– श्रीनिवास बाळकृष्ण
प्रिय मित्रा,
मला माझी देशोदेशीची भटकंती थांबवावी लागणार आहे. अहं, देश संपले नाहीत की मला येणारी आमंत्रणेदेखील संपली नाहीत. गेले वर्षभर सर्वांत भारी देशांतल्या सर्वांत भारी गोष्टी पत्रातून तुझ्यापर्यंत पोहचवल्या आहेत. ज्या ज्या देशात गेलोय तिथं काहीतरी छान दिसतेच. आताही या देशात बोलावलेय. दोनशे डोंगर उतरून एक खाडी आणि समुद्र पार करून महिन्याभरात इथे पोहोचलो. नवीन वर्ष बहुदा इथेच साजरे होईल. या सर्वांत इथे येईस्तोवर माझ्याकडचे सर्व कागद, रंग संपलेत. पेन्सिलही कानात मावेना इतक्या छोट्या झालेल्यात, त्यामुळे मला वाटलं यावेळी तुला चित्र पत्र पाठवताच येणार नाही. या आनंदातच मी इथल्या बाजारात खरेदी करायला गेलो. आयुष्यात पहिला असा बाजार बघितला- जिथे विक्रीवस्तूपेक्षा सर्वांत आकर्षक होती ती वेगवेगळ्या देशातील माणसे. आमच्या काळी दोन डोळे, दोन कान, एक नाक, कपाळ, हनुवटी, डोक्यावर केस असे काही एकत्र केले की झाला चेहरा; पण हल्लीची तुमची पिढी एकमेकांपासून इतकी वेगळ्या चेहऱ्याची आहेत की बास.
वेगवेगळ्या जातीच्या, रंगाच्या मुंग्या लागलेल्या. पूर्ण लाल तोंडाच्या, पूर्ण काळ्या तोंडांच्या, लाल पारदर्शक तोंडाच्या, चॉकलेटी डोके आणि मोठ्या डोळ्याच्या, वेगवेगळे दात आणि वेगवेगळ्या चवीच्या मुंग्या एकाच डब्यात फराळ खाताना मी या दिवाळीत पाहिल्या. तसेच विविधढंगी चेहरे इथे माणसांचेही असतात, हे मात्र इथे पहिल्यांदाच पाहिलं. इथे कुणी लांब चेहऱ्याचे, कुणी गोल गरगरीत, कुणाचे घनदाट केस तर कुणाचे टक्कल. त्यांच्या रंग आणि श्टायलीही वेगळ्या, अळीदार केसांचे गुंते, तर कुणाचे घोड्याच्या शेपटासारखे सरळ. जाडजूड बसलेल्या नाकाचे, तर नाकाच्या जागी जणू चोचच.
हेही वाचा – सांधा बदलताना : जग हे आनंदशाळा
बारीक, मोठे, घारे, काळे, निळे, हिरवे डोळे, त्यांना झाकणारे विचित्र गॉगल, भन्नाट रंगाच्या पापण्या, आत गेलेले गाल, बाहेर आलेले गाल, टोकदार हनुवटी, ताडगोळी हनुवटी… उभट, लांबट, शेंबडे कोरडी नाके… त्यातले केस… हे कमी म्हणून की काय, लोकांनी डोक्यावर टोप्या, हॅट, पगड्या घातलेल्या. काहींनी दाढी- मिशा वाढवलेल्या, कानातल्या लटकत्या दगिन्यांबद्दल तर विचारू नकोस. जगभरात नाजूक, भरड्या चेहऱ्याचे इतके प्रकार असतात? आणि एकमेकांपासून दिसण्यात, बोलण्यात इतके वेगळे असूनही एकत्र चालत होती. चालताना समोर आलेल्यांना अनोळखी लोकांना एकमेकांकडे पाहून डोके झुकवून स्माईल देत होते आणि लगेच पुढे जात होते. खरेदी करताना एकमेकांना बार्गेनिंग करताना मदत करत होते. कुणाच्या दिसण्यावर हसत नव्हते, नजरेत आश्चर्य व्यक्त करत नव्हते. नाक मुरडत नव्हते, त्यामुळे अनोळखी गर्दी गोंधळ असूनही मनात निर्धास्त शांतता होती. या विविधतेत मीच एकटा होतो जो कधीच वेगळा दिसत नाही. मला याचे जाम आश्चर्य वाटले. आमच्याकडे नाय बा असे वेगळे दिसणाऱ्या माणसांना प्रेमाने बघत. कुणी टोपी घातलेली असेल, कुणाची दाढी वाढलेली असेल तर भूत असल्यासारखे वागतात. इतकी वेगळी माणसे आमच्या देशात तरी अलावुडच नाहीत. तर ते असो.
हेही वाचा – आजच्या पुरुषाचे ‘कर्तेपण’
चित्रास कारण की, आता मी रंगाने चित्र काही काढू शकत नाही, पण त्या वेगवेगळ्या चेहऱ्याचे अनुभव मात्र तुला देऊ शकतो. हे फोटो पाहा. कुणासारखा दिसतोय रे हा? तू बघ ओळखलेस हिला? तुझ्या देशातही वेगवेगळ्या चेहऱ्याची माणसे असतात का? असतील तर मला चित्र काढून पाठवशील?
तुझा खासमखास मित्र
श्रीबा
shriba29@gmail.com