आपल्या वैविध्यपूर्ण साहित्यातून भारतीय स्त्रीची वेदना, दु:ख आणि स्त्रीवादाचे कणखर दर्शन घडविणाऱ्या प्रख्यात लेखिका अमृता प्रीतम यांच्या अप्रकाशित २५ कथांचा मराठी अनुवाद असलेले ‘रिकामा कॅनव्हास’ हे पुस्तक अभिजीत प्रकाशनतर्फे प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने पुस्तकाच्या अनुवादिका डॉ. सुप्रिया सहस्रबुद्धे यांचे हे संपादित मनोगत..

प्रिय अमृता,

Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Counseling center for victimized women in Thane district
ठाणे जिल्ह्यात पीडित महिलांसाठी समुपदेशन केंद्र
Tuberculosis awareness campaign for 100 days in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात शंभर दिवसांसाठी क्षयरोग जागृती मोहीम
sex ratio of birth in nashik municipal corporation
जिल्ह्यात लिंगोत्तर प्रमाणात घट; लिंग चाचणीची दक्षता समिती बैठकीत साशंकता
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
द्रराजला पत्नी व दोन मुली आहेत. त्याची मोठी मुलगी प्राजक्ताच्या वयाची आहे. तरीही त्याने प्राजक्ताला लग्न करण्याचे आमिष दाखवले.
गवंड्याच्या प्रेमात पडली दहावीची विद्यार्थिनी, पळून जाऊन लग्न केले
chaturang article men struggle
आजच्या पुरुषाचे ‘कर्तेपण’

गेली ११ वर्षे प्रत्येक ३१ ऑक्टोबर जवळ आला की तुझी आठवण हमखास येते. तुला भेटायची फार तीव्र इच्छा होती, पण ते जमले नव्हते. आणि ३१ ऑक्टोबर २००५ या दिवशी ती इच्छा पूर्ण होण्याची सर्व शक्यता संपली. कारण त्या दिवशी तू या जगाचा निरोप घेऊन निघून गेलीस. ६० वर्षांची साहित्यसाधना करून आणि एक विलक्षण वेगळे आयुष्य निर्भयपणाने जगून तू गेलीस. तुला मिळालेले पद्मश्री, पद्म्विभूषण, साहित्य अकादमी, ज्ञानपीठ, साहित्य अकादमीचा जीवनगौरव हे भारतातले पुरस्कार आणि शिवाय फ्रान्स, बल्गेरिया, पाकिस्तान या देशांनीही दिलेले सन्मान, पुरस्कार हे सर्व थोर आहेच; पण या असंख्य पुरस्कारांपेक्षा तुझी निर्भयता, तुझी संवेदनशीलता आणि प्रतिभा पाहिली की तुला सलाम करावासा वाटतो. तुझी निसर्गदत्त प्रतिभा अशी, की वयाच्या विशीच्या आत तुझे दोन श्रेष्ठ कवितासंग्रह प्रसिद्ध झाले होते. नंतर वीसहून अधिक कादंबऱ्या, डझनापेक्षा जास्त लघुकथासंग्रह, शिवाय कविता, चरित्रे, निबंध, पंजाबी लोकगीतं यांचा तुझा पुस्तकांचा संभार शंभरापुढे पोहोचला. भारताचा स्वातंत्र्यलढा, राष्ट्रीय एकात्मता, मानवी मूल्यांवरची निष्ठा, पंजाबी भाषेचे प्रेम आणि आणखी कितीतरी. कुठलाच विषय तुला वज्र्य नव्हता आणि कुठल्याच विषयाचं सोनं करायचं तू ठेवलं नाहीस. शिवाय या सर्व साहित्यात अस्तित्ववादही आहे आणि जीवनाच्या अंतिम अध्यायात आध्यात्मिक जाणीवही तरळताना दिसते आहे. तरल, कोमल संवेदनशीलता असूनही त्याच्या जोडीला स्त्रीच्या स्वातंत्र्याची मागणी करणारा बंडखोरीचाही स्वर तुला कसा पेलला? तुझ्या ‘रसीदी टिकट’ आत्मचरित्रात हीच प्रामाणिक निर्भयता आहे. तुला म्हटलं गेलं होतं ना, तू काय लिहिणार आत्मचरित्र? या रेव्हेन्यू तिकिटावर पण मावेल की ते आत्मचरित्र! म्हणून ते नाव दिलंस आत्मचरित्राला. आणि आपल्या जगण्याच्या रीतीचं कोणतंही गौरवीकरण न करता ते लिहिलंस. ‘सुनहरे’ आणि ‘कागज ते कॅनव्हास’ या सर्वाला तर पंजाबी स्त्रीचा पहिला बुलंद आवाज म्हणता येईल. ‘कागज ते कॅनव्हास’मधल्या ‘गरबवती’ कवितेत गुरूनानक आणि माता त्रिप्ता यांच्या जणू मूर्तीच तू घडवल्यास. त्या गर्भवतीचे शरीर अमृताचं सरोवर बनलं आहे. आणि त्यामध्ये एक राजहंस उतरला आहे. दिवस फुलासारखा उगवला आहे.. अशा त्यातल्या प्रतिमा विसरणं अशक्य आहे. यातली कोवळीक आणि तुझी इतरत्र दिसणारी तेजस्वीता हा संयोग किती लोभवणारा आहे! भारतीय स्त्रीची वेदना आणि स्त्रीवादाचे धैर्यशील स्वरूप या दोन्हीचे दर्शन तू तुझ्या साहित्यात घडवलेस. कित्येक एकनिष्ठ, उत्कट प्रेमिक पुरुषांनाही तू विसरलेली नाहीस.

फाळणीच्या रक्तबंबाळ काळावरती खूप लिहिलं गेलं आहे. त्या संघर्षांमध्ये सर्वाधिक भाजून निघाली ती स्त्रीजात. या स्त्रीची दाहक यातना आणि अगतिकता तुझ्याइतक्या समरसतेनं कुणी मांडली? अठराव्या शतकातील पंजाबचा श्रेष्ठ कवी वारिस शाहची हीर-रांझा ही अमर प्रेमकथा तुझी आवडती. तिचा आधार घेऊन तू ‘अज्ज आखॉं वारिस शाह नू’ लिहिलीस. तिच्यामधली तुझी हीर फाळणीच्या अत्याचाराने उद्ध्वस्त झाली आहे. ती वारिस शाहला पंजाबची दशा सांगते. रक्तरंजित झालेल्या चिनाब नदीची व्यथा वर्णन करते. हीरने त्याला मदतीसाठी केलेली आळवणी तू रंगवलीस. ती कविता पंजाबचे शोकगीत बनली. भारत-पाक सीमेवर बाघामध्ये कोरलेल्या तुझ्या हीरच्या त्या ओळी एखाद्या स्तोत्रासारख्या वाटतात. तुझ्या ‘पिंजर’ कादंबरीमधले प्रसंगवर्णन आणि त्यातल्या पुरोची कथा तर काळजाला हात घालणारी आहे. रशीद तिला पळवून नेतो आणि आई-वडील तिला नाकारतात. पण मग रशीद तिच्यावर खरेखुरे प्रेम करायला लागतो. दोघे मिळून कित्येक स्त्रियांना आपल्या कुटुंबाकडे सुखरूप पोहोचवायचा प्रयत्न करतात. पुरो म्हणते, कोणी मुलगी हिंदू असो वा मुसलमान, जी कुणी आपल्या घरी परत जाते आहे, तिच्यामधून पुरोचा आत्मा आपल्या घरी परत जातो आहे असं समजा. नंतर भारतात परतून जाण्याची संधी आलेली असूनही अखेर पुरो रशीदसह जगायचा निर्णय घेते.

इथे निवडलेल्या तुझ्या सर्व कथा स्त्रीकेंद्री आहेत. त्यातल्या स्त्री-व्यक्तिरेखांचे वैविध्य विलक्षण आहे. पंजाबच्या गावाकडच्या अशिक्षित आई-वडिलांपुढे, समाजापुढे निमूटपणे मान तुकवून पुढे आलेल्या अडाणी वा वयस्क पुरुषाच्या गळ्यात माळ घालणाऱ्या बऱ्याचशा स्त्रिया आहेत. तुझी एक अंगुरी म्हणते की, बाईनं पुस्तक वाचलं तर तिला पाप लागतं असं मला सांगितलंय. आमच्या इथेसुद्धा एका आनंदीला असंच बजावलं गेलं होतं की, बाईनं पुस्तक वाचलं तर नवरा लवकर मरतो. फार कशाला, तिकडं इंग्लंडमध्ये नाही का त्या जेन ऑस्टेननं लिहिलेली कादंबरी सुरुवातीला लेखिका म्हणून तिचं नाव न लिहिता ‘By a Lady’ म्हणून छापली गेली! आणि अठराव्या शतकात तो एरवी छान दयाळू असलेला डॉक्टर जॉन्सन नव्हता का म्हणाला, की स्त्रियांच्या लिखाणाचं कौतुक करायला पाहिजेच की! कसं? जसं आपण दोन पायांवर चालणाऱ्या कुत्र्याचं कौतुक करतो, तसं! जगभर हे होतंच म्हणा. पण अशा ललनांप्रमाणेच हा अन्याय न जुमानता या काही निर्भय बायाही तू चितारल्यास. कसे गोळा केले असशील हे एवढे स्त्रीच्या भोगांचे अनुभव?

या कथा विसाव्या शतकाच्या पूर्वार्धाच्या काळातल्या आहेत. स्त्रीमुक्तीचे वारेही न लागलेल्या काळातल्या उत्तर प्रदेश, पंजाब अशा प्रदेशांतल्या स्त्रियांच्या या कथा आहेत. समाजशास्त्र आणि मानसशास्त्र या दोन्ही दृष्टींनी या कथांकडे पाहता येते. कथा स्त्रीकेंद्री असल्या तरी पुरुष विरुद्ध स्त्री असं युद्ध किंवा एखाद्या पुरुषाकडून छळली जाणारी ‘बिच्चारी’ स्त्री असं चित्र तू रंगवत नाहीस. पुरुषाला अनुकूल असे चालत आलेले नियम पाळत राहणाऱ्या समाजातल्या स्त्रीच्या भोगांच्या या कथा आहेत. तू मांडलेल्या या स्त्रियांच्या अनुभवांतील वैविध्याचे एक कारण म्हणजे विविध समाजांच्या रीती-रिवाजांची तुला चांगली माहिती होती आणि त्या रिवाजांमुळे त्या, त्या समाजातल्या स्त्रीला जे भोगावे लागत होते, त्याचे रेखाटन तू केलेस.

‘कोकली’मधले मच्छीमार समाजातल्या एका निर्घृण रीतीचे वर्णन केवढे भयंकर आहे! आजच लग्न झालेली कोकली रात्री नवऱ्याची वाट पाहते आहे. तो येतो आणि काही वेळाने रक्ताळलेली चादर बाहेर घेऊन जातो. ती झेंडय़ासारखी मिरवत तो समाज आनंदाने गरजतो, ‘कुमारी! कुमारी!’ योनिशुचितेचे हे दैवतीकरण आणि प्रदर्शन हतबुद्ध करणारे आहे. तुझी ही कथा (दुर्दैवाने!) कालबा झालेली नाही.

दुसऱ्या एका समाजातल्या स्त्रीची याहून दाहक कहाणी ‘उद्ध्वस्ततेच्या कहाण्या’मध्ये आहे. जुळ्या मुलांना जन्म दिलेल्या मातेला गावचा गुनिया व्यभिचारी ठरवतो आणि नवऱ्यानंच बायकोला मरणाची शिक्षा द्यायची असं सांगतो. त्या जुळ्यांच्या मरणानंतर ते पापाचे आत्मे होते असं सांगतो. गाववाले हे सगळं शिरोधार्य मानतात. कारण गुनियाचा कोप झाला तर गावाचं अकल्याण होईल अशी त्यांची दृढ अंधश्रद्धा आहे. केवळ केतकी नावाची एक स्त्री खंबीरपणे त्या नवऱ्याला- कार्तिकला सावरते. हे सर्व आजच्या शहरी सुशिक्षितांना अतिरंजित वाटू शकेल; कारण हे ‘फिक्शन’ आहे. पण असाच आळ साक्षात् सीतामाईवर काही लोककथांमध्ये घेतलेला आहे. गोष्टीच्या शेवटी तू म्हणतेस, ‘मलाही माहीत नाही, तुम्हालाही माहीत नाही, की जगातले हे गुनिए जगातल्या किती कहाण्या रोज उसवत आहेत.’ ‘उसवत आहेत’मधला वर्तमानकाळ जाऊन तिथे ‘उसवत होते’ असा भूतकाळाचा वापर कधी करता येईल का गं? कारण आजही रोजची वर्तमानपत्रं नावाचे वास्तव दस्तावेजसुद्धा विविध अंधश्रद्धांच्या बळींच्या सत्यकथा मांडत आहेत. खाप पंचायतींच्या कृतींच्या अशाच कहाण्या सांगत आहेत. मात्र, ‘सतलतिया’मधल्या गावची पंचायत फिरकीशी लग्न न करता तिच्या पदरात दोन मुलं टाकून पळून जाऊ पाहणाऱ्या बन्सीधराला तिच्याकडून सात लाथा देऊन गावातून हाकलून लावते, हे चित्रही तू दाखवतेस. कधी दारिद्रय़, कधी राजकारणी पतीची सामाजिक प्रतिष्ठा, समाजाच्या नजरेचं भय अशा विविध कारणांनी दबून जीवनाकडे पाठ फिरवणाऱ्या अनेक स्त्रियांचे दर्शन ‘पांच बहनें’च्या रूपककथेतून तू मांडतेस. ‘छम्मकछल्लो’मधल्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी टोपल्या विकणाऱ्या छल्लोच्या साधेपणाचा, भोळेपणाचा फायदा घेऊन एक मोटारवाला तिची अब्रू लुटून तिला रस्त्यात सोडून निघून जातो. मूल होत नसेल तर या समाजात सहजासहजी दुसऱ्या लग्नाचा मार्ग स्वीकारला जातो. तो अपरिहार्यच मानला जातो. ‘एक नि:श्वास’मधली सरदारीण तर पूर्णतया मन:पूर्वक सरदार पती फारसा उत्सुक नसतानासुद्धा त्याच्या दुसऱ्या लग्नाचा पर्याय स्वीकारते. इतकेच नव्हे तर स्वत:च त्याच्यासाठी मुलगी शोधून आणते. ‘गंध’मधला अत्यंत संवेदनशील आणि पत्नी गुलेरीवर जीव टाकणारा नायक मानक आईसमोर हतबल होऊन अपत्यासाठी दुसऱ्या लग्नाला मान्यता देतो. पण या कथांमधले सगळेच पुरुष दुष्ट आहेत असे नाही. मानक गुलेरीसाठी मनोमन झुरत राहतो. ‘एक मुलगी, एक प्याला’मधल्या सुमेश नंदा या चित्रकाराने पूर्वी अनेक स्त्रियांशी मैत्री केली होती. पण लावण्यवती व विचारशील टुणीशी लग्न ठरवल्यावर तिच्या अचानक मरणानंतर तो आजन्म तिच्या स्मृतीशी एकनिष्ठ राहतो. ‘परदेशी’मधला देव स्त्रीजातीचा सन्मान करणाराच आहे.

तुझ्या सगळ्याच नायिका परिस्थितीला वा समाजाला शरण जाणाऱ्या नाहीत. केतकी, गरुडगंगा या स्त्रिया अशिक्षित आणि समाजाच्या अतिसामान्य स्तरातल्या असूनही निष्ठेचे एक तत्त्वज्ञान जपत आणि तडजोड न करता त्याची किंमत देत ताठ मानेने जगतात. तुझी एखादी नायिका बिनधास्तही असते. ‘लटियाची पोर’मधल्या एका बेडर आदिवासी मुलीची- चारूची कहाणी विलक्षण आहे. ‘सौभाग्यशालिनी’ची नायिका पती एकनिष्ठ नाही व त्याने फसवणूक केली म्हणून कष्ट करून स्वतंत्रपणे जगत राहण्याचा निर्णय घेते.

तुझ्या बहुतेक स्त्रियांची संवेदनशीलता अत्यंत तीव्र आहे. बहुतांश नायिका एकदा प्रेमात पडल्या की मनाने आयुष्यभर त्या प्रियकराशी जोडलेल्या राहतात. त्या तडजोड करून पहिलं प्रेम विसरू तर शकत नाहीतच; त्यातल्या वैफल्याच्या आगीत जळत राहतात. ‘हा कुठला रंग रे?’मधल्या कलावतीचे कुटुंब तिच्या युसूफला स्वीकारेल हे शक्य नसते. आणि ‘छापा की काटा’मधल्या निर्मलाचा प्रियकर अन्वर स्वत: धर्माची भिंत ओलांडू शकत नाही. या दोघी स्त्रिया नाइलाजाने लग्न करतात; पण झुरून मरण पावतात. अशीच ‘भटियारन’ बन्तीची सासूही लग्नानंतर प्रियकराच्या आठवणीत झुरत मनाने जळत मरून जाते. ही कथा अतिभावविवश वाटेल, पण या तरुण स्त्रीची गाठ एका म्हाताऱ्याशी बांधलेली होती, हे लक्षात घेतल्यावर ही अतिशयोक्ती वाटत नाही. अशा बिजवर, वयस्क वगैरे पतीशी संसार करताना ‘जंगली जडीबुट्टी’मधली साधीसुधी तरुण अंगुरी रामताराच्या प्रेमात पडते. ‘दोन खिडक्या’मधली जेनी म्हणते, ‘‘मी खोटे लेख लिहिते तेव्हा घरी आल्यावर वाटते, जणू काही मी परक्या पुरुषाबरोबर झोपून आले आहे.’’ ‘एक मुलगी, एक शाप’मधली इंटेलेक्चुअल लेखा विवाहाच्या विरुद्ध आहे. पण कोणाच्याही प्रेमाला थारा न देणारी ही स्त्री कौशलच्या प्रेमात अशी काही बुडते, की त्याच्यावाचून जगू शकणार नाही असे म्हणते. त्याने तिला सोडल्यावर ती मरणाला कवटाळते. जगात ही भावविवशता अव्यवहारी ठरते व कदाचित ती सर्वच वाचकांना भावेल असे नाही.

लहान मुलीच्या निवेदनातून उलगडत जाणारी ‘पक्की हवेली’ ही एक वेगळीच दीर्घकथा सस्पेन्स-थरार टिकवण्यात यशस्वी होते. ‘रिकामा कॅनव्हास’ ही कथा तरल पातळीवरची आहे. भौतिक जग विसरून एखाद्या कलेच्या जगात पूर्णतया बुडून गेलेल्या अभिजात कलावंताची मानसिकता व कल्पनाविश्व इथे लक्षात घेतले तरच ती पटेल. बाप आणि मुलीचे कोवळिकीचे नाते तू आदिम विश्वाला जोडून ‘मित्रा’ या कथेत हळुवारपणे रंगवले आहेस.

‘फ्रॉइडपासून फ्रिजिडेअपर्यंत’ ही कथा इतर सर्व कथांपेक्षा वेगळी, अधिक प्रगल्भ, आधुनिक आणि आजच्या एकविसाव्या शतकातल्या स्त्रीचे प्रश्न विचारणारी आहे. त्यातल्या अचलाला आपल्या सुरक्षित आणि सुखी संसाराच्या व्याख्येत चपखल बसणाऱ्या संसारात रोमान्सचा अभाव जाणवतो. शिवाय ती आपल्या स्वत:च्या अस्तित्वाचा अर्थ शोधू पाहते आहे. ती म्हणते, ‘‘मी आपल्या स्वत:च्या अस्तित्वाचा अर्थ शोधते आहे. पण प्रत्येक स्त्रीने पतीच्या माध्यमातून जगायचं असतं, किंवा मुलांच्या माध्यमातून. त्यामुळे तिच्या स्वत:च्या अस्तित्वाला काही अर्थ नसतो. तिच्या कुठल्या नावालाही काही अर्थ नसतो. तिची फक्त दोन नावे असतात. एक पत्नी, एक आई. आणि ही दोन नावे कुणा दुसऱ्याच्या अस्तित्वाच्या कारणामुळे असतात. पती असेल तर त्याच्या अस्तित्वाच्या कारणामुळे ती पत्नी होऊ  शकते. मूल असेल तर त्याच्या अस्तित्वाच्या कारणामुळे ती आई होऊ  शकते.’’

ही विचारशृंखला ‘अस्तित्ववादी’ असली तरी एक प्रकारे सनातन आहे. पण आज एकविसाव्या शतकात स्त्रीला आई आणि पत्नी ही दोन्ही नाती न स्वीकारता जगणे शक्य झाले आहे. कित्येक स्त्रिया तशा जगू पाहताहेत. कायद्याने स्त्रीला आज ते स्वातंत्र्य दिले आहे. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या काही निवाडय़ांमधून ते अधोरेखित झाले आहे. मग अशा जीवनात तिला आज अस्तित्वाचा अर्थ सापडतो आहे का, सापडला आहे का, हा मात्र विचार करण्यासारखा प्रश्न आहे.

अमृता, तू स्वत: इमरोजबरोबर पत्नी म्हणून नव्हे, तर सहचरी म्हणून राहिलीस. तुम्हा दोघा कलावंतांच्या सहजीवनाकडे पाहता या प्रगल्भ प्रश्नाचे उत्तर तुला सापडले आहे असे वाटते. ‘अमृता अ‍ॅन्ड इमरोज : अ लव्ह स्टोरी’ या उमा त्रिलोकच्या पुस्तकात, ‘इन द टाइम्स ऑफ लव्ह अ‍ॅन्ड लॉंगिंग’मध्येही आम्हाला ते दिसते आहे. एकमेकांच्या अस्तित्वाचा सुगंध अनुभवत निर्भरपणे तुम्ही एका घरात राहिलात. गुलजारजींनी तर म्हटलं आहे की, ‘अमृता-इमरोज यांचं नातं हे कविता आणि प्रतिमा यांचं नातं होतं. आणि त्यांची दोस्ती म्हणजे एक आख्यायिका.’ तुझ्या निधनानंतरच्या स्वत:च्या जीवनाबद्दल इमरोज म्हणतो की, ‘तिनं शरीराचा त्याग केला आहे; माझा त्याग नाही, माझ्या सहवासाचा त्याग नाही.’

प्रिय अमृता, आशीर्वाद दे या शतकाला, की पुरुषांकडून स्वत:ची सोय पाहत स्त्रीला वापरलं जाऊ  नये. पुरुष व स्त्रियांच्या जातींमध्ये समजुतीचा इंद्रधनुषी, पण मजबूत पूल अखंड राहू दे. या जगात प्रत्येक स्त्रीला इमरोजसारख्या सहचराचं प्रेम मिळण्याचे भाग्य लाभू दे.

अनुवादिका डॉ. सुप्रिया सहस्रबुद्धे

Story img Loader