मनस्वी अभिनेता आणि परखड माणूस असणाऱ्या एका व्यक्तिमत्त्वाची एकूणच जगण्याविषयीची, समाजस्थितीबद्दलची कळकळीची भाषालिपी या नव्या सदरातून उलगडेल. भवतालाविषयी सजग अन् संवेदनशील असणाऱ्याला कायमच अनेक प्रश्न पडत असतात. नाना पाटेकर यांनाही ते पडतात. त्यांना पडलेले प्रश्न ते यात मांडतीलच; परंतु त्यातूनच त्या प्रश्नांच्या उत्तरांची दिशाही सापडायला मदत होईल. हे सदर शीर्षकाप्रमाणेच अधूनमधून असेल. हा पहिला नमनाचा लेख..
माधवास,
आज उगाचच कारण नसताना पत्र लिहावंसं वाटलं.
फोनवर बोलता येतं, पण मोकळं होता येत नाही.
पत्रातून भळभळता येतं. पुन:पुन्हा वाचता येतं पत्र.
काहीतरी वेगळं गवसतं, वाचता वाचता.
पत्र लिहिणाऱ्याचा चेहरा समोर यायला लागतो-
पूर्वी सिनेमात दाखवायचे तसा.
फोन वन-डायमेन्शनल आहे, पत्र थ्री-डायमेन्शनल वाटतं.
फोन उपचार वाटतो, पत्र दखल वाटते.
आई आणि दाई इतका फरक आहे दोघांत.
पत्र धन आहे, फोन संशोधन आहे.
फोन सोय आहे, पत्र सय आहे.
पत्राला नातं आहे. पत्राला गण आहे, गोत्र आहे.
पत्र नक्षत्र आहे, पत्र व्योम आहे.
क्षितिजावरचा इवलासा पक्षी आहे पत्र,
कागदावर कोरलेली वेरुळची नक्षी आहे पत्र.
नात्याला घातलेली साद आहे पत्र,
उगाचच घातलेला वाद आहे पत्र.
पत्र फुंकर आहे, पत्र झुळूक आहे.
आभाळाला भिडणारी वावटळ आहे पत्र,
कडेकपारीत झुळझुळणारा झरा आहे पत्र.
सीतेला पडलेला मोह आहे,
कालियाचा डोह आहे,
अश्वत्थाम्याची भळभळणारी जखम आहे,
आठवणीच्या झाडावरून अवखळ वाऱ्यानं खुडलेलं पान आहे पत्र.
पत्र छंद आहे, नाद आहे, अंतरीचा निनाद आहे.
ज्ञानाची ओवी, तुक्याचा अभंग, दासाचा श्लोक,
येशूच्या खांद्यावरचा सूळ,
बैलाच्या घंटेची किणकिण,
खारकुंडीचा डोंबारखेळ,
पारंब्यांना लोंबकळणारा उनाड पोर,
संथ पाण्यात तरंग उठवणारा खडा,
आईचा मुका, बाबांचा धपाटा,
केळीच्या सालीवरून घसरणारी फजिती,
सक्काळी गावाजवळून जाणाऱ्या झुकझुक गाडीची घोगरी शीळ,
गुरवानं तळहातावर ठेवलेला बत्तासा,
मनगटावर नात्याला कसून बांधणारा राखीचा दोरा,
एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून शाळेकडे जाणारी पायवाट,
अलिबाबाची गुहा आहे रे पत्र,
बाबांच्या पाठंगुळीला बसलेलं अढळपद आहे पत्र,
बहीण सासरी निघाल्यावर रिते रिते झालेले डोळे आहेत पत्र,
अंगणात आईनं घातलेल्या रांगोळीचं, डोळ्यात पडलेलं प्रतिबिंब आहे पत्र,
अनंताला पडलेला प्रश्न आहे पत्र.
किनाऱ्याच्या ओढीनं काठावर आलेली लाट आहे पत्र,
श्रावणाच्या खांद्यावरची कावड आहे पत्र,
होय-नाहीचं द्वंद्व आहे पत्र,
स्वत:ला शोधण्याचा खेळ आहे पत्र,
टाचा उंचावून फळीवरचा खाऊ चोरण्याचा धिटुकला प्रयत्न आहे पत्र,
पाटीवर लिहिलेलं थुंकीनं पुसणं,
भवतालानं लादलेली घुसमट,
निर्लज्जपणाची कबुली,
नपुंसकत्वाची जाणीव,
गांधारीनं नाकारलेलं सूर्याचं अस्तित्व,
एकलव्याचं प्राक्तन,
विष्णूच्या बेंबीतून डवरलेल्या कमळात बसण्याची इच्छा,
गर्द वनराईला घुसळून टाकणारा वारा,
ठुसठुसणारं नखुरडं,
विवेकाला वटवाघळासारखं उलटं लटकलेलं नाकर्तेपण,
डोंगरावर उभं राहून आकाश झिमटण्याचा प्रयत्न,
रजस्वला द्रौपदीचा दीनवाणा चेहरा,
क्षितिजावर संध्या करणारा दिनकर
सुतळीचा फेटा बांधून सरसर फिरणारा भोवरा,
पोटात नक्षी मिरवणारा बैदुल,
तांबडय़ा मातीवरची बैलाच्या मुताची वेलांटी,
काय काय आहे रे पत्र!
अल्याड पल्याड कुठलीच सीमा नाही.
कुठं कुठं फिरून येता येतं.
पत्र माझा सखा आहे.
पत्र अज़ान आहे, चर्चमधली प्रार्थना आहे,
पत्र म्हणजे बुद्धाच्या डोळ्यांतली करुणा आहे.
पत्राच्या आजूबाजू आहेत
पत्राच्या चारी बाजूंनी फिरता यायला हवं.
एवढय़ाशा कागदात ब्रह्मांड दडलेलं असतं, नाही रे?
निवांत कृष्णाच्या अंगठय़ात रुतणारा बाण आहे पत्र.
आपल्या संस्कारांचं गोत्र आहे पत्र.
भल्याथोरल्या नात्याची आपल्या पायाखाली
आलेली पिटुकली सावली आहे पत्र-
जसजशी सायंकाळ होईल तशी ती मोठी होईल.
आपल्या नात्याला दृष्ट लागू नये म्हणून मी
हल्ली सावलीलासुद्धा तीट लावतो.
पत्राला कारण नाही.
तुझा- नाना
७- २- १३
ताजा कलम : काल मला एक प्रश्न विचारला-
अफझल गुरूला फाशी दिल्याबद्दल तुम्हाला काय वाटते?
आनंद झाला का? एक बाइट हवाय.
मी म्हणालो, ‘त्याने जे केले ते घृणास्पदच होते,
त्याची शिक्षा त्याला मिळाली आणि मिळायलाच हवी होती.
आनंद मात्र झाला नाही.’
आसपासचे आवाज क्षीण ऐकू येताहेत.
पूर्ण धूरकट नाही, पण स्पष्टसुद्धा दिसत नाही काही.
सुन्नपणा आलाय.
प्रश्न पडलाय-
माझ्या देशातल्या या मुलांच्या मनात- मग ते कुठल्याही
धर्म, पंथाचे असोत- असे देशद्रोही विचार का येताहेत?
राजकीयदृष्टय़ा आमचं काही चुकतंय का?
काही धोरणात्मक बदल आवश्यक आहेत का?
असतील तर आम्ही का थांबलो आहोत?
तरुणाईची मानसिकता अशी का होतेय, या प्रश्नाच्या
मुळाला आम्ही का भिडत नाही?
उद्या याच मार्गानं माझा मुलगा गेला तर?
त्याचाही अंत असाच झाल्यावर पुन्हा एक बाइट टीव्हीवर
‘तुमच्या मुलाला फाशी झाली, तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल?’
एका बापाला वाटतं तेच वाटणार.
पुन्हा तोच प्रश्न- आम्ही कुठे कमी पडतोय?
फाशी देऊन प्रश्न संपणार आहेत का?
वय झालेला बाप म्हणून प्रश्न छळताहेत रे.
चुकतंय का रे माझं?
लिहिताना हात थरथरत नसेल तर उत्तर धाड.
तुझीही तब्येत बरी नसते हल्ली.
तुझा- नाना
८- २- १३