आपल्याकडे पंडित नेहरूंनी त्यांची कन्या इंदिरेस लिहिलेल्या पत्रांवरचे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यात भारतीय संस्कृती व जगातील अन्य संस्कृती यांची माहिती पत्ररूपात दिली आहे. पत्र हा आकृतिबंध तसा माणुसकीचा ओलावा असलेला. त्यामुळे या स्वरूपात दिलेली माहिती वाचकांशी जवळीक वाढवणारी असते. अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाचे मानद प्राध्यापक डॉ. एडवर्ड ओ. विल्सन यांच्या ‘लेटर्स टू अ यंग सायंटिस्ट’ या पुस्तकाचा अनुवाद माधुरी शानबाग यांनी केला आहे. या पुस्तकातील पत्रांमध्ये जगातील एक नामवंत कीटकशास्त्रज्ञ त्यांची विज्ञान क्षेत्रातील कारकीर्द कशी घडत गेली, हे सांगता सांगता त्यांच्या संशोधनाचा मूळ विषय असलेल्या मुंगीचे महाभारत उलगडत जाते. मुंगी हा कीटक इवलासा, पण त्याच्या अंगी ज्या नाना कळा असतात, त्याचे दर्शन यातून घडते. विज्ञान क्षेत्रात कारकीर्द करायची म्हणजे गणित आलेच पाहिजे, हा आपल्याकडचा गैरसमज त्यांनी पहिल्याच पत्रात इतक्या सफाईने खोडून काढला आहे, की गणित विषयाची धास्ती घेतलेल्यांना जरा सुखावल्यासारखे निश्चितच वाटेल. दहावीनंतर जेव्हा विज्ञानाचा झेंडा खांद्यावर घ्यायचा की कला क्षेत्राकडे वळायचे, असे प्रश्न पडतात, तेव्हा साहजिकच गणित येत नसेल तर विज्ञान शाखेत जाऊन काही उपयोग नाही. कारण गणिताशिवाय विज्ञानातील कुठल्याच विषयात पुढे जाणे अशक्य असा समज आहे. डॉ. विल्सन यांच्या मते, ज्यांना जुजबी गणित येते ते लोक जीवशास्त्रात त्यांची चांगली कारकीर्द घडवू शकतात. फक्त त्यासाठी आवड पाहिजे. सजीवसृष्टीची रहस्ये उलगडण्याची असोशी असेल तर ही दुनियाही आकाशातील ग्रहगोलांइतकीच अद्भुत आहे, यात शंका नाही. त्यामुळे जीवशास्त्रातील अनेक उपशाखा विद्यार्थ्यांसाठी खुल्या आहेत. डॉ. विल्सन यांचा गुरुमंत्र असा की, अत्यंत यशस्वी गणल्या गेलेल्या संशोधकांमध्ये कितीतरी जण गणितात अगदी जेमतेम होते. गणित येत नाही म्हणून विज्ञानाकडे पाठ फिरवू नका, असा त्यांचा सल्ला आहे. अत्यंत महत्त्वाचे सूत्र त्यांनी सांगितले आहे की, संशोधकाला गणितज्ञाची वा संख्याशास्त्रज्ञांची मदत घेणे नेहमी सोपे असते, पण गणितज्ञ किंवा संख्याशास्त्रज्ञाला त्याची समीकरणे वापरता येतील असे संशोधन करणारा संशोधक भेटणे जवळपास अवघड असते. खुद्द विल्सन यांनी त्यांच्या संशोधनात एका गणितज्ञ विद्यार्थ्यांची मदत घेतल्याचे एका पत्रात म्हटले आहे. जनुकशास्त्र, सजीव नोंदणीशास्त्र (टॅक्सॉनॉमी), जैवभूगोल, भूगर्भशास्त्र अशा असंख्य शाखा गणिताची भीती वाटणाऱ्यांसाठी उपलब्ध आहेत. या शाखांमध्ये संशोधकांची कमतरताही आहे. मग आपण गणिताचा बागुलबुवा करून विज्ञानाचा मार्ग का निवडत नाही, असा त्यांचा प्रश्न आहे. कुठल्याही विद्यार्थ्यांची गणिताची जी समज असेल ती पुरेशी होईल अशी विज्ञानाची एक तरी शाखा अस्तित्वात आहे. त्यात तो नैपुण्य मिळवू शकतो, हे विल्सन यांचे दुसरे सूत्र. डार्विनला गणितात अजिबात रुची नव्हती. त्याने तपशील व नोंदी गोळा केल्या व नंतर त्यात सुसूत्रता आणण्यासाठी गणिताची मदत घेतली गेली. न्यूटनला गुरुत्वाकर्षणाची कल्पना एकदम फळ्यावर गणित मांडून सुचली नाही, ती  झाडावरून खाली पडणाऱ्या सफरचंदावरून सुचली. थोडक्यात, विज्ञानात जे संशोधन झाले ते शुद्ध गणितीय कल्पनांतून झालेले नाही, असे विल्सन यांचे म्हणणे आहे. त्याला प्रतिवाद करणे जवळपास कठीण आहे, कारण  त्यांनी उदाहरणानिशी ते सांगितले आहे. तुमची संशोधन विषयात समर्पणाने काम करण्याची तयारी असेल तर विज्ञानातील जीवशास्त्राशी संबंधित कुठलीही

शाखा निवडण्यास घाबरण्याचे कारण नाही, असे त्यांचे सांगणे आहे.

पृथ्वीवर ७० टक्के पाणी आहे. उरलेली जमीन आहे. महासागरांचा शोध जेवढा घ्यायला पाहिजे तेवढा आपण कधीच घेतलेला नाही. तो घेण्यासाठी संशोधकांची गरज आहे. ग्रीक तत्त्ववेत्ता आर्किमिडीज अंघोळीसाठी टबात बसला असताना, वस्तू कोणत्याही आकाराची असेल तर तिची घनता कशी मोजता येईल याचा विचार करीत होता. वस्तू पाण्यात टाकल्यास तिने विस्थापित केलेल्या पाण्यावरून ती काढता येते ही कल्पना त्याला सुचली व तो युरेका.. युरेका असे ओरडला. यात त्याने कुठलेही गणित आधी केलेले नव्हते.

वैज्ञानिकांना अनेकदा त्यांनी मांडलेल्या नवीन मतांमुळे सामाजिक रोषाला तोंड द्यावे लागते. तसा प्रसंग विल्सन यांच्यावरही आला होता. त्यांच्या ‘सोशिओ बायॉलॉजी: द न्यू सिंथेसिस’ या पुस्तकात त्यांनी आगामी संकटाचे पूर्वसंकेत सजीवांना कळत असतात व त्याचा संबंध जनुकांशी असतो, असे म्हटले होते. त्या वेळी डाव्या विचारांचे लेखकखवळले. त्यांनी हार्वर्ड चौकात निदर्शने केली. विद्यापीठातून डॉ. विल्सन यांना काढण्याची मागणी केली. पण विल्सन यांच्या मते, त्यांनी या वादास बुद्धिवादाने तोंड दिले.  विज्ञान व राजकीय विचारसरणी यांच्यातील वाद इतिहासात नेहमीच रंगले. तसेच एक वादळ त्यांच्या आयुष्यात आले, पण सरतेशेवटी शास्त्रीय संशोधनाचाच विषय झाला आहे याची जाणीव ते करू न देतात. ‘जुरासिक पार्क’ या चित्रपटातील काल्पनिक कथेत विज्ञान कसे मर्यादेबाहेर खेचत नेले आहे, त्याची गंमतही मुळात वाचण्यासारखी आहे, पण त्यांच्या मते, ललित कादंबरीकाराला तसे करण्याची मुभा आहे हेही ते मान्य करतात.

आज सर्वच क्षेत्रांत नीतिमूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. त्यामुळे त्यांनी विज्ञानातील नीतिमूल्यांवरही बोट ठेवले आहे. संशोधक त्यांनी केलेल्या संशोधनाच्या निष्कर्षांबाबत गुप्तता पाळतात. अनेकदा त्यांच्यात स्पर्धाही सुरू होते, कारण संशोधक हा माणूसच असतो. संशोधन करताना आपल्या संशोधनासाठी उपयुक्त ठरलेल्या शोधनिबंधाचा उल्लेख जरूर करा. एखादा तुमचा प्रतिस्पर्धी असेल व त्याचे काम चांगले असेल तर पुरस्कारासाठी किंवा पदासाठी त्याची शिफारस करा, मनातील असूया बाजूला ठेवा. माणसाच्या हातून चुका होतात तशा संशोधकांच्या हातूनही होतात. पण चूक कबूल करा व पुढे चला, असा विल्सन यांचा सल्ला आहे. एखाद्या प्रयोगात निष्क र्ष खात्रीचे वाटत नसतील तर प्रयोग पुन्हा करून पाहा. तुमच्याकडे त्यासाठी वेळ व पैसा नसेल तर ते काम दुसऱ्यावर सोपवा. असे करताना खात्री नसलेली तुमची माहिती तुम्ही प्रकाशित करू शकता, फक्त त्यात तसा उल्लेख करा. दुसरे कुणीतरी त्यावर पुढे काम करू शकते व तुम्हाला त्यात थोडेसे श्रेयही मिळू शकते. न्यूऑर्लिन्समधील कोरी सॉ या तरुण संशोधक मुलीची कथा अशीच वैज्ञानिकांमधील व्यवहार कसे चालतात यावर प्रकाश टाकणारी आहे. ही मुलगी तीन संस्थांमधील कीटकशास्त्रज्ञांनी जगातील मुंग्यांच्या डीएनए क्रमवारीचा जो प्रकल्प हाती घेतला होता, त्यातील एका मुंगीची डीएनए क्रमवारी लावण्याचे काम मागण्यासाठी गेली. ती पीएच.डी. नसल्याने त्यांनी तिला सहभागी करण्यास नकार दिला. नंतर ती विल्सन यांच्याकडे आली. त्यांनी तिला सर्व मदत केली व तिचा संशोधन निबंध सायन्स नियतकालिकात मुखपृष्ठ कथा म्हणून प्रसिद्ध झाला. ती पीएच.डी.सुद्धा झाली. यात विल्सन यांचा दिलदारपणा व नैतिकता पाळण्याचा स्वभाव दिसतो. कुणी आपल्याला नकार दिला तर तो वैयक्तिक आपल्याला नकार आहे असे समजू नये, त्यासाठी आपली कातडी काही वेळा गेंडय़ाची असावी लागते, हे विद्यार्थीदशेपासून आपण शिकलो आहोत असे विल्सन म्हणतात. विल्सन अलाबामा विद्यापीठात शिकत असताना त्यांनी त्यांच्यापेक्षा काही वर्षे पुढे असलेल्या विल्यम. एस. ब्राऊन या कीटकशास्त्रज्ञाशी पत्रमैत्री केली. त्या वेळी अलाबामा परिसरात सापडणाऱ्या सर्व प्रजातींच्या मुंग्यांची नोंद करण्याचा प्रकल्प सुरुवातीला हाती घे, असा सल्ला ब्राऊन यांनी दिला होता. थोडक्यात, तुम्ही कुठलेही क्षेत्र निवडा, तुम्हाला काही चांगली माणसे भेटावी लागतात. यात त्यांनी ब्राऊन यांचे वर्णन शिस्तीबाहेर जाऊन वाटेल तसे कपडे घालणारा, इतर सहकाऱ्यांशी बंधने झुगारून देत मैत्री करणारा, आवडीने बिअर पिणारा असे केले आहे. थोडक्यात, संशोधक म्हणजे कुणी मख्ख चेहऱ्याचा, सतत चिडचिड करणारा असे चित्र नसते. उलट तो जीवनाचा आनंद आपल्यापेक्षाही अधिक समरसतेने घेणारा असतो, हेच दिसून येते.

या पुस्तकात जसे तरुण वैज्ञानिकांना मार्गदर्शन केले आहे तसेच दुसरीकडे मुंगी या विषयावर विल्सन यांनी केलेले अफाट संशोधन अतिशय रंजक पद्धतीने मांडले आहे. त्यांच्या मते, माणूस मुंग्यांसारखे वागला तर तो पंधरा कोटी वर्षे जगेल, कारण तो विक्रम मुंग्यांच्या नावावर आहे. माणूस फार तर चार लाख वर्षे जुना आहे, पण तो मुंग्याइतका काळ टिकू शकणार नाही असे ते सांगतात. त्यांच्या मते, विज्ञान वेगाने पुढे जात असले तरी ऱ्हासही तितक्याच वेगाने होतो आहे. त्यामुळे पृथ्वी फार काळ हे सगळं सांभाळू शकेल अशी स्थिती नाही. मुंग्यांमध्येही सामाजिक उतरंड असते; त्यात राणी मुंगी, कामकरी मुंगी, नर सैनिक अशी कामे वाटलेली असतात. मुंग्या फेरोमोन्समुळे एकमेकांना ओळखतात, त्यांना त्यांचा मार्ग सापडतो. त्यांचेही एक विश्व असते. त्याचे काही नियम विल्सन अगदी बारकाईने या पत्रांमधून सहज सांगतात. मुंग्यांच्या या जगात राणी मुंगीला गर्भवती केल्यानंतर नराने मरून जायचं असतं, असा नियमच आहे. जरी तो न्यायाच्या तत्त्वाला धरून नसला तरीही! राणी मुंगी तिच्या राजमहालात राहात असते. ती फक्त खाते अन् अंडी घालते. बाकी कामकरी मुंग्यांना लैंगिक इच्छाशक्ती दाबून भावा-बहिणींना मोठे करावे लागते. त्यातील काही दुर्मिळ भावंडे पुढे राणी अन् नर मुंगी बनतात व नवी वसाहत स्थापन करतात. कामकरी मुंग्या काम करीत राहतात. सैनिकी मुंग्यांना सशक्त स्नायू असतात व विषारी लाळही असते व त्या सतत युद्धास सज्ज असतात. हा सगळा तपशील आपल्यासारख्या सामान्य माणसाला आश्चर्यचकित करणारा आहे. मुंग्यांमध्येही फॅसिझम असतो. त्यांच्यात दुर्बल, जखमी मुंग्यांना मारलं जातं. इतर मुंग्या त्यांना चक्क खाऊन टाकतात. विल्सन यांच्या मते, मुंग्यांमध्ये अशी काही व्यवस्था असली तरी त्यांचे समूहाने राहणे व इतर अनेक गोष्टींतून शिकण्यासारखे आहे. त्यांच्या प्रयोगशाळेत मुंग्यांचे अनेक नमुने आहेत, त्यांच्यासाठी ते दागिन्यांइतके महत्त्वाचे आहे. भारतातही मुंग्यांच्या अनेक प्रजाती शोधण्यास वाव आहे. हिमालय, पश्चिम घाट, केरळातील जंगल, आसाम येथे अशा अनेक प्रजाती सापडू शकतात, असे विल्सन यांनी अनुवादक शानबाग यांना अमेरिकेत झालेल्या प्रत्यक्ष भेटीत सांगितले. त्यावरून आपल्याकडेही कीटक संशोधनास मोठा वाव आहे हे सहज स्पष्ट होते.

या पुस्तकाचा अनुवाद करताना लेखिकेने काही ठिकाणी एक इंग्रजी, एक मराठी असे शब्द वापरले आहेत. सायन्स या शब्दाला मराठीत शब्द नाही अशातला भाग नाही, पण सगळीकडे सायन्स हा शब्द का वापरला आहे हे समजत नाही. शब्द अवतरणात टाकला की, देवनागरीत इंग्रजी शब्द वापरायला मोकळे असा सगळ्यांचाच एक समज झालेला दिसतो. बायोस्फिअर, एक्सप्लोर्स, हार्मोन, एंझाइम, फेरोमोन्स अणुसमूह (मॉलिक्युल्स) ( येथे रेणूसमूह हवे होते), रँडम पद्धत, म्युटेशन, इकॉलॉजी, इकोसिस्टीम, मॉलिक्युलर बायॉलॉजी (म्हणजे आण्वीय जीवशास्त्र की, रेणवीय जीवशास्त्र), अनप्रॉडक्टिव्ह, सायन्स आणि तंत्रज्ञान, थिअरी, फायर मुंगी नंतर आग्या मुंगी, ब्रेक थ्रू, गॅलॅटिक नकाशे, मॉलुस्क, नेमॅटोड, फोटो सिंथेसिस (याला प्रकाशसंश्लेषण म्हणतात, त्याचे वर्णन करण्याची गरज नाही), वर्ल्ड क्लासिक, सेंद्रिय केमिस्ट्री यासारखी अनेक उदाहरणे या पुस्तकात आहेत; ज्यांना अचूक मराठी शब्द असताना ते वापरलेले नाहीत, त्यांचा वर्णनात्मक अर्थ सांगितला आहे. सायन्स या शब्दाचा प्रत्येक ठिकाणी उल्लेख आहे. काही ठिकाणी एक  इंग्रजी-एक मराठी शब्द आहे. काही वाक्यरचनांतही दोष आहेत. काही शब्दांना मराठी शब्द नाहीत हे मान्य केले तरी जे शब्द आहेत ते वापरायला हवे होते व कंसात इंग्रजी शब्द देता आले असते. अनेक ठिकाणी वापरलेल्या मराठी शब्दांत अचूकता नाही. शब्दांच्या उणिवा सोडल्या तर हे पुस्तक विज्ञान क्षेत्रात कारकीर्द घडवणाऱ्यांसाठी मार्गदर्शक आहे. या मूळ पुस्तकाचा अनुवाद करण्याची कल्पनाही कौतुकास्पद आहे यात शंका नाही.

‘लेटर्स टू अ यंग सायंटिस्ट’-

डॉ. एडवर्ड. ओ. विल्सन

अनुवाद- माधुरी शानभाग

राजहंस प्रकाशन, पुणे</p>

पृष्ठे- १७४,  किंमत-२०० रुपये. ल्ल

Story img Loader