननिर्देशावर (सार्वमत) भयंकर चिडले होते. फ्रान्समधून लंडनमध्ये येऊन जवळपास वीस वर्षे स्थायिक झालेला अमियन- प्रत्येक भेटीत जर ब्रेग्झिट झाले तर इंग्लंडची अर्थव्यवस्था कशी कोलमडेल, यावर स्वयंस्फूर्त भाषण देत असे. लंडनमध्ये युरोपीय लोकांचा प्रभाव अधिक असल्याने, तसेच जागतिक अर्थकारणाचे ते एक महत्त्वाचे केंद्र असल्याने ‘ब्रिमेन’ला मनापासून संमती देणाऱ्यांची संख्या जास्तच. तरीही पॉल, ब्रेण्डा, हिलरी ही माझ्या टेनिस क्लबची वयस्कर मंडळी दुसराच सूर आळवीत होती. पॉलने ठरवले होते की, ‘जरी ब्रिमेन जिंकणार हे खरे असले, तरीही मी मात्र ब्रेग्झिटसाठी माझे मत देणार!’ युरोपियन युनियनची गुंतागुंतीची नोकरशाही आणि जाचक नियम याचा ब्रिटिश जनतेने सुरुवातीपासूनच निषेध केला आहे. अ‍ॅण्डी हा माझा शेजारी. युरोपियन म्हणजे काय, असा सवाल करून त्याला ब्रिटिश असल्याचा अभिमान आहे, असं तो जाहीर करतो. एक ब्रिटिश म्हणून तो अन्य वंश आणि धर्म यांविषयी आदर बाळगतो आणि हा त्याचा ‘ब्रिटिश’ असण्याचा एक भाग आहे असे नमूद करतो.
जसजसा जननिर्देशाचा दिवस जवळ येऊ लागला तसतसा ब्रिटिश लोकांचा ब्रेग्झिटवरचा कल वाढू लागला. खरं तर १९७५ मध्ये युरोपियन युनियनचा भाग बनल्यापासून त्याविषयीची ब्रिटिश लोकांची नाराजी वाढतच गेली होती.
पॉलने १९७५ च्या जननिर्देशातही ब्रिटनने युरोपियन युनियनचा भाग बनू नये असेच मत दिले होते. पोलंड, रोमानिया, बल्गेरिया या पूर्व युरोपियन देशांचा युरोपियन समुदायातील सहभाग, या परदेशी नागरिकांचा त्याद्वारे इंग्लंडमध्ये झालेला प्रवेश आणि परिणामी इंग्लिश नागरिकांत झालेली वाढती बेरोजगारी याचे मोठे भांडवल नायझेल फराज यांच्या युकिप (ukip) पक्षाने केले. मात्र, सारेच ब्रिटिश यावर सहमत नाहीत. काही महिन्यांपूर्वी डोरसेट या इंग्लंडच्या समुद्रकिनारी वसलेल्या छोटय़ा शहरात गेलो असता, तेथील हॉटेलच्या मालकाने इंग्लिश लोकांच्या कामचुकार प्रवृत्तीकडे बोट दाखविले. तो म्हणाला, ‘जर कमी पैशांत मला पोलिश प्लंबरकडून उत्तम काम करून घेता येत असेल तर मग मी ते का स्वीकारू नये?’ मला लगेचच मुंबईतील शिवसेना आणि मनसेचा मराठी माणसांच्या प्रश्नावरील गदारोळ आठवला. असो!
ब्रेग्झिटला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये अनेक उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित लोकही सामील होते. सॅम हा माझा वकील मित्र युरोपिय युनियनच्या जाचक नियमांना कंटाळला होता. गेल्या वर्षी सीरिया आणि इतर देशांतून आलेल्या निर्वासितांची ‘ईयू’मुळे झालेली परवड, रशियाच्या युक्रेन आक्रमणावर ‘ईयू’ने घेतलेली बघ्याची भूमिका यामुळे युरोपियन पार्लमेंट ही एक सर्कस आहे, असे सॅमचे, तर ‘ईयू’चा भाग बनल्यापासून ब्रिटन आपले सार्वभौमत्व गमावून बसला आहे, असे बँकेत काम करणाऱ्या डॅफनीचे मत आहे. या तीव्र मतांच्या गलक्यात कँडिस या माझ्या फ्रेंच मैत्रिणीला ‘सारे काही ठीक होईल!’ असा मेसेज करून २३ जूनच्या रात्री मी झोपी गेलो. ब्रेग्झिट झाले तर आपल्याला परत फ्रान्सला जावे लागणार का, आणि आपल्या कामाचे काय होणार, या चिंतेत कँडिस मात्र संपूर्ण रात्र निकालाची वाट पाहत राहिली.
ब्रेग्झिट निकाल सर्वासाठीच धक्कादायक होता. त्याचे समर्थन करणारे आणि विरोध करणारेही या निकालाने अचंबित झाले. पत्रकार, विश्लेषक, राजकारणी आवेगाने या निकालाच्या परिणामांचा काथ्याकूट करीत असताना रस्त्यावर मात्र नेहमीसारखीच वर्दळ होती. बसमध्ये कामाला जाणाऱ्या लोकांची गर्दी कायम होती. फ्रेंच रेस्टॉरंटच्या बाजूला इंग्लिश ब्रेकफास्टची नेहमीची वर्दळ होती. पण जसजसा दिवस पुढे सरकू लागला तसतसे ऑफिसमधले वातावरण तापू लागले. ब्रेग्झिटला विरोध करणारे ब्रिटिश लोकांच्या कूपमंडूक वृत्तीला नावे ठेवू लागले. ग्रीसमधून इथे गेली दहा वर्षे स्थायिक झालेल्या कोस्टाने ब्रिटिश नागरिकत्व मिळविण्याची तयारी सुरू केली! ग्रीसमध्ये आर्थिक परिस्थिती हलाखीची आणि ब्रेग्झिटमुळे इंग्लंड सोडायची पंचाईत नको म्हणून ब्रिटिश नागरिकत्व घेण्याचे त्याने ठरवले होते. किंबहुना, या भीतीपायी काही युरोपियन लोकांनी आधीच ब्रिटिश नागरिकत्वासाठी अर्ज केले होते. ब्रेग्झिटमुळे या अर्जात नक्कीच वाढ होईल यात शंकाच नाही. अर्थात जे युरोपियन येथे वर्षांनुवर्षे राहत आहेत त्यांना ब्रिटिश सरकार हाकलणार नाही. कारण बरेच ब्रिटिश युरोपमधील पॅरिस, फ्रँकफर्ट, बर्लिन, रोम या शहरांत अनेक वर्षे वास्तव्य करीत आहेत.
निकालाच्या विश्लेषणानुसार, जवळपास सर्व महत्त्वाच्या शहरांनी (लंडन, ब्रिस्टल, बाय, लीड्स, मॅन्चेस्टर) ‘ब्रिमेन’ला समर्थन दिले होते. वेल्स आणि कॉर्नवॉल हे सार्वभौमत्वासाठी लढा देणारे युनायटेड किंग्डमचे भाग मात्र ब्रेग्झिटला पाठिंबा देत होते. ू हा माझा टेनिसचा मित्र लंडन युनिव्हर्सिटीत गेली काही वर्षे काम करतो आहे. बँगर या वेल्समधील भागात त्याचा जन्म आणि तिथेच शिक्षण. त्याचा सध्याचा जॉब ‘ईयू’मधून येणाऱ्या निधीवर अवलंबून आहे. अर्थातच त्याचा ‘ब्रिमेन’ला पाठिंबा होता. मात्र, त्याचे आई-वडील आणि आजोबा अगदी भिन्न मताचे! मतदानाच्या आधी आणि नंतरही त्याने आपल्या पालकांशी अबोला धरलेला आहे. ही परिस्थिती जवळजवळ सर्वच घरांतून दिसते. ब्रेग्झिटचे समर्थन करणाऱ्या काही पालकांनी विरोधी मत प्रदर्शित करणाऱ्या त्यांच्या पाल्यांपासून सुटका म्हणून मतदान झाल्यावर सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला. या जननिर्देशामुळे लोकांची नाती तुटली आहेत; तर काही ठिकाणी घट्ट झाली आहेत. अमियनने ब्रेग्झिटला पाठिंबा देणाऱ्या त्याच्या मित्रांशी संबंध तोडले आहेत. बरेचसे युरोपियन लोक एकत्र येऊन या जननिर्देशाची पुनर्चाचणी व्हावी म्हणून प्रयत्न करीत आहेत. ब्रिटनमधील तरुण जनतेला- ज्यांनी ब्रेग्झिटला विरोध केला- वयस्कर लोकांशी पुन्हा चर्चा करून जवळ आणण्यासाठी आवाहन केले जात आहे, तर सत्तरीतील एडमंड- ज्याने ब्रेग्झिटला पाठिंबा दिला- तरुण पिढीच्या असाहसी प्रवृत्तीने चिंतातुर झाला आहे.

या निकालाच्या विश्लेषणांत एक बाब प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या वगळली जात आहे. ती म्हणजे इथल्या ‘ईयू’बाहेरून आलेल्या लोकांचे मत. आफ्रिका आणि भारतीय उपखंडातून आलेल्या लोकांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. राजकीय पटलावरही भारतीय उपखंडातून आलेले लोक प्रकर्षांने दिसतात. गेल्या वर्षी संसदेच्या निवडणुकीत कन्झव्‍‌र्हेटिव्ह पार्टीचा विजय होण्यामागे या मूळच्या भारतीय उपखंडातील लोकांचा मोलाचा वाटा होता. पोलंड, बल्गेरियातील लोकांना चांगली वागणूक दिली जाते. या देशात प्रवेश करताच त्यांना सर्व प्रकारचे सामाजिक भत्ते मिळतात. इतर देशांतून येणाऱ्यांना मात्र त्यासाठी पाच-सात वर्षे वाट पाहावी लागते. याविषयीचा असंतोष भारतीय उपखंडातून आलेल्या लोकांमध्ये गेली काही वर्षे खदखदतो आहे. उदाहरणार्थ, येथील भारतीय उपाहारगृहांत ‘ईयू’मधील लोकांना काम द्यावे असा सरकारचा सूर आहे. पाकिस्तान, भारत, बांगलादेश, श्रीलंका येथून आचारी न आणता येथील लोकांना ती पाककला शिकवावी, या सरकारी नियमामुळे अनेक भारतीय उपाहारगृहे बंद पडू लागली आहेत. मात्र इटालियन, स्पॅनिश, फ्रेंच रेस्टॉरंटमध्ये त्या- त्या देशांतील लोक काम करताना आढळतात. कदाचित हेच कारण असेल का, की बर्मिगहॅम- जेथे मूळ पाकिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या लोकांची संख्या अधिक आहे- या शहराने ब्रेग्झिटला पाठिंबा दिला? ‘ईयू’ ही केवळ गोऱ्या वर्णाच्या आणि ख्रिस्ती धर्माच्या लोकांचीच संस्था आहे अशी भावना येथील ‘ईयू’बाहेरील लोकांच्या मनात घट्ट होत आहे का? ब्रेग्झिटनंतर ब्रिटिश लोक इतर देशांतून आलेल्या लोकांनाही ‘चले जाव’ असे सांगतील का? इथले लोक २००८ च्या आर्थिक मंदीतून अजूनही सावरलेले नाहीत. सध्याची राजकीय अनागोंदी पुढच्या आर्थिक मंदीची मुहूर्तमेढ रोवील का? ब्रेग्झिटच्या मतभेदांतून जर स्कॉटलंड आणि उत्तर आर्यलड युनायटेड किंगडममधून बाहेर पडले तर इंग्लंडचे जागतिक वर्चस्व अबाधित राहील का? या आणि अशा अनेक प्रश्नांनी इंग्लंडमधील लोकांना ग्रासले आहे. राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेचा काळ कितपत लांबेल आणि त्याचे परिणाम किती जगव्यापी असतील यावरची चर्चा कॉफी हाऊसेस आणि पबमध्ये होत आहे. दरम्यानच्या काळात या ग्रहणकाळाला ‘Keep Calm and Carry on’ या ब्रिटिश वृत्तीने सामोरे गेले पाहिजे यावर मात्र कोणाचेच दुमत नाही!
प्रशांत सावंत  wizprashant@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा