चंद्रकांत पोतदार ९०च्या दशकापासून कविता लिहित आहेत. ‘स्वप्नांच्या पडझडीनंतर’ हा त्यांचा तिसरा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.

‘स्वप्नांच्या पडझडीनंतर’ हे कवितासंग्रहाचे शीर्षक यातील कवितांच्या आशयकेंद्राकडे निर्देश करणारे आहे. जगताना पाहिलेली स्वप्नं, धरलेल्या आशाआकांक्षा, जपलेली मूल्यं या सगळय़ांची पडझड आणि त्यातून वाटय़ाला आलेलं भ्रमनिरासाचं जगणं, स्वप्नहीन सृष्टी आणि मूल्यहीन काळोख यानं विदीर्ण होणारं कविमन या सगळय़ा कवितांमध्ये विखुरलेलं आहे. ‘स्वप्न उद्याची बांधून’ जगणाऱ्या संवेदनशील माणसाला आजच्या काळात आयुष्य हुलकावण्या देतं. कवी लिहितो,

Pali language, mother tongue, upcoming census, abhijat darja
आगामी जनगणनेमध्ये भारतातील सर्व बौद्धांनी मातृभाषेखालोखालचे स्थान पाली भाषेला द्यावे…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
article nobel prize winner south korean author han kang
विश्व साहित्याला गवसलेला नवा सूर
article about psychological effects of bossy behavior on colleagues
इतिश्री : भावनांची सर्वव्यापी जाणीव
book review the silk route spy book by author enakshi sengupta
बुकमार्क : गुप्तहेर की देशभक्त?
Actor Sankarshan Karhade presented a beautiful poem for his mother watch video
Video: “जग जिंकायचं आहे का तुम्हाला? आईच्या पायावर डोकं ठेवा”, संकर्षण कऱ्हाडेची कविता ऐकून कलाकार झाले भावुक, पाहा व्हिडीओ
Marathi Actor Ajinkya Deo presented a poem in memory of his father Ramesh Deo watch Video
Video: “बाबांच्या मनात…”, अजिंक्य देव यांनी वडील रमेश देव यांच्या आठवणीत सादर केली सुंदर कविता, पाहा व्हिडीओ
Vice Chancellor Madhuri Kanitkar said counseling by psychiatrists is necessary to reduce mental stress
आरोग्य विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य हेल्पलाईन!

‘जगण्याची चौकट आणि दु:खाच्या खिडक्यांना

कितीही दिला गिलावा तरी

जगण्याची मुळं

इथं काही रुतत नाहीत’

दु:ख हा या साऱ्या कवितांचा स्थायीभाव आहे. दु:खानं माणसाचं सारं आयुष्य व्यापून टाकलं आहे. या सर्वव्यापी दु:खानं माणसाच्या जगण्याचा आधार काढून घेतला आहे, ही जाणीव व्यक्त करताना कवी माणसाच्या जगण्याची प्रत तपासत राहतो. मूल्ययुक्त जगण्याची केलेली अपेक्षा आणि नियतीनं, परिस्थितीनं पदरात घातलेलं वास्तवाचं माप यातील अंतर कवीला व्याकूळ करतं आणि भविष्याबद्दल सचिंत करतं. चंद्रकांत पोतदार लिहितात-

‘उगवणारी नवी पहाट आणि

नव्या माणसाचं नवं आयुष्य

पाठीशी बांधून

उरीपोटी तटतटलेल्या

गरोदर मुलीची पावलं

आता नक्की कुठल्या दिशेनं पडणार आहेत?’

उद्या येणाऱ्या पिढय़ांसाठी कोणत्या प्रकारचं आयुष्य आपण संकल्पून ठेवलं आहे, या विचारानं येणारी संभ्रमचित्त अवस्था कवीनं या कवितेत नेमकेपणानं टिपली आहे.

‘दु:खाला फुटावी उकळी

नि अश्रूंचा वाहावा पाट

अशी राहिली नाही

माया

नि माणसंसुद्धा..’

– हे वर्तमान आहे आजच्या माणसांचं, याची विदारक जाणीव कवी व्यक्त करतो. परंतु, केवळ विदारकता व्यक्त होऊन पुरत नाही. त्या पाठीमागचा कार्यकारणभाव ध्यानात घेतला तर यातूनही जगणं फुलवता येतं. पोतदार यांना हा कार्यकारणभाव आजच्या परिस्थितीत सापडतो. दु:खाची मुळं समकालीन बदललेल्या वास्तवात आहेत याचं भान व्यक्त करताना ते म्हणतात,

‘जीव लागत नसला वर्तमानात तरीही

झेपावता येत नाही गावच्या माणसांकडे

त्वरित पाखरांसारखं!’

पाखरांसारखं मन:पूत झेपावण्यातली नैसर्गिकता, उत्स्फूर्तता माणसाच्या जगण्यातून हरवत चालली आहे. या सत्यांशावर पोतदार नेमका प्रकाश टाकतात.

‘आता युद्धाला केव्हाही सुरुवात होईल

याची भीती वाटते’

अशा भीतियुक्त जीवनामध्ये ‘जन्म नसतो स्वत:च्या परवानगीचा मोफत पास’ हे आकलन ते व्यक्त करतात. धावण्याच्या शर्यतीत तोंडाला फेस येईपर्यंत धावत राहायचे आणि स्वत:चे अस्तित्व या भयानक गर्दीत टिकवून ठेवायचे याचा ताण इथे जगणाऱ्या प्रत्येक माणसाला जाणवणारा. या ताणतणावाची बोच ‘सर्वत्र व्यापून’ या कवितेत ठळक होते.‘सर्वत्र व्यापून राहिलाय तणावाचा अवकाश’- अशा शब्दांत दु:खाची दुखरी नस पकडण्याचा ते प्रयत्न करतात.

यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या या युगात अनेक जुन्या गोष्टींची संबद्धता संपुष्टात आली. त्याचबरोबर त्यातला ओलावा, आत्मीयता, आस्थाही विरत गेली. ‘पत्र लिहिणं’ या एका सुंदर कृतीच्या आगेमागे असलेले प्रेमाचे, नात्यांचे धागेही विसविशीत झाले, ही जाणीव ‘खूप दिवस झाले असं आतून पत्र लिहून’ या कवितेत स्पष्ट झाली आहे. या हरवलेल्या कृतीला अनेक परिमाणं चिकटून होती. नातेसंबंधातला ओलावा होता, शहर-खेडय़ाची जुळलेली नाळ होती, इतरांसाठी तुटणारं काळीज होतं, जबाबदारीचं भान होतं. आता एका कोरडय़ा फोनने या सगळय़ाच मूल्ययुक्त जगण्याला, संवेदनांना दिलेला कोरडा निरोप या कवितेत अधोरेखित झाला आहे. यंत्र आणि तंत्र युगाने माणसांच्या मनांना आलेली बधिरता, आटलेले अश्रू, ओसरलेला मानवताभाव या कवितांमधून प्रत्ययकारी पद्धतीने उमटला आहे. ‘नाती नासली की उरत नाही नाळेचा बंध’ अशा शब्दांत तो उतरला आहे.

जागतिकीकरणाच्या रेटय़ात व्यक्तिकेंद्री स्वार्थ जपणाऱ्या जगण्यात नासत, उसवत जाणाऱ्या नात्यांचे अनुबंध इथे ठायी ठायी जाणवतात.

या कवितांना तसे ग्रामीण कवितेचे लेबल लावता येणार नाही, तरीही या कवितांच्या आशयद्रव्यात कुठे तरी खेडे अदृश्यपणे वसते आहे. या खेडय़ाचे अस्तित्व अनेक कवितांमध्ये जाणवते. कदाचित कवीच्या व्यक्तित्वात असलेले खेडे असे अधूनमधून दृश्यमान होते. ‘फडाचा संसार’, ‘तुकातात्याची मुकी ढोलकी’, ‘वर्तमान श्वासांच्या तपशिलात’ यांसारख्या कवितांमधून गाव, गावाकडची माणसं, सूर्याबरोबर सुरू होणारं त्यांच्या जगण्याचं चक्र, भूक आणि कर्जानं ग्रस्त जिणं, या वास्तवाचं दर्शन घडतं.

‘असा फडाचा संसार, उसा पाल्यात चालतो

बाप अनवाणी पायी, अशी चाळण सोसतो’

अशा शब्दांत गावाकडच्या माणसांच्या कथावेदनांना शब्द फुटतो. बांधामेढीवरची भांडणं असली तरी गावाकडच्या माणसांच्या मनात असलेला मातीचा ओलावा या शब्दांमधून झिरपतो. ‘तुकातात्याची मुकी ढोलकी’सारख्या कवितेत गावाकडच्या साध्यासुध्या, कष्टाळू, ढोलकी वाजवण्याची कला असलेल्या माणसाचं व्यक्तिचित्रण येतं, ते गावाकडच्या माणसाच्या व्यक्तित्वाचं प्रातिनिधिक बनतं. त्याचबरोबर ‘आई : काही संदर्भ’, ‘आई’, ‘पोरीचा बाप’ अशा काही नितांतसुंदर व्यक्तिचित्रणात्मक, नात्यांचा सुंदर सनातन अनुबंध अधोरेखित करणाऱ्या कविता या संग्रहात आहेत. दम्याला अश्वत्थाम्याच्या जखमेसारखं सांभाळणाऱ्या, डबडबत्या डोळय़ांनी काळजी घ्यायला सांगणाऱ्या, ‘दिवस येतीलच की’ म्हणून आधार देणाऱ्या आईचं हृदयंगम चित्रण आईविषयक कवितांमध्ये आहे. तर ‘पोरीचा बाप’ या कवितेत-

‘वेलीचं फूल होण्याच्या वाटेवरची माझी पोर

घर-गल्ली, शाळा-घर नजरांचा जिवाला घोर’

अशा शब्दांत मुलीच्या काळजीनं काळजाची उलघाल होणारा बाप चित्रित झाला आहे.

‘ग्रेस’ ही या संग्रहातली सर्वात वैशिष्टय़पूर्ण कविता आहे. ग्रेसच्या कवितेचं, ग्रेसच्या काव्यशैलीचं, भाषेचं, ग्रेसच्या प्रतिमासृष्टीचं गारुड समस्त मराठी रसिकांप्रमाणे चंद्रकांत पोतदार यांच्यावरही आहे. संपूर्ण कवितासंग्रहभर ग्रेसचं हे गारुड आपल्याला जाणवत राहतं.

‘पंख्याला टोचून तीर

जखमेचे रक्त गळाले’

यांसारख्या अनेक ओळी आपल्याला या संग्रहात भेटतात. ‘ग्रेस’ या कवितेत पोतदार यांनी ग्रेसच्या कवितेची भाषा काय बोलू पाहते आहे याचा शोध घेतला आहे. पण ग्रेस असा सहजासहजी हाती लागत नाही. तो आकलनाच्या मुठीतून पाऱ्यासारखा निसटत राहतो.

‘सापडते- निसटते- खुणावत राहते

मी अपुराच असतो इथे’

अशी ही चंद्रमाधवी ग्रेसची भाषा पोतदारांना सातत्याने स्वत:कडे खेचत राहते. हे खेचले जाणे, हे गारुड पोतदार यांनी फार पारदर्शीपणे व्यक्त केले आहे. ग्रेसच्या सैरभैर, तरल भाषेच्या जवळजवळ जात पोतदारांची अभिव्यक्ती काव्यात्मतेचे टोक गाठण्याचा प्रयत्न करते, परंतु ती ग्रेसचे अनुकरण करत नाही. भाषा आणि प्रतिमांच्या माध्यमातून ती स्वत:च्या आतल्या अनुभवाचा तळ शोधण्यात मग्न राहते. ‘स्वप्नांच्या पडझडीनंतर’ स्वत:च्या आत झालेल्या स्थित्यंतरांचे स्वरूप शोधत राहते.

‘स्वप्नांच्या पडझडीनंतर’- चंद्रकांत पोतदार,

आर्यन प्रकाशन,