अरुंधती देवस्थळे
इटलीत उभारलेलं रेनेसान्स हा युरोपिअन कलेच्या इतिहासातला सोनेरी कालखंड- अभिजाततेतून आधुनिकतेत आणणारा! डोनातेलो, कारवाज्यो, राफाएल, टिशीअन, बेलिनी, मार्को बेलो अशा अनेक शिल्प/ चित्रकारांची मांदियाळी. प्रत्येकाचं परंपरेतून सुरू होणं आणि आधुनिकतेवर आपापली छाप सोडून जाणं. यातले दोन सुपरस्टार्स म्हणजे लिओनार्दो द विंची (१४५२-१५१९) आणि मायकेलएंजेलो (१४७५-१५६४). दोघांच्या कलेचा दर्जा आणि आवाका कालजयी म्हणायला हवा, कारण आज इतकी शतकं लोटल्यावरही त्यांची कला- लिओनार्दोबाबत म्हणायचं तर अपूर्णतेसह- रसिक आणि अभ्यासकांना अजोड वाटते. सर्जनशीलता बहुमुखी असल्याने त्याचा वावर सैन्याची शस्त्रास्त्र डिझाईन करण्यापासून १२ माणसाला उडायला पंख बनवून देण्यापलीकडे! अवगत नाना कलांपैकी चित्रकला ही त्याची सर्वात प्रिय. तरीही त्याच्या आयुष्यात असेही कालखंड येऊन गेलेले दिसतात, जेव्हा तो ब्रश बाजूला ठेवून कलेबद्दल लिहिण्या-वाचण्यात रमून जाई. आयुष्यात जेमतेम २० चित्रं पूर्ण काढलेली, तरी जनमानसात कला- पुराणपुरुषाचं स्थान भूषवणाऱ्या लिओनार्दो द विंचीची बातही है कुछ और! त्याच्या अनेक अतिशय सुंदर चित्रं अपूर्ण सोडून देण्याच्या वृत्तीच्या संदर्भात त्याचा चरित्रकार मित्र जॉर्जिओ वासारी लिहितो,‘‘His knowledge of art indeed, prevented him from finishing many things which he had begun, for he felt that his hand would be unable to realize the perfect creations of his imagination, as his mind formed such difficult, subtle and marvelous conceptions that his hands, skillful though…’’ त्याच्या डायऱ्यांमधून कळतं की, लिओनार्दोला प्रवासाची आवड होती, निसर्गावर उत्कट प्रेम होतंच. एके ठिकाणी पाय टिकणं कठीण, त्यामुळेही मन एकाग्र करून भव्य स्केलवर हाती घेतलेलं काम पूर्ण करणं स्वत:लाच बांधून ठेवणारं होत असणार.
शिल्पकार, कवी, संगीत, नेपथ्यकार, लेखक लिओनार्दोच्या आयुष्यात कथा- कादंबऱ्यांत शोभण्यासारखे चढउतार आले होते. सुरुवात जन्मापासूनच झालेली. त्याच्या आईवडिलांचं लग्न एकाच दिवशी झालं, पण दोन वेगळय़ा सहचरांशी. श्रीमंत वडिलांचं कुलीन, प्रतिष्ठेला शोभणाऱ्या मुलीशी आणि त्याच्या आईचं, सामान्य कामगाराशी. असं सर्रास व्हायचं त्या काळात. पण आजोबांनी (वडिलांचे वडील) त्याचा जन्म स्वत: कार्यालयात जाऊन नोंदवला होता, आपल्या कुळाच्या आणि त्याच्या वडिलांच्या नावासकट. लिओनार्दोचे वडील पिएरो, त्यांच्या वडिलांसारखेच नोटरी. वयाची पहिली पाच वर्ष आईकडे, त्यानंतर जवळच राहणाऱ्या वडील, आजोबा, काका वगैरेंच्या संयुक्त कुटुंबात त्याची रवानगी झाली. सात वर्षांचा असताना त्याचे वडील कुटुंबासहित फ्लॉरेन्सला आले. नवं शहरी आयुष्य सुरू झालं, पण शालेय शिक्षण कधी त्याच्या वाटय़ाला आलं नाही. वडिलांनी बायका वारल्यामुळे एकामागून एक चार लग्नं केली. घरातल्या १३ मुलांत लिओनार्दो मोठा भाऊ झाला. तो अनौरस म्हणून त्याला काही हक्क नाकारले गेले. एके काळी इच्छा असूनही आजोबा आणि वडिलांसारखा तो नोटरी बनू शकला नाही. आयुष्यभर अनौरसपणाचा शिक्का वेळोवेळी त्याचा मानभंग करत राहिला. त्याने कधी लग्न केलं नाही. त्याला वडिलांकडून वारसाहक्कात काही मिळू शकणार नव्हतं, तो ‘विंची’ आहे असं म्हणून फ्रांचेस्को काकांनी मात्र आपली बरीच मालमत्ता त्याच्या नावे केली होती.
चौदा वर्षांचा झाल्यावर त्याचा कल पाहून वडिलांनी त्याला वेरोचिओ नावाच्या एका नावाजलेल्या चित्रकाराकडे प्रशिक्षणार्थी म्हणून पाठवलं. पोरगेल्याशा डावखुऱ्या लिओनार्दोची चित्रं त्याला फारच पसंत पडली. वेरोचिओ एक हरफनमौलाच म्हणायला हवा, कारण कलेची वेगवेगळी माध्यमं त्याला कुशलतेने वापरता येत. तो चित्रं काढे, धातू, टेराकोटा आणि दगडांतून शिल्पं बनवे, पिगमेंट्स बनवण्यात त्याचा हातखंडा! कलाकार बनू पाहणाऱ्या तरुणांना तो उत्कृष्ट मार्गदर्शन करू शके. वेरोचिओच्या हाताखाली तयार झालेल्या कलाकारांमध्ये पिएत्रो पेरूगिनो किंवा लॉरेंझो दी क्रेडी हे लिओनार्दोचे समकालीन. मायकेलएंजेलोही इथलाच, पण मागाहून आलेला. या शिकण्याच्या कालखंडात त्यांना फार्मसीमधून रंग आणणे, ते वस्त्रगाळ मातीत मिसळणे, ही माती अंडी आणि तेलात घोळून रंग बनवणे, जिप्समने पॅनल बनवून त्यावर रेखाचित्र लावणे यांसारखी कामे करावी लागत. त्यात चित्राची येणाऱ्या-जाणाऱ्याला दिसेलशी मांडणी आणि विक्रीच्या पैशांची वसुलीही आलीच. पुढली पायरी म्हणजे त्यांना पुतळे किंवा शिल्पांचे साचे आणि कोरीव काम देण्यात येई आणि चित्रांमध्ये रंग भरता येत. अनेकदा मास्टर मुख्य आकृती काढत असे आणि या होतकरू शिष्यांना पार्श्वभूमी रेखाटण्याची संधी मिळे. ‘बाप्तिझ्म ऑफ ख्राईस्ट’ (टेम्पेरा ऑन वूड, १८० ७१५२ से. मी. १४७२-७५) हे सध्या फ्लोरेन्सच्या उफी गॅलरीत असलेलं म्यूरल हे अशा कामाचं उदाहरण. चित्राखाली दोघांची (वेरोचिओ आणि लिओनार्दो) नावं दिलेली आहेत. लिओनार्दो कधीही आपल्या चित्रावर स्वत:चं नाव घालत नसे हे सर्वश्रुत आहेच. वडिलांच्या नोटरी असण्याचा प्रभाव म्हणून की काय त्याला केलेल्या कामाची वर्णनं, रेखाचित्रं, लांबी-रुंदीची परिमाणं अशा सविस्तर नोट्स ठेवायची सवय होती, म्हणून त्याच्या कामाची कहाणी त्याच्याच शब्दांत ऐकायला मिळते. त्याने पेनने अर्नो नदी व दरीच्या केलेल्या रेखाचित्रांची मालिका आता छापली गेली आहे.
अशी १०-१२ वर्ष प्रशिक्षण घेतल्यावर लिओनार्दोला मिळालेलं पहिलं स्वतंत्र काम म्हणजे एका खानदानी मुलीचं पोट्र्रेट. तिचं नाव होतं जिनेव्रा दी बेंची. तिचं आरस्पानी गोरेपण, बदामासारखे डोळे आणि सोनेरी कुरळे केस आणि मागची निसर्गसुंदर पार्श्वभूमी लिओनार्दोची उमलती प्रतिभा दर्शवणारे. यानंतर लिओनार्दोला कामं मिळायला सुरुवात झाली. त्यात चर्चच्या भव्य आल्टरपीसवर बायबलमधलं ‘अडोरेशन ऑफ मजाय’चं दृश्य २४३ २४६ सें. मी. मध्ये पॅनलवर बनवायचं होतं. काम आव्हान देणारं होतं. आजवर असा भारदार आल्टरपीस घडला नव्हता अशी चर्चा सुरू असतानाच वर्षभराचं काम अपूर्णच ठेवून लिओनार्दो मिलानला गेला आणि १८ वर्षांनी परतला; तोवर ते काम दुसऱ्या कोणी पूर्ण केलं होतं. त्या काळात इटली वेगवेगळय़ा प्रांतांत विखुरलेला होता. मिलानवर डय़ूक लुदविकोचं आधिपत्य होतं. त्याला एका बहुमुखी प्रतिभेच्या कलाकाराची गरज आहे हे ऐकल्यावर आपण सेनेसाठी यंत्र आणि शस्त्रास्त्रं, तोफा बनवतो, इमारतींसाठी स्थापत्याचे आराखडे आणि (शेवटी) चित्रं काढतो असं लिओनार्दोने अर्जात लिहिलं होतं. सुरुवातीला काम मिळेना म्हणून दोन चित्रकार भावांशी भागीदारीत ‘व्हर्जिन ऑफ दी रॉक्स’ (१४८३) हे पाच पॅनल्सचं तैलचित्रं केलं, पण अपेक्षित किंमत न मिळाल्याने ते तसंच राहिलं. मधलं मुख्य १०० १२२ सें. मी.चं पॅनल अर्थातच लिओनार्दोचं. ते मध्यंतरीच्या काळात कुठे कुठे गेलं हे कळायला मार्ग नाही, पण आता लूव्रमध्ये आहे. मूळ चित्रं गायब झाल्याने लिओनार्दोने त्याची प्रतिकृती बनवून दिली होती. नव्यात मॅडोना आणि जीजसच्या मागे प्रभामंडल आहे, पार्श्वभूमीही वेगळी. पण मग मूळ चित्रं सापडलं. पर्वतांतून वाहणारे फेनधवल धबधबे, वर निळय़ा आकाशाची चाहूल, निळय़ा पायघोळ वस्त्रांतील मॅडोना, तिच्या चेहऱ्यावर शांत स्निग्ध भाव, तिचा एक हात (पुढे सेंट जॉन होणाऱ्या) भाच्याभोवती लपेटलेला, छोटासा जीजस त्याला हात उंचावून आश्वस्त करतोय. बाजूला तिची बहीण.
हे करताना तो शिकाऊ कलाकारांसाठी एक कार्यशाळा चालवत होता, आध्यात्मिक विषयांवर आधारित चित्रं काढण्यासाठी. लुदविकोपर्यंत पोहोचायला त्याला तीन वर्ष लागली. त्याला आर्थिक अनिश्चिततेचा कंटाळा आला होता. नियमित उत्पन्नाची नोकरी हवी होती. लिओनार्दोचं एक चित्रं लुदविकोने हंगेरीच्या राजाला भेट म्हणून पाठवलं, त्याची खूप वाहवा झाली आणि दरबारी नोकरी मिळाली. इथे जवळजवळ एक दशक सुख-चैनीत गेलं. यादरम्यान त्यानं नाटकांसाठी वेशभूषा आणि नेपथ्य सांभाळलं, शहरासाठी ड्रेनेजची व्यवस्था आखून दिली आणि डय़ुकसाठी सैन्यप्रमुखाचा नवा शानदार गणवेश बनवून दिला आणि मिळणाऱ्या कामाची चित्रं काढली, जास्त करून पोट्र्रेटस्/ पुराणकथांवर आधारित. लुदविकोच्या आयुष्यातील तिन्ही स्त्रियांची पोट्र्रेटस् करून देण्याचं काम त्याला मिळालं आणि ते त्याने फार सुंदरपणे निभावलं. त्यापैकी ‘ला बेल फेरोनिय’ (६२ ४४) हे लाकडावर काढलेलं तैलचित्र आता लूव्रमध्ये आहे आणि एक क्राकाऊच्या म्युझियममध्ये आहे.
लुदविकोच्या दरबारी असताना त्याला डय़ुकच्या वडिलांचा एक २५ फुटी अश्वारूढ पुतळा ब्रॉन्झमध्ये बनवून देण्याची कामगिरी सोपवली होती. मुख्य म्हणजे तो घोडा आणि घोडेस्वार एकेक सलग तुकडय़ाने बनवायचे होते. हे महाकठीण, वेळखाऊ होतं. पण लिओनार्दोच्या सुदैवाने मिलानवर फ्रेंच आक्रमण झालं आणि ते दीड लाख पौंड वजनाचं ब्रॉन्झ, तोफा बनवायला वापरायचं ठरलं. मिलानच्या पाडावानंतर काही काळ लिओनार्दो तिथेच राहिला आणि त्याने नव्या राजाकडून म्हणजे बाराव्या लुईकडून स्वत:साठी काम मिळवलं. त्या काळात इटलीचं एकीकरण झालेलं नसल्यानं वेगवेगळय़ा शहरांवर वेगवेगळे राज्यकर्ते असत, आपल्या संस्थानिकांसारखे. म्हणून फ्रान्स आणि स्पेन त्यांच्यावर संधी पाहून आक्रमण करत व त्यांचा प्रदेश ताब्यात घेत. लिओनार्दोला राजकारणात मुळीच रस नव्हता, फक्त त्याच्या कलेसाठी जगायचं होतं. कोणा सत्ताधीशाशी किंवा रईस यजमानाशी त्याची बांधिलकी नसे. मिलाननंतर तो मांतूआ, व्हेनिस, फ्लोरेन्स आणि रोमला गेला. इटलीत राजवटी बदलत राहायच्या आणि लिओनार्दोच्या युद्ध, अभियांत्रिकी आणि नकाशा बनवून देणं यांसारख्या विविध कौशल्यांमुळे तो दोन्ही बाजूंना हवा असायचा. स्वत:च्या अस्थिर स्वभावामुळे तो ‘दलबदलू’ ठरला होता. पण त्याला हा आपला दोष वाटत नसे, त्याच्याकडे अशा बेवफाईसाठी कारणं असत. ‘दी लास्ट सपर’ आणि लुदविकोच्या बायकांच्या सरस पोट्र्रेट्समुळे त्याचं नाव झालं होतंच, त्यामुळे जिथे जाईल तिथे त्याला काम मिळायचं आणि प्रवासाच्या संधीही! आता फ्लोरेन्सला स्थायिक व्हावं असं त्याला वाटत होतं. या काळातली त्याची अनेक चित्रं गहाळ झाली आहेत, पण वाचलेल्यांपैकी ‘दि व्हर्जिन अँड चाइल्ड विथ सेंट अॅन अँड दि इन्फन्ट सेंट जॉन दि बॅप्टिस्ट’ (१४१ १०४ सें. मी. चारकोल अँड वॉश विथ चॉक ऑन पेपर, १५०१) आणि ‘मॅडोना ऑफ दी यार्नवाईंडर’ (४८.४ ३७ सें. मी. ऑईल ऑन वॉलनट, १५००) ही दोन चित्रं आता इंग्लंडमधील दोन कला संग्रहालयांत सुरक्षित आहेत. ‘मॅडोना ऑफ दी यार्नवाईंडर’ इतकं प्रसिद्ध झालं की त्याच्या सहा प्रतिकृती लिओनार्दोला स्वत:च कराव्या लागल्या आणि नंतर ही संख्या ३० वर गेली, ज्या त्याने सहकाऱ्यांच्या मदतीने बनवल्या होत्या. हे चित्र म्हणजे लिओनार्दोच्या नव्या तंत्राची सुरुवात होती : ‘स्फुमातो’ म्हणजे अंधाराचं हळूहळू धूसर प्रकाशात बदलणं. त्याच्याच शब्दात सांगायचं तर, ‘वस्तूंच्या बारेखा कधी आखीव-रेखीव स्पष्ट असू नयेत, शॅडोचा परिणाम साधण्यासाठी ब्रशचे फटकारे समांतर दिसू द्यायचे नाहीत आणि त्यातून शॅडोज् आणि रंग एकमेकांत हलकेच मिसळू द्यायचे.’ हे तंत्र तो याहूनही अधिक कौशल्याने नजीकच्याच भविष्यात त्याच्या जगप्रसिद्ध ‘मोनालिसा’ करता वापरणार होता. फ्लोरेन्सच्या सरकारने त्याला कार्यालय आणि घर थाटून दिलं, त्याला भत्ता सुरू केला, लिओनार्दोला मानाने वागवून पदरी ठेवून घेण्याचे हे प्रयत्न होते. या काळात त्याने पुन्हा चित्रं काढायला सुरुवात केली- या वेळी घोडय़ांची, विशेषत: रणधुमाळीतल्या. इथेच १५०४ मध्ये त्याची मायकेलएंजेलोशी भेट झाली. तो लिओनार्दोहून २३ वर्ष लहान, पण उत्कृष्ट शिल्पांमुळे तेवढाच कीर्तिमान. पण त्याची पेंटिंगमधली गती अजून निश्चित ठरायची होती. ग्रेट कौन्सिलच्या भिंतीवर म्यूरल्स करण्यासाठी या दोघांना एकमेकांसमोरच्या भिंती देण्यात आल्या. लिओनार्दोने अंघीआरीच्या लढाईचं समरांगणावरचं दृश्यं रंगवलं, तर मायकेलएंजेलोने स्नान करणारे सैनिक पायसन युद्धवार्तेने गडबडून तयार होत आहेत असं काहीसं. दोघांच्या स्वभावातला फरक चित्रातही उतरलेला.. लिओनार्दोला माणसं आणि त्यांच्या परस्परसंबंधांचं चित्रण करायला आवडे, तर मायकेलएंजेलोने प्रत्येक सैनिक वेगळा आपापल्या संघर्षांत गुंतलेला दाखवलेला. एक मात्र साम्य होतं दोघांत- चंचलपणा! हाती घेतलेलं काम अपुरं सोडून नव्या कामाकडे कूच करणं. दोघांमध्ये तुलना होतच असणार त्यामुळे असुरक्षितता, कदाचित मत्सरही, कारण दोघांच्याही लिखाणांत परस्परांचा उल्लेख सापडत नाही. (क्रमश:)
arundhati.deosthale@gmail.com