डिसेंबर-जानेवारी हा काळ विविध कलामहोत्सव, साहित्यविषयक उपक्रम, व्याख्यानमाला आदींनी गजबजलेला असतो. एकेकाळी लोकांची सांस्कृतिक भूक भागवणाऱ्या या कार्यक्रमांना लोक आवर्जून जात असत. परंतु अलीकडच्या काळात  या कार्यक्रमांना ज्येष्ठ नागरिकांचीच उपस्थिती दिसते. तरुणाईला अशा कार्यक्रमांना का जावंसं वाटत नाही? आज एकूणच सांस्कृतिक उपक्रमांना मिळणाऱ्या अत्यल्प प्रतिसादाबद्दल एका संवेदनशील कलावंताचं मुक्त चिंतन..

माणसाचे जीवन गतिमान आहे. नव्हे, तसे ते असलेच पाहिजे. कालचा दिवस आयुष्यात परत येणार नाही हेच तर जगण्याचे वास्तव आहे. पण जीवन जगताना या गतिमानतेमध्ये आपण काही गोष्टी हरवून तर बसत नाही ना, असा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो. अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधून जगण्याचा मिळणारा आनंद आपण हरवून बसलेलो नाही ना? या वेगवान आयुष्यात माणूस यांत्रिक तर होत नाहीए ना? काळाच्या गतीशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न प्रत्येकजणच करत असतो. पण काळाच्या गतीशी जुळवून घेण्याच्या या खेळामध्ये काही वेळा खूपच दमछाक होते, हे वास्तव नाकारता येत नाही. अनेकदा हे सारे नकोसेदेखील वाटू लागते. पण आयुष्य जगताना या सगळ्या गोष्टी अपरिहार्य आहेत याचीही जाणीव होत असते.

Viral Video Shows little girls playing Bhatukali
‘खरंच खूप भारी होते ते दिवस…’ भांडीकुंडी आणली, पानांची बनवली पोळी-भाजी अन्… VIRAL VIDEO पाहून आठवेल बालपण
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
naga chaitianya sibhita dhulipala wedding card viral
नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपालाची दाक्षिणात्य ढंगातील लग्नपत्रिका झाली व्हायरल, ‘या’ तारखेला होणार विवाहसोहळा
nehru literature soon in one click available on digital form on mobile
नेहरूंचे साहित्य लवकरच एका क्लिकवर!
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
Musical dance drama Urmilayan Aryans Group of Companies Kamesh Modi
सांगीतिक नृत्यनाट्य ‘ऊर्मिलायन’
we the documentary maker Dheeraj akolkar
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: आनंददायी दृश्य-व्यायाम

माणसाचं एकूणच जीवन अतिशय गतिमान आणि भवताल गर्दी, गजबज आणि गोंगाटाचा झाल्यामुळे त्याचे अग्रक्रम बदलले आहेत. करायलाच हव्यात अशा नित्यनेमाच्या गोष्टी आणि व्यवहारांच्या शहरी धबडग्यात आपल्या मनाला रिझवणाऱ्या, सुखावणाऱ्या आणि आवडीच्या गोष्टी पाहायला, ऐकायला, अनुभवायला उसंतच आता मिळेनाशी झाली आहे. त्यापायी हळूहळू आपली संवेदनशीलताही हरवत चालली आहे. कदाचित छोटय़ा नगरांमध्ये, गावांमध्ये हे होत नसावं. तिथे अजूनही उत्साह, उत्सुकता आणि नव्या गोष्टीची नवलाई दिसून येते. दूरचित्रवाणी वाहिन्या, मोबाइल आणि समाजमाध्यमांचं आक्रमण तिथंही झालं आहेच; पण तरीही ग्रामीण भागात नव्या गोष्टीची उत्सुकता, नवलाई आणि त्याबद्दल जाणून घेण्याची असोशी अजूनही कायम आहे असं माझं निरीक्षण आहे. शहरी धबडग्याच्या तुलनेत अनागर भागातील लोकांमधील संवेदना अजून बऱ्यापैकी शाबूत आहेत. शूटिंग, नाटकाचे प्रयोग वगैरेच्या निमित्तानं मी बऱ्याच ठिकाणी जात असतो तेव्हा मला हे प्रकर्षांनं जाणवतं. यासंदर्भात पु. ल. देशपांडे यांनी व्यक्त केलेल्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. पुलं म्हणतात, ‘आयुष्यात मला भावलेलं एक गूज सांगतो. शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा. पण एवढय़ावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाटय़, शिल्प, खेळ यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील; पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं, हे सांगून जाईल.’ पुलंच्या या विधानामध्ये सार्वकालिक सत्याची प्रचीती येते.

याबाबतीत मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. लहानपणी मी कीर्तनं आणि प्रवचनं ऐकू शकलो. राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे हे निव्वळ कथेचं निरूपण करणारे कीर्तनकार नव्हते, तर ते एक उत्तम ‘परफॉर्मर’ होते. त्यांचं कीर्तन हा ‘बघण्याचा’ भागही असायचं. दासबुवा परुळेकर, गजाननबुवा राईलकर यांची कीर्तनं मी केवळ ऐकली नाहीत, तर ती प्रत्यक्ष अनुभवली आहेत. माझ्या लहानपणी मी सर्कसचे अनेक खेळही बघितले. वार्षिक परीक्षा संपल्यानंतर उन्हाळ्याच्या सुटीमध्ये सर्कस पाहण्याचा आनंद काही औरच असे. सर्कस म्हणजे आम्हा मुलांसाठी एक प्रकारचं ‘थ्रिल’ होतं. त्यातले साहसी खेळ आणि विदुषकाच्या गमतीजमती हे सारं अनुभवण्यामध्ये एक मजा होती. माझ्या कळत्या वयामध्ये मी जे वक्ते ऐकले ते आता आहेत कुठे, असा प्रश्न मला पडतो. राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांतील दिग्गज वक्त्यांची भाषणं मी ऐकली आहेत. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या व्याख्यानांत त्यांच्या वाणीला चढलेली धार अनुभवायला मिळे. पण त्यांच्या भाषणामध्ये काही वेळा टिंगलटवाळीही असे. पु. ल. देशपांडे यांची अनेक भाषणं मी ऐकली आहेत. मी आणीबाणीच्या काळातली त्यांची राजकीय भाषणं जशी ऐकली, तशीच सांस्कृतिक कार्यक्रमांतील नर्मविनोदी शैलीतली त्यांची भाषणं ऐकणं हीसुद्धा एक आगळी मेजवानी असायची. कॉ. श्रीपाद अमृत डांगे, मधू दंडवते, अटलबिहारी वाजपेयी असे श्रेष्ठ वक्ते मी ऐकू शकलो. मी मुंबईत ज्या भागात राहत होतो तेथील अमर हिंदू मंडळामध्ये तर व्याख्यानमालांचा उत्सवच असायचा. विविध विषयांवरील व्याख्यानांच्या श्रवणातून मी केवळ श्रोता झालो नाही, तर थोडय़ाबहुत प्रमाणात बहुश्रुतही झालो. कीर्तन-प्रवचनं, सर्कस, व्याख्यानं अशा सर्वच गोष्टींमध्ये मला रस होता. हे सारे माझ्या घडणीतील अविभाज्य घटक आहेत. किंबहुना, या सर्व गोष्टींमध्ये मी स्वत:ला ‘मोल्ड’ करून घेतलं.

काळ बदलतो तशा काही गोष्टी काळानुरूप बदलत जातात. त्या बदलल्याच पाहिजेत. त्याविषयी आक्षेप असण्याचं कारण नाही. पण पूर्वी एखादं कीर्तन, प्रवचन, सुंदर भाषण किंवा व्याख्यान ऐकल्यानंतर त्याविषयी चर्चा व्हायच्या. त्यावर वादविवाद व्हायचे. या गोष्टी अलीकडे होताना दिसत नाहीत. सध्याच्या जमाना हा ‘यूज अँड थ्रो’चा आहे. त्या धर्तीवर माणसाची विचारशक्तीसुद्धा ‘वापरा आणि फेकून द्या’ अशीच झाली आहे का? एखादी चांगली कथा वाचली, उत्तम नाटक वा चित्रपट पाहिला किंवा अप्रतिम मैफल ऐकली तर त्याविषयी आपण आपापसामध्येही चर्चा करत नाही. याचं कारण- त्याविषयी आपल्याला बोलावंसं वाटत नाही, की विनाकारण चर्चा करण्यात वेळ घालवू नये ही वृत्ती वाढीस लागली आहे? आपलं जीवन इतकं तात्कालिक झालं आहे का? आज माणसाचं चर्चेत, संवादात, स्मृतींमध्ये रेंगाळणं कमी झालं आहे का? सध्याच्या गतिमान आयुष्यामुळे माणूस असल्या गोष्टींमध्ये वेळ घालवू इच्छित नाही की चांगल्या गोष्टीचं कौतुक करण्यासाठी व्यक्त होण्याच्या बाबतीत त्याच्यात उदासीनता आलीय, असा प्रश्न मला भेडसावतो आहे. आपल्या प्राधान्यक्रमांत समाजमाध्यमांचं (सोशल मीडिया) आक्रमण वाढत आहे का? समाजमाध्यमांचे जसे काही फायदे आहेत, तसेच तोटेदेखील आहेत.

नाटक, चित्रपट, मालिका या क्षेत्रांमध्ये मी काम करतो. या सर्वच माध्यमांमध्ये मार्केटिंग, प्रमोशन, प्रसिद्धी आणि जाहिरातबाजी याचं प्रस्थ वाढलं आहे. मी कलाकार आहे, तर मी केवळ चित्रीकरणात भाग घेऊन चित्रपट करून भागत नाही, तर त्याच्या प्रसिद्धीमध्येही सहभाग घेणं हीसुद्धा हल्ली प्राधान्याची बाब झाली आहे. या सगळ्या प्रकारात मी थोडासा मागासलेलाच आहे. किंबहुना, या गोष्टीपासून मी काहीसा अलिप्त राहू इच्छितो. पण तसं मला राहता येत नाही ही माझी अडचण आहे. व्हॉट्स अ‍ॅपसारखं माध्यम वापरताना सध्या भाषेचं लघुरूप वापरलं जातं. मी मात्र इंग्रजीत संपूर्ण स्पेलिंग बरोबर टाईप करूनच संदेश पाठवतो. हाच संदेश मराठीमध्ये पाठवायचा असेल तर त्यातही शुद्धलेखन बिनचूक असेल याची दक्षता मी आवर्जून घेत असतो. पण सध्या सर्वाना सारं काही ‘शॉर्टकट’ हवं असतं. त्यामुळे संदेश पाठवतानाही तो अल्पाक्षरीच असतो. मोबाइलवर आलेला संदेश वेळ देऊन वाचणं ही काहीशी किचकट प्रक्रिया असल्यानं प्रत्येकाचाच संक्षिप्ततेवर भर असतो. घरातल्या घरातसुद्धा माणसं आता ‘एसएमएस’वर ‘चॅट’ करू लागली आहेत. या साऱ्याचा परिणाम म्हणून माणसाचं बोलणं कमी होत आहे. परिणामी संवाद हरवून आभासी संवाद वाढला आहे का? माणसांचं बोलणं कमी झाल्यामुळे संवाद, चर्चा, वादविवाद, खंडन-मंडन, मत-मतांतरं या साऱ्याच गोष्टी लुप्त होऊ लागल्या आहेत की काय असं वाटू लागलंय. माझ्या लहानपणी भा. रा. भागवतांची पुस्तकं, ‘बालमित्र’ आणि ‘आनंद’ या मासिकांनी मला वाचनाची

गोडी लावली. आता पुस्तकं घेऊन वाचायला कोणाकडे वेळ आहे? ‘किंडल’वरच ऑनलाइन वाचन केलं जातं. मात्र, या आधुनिक माध्यमाद्वारे किती लोक अभिजात साहित्य वाचत असतील? मोठय़ा गोष्टींच्या वाचनासाठी माणसं आता पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत हे वास्तव आहे का? या गोष्टीमुळे समाजातील वैचारिक चलनवलन कमी होतं आहे का? माणूस खरोखरीच उतावीळ

झालेला आहे का?

सध्याचा जमाना हा झगमगाटाचा आहे. याचाच परिणाम म्हणून नव्या पिढीमध्ये व्यवहारीपणा आला आहे का? साऱ्या गोष्टी या उपयुक्ततेमध्येच तोलण्याची प्रवृत्ती वाढते आहे का? पूर्वी क्रिकेट सामने पाच दिवसांचे असायचे. ‘कसोटी सामने’ असे म्हणताना फलंदाज आणि गोलंदाजांची कसोटी लागायची. बापू नाडकर्णी सलग निर्धाव षटकं टाकत असत. तर उजव्या यष्टीबाहेर जाणारे चेंडू सोडून देताना सुनील गावसकर गोलंदाजाच्या संयमाची परीक्षा घेत असे. आज हा संयम संपला आहे का? एकदिवसीय सामने सुरू झाल्यानंतर ‘एकच षटकार’मधील ‘गुगली’ या सदरामध्ये मी आता रात्रीचे सामने होतील, असं गमतीनं म्हटलं होतं. पण खरोखरच नंतर ‘डे-नाईट’ क्रिकेट सुरू झालं. खेळाप्रमाणेच माणसाच्या जीवनाचा खेळ ‘फास्ट स्पीड’चा- म्हणजे गतिमान झाला आहे. त्या गतीशी जुळवून घेताना त्याला अवघड जातंय का? ‘थोडक्यात काय ते सांगा. लांब पल्ल्याचं ऐकायला आम्हाला वेळ नाही’ अशी वेळ आज आली आहे. आत्मविश्वासामुळे बेफिकीर वृत्ती वाढते आहे का? स्मरणरंजनात रमायला आज कुणालाच वेळ नाही. ‘आजचं काय ते बोला. पुढचा विचार माहीत नाही’ अशी माणसाची धारणा होत चालली आहे का? नव्या तंत्रज्ञानाशी, त्यातल्या गतिमानतेशी जुळवून घेताना, ‘स्मार्ट’ होताना आपली दमछाक तर होत नाहीए ना? आत्ममग्नता, आत्मकेंद्रीतता, नात्यातील

तुटलेपण या साऱ्याचं प्रतििबब माणसाच्या सांस्कृतिक जीवनात आणि कलाप्रकारांमध्येही उमटत आहे का? माणसाचं औत्सुक्य, कुतूहल संपलं आहे का? की हे सारं व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असेल?

सध्याची पिढी बुद्धिमान, बहुश्रुत, आत्मविश्वास ठासून भरलेली आणि ‘स्मार्ट’ आहे. हा काळाचा महिमा आहे. या काळाशी जुळवून घ्यायला काहींना जमत नाही हे वास्तव आहे. जीवनाच्या बदलत्या स्वरूपाशी जुळवून घेताना काही गोष्टी- मग त्या पटत असोत किंवा नसोत- त्या आपल्याला स्वीकाराव्याच लागतात. हे करत असताना युवा पिढीवर संस्कार करण्यामध्ये मागची पिढी कमी पडली आहे का? प्रबोधन करणारे कीर्तन-प्रवचनं, विचारप्रवर्तक व्याख्यानं, आशयघन नाटकं-चित्रपट यांचे विविधांगी संस्कार मुलांवर आपण जाणीवपूर्वक करतो का? ‘तू मला मदत करशील का?’ असं म्हणण्याऐवजी ‘तू माझी मदत करशील का?’ असं म्हणताना आपल्या भाषेवरील हिंदूीचा प्रभाव वाढतो आहे का? या साऱ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्यापाशी नसली तरी मुक्त चिंतन करताना मला हे प्रश्न पडले आहेत खरे.

दिलीप प्रभावळकर

शब्दांकन : विद्याधर कुलकर्णी